ब्राह्मण धर्म विरुद्ध बौद्ध धर्म संघर्षाचे मूळ आणि विस्तार श्रीधर तिळवे नाईक
अलीकडे कुशावाहा समाजाने अचानक मौर्य वंशावर आपला दावा सांगितला आणि पुन्हा एकदा वैचारिक वाद उफाळला. दोन्ही बाजूंनी युक्तिवाद सुरू झाले याचे कारण असे होते की मौर्य वंशातला अशोक राजा हा बौद्ध धर्माच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा राजा आहे आणि तोच जर का कुशावाहा झाला तर त्यातून निर्माण होणारा परिणाम हा बौद्ध धर्माच्या प्रचाराला क्षती पोहोचवू शकतो असे बौद्धांना वाटते . सर्वसाधारणपणे या वादा मधले अनेक मुद्दे अलीकडे नव बौद्ध लोकांनी महाराष्ट्रामध्ये आयात करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे साहजिकच महाराष्ट्राच्या संदर्भात सुद्धा हा वाद अलीकडे खेळला जाताना दिसतो .
मुळातच आपण हे लक्षात घेतले पाहिजे की हा वाद फार जुना आहे. यासाठी इतिहास पाहिला पाहिजे.
मी हे खूपदा सांगितलेले आहे की भारताचा इतिहास क्रम हा भारताचाच इतिहास क्रम आहे म्हणजे आफ्रिकेत श्रद्धा निर्माण झाली आणि राज्य प्रणाली निर्माण झाली युरोपमध्ये श्रद्धा निर्माण झाली आणि त्यातून ग्रीक तत्त्वज्ञान निर्माण झाले पण युरेशियामध्ये मात्र श्रद्धा निर्माण झाल्यानंतर धर्म निर्माण झाला आणि धर्माच्या आधारे पुढे मग राज्य यंत्रणा निर्माण झाली भारतात मात्र श्रद्धा निर्माण झाल्यानंतर मोक्ष निर्माण झाला आणि नंतर धर्म निर्माण झाला म्हणजेच इतर खंडांच्या पेक्षा मोक्षामुळे आपल्याकडचा क्रम बदललेला आहे. आपण हे लक्षात घेतले पाहिजे आणि हे शैव श्रुतीमुळे घडलेले आहे . म्हणजे झाले असे की भारतामध्ये सर्वात आदिम श्रद्धा होतीच आणि ती मातृसत्ताक होती . वृक्ष, जंगल, पर्वत, नदी वगैरे गोष्टींची पूजा त्यामुळेच केली जात होती . तिला आता आपण शैव श्रद्धा म्हणू शकतो जी पुढे शैव-धर्मामध्ये सामावून घेण्यात आली. या श्रद्धेच्या विरोधात भगवान शंकर यांनी बंड करून मोक्षाचा तिसरा डोळा तिसरा अक्ष म्हणजे मार्ग दाखवला आणि मोक्षासाठी 114 तंत्रे मानव जातीला दिली . मात्र पुढे मोक्ष पुन्हा एकदा काही प्रमाणात बाजूला झाला आणि धर्माचा उदय झाला या धर्माच्या उदयानेच ज्याला आदिवासी आजकाल बडा देव म्हणतात तो देव म्हणून आला . त्याचाच पुढे महादेव झाला .अनेक आदिवासी जमातींच्या मध्ये पेन म्हणजे देव असा अर्थ आहे. जय जोहार ही यांची घोषणा होती . भारतामध्ये आदिवासी राज्य असतानाच भारतीय लोक आदिवासी अवस्थेत असतानाच या धर्माची निर्मिती सुरू झाली होती. पुढे मग त्याला एक व्यवस्थित आकार येत गेला आणि त्यातून आदीशैव धर्म तयार झाला . म्हणजेच भारतामधला क्रम श्रद्धे कडून मोक्ष आणि मोक्षाकडून धर्म असा आहे हे आपण सर्वात प्रथम नीट लक्षात घेतले पाहिजे अन्यथा भारताच्या इतिहासातल्या अनेक गुंतागुंती आपणाला कळत नाही अनेकदा युरोपचे मॉडेल आपण समोर ठेवतो आणि अनेकदा त्यामुळेच श्रद्धेनंतर आपण थेट दर्शनांच्याकडे येतो वास्तविक भारतीय दर्शने ही मोक्षानंतर धर्माने तयार केलेली आहेत . त्यांचा मुख्य आधार तंत्र आहे . दुसरी गोष्ट भारतीय दर्शने ही मोक्ष केंद्र स्वीकारणारी आहेत अपवाद फक्त लोकायत दर्शन आहे हे दर्शन मोक्षही नाकारते आणि धर्म ही नाकारते आणि कम्युनिस्टांच्या मुळे या दर्शनाला पुन्हा एकदा बळ प्राप्त झाले. तेव्हा आपल्याकडची इतिहास आणि दर्शन मीमांसा करताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपली दर्शने म्हणजे तत्त्वज्ञान नव्हे. तत्त्वज्ञान हे नेहमी तत्व जाणण्याचा प्रयत्न करते . जग जाणण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे विज्ञानाला वाव मिळतो दर्शनांच्यामध्ये अशाप्रकारे विज्ञानाला वाव नाही . तत्त्वज्ञान मोक्ष मिळवण्याचा प्रयत्न करत नाही . अगदी ग्रीक परंपरेमध्ये सुद्धा पायथागोरस आणि हेराक्लिटसबाबत त्यांचा कल हा मोक्षाकडे होता असे सांगितले जाते प्रत्यक्ष लिखाणांमध्ये त्याचे अंश मिळतात पण संपूर्ण पुरावा मिळत नाही याचे एकमेव कारण म्हणजे यांच्यापैकी कोणीही मोक्षाला पोचलेला नाही .(याबाबतीत ओशो रजनीश्याने प्रचंड थापा मारल्या आहेत त्या आपण स्वीकारू नयेत त्यांना युरोपियन लोकांना स्वतःकडे खेचायचे होते म्हणून हे खोटे अवडंबर त्यांनी निर्माण केले ) या तत्त्वज्ञानाचा आणि त्याच्या आधी असलेल्या ग्रीक श्रद्धेचा परिणाम थेट रोमन संस्कृतीवर झालेला आहे कारण रोमन संस्कृतीला त्यामुळेच मोक्ष स्वीकारण्याची गरज भासली नाही आणि म्हणूनच आपणाला रोमन कॅथोलिक धर्मामध्ये मोक्ष दिसत नाही .
भारतात जे युरेशियन लोक आले त्यांच्या बाबतीत हा भारतीय क्रम निर्माण झालेला दिसतो याबाबतीत ते आपल्या युरोशियन परंपरेपासून पूर्णपणे तुटलेले दिसतात त्यामुळेच ते एका अर्थाने युरो इंडियन आहेत . ते स्वतः बरोबर वैदिक श्रद्धा घेऊन या देशात आले ही वस्तुस्थिती . पण ते इथेच थांबले नाहीत त्यांनी आपल्या श्रद्धेमध्ये भारतीय भूगोल मिसळला आणि ऋग्वेद हा भारतीय आणि अ भारतीय अशा दोन्ही प्रकारच्या भूगोलामध्ये वाढलेला आहे. कालांतराने या वैदिक श्रद्धेने इथल्या लोकांशी संपर्क प्रस्थापित करून सांस्कृतिक सरमिसळ सुरू केली पंजाबराव देशमुख यांच्या मते या लोकांच्याकडे स्त्रिया नसल्यामुळे त्यांनी ही घुसळण सुरू केली कारण वंश सातत्यासाठी त्यांची ही गरज होती. सहाजिकच हळूहळू आपोआपच शैव श्रुतीने निर्माण केलेल्या मोक्षाकडे ही वैदिक श्रद्धा आकर्षली गेली इतकेच नव्हे तर तिने मोक्ष एक पुरुषार्थ म्हणून स्वीकारला आणि नंतर तर त्याचा मुख्य पुरुषार्थ म्हणून सुद्धा स्वीकार केला हा युरेशियन लोकांच्या मधला भारतीय पद्धतीने भारतात झालेला बदल आहे आणि म्हणूनच जेव्हा कोणी युरेशियन लोकांना हाकलून देण्याची गोष्ट करतो तेव्हा मी ती स्वीकारत नाही माझा त्याला ठाम नकार आहे कारण हे लोक शेवटी इथे आल्यानंतर इंडियन झालेले आहेत. त्यांचे जेनेटिक कोड सुद्धा आता इंडियन झालेले दिसते. त्यामुळेच आपणाला अशी गोष्ट दिसते की मोक्षाकडे जाणारे षष्ठीतंत्र स्वीकारलेल्या कपिलाच्या दर्शनामुळे नंतर युरेशियन लोकांनी सांख्य धर्म तयार केला तर देवगणामध्ये प्रचलित असलेले ब्रह्म तंत्र स्वीकारून त्यातूनच मग ब्रह्मधर्म तयार झालेला दिसतो . सांख्य धर्म आणि ब्रह्म धर्म यांच्या संकरातून ज्याला वैदिक श्रुती म्हणता येईल ती तयार झालेली आहे . यालाच वेदांत धर्म असे सुद्धा नंतर आद्य शंकराचार्य यांनी नाव दिलेले दिसते . याचे कारण या मोक्षाने वेदांचा अंत घडवला वैदिक श्रद्धेचा अंत घडवला आणि मोक्ष हा पुरुषार्थ केंद्रस्थानी आणला . त्यामुळेच उपनिषदांचे जे प्रकार होतात त्यामध्ये प्रामुख्याने १ ब्रह्मकेंद्री म्हणजेच ब्रह्म आणि माया स्वीकारणारी उपनिषदे २ सांख्यकेंद्री उपनिषदे म्हणजेच पुरुष आणि प्रकृती स्वीकारणारी उपनिषदे ३ ब्रह्म सांख्य केंद्री उपनिषदे यामध्ये प्रामुख्याने ब्रह्म धर्म आणि सांख्य धर्म या दोघांची सांगड घातलेली दिसते . यांच्याच आधारे पुढे वेदांत निर्माण झालेला दिसतो.
या दोन्हींच्या मधून म्हणजेच वैदिक श्रद्धा आणि वेदांत यांचा आधार घेत युरेशियन श्रुतीतला कायदे देणारा पहिला धर्म अवतरलेला दिसतो तो म्हणजे ब्राह्मण धर्म होय . हा धर्म ब्राह्मणांनी निर्माण केला म्हणून त्याला ब्राह्मण धर्म म्हणतात . गौतम बुद्धाच्या काळामध्ये हा ब्राह्मण धर्म सर्वाधिक प्रचलित झालेला होता. ब्राह्मण धर्माला काही झाले तरी यज्ञ संस्था शाबूत ठेवायची होती म्हणजेच वैदिक श्रद्धा शाबूत ठेवायची होती पण त्याचबरोबर वेदांतातील मोक्ष सुद्धा आता त्यांना हवा होता. त्यामुळे एकीकडे जन्मदत्त वर्ण व्यवस्थेचे वर्चस्व ठेवायचे आणि दुसरीकडे मोक्षाकडे नेण्याची वाट ओपन ठेवायची असे धोरण ब्राह्मण धर्माने स्वीकारलेले दिसते. गौतम बुद्धाने यातील वर्ण जातव्यवस्थेला आणि यज्ञ संस्थेला ठाम नकार दिलेला दिसतो. आणि त्यामुळेच मग ब्राह्मणधर्म विरुद्ध बौद्ध धर्म असा संघर्ष निर्माण झालेला दिसतो. बौद्ध साहित्यामध्ये त्यामुळेच विरोधक म्हणून प्रामुख्याने ब्राह्मण धर्माचा उल्लेख आहे याचे कारण बौद्ध धर्माला सर्वाधिक विरोध ब्राह्मण धर्माचा होता कारण तो यज्ञ संस्था नाकारत होता आणि त्याचबरोबर जन्मदत्त वर्ण व्यवस्था ही नाकारत होता . या काळामध्ये शैव धर्म हा नाथ धर्म , लोकधर्म पशुपत धर्म या नावांनी प्रचलित होता . सुरुवातीच्या काळामध्ये बौद्ध धर्माचा सर्व संघर्ष हा मगध आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्रामध्ये झाल्याने साहजिकच तिथल्या संस्कृतीचा सखोल परिणाम बौद्ध धर्मावर झालेला दिसतो . खुद्द बुद्धाने सुद्धा आपण अनुशासन निर्माण करत आहोत शिस्त निर्माण करत आहोत अशी शैव भाषा वापरलेली आहे . शेवटी त्याने याला धम्म असे नाव दिले . त्याने स्वतःच धम्म हा शब्द वापरला होता की नंतरच्या बौद्ध संगीतीने ब्राह्मण धर्माला शह देण्यासाठी तो वापरला हा एक फार मोठा प्रश्न आहे. याचे कारण या काळामध्ये बौद्ध धर्माचे मुख्य उद्दिष्ट ब्राह्मणधर्म पूर्णपणे रिप्लेस करणे होता . आता ब्राह्मण धर्माला ही रिप्लेसमेंट मान्य नव्हती त्यामुळे साहजिकच ब्राह्मण वर्गाने आणि धर्माने बौद्ध धर्माला अत्यंत निकराचा विरोध केला कारण त्यांना हे कळून चुकले होते की आता एक तर आपण ब्राह्मण धर्म म्हणून जिवंत राहू किंवा सगळा आर्य लोकांचा प्रदेश बौद्धमय होणे अटळ आहे. ब्राह्मणधर्म विरुद्ध बौद्ध धर्म यांच्यातील संघर्षाचे मूळ हे इथे आहे. मात्र गौतम बुद्धाने गुलामगिरीला विरोध केला होता का हा एक फार मोठा प्रश्न आहे कारण एकदाच गुलामाचा उल्लेख आला आहे आणि त्याबाबतीत गौतम बुद्धाने तू तुझ्या मालकाची परमिशन घेऊन ये असे त्याला सांगितलेले आहे. आता याला गुलामगिरीला गौतम बुद्धाने मान्यता दिली असे मानायचे की नाही असा हा प्रश्न आहे याशिवाय गौतम बुद्ध बुद्ध होण्यापूर्वी त्याच्या महालामध्ये अनेक दास दासी होत्या असाच उल्लेख आहे. त्यांची सुटका करा असे काही नंतर आपल्या बापाला भेटल्यानंतर बुद्धाने सांगितलेले दिसत नाही. किंबहुना दास्य मुक्तीचा कसलाही उपदेश आपणाला गौतम बुद्धाच्या मूळ उपदेशात दिसत नाही . मात्र जन्मदत्त असलेल्या वर्ण जातीला मात्र त्याचा विरोध आहे . पण गुलाम असलेल्या माणसाला जी मुले होतात ती गुलामच राहतात की नाही याचा पुरेसा बोध आपणाला होत नाही. किंबहुना या संदर्भामध्ये गौतम बुद्धाने फार काही मौलिक विधान केलेले दिसत नाही कदाचित त्या काळामध्ये गुलामगिरीची प्रथा पूर्ण पणे प्रस्थापित झाली नसावी. शरद पाटील यांच्या मते गौतम बुद्धाने गुलामगिरीला मान्यता दिली होती पण नवयानी विचारवंत लोकांच्या पैकी काही लोकांनी याबाबत शरद पाटील चुकलेत असा दावा केला होता . पण या सर्व वादावरून एक गोष्ट निश्चित होते ती म्हणजे वर्ण व्यवस्था म्हणजे दासव्यवस्था नव्हे . वर्ण व्यवस्था ही एक धार्मिक व्यवस्था आहे तर दास व्यवस्था ही एक आर्थिक व्यवस्था आहे . जोपर्यंत ही मूलभूत गोष्ट आपणाला कळत नाही तोपर्यंत मोठा गोंधळ उडत राहणार जसा बाबासाहेब आंबेडकरांचा उडालेला होता. नंतर मात्र अस्पृश्यांना संपूर्णपणे गुलाम म्हणजेच दास करण्यात आले ही वस्तुस्थिती आहे आणि पुढे पुढे इसवीसन १००० नंतर वैष्णव धर्म एक प्रस्थापित धर्म म्हणून उदय झाल्यानंतर शूद्रांना सुद्धा दासाचा दर्जा दिलेला दिसतो. उदाहरणार्थ संत जनाबाई यांच्या अभंगांमध्ये आपणाला ती अनेकदा दासी आहे हे स्पष्ट दिसते पण दासी याचा अर्थ शूद्र होतो का असा प्रश्न निर्माण होतो आणि पुन्हा एकदा दासव्यवस्था ही धार्मिक व्यवस्था होती की सामाजिक व्यवस्था होती की आर्थिक व्यवस्था होती असा प्रश्न निर्माण होतो. कारण खुद्द नामदेव हा या वर्णव्यवस्थेमध्ये शूद्र वर्णांमध्ये येतो पण तरीही त्याने बहुदा घर काम करण्यासाठी दासी ठेवलेली आहे . या काळात किमान सर्व शूद्रांना जन्मदत्त दास बनवण्याचा प्रयत्न झाला किंवा त्या दिशेने प्रयत्न केले गेले असे स्पष्ट दिसते. पण नामदेव असा स्वतःला दास समजताना दिसत नाही. तुकाराम मात्र स्वतःचा उल्लेख अनेकदा शूद्र असा करताना दिसतात .
याचा अर्थ स्पष्ट आहे शूद्र म्हणजे दास नव्हे पण नंतर मात्र तसा अर्थ झालेला आहे याचे कारण ब्राह्मण धर्माने गुलामगिरी निर्माण केली नसावी किंवा केले असेल तर त्यांनी ती स्वतंत्र अर्थव्यवस्थेचा भाग म्हणून केलेली असावी पण वैष्णव धर्माने मात्र गुलामगिरी नक्की निर्माण केलेली आहे आणि त्याचे अनेक पुरावे आपणाला मिळतात. वैष्णव धर्मानंतरच अस्पृश्यता आलेली आहे . ही एक अत्यंत अमानुष जन्मदत्त दासव्यवस्था आहे हे आता आपणाला स्वीकारावे लागते म्हणूनच आज सुद्धा तुच्छतेने त्यांचा उल्लेख करणारे अनेक लोक दिसतात या लोकांना आपल्या वर्णाचा माज सुद्धा दिसतो. साहजिकच यामुळे दुःखी झालेले व्यथेत झालेले जे विचारवंत आहेत ते आता ब्राह्मण धर्मावर तुटून पडताना दिसतात . पण यातून दुसरे टोक निर्माण झालेले दिसते ते म्हणजे ब्राह्मण धर्माचे जे काही आहे ते सर्व बौद्ध धर्म निर्माण झाल्यानंतर निर्माण झालेले आहे अशी मांडणी करणे साहजिकच ब्राह्मण धर्मातले लोक याचा निकराने विरोध करताना दिसतात. त्यांच्या मते जर का बौद्ध धर्म ब्राह्मण धर्माच्या आधी निर्माण झाला होता तर मग गौतम बुद्ध नेमका कशाला विरोध करतो आहे ? एकीकडे तुम्ही असे म्हणता की गौतम बुद्धाने यज्ञा मधल्या हिंसेला विरोध केला हिंसेला विरोध केला आणि दुसरीकडे तुम्ही म्हणता की यज्ञ संस्था नंतर निर्माण झाली आता यामधला परस्पर विरोध उघडच आहे . त्यामुळेच वस्तुस्थिती अशी आहे की ब्राह्मणधर्म बौद्ध धर्माच्या आधी निर्माण झाला आणि तसे पुरावे खुद्द बौद्ध साहित्यामध्येच प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. अगदी शुद्ध मानल्या जाणाऱ्या थैर साहित्यात सुद्धा आपणाला ब्राह्मण लोकांच्या अनेक गोष्टींचा उल्लेख दिसतो . काही झाले तरी ब्राह्मण धर्माचा अपमान करायचा असे ठरलेले दिसते. ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे परंतु ही प्रक्रिया पार पाडताना इतिहासाचा इतका आपलाप का करावासा वाटतो ? खरे तर अस्पृश्यता ही काही ब्राह्मण धर्माने निर्माण केलेली नाही ती वैष्णव धर्माने निर्माण केलेली गोष्ट आहे आणि म्हणूनच वैष्णव धर्म यांना सवर्ण हा दर्जा देत नाही म्हणजेच एका अर्थाने अस्पृश्यांना तो वर्ण व्यवस्थेच्या बाहेर ठेवतो अवर्ण मानतो पण तो असे बाहेर का ठेवतो याचे कारण स्पष्ट आहे कारण हे लोक मुळातच ब्राह्मण धर्म संस्थेचा भाग नाही मात्र ते ब्राह्मण अर्थ संस्थेचा भाग आहेत आणि त्यांचा दर्जा गुलाम असा आहे. आता गुलामगिरी देणाऱ्या कुठल्याही व्यवस्थेला गुलाम लोक विरोध करणारच तो त्यांनी करायलाच हवा पण हा विरोध करताना शत्रू कोण हे सुद्धा जर तुम्हाला कळत नसेल तर कठीणच आहे. ब्राह्मणधर्म विरुद्ध बौद्ध धर्म या वादामध्ये अनेक ब्राह्मणांनी नंतर बौद्ध धर्म स्वीकारलेला दिसतो . गौतम बुद्धाचे सुरुवातीचे शिष्य तर सरळ सरळ वैश्य किंवा वाणीपणी होते कारण तो त्यांच्यातूनच म्हणजे खतीय समाजातून आलेला होता. तेव्हा सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे अस्पृश्यता ही वर्ण व्यवस्थेचा भाग नाही अस्पृश्य लोक अवर्ण मानले गेलेले आहेत. याचे कारण स्पष्ट आहे ते म्हणजे या लोकांना वर्ण व्यवस्थेमध्ये त्यांना जागा द्यायची नव्हती आणि म्हणूनच मग सवर्ण विरुद्ध अवर्ण अशा प्रकारचा भेद नंतर वैष्णव धर्माने निर्माण केलेला आहे . अशा प्रकारचा भेद आपणाला वेदांमध्ये आढळतो का ? तर वेदांच्या मध्ये अस्पृश्यतेचा उल्लेख नाही आणि जे पुरुष सूक्त आलेले आहे ते नंतर घुसवण्यात आलेले असून सुद्धा त्यामध्ये सुद्धा चारच वर्णांचा उल्लेख आहे . अस्पृश्यता हा पंचम वर्ण आहे ही संकल्पना नंतरच्या काळामध्ये वैष्णव आणि जैन धर्माने डेव्हलप केलेली आहे . याचे कारण या दोन्ही लोकांना शेती करण्यासाठी दास लोकांची गरज होती श्रमिक कामे करण्यासाठी दास लोकांची गरज होती. पुढे पुढे मग संपूर्ण शूद्र समाज या लोकांनी दास समाज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. महात्मा गांधी सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये जैन वैष्णव लोकांच्या प्रभावाखाली येऊन अस्पृश्यांचा उल्लेख पंचम असाच करत होते . मुस्लिम लोक प्रथम व्यापारी म्हणून आले आणि तिथूनच व्यापार शेती इतकाच महत्त्वाचा बनत गेला कारण अरब व्यापारी होते इस्लाम हा प्रामुख्याने व्यापारी लोकांचा धर्म आहे . त्यांचा प्रेषित सुद्धा मूळचा व्यापारी आहे . साहजिकच त्यांच्यापासून जैन हे सुद्धा प्रामुख्याने वैश्य असल्याने अथवा बनल्याने गुलामगिरीला मान्यता द्यायला शिकले आणि त्यातूनच पंचम वर्ण हा तयार झाला इस्लामचा झालेला हा निगेटिव्ह परिणाम आहे कारण इस्लाम मुळेच भारतामध्ये गुलामगिरीला अधिकृत मान्यता मिळाली आणि मुख्य म्हणजे प्रथमच तिच्या मागे इतक्या मोठ्या ताकतीने शासन संस्था उभी राहिली . माझा इस्लामला विरोध असण्याची जी काही कारणे आहेत त्यामध्ये इस्लाममुळे जगभर पसरलेली गुलामगिरी हे एक कारण आहे. रोमन लोकांच्या काळात ती पूर्वी होती परंतु तिचे जे नंतरचे अमानुष भयावह स्वरूप आहे ते इस्लाम मुळे आहे .याची सुरुवात अर्थातच रोमन लोकांनी आणि पुढे रोमन कॅथोलिक धर्माने केली होती. ( या लोकांनी आम्ही ही सुरुवात केली नव्हती हे सिद्ध करण्यासाठी म्हणून इजिप्त मध्ये पिरॅमिड बांधताना गुलामगिरी होती असे पोकळ ऐतिहासिक प्रचार केले होते आता हळूहळू हे स्पष्ट होते आहे की हा केवळ युरोपियन लोकांचा प्रचार होता मुळात जुडाईक धर्मामध्येच गुलामगिरी मान्य आहे किंबहुना राजे लोकांनी धर्म स्वीकारण्याचे सर्वात मोठे कारण गुलामगिरीला जवळजवळ सर्वच धर्मांनी दिलेली मान्यता आहे. अपवाद फक्त शैवधर्म आहेत .)
त्यामुळे अस्पृश्य हे दास होते गुलाम होते हीच वस्तुस्थिती आहे पण ही जी व्यवस्था आहे ती गुलामगिरीची व्यवस्था आहे आणि गुलामगिरीच्या व्यवस्थेला सर्वच धर्मांचा पाठिंबा असतो त्याप्रमाणे भारतात सुद्धा या गुलामगिरीच्या पद्धतीला धर्मांचा पाठिंबा मिळालेला दिसतो विशेषत: युरोशियन धर्म पाठिंबा देताना दिसतात. अगदी वेदांच्या मध्ये सुद्धा आपणाला गुलामगिरी दिसते आणि ब्राह्मण सुद्धा वस्तू म्हणून विकले गेलेले एका कथेमध्ये दिसतात खुद्द राजा सुद्धा विक्री वस्तू झालेला आहे खुद्द महाभारतामध्ये सुद्धा पांडवांना दास केले गेलेले आहे . आणि द्रौपदीचा जो मूलभूत प्रश्न आहे तो हाच होता की जो आधीच गुलाम झालेला आहे त्याला स्वतंत्र असलेली स्त्री जी गुलाम झालेली नाही तिला पणाला लावता येते का आणि या प्रश्नाचे उत्तर स्पष्टपणे नाही असे आहे . त्यामुळेच तो सगळा प्रकार संपूर्णपणे अनैतिक आहे कारण काही झाले तरी यामध्ये अगदी त्याकाळचे गुलामगिरीचे नियम मान्य केले तरीसुद्धा द्रौपदीला गुलाम करता येत नाही कारण कुठल्याही गुलामाला दासाला तो जर स्वतःच दास झाला असेल तर पणाला लावता येत नाही कारण ती स्वतंत्र असते. येथे पुन्हा एक नियम येतो तो म्हणजे गुलामाची पत्नी आणि त्याची मुले ही सुद्धा जन्मदत्त पद्धतीने गुलाम होतात की नाही आणि कळत नकळत दुर्योधन इथे अशा पद्धतीने गुलाम होतात असे मानताना दिसतो म्हणजेच गुलामगिरीचे दोन नियम इथे एकमेकाला टक्करताना दिसतात म्हणजे एक नियम असे सांगतो की गुलामाचे कुटुंब सुद्धा गुलामच म्हणजे त्याची पत्नी आणि त्याची मुले गुलामच हा पुरुष सत्ताक नियम आहे हे तर उघडच आहे आणि हा प्रामुख्याने युरेशियन नियम होता त्या उलट दुसरा नियम सांगतो की दास असलेला मनुष्य जुगारासारख्या खेळामध्ये स्वतंत्र व्यक्तीला पणाला लावू शकत नाही आणि द्रौपदीचा युक्तिवाद हाच आहे . माझे स्पष्ट मत असे आहे की मुळात अशा तऱ्हेने जुगार खेळणे हाच मूर्खपणा आहे. त्याच्याही पुढे जाऊन जुगारांमध्ये स्वतःला आणि स्वतःच्या भावांना पणाला लावणे हा त्या पुढचा मूर्ख पण आहे . दुर्योधनचा युक्तिवाद असा आहे की जर स्वतंत्र व्यक्ती पणाला लावता येत नसेल तर मग युधिष्ठराने त्याचे स्वतंत्र असलेले भाऊ का पणाला लावले ? म्हणजेच इथे जो नियम केला गेलेला आहे तो मी केलेला नाही तर तो युधिष्ठराने स्वतःच केलेला आहे . जर स्वतंत्र असलेले भाऊ पणाला लावले गेले असतील तर बायको सुद्धा त्याच नियमानुसार पणाला लावली गेली आणि आम्ही ती जिंकली हा त्याचा युक्तिवाद आहे. त्याच्या या युक्तिवादा पुढे सर्व निष्प्रभ झालेले आहेत. त्यामुळेच या सभेमध्ये भीष्म असो किंवा द्रोणाचार्य असो गप्प झालेले दिसतात कारण त्या पुढचा युक्तिवाद कोणाला सुचलेला नाही आणि हा युक्तिवाद दुर्योधनाच्या पक्षाने जिंकला धृतराष्ट्रांपुढे यातून मग मधला मार्ग काढण्याचा पेज प्रसंग निर्माण झाला पुढे मग मार्ग काढला गेला तो म्हणजे एका मर्यादित काळा पुरते अरण्यवास आणि वनवास भोगायला लावणे. जर दुर्योधन खूपच वाईट असता तर त्याने आयुष्यभर या लोकांना गुलाम म्हणून ठेवले असते पण त्याने तसे केलेले नाही कारण त्याला तसे या म्हाताऱ्या लोकांनी करू दिलेले नाही कळत नकळत इथे बुजुर्ग लोकांनी एक मध्यम मार्ग काढला आणि त्यामुळेच पुढचे युद्ध करणे पांडवांना शक्य झाले आणि म्हणूनच दुर्योधन कायमच आपल्या वृद्ध लोकांचा अपमान करताना दिसतो कारण त्यांनीच त्याच्यापुढे ही अजिबो गरीब सिच्युएशन निर्माण केली असे त्याला वाटत होते . मात्र या सगळ्या प्रकारामधून वैष्णव धर्माला गुलामगिरी आणि जुगार दोन्ही मान्य आहेत हे स्पष्ट दिसते. महाभारत ही वैष्णव लोकांची स्मृती म्हणजे कायदे संहिता आहे त्यामुळे हा नियम महाभारत या स्मृतीनुसार सिद्ध होतो. याच ग्रंथाचा गीता हा सुद्धा तो भाग आहे जो हिंदूंचा कोर्टातला धर्मग्रंथ आहे. त्यामुळे हिंदूंना सुद्धा रामायण महाभारत प्रमाण आहे. ब्रह्मसूत्रे , उपनिषदे म्हणजेच वेदांत , मनुस्मृति ,रामायण आणि महाभारत त्यामधील गीता ही वैष्णव धर्माची प्रस्थान पंचमी आहे.
त्यामुळेच नव बौद्ध लोकांना यापुढे संघर्ष करायचा असेल तर त्यांनी तो वैष्णव धर्माशी करायला हवा कारण अस्पृश्यता ही वैष्णव धर्माने निर्माण केलेली आहे ब्राह्मण धर्माने नाही. त्याचे बीज मात्र नक्कीच ब्राह्मणधर्माने जन्मदत्त वर्ण व्यवस्था स्वीकारून घातलेले आहे पण ब्राह्मण धर्माने वर्ण निर्माण केलेले आहेत आणि अस्पृश्यता वर्ण व्यवस्थेच्या बाहेर असलेली दास व्यवस्था म्हणजेच गुलामगिरी आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे हा जो संघर्ष आहे तो मुळात वैष्णव धर्म विरुद्ध बौद्ध धर्म असा आता झाला पाहिजे पण तसा तो होत नाही याचे कारण बौद्ध धर्मातले बहुतांशी लोक हे जुन्या बौद्ध इतिहासामध्ये अडकून आहेत त्यांना असे वाटते की ते क्षत्रिय आहेत आणि त्यामुळेच क्षत्रिय लोकांनी (महाराष्ट्रात मराठा लोकांनी) घराबाहेर हाकलून दिलेला भाऊ म्हणून ते स्वतःला बघतात . कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आपण क्षत्रिय होतो असे त्यांना सांगितलेले आहे तसे त्यांची मांडणी आहे त्यामुळे वैष्णव धर्माशी तडजोड करण्यामध्ये त्यांना काहीही वाटत नाही पण त्यामुळे पेच प्रसंग सुटत नाही कारण या लोकांनी कितीही स्वतःला क्षत्रिय मानले तरी खुद्द बहुसंख्य क्षत्रिय त्यांना स्वीकारायला तयार नाहीत.
बौद्ध धर्मामधल्या लोकांना असे वाटते की अस्पृश्यता ही खूप प्राचीन गोष्ट आहे . प्रत्यक्षामध्ये ती इतकी प्राचीन नाही तिचा मुख्य प्रभाव काल हा वैष्णव काळ आहे म्हणजेच इसवी सन ७०० पासून तिची सुरुवात झालेली आहे. गौतम बुद्धाला अस्पृश्यता माहीत होती असे वाटत नाही मात्र त्याच्या कालखंडामध्येच गुलामगिरीचा उदय होऊन ती प्रस्थापित झालेली होती कारण शेतीला लागणारे काम करण्यासाठी म्हणून जिंकले गेलेले सर्व लोक दास म्हणून ठेवण्याची प्रथा जगभरात या काळामध्ये प्रचलित झालेली दिसते. नवीन कृषी व्यवस्थेची ही गरज होती असे सुद्धा काही जण मानत असतात .(विशेषतः मार्क्सवादी लोक) माझ्या मते यात काही तथ्य नाही कारण या लोकांना सेवक म्हणून सुद्धा ठेवता येते . त्यांना वेतन देता येते . शैव लोकांनी हा पर्याय निवडलेला होता . पण हा पर्याय निवडण्या ऐवजी गुलामगिरीचा पर्याय निवडला गेला कारण तो सर्वात स्वस्त पर्याय आहे आणि मुख्य म्हणजे त्यामध्ये गुलाम लोकांच्या स्त्रिया उपभोगण्याचे उद्योग उपलब्ध आहेत . त्यामुळे जगभरामध्ये प्रस्थापित लोकांनी गुलामगिरीला उत्तेजनच दिलेले दिसते. फुकटचे श्रम म्हणजेच अर्थ आणि फुकटचा काम अशा दोन्ही गोष्टी त्यामध्ये साधलेल्या दिसतात . हे लोक मोक्षाकडे वळतील आणि स्वतंत्र होतील अशी भीती असल्याने साहजिकच ब्राह्मण धर्माने आणि पुढे वैष्णव धर्माने अस्पृश्यांना मोक्षाची साधना करायला सुद्धा मनाई केली शम्बुकाची कथा ही त्यामुळे आलेली आहे आणि रामाने ब्राह्मण लोकांच्या सांगण्यावरून मोक्ष मिळवण्याची तपश्चर्या करतो म्हणून शंभुकाची हत्या केलेली आहे . ही कथा वैष्णवांची मांडणी आहे ती तशी का केली गेली याचे कारण सांगण्याची गरजच नाही कारण शुद्रांना गुलाम करण्याची कथा म्हणजे ही कथा होय . त्यांनी काही केल्या मोक्षाकडे वळता कामा नये म्हणून करण्यात आलेली ही तजवीज आहे . गुलामांना अर्थ काम मोक्ष आणि धर्म या चारही पुरुषार्थांच्या पासून वंचित ठेवणे यामध्ये साधलेले दिसते. जगामध्ये इतरत्र कुठेही अशा प्रकारची त्या टोकाची वंचितगिरी करणारी गुलामगिरी अस्तित्वात असलेली दिसत नाही. अलीकडे अशी व्यवस्था नव्हती अशा प्रकारचे युक्तिवाद ब्राह्मण धर्मातले लोक करत आहेत. आणि हे संताप जनक आहे . साहजिकच अस्पृश्यांच्या कडून त्याला मग त्याच भाषेत प्रत्युत्तर मिळते . हे असे इतिहासाचे खोटे मजले निर्माण करून पापा पासून मुक्तता मिळवायची युक्ती फार कामाला येणार नाही . त्यापेक्षा जे काही केले त्याबद्दल क्षमा मागावी आणि पुढे सरकावे निघावे हेच बरे. इंग्रजांच्या काळामध्ये आणि नंतर काँग्रेसच्या काळामध्ये ब्राह्मण हे करत होते परंतु नंतर अचानक विशेषत: अलीकडे याबद्दल पश्चाताप दूर राहू दे उलट आम्ही असे काही केलेच नाही असे सांगण्याची टूम बळवलेली दिसते . खरे तर या संदर्भात भागवत यांनी स्पष्टपणे सांगितल्यानंतर सुद्धा हे काही कमी होत नाहीये त्यामुळेच मग ब्राह्मण धर्म हा आपला मुख्य शत्रू आहे हे जुने गृहीतक पुन्हा उफाळलेले दिसते . गुलामगिरी जगामध्ये सर्वत्र होती पण विरोधात्मक गोष्ट अशी की इस्लाम आणि वैष्णव ब्राह्मण हे अद्यापही याबद्दल पश्चाताप करत नाहीत . याबाबतीत ज्यू आणि ख्रिश्चन या धर्मांनी मात्र आपल्या चुका सुधारलेल्या दिसतात पोप यांनी तर जाहीरपणे माफी मागितलेली आहे. त्याच धर्तीवर भागवत यांनी सुद्धा माफी मागितलेली होती . परंतु काही कर्मठ ब्राह्मण लोकांनी अजूनही आपले उद्योग सोडलेले दिसत नाहीत. माझा स्वतःचा प्रश्न इतकाच आहे की आपण जुन्या गोष्टीमध्ये किती काळ अडकून पडणार आहोत आणि भविष्याच्या दृष्टीने आपण पावले टाकणार आहोत की नाही? जी गोष्ट ज्यू आणि ख्रिश्चन धर्माला साधते ती आपल्याला का साधू नये?
( क्रमश:)
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment