नागपंचमीची कोणी साप पंचमी केली ? श्रीधर तिळवे नाईक 

भारतातील शैव श्रुती ही सर्वात आधीची श्रुती आहे आणि बाकी सर्व नंतर आलेले आहे. साहजिकच या श्रुती मधून अनेक उत्सव निर्माण झाले त्यातील एक उत्सव म्हणजे नागपंचमी ! या सणाविषयी जितके गैरसमज आहेत तितके कदाचित कुठल्या सणाविषयी नाहीत .

सर्वात प्रथम आपण दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत . पहिली गोष्ट नाग म्हणजे हत्ती ! त्यातील हत्ती हा शब्द सुद्धा युरेशियन लोकांनी आणलेला शब्द आहे कारण त्यांच्यासाठी हा प्राणी नवीन होता आणि त्यांना हत्ती म्हणजे हात असलेला प्राणी वाटला कारण ते सोंडेला हात समजत होते हस्त वरून हस्ती मग हत्ती आणि नंतर मग हत्तींचे नगर ते हस्तीनापूर आले ती बडी हस्ती आहे असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण तो मोठा हत्ती आहे म्हणजे हत्ती इतका मोठा आहे असे म्हणत असतो तेव्हा नाग हा शब्द प्रथम हत्तीसाठी होता हे लक्षात घेतले पाहिजे 

मोक्षाच्या पातळीवर सर्प हा महत्त्वाचा प्राणी होता की नव्हता तर होता पण त्याचे नाते कुंडलिनीशी होते आणि खुद्द शंकर जेव्हा आपल्या गळ्यात नाग ठेवत होते तेव्हा तो नाग कुंडलिनीचा प्रतीक होता हे आपण लक्षात घेतले पाहिजे . इतकेच कशाला नदीला गंगा हा शब्द होता आणि प्रत्येक गंगा ही शंकराच्या जटेतून वाहते अशी आपली श्रद्धा होती पुढे गंगा हा शब्द फक्त गंगा नदी साठी वापरण्याचा उद्योग सुरू झाला. अन्यथा ती काही फक्त गंगा नदी नव्हती भारतामध्ये अनेक नद्यांना आज सुद्धा गंगा हा प्रत्यय लावला जातो तेव्हा त्याचा अर्थ नदी असा असतो म्हणजे पंचगंगा या शब्दाचा अर्थ पंचनदी असा होतो तर सर्वात प्रथम नाग म्हणजे हत्ती हे डोक्यात ठसवा अन्यथा हा उत्सव प्रथम हत्ती आणि नंतर सापासाठी आहे हे लक्षातच येणे शक्य नाही .

दुसरी गोष्ट प्रत्यक्ष शैव लोकांच्या मध्ये मात्र हत्तीला नागच म्हटले जात होते आणि हत्ती हा दळणवळण करणाऱ्या तीन प्राण्यांच्या पैकी एक प्राणी होता दुसरा प्राणी अर्थातच बैल आणि तिसरा प्राणी गाढव आहे . यातील अतिशय अवजड असे ओझे हत्ती सहज घेऊन जाई म्हणजेच एका अर्थांने जंगलामधून अनेक महत्त्वाच्या वस्तू हत्तीवर लादत आणि हत्तींच्या साह्याने त्याचे दळणवळण पार पाडे . नागावर नागाच्या पाठीवर म्हणजेच हत्तीच्या पाठीवर असलेले ते नग! नग हा शब्द आज सुद्धा प्रचलित आहे आणि नगर हा शब्द सुद्धा याच शब्दावरून आलेला आहे कारण जिथे नगांची खरेदी विक्री होते असा आणि त्यासाठी नगांची बाजारपेठ असलेला आणि सर्व गावांशी जोडला गेलेला भूप्रदेश म्हणजे नगर होय . नागपंचमी हा प्रामुख्याने नगरामध्ये जास्त साजरा होणारा असा सण आहे कारण तिथेच प्रामुख्याने हत्ती त्याच्यावर लादलेले सामान घेऊन दाखल होत होते त्या उलट युरेशियन परंपरेमध्ये सामानाचे वाहन करण्यासाठी घोडे होते . अगदी त्यामुळेच ट्रोजन हॉर्स तयार होऊ शकला . 

तिसरा जो पूजला जाणारा प्राणी आहे तो सर्प आहे पण तो पूजला जातो याचे सर्वात मोठे कारण त्याचे कुंडलिनीशी जोडले गेलेले नाते ! संपूर्ण शैव श्रुतीमध्ये कुंडलिनी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण ती सहा चक्रांना जोडते आणि तिचे जे सहावे चक्र आहे ते नागाचा फणा होय आणि त्यानंतरचे सातवे चक्र म्हणजे हत्ती होय. साहजिकच हत्ती आणि सर्प या दोघांची पूजा हळूहळू प्रचलित होत गेली प्रश्न असा आहे की मग हत्तीची पूजा का मागे पडली ? 

प्राचीन काळामध्ये भारतामध्ये हत्तींना माणसाळवण्याची विद्या भारतामध्ये सहज विकसित झाली .हत्तींची संख्या वाढेल याबद्दल सर्वच गणपती म्हणजे वेगवेगळ्या गणांचे अधिपती अत्यंत सजग होते . किंबहुना एखाद्या गणपतीची श्रीमंती मोजण्यासाठी त्याच्याकडे किती नग आणि किती नाग आहेत म्हणजे हत्ती आहेत ते तपासले जात होते . वाणी आणि पणी हे दोन समाज जे व्यापार करत होते त्यांच्याकडे सुद्धा हत्ती स्वतःचे असत आणि या हत्तीवरूनच अनेकदा ते व्यापार करत असत . साहजिकच हा उत्सव प्रामुख्याने व्यापारी वर्गाचा उत्सव होता आणि राजा सुद्धा त्यामध्ये भाग घेत असे कारण राजाकडे अनेकदा संरक्षणासाठी म्हणून हत्ती असत .

प्रश्न असा आहे की मग या नागपंचमीच्या सणांमध्ये हत्ती बाजूला का पडत गेले ? 

याचे पहिले कारण युरेशियन लोकांच्यामुळे झालेले घोड्याचे आगमन ! भारतामध्ये कधीही घोडे नव्हते घोडे हे नंतरचे युरेशियन लोक घेऊन आले हे आपण लक्षात घेतले पाहिजे किंबहुना ऋग्वेद हा बाहेरून आलेल्या लोकांचा आहे याचे जे काही पुरावे आहेत त्यात घोडे हा मोठा पुरावा आहे हा प्राणी दिसायला देखणा होताच पण त्याचबरोबर त्याच्यावर स्वार होणे हे हत्तीपेक्षा अधिक सोपे होते आणि त्याचबरोबर घोड्याचा वेग हा अतिशय वेगवान होता आणि मुख्य म्हणजे हत्तीपेक्षा त्याची साईज कमी असल्याने साहजिकच तो अधिक जास्त जागांच्या मधून बाहेर काढता येत होता 

त्यामुळेच प्राचीन काळात जे भारतीय राजे लोक जेव्हा युद्ध करत तेव्हा त्यांच्याकडे हत्तींचे खास दळ होते पुढे अलेक्झांडर आणि मुस्लिम लोकांच्या वर्चस्वानंतर त्याची जागा अश्वदळाने घेतली . आपल्याला रामायण आणि महाभारतामध्ये घोडे दिसतात याचा अर्थ स्पष्ट आहे की युरेशियन लोकांचे आगमन झाल्यानंतरच रामायण आणि महाभारत लिहिले गेले आहे . त्यामुळेच रामायण आणि महाभारत यांचा कालखंड जेव्हा आपण निश्चित करतो तेव्हा आपणाला मनुष्य आश्वारोहण करायला कधी शिकला असा प्रश्न विचारता येतो. कारण या विद्येनंतरच हळूहळू रथ संस्कृती विकसित झाली . आज सुद्धा अश्व इतिहासामध्ये प्रथम रथ तयार झाले की प्रथम थेट माणूस घोड्यावर बसायला शिकला हा एक कळीचा प्रश्न आहे . काहींच्या मते प्रथम घोड्यावर बसता येत नव्हते पण घोडे जोडता येत होते त्यामुळे घोडे हे गाढवांच्याप्रमाणेच सोबत आणले जात होते पण त्यांच्यावर स्वार होता येत नव्हते स्वार होण्याची विद्या नंतर आली तर काहींच्या मते प्रथम मनुष्य लोक घोड्यावर स्वार व्हायला शिकले पण काही लोकांच्यासाठी जे प्रामुख्याने सेनापती असत रथ तयार केले जाऊ लागले . कारण घोड्यावर सुरुवातीच्या कालखंडामध्ये चिलखत तयार नसल्याने बांध लागण्याची शक्यता होती आणि या शक्यतेपासून वाचण्यासाठी म्हणून सेनापतीला घोड्याच्या रथात बसवायचे जेणेकरून त्याच्यावर हल्ला होऊ नये म्हणून रथ तयार झाले .

एक गोष्ट मात्र नक्की आहे तो म्हणजे हा घोड्यावर स्वार होण्याचा शिकण्याचा कालखंड साधारण इसवी सन पूर्व १००० च्या आसपास आहे त्यामुळेच रामायण आणि महाभारत यांची प्राचीनता या कालखंडाच्या आधी नेणारे लोक इतिहासाच्या पातळीवर आंधळे असतात असे समजायला हरकत नाही 

तेव्हा सर्वात प्रथम एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे नागपंचमी म्हणजे हत्तीची पूजा करण्याचा सण आहे ज्या प्रमाणे बैलपोळा असतो आणि आपण बैलाची पूजा करतो त्याचप्रमाणे आपण हत्तीची सुद्धा पूजा करत होतो भारतामध्ये अगदी गाढवाची सुद्धा पूजा करणारे लोक होते ते कालांतराने नाहीसे झाले .

प्रश्न असा आहे की हे दोन प्राणी का नाहीसे होत गेले ? याचे सर्वात मोठे कारण अचानक हस्तिदंताला आलेले महत्त्व त्यामुळे त्यांची वाढलेली शिकार आणि साहजिकच त्यामुळे हत्ती हा स्वतःच मग एक विक्रेय वस्तू बनला त्याचा दात हा विक्रय वस्तू बनला आणि त्यामुळे हत्तींची शिकार प्रचंड प्रमाणात वाढत गेली कारण हस्तिदंत हा एक फार मोठा उद्योग होऊन बसला दुसरी गोष्ट मी आधीच सांगितले आहे की घोड्याने युद्धामध्ये हत्तीला रिप्लेस केले तिसरी गोष्ट अर्थातच हत्तीची प्रजनन क्षमता घोड्याच्या प्रजनन क्षमतेला मॅच होऊ शकली नाही आणि साहजिकच हत्ती हा हळूहळू प्रजनन क्षमतेच्या पातळीवर सुद्धा संख्येने कमी तयार होऊ लागला आणि सरते शेवटी भारतामध्ये तो दुर्मिळ होत गेला आता अशा दुर्मिळ होत गेलेला प्राण्याची पूजा कोण करणार म्हणूनच नागपंचमी ही हत्तीची पंचमी आहे ही गोष्ट लोक विसरून गेले नंतर तर मुस्लिम लोकांच्या आक्रमण झाले जे प्रामुख्याने घोड्यावरच बसून आले होते आणि या लोकांच्या बरोबरचे व्यापारी लोक होते त्यांना हत्तीची तितकीशी आवश्यकता व्यापार करण्यासाठी भासत नव्हती ते त्यासाठी घोडेच वापरत त्यामुळे ही हत्तीचे महत्त्व कमी होत गेले अर्थात दक्षिण भारतात मात्र ते दीर्घकाळ टिकले होते .

एकदा हत्तीची पूजा करणे साईडलाईन होत गेले आणि त्या जागी मग अधिक उपलब्ध असणारे सर्प लोकांना सोयीचे वाटले शिवाय कुंडलिनी ची पूजा करण्यासाठी म्हणून सर्प हा पूजनीय होताच विशेषत: नागाची पूजा या संदर्भात अधिक महत्त्वाची होती . त्यामुळेच नागपंचमीतला नाग हत्ती गेला या हत्तीला पूजक म्हणून पुजणारे नागलोक गेले किंबहुना महाभारत म्हणजे नाग लोकांची हत्या कशी होत गेली त्याचा कळत नकळत लिहिला गेलेला इतिहास आहे . आणि त्या जागी मग नाग म्हणजे सर्प हे समीकरण रूढ झाले हे समीकरण रूढ करताना दूध कुठून आले ? तर त्याचा संबंध थेट शिवलिंगाशी आहे शिवलिंगावर साधारणपणे दूध अभिषेक करण्याची प्रथा प्रचलित होत गेली कारण वैदिक लोक स्वतःबरोबर फार मोठ्या प्रमाणात दूध संस्कृती घेऊन आले . वास्तविक शिवलिंगावर त्याआधी जल अभिषेक महत्त्वाचा मानला जात होता परंतु या लोकांनी शैव धर्म स्वीकारल्यानंतर त्यांनी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक सुरू केला . वास्तविक शिवलिंगावर फक्त महाशिवरात्रीला दूध अभिषेक करण्याची प्रथा होती पण ही प्रथा बाजूला पडत गेली आणि त्या जागी दररोज दुधाचा अभिषेक करण्याची प्रथा युरेशियन लोकांनी शैव-धर्मामध्ये प्रचलित केली . दूध हे पवित्र असल्याने ते साहजिकच मग कुंडलीने इतके पवित्र मानल्या गेलेल्या सापाला सुद्धा पाजण्याचा रिवाज आला वास्तविक साप मांसाहारी आणि स्तन नसलेला असा प्राणी असल्याने दूध पीत नाही ही वस्तुस्थिती त्यामुळे साप दूध पिणे किंवा त्याला दूध पाजणे शक्य नाही तरीसुद्धा केवळ परंपरा म्हणून हे अट्टाहासाने सुरू आहे ही अंधश्रद्धा आहे हे लक्षात घ्या आणि मुळात ती शैवप्रथा न्हवे. त्यामुळे नागपंचमीला अकारण दुधाची नासाडी करण्यापेक्षा सर्वांनी स्वतःची कुंडलीनी जागृत करावी हे उत्तम ! सापाची पूजा केल्याने कुंडलिनी जागृत होत नाही. ही एक युरेशियन लोकांनी प्रचलित केलेली पूजा आहे जेणेकरून हत्ती रिप्लेस करता यावा . कुंडलिनीचा सर्प आपल्यातच मज्जा संस्थेत उपस्थित आहे त्याच्याविषयी अत्यंत सविस्तर मी 365 days with your body या ग्रंथांमध्ये लिहिलेले आहे . कृपया या संदर्भामध्ये जुन्या काळामध्ये शरीरशास्त्र प्रगत नसल्याने काही घोटाळे झालेले होते परंतु आता आपणाला सर्व गोष्टी स्पष्ट असल्याने आपण अधिक चांगल्या तऱ्हेने या संकल्पना समजून घेऊ शकतो . तेव्हा सापाची पूजा ही सुटका आहे शॉर्टकट आहे . ज्यांना साधना टाळायची असते असे लोक हा उद्योग करत असतात . नागपंचमीचा उद्देश तो नाही तिचा खरा उद्देश तुमच्या आत मधला मेंदू मधला शहाणपणाचा हत्ती आणि मोक्षाची सापाप्रमाणे वेटोळे घातलेली सर्प कुंडलिनी जागृत करणे जागी करणे जागती ठेवणे म्हणजे जागरण ठेवणे आणि उन्नत करणे हा आहे . आज त्यावरच चर्चा व्हायला हवी परंतु त्याऐवजी सापाची पूजा करून मोकळे होणे यासारखी विपरीत रीत नाही . मोक्षापासून सतत हिंदवी लोकांनी दूर पळावे म्हणजे जेणेकरून त्यांना शहाणपण कधीच प्राप्त होऊ नये अशा तऱ्हेची योजना केली जाते कृपया यापासून सावध राहा . मुख्य म्हणजे यानिमित्ताने संपूर्ण शरीरशास्त्र समजून घ्या ज्याला इंग्लिश मध्ये फिजिओलॉजी म्हणतात . 

पाठीच्या कण्यात असलेला साप जागरण करत मेंदूचा हत्ती स्वयंप्रकाशित करणे म्हणजेच नागपंचमी साजरी करणे होय . शैवलोक आणि बहुजन समाज हे जितक्या लवकर समजून घेईल तितक्या लवकर त्याने ते घ्यावे त्याचे कल्याण त्यातच आहे .

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती