श्रद्धा विरुद्ध मोक्ष अर्थात मोक्षाने श्रद्धेचा विरोध का केला नाही ? 

भारताच्या इतिहासामध्ये ज्या काही गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत त्यामधील एक गोष्ट म्हणजे श्रद्धा निर्माण झाल्यानंतर जी एक श्रद्धा प्रणाली उभी राहिली तिच्या विरोधात आश्चर्य कारकरीत्या संघर्ष झालेला नाही जगामध्ये सर्वत्र मांत्रिकांच्या विरोधातल्या लढाया लढल्या गेलेल्या आहेत अगदी पारंपारिक बनवल्या जाणाऱ्या इस्लामने सुद्धा आणि त्यांच्या प्रेषिताने सुद्धा त्याच्या काळामध्ये अस्तित्वात असलेल्या श्रद्धेशी लढाई लढली आणि स्वतःची नवीन महाश्रद्धा निर्माण केली म्हणजेच मजहब निर्माण केला. भारतामध्ये अशा प्रकारचा संघर्ष फार निखराला कधीच पोहोचलेला दिसत नाही याचे कारण काय आहे हा एक फार मोठा प्रश्न आहे.


जगभरात श्रद्धे विरोधातल्या लढाया यशस्वी कितपत झाल्या याविषयी मात्र फार मोठा प्रश्न आहे आणि मांत्रिक जिवंत राहिल्यामुळे साहजिकच आपोआपच मांत्रिकी( हिला समाजशास्त्रामध्ये यातू म्हणतात ) जिवंत राहिली आणि मांत्रिकी जिवंत राहिली म्हणून श्रद्धां आणि अंधश्रद्धा यांचा गजबजाट कायमच या जगामध्ये होत राहिला .


भारतामध्ये हा संघर्ष टोकाला न जाण्याचे कारण मुळात ज्या माणसाला प्रथम मोक्ष मिळाला त्यानेच ही लढाई लढली नाही . किंबहुना त्याला ती लढावी लागलीच नाही .शैव श्रुतीमध्ये भगवान शंकर यांनी परंपरेने चालत आलेल्या श्रद्धा प्रणालीला बदलून त्या प्रणालीत असलेल्या सर्व मांत्रिक लोकांना पंडित बनवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो आणि तो संपूर्णपणे जवळजवळ यशस्वी झालेला दिसतो त्यामुळे अर्थातच शैव प्रणालीमध्ये असलेले पारंपारिक भगत लोक होते जे मांत्रिक विद्या चालवत होते मंत्र वगैरे करत होते त्या सगळ्यांना अर्थातच माघार घ्यावी लागली एका अर्थाने ते आपल्या परतण्याची संधीची वाट बघत बसले या भगत लोकांची संख्या अत्यंत कमी होती कारण बहुतेक सर्वच भगत मांत्रिकांनी आपला व्यवसाय त्यागला आणि मोक्षाचा स्वीकार करून एक नवीन शैव जीवन प्रणाली निर्माण करण्याचा आणि विकसित करण्याचा जो भगवान शंकरांचा प्रयत्न होता त्याला हातभार लावला परिणामी संपूर्ण भारतभर आणि नंतर भारताच्या बाहेर सुद्धा आपणाला शैव लोकांचा एक मोठाच सेटअप तयार झालेला दिसतो 


त्या उलट आपण ग्रीक लोकांच्यात जर बघितले तर सॉक्रेटिसचा संघर्ष सरळ सरळ पारंपारिक श्रद्धेशी झालेला दिसतो . सॉक्रेटिसच्या आधी तिथे ग्रीक श्रद्धा होती आणि या ग्रीक श्रद्धेची स्वतःची महाकाव्य रचना सुद्धा सुद्धा तयार झालेली होती खुद्द सॉक्रेटिसचा या श्रद्धेवर विश्वास होता की नव्हता हा एक फार मोठा प्रश्न आहे कारण अनेकदा या श्रद्धेबाबत त्याने काही पॉझिटिव्ह सुद्धा उद्गार काढलेले आहेत मात्र सॉक्रेटिस सत्यशोधनाचा आपला आग्रह कायम ठेवतो आणि केवळ या आग्रह पोटी त्याला शिक्षा मिळालेली दिसते त्याने नेमके काय सत्य शोधले याच्याबद्दल मात्र आपणाला फार सुगावा लागत नाही याचा एक परिणाम असा झालेला आहे की सॉक्रेटिस नंतर मग सत्यशोधनाची एक दार्शनीक परंपराच ग्रीक परंपरेमध्ये तयार झाली आणि आपणाला असे दिसते की प्लेटोने सॉक्रेटिसला काय सत्य शोधायचे होते ते व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा प्रतिवाद अरिस्टॉटलने केला म्हणजेच इथेच श्रद्धेनंतर ती महाश्रद्धा बनण्याआधीच म्हणजेच रीलिजन बनण्याआधीच दार्शनीक परंपरा आलेली दिसते मोक्षापर्यंत ग्रीक तत्त्वज्ञान का गेले नाही हा एक फार मोठा प्रश्न आहे याचे कारण उघड आहे काही लोकांना असे वाटते की तिथे मोक्ष निर्माण झाला आणि हेराक्लिट्स आणि पायथागोरस हे मोक्षाच्या गोष्टी करतात असाही एक समज आहे माझ्या मते हा समज चुकीचा आहे प्रत्यक्षामध्ये हे राक्लिटसच्या कुठल्याही लिखाणामध्ये आपणाला मोक्षाचे काहीही मिळत नाही मात्र मोक्षाच्या तत्त्वज्ञानाशी साम्य दाखवणारे तत्त्वज्ञान मात्र काही प्रमाणात आपणाला मिळते पण ते पुरेसे वाटत नाही . असे वाटते की ही यात्रा ध्यानापर्यंत पोहोचली पण सविकल्प समाधी किंवा निर्विकल्प समाधी पर्यंत पोचलीच नाही पुढे मग याच श्रद्धांच्या आधारे रोमन कॅथोलिक धर्म निर्माण झालेला दिसतो .


एका अर्थाने ग्रीक श्रद्धेतून आपणाला महाश्रद्धा निर्माण झालीच नाही असे दिसते मात्र दर्शन आणि तत्वज्ञान तिथे नक्कीच निर्माण झाले आणि त्यामुळेच त्यातून पुढे वैज्ञानिक तत्व प्रणाली सुद्धा आपोआपच उभी राहिली 


भारतामध्ये मोक्ष उभा राहिला परंतु वैज्ञानिक तत्व प्रणाली मात्र उभी राहिली नाही याचे कारण आपल्याकडे वैज्ञानिक दर्शन प्रणालीला उपयुक्त अशा ज्या गोष्टी फार मोठ्या प्रमाणात पुढे येणे आवश्यक होते ते झालेले नाही आणि याला कारण भारतामध्ये अचानकपणे निर्माण झालेला ब्राह्मण धर्म होय एकदा धर्माची निर्मिती झाली की मग विज्ञान निर्माण करणे फार अवघड जाते आपल्याला इस्लाम मध्ये सुद्धा हेच घडलेले दिसते किंवा ज्यू लोकांच्यातसुद्धा हाच प्रकार झालेला दिसतो म्हणजेच एका अर्थाने धर्म हा विज्ञान येण्याच्या बाबतीत फार मोठा अडथळा आहे हेच इथे स्पष्ट व्हावे याचे कारण उघड आहे धर्माचा स्वतःचा कणा सुद्धा श्रद्धा आहे आणि धर्म हे श्रद्धेचे राजकीय तत्त्वज्ञान आहे जे सत्तेवर यायला उत्सुक आहे साहजिकच सर्वत्र फक्त धर्म येत नाही धर्माची सत्ता पण येते आणि एकदा धर्मसत्ता आली की ती मग श्रद्धेच्या अंगाने सर्व मांडणी करायला लागते हे आपणाला ब्राह्मण धर्म वैष्णव धर्म यांच्या बाबतीत जास्त तीव्रपणाने जाणवते आणि नंतर जेव्हा शैवलोकधर्मातल्या लोकांनी स्वतःचा धर्म उभा करायला सुरुवात केली स्वतःचे राजकीय तत्वज्ञान उभे करायला सुरुवात केली तेव्हा मग शैव लोकांच्या राजवटी सुद्धा उभा राहिलेल्या दिसतात शैव दंड नीती ही त्या त्या राजानेच विकसित करायची गोष्ट असल्यामुळे आपणाला प्रत्येक शैव राज्यानुसार वेगवेगळी दंड निती निर्माण झालेली दिसते याचे उत्तम उदाहरण मी मागेच सांगितलेले आहे की खुद्द शिवाजी महाराज आहेत .


वैदिक श्रद्धेच्या बाबतीत हे घडलेले दिसत नाही साहजिकच तिथे ब्राह्मणधर्माने कौटिल्य प्रणित अर्थशास्त्र नावाची दंडनीती विकसित केली आणि ती फॉलो करण्याचे आव्हान केलेले दिसते या दंडनीतिचे पुस्तक नंतर मिळाले असले तरी त्याच्या तत्त्वांची कल्पना महाभारतापासूनच आपणाला येते साहजिकच महाभारतात सांगितलेली दंडनीती हीच अनेकदा वैष्णव राज्यांची दंडनीती झालेली दिसते . कारण वैष्णो धर्मामध्ये महाभारताला स्मृती म्हटलेले आहे आणि वैष्णव धर्माची स्मृती महाभारत आहे अशी ही संकल्पना आहे पुढे त्यातूनच मग महाभारतातली गीता हे वैष्णवांचे मुख्य तत्त्वज्ञान झाले आणि त्यामुळेच मग वर्णसंकर होऊ द्यायचे नाही हे जे वैष्णव धर्माचे आद्य तत्व भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितलेले आहे ते प्रत्येक वैष्णव राज्याने पाळलेले दिसते . त्यामुळेच भारतामध्ये वर्णव्यवस्था ही हळूहळू प्रस्थापित होत गेली .


हे सर्व सहजरीत्या साध्य झाले कारण मोक्षाच्या संदर्भात श्रद्धेशीची लढाई व्हायला हवी होती ती लढाई झालीच नाही मोक्षाने नेहमीच श्रद्धेबरोबर कॉम्प्रमाईज केलेले दिसते आणि या तडजोडीची फार मोठी किंमत या देशाला मोजावी लागली भारतामध्ये अनेक मोक्ष मिळालेले सिद्ध स्त्री-पुरुष हे श्रद्धेच्या विरोधात जाण्याऐवजी श्रद्धेला कसे बदलता येईल अंधश्रद्धा कशी नीट करता येईल याच अंगाने विचार करताना दिसतात श्रद्धेच्या विरोधात लढाईच न घडल्यामुळे आपण मोक्ष सुद्धा नष्ट करणार आहोत आणि धर्मालाच बलवान करत आहोत ही बेसिक गोष्ट अनेक मोक्षवादी आणि मोक्ष मिळालेल्या सिद्ध लोकांना कळाली नाही. परिणामी समतेचे जे राजकारण भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इसवी सन 1000 नंतर यायला हवे होते ते आले नाही विज्ञान सुद्धा आले नाही याला जबाबदार भारतातले सर्व सिद्ध आहेत त्यांनी यासंदर्भातले जर का लढे लढले असते तर कदाचित भारताचे दृश्य बदलले असते पण दुर्दैवाने असे झाले नाही सामाजिक आणि राजकीय तत्त्वज्ञानाशी तडजोड करायची आणि मोक्ष प्रणाली सांगत बसायचे असे काहीतरी उद्योग बहुतांशी सिद्ध लोकांनी केलेले दिसतात. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की तरीसुद्धा अनेक ठिकाणी त्यांचे संघर्ष तरीही झाले कारण मोक्षाबाबत ते जी समता सांगत होते ती समता धर्माबाबत सुद्धा लागू होईल अशी भीती कायमच धर्म कर्मठ लोकांना लागून होती साहजिकच मोक्ष मिळालेल्या प्रत्येक सिद्धाला अनेकदा धर्म घाबरताना दिसतो आणि या धर्मा पोटीच मग काही लोकांना त्रास सुद्धा दिला गेलेला आहे आणि कदाचित काही जणांच्या हत्या सुद्धा झालेले आहेत ज्याबद्दल आपला इतिहास मौन पाळतो .


प्रश्न असा आहे की आता तरी आपले सिद्ध लोक श्रद्धाशी लढणार आहेत की नाही की ते आत्ता सुद्धा श्रद्धेबरोबर राहून आश्रम काढत बसणार आहेत ? लोकांच्यात अंधश्रद्धा निर्माण करण्यासाठीच मदत करणार आहेत ? 


श्रीधर तिळवे नाईक


Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती