मनुस्मृती ,पाचवा वर्ण, अस्पृश्यता आणि अस्पृश्य समाज श्रीधर तिळवे नाईक
अलीकडे पुन्हा एकदा स्वामी वरदानंद भारती यांनी मनुस्मृति वर केलेल्या भाष्याची चर्चा पुन्हा एकदा उफाळून आलेली आहे . त्यातूनच मग मनू हा ब्राह्मण होता की क्षत्रिय होता असाही वाद सुरू झालेला दिसतो . अलीकडे ब्राह्मण धर्मातल्या लोकांनी मनु क्षत्रिय होता अशी मांडणी करायला अत्यंत जाणीवपूर्वक सुरुवात केलेली आहे . यामागचा उद्देश एकच आहे तो म्हणजे क्षत्रिय हा वर्ण पूर्णपणे ब्राह्मण धर्मी बनवणे . शैव श्रुती मधील सर्व वीर समाज म्हणजे मराठा , राजपूत वगैरे क्षत्रिय वर्णाच्या टायटल खाली एकत्र आणणे आणि त्याला ब्राह्मणधर्मी करणे हा या मागचा मुख्य उद्देश आता सफल होतो की काय अशी शंका येते आहे. कारण हे सर्व वेळ समाज हल्ली ब्राह्मण धर्माच्या प्रचंड आहारी चाललेले दिसतात . त्यातूनच मग एकनाथ शिंदे यांच्यापासून नारायण राणे पर्यंत अनेकांचे हृदय परिवर्तन होऊन त्यांनी भाजपशी आणि ब्राह्मणी हिंदुत्वाशी युती केलेली दिसते. अलीकडे शरद पवार याबाबतीत तळ्यात मळ्यात करताना दिसतात पण अजित पवार यांनी मात्र थेटच उडी मारली . महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा तब्बल 32% आहे त्यामुळे तो जर का क्षत्रिय झाला तर महाराष्ट्रामध्ये आपोआपच वर्ण व्यवस्था प्रचलित करता येते यादवांच्या उत्तर काळात या पूर्वी हे करण्यात आलेले आहे आणि त्याला नंतर शिवाजी महाराजांनी व्यवस्थित शह दिला होता . मग पुन्हा नानासाहेब पेशवे यांच्या काळात हे करण्यात आले. आणि आता पुन्हा एकदा मराठा समाज ब्राह्मण धर्माच्या आहारी जाताना दिसतो आहे . त्याचे परिणाम काय होणार ते सांगता येणे कठीण आहे कारण मुळातच ब्राह्मण चार टक्के मराठा 32% असे 36 टक्के लोक एकत्र आले आणि त्याला जर का वैश्य लोकांनी साथ दिली तर हे सर्व प्रमाण जैन वैश्य चार टक्के असे गृहीत धरले तर 40 टक्क्यापर्यंत जाते . प्रश्न असा आहे की मराठा म्हणणारा समाज संपूर्णपणे क्षत्रिय म्हणून स्वीकारण्यात येणार आहे की नाही ? की यांच्यापैकी फक्त 96 कुळी मराठा समाज क्षत्रिय म्हणून स्वीकारण्यात येईल आणि उरलेल्या लोकांना ओबीसी मराठा मध्ये टाकण्यात येईल ?
आरक्षणाच्या मार्फत अत्यंत पद्धतशीरपणे एक डाव टाकण्यात आला होता आणि तो यशस्वी झालेला आता दिसतो आहे . या सगळ्याला एक कायदेशीरपणा पुरवणे आवश्यक होते आणि त्या दृष्टीनेच मग मनुस्मृतीचे पुनरागमन महाराष्ट्रात सादर करण्याची तयारी सुरू झालेली दिसते . राजस्थान मध्ये हा खेळ थोडा आधी सुरू झाला . आपण 40% आणि मुस्लिम 20% असे समीकरण जुळले की आपोआपच बहुजन समाज अल्पमतात जातो आणि याचा फायदा अंतिमतः मुस्लिम लोकांना होतो याची जाणीव अनेकदा ब्राह्मण धर्माला असत नाही . आपण या वैष्णव बहुजन खेळीत बहुजन होतो याची जाणीव ज्या लोकांनी ही आखणी केली त्यांना असते आणि आताही असावी . पण प्रश्न हाच आहे की मराठा म्हणून प्रत्येक जण क्षत्रिय म्हणून सामावून घेतला जाणार आहे की आत्तापुरते हे आईस्क्रीम दाखवण्यात येत आहे ? कारण शिवाजी महाराजांच्या आधी जेव्हा ही खेळी खेळली गेली तेव्हा फक्त 96 कुळी मराठा लोक क्षत्रिय म्हणून प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यात आली होती . उरलेल्या सर्व मराठा म्हणवून घेणाऱ्या लोकांना अंतिमतः शूद्र करण्यात आले होते आणि त्यांच्या ताब्यात असलेली सर्व शैव मंदिरे ताब्यात घेण्यात आली .(आत्ताचे विठ्ठल मंदिर सुद्धा पंढरपूरचे असेच ताब्यात घेण्यात आलेले आहे)आता इतिहासाची पुनरावृत्ती होईल की नाही हा एक फार मोठा प्रश्न आहे. विशेषता कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये हे घडलेले आहे आणि त्र्यंबकेश्वर येथे सुद्धा असे काही घडवण्याचे घाटत आहे का हे तपासले पाहिजे . टप्प्याटप्प्याने गोष्टी करत जाणे हे ब्राह्मण वर्णाचे फार मोठे वैशिष्ट्य आहे. म्हणजे हिंदू धर्म नावाची गोष्ट जवळजवळ अस्तित्वातच नव्हते पण इसवीसन १००० नंतर ती हळूहळू अस्तित्वात आणण्यात आली आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये पूर्ण फायदा घेत आत्ताचा श्रुती स्मृती पुराणोक्त हिंदू नावाचा एक धर्मच व्यवस्थित निर्माण करून त्यामध्ये शैव सामावून घेण्यात आले . या हिंदू धर्माचा धर्मग्रंथ मात्र वैष्णव ठेवण्यात आला म्हणजेच गीता ठेवण्यात आला . ब्रिटिश काळाचा सुद्धा ब्राह्मण लोकांनी ब्राह्मण धर्माच्या प्रचारासाठी वापर केला . ब्राह्मण धर्म किती हुशारीने काम करतो हे दर्शवणारी ही गोष्ट आहे . किंबहुना ख्रिश्चन ,इस्लाम आणि ब्राह्मण धर्म हे याबाबतीत कमालीचे हुशार आहेत ते प्रतिकूल परिस्थितीसुद्धा व्यवस्थित अनुकूल करून घेतात . आपल्याला आपला धर्म वाढवायचा आहे आणि तो कोणत्याही किमतीवर वाढवायचा आहे याची जाणीव असणारे लोक या तिन्ही धर्मामध्ये व्यवस्थित ऍक्टिव्ह राहतात . यापैकी भारतीय धर्मामध्ये ब्राह्मण वर्णाचा सर्वाधिक फायदा असल्याने ते बरोबर हे सर्व करत राहतात.
मनुस्मृती हीच जातीव्यवस्थेची जननी आहे. मुळात अगदी सुरुवातीलाच मनुस्मृतीमध्ये मनूला करण्यात आलेली विनंती अशी आहे की वर्ण आणि वर्णसंकरामुळे तयार झालेल्या जाती यांच्या विषयीची आपण माहिती द्यावी आणि त्याचबरोबर यांचा धर्म सांगावा. या विनंतीत सर्व काही आहे तरीसुद्धा मनुस्मृती ही खूप मानवतावादी आहे असे सांगण्याचे प्रयोजन काय आहे ? पण 21 व्या शतकात सुद्धा ज्यांना मनस्मृती लागू करण्याजोगी वाटते त्यांच्या बुद्धी विषयी काय विचारावे ?
मनुस्मृतीमध्ये सुद्धा जग कसे निर्माण झाले याविषयीची गोष्ट आहे ती आणि बायबल मधली गोष्ट यांच्या काल्पनिकतेत प्रचंड सारखेपण आहे .
आश्चर्यकारकरीत्या मनुस्मृतीमध्ये अस्पृश्यतेचा फारसा उल्लेख नाही . म्हणजेच एका अर्थाने फक्त चार वर्ण अस्तित्वात आहेत आणि मनुस्मृतीत पाचव्या गटाला स्पष्ट आणि स्वच्छपणाने आरण्यवासी म्हटलेले आहे आणि त्यांना मनुस्मृतीचे कायदे लागू होत नाहीत म्हणजेच एका अर्थाने आजच्या आदिवासी लोकांशी मनुस्मृतीला काहीही देणे-घेणे नाही किंबहुना या आदिवासी राज्यांच्या मध्ये हस्तक्षेप करू नये असेच मनस्मृती सांगते . त्यामुळे साहजिकच राजाचा अंमल या जंगलात राहणाऱ्या लोकांच्यावर चालत नाही . मला नेहमीच प्रश्न पडतो की मनुने असे का केले असावे ? त्यातूनच आणखी एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे ज्यांना अलीकडे आपण अस्पृश्य म्हणतो ते गावाबाहेर म्हणजेच जंगलातले होते काय ? मुख्य म्हणजे जंगलांची गरज नंतर नगरांना भासायला लागल्यानंतर या नागरी लोकांनी जो भूभाग ताब्यात घेतला त्या भूभागातील लोकांना गुलाम बनवले काय दास बनवले काय आणि त्यांनाच मग अस्पृश्य बनवले काय ? अस्पृश्य हे आपण समजतो तसे नागरी नसून ते आरण्यवासी मूळचे आदिवासी होते की काय ? महाभारतात खांडव वन जाळताना ज्या पद्धतीचा नरसंहार केला आहे तो नरसंहार स्पष्ट आणि स्वच्छपणाने आदिवासी लोकांचा आहे आणि तो प्रामुख्याने नाग असलेल्या आदिवासी लोकांचा आहे. याचा अर्थ भूमी ताब्यात घेताना त्या भूमीवरच्या लोकांना मारण्याची परमिशन आहे असे वैष्णव धर्म मानतो का? कारण हे सर्व होताना भगवान श्रीकृष्ण स्वच्छ आणि स्पष्ट पणाने तटस्थ राहताना दिसतात . पुढेही राम वालीला मारताना जे कारण देतो ते हेच आहे म्हणजेच वाली जेव्हा विचारतात की तू मला का मारलीस मी तर नि:शस्त्र होतो तेव्हा राम म्हणतात ," तू जंगलातलाच पशु आहेस आणि पशुला मारण्याचा मला हक्क आहे" इथे वालीची हत्या पशु म्हणून केलेली दिसते मग आता असे समजावे काय की जंगलातल्या लोकांना हे लोक पशु मानत होते ? मनुस्मृति निदान त्यांचे राज्य स्वतंत्र स्वायत्तपणाने शाबूत ठेवण्याला अनुमती देत होती पण वैष्णव धर्मात ही अनुमतीही नाकारलेली दिसते आणि म्हणूनच रामायण आणि महाभारतामध्ये गोष्टी मनूस्मृतीपेक्षा वेगळ्या पातळीवर घडलेल्या आहेत . यातूनही पुढचा प्रश्न असा निर्माण होतो की रावण हा आदिवासी लोकांचा राजा होता अशी आदिवासी लोकांची समजूत आहे विशेषता गोंड आदिवासी असे मानतात ही समजूत खरी आहे की काय? आणि रावण आदिवासी म्हणजेच वैष्णव धर्माच्या दृष्टीने पशु असल्याने त्याला मारण्याचा हक्क आपोआपच वैष्णव लोकांना प्राप्त होतो ? रामाच्या बाजूने उतरलेल्या मरुत लोकांना जी माणसे होती त्यांनासुद्धा वानर बनवण्याचा वा म्हणण्याचा उद्योग त्यामुळे सुचला असावा का ?
मुख्य म्हणजे पुन्हा एकदा आपण आदिवासी लोकांना पशु समजणार आहोत काय ? मनुस्मृती त्यासाठी आवश्यक वाटत आहे काय ?
बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेला नवा दलित वर्ग हा आदिवासी न मानता नागरी मानून आदिवासी लोकांच्या मध्ये फूट पाडण्याचा हा प्रयत्न आहे का ? मुख्य म्हणजे बाबासाहेब आंबेडकर नागर असल्याने त्यांना क्षत्रियांशी नाते जोडावेसे वाटले का ?
आपल्याकडे अनेकदा अलीकडे पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य लोकां कडे असलेल्या जमिनीचा प्रश्न वारंवार निर्माण होतो . त्याला वतन असे सुद्धा महाराष्ट्रात म्हटले गेलेले आहे . उत्तर भारतात चांभार बहुसंख्य आहेत आणि त्यांच्याकडे बऱ्याच मोठ्या लोकसंख्येकडे प्रचंड जमिनी आहेत हे आता स्पष्ट झालेले आहे. साहजिकच यातून अनेक प्रश्न निर्माण होतात आणि हे प्रश्न या लोकांच्याकडे असलेल्या जमिनीमुळे आणि जमिनीच्या वाढलेल्या किमतीमुळे निर्माण होतात कारण या जमिनीच्या किमती अशा आहेत की जमिनी असणारे बहुतेक सर्वच्या सर्व पूर्वाश्रमेचे अस्पृश्य लोक आता उच्च मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत या कॅटेगरीमध्ये यायला लागले आहेत. त्यामुळे हे लोक जेव्हा आरक्षण घेताना दिसतात तेव्हा अनेकांच्या डोळ्यांना ते खूपायला लागते. विशेषत: या संदर्भात जे पूर्वाश्रमीचे अस्पृश्य जमिनीचे करोडोचे व्यवहार करतात तेव्हा हे फारच डोळ्यात यायला लागते यातूनच अलीकडे एक वेगळा संघर्ष निर्माण होताना दिसतो .
यातील काही जणांनी जमिनी विकून मुंबईसारख्या शहरांच्या मध्ये मोठे फ्लॅट घेतलेले आहेत . ते फ्लॅट सुद्धा अनेकांच्या डोळ्यात येतात. वास्तविक या त्यांच्या पूर्वजांच्या जमिनी आहेत त्या त्यांनी विकल्या त्यामुळे त्या का खटकाव्यात ? जेव्हा तुम्ही जमिनी विकल्या तेव्हा ते बरोबर असते आणि दलितांनी जमिनी विकल्या तर ते मात्र चुकीचे असते हे कसे काय बुवा ? वास्तविक खरा प्रॉब्लेम हा आहे की ज्याप्रमाणे मराठ्यांनी 1980 ते 1999 पर्यंत जमिनी विकून स्वतःची गावठी श्रीमंती कमावली आणि जिच्यामुळे पुढे त्यांचे ते पैसे जगताना विरून गेल्यामुळे अचानक गरिबी आली त्याच दिशेने आत्ताचा दलित वाटचाल करतो आहे का ? या जमिनी मूळच्या शेत जमिनी होत्या आणि त्या मग नॉन अग्रिकल्चरल करून बाजारभावाने विकल्या गेल्या . हे करण्यासाठी नागरी मानसिकता विकसित व्हायला लागते आणि ती बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळेच दलितांच्या मध्ये विकसित झाली का हा प्रश्न आहे ? अशी जमिनी विकून आलेली श्रीमंती टिकेलच याची कसलीही गॅरंटी नसते . आलेल्या पैशाच्या आधारे काही व्यवसाय निर्माण करणे आवश्यक असते दलितांच्या पूर्वी मराठा समाजामध्ये जमीन विकून पैसा आला परंतु त्या पैशाच्या सहाय्याने अशा प्रकारचा व्यवसाय निर्माण करता आलेला नाही आणि त्यामुळेच मराठा जमातीचे फार मोठे प्रॉब्लेम झाले. आत्तासुद्धा जमीन विकायला निघालेल्या दलित समाजाचे सुद्धा असेच होणार आहे का? हा खरा प्रश्न आहे . यामध्ये सुद्धा जे चाप्टर लोग होते त्या लोकांनी आपल्याच जातीच्या लोकांच्या जमिनी खरेदी करून नंतर त्याचा प्रचंड पैसा केला आणि यातल्या काहींनी नंतर राजकारणात उडी मारली तर काहींनी आधी राजकारणात उडी मारून जमिनीचा धंदा केला . आता सुद्धा नेमके हेच दलित समाजाच्या बाबतीत घडताना दिसते . म्हणजेच एका अर्थाने पाचवा वर्ण म्हणून मान्यता न देता त्यांना थेट वर्णव्यवस्थेच्या बाहेर ठेवल्यामुळे अचानक त्यांच्याकडे असलेल्या जमिनी सुद्धा अस्पृश्य झाल्या आणि आता त्यांचे भाव आभाळाला भिडल्यामुळे अचानक काही वेगळ्या समस्या निर्माण झालेल्या दिसतात . याबाबतीत जे आदिवासी राहिले ते मात्र दुर्दैवी ठरले आणि अनेक शासकीय आणि सरकारी योजनांच्या नावाखाली त्यांच्या जमिनी अत्यंत कमी किमतीत बळकावल्या गेल्या . काही जणांना तर चक्क हाकलून लावण्यात आले . मुंबईतल्या मूळच्या आगरी आणि कोळी लोकांच्या समुद्रकाठाच्या जमिनी कुठे गेल्या कशा गेल्या याचाही यादृष्टीने अभ्यास करणे आवश्यक आहे .
पैसा नावाचे चलनवलन केंद्रस्थानी आणल्यामुळे हे सर्व घडलेले आहे म्हणजेच एका अर्थाने आधुनिकतेने आपले कागदी नोटा आहे आधुनिक चलन आणि सरकारी आधुनिकता वापरून आधुनिकतेचे सरकार आणत सत्तेचा केलेला हा गैरवापर आहे आणि हा काँग्रेसच्या राजवटीतच प्रचंड बोकाळला होता ही वस्तुस्थिती . पुढच्या राजवटींच्या मध्ये हे सर्व कंटिन्यू झाले आणि त्याची व्याप्ती मात्र फास्ट वेगाने वाढत गेली .
थोडक्यात काय अनकॉन्ससली मनू स्मृती, रामायण आणि महाभारत हे तीन ग्रंथ भारतामध्ये ब्रिटिश काळापासून ॲक्टिव्ह झाले त्यातील गीता हा महाभारताचा अंश एका हिंदू धर्माचा धर्मग्रंथ झाला . नाव घ्यायला आणि जपायला ब्रह्मसुत्रे, वेदांत म्हणजे उपनिषदे आणि गीता ही प्रस्थान त्रयी आणि प्रत्यक्ष व्यवहारांमध्ये मात्र मनुस्मृती, रामायण आणि महाभारत ही प्रस्थान त्रयी या काळामध्ये काम करत होती. फक्त बाबासाहेब आंबेडकर यांनीच ही गोष्ट ओळखली होती आणि म्हणूनच या तीन ग्रंथांच्या विरोधात फक्त एकत्रितपणे संघटित विरोध फक्त त्यांनी आणि त्यांनीच केला . त्यातूनच मनुस्मृति जाळणे किंवा रीडल ऑफ रामा लिहिणे या गोष्टी झालेल्या दिसतात . याचा फायदा महाराष्ट्रामध्ये स्पष्ट आणि स्वच्छपणाने पूर्वाश्रमीच्या महार लोकांना झालेला आहे. म्हणजे बहुजन समाज ब्राह्मण धर्मापासून वाचला नाही परंतु बाबासाहेब आंबेडकर आपल्या स्वतःच्या नवयानी समाजाला मात्र वाचवण्यात यशस्वी झाले असे आता दिसते.
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment