वर्टीकल्स आणि स्टेटसचा प्रश्न श्रीधर तिळवे नाईक
दृश्य माध्यमातून हल्ली ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत त्यामध्ये वर्टीकलचा समावेश फार मोठ्या प्रमाणात करावा लागतो . मोबाईल किंवा मोबाईल सदृश्य कॅमेरे वापरून केवळ उभ्या अंगाने मोबाईल धरून पाहता येतील अशी दृश्य मांडणी करणे हे या वर्टीकल मध्ये अपेक्षित असते. इथे टार्गेट ऑडियन्स हा प्रामुख्याने मोबाईल धारक असतो . या उभ्याचा प्रभाव म्हणून साहजिकच वर्टीकल सौंदर्य सुद्धा आपोआपच निवडले जाते ( माझ्या दोन सरळ नाकाच्या उभ्या सौंदर्याच्या मैत्रिणी सध्या यामध्ये काम करत असल्याने ते जास्तच जाणवते )म्हणजे तुम्ही जर का अभिनेत्यांच्याकडे अभिनेत्रींच्याकडे पाहिले तर तुम्हाला लांब ग्रीक नाकांचा प्रत्यय वारंवार येत राहतो . त्याचे कारण व्हर्टिकल मध्ये गोल चेहरा हा फार मोठा असेट ठरत नाही . माझ्या मते ही गैरसमजूत आहे आणि हळूहळू ती नष्ट होईल .
या सर्वच वर्टीकलचा आपण अभ्यास केला तर त्यामध्ये एक गोष्ट सातत्याने येते आहे ती म्हणजे स्टेटसचा प्रश्न ! 1960 पासूनच या स्टेटस च्या प्रश्नाची चर्चा सुरू झाली होती आणि समजा वर्गांचा अंत झाला तर त्या वर्गहीन वर्ग शून्य क्लास less समाजामध्ये स्टेटस महत्त्वाचे होऊन जाईल का असा प्रश्न निर्माण झाला होता साहजिकच पोस्ट मॅनेजमेंट काळात अनेक ब्रँड्स नंतर असे उदयाला आले जे स्वतःला स्टेटस सिम्बॉल म्हणून सादर करायला लागले म्हणजे प्रत्यक्ष उत्पादनाची किंमत जर का आपण तपासली तर ती काही ग्रेट नाही पण स्टेटसचे लेबल लागले की आपोआपच ती वस्तू महागडी होत जाते . बीएमडब्ल्यू गाड्या किंवा मर्सिडीज गाडी या अशा स्टेटस सिम्बॉल बनून गेल्या . त्यानंतर मग शर्ट पॅन्ट वगैरे सुद्धा या स्टेटस च्या भानगडीत आले आणि तुम्ही कोणत्या ब्रँडचा सूट घातलाय हे महत्त्वाचे झाले . तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये जेवता हे महत्त्वाचे झाले कारण त्यावरून स्टेटस ठरायला लागले आज या सगळ्या वर्टीकलमध्ये तुम्ही पाहिले तर एकाला स्टेटस असतो आणि दुसऱ्याला स्टेटस नसतो आणि त्यामुळे अनेकदा हे दोन परस्पर विरोधी स्टेटस ध्रुव एकमेकाला भेटतात आणि त्यांच्यामधून ड्रामा तयार होतो. एका अर्थाने जुन्या काळातल्या सिंड्रेला सिंड्रोम येथे पुनर्जीवीत झालेला दिसतो मात्र फक्त आता मुलगीच गरीब नाही तर मुलगा सुद्धा गरीब असू शकतो किंवा मध्यमवर्गीय असू शकतो आणि जो कोणी राजपुत्र किंवा राजकन्या असते ती नेहमी कुठल्यातरी अतीश्रीमंत वा गर्भ श्रीमंत माणसाचा पुत्र किंवा कन्या असते योगायोगाने त्याची किंवा तिची मीटिंग सतशील अशा मेल किंवा फिमेलशी होते आणि मग त्यांच्यातला रोमांस बहरायला लागतो आणि मग हा रोमान्स शेवटी एकता कपूरच्या सोप ऑपेरा सारखा वाढत जातो . पाश्चात्त्य देशातल्या अनेक व्हर्टिकल मध्ये तर तो किंवा ती घटस्फोटीत असू शकतात आणि त्यांना मुले पण असू शकतात कारण तिथल्या संस्कृतीमध्ये हे चालते त्याउलट आपल्या इंडियन व्हर्टिकल मध्ये मात्र नायक किंवा नायीकेला मूल सहसा असत नाही .
स्टेटस संघर्षाचे आणि समायोजनाचे हे सर्व मोठे दर्शन आपणाला वारंवार काय सांगते हा एक फार मोठा प्रश्न आहे मात्र यातून स्टेटस सिम्बॉल असणाऱ्या ब्रँडसची प्रचंड मोठ्या प्रमाणात जाहिरात होत असते . साहजिकच पुढे मागे या स्टेटस ब्रँडसच्या जाहिराती यांना लाभत गेल्या तर आश्चर्य वाटणार नाही किंबहुना आता सुद्धा ब्रँडच्या किती उल्लेखासाठी किती पैसे मिळतात हे अजून गुलदस्त्यात आहे
एक मात्र खरे की मी चौथ्या नवतेची मांडणी करताना असे सांगितले होते की यापुढे वर्ग संघर्ष समायोजन असणार नाही तर स्टेटस संघर्ष समायोजन असेल त्याचा फार मोठा प्रत्यय या वर्टीकल मधून येत असतो . या वर्टीकल्स नंतरच्या काळात कशा आकार घेतील ते पाहणे मनोरंजक असेल पण निदान आता त्यांची कोणीतरी नोंद घेणे आवश्यक आहे म्हणून हे काम मी केले. प्रॉब्लेम असा झाला की समकालीन जे काय चाललय त्याबद्दल अजूनही तरुण पिढी काही लिहीत नाही आणि मला लिहायची वेळ येते .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment