पुन्हा नेमाडे पुन्हा उत्तराधुनिकता पुन्हा देशीवाद आणि आडगळ झालेली गोची श्रीधर तिळवे नाईक 

खरे सांगायचे तर नेमाडे यांच्याकडे सांगायला फारसे नवे उरलेले नाही त्यांची गाडी कोणत्या दिशेने जाणार हे मी आधीच सांगितले होते आणि ती तिथेच म्हणजेच वैष्णव हिंदुत्वामध्ये गेली आहे अलीकडच्या त्यांच्या या वक्तव्यावरून हे सिद्ध होते आहे 

ते म्हणालेत ," देशाचे दुर्दैव असे की आपण वर्तमानाच्या मागे लागलो आणि भूतकाळ विसरलो. त्यामुळे आपले वाईट दिवस आले. जितके भूतकाळाला विसराल, तितके वाईट दिवस येतील .

भारताचा बहुमान त्याच्या भूतकाळातील ज्ञान आणि कर्तृत्वामुळे आहे. त्यामुळे इतिहासातील चांगल्या गोष्टी शोधून त्या पुढील पिढीपर्यंत पोहोचवायला हव्यात

शून्याचा शोध, शरीरशास्त्र आणि शस्त्रक्रियेसारख्या क्षेत्रांत भारताने योगदान दिलेले आहे पूर्वी खेड्यातील न्हावीदेखील ओठ आणि दात यांसारख्या अवयवांशी संबंधित दुरुस्तीची कामे करायचे.

हिंदुत्वाचा व्यापक अर्थ मांडण्याची गरज हिंदू या शब्दाला संकुचित अर्थ प्राप्त झाला असून तो बदलण्याची गरज आहे

हिंदुत्वाचा अर्थ केवळ गोधरा घटनेपुरता मर्यादित नसून सर्वांना जवळ घेणारी व्यापक सांस्कृतिक संकल्पना म्हणून तो समजावून सांगायला हवा. बौद्ध, शीख आणि आदिवासी यांच्या स्वतंत्र धार्मिक व सांस्कृतिक परंपरांनाही महत्त्व दिले पाहिजे. विविध परंपरांचा स्वीकार केल्यानेच देश मोठा होईल

रामायणाला जगातील अनेक देशांमध्ये आदर्श मानले जाते. त्यामुळे साहित्याच्या माध्यमातून हिंदुत्वाचा व्यापक आणि सर्वसमावेशक अर्थ पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे"

( दैनिक लोकसत्ता ने दिलेल्या बातमीवरून)

या सर्व गोष्टीवरून हे स्पष्ट व्हावे की ते पुन्हा एकदा परंपरेच्या अंगानेच मांडणी करत आहेत आणि भारताचा मोठेपणा हा त्याच्या भूतकाळामुळे आहे असे ते सांगतात हे कोणीतरी सांगणे आवश्यक आहे परंतु हेही सांगितले पाहिजे की भारत हा वर्तमानात सध्या जगत नसल्यानेच वर्तमान काळवलेला आहे हेही सांगणे गरजेचे होते कुठल्याही देशाची प्रगती तो भूतकाळात काय करतो यावर अवलंबून नसते तर तो वर्तमानात काय करतो आणि स्वतःच्या वर्तमानाचे काय करतो यावर अवलंबून असते नेमाडे हे नेमके याच्या विरोधात भूमिका घेतात कारण ते उत्तराधुनिकतेत आणि देशी वादात अडकून पडलेले आहेत . त्यामुळेच ते भारताच्या भूतकाळाकडे जायला सांगतात परंपरे कडे जायला सांगतात .

याचे कारण असे आहे की वैष्णव हिंदुत्ववाद आणि वैष्णव हिंदू वाद हे अंतिमतः ब्राह्मण धर्माचे दोन बाय प्रॉडक्ट आणि पाय - प्रॉडक्ट असतात आणि हे दोन्हीही भूतकाळात हवे असतात वर्तमान काळात नसतात त्यामुळेच प्राचीन काळात काय झाले भूतकाळात काय झाले याविषयीचे अनेक पौराणिक गोंडस काल्पनिक पुरावे हे लोक कायम देत असतात. आपणाला हे स्पष्ट दिसत नाही कारण सर्वसाधारणपणे वैष्णव हे नेहमी क्षत्रिय चेहरा करून येतात. ब्राह्मणधर्मच राम आणि कृष्ण सांगत असतात परंतु तो ब्राह्मण धर्म सांगताना ते क्षत्रिय चेहरा घेत असतात. त्यामुळेच एक वेळ ब्राह्मण धर्म परवडला पण वैष्णव धर्म नको असे होते कारण हा जो चेहरा असतो तो इतका सभ्य असतो की तुम्हाला खांडववन जाळणारा चेहरा दिसतच नाही. 

भालचंद्र नेमाडे हे याला अपवाद नाहीत . साठोत्तरीच्या काळामध्ये नेमाडे हा असा क्षत्रिय चेहरा होता आणि त्यांनी परंपरेचा कैवार घेऊन अत्यंत पारंपारिक भूमिका घेणारी कोसला लिहिली आणि आधुनिकतेची जेवढी टिंगल टवाळी करता येणे शक्य होते तेवढी त्यांनी केली 

त्यांच्या सर्व कामाला प्रत्यक्ष पाया मात्रे पाश्चात्त्य देशातच होता पाश्चात्त्य उत्तर आधुनिकतेत होता परंपरेच्या या कैवाराला त्याला उत्तराधुनिक परिभाषेमध्ये देशीवाद असे नाव मिळाले त्यामुळे नेमाडे आज ना उद्या ब्राह्मण धर्माला जाऊन मिळणार या विषयी माझ्या मनात शंका नव्हती . त्यांच्या जातीविषयक विचारांचा समाचार मी इतरत्र घेतलेलाच आहे परंपरेचे गोंडस लेबल लावले की या देशांमध्ये बरेच गुन्हे माफ होतात नेमाडे आणि ते ज्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आहेत असे समाजवादी लोहिया साहेब यांनी असे कित्येक गुन्हे केलेले आहेत आणि ते वैष्णव गुन्हे असल्याने त्यांना माफ करण्यात आलेले आहे. 

त्यामुळेच त्यांना मी ठाम विरोध करत आलेलो आहे आणि आता जे त्यांच्या विरोधात आहेत त्यांनी त्यावेळी मला विरोध केला होता याचा बहुदा त्यांना विसर पडलेला दिसतो . नितीन वाघ यांच्यासारखे जे माझ्या पुढे समर्थन घेऊन येत होते ते सुद्धा नंतर बदलत गेलेले माझ्या डोळ्यात देखत मी बदललेले बघितलेले आहेत . कारण नेमाडे यांच्या सहवासात गेल्यानंतर नितीन वाघ यांचे हळूहळू हृदय परिवर्तन झाले आणि नेमाडे यांच्या बद्दल त्यांचे मत बदलत गेले नाही तर तो सुद्धा माझ्याकडे येत होता तेव्हा सुरुवातीच्या कालखंडामध्ये एकेकाळी कट्टर देशीवादी होता . आता नितीन वाघ यांच्यासारखा बुद्धिमान मनुष्य जर चकत असेल तर मग बाकीच्यांच्या विषयी काय बोलावे क्षत्रिय चेहरा हा असा चकवत असतो क्षत्रिय हा चेहरा हा नेहमीच राजकारणी असल्याने तो चटकन लक्षात येत नाही त्यांचे सत्ता कारण चटकन लक्षात येत नाही कारण एका बाजूला ते स्वतःला जनतेशी म्हणजे वैश्य शूद्र अति शूद्र आणि आदिवासी यांच्याशी आपण जोडत आहोत असे दाखवत असतात आणि दुसरीकडे त्यांना ब्राह्मणांना सुद्धा लगाम घालायचा असतो मात्र आपल्या सत्ता कारणासाठी ब्राह्मणांचे समर्थन आवश्यक आहे धर्माचे समर्थन आवश्यक आहे याची त्यांना जाणीव असल्याने ते त्यांची व्यवस्थित धर्माच्या संदर्भात पाठराखण देखील करत असतात. हे एका अर्थाने दुतोंडी राजकारण असते त्याचे एक तोंड ब्राह्मणांच्या दिशेने असते तर दुसरी तोंड बहुजन समाजाच्या दिशेने असते . मात्र वेळ प्रसंगी आपले हितसंबंध आले तर ब्राह्मण धर्मासाठी हे लोक बहुजन समाजाचा म्हणजेच वैश्यशुद्र अतिसुद्र यांचा बळी द्यायला तयार असतात. इथे परंपरा व्यवस्थित स्वतःच्या सत्ताकारणासाठी म्हणून वापरली जाते .

मी मागेच सिद्ध केल्याप्रमाणे उत्तर आधुनिकतेने कसे इतिहासाला रिप्लेस करून त्या जागी परंपरेला प्रस्थापित केले हे आपण खूप तळात जाऊन पाहिलेले आहे . त्याची रिपीटेशन मी इथे करत नाही मात्र उत्तरआधुनिकतेने परंपरा आणली आणि हीच परंपरा देशीवादी लोकांनी आपल्याकडे भारतामध्ये देशीवाद नावाखाली आणली .

मात्र भारतामध्ये याची बीजे पुरोगामी वादी कालखंडामध्येच होती हेही मी मागे सिद्ध केलेले आहे त्याचीही रिपीटेशन मी इथे करत नाही . प्रश्न असा आहे की उत्तराधुनिक सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर आता नेमाडे काय करणार आहेत ? कारण ज्या परंपरेचा ते जयजयकार करत आहेत त्याच परंपरेचा जयजयकार करत परंपरावादी लोक सत्तेवर आलेले आहेत अशा वेळेला पर्याय दोनच उरतात ते म्हणजे एक तर जे परंपरा घेऊन आलेले आहेत त्यांची परंपरा नाकारणे आणि त्या जागी दुसरी परंपरा आणणे किंवा मग पूर्णपणे नवतेचे समाजकारण खेळणे . मी हे शैव श्रुती आणि चौथी नवता आणत केलेले आहे . नेमाडे यांनी हे दोन्ही टाळलेले आहे त्याचे कारण त्यांना मुळात परंपराच भक्कम करायची आहे याबाबतीत ते एका अर्थाने इस्लामिक कट्टर वादी असतात तसे आहेत . त्यामुळेच ते वर्तमानाची उपेक्षा करा असे सांगतात . भूतकाळाचा जयजयकार करतात .

पण मग भूमिका घेणे टाळता येणे शक्य आहे का ? कारण नरेंद्र मोदी हे स्पष्ट आणि स्वच्छपणाने उत्तराधुनिक देशीवादी राज्यकर्ते आहेत ते तुम्हाला आवडत असोत अगर नसोत पण ते तुमचेच बाय प्रॉडक्ट आणि पाया प्रॉडक्ट आहे . तुम्ही पाया घातला नसता तर ते सुद्धा आले नसते . त्यामुळे तुम्ही मोदी यांच्या हस्ते पुरस्कार घेतला याबद्दल आम्हाला प्रॉब्लेमच नव्हता कारण हेच तर होणार होते . तुम्ही उभा अक्ष मान्य नाही आणि आडवा अक्ष मान्य आहे म्हणत जाती व्यवस्था स्वीकारणार हे तर सुरुवातीपासूनच तुमच्याच भाषणामधून स्पष्ट झाले होते त्यामुळे मुळात याबाबतीत आता जे काही लोक टीका करत आहेत हे लोक उशिरा जागे झालेले आहेत त्यांना काय नेमाडे आधी हे करत आहेत हे कळत नव्हते ? त्यावेळेला नेमाडेंना पाठिंबा देणारे कोण होते? आता त्यांना विरोध करणारे हे सगळे समाजवादी नेमाडे यांना सामील नव्हते का ? लोहियांच्या मांडणीमध्येच (त्यांची यासंदर्भातली राम आणि कृष्ण यांच्यावरची पुस्तके पहा) मुळात याची बीजे होती . नेमाडेंनी त्याचा मराठी साहित्य क्षेत्रात वृक्ष केला एवढेच . तुम्ही जेव्हा वारकरी संप्रदायाशी जोडून घेता तेव्हा तुम्ही वैष्णव संप्रदायाशी जोडून घेता मग तुम्ही कितीही देशी वादाच्या गप्पा मारा . 

विठ्ठल ही मुळची शैव देवता आहे ही गोष्ट काय नेमाडे यांना माहित नाही ? पण ते यावर बोलणारच नाहीत कारण मुळातच स्वतःचे वैष्णव समीकरण त्यांना पुढे न्यायचे आहे जे महानुभवी आहे .

नेमाडे यांची खरी गोची अशी आहे की आपल्या देशी वादाचा आकार हा हिंदुत्ववादी म्हणून राजकारणामध्ये काम करेल याची त्यांना स्वतःलाच कल्पना आली नव्हती . परंपरांचा प्रॉब्लेम हाच असतो त्यांना अनेकदा आपला राजकीय वापर कसा होईल हे ठरवता येत नाही . त्यामुळे ज्यांना परंपरा आणायची असते त्यांना खूप साधक बाधक विचार करावा लागतो . मराठीमध्ये या संदर्भात नाथशैव आणि वारकरी अशा दोन परंपरा फार मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहेत . पण नेमाडे यांनी वारकरी परंपरा निवडली . अलीकडे त्यांच्या लक्षात आले की काहीतरी गडबड झालेली आहे म्हणून मग त्यांनी मीनाक्षी पाटील यांच्या काव्यसंग्रहाच्या निमित्ताने हळूहळू शैव लोकांच्याकडे सुद्धा लक्ष द्यायला सुरुवात केली. या भाषणामध्ये ही पहिल्या स्त्री कवियत्री म्हणून गाथा सप्तशतीचा उल्लेख केला .वास्तविक मीनाक्षी पाटील यांचा संग्रह फार वेगळ्या ताकतीने आला होता . काश्मिरी शैव परंपरा खांद्यावर घेऊन मराठीत काम करणे खूप अवघड असते पण त्यांनी ते करून दाखवले होते . त्यामुळे त्याला सपोर्ट द्यायचा आणि नंतर मात्र पुन्हा एकदा ते सर्व काही वैष्णव करून टाकायचे असे काहीतरी गणित ते करतील असा माझा अंदाज आहे त्यामुळे मीनाक्षी पाटील हळूहळू वैष्णव झाल्या नाहीत म्हणजे मिळवले . पण त्या तशा झाल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही कारण हिंदू खेळी ही अशीच काम करते . किंबहुना अशा खेळ्या खेळण्यासाठीच म्हणून वेदांत म्हणजेच वेदांचा आणि ब्राह्मणी परंपरेचा अंत करणारा धर्म नाहीसा करून त्याजागी त्याच्या नावाने त्यांच्या खांद्यावर सनातन हिंदू नावाचा धर्म या लोकांनी जन्माला घातला. अर्थात बसवेश्वर जन्मले आणि त्यांनी शैव धर्म नष्ट होऊ दिला नाही . त्यांच्यामुळे दक्षिणेत शैव धर्म टिकला महा राष्ट्राने मात्र वारकरी चळवळीमुळे त्याला गमवायला सुरुवात केली . बाराव्या शतकामध्ये सुरू झालेला हा कार्यक्रम विसाव्या शतकामध्ये देशी वाद्यांनी पूर्ण करण्याचे ठरवले आणि नेमाडे यांचे खरे ऐतिहासिक कार्य हेच आहे . हा सर्व कार्यक्रम साहित्यिक आणि त्यांच्या अनुयायांनी भक्तांनी अवलंबलेला कार्यक्रम आहे . त्याला अजूनही यश येत नाही म्हणून प्रॉब्लेम आहे कारण बहुजन समाज अजूनही भगवान शंकर यांना सोडायला तयार नाही शैव धर्म सोडायला तयार नाही . आता या देशीवादी वैष्णव चळवळीने नव बौद्ध लोकांना आपल्या बाजूने वापरायला सुरुवात केली आणि नितीन वाघ त्याचा पहिला बळी होता . 

त्यामुळे नेमाडे जे काही करत आहे ते शेवटी एकच गोष्ट दाखवते ते म्हणजे त्यांची सुरुवात हिंदू पासून झाली हिंदू वादापासून झाली आणि शेवटी ते हिंदुत्ववादी ब्राह्मणी परंपरेतील आडगळीपाशी पोहोचले . ही आडगळ एवढी समृद्ध आहे की ती सतत आडवी येते . भारतात जन्मलेला प्रत्येक बंडखोर धर्म ती माळ्यावरून उडी मारून ताब्यात घेते . तिला प्रतिकार करायचा असेल तर सर्वात उत्तम शैव हिंदुत्व आहे हे मी सांगत आलेलोच आहे . आता नेमाडे यांनी सुद्धा हिंदुत्व हा शब्द वापरावा याला काय म्हणावे ? आणि एकदा का हिंदुत्व स्वीकारले की मग कोणत्या मार्गाने जायचे हे ठरवावे लागते आणि एकदा का तुम्ही वैष्णव हिंदुत्ववाद स्वीकारला की तुम्हाला मग त्याच भाषेत बोलावे लागते साहजिकच मग परंपरेमध्ये नाभिक लोकांच्याकडे प्लास्टिक सर्जरी होती वगैरे बोलावे लागते . वास्तविक त्यांनी असे म्हणायला हवे होते की पूर्वीचे न्हावी आता ज्यांना शस्त्रक्रिया म्हणतात अशा छोट्या छोट्या शस्त्रक्रिया ज्या केवळ पात्याने करणे शक्य होते ते करत होते हे विधान इतिहासाला धरून झाले असते कारण खरोखरच पूर्वी गावांमध्ये मस काढणे वगैरे प्रकार नाभीक लोक सहजरीत्या करायचे. दोरा वापरून सुद्धा या अंगाने शस्त्रक्रिया झालेली मी स्वतः बघितलेली आहे . मेडिकल भाषेमध्ये तिला सर्जरीच म्हणतात . त्यामुळे फक्त सर्जरी एवढा शब्द वापरला असता तर प्रॉब्लेम नव्हता. अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया फार पूर्वीपासूनच मध्य युगामध्ये सुद्धा जवळजवळ जगामध्ये अनेक ठिकाणी होत होत्या . फक्त आपणच इतिहासामध्ये हे करत होतो हा एक फार मोठा गैरसमज आहे इतरांचा इतिहास नीट वाचलेला नाही एवढेच त्यावरून कळते . त्यामुळे सर्जरी या शब्दाबद्दल अभिमान बाळगू नये जगात अनेक ठिकाणी या अंगाने मध्ययुगापासूनच प्रयत्न सुरू झाले होते त्यामुळे तो शब्द वापरला गेला असता तर प्रॉब्लेम झालाच नसता प्रॉब्लेम तेव्हा झाला जेव्हा प्लास्टिक सर्जरी असा शब्द वापरला गेला. आणि प्लास्टिक सर्जरी ही गुंतागुंतीची सर्जरी आहे. प्रत्यक्ष नेमाडे यांनी तो शब्द वापरला आहे की नाही याबद्दल मला शंका आहे. पण तो वापरला असेल तर मात्र एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली पाहिजे ती म्हणजे प्लास्टिक सर्जरी नाभिक लोकांनाच काय कोणालाच अगदी पूर्वीच्या वैद्य लोकांना सुद्धा शक्य नव्हती. त्यामुळे विधान थोडेसे वैज्ञानिक पद्धतीने केले गेले असते तर मग इतका गदारोळ माजला नसता . पण परंपरा थोर आहे हे सांगण्याच्या नादामध्ये अनेकदा आपल्याकडे ब्राह्मणी ब्राह्मणधर्म पाळणारे लोक इतका कल्पनाविलास करतात की बोलता सोय नाही त्याचा साईड इफेक्ट बहुतेक नेमाडे यांच्यावर झाला. कदाचित वयाचाही परिणाम असू शकतो . या वयामध्ये सर्वांना सोबत घेऊन जाणे आवश्यक वाटायला लागते कारण मुळातच किरकोळ मतभेद आयुष्यापेक्षा मोठे नसतात असे वाटायला लागते . नेमाडे तर याबाबतीत फार पूर्वीपासूनच म्हातारे झाले होते . माझ्या प्रकरणांमध्ये सुद्धा त्यांनी मला फक्त एकच सांगितले होते की कविता मस्त आहे पण मुखपृष्ठावर टाकायला नको पाहिजे होतास आणि भाषा सौम्य ठेवली असतीस तर बरे झाले असते तेव्हा हा जो आक्रमकपणा आहे तो सौम्यपणात आणि सभ्यतेत नांदायला पाहिजे असा त्यांचा आग्रह फार सुरुवातीपासून आहे. 

प्रश्न असा आहे की हिंदू असणे म्हणजे काय आहे ? मी हिंदू हा शब्द बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये ज्या अर्थाने वापरलेला आहे त्या अर्थाने वापरत असतो . तो वापरावा लागतो कारण आंबेडकरांनी तो वापरलेला आहे तो कायद्याचा शब्द आहे त्यामुळे त्याचा वापर कळत नकळत अपरिहार्य होतो .

पण हिंदुत्वाचे करायचे काय ? त्याला मग तुम्हाला एक अर्थ द्यावा लागतो . कारण कळत नकळत जुडाइक धर्म सुद्धा भारतामध्ये अस्तित्वात आहेत त्यांच्यापेक्षा भारतामध्ये जन्मलेले धर्म वेगळे काढावे लागतात आणि त्या भारतात जन्मलेल्या सर्व धर्मांना आणि त्या धर्मामधील सर्वांना मिळून एक हिंदू नावाचे टायटल बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहे . त्यांच्यासाठी स्वतंत्र कायदा आहे .

आता या लोकांचा इतिहास काय आहे हे आपणाला ठरवावे लागते आणि मग आपल्या लक्षात येते की भारतीय धर्मांच्या संदर्भात अशा प्रकारचे चार इतिहास रचले जातात 

१ शैव 

२ युरेशियन यामध्ये वैदिक ब्राह्मणी वैष्णव आणि वैष्णव हिंदू असे चार प्रकार येतात 

३ ज्युदाइक 

४ यूरो अमेरिकन 

यामधील श्रमणिक वेगळे काढत असले तरी प्रत्यक्षात ते वेगळे नाहीत मात्र ते शैव श्रुतीमध्ये टाकावेत की युरेशियन श्रुतीमध्ये टाकावेत हा प्रश्न अजूनही अनिर्णित आहे आणि म्हणूनच सध्या त्यांना वेगळे ठेवावे असा आग्रह काहीजणांचा आहे मुळातच कट्टर असलेले काही श्रमणधर्मातले लोक स्वतःला वेगळेच ठेवू इच्छितात हेही या मागचे कारण आहे. असो 

नेमाडे यांनी नेहमीच याबाबतीत युरेशियन परंपरेमधील वैष्णव परंपरेशी आपले नाते जुळवून ठेवलेले आहे त्यामुळेच महानुभव आणि वारकरी संप्रदाय त्यांच्या संपूर्ण मांडणीमध्ये सातत्याने प्रकट होत राहतो. मधूनच त्यांना शैव श्रुतीची आठवण येते आणि मग ते अधून मधून नाथ धर्म , कश्मीरी शैव धर्म यांची अशी आठवण काढतात कारण त्यांना अचानक जाणीव होते की शैव परंपरा आहे आणि तिला टाळता येणार नाही. विशेषतः अलीकडे ते जास्त लक्ष देत आहेत. 

त्यांना गुजरात गोधरा हत्याकांड करणारे हिंदुत्व नको आहे हे उघडच आहे किंबहुना ते त्या संदर्भातच इशारा देतात आणि मग प्रश्न पडतो की तुम्ही हिंदू हा शब्द का वापरत नाही ? हिंदुत्व हा शब्द का वापरता आहात ? की ज्या लोकांनी बोलावले ते हिंदुत्ववादी असल्याने त्यांना ऐकवण्यासाठी म्हणून हे भाषण अशा हिंदुत्ववादी पद्धतीने केले गेले आहे ? हिंदुत्व हा शब्द वापरणे आमच्यासारख्या शैव आचार्यांचा नाईलाज होता आणि आहे कारण आमचे लोक हिंदुत्वामध्ये राजकीय कार्यकर्ते आणि नेते म्हणून काम करत आहेत आणि भाजपासाठी काम करणारी जी लोकसंख्या आहे त्यापैकी किमान 50% लोकसंख्या आमचीच आहे त्यामुळे ते भटकू नयेत त्याची काळजी आम्हाला घ्यावी लागते . त्यामुळे शैव हिंदुत्व मांडावे लागते नेमाडे यांची अशी काही मजबुरी नाही मग त्यांनी हे का करावे ? की त्यांचे वाचक आता हिंदुत्वाच्या दिशेने सरकायला लागलेत म्हणून त्यांनी हे पाऊल टाकले आहे ? आणि जर का असे विचार करून पाऊल टाकले असेल आणि हिंदुत्व स्वीकारले असेल तर हा नेमाडे यांच्या मधला फार मोठा बदल आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे . दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्यांची वैष्णव बॅकग्राऊंड आहे आणि त्यामुळे ते वैष्णव हिंदुत्वाला शरण गेले तर काय? कारण वैष्णव हिंदू धर्म हा गांधीवादाच्या प्रभावाखाली येऊन नव वैष्णव धर्म होऊ शकतो परंतु वैष्णव हिंदुत्व गांधींच्या प्रभावाखाली नाही. ते चक्क गोडसे यांच्या प्रभावाखाली आहे नेमाडे त्याचे काय करणार आहेत ? वैष्णव हिंदुत्व वर्ण जात व्यवस्थेचे समर्थन करते नेमाडे ते समर्थन आधीपासूनच करत असल्याने त्याबाबतीत फार प्रॉब्लेम नाही परंतु नेमाडे जातीव्यवस्थेचे समर्थक आहेत पण वर्ण व्यवस्थेचे समर्थक नाहीत . त्यांच्या दुर्दैवाने जातिव्यवस्था अंतिमतः वर्णव्यवस्थेचीच भिंत राखत असल्याने उंच अक्ष शाबू ठेवत असल्याने तो किल्ला राखत असल्याने नेमाडेंची सर्व मांडणी शेवटी वर्ण व्यवस्थेला सुद्धा शाबूत ठेवणारीच ठरत जाते. हे मी टीका हरण या माझ्या ग्रंथामध्ये मांडलेलेच आहे. नेमाडे यांच्यासारखा साहित्यिक जर का वैष्णव हिंदुत्वात जाऊन कोसळला तर त्याचा भारतावर फार विपरीत परिणाम होऊ शकतो विशेषत: महाराष्ट्रावर ! नेमाडे यांनी लवकरात लवकर शैव हिंदुत्व स्वीकारावे हे उत्तम . हिंदुत्वापाशी आलेलाच आहात तर निदान या देशातल्या बहुजन समाजाशी नीट नाते जोडा आणि हर हर महादेव म्हणा . अन्यथा राम कृष्ण हरीने कधी गिळले ते कळणार पण नाही 

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती