विषय घटनाच्या कविता
Resurrection श्रीधर तिळवे नाईक
आणि तू म्हणालास
I will resurrect you
हिरव्या रंगांच्या भिंती अधिक हिरव्या
जणू सपाट झाड
किरण पोहोचत नाही
तिथे छतातून सूर्य पोहचलेला
जमिनीवर यमाने टाकलेली अदृश्य चादर
आता मान मोडून पडलेली
मी विषप्रयोगाने मेलो होतो
आणि तू म्हणालास
I will resurrect you
ऑथर इज डेड
आयडिया लॉजि इज डेड
हिस्टरी इज डेड
मृत्यूचे युग सर्वत्र
आणि झालेला हिरवा विषप्रयोग
मारणारा मर्डर करून निघून गेला
आणि माझे डोळे तुझ्या मध्ये उघडे
आणि तू म्हणालास
I will resurrect you
तुला हो म्हणावे की शांतपणाने नाहीसे व्हावे
पुन्हा या जगात जन्मून तरी करणार काय ?
त्याच आसक्त भुका तृष्णा आणि प्रदूषित झालेले श्वासहवामान
बदल करायला जावे तर
सनातनांची दलदल ,दलाल आणि दल उभे
लोकांना शहाणे करून सोडावे म्हणावे तर
कित्येक जणांना मूर्ख ठरवून
लोक शांत
डोळे द्यायला जावे
तर आंधळेच तुमच्या विरोधात
कान उघडे करा म्हटले
तर वाजणारे डीजे
आणि परंपरेचे ढोल
कीहोलमधून बघण्याची मुभा त्याला स्वातंत्र्य समजणारे लोक
कुणासाठी कुणी काय करावे
मी तुझ्यात उमललो
तर गुन्हा समजून
माझ्यात मळ धाडला गेला
आता कमळ हे कमळच
ते चिखलाने थोडेच मलीन होणार आहे ?
कमळाच्या नावाखाली चिखल जमवता येतो
पण त्या चिखलाला कमळ करता येत नाही
जे लोक कमळात सुद्धा लक्ष्मीला उभे करतात
त्यांना ज्ञानाची किंमत काय
मी पुन्हा जन्माला नकार देतोय
आणि तू म्हणतोयस
I will resurrect you
माझे पाय शक्तिमान होत आहेत
माझा पाठीचा कणा सुपरमॅन बनतोय
आता हात एकदा स्पायडरमॅन झाले
की मी उडायला मोकळा
मोकळा ढाकळा
तुझ्या या पृथ्वीचा ढोकळा खायला
मी माझ्या शरीरात पडून
आणि तू म्हणतोयस
I will resurrect you
तुलासुद्धा मला निर्णयाचे स्वातंत्र्य द्यावेसे वाटते
मी निर्णयात नाही
तुझ्या त्या सहस्वाभाविक स्वातंत्र्यात उभा आहे
श्रीधर तिळवे नाईक
( निर्वाण सिरीज मधील लॉकडाऊन मधील क्वारंटाईन स्वगते या महाकाव्यातील विषघटनाच्या कविता या खंडातून)
Comments
Post a Comment