मैथिली ठाकूर आणि फक्त ब्राह्मण क्षत्रिय महान असतात श्रीधर तिळवे नाईक
अलीकडे मैथिली ठाकूर यांनी आपण भाजपमध्ये का आलो याची काही मीमांसा केलेली आहे तिच्यामध्ये मोदी यांना त्यांच्याकडून देव मानले गेले आहे .
त्यांच्या या निवेदनामुळेच प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळे मला या प्रश्नाच्या मुळात जाणे आवश्यक आहे असे वाटते. प्रश्न असा आहे की अशा प्रकारचे एखाद्या व्यक्तीचे दैवीकरण ब्राह्मण धर्माला का आवश्यक वाटते ?
मुळातच आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे देव हा शब्द शैव आणि युरेशियन अशा दोन्ही श्रुतींच्या मध्ये सारख्याच अर्थाने उपस्थित आहे आणि हा शब्द मुळात भारतातूनच निर्यात झालेला आहे . त्याचा मूळ अर्थ आसमंत प्रकाशमान करणारे शरीर असा आहे आणि त्यामुळेच भगवान शंकर यांना बडा देव असे आदिवासी परंपरेमध्ये मानले जाते. तिथे एका अर्थाने देव याचा अर्थ सिद्ध असा आहे . पण आता तो कोणीही त्या पद्धतीने घेत नाही . प्रत्येक सिद्ध पुरुषाला किंवा स्त्रीला देव किंवा देवी म्हणणे हे शैव-धर्मांमध्ये अत्यंत सामान्य होते . विज्ञान भैरव तंत्रामध्ये भगवान शंकर आणि भगवती पार्वती एकमेकाला देवदेवी म्हणतात त्याचे कारण सुद्धा हेच आहे . कोणालाही सिद्ध होता येणे शक्य असल्याने कोणालाही देव होणे शक्य आहे पण मुळात प्रश्न असा आहे की संबंधित व्यक्ती सिद्ध झाली आहे का ? आणि जर का ती सिद्ध झाली नसेल तर मग तिला देव का म्हणावे? असा प्रश्न युरेशियन श्रुतीमध्ये निर्माण होवो वा न होवो पण शैव श्रुतीमध्ये नक्की निर्माण होतो . या संदर्भातला विवेक मुळात त्या व्यक्तीनेच बाळगला पाहिजे कारण लोक तुमच्याविषयी काहीही कल्पना करून घेऊ शकतात पण आपल्याविषयी अशी कल्पना होऊ नये याची काळजी प्रत्येक चांगला साधक घेतच असतो . मी स्वतः या प्रयत्नाला आणि प्रश्नाला तोंड दिलेले आहे कारण लोक तुम्हाला देव मानायला टपलेलेच असतात अशा वेळेला आपणच हे दैविकरण होऊ न देणे अत्यंत आवश्यक असते कारण देव बनण्याची तृष्णा हीसुद्धा अंतिमत: आसक्ती असते आपल्याकडे अशी आसक्ती अनेकदा कसलाही पराक्रम नसणाऱ्या माणसांच्या मध्ये सुद्धा निर्माण होते आणि अनेकदा अनेक प्रकारचे भामटे लोक असा प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळेच कोणाचेही दैवीकरण करू नये असे माझे स्पष्ट मत आहे.
असे वाटण्याचे एक कारण असेही आहे की ज्याला सिद्ध बनायचे असते तो अनेकदा या आसक्ती पोटी सिद्ध बनतच नाही याचे कारण सिद्ध बनण्याची आसक्ती ही इतकी मोठी होत जाते की अनेकांच्या सविकल्प समाधी हुकलेल्या मी पाहिलेल्या आहेत ओशो रजनीश यांच्यासारख्या मातब्बर माणसाचा सविकल्प समाधी पर्यंत प्रवास होऊन सुद्धा त्यांना निर्विकल्प समाधी मिळाली नाही याचे सर्वात मोठे कारण ती मिळण्याआधीच त्यांनी स्वतःला मोक्ष मिळाला अशी गैरसमजुत करून घेतली आणि नंतर यांना लोकांनी भगवान म्हणायला सुरुवात केल्यामुळे यांचा प्रवास थांबलेला दिसतो . लोक अनेकदा तुमच्या सविकल्प आणि निर्विकल्प समाधी मिळवण्याच्या साधनेत तुमचे दैवतीकरण घडवत साधने मधला सर्वात मोठा अडथळा म्हणून येतात . या संदर्भातल्या धोक्याच्या सूचना वारंवार आपल्याकडे देण्यात आलेल्या आहेत पण अनेकदा साधना करणाऱ्या लोकांना तरुणपणी या सगळ्या गोष्टींच्यामुळे जे तुमच्या भोवती वलय आणि लोकांच्या मधले आकर्षण निर्माण होते त्याचे इतके आकर्षण वाटायला लागते की लोक या आकर्षणापोटी आपल्या पुढच्या साधनेचा बळी देत स्वतःला देव किंवा भगवान म्हणवून घ्यायला लागतात . अनेकदा तर आपल्याकडे पराक्रमी पुरुषाला किंवा स्त्रीला देव आणि देवी मानले जाते . विशेषत: युरेशियन श्रुतीमध्ये हे वारंवार घडलेले दिसते. अनेकदा काल्पनिक पुरुष आणि स्त्री यांना सुद्धा अशा प्रकारचा दर्जा देण्यात आलेला आहे . त्या मागचा उद्देश जे खरे भगवान आहेत त्यांना नाहीसे करणे हाच होता आणि असतो . मुख्य म्हणजे असे काही दैवतीकरण केले की पुरोहितांना किंवा ब्राह्मण लोकांना किंवा गुरव लोकांना साधना करण्याची गरज राहत नाही ते काय महान पुरुष होते दैवी पुरुष होते त्यामुळे त्यांना साधना जमली आम्ही काय अत्यंत साधारण माणसे त्यामुळे आम्ही कशी काय साधना करणार आम्हाला साधना कशी काय जमणार अशी भाषा करत साधने पासून अशा प्रकारची सुटका करून घेता येते या लोकांच्या दैवतीकरणापासून मिळणारे फायदे सुद्धा घेता येतात.
भारतामध्ये या सगळ्या गोष्टींना वर्ण जातव्यवस्थेमुळे काही वेगळेच मुलामे चढलेले दिसतात . कारण ब्राह्मण धर्मापुढे जे काही प्रश्न होते त्यामधला एक प्रश्न म्हणजे वैश्य आणि शूद्र या दोन वर्णांच्या मधून जर एखादा पराक्रमी पुरुष किंवा एखादी पराक्रमी स्त्री निर्माण झाली तर तिचे काय करायचे हा एक प्रश्न होता . त्यावर त्यांनी एक उत्तर शोधले ते म्हणजे या लोकांना आपण ब्राह्मण किंवा क्षत्रिय सिद्ध करणे . आणि त्यांना ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा दर्जा देणे. विशेषतः शैव-धर्मामध्ये वर्णजात व्यवस्था नसल्यामुळे शैव-धर्मातील अनेक पराक्रमी पुरुषांना आणि स्त्रियांना ब्राह्मण लोकांनी आणि ब्राह्मण धर्माने ब्राह्मण आणि क्षत्रिय असे वर्ण बहाल करून आपल्यामध्ये सामील करून घेतलेले दिसते . यामध्ये सर्वात आश्चर्यकारक काही असेल तर ते म्हणजे खुद्द ओबीसीबीसी लोकांनीच आपल्या प्रवर्गात जन्मलेल्या माणसावरचा अधिकार सोडलेला दिसतो किंबहुना त्यांनी तो सोडावा म्हणून ब्राह्मण धर्मातले लोक व्यवस्थित प्रयत्न करत असतात . यामुळेच मग जगात भारतामध्येच फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय वर्णांच्या मध्ये पराक्रम होतो बाकीचे लोक बाकीचे वर्ण पराक्रम शून्य आहेत असा गैरसमज पसरतो . याचे कारण स्पष्ट आहे. ब्राह्मणधर्माने कायमच फक्त ब्राह्मणच पराक्रमी असतात आणि क्षत्रियांचा पराक्रम हा ब्राह्मणांच्यामुळे शक्य होतो अशी मांडणी केलेली दिसते पण याला पुढे वैष्णव धर्माने शह दिलेला आहे .
वैष्णव धर्माची जी काही मांडणी आहे जिला काही क्षत्रिय अलीकडे क्षत्रिय धर्म असे म्हणायला लागलेले आहेत त्यानुसार जगातले सर्व थोर पुरुष हे फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोन वर्णांमध्ये जन्म घेतात. साहजिकच गीतेमध्ये यांचा उल्लेख पुण्य योनी असा होतो आणि व जीव ववैश्य शूद्र अतिशूद्र आदिवासी हे सर्व पाप योनीमध्ये येतात . या मांडणीला अर्थातच सुरुवात नेमकी कोणी केली हा एक फार मोठा प्रश्न विचारला जातो कारण बौद्ध धर्मामध्येच मुळात बुद्ध फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय या वर्णांच्या मध्ये जन्म घेतात अशा प्रकारची मांडणी गौतम बुद्धाच्या आधी होऊन गेलेल्या बुद्धांच्या संदर्भामध्ये केली गेली आणि या होऊन गेलेल्या बुद्धांचा वर्ण सुद्धा सांगितला गेला प्रत्यक्षात ही मांडणी ब्राह्मण धर्मानेच बौद्ध धर्मामध्ये केली होती आणि म्हणूनच मी अलीकडे नेहमी सांगत असतो की कृपया ही मांडणी स्वीकारू नका कारण गौतम बुद्धाचे महत्त्व कमी करण्यासाठी हे मुद्दाम केले जाते म्हणजे त्याच्या आधीच बुद्ध होऊन गेले असे सांगितले की गौतम बुद्ध हा एकमेव राहत नाही . आणि मग बुद्ध फक्त ब्राह्मण किंवा क्षत्रिय या दोन वर्णांच्या मध्येच जन्म घेतात अशी मांडणी केली की साहजिकच मग ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोन वर्णांचे वर्चस्व प्रस्थापित होते . त्या काळामध्ये बौद्ध धर्मामध्ये असलेल्या ब्राह्मणांनी हे केले कारण अर्थातच हे मुळात जैन धर्मातल्या संकल्पनांचे अनुकरण होते आणि जैनांचे सर्वच्या सर्व कैवल्यप्राप्ती केलेले लोक महावीर यांच्या आधीचे कैवल्य प्राप्त करणारे पुरुष हे ब्राह्मण किंवा क्षत्रिय होते अशीच धारणा होती. प्रत्यक्षामध्ये आपली प्रत्येक व्यक्ती खरी होती परंतु हे सर्वच्या सर्व शैव सिद्ध होते आणि त्यांच्यापैकी कोणाच्याही चरित्रामध्ये वर्ण जातीच्या संदर्भात कसलीही प्राचीन चर्चा नाही या लोकांच्या संदर्भातली सगळी मांडणी ही महावीर निर्माण झाल्यानंतर झालेली आहे. याचे कारण महावीर जेव्हा काम करत होते तेव्हा त्यांचा जो विचार केला जात होता तो नाथ संप्रदायातला एक आणखी साधू असाच केला जात होता परंतु प्रत्यक्षामध्ये त्यांचे तत्त्वज्ञान हे शैवांच्या पेक्षा काही बाबतीत पूर्णपणे भिन्न होत गेले आणि साहजिकच त्यामुळे त्यांना स्वतंत्र धर्म स्थापन करावा लागला . म्हणजे एकीकडे महावीर यांना धर्म संस्थापक म्हणून प्रस्थापित करायचे आणि दुसरीकडे त्यांच्या मागे असलेली सगळी शैव धारा गिळंकृत करायची असे हे धोरण आहे . पण तरीसुद्धा काही गोष्टी शिल्लक राहिल्या म्हणजे शैवांच्या मध्ये ज्ञानतंत्राने जो मनुष्य मोक्षाला पोहोचतो त्याला नाथ म्हटले जाते ते नाथ हे विशेषण जैन धर्मामध्ये शिल्लक राहिलेले दिसते महावीरांच्या आधी झालेले सर्व म्हणजे वृषभ नाथांच्या पासून पार्श्वनाथ यांच्यापर्यंत आपणाला नाथ म्हणूनच प्रसिद्ध असलेले दिसतात कारण नावे बदलता आलेली नाहीत . महावीरांच्या बाबतीत सुद्धा एक फार वेगळी गोष्ट दिसते ती म्हणजे त्यांच्या समकालीन असलेल्या बौद्ध लोकांनी मात्र त्यांना निगुंठनाथपुत्र च म्हटलेले दिसते . भगवती सूत्रानुसार ते नाथपुत्त आहेत . म्हणजे त्यांचे वडील नाथ संप्रदायातले होते हे स्पष्ट असावे. असे असताना सुद्धा महावीरांना मात्र कोणी महावीर नाथ म्हणताना दिसत नाही याचे कारण महावीरांनी नाथसंप्रदाया विरोधात बंड केले आणि एका नवीन धर्माची स्थापना केली ज्याला आपण जैन धर्म म्हणतो हा धर्म शैवधर्मापेक्षा पूर्णपणे वेगळा असा धर्म म्हणूनच स्थापन करण्यात आलेला आहे . उदाहरणार्थ नाथ संप्रदायामध्ये ब्रह्मचर्य नव्हते परंतु महावीर यांनी ते आणले पुढे मग नवनाथ धर्माने हे स्वीकारलेले दिसते . किंबहुना मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ यांच्यामध्ये जे मतभेद झालेले आहे ते ब्रह्मचर्यावरूनच झालेले आहेत मच्छिंद्रनाथ ब्रह्मचर्य स्वीकारायला तयार नव्हते तर गोरखनाथ मात्र ब्रह्मचर्याचे कट्टर पुरस्कर्ते होते या संघर्षाला नंतर मग दंत कथेचे स्वरूप देण्यात आले परंतु स्पष्ट सांगायचे तर हा वैचारिक मतभेद आहे. हीच गोष्ट हिंसेबाबत आहे. महावीरांनी अत्यंत कठोर अशा अहिंसेचा पुरस्कार केलेला दिसतो. नाथ संप्रदायाने अशा प्रकारची अहिंसा स्वीकारलेली नव्हती ती पुढे गोरखनाथ यांच्यामुळे स्वीकारली आणि पुढे मग आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये ज्ञान नाथांनी सुद्धा ती पुढे नेलेली दिसते. हा कळत नकळत जैन धर्माचा नाथ धर्मावर झालेला परिणाम आहे म्हणूनच त्याला नवनाथ म्हटले जाते कारण तो नवा होता .
दुसरी गोष्ट अर्थातच कायमच राहिली याचे कारण नवनाथ धर्माने सुद्धा वर्ण जात व्यवस्था नाकारली त्यांच्या नावाने विशेषत : गोरखनाथांच्या नावाने ही जात आणि वर्णव्यवस्था पुन्हा आणण्याचा प्रयत्न ब्राह्मण क्षत्रिय लोकांनी केलेला दिसतो आणि या लोकांनी जेव्हापासून नाथ धर्म बळकवलेला आहे तेव्हापासून अनार्य शैव श्रुती मध्ये सुद्धा वर्ण जात व्यवस्था शिरकाव करताना दिसते. खुद्द गोरखनाथ यांना ते पंडित असतानाही ब्राह्मण करण्याचा आटोकाट प्रयत्न सर्वच ब्राह्मण करत असतात याचे कारण वर्ण जात व्यवस्थेला शैव श्रुतीमध्ये तंत्र श्रुतीमध्ये प्रतिष्ठा मिळवून देणे हा त्यांचा अजेंडा आहे आणि तो बऱ्यापैकी यशस्वी झालेला दिसतो
हे सर्व करण्याचे कारण एकच आहे ते म्हणजे शैव लोकांच्यातले सिद्ध सुद्धा अनेकदा कसे ब्राह्मण आणि क्षत्रिय वर्णांमध्ये निर्माण झाले हे सांगणे आणि महान लोक फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय वर्णांच्या मध्ये निर्माण होतात हे सिद्ध करणे हेच आहे.
म्हणजेच आपण जर का या सर्व खटाटोपाकडे पाहिले तर या सगळ्या प्रकारांमध्ये एक गोष्ट स्पष्ट होते ते म्हणजे जगातले जे जे थोर आहे ते सर्व काही ब्राह्मण किंवा क्षत्रिय आहे हे सिद्ध करणे.
या सगळ्या प्रोसेसचा एक भाग म्हणून नेहमी दैविकरण किंवा दैवतीकरण येते . त्यामुळे मिथिला ठाकूर यांचे जे स्टेटमेंट आहे ते ह्या मोदी यांच्या दैवतीकरणाचा भाग म्हणून बघितला पाहिजे . अंधश्रद्धा म्हणून याची चेष्टा उडवण्यापेक्षा हे नेमके वर्ण जात व्यवस्था पूर्ण प्रस्थापित करण्याचे आणि ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचे महानत्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न कसे आहेत ते बघितले पाहिजे हा मूर्खपणा नाही हा धूर्तपणा आहे निदान इतके तरी प्रत्येकाने लक्षात घ्यावे . मोदी हे ब्राह्मण किंवा क्षत्रिय नाहीत ही गोष्ट आता या लोकांना खटकत असल्याचेही दिसते त्यातूनच मग अशा प्रकारची विधाने मोदी यांच्या संदर्भात ब्राह्मण आणि क्षत्रिय वर्णातल्या काही लोकांच्याकडून वारंवार पुढे येत राहतील हे स्पष्ट आहे. कारण सुरुवात अशीच होते . शिवाजी महाराजांच्या बाबतीत पूर्वी हे केले गेलेले आहे .
त्यामुळेच नजीकच्या काळामध्ये मोदी यांचे वैश्य असणे हे काही लोकांना खटकणार आणि हे लोक त्यांना हळूहळू क्षत्रिय दर्जा देणार याबद्दल माझ्या मनात शंका नाही कदाचित त्यासाठी त्यांची संपूर्ण तेली जातच कशी मुळात क्षत्रिय होती याचे काल्पनिक किंवा खरे पुरावे शोधले जातील आणि ते सादर करून संपूर्ण तेली समाज हाच कसा क्षत्रिय आहे हे सांगितले जाईल ही खेळी काही आजची नाहीये ब्राह्मण लोक हे नेहमीच करत असतात किंबहुना वैदिक धर्म आणि त्या धर्मातला नव्याने निर्माण झालेला मोक्ष विचार नाहीसा करण्यासाठीच ब्राह्मण लोकांनी वैदिक धर्मामधून ब्राह्मण धर्म निर्माण केला नंतर मग पाशुपत ,जैन आणि बौद्ध या धर्मांना नाहीसे करण्यासाठी म्हणूनच वासुदेव धर्मापासून वैष्णव धर्माची निर्मिती करण्यात आली त्यासाठी पाशुपत धर्माचे संस्थापक नकुलीश हे धनगर समाजातून आलेले असून सुद्धा त्यांना बाजूला हटवून त्यांच्या जागी लकुलिश नावाचे त्यांचे ब्राह्मण शिष्य धर्म संस्थापक म्हणून पुढे आणण्यात आले आणि तरीही शैवधर्म टिकला म्हणून शैवधर्म नाहीसा करण्यासाठी म्हणून मुळ वेदांत हिंदू धर्मापासून आत्ताच्या श्रुतीस्मृतीपुराणोक्त हिंदू धर्माची निर्मिती करण्यात आलेली आहे. हे लोक आपले शत्रू आहेत याची व्यवस्थित कल्पना ब्राह्मण धर्माला त्यावेळी होती आणि आताही असल्याने आणि ब्राह्मणाचे वर्चस्व कायमस्वरूपात जर का टिकवायचे असेल तर ब्राम्हण्याच्या विरोधात लढणाऱ्या या सर्व धर्मांना आपण नाहीसे केले पाहिजे हे ब्राह्मण धर्माला पटलेले असते आणि तसा प्रयत्न म्हणून ते नेहमीच दैवतीकरण घडवत असतात अलीकडे शिवाजी महाराजांचे मंदिर त्यातून निर्माण झालेले आहे.
मात्र हे सर्व काही घडवण्याची एक पद्धत आहे आणि हे सर्व शांत पद्धतीने केले जाते त्यातूनच मग सर्व शैव जैन बौद्ध धर्मातल्या देवतांच्यावर हळूहळू ब्राह्मणी करण लादले जाते आणि ते जिथे आहेत ती सर्व मंदिरे बळकवली जातात आणि हे करताना कसलाही आवाज होता कामा नये असेही तत्व असते. ब्राह्मणांची क्रांती ही नेहमीच सायलेंट क्रांती असते आणि दुर्दैवाने व्हायलंट क्रांतीलाच क्रांती समजणाऱ्या लोकांना हे कधीही लक्षात येत नाही आणि प्रत्यक्षात समाज पूर्णपणे ब्राह्मणी बनून गेलेला असतो . आंबेडकरांचा शब्द वापरायचा झाला तर ब्राह्मणी प्रतिक्रांती ही नेहमी शांततेने येते . त्यातूनच मग बुद्धाला विष्णूचा नववा अवतार करणे किंवा मोदी पंतप्रधान झाल्यामुळे मोदींना अवतार करणे आवश्यक वाटते देव करणे आवश्यक वाटते आणि त्यातूनच मग मैथिली ठाकूर यांच्यासारख्या काही लोकांचे निवेदन येते. हे एक व्यवस्थित रचलेले आणि स्पॉन्सर केलेले वैचारिक संरचनाकरण आहे ते पुरोगामी लोकांना जरी चेष्टा करण्याजोगे वाटते पण प्रत्यक्षात ते सामान्य लोकांच्या पातळीवर अनेकदा यशस्वी झालेले दिसते आणि त्याचे वजन सुरुवातीला लक्षात येत नाही आणि मग जेव्हा ते वजनदार बनते आणि लक्षात यायला लागते तोपर्यंत प्रतिक्रांती होऊन गेलेली असते हे वजन कळत नसल्यामुळे पुरोगामी लोक ते फार लाईटली घेतात आणि त्याचे वजन लक्षात येईपर्यंत प्रत्यक्षात प्रतिक्रांती होऊन गेलेली असते त्यामुळे आताही असे काही घडलेले आहे हे लक्षात येईपर्यंत भाजप सत्तेवर प्रस्थापित झालेला आहे . आपला इस्लाम धार्जिणा तथाकथित सेक्युलरिझम हा भाजपला मदत करतो इतकी बेसिक गोष्ट सुद्धा पुरोगामी लोकांना कधी कळलेली नाही आणि आत्ताही या मूर्ख लोकांना ती कळत नाही .
सुरुवातीला अशी लहान मुलासारखी बडबड करणे अत्यंत भ्रामक आणि निरोपयोगी वाटत असते परंतु प्रत्यक्षामध्ये ते समाजामध्ये अत्यंत खोलात जाऊन ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोन वर्णांची मक्तेदारी प्रस्थापित करत असते. क्षत्रिय लोक यांना मनापासून पाठिंबा देत असतात कारण क्षत्रिय लोकांचा मूळ धर्म हा ब्राह्मण धर्मच आहे आणि आज सुद्धा अनेकदा क्षत्रिय लोक महर्षी मनु क्षत्रिय होते असे सांगायला लागले आहेत . मग कधी ना कधीतरी ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यात वर्चस्वाच्या लढाया होतात आणि मग अचानकपणे हे सगळे क्षत्रिय ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर असा वाद निर्माण करतात . याचे कारण उघड आहे यांना आता ब्राह्मणांना नामोहरण करायचे असते मात्र त्यासाठी लोकांचा पाठिंबा लागतो आणि त्यातूनच मग यांच्या क्षत्रियत्वाच्या लढाया उभ्या राहतात . त्यातूनच मग काही आतून वर्ण वादी असलेल्या क्षत्रियांच्याकडून समतेची भ्रमक घोषणा करण्यात येते. प्रत्यक्षामध्ये या लोकांनाही समता नको असते त्यांना स्वतःच्या क्षत्रिय धर्माचे वर्चस्व ब्राह्मण धर्मावर निर्माण करायचे असते आणि वैश्य शूद्र अति शूद्र आणि आदिवासी यांच्यावर लादायचे असते आणखी काही नाही . त्यातून मग या लढाया उदयाला येतात पण जोपर्यंत क्षत्रियांचे वर्चस्व असते आणि ब्राह्मण मुकाटपणे क्षत्रियांचे ऐकत राहतात तोपर्यंत कधीही क्षत्रिय ब्राह्मण धर्माचा त्याग करत नाही कारण त्यांना त्यांचे वर्चस्व प्रस्थापित करायला ब्राह्मणांची आणि ब्राह्मण धर्माची अत्यंत गरज असते भारतामधले हे वर्णाचे राजकारण कायमच अस्तित्वात होते ,असते आणि आत्ताही ते चाललेले असते. आणि यामध्ये सर्वच्या सर्व युरेशियन धर्म ज्यामध्ये बौद्ध आणि जैन हे सुद्धा येतात याला सपोर्ट देताना दिसतात.
आत्तासुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांचा नवीन नवयान बौद्ध धर्म किंवा महात्मा फुले यांचा सत्यशोधक धर्म किंवा विवेकानंद यांचे रामकृष्ण मिशन यासारखे जे नवीन धर्म आहेत त्यांना कसे गिळायचे असा फार मोठा प्रश्न ब्राह्मण धर्मापुढे उभा आहे याचे कारण हे सर्व लोक अनेकदा हिंदू या कॅटेगरीमध्ये टाकले गेलेले आहेत . आता या सर्वांनाच मुख्य म्हणजे यामधील पुरोगामी धर्मांनाच गिळंकृत करणे ही ब्राह्मण धर्माची पुढची पॉलिसी आहे . त्यासाठी हिंदू म्हणवून घेणे परवडणारे नाही म्हणून आता नवीन शब्द आलेला आहे तो म्हणजे सनातन धर्म ! यातूनच प्रत्यक्षामध्ये आज ना उद्या आंबेडकरांच्या या नव बौद्ध धर्माचे महात्मा फुले यांच्या सत्यशोधक धर्माचे रूपांतर पुन्हा एकदा एखाद्या सनातन धर्मामध्ये केले गेले तर मला फारसे आश्चर्य वाटणार नाही इतकेच कशाला आंबेडकर मूळचे ब्राह्मण होते असे सांगितले जाईल किंवा मग आंबेडकरांचा सिद्धांत वापरून सर्व पूर्वाश्रमीचे महार हे क्षत्रिय असल्याने त्यांना क्षत्रिय म्हणून मान्यता देऊन त्यांच्या समावेश क्षत्रिय वर्णांमध्ये केला जाईल . माझा अंदाज चुकला नाही तर भविष्यामध्ये पूर्वाश्रमीचे सर्व महार जेव्हा त्यांना क्षत्रिय म्हणून मान्यता मिळेल तेव्हा ते ती स्वीकारतील . आणि बौद्ध धर्माची आणखी एक शोकांतिका म्हणून इतिहासात त्याची नोंद होईल. यासाठी सर्वात प्रथम एकटी पाडण्याची प्रोसेस तयार करावी लागते आणि ही प्रोसेस ब्राह्मण धर्म व्यवस्थितपणे तयार करताना दिसतो आहे आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की या समाजाला ही गोष्ट कळत नाही यालाच मी सायलेंट रेवोल्युशन म्हणतो.
एखादी पराक्रमी व्यक्ती झाली तर त्या व्यक्तीला आपल्या युरेशियन श्रुतीमध्ये सामावून घ्यायचे किंवा मग तिचा संपूर्ण समाज युरेशियन वर्ण जातीमध्ये सामावून घ्यायचा असा हा धोरणात्मक डाव असतो आणि तो भारतामध्ये अनेकदा यशस्वी होतो आणि त्यातूनच मग मराठा समाज आणि राजपूत समाज हे मूळचे शैव असलेले समाज क्षत्रिय होऊन जातात . इतकेच कशाला त्यांचा क्षत्रिय असण्याचा अभिमान अतिशय जाज्वल होत जातो .
भारतामध्ये ब्राह्मण धर्म टिकण्याचे सर्वात मोठे कारण ब्राह्मणांचे कुठल्याही गुणवत्तेचे रूपांतर ब्राह्मण वर्णात आणि क्षत्रिय वर्णात करण्याचे कौशल्य आहे . प्रत्येक माणसाला अहंकार असतो आणि त्याला स्वतःला नेहमीच उच्च स्थान हवे असते आणि त्याला मानसिक पातळीवर आपण उच्च आहोत असे फिलिंग लागते त्यामुळे साहजिकच तो या ब्राह्मणीकरणाला आणि क्षत्रिय करणाला सहजरीत्या बळी पडतो अगदी बाबासाहेब आंबेडकर सुद्धा स्वतःला आणि स्वतःच्या समुदायाला पूर्वाश्रमीचे क्षत्रिय म्हणण्याचाच प्रयत्न करत असतात कारण मानसिक पातळीवर स्वतःचे श्रेष्ठत्व आणायचे आणि ठसवायचे ही एक मानसिक गरज असते आणि यातून कोणीही मुक्त असत नाही . त्यामुळे या धोरणाचा पराभव करणे हे अशक्य बनते कारण हे सर्व काही मानसशास्त्राच्या कक्षेत येते आणि मन ही गोष्टच अशी आहे की ती कधीही नव्याने तयार करता येत नाही ती पुन्हा पुन्हा जुनाट गोष्टींना रिपीट करत बसते अलीकडे तर ब्रेन सुद्धा अशाच पद्धतीने फंक्शन करतो असे वैज्ञानिक सत्य पुढे आलेले आहे त्यामुळे या गोष्टी बदलणे आपण समजतो तितके सहज सोपेपणाने शक्य नाही १९४७ नंतरच अशा प्रकारचे परिवर्तन घडवणे सोपे झाले असते पण दुर्दैवाने तसे त्या काळात ते झाले नाही कारण शेवटी वर्ण व्यवस्था मागल्या दाराने आली. आपल्याकडच्या आरक्षणाच्या धोरणाने या सर्व गोष्टी पुन्हा एकदा पुरोगामी लोकांनी सुद्धा पुनर्जीवित केल्या आणि कदाचित ती त्या काळाची गरज ही होती परंतु या गरजेने आता वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्थेचा पराभव करणे अशक्य करून टाकलेले आहे ही वस्तुस्थिती ! आणि एकदा शिक्षण देणाऱ्या संस्थांच्यातच तुम्ही वर्ण, जात आणि धर्म यांचे संस्कार करायला लागला की जे काय होते ते झालेले आहे .आज मानसिक पातळीवर प्रत्येक जण आपला वर्ण आणि आपली जात आणि आपला धर्म या तीन गोष्टी स्वीकारताना दिसतो त्यामुळेच आज सुद्धा हनुमान अंश सारखा चित्रपट प्रचंड प्रमाणात व्यवसाय करताना दिसतो या गोष्टीचे काहीही करता येत नाही आणि त्यामुळे वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्था या सनातन व्यवस्था आहेत अशी प्रौढी ब्राह्मण धर्म सहजरीत्या मारू शकतो . याचा अंतिम फायदा अर्थातच इस्लाम धर्माला होणार आहे . कारण अशा फळ्या पडलेला धर्म इस्लामला पराभूत करणे अशक्य करून टाकतो . मला वर्ण जात व्यवस्थेमुळे इस्लामपुढे सर्व इंडियन धर्म हरले तर आश्चर्य वाटणार नाही . म्हणजेच एका अर्थाने वर्ण जात व्यवस्था आणणारे ब्राह्मणच सर्व इंडियन धर्मांना पराभूत करून टाकणार आहेत इंडियन धर्मांना इस्लामच्या दावणीला बांधणार आहेत आणि भारतामध्ये साधारणपणे २०९० च्या आसपास जर का इस्लामिक राजवट आली तर आपण आश्चर्य मानू नये. ब्राह्मण काही स्वतःचा स्वार्थ सोडणे शक्य नाही त्यामुळे शेवटी तेच आपल्याच धर्माचा बळी घेऊन शांत होतील अशी चिन्हे आता दिसायला लागलेली आहेत.
माणसाला वाटणारा उच्चत्वाचा अहंकार आणि त्या अहंकाराची पूर्ती करण्याची आसक्ती ही एक अत्यंत सनातन गोष्ट असल्याने वर्ण जात व्यवस्था कायमच धगधगत राहते यातून बाहेर पडायचे असेल तर उपाय एकच असतो तो म्हणजे मोक्ष पण तो उपाय स्वीकारण्याची तयारी कुठल्याच पुरोगामी विचार प्रणालीची नसते आणि त्यामुळेच पुरोगामी व्यवस्था कधीही या वर्ण जाती व्यवस्था नष्ट करू शकत नाहीत . उलट त्यांनी सुद्धा वर्ण आणि जात या दोन गोष्टी बळकटच केलेल्या दिसतात कारण त्यांच्यामुळेच आतापर्यंत फक्त मौखिक परंपरेत रंगणारे हे दोन घटक लिखित झाले आणि नंतर छापील झाले आणि त्यांना एक प्रकारे पर्मनंट चा शिक्का या पुरोगामी व्यवस्थांनी लावला म्हणजे पुरोगामी व्यवस्थेने वर्ण आणि जात बळकट केले . पूर्वी मौखिक असल्यामुळे निदान पलायनाच्या वाट्या होत्या त्या वाटा सुद्धा आता बंद झालेल्या दिसतात कारण तुम्ही कितीही काही सांगितले तरी तुमच्या पूर्वजांच्या वर्ण जात व्यवस्थेचे दाखले मिळत राहतात .
त्यामुळे एक तर मोक्ष स्वीकारा किंवा मग वर्ण जात व्यवस्था स्वीकारा असाच एक अंतिम पर्याय आपल्यापुढे उभा राहतो आज तरी हा पर्याय स्वीकारण्याची तयारी कोणाची आहे असे दिसत नाही . मोक्ष मिळवायचा असेल तर तुम्हाला केवळ वर्ण जात किंवा धर्म यांचाच त्याग करावा लागत नाही तुम्हाला सर्वच प्रकारच्या उच्चत्वाचा त्याग करावा लागतो ज्याला हा त्याग जमत नाही त्याला मोक्ष मिळत नाही . किंवा त्याच्या साधनेमध्ये सुद्धा काहीही प्रगती होत नाही . असो.
आता हळूहळू का होईना आता हळूहळू का होईना पण आपण सर्व शैव पूर्णपणे गिळलेले आहे याची खात्री ब्राह्मण धर्माला पटलेली असल्याने हळूहळू हिंदू धर्म हा शब्द सुद्धा नाहीसा होईल आणि त्या जागी सनातन धर्म हा शब्द आणला जाऊन या सनातन धर्मामध्ये आता बाकीचे काही उरलेले घटक सामील कसे करून घेता येईल ते पाहिले जाईल विशेषतः आदिवासी लोकांच्या संदर्भामध्ये हा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहे आणि आदिवासी लोकांनी सनातन धर्म स्वीकारावा म्हणून हळूहळू फार मोठा प्रचार यंत्रणेचा अजेंडा राबवला जाणार हे आता स्पष्ट होत आहे प्रश्न इतकाच आहे की हा सनातन धर्म युरेशियन धर्मांच्या पैकी जे ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्म आहेत त्यांना स्वतःमध्ये सामावून घेणार आहे का? मला स्वतःला असे वाटते की कदाचित सनातन शब्द आणण्यामागे एक कारण हेच आहे की नव बौद्ध, जैन, आदिवासी आणि ज्युदाइक युरेशियन धर्म हे सर्वच्या सर्व आता एका धर्माच्या म्हणजेच ब्राह्मण धर्माच्या तत्वाखाली सनातन धर्म या नावाने आणणे . ही महत्त्वाकांक्षा अनेकांना मोठी वाटते परंतु ती अगदीच अशक्य आहे असे म्हणता येत नाही . पण हे करण्यामध्ये वर्ण जात व्यवस्था फार मोठा अडथळा आहे कदाचित त्यामुळे वर्ण जात व्यवस्था नष्ट करावी असा प्रचार होऊ शकतो परंतु हा फक्त सुरुवातीचा प्रचार असणार की हे कायमस्वरूपी धोरण असणार हे सांगणे फार कठीण आहे कारण कदाचित धर्मांतर करेपर्यंत किंवा धर्मांतर घडवेपर्यंत हे केले जाईल आणि नंतर पुन्हा एकदा मागल्यादाराने वर्ण जात व्यवस्था आणली जाईल कारण जो जो पराक्रमी असतो त्याला व्यवस्थितपणे ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा दर्जा देऊन अनुयायासकट ब्राह्मण धर्मात सामावून घेण्याची एक फार व्यवस्थित काल्पनिक व्यवस्था निर्माण झालेली आहे आणि तिच्या आधारे कोणाचेही धर्मांतर होऊ शकते . पराक्रमी माणसांचा पराक्रम हाच त्यांना अनेकदा अहंकारी बनवतो आणि या अहंकाराला सर्वोत्कृष्ट म्हणून मान्यता देण्याची खेळी म्हणजे वर्णव्यवस्था होय . जोपर्यंत पृथ्वीतलावर माणसाचा हा अहंकार आणि प्रतिष्ठा प्राप्त करण्याची आसक्ती शाबूत आहे तोपर्यंत वर्णव्यवस्था नष्ट होणे कठीण आहे. दैवतीकरण नष्ट होणे कठीण आहे दैवीकरण नष्ट होणे कठीण आहे . त्यामुळे ठाकूर आता जे काही करत आहे त्याला लाईटली घेऊ नका हे सर्व नंतर प्रचंड वजनदार होणार आहे .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment