गोत्र: काश्यप आणि शैव श्रीधर तिळवे नाईक
अलीकडे अनेकांना आपल्या अस्तित्वात नसलेल्या गोत्राचा प्रश्न पडायला लागलेला आहे ब्राह्मण धर्माचा हा एक अर्थाने सर्वात मोठा विजय म्हणायला हरकत नाही. वास्तविक शैवांच्या मध्ये गोत्र नसते तर कुलदेवता असते परंतु स्वतःच्या देवाऐवजी ब्राह्मणाने दिलेल्या ऋषीवर संतुष्ट होणे आता अनेकांना जास्त सोयीचे वाटते. एखादा बहुजन समाजातला मनुष्य वैष्णव किंवा ब्राह्मण धर्मी कधी बनतो या प्रश्नाचे साधे उत्तर जेव्हा तो मनुष्य स्वतःच्या कुलदेवतेचा त्याग करत जेव्हा ब्राह्मणाने दिलेले गोत्र लावायला लागतो तेव्हा असे आहे . अर्थातच काही जिज्ञासू लोक असतातच ते मग काही प्रश्न विचारतात तर हे प्रश्न पुढे उपस्थित होऊ नयेत म्हणून ब्राह्मण धर्मामध्ये एक खास सोय केलेली आहे हिला मी कश्यप सोय म्हणतो म्हणजे काय
,"गोत्रस्य परिज्ञाने काश्यपं गोत्रमुच्यते"
ज्याला कोणाला गोत्र सांगता येत नाही माहित नाही त्याने कश्यप हे गोत्र लावावे असा हा नियम आहे
त्यामुळे अलीकडे बहुतांशी मूळ शैव असणाऱ्या लोकांचे गोत्र काश्यप झालेले दिसते
यातून असा प्रश्न निर्माण होतो की गोत्र हवेच कशाला ? तुमचे स्वतःचे धर्म आहेत आणि प्राणप्रतिष्ठा कशी करायची याचे नियम आहेत जन्म लग्न आणि मृत्यू या विधीचे कसे काय पालन करायचे याचेही विस्तृत विवरण परंपरेने तुम्हाला दिलेले आहे पण तरीही तुम्हाला ते घ्यायचे नाही याचे कारण तुम्हाला स्वतःला ब्राह्मण किंवा क्षत्रिय म्हणवून घेण्यात सार्थकता वाटते
यातला सर्वात मोठा विनोद जर काही असेल तर तो म्हणजे सर्व विधी ब्राह्मण धर्माप्रमाणे पार पडल्यानंतर हे लोक आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद घ्यायला जातात वास्तविक सर्वात प्रथम कुलदेवतेचा आशीर्वाद घ्यायचा असतो आणि मग त्या कुलदेवतेच्या मंदिरामध्ये लग्न करायचे असते . ही शैवप्रथा आहे पण अनेकदा गुरव लोकांनाच किंवा पंडितांनाच ती माहित नसते असे दिसते अनेक गुरव तर स्वतःच्या लग्नासाठी ब्राह्मण लोकांना बोलवतात एखाद्या पुरोहित वर्गाने स्वतःच्या धर्माचा किती त्याग करावा याची स्पर्धा जर का जगात ठेवली तर कदाचित शैव धर्मगुरू यामध्ये प्रथम क्रमांकावर येतील इतके या लोकांच्या जवळ स्वतःच्या धर्माबाबत अज्ञान आहे या लोकांना स्वतःच्या धर्माची काडीचीही माहिती नसते मात्र या लोकांच्याकडे असलेली शैव मंदिरे मात्र हे लोक सोडत नाहीत त्या मंदिरातून आलेली जमीन सोडत नाहीत म्हणजे इस्टेट पाहिजे परंतु ज्या धर्मामुळे ती इस्टेट आलेली आहे तो धर्म नको .
सर्वात मोठा प्रॉब्लेम अलीकडे ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य समजणाऱ्या लोकांना येत असतो याचे कारण गुरव हा समाज अलीकडे ओबीसींच्या मध्ये टाकलेला आहे कारण वैष्णो धर्माच्या महाराष्ट्रातल्या सेटलमेंट मध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्यामध्ये गुरव समाजाला शूद्रांच्या मध्ये टाकण्यात आणि हळूहळू सर्व धार्मिक अधिकारांच्या मधून त्यांना बघायला सुरुवात झाली जास्तीत जास्त सारे संस्कार हडपण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि गुरवांना संस्कार करण्याच्या हक्कापासून वंचित करण्यात आले याचा परिणाम असा झाला आहे की आता स्वतःला उच्चवर्णीय समजणारे अनेक लोक या ओबीसींच्याकडून धर्मविधी करून घ्यायला तयार नसतात . याउलट अनेकदा ओबीसींच्या मधले अनेक लोक ब्राह्मण लोकांना बोलवतात कारण त्यांना सुद्धा ओबीसींच्या मधला पुरोहित चालत नाही . आता इतका तुम्ही आपल्या स्वतःच्या धर्माचा अपमान करत असणार तर मग त्या अपमानाबाबत काय बोलावे ?
मुळातच शैव धर्म हा संस्कृतच्या सुद्धा दहा हजार वर्षे आधीचा आहे त्यामुळे या धर्माची भाषा संस्कृत होती असे समजणे याहून मोठी गफलत काय असू शकते? स्वतःलाही न कळणाऱ्या मंत्रांना होकार देत जे लोक विधी करतात त्या लोकांची भक्ती संशयास्पद असते कारण ते नेमके कशाला हो म्हणत असतात हे त्यांनाच कळत नाही तेव्हा पौराहीत्य हे नेहमीच त्या त्या भाषेत सांगायचे असते अलीकडे ख्रिश्चन धर्मात सुद्धा अनेकदा लग्नाचे पौरोहित्य त्या त्या स्थानिक भाषेत आणि मराठी ख्रिश्चन लोकांच्या संस्कृतीत लोकांच्या म्हणजेच मराठी भाषेत केले जाते परंतु आपले लोक काही सुधारत नाही ज्या भाषेत यजमान जिथे संस्कृतचा तज्ञ असतो तिथेच फक्त संस्कृत मध्ये पौरोहित्य सांगावे ज्यांना संस्कृत कळत नाही त्यांना विनाकारण संस्कृत मध्ये सांगत अज्ञानामध्ये ठेवत का धर्म कृत्य करणे भाग पाडले जाते ?
गोत्र ही मुळात आदिवासी संकल्पना मुळात गणगोत अशी आहे आणि तिचा अर्थ नातेवाईक आणि आप्त असा आहे आणि शक्यतो लग्न आपल्या गणगोत मध्ये करावे किंवा आपल्या गणगोत मध्ये अजिबात करू नये अशा दोन्ही प्रकारच्या परंपरा चाललेल्या दिसतात हळूहळू उत्तर भारतातले काही मोजके आदिवासी गण सोडले तर ती इतरगणांच्या मधून बाजूला होत गेली अनेकदा ज्याला गोत्र म्हटले जाईल ती कुलदेवता असे आणि ही कुलदेवता नेहमीच शैव असायची अलीकडे ही मूलभूत गोष्ट सुद्धा काही जणांना कळलेली दिसत नाही आपल्याकडे जेव्हा युरेशियन लोक आले तेव्हा त्यांनी भारतीयांच्या जवळजवळ सर्वच गोष्टी आत्मसात केल्या आणि त्याचे प्रतिबिंब आपणाला स्पष्टपणे ऋग्वेदामध्ये दिसते . उदाहरणार्थ ळ हा वर्ण सुद्धा त्यांनी स्वीकारला आणि तुम्हाला तो ऋग्वेदामध्ये मुबलक दिसेल किंबहुना भारतीय युरेशियन लोक हे जगातल्या इतर लोकांच्या पासून वेगळे होण्याचे सर्वात मोठे कारण ऋग्वेदातला हा ळ आहे आश्चर्यकारकरीत्या नंतर त्याचा पुन्हा एकदा त्याग करण्यात आला जेव्हा वैदिक धर्म ब्राह्मण धर्म बनला. भारतामध्ये प्रामुख्याने बाहेरून आलेले सुरुवातीचे लोक हे ळ चा उच्चार करू शकत नव्हते त्यामुळे त्यांनी हळूहळू त्याला काट मारायला सुरुवात केली . कसलीही मेहनत घ्यायची नाही आणि तोरा मात्र मिरवायचा असा हा प्रकार आहे . त्यातूनच मग शैव भाषेचे ब्राह्मणी करण आणि संस्कृतायझेशन सुरू झाले . वास्तविक संस्कृती भारतातल्या लोकांनी स्वतःच्या संपर्कासाठी म्हणून निर्माण केलेली भारतीय भाषा होती परंतु तिच्यावर नंतर ब्राह्मणांनी संपूर्ण कब्जा मिळवला आणि ज्यांची ती भाषा होती त्यांनाच त्या भाषेपासून वंचित करण्यात आले .
या सर्व पार्श्वभूमीवर मग गोत्र हे स्वीकारावे की नाही? हा प्रश्न विचारायला हवा . गोत्र स्वीकारायचे असेल तर सरळ सरळ कुलदेवता हेच माझे गोत्र आहे आणि भगवान शंकर हे माझे राम पुरुष आणि भगवान भगवती पर्वती ही माझी राम स्त्रि आहे अशी प्राचीन काळापासून चालत आलेली मांडणी आपण स्वीकारलेली आहे आणि तीच आता आपण पुढे नेली पाहिजे. राम नवमीला सर्व शैव लोकांच्या मध्ये शिवलिंगाची पूजा होते त्याचे कारण शिव हा आदि रामपुरुष म्हणून आपण पुजतो . सूर्य हे आदिलिंग आहे आणि त्यापासूनच पृथ्वीवर प्राणी सृष्टीची आणि वनस्पती सृष्टीची निर्मिती झाली असे मानले जात होते. राम हे सकाळच्या सूर्याचे शिवलिंगाचे नाव आहे याचा सुद्धा विसर अनेक शैव लोकांना पडलेला दिसतो . दुपारच्या शिवलिंगाचे नाव मार्तंड संध्याकाळच्या शिवलिंगाचे नाव श्याम आणि रात्रीच्या शिवलिंगाचे नाव कृष्ण असे होते आणि हे सर्व यमाला म्हणजे सूर्याला दिलेली नावे आहेत . हे चारच्या चार सूर्य शेवटी यमा मध्ये जाऊन विलीन होतात म्हणजेच पाताळात सूर्य जातो आणि पुन्हा सकाळी उगवतो .
त्यामुळेच शैव लोकांच्या मध्ये सर्वात पहिले आदी गोत्र हे सूर्य आहे . सर्वात प्रथम गोत्राचा विचार जो शैव लोकांच्या मध्ये झाला तो आदि शिवलिंगाची म्हणजेच सूर्याची पूजा करून झाला . आणि गोत्र पूजा ही सूर्यापासून सुरू होते .
भारतामध्ये जेव्हा वैदिक लोक आले तेव्हा त्यांच्या श्रद्धेमध्ये सूर्य महत्त्वाचा नव्हता तर इंद्र महत्त्वाचा होता कारण त्यांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट पाऊस होती . या पृथ्वीवर जे काही चाऱ्याची निर्मिती होती तिच्या केंद्रस्थानी इंद्र आहे असे त्यांची श्रद्धा होती. याशिवाय इंद्र हा आकाशामध्ये वीज घेऊन होता आणि त्याची वीज हे त्यांच्या दृष्टीने पहिले शस्त्र होते त्यालाच वज्र असे म्हटले जाते त्यामुळे तो फक्त पावसाचा देव नव्हता तर तो युद्धाचा सुद्धा देव होता वैदिक लोकांची ही जी श्रद्धा होती त्याच्यामुळेच मग पुढे काही मतभेद निर्माण झाले किंबहुना यांचा इराण मध्ये जो संघर्ष झाला तो यावरूनच होता . हा संघर्ष असुर आणि सूर असा आहे आणि असुर म्हणजे सूर्याची पूजा करणारे तर सूर म्हणजे इंद्राची पूजा करणारे असे स्पष्ट वर्गीकरण आपणाला ऋग्वेदामध्ये आणि अवेस्तन या पार्शी लोकांच्या ग्रंथामध्ये दिसते .
तेव्हा याबाबत आपण सावध असावे नेमके काय घडले ते समजून घ्यावे .
आता आपण या पार्श्वभूमीवर कश्यप यांच्याकडे वळलो तर आपणाला गोष्ट नीट होते मुळातच कश्यप हे देव गणाचे मुख्य पुरोहित होते आणि भगवान शंकर यांचे महात्म्य त्यांना भेटता क्षणीच त्यांनी ओळखले आणि त्यानंतरच मग त्यांनी शैव श्रुती स्वीकारली एका अर्थाने ते आत्ताच्या काश्मिरी पंडित लोकांचे आद्यशैव गुरु आहेत यानंतरच त्यांची शिव आराधना सुरू झाली जिला नंतर पुराणांच्या मध्ये शिवभक्ती म्हटले गेले
त्यांचाच पुत्र ब्रह्मदेव होता जो भगवान शंकरांचा शिष्य झाला . पुढे या मूळ दंतकथेला वेगवेगळे स्वरूप देत सर्वच मानव जातीची उत्पत्ती कश्यप यांच्यापासून झाली असा सिद्धांत वैदिक लोकांनी मांडला आणि आपण मूळ या देशातलेच आहोत हे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला गेला. प्रत्यक्षामध्ये जे देवगण होते आणि त्याचे सभासद होते ते सर्व रंगाने गोरे आणि बर्फातच वाढल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात युरेशियन लोकांच्या सारखेच दिसत होते . त्यामुळेच आपल्यासारखे दिसणारे लोक आपले वाटणे हे स्वाभाविक आहे आणि त्यामुळेच देवगण आणि बाहेरून आलेला इराणी आणि कदाचित इजिपशन समूह यांच्यामध्ये नंतर वैचारिक देवाण-घेवाण झालेली दिसते आजही ऋग्वेद हा मूळ देव गणाचा आहे की बाहेरून आलेल्या लोकांचा आहे हे ठरवणे फार अवघड जाते . माझ्या मते या दोन वैदिक श्रद्धा होत्या आणि त्यांचे मिलन आत्ताच्या ऋग्वेदामध्ये झालेले आहे .
त्यामुळेच अलीकडे जेव्हा ब्राह्मण लोकांच्या पुढे असा प्रश्न निर्माण होतो की आता शैव लोकांना कुठले गोत्र सांगावे तेव्हा ते नेहमीच कश्यप असे नाव घेतात जेणेकरून शैव परंपरेचा अपमान होऊ नये आणि त्यांच्या हिशेबात बसेल असे शैव गोत्र सुद्धा दिले जाईल . ही तत्कालीन व्यवस्था अलीकडच्या काळामध्ये खूपच प्रस्थापित होताना दिसते आणि म्हणूनच तिची दखल घ्यावी लागते .
या कश्यपांच्या मुळेच पुढे कश्मीर तयार झालेला आहे किंबहुना कश्यप्पा पासूनच कश्मीर हा शब्द बनलेला आहे . तेव्हा गोत्र यदा कदाचित स्वीकारायचे असेल तर सर्वात प्रथम कुलदेवताच गोत्र म्हणून स्वीकारा म्हणजेच 96 कुळी मराठा असाल तर सरळ सरळ तुमचे गोत्र हे तुळजाभवानी किंवा खंडोबा आहे हे लक्षात घ्या . आणि तरीही वर्णाचा अहंकार बाळगायचा असेल तर मग कश्यप हे गोत्र स्वीकारा . माझे स्वतःचे मत वेगळे आहे माझ्या मते आपण आपली कुलदेवता स्वीकारावी तेच बरे आहे .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment