चालते बोलते कोल्हापूर अर्थात उदय कुलकर्णी श्रीधर तिळवे नाईक 

उदय कुलकर्णी गेला . माझ्या आयुष्यामध्ये कोल्हापुरात असताना ज्या काही मोजक्या पत्रकारांनी महत्त्वाचे स्थान मिळवले होते त्यामध्ये तो एक होता . माझ्या कवितांना कोल्हापूरकरांचा कायमच विरोध होता माझ्या मांडणीला त्यांचा विरोध होता आणि अशा या वातावरणात सुद्धा जे काही मोजके लोक माझ्याबरोबर ठामपणाने राहिले त्यामध्ये एक उदय होता. त्याने माझ्या कवितासंग्रहाचे परीक्षण पण लिहिलेले होते. सर्वच काही पटत नाही पण समजून घ्यायला हवे असे तो म्हणायचा आणि हळूहळू मला काय म्हणायचे आहे हे त्याला समजायला लागले होते. त्यामुळेच कोल्हापुरातून जे काही मोजके फोन मला अधून मधून यायचे त्यात त्याचाही एकादा दुसरा असायचा .

माझ्या आजारपणात मात्र अचानक सर्वच कोल्हापूर माझ्यापासून जवळजवळ तुटत गेले आणि उदय बरोबरचा सुद्धा माझा संबंध संपला . पुढे मग माझा वर्गमित्र जीवन बोडके याने सांगितले की अरे उदय तुझी आठवण काढतोय आणि तू साधा त्याला फोन करत नाहीस. त्यानंतर मला चौकशी केल्यावर कळाले की त्याची तब्येत माझ्यासारखीच खराब झाली होती . साहजिकच नंतर एकच गोष्ट होती ती म्हणजे एकमेकाला दिलासा देणे आणि आपण यातून नक्की बाहेर पडू असा एकमेकाचा आत्मविश्वास वाढवणे . 

कोल्हापूरच्या परिसराबाबत त्याला जे जिओपोलिटिकल भान होते ते कोल्हापूरच्या पत्रकारितेमध्ये जवळजवळ मिसिंग होते . त्याचा पर्यावरणाविषयक असलेला जिव्हाळा अत्यंत अस्सल होता . रंकाळ्याविषयीचे त्याचे अगत्य आणि प्रेम हे कोल्हापुरात हळूहळू प्रसिद्ध झाले होते. कोल्हापुरातील एका मुलीचे माझ्यावर असलेले एकतर्फी प्रेम ती त्याचीही मैत्रीण असल्याने त्याला फारच व्यवस्थित माहिती होते . मी तिला का प्रतिसाद देत नाही हे मी त्याला स्पष्टपणे सांगितले होते . त्यानंतर मग या विषयावर आमचे बोलणे थांबले . मात्र तिच्या प्रेमाची गॅरंटी मात्र तो आयुष्यभर देत राहिला होता . ज्या व्यक्ती बाबत संपूर्ण कोल्हापूर कसलीही गॅरंटी घ्यायला तयार नव्हते तिच्या माझ्यावरच्या प्रेमाबद्दलची गॅरंटी त्याने घेणे हा आमच्यातला एक फार विचित्र प्रकार होता . मला एक गोष्ट मात्र माहीत होती ती म्हणजे तिचीही पर्यावरण विषयीची आस्था ही अस्सलच होती . उदयला असलेले साहित्यिकांच्या विषयी कलावंतांच्या विषयी प्रेम हा आम्हाला जोडणारा आणखी एक धागा ! कोल्हापुरातल्या अगदी बारीक बारीक कलावंतांच्या वर सुद्धा माझे बऱ्यापैकी लक्ष असते. त्यामुळे त्याला माझी निरीक्षणे फार महत्त्वाची वाटत होती आणि मला त्याची . तो प्रत्येक कलावंतांचा स्वभाव अतिशय व्यवस्थित ओळखून होता आणि तरीही मोठ्या लोकांच्या बाबतीत त्यांच्या कर्तुत्वाच्या गोष्टी आपण पहाव्यात त्यांचे कौतुक करावे आणि त्यांच्या निगेटिव्ह गोष्टींच्या बाबतीत थोडेसे दूर राहावे असे त्याचे उमदे धोरण होते . किंबहुना उदय कुलकर्णी या शब्दाचा दुसरा अर्थ उमदेपणा होता साहजिकच त्याचे हास्य वातावरण निर्मळ करून टाकत असे . तो माझा प्रकाशक सतीश पाध्ये यांचाही दोस्त असल्याने साहजिकच तो आणखी एक धागा होता. अरुण कोलटकर या कवीवर त्याचे चांगलेच प्रेम होते आणि ते कोल्हापूरचे असल्याने त्याला त्यांच्याविषयी वेगळा जिव्हाळा वाटत होता. 

त्याला मला जोडणारी आणखी एक गोष्ट म्हणजे आम्ही दोघेही निर्व्यसनी होतो . त्यामुळे एका चहावर आमच्या भेटी होऊ शकत होत्या. कोल्हापुरातील अनेक लोकांच्या भेटी या माझ्या भविष्यांच्या भानगडीमुळे खाजगी असतात त्याला उदय सुद्धा अपवाद नव्हता .

पर्यावरण परिसर संवर्धन आणि अंधश्रद्धा निर्मूलन (देवदासी चळवळ) अशा दोन चळवळीमध्ये तो एक कार्यकर्ता म्हणून सुद्धा सतत अॅक्टिव राहिला .

आम्हाला जोडणारा आणखी एक धागा म्हणजे चित्रपट ! कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीवर त्याने प्रचंड लिखाण केले आणि मुख्य म्हणजे सातत्याने केले . त्यातले अनेक आम्हाला माहीत नसलेले तपशील त्याला माहीत होते . त्यावरही त्याचे कार्य चालूच होते. तो एक अर्थाने चालते बोलते कोल्हापुर होता. व्यासंगाचे प्रदर्शन करण्यापेक्षा तो सहजरित्या कागदावर आणणे त्याला जास्त मानवत होते. वागण्यात मऊ असणारा हा मनुष्य भूमिका घेताना मात्र मऊच राहील याची कसलीही खात्री नव्हती . अपवादात्मक वेळेला तो कठोर भूमिका घेऊ शकत होता आणि त्याची कल्पना त्याच्या आसपास असणाऱ्या लोकांना होती.

सुहास एकसंबेकर या आमच्या मित्रांने चालू केलेल्या युगांतर फिल्म सोसायटीच्या संदर्भातही त्याचा फार व्यवस्थित पाठिंबा होता. जेवढ्या सोसायटी अधिक तेवढे अधिक समांतर फिल्म ला पूरक वातावरण मिळेल असे त्याचे मत होते. 

सर्वच चळवळी हळूहळू विस्कळीत होत जातात आणि आपण ते स्वीकारले पाहिजे असा एक परिपक्व स्वीकारही त्याच्याकडे आता डेव्हलप होत गेला होता . आजाराने त्याला खिळवून ठेवले तरी तो मानसिक पातळीवर चांगुलपणाची एक्टिवाच होता .

अनेकांचे अनुभव विश्व शब्दबद्ध करून देणे ही एक त्याच्या लेखनाची खासियतच होती असे म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे अनेक मुके बोलके झाले.

पुढे पुढे शब्दांकनाबरोबरच त्याच्या लेखांचीही पुस्तके होऊ लागली . उदाहरणार्थ भिरभिर आणि तो लेखकही झाला. त्याच्या एका प्रश्नाचे उत्तर मात्र मी आयुष्यात कधीही देऊ शकलो नाही तो प्रश्न म्हणजे कोल्हापूरकर आणि शिवाजी विद्यापीठ तुझ्या इतक्या विरोधात का ? मला स्वतःलाच या प्रश्नाचे उत्तर माहीत नसल्याने मी त्याला म्हणायचो की तू शोध तू पत्रकार आहेस . 

त्याच्या लिखाणाची शैली ही वृत्तांताची शैली होती पण या वृत्तांताला एक ओघवता प्रवाह देण्यामध्ये तो वाकबगार होता त्यामुळे त्याचे लेख कधी बोर करायचे नाहीत . कोल्हापुरातील केसरी आणि सकाळ या दोन वृत्तपत्रांच्या संदर्भातील त्याचे योगदान महत्त्वाचे होते. 

त्याच्यामुळे एका अर्थाने हसती खेळती पण विषयाचा ठामपणे माग काढणारी पत्रकारिता गेली . वैचारिक पातळीवर एखादे मोठे ग्रंथकाम त्याने करावे अशी माझी नेहमीच इच्छा होती . कोल्हापूरच्या संदर्भात अधिक मोठा ग्रंथ त्याने लिहिणे आवश्यक होते विशेषत: समकालीन कोल्हापूर त्याला जितके कळाले होते तितके फार कमी लोकांना कळाले होते . मात्र बहुदा समकालीन राजकारणाला तो कंटाळला होता आणि नाही म्हणत असला तरी शेवटच्या दिवसांमध्ये त्याला कोल्हापूर बद्दल थोडेसे फ्रस्टेशन यायला लागले होते. 

त्याचे निधन ही माझी वैयक्तिक पातळीवरची हानी आहेच परंतु कोल्हापूरच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये एकाच वेळेला ऐतिहासिक आणि समकालीन अशा दोन्ही काळामध्ये उत्साहाने भाग घेणारा एक अतिशय चांगुलपणाचा ओतप्रतपणा असलेला निष्ठावान पत्रकार गेला याबद्दल शंका नाही त्याची उणीव आता कोल्हापुरात कधीही गेलो तरी जाणवल्याशिवाय राहणार नाही . शेवटी उदयचा सुद्धा अस्त झाला . त्याला माझी नम्र आदरांजली .

श्रीधर तिळवे नाईक 

Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती