तुम्हाला शैव धर्मात पंडित का हवे आहेत श्रीधर तिळवे नाईक
हा एक प्रश्न अली वारंवार विचारला जात आहे म्हणून त्याचे उत्तर देत आहे .ब्राह्मण वर्ण प्रामुख्याने ज्ञानाच्या केंद्रात आहे त्यामुळे ज्ञानाची इज्जत निदान युरेशियन लोकांच्या तरी टिकलेली दिसते आणि राहते. बहुजन समाजात काय दिसते? विचारवंतांची हालत काय आहे ? महात्मा फुले यांचे आपण नेमके काय केले ? हरी नरके पासून संजय सोनवणी पर्यंत अत्यंत चांगले विचारवंत बहुजनांच्या मध्ये झाले आहेत आणि आत्ताही आहेतच. पण त्यांची काय कदर आपला बहुजन समाज करतो किंवा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची काय कदर मराठा समाजाने केली ? आता सुद्धा आ ह साळुंखे यांची काय कदर आपण करत आहोत? किती लोकांचा त्यांना पाठिंबा आहे ? बहुजन समाजातल्या किती राजकीय पुढार्यांनी हे विचारवंत वाचलेले आहेत ? माझ्या दृष्टिकोनातून हे सर्वच्या सर्व पंडित आहेत. पंडित याचा अर्थ विद्वत्ता असलेला मनुष्य पांडित्य असलेला मनुष्य ! आपल्याकडे मोक्ष मिळालेला मनुष्य अनेकदा पंडितांची खिल्ली उडवत असतो परंतु पंडित हे फक्त काय मोक्षाच्या क्षेत्रात काम करत नसतात आपल्याकडे ओशो रजनीश्यांच्या सारख्या फालतू लोकांच्यामुळे अनेकदा असा गैरसमज पसरलेला दिसतो. पंडित हे प्रत्येक क्षेत्रात असतात. आणि प्रत्येक क्षेत्रात लागतात .
वस्तुस्थिती अशी आहे की ज्ञानाची उपासना बहुजन समाजाला माहीत नाही इतका त्याला ज्ञान उपासनेचा विसर पडलेला आहे. अनेकदा तरी लोक ज्ञानाचा प्रश्न आला की ब्राह्मणालाच बोलवतात . बहुजन समाजातला पंडित त्यांना आठवत नाही . अशावेळी फक्त ब्राह्मण बोलवण्याचा उद्योग करून बसलेले लोक बहुजन समाजाच्या राजकारणात भरपूर वावरतात. अपवाद फक्त राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड महाराज होते . पण त्यांच्याकडे सुद्धा ब्राह्मण पंडित किती होते आणि ब्राह्मणे तर पंडित किती होते याचाही एकदा नीट कोणीतरी आढावा घेतला पाहिजे .
याही पुढची गोष्ट म्हणजे ब्राह्मणेतर लोकांनी नंतर शिक्षण क्षेत्र ताब्यात घेतले. अनेक ब्राह्मणे तर शिक्षण महर्षी झाले . आज आपण त्या शिक्षण संस्थांच्या कडे पाहिले तर काय दिसते ? त्या शिक्षण संस्थाची काय अवस्था त्यांनी केलेली आहे ? या संस्थांच्या नावाने त्यांनी किती पैसे जमवले ? काय पद्धतीच्या संस्था या लोकांनी काय पद्धतीने चालवल्या ? यांनी स्थापन केलेल्या संस्थांच्या मध्ये काय प्रकारचा भ्रष्टाचार चालतो? साधा प्राध्यापक होण्यासाठी सुद्धा पैसा सध्या कोण घेतो आणि यातल्या किती जणांच्या संस्था भ्रष्टाचार मुक्त आहेत. दरवेळेला जुन्या काळातल्या सामनांच्या वर्ण जात व्यवस्था पाळणाऱ्या शिक्षण संस्था चर्चांच्या मध्ये आणून वर्तमान काळाला नेमका काय फायदा होतो आणि मुळात त्याच्यामुळे वर्तमान काळातल्या ब्राह्मणेतरांच्या संस्थावर पांघरून घालून काय फायदा ?
काय आहे? शिव्या घ**** फार सोपे असते परंतु ब्राह्मण जेव्हा शिक्षण संस्था चालवत होते तेव्हा तिथे करप्शन कमी होते आणि अनेकदा अतिशय उत्तम शिक्षक मिळत पण होते कारण गुणवत्तेला वाव होता आपण ब्राह्मणेतरांच्या संघटना काढल्या खऱ्या पण त्या भ्रष्टाचार मुक्त आणि राजकारण मुक्त चालवल्या का ? कोणत्या शिक्षण संस्थांच्या मध्ये आता अक्षरशः साठ लाखाला प्राध्यापकी विकली जाते ? अशा वेळेला कोणत्या तोंडाने ज्ञानाचे सेलिब्रेशन चालू आहे असे म्हणावे ? वस्तुस्थिती अशी आहे की आपल्या लोकांच्यातील राजकारण करणारे लोक हे पैशासाठी खवखवलेले लोक आहेत. त्यांना काही ज्ञानाशी संबंध असावा असे वाटत नाही. त्यांना फक्त ज्ञान फक्त शिक्षण म्हणून आणि शिक्षणाचा व्यापार म्हणून वापरायचे असते मग ते ज्ञान ब्राह्मणाचे असले तरी चालते तेव्हा ज्ञानाची ही जी अवदसा करून ठेवलेली आहे ती अगोदर नष्ट करायची असेल तर पांडित्य टिकवले पाहिजे. ब्राह्मणांना हटवा क्षत्रियांना हटवा असे म्हणायला हरकत नाही पण असे म्हणण्याआधी त्याच्या बदल्यात तुम्ही काय देणार आहात ते सांगाल की नाही? की नुसते हे जाऊ दे आणि ते जाऊ दे क्षत्रिय हटवा ब्राह्मण हटवा इतकीच आरडा ओरड करायची आहे ?पण क्षत्रिय हटवले तर त्या जागी वीर समाजातले लोक हवेत उद्या लढाई झाली तर काय करायचे ? ऐनवेळी क्षत्रियांना शोधत बसणार काय ?
त्यामुळेच मी पंडित समाज आणि वीर समाज असे दोन्ही समाज स्वीकारतो त्यातच भविष्य सुद्धा आहे बरे हे दोन्हीच्या दोन्ही समाज कोणालाही ओपन आहेत कारण कोणीही पंडित बनू शकतो कोणीही वीर बनू शकतो अनेकदा वैश्य आणि शूद्र या वर्णांच्यातले लोक आपल्याला पंडित किंवा वीर बनलेले दिसतात आणि नंतर मग त्या लोकांना ब्राह्मण लोकांनी ज्ञानाचे राजकारण खेळत क्षत्रिय बनवलेले दिसते . क्षत्रिय झाल्यानंतर अनेकदा मूळ वीर किंवा पंडित असलेला ब्राह्मण किंवा क्षत्रिय झाल्यावर उच्चत्वाचे वेड लागून बिघडलेला दिसतो .
तेव्हा पुढे सरकण्यासाठी काय करायचे याचा नीट समतोल पण ठेवावा लागतो. गाव गप्पा हाणायला काय अक्कल लागते ? निगेटिव्हिटी सादर करायला काय अक्कल लागते ? या समाजाचे कन्स्ट्रक्शन कसे करणार याचाही मॅप तुमच्याजवळ असायला हवा आजही ब्राह्मणेतर पंडित हा दुर्लक्षितच आहे बापटांच्या संस्कृतचे कौतुक होते पण आ. ह साळुंखेच्या संस्कृतचे काय? त्यांच्या संस्कृत शिकण्याचे मीडियामध्ये बापटांचे इतके कौतुक झाले नाही आणि आताही कौतुक होत नाही असे का हे सुद्धा आता विचारायला हवे याचे कारण मला आपल्या ब्राह्मणे तर लोकांनाच त्यांचे कौतुक नसते त्यांच्या संस्कृतचे कौतुक नसते असे जाणवलेले आहे .
तेव्हा प्रथम ब्राह्मणे तर समाजातल्या ज्ञानवंतांची प्रतिभावंतांची कदर करायला शिका तुम्ही ती करत नाही ही गोष्ट तुम्हाला कोणी स्पष्टपणे सांगत नाही कारण प्रत्येकाला स्वतःचे हितसंबंध टिकवायचे आहेत . मी संन्यासी असल्याने स्पष्टपणे बोलू शकतो एवढाच काय तो संन्यासी असण्याचा या देशात फायदा आहे .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment