इतिहास आणि व्यवस्था यांच्याकडून परंपरा आणि संस्कृती यांच्याकडे श्रीधर तिळवे नाईक
विज्ञान वाद आणि त्यातून निर्माण झालेला पुरोगामी युगाचा टप्पा हा मानवी इतिहासामधला अतिशय महत्त्वाचा असा टप्पा आहे. ज्ञानाची कुठलीही नवीन व्यवस्था जेव्हा निर्माण होते तेव्हा तिला प्रस्थापित सत्ता विरोध करते किंवा मग समांतर सत्ता तिला अतिशय हुशारीने आपल्या बाजूने वळवत आणि वापरत आपल्या समांतर सत्तेला प्रस्थापित सत्ता करून टाकते युरोपियन राजकारणामध्ये जवळजवळ सर्वच राष्ट्रांच्या मध्ये हे घडलेले दिसते . विज्ञान जेव्हा प्रायोगिक अवस्थेत होते तेव्हा सर्वच राज्यकर्त्या लोकांनी धर्माच्या प्रभावाखाली विज्ञानाला विरोध केला असे आपणाला दिसते परंतु जेव्हा या लोकांच्या हे लक्षात आले की आपणाला हे नवीन आलेले ज्ञान अधिक सत्ता देणार आहे तेव्हा या लोकांनी मग धर्माचा पक्ष सोडून विज्ञानाचा पक्ष घ्यायला सुरुवात केली आणि खरोखरच विज्ञानाने त्यांना आधीच्या धार्मिक साम्राज्यांच्या पेक्षा फार मोठे वैज्ञानिक साम्राज्य निर्माण करून दाखवले ज्याला आपण वसाहतवाद असे म्हणतो .
धर्मयुगाने आणि धर्मज्ञानाने निर्माण केलेले मायथॉलॉजीचे उद्योग कधीच काही राज्यकर्त्यांना पटलेले नव्हते किंबहुना त्यांना कधी ना कधीतरी धर्माला तडाका द्यायचाच होता त्यामुळे साहजिकच त्याला शह देणारी लॉजी जर येणार असेल तर या लोकांना ती हवीच होती ते तिची वाटच बघत होते पण त्यासाठी लागणारे ज्ञान तयार होत नव्हते वैज्ञानिक क्रांती झाली तेव्हा सर्वात प्रथम युरोपमधल्या राज्यकर्त्यांना त्यांना हवी असलेली ज्ञानाची एक नवीन प्रणाली जी धर्माला शह देऊ शकत होती अशी उपलब्ध झाली आणि साहजिकच युरोपमधल्या बऱ्याच राजांनी बऱ्याच वेळा आपल्या सोयीच्या हिशेबाने विज्ञानाला कधी विरोध केला आणि बहुतांशी वेळा विज्ञानाला पाठिंबा दिला. यासंदर्भामध्ये धर्म कुठे आणि किती ॲक्टिव्ह आहे याचा आदमास घेत या लोकांनी आपला सत्ता काळ चालवलेला आणि पूर्ण केलेला दिसतो . एका अर्थाने पुरोगामी सत्ता ही नेहमीच विज्ञानाला वापरत असते असे नवीन गृहीतक यातूनच पुढे आधुनिकतेमध्ये उदयाला आले . अर्थातच त्यामध्ये बरेचसे तथ्य आहे कारण आपण जर का बारकाईने पाहिले तर विज्ञानाचे प्रत्यक्ष अंमलबजावणीचे काम हे व्यापारी वर्गाने केले त्यांच्या कंपनीने केले पण वसाहत ताब्यात आल्यानंतर आणि ती प्रस्थापित झाल्यानंतर राजकारणी लोकांनी ताबडतोब ती सत्ताकारण करत आपल्या ताब्यात घेतलेली दिसते भारतामध्ये सुद्धा ईस्ट इंडिया कंपनी लगेच तिथल्या इंग्लंडमधल्या राजकारणी लोकांनी आपल्या ताब्यात घेतली . राजकीय सत्तांचा हा पुरोगामी खेळ अनेकदा आपल्याकडच्या लोकांना कळत नाही त्यामुळेच आपल्याकडे जेव्हा पुरोगामी वादाच्या नावाखाली सत्तेने विज्ञान वापरायला सुरुवात केली आणि या विज्ञानाच्या वापरातून पुढे गावागावांमध्ये आपली सत्ता प्रस्थापित करायला सुरुवात केली तेव्हा हे काम काँग्रेस कसे करत आहे हेच अनेकांना कळत नव्हते . काँग्रेस म्हणजे काहीतरी खूप प्रामाणिक अशी सत्ता होती असा एक फार मोठा गैरसमज आहे पण वस्तुस्थिती अशी आहे की काँग्रेस सुरुवातीपासूनच इंग्रजांची सत्ता आपल्या ताब्यात कशी येईल आणि इंग्रजांची सत्ता आपल्या ताब्यात आल्यानंतर आपण ती कशी वापरायची यासंदर्भात अतिशय सजग होती . काँग्रेसचे हे सत्तारूढ रूप फक्त बाबासाहेब आंबेडकरांना कळले होते म्हणूनच आंबेडकर हे असे ह्या बाबतीत सुद्धा अतिशय थोर ठरतात . मी नेहमीच सांगत आलेलो आहे की आपला काळ कळलेले फक्त दोनच लोक होऊन गेले ते म्हणजे महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर ! त्याआधी अर्थातच महात्मा फुले !
या विज्ञानातून एक नवीन सामाजिक गोष्ट निर्माण होणे अटळ होते आणि त्या सगळ्याला शेवटी नाव मिळाले व्यवस्था ! सिस्टीम ! आपण जर का याच्या मुळात गेलो तर आपणाला स्पष्ट दिसते की हे सर्व बायोलॉजी मधून आलेले आहे तिथे जशी शरीराची रेस्पिरेटरी सिस्टीम वगैरे वगैरे डायजेस्टिव्ह सिस्टीम वगैरे वगैरे अस्तित्वात असते तशीच समाजात सुद्धा वेगवेगळ्या सिस्टीम असतात असे गृहीतक आहे. ज्ञान सामाजिक सत्तेला सुद्धा आकार देते त्याचे हे उदाहरण !
त्यामुळे जर का तुम्ही पुरोगामी वादांच्या चर्चा ऐकल्या तर तिथे वारंवार व्यवस्था हा शब्द येतो . याचे कारण असे की सुरुवातीच्या काळामध्ये ही व्यवस्था सरंजामदार वर्गाने आणि राजेशाहीने आपल्या ताब्यात घेतली त्यासाठी या नव्या व्यवस्थेमध्ये कॉन्सर्वेटिव्ह पार्ट्या स्थापन केल्या आणि आपला सारा सरंजाम लोकशाही व्यवस्थेमध्ये नीट चालेल याची काळजी घेतली . साहजिकच ज्यांना हे कळाले होते त्यांनी या व्यवस्थेला जर का जनताभिमुख करायचे असेल तर आपणाला ह्या व्यवस्था बदलाव्या लागतील हे ओळखले त्यामुळेच या ओळखीचा असा साक्षात्कार पुरोगामी लोकांना सातत्याने होत होता झालेला आहे आणि आद्यापही होत असतो साहजिकच मग धर्माचा अभ्यास करताना सुद्धा या पुरोगामी लोकांनी धर्म व्यवस्था म्हणून विचार करायला सुरुवात केली आणि त्यातूनच मग रिलीजियस सिस्टीमचा अभ्यास करणे अशी एक फॅशनच युरोपमध्ये विज्ञानाच्या काळामध्ये आपणाला प्रचलित झालेली दिसते जी नंतर आपल्याकडे आले आणि आपल्याकडे मग धर्म म्हणून विशेषतः महाराष्ट्रामध्ये वारकरी चळवळीचा अभ्यास सुरू झाला . महाराष्ट्र धर्म नावाची जी संकल्पना नंतर विकसित झाली ती मुळात पुरोगामी संकल्पना आहे प्रत्यक्षात रामदासांना काही अशी व्यवस्था अपेक्षित नव्हती .
कुठल्याही व्यवस्थेशी लढताना किंवा नवीन व्यवस्था निर्माण करताना सर्वात मोठा प्रॉब्लेम नेहमीच भूतकाळाचा असतो कारण भूतकाळ तुमच्या सामूहिकतेमध्ये कायमच उपस्थित असतो तो अनेकदा तुमच्या शिक्षणाच्या अभ्यासक्रमातून तुम्हाला काही ना काही सांगत असतो त्यामुळे त्या सगळ्या भूतकाळाचे करायचे काय हा प्रश्न पुरोगामी विचारवंतांच्या आणि लोकांच्या पुढे सुद्धा उपस्थित झाला .याचे जे धर्माने दिलेले उत्तर होते ते म्हणजे मायथॉलॉजी ! साहजिकच ही मायथॉलॉजी नाकारणे गरजेचे बनत गेले आणि जर हे नाकारणे गरजेचे असेल तर तसे करताना त्याला पर्याय काय द्यायचा असाही प्रश्न निर्माण झाला आणि या प्रश्नाचे उत्तर आपणाला या विज्ञानवादी व्यवस्थेने इतिहास लेखन असे दिले आणि त्याची विज्ञाननिष्ट अशी एक अभ्यासाची पद्धत सुद्धा विकसित करणे सुरू केले
यातूनच मग विज्ञान इतिहास आणि यांनी निर्माण केलेली व्यवस्था यांच्या संबंधांचे प्रचंड मोठे जाळे संपूर्ण युरोपभर आणि नंतर जिथे जिथे युरोपने राज्य केले तिथे म्हणजेच त्यांच्या ताब्यातील कलोनियल वसाहतींच्या मध्ये पोहोचले भारत याला अपवाद नव्हता त्यामुळेच आपणाला महात्मा फुले यांनी पेशवाई नको इंग्रजांचे राज्य हवे असा उघड उघड स्टान्स घेतलेला दिसतो याचे कारण असे आहे की मुळातच पेशवाई जे काय करत होती ती व्यवस्था नव्हती तो केवळ एक मध्ययुगीन सरंजाम होता .तिथे विज्ञान नव्हते तर धर्माच्या आधारे त्यांनी जो सरंजाम निर्माण केला होता तो सरांजाम अत्यंत मागासलेला असा होता . हा सगळा सरंजाम मोडीत काढणे आवश्यक होते आणि त्यासाठी त्या जागी एक व्यवस्था तयार करणे आवश्यक होते आणि हे आपल्या एकोणिसाव्या शतकातल्या सर्वच्या सर्व सुधारकांना व्यवस्थित कळलेले होते आणि म्हणूनच प्रत्येकाने आपल्या पद्धतीने नवीन व्यवस्था आणण्यासाठी काय केले पाहिजे या दिशेने विचारमंथन सुरू केले भारताचा आत्माच मुळात मोक्ष असल्यामुळे आणि शरीर धर्म असल्यामुळे अनेकदा याच अंगाने मग विचार करणे भाग पडले कारण जो सरंजाम होता तो धर्म केंद्री सरंजाम होता हा धर्म केंद्री सरंजाम बदलायचा असेल तर प्रथम या सरंजामाने प्रचलित केलेल्या सर्व कायद्यांना शह द्यावा लागेल त्या सरंजामाला आणि त्याच्या कायदे पद्धतीला मोडीत काढावे लागेल याची त्यांना कल्पना आली प्रचलित केलेल्या सर्व कायदे कानून यांना आपल्याला शह द्यावा लागेल हे या लोकांच्या लक्षात आले आणि त्यातूनच मग कायद्यात बदल चळवळ सुरू झाली . इंग्रजांनाही मुळात अशा प्रकारची नवीन कायद्याची एक व्यवस्था इथल्या लोकांना न दुखवता उभी करायची होती कारण त्यांना ते राज्य चालवताना आवश्यक वाटत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना शेवटी सरंजाम वादामध्ये अडकायचे नव्हते त्यामुळेच त्यांनी एक अशी व्यवस्था निर्माण केली ज्यामध्ये त्यांना मध्ययुगीन सरंजामाचा फायदाही मिळत होता आणि त्याचबरोबर नवीन कायदे व्यवस्था ही मिळत होती जिच्या आधारे नवीन कायदे निर्माण करून सर्व प्रजेवर नियंत्रण मिळवता येत होते. त्यांना सुद्धा स्वतःचे पुरोगामीपण सोडायचे नव्हते परंतु त्याच बरोबर त्यांना पुरोगामी वादा मधून मिळालेला साम्राज्याचा वारसा सुद्धा सोडायचा नव्हता कारण त्यामध्ये त्यांच्या युरोपमधल्या सर्व आर्थिक व्यवस्थेचा पाया होता . वसाहतींचे प्रचंड शोषण केल्याशिवाय युरोपमधील सर्व व्यवस्था चालणे शक्यच नव्हते साहजिकच मग यातूनच या लोकांनी एका बाजूला आपला साम्राज्यवाद शाबूत ठेवायचा आणि दुसऱ्या बाजूला एक नवीन व्यवस्था सुद्धा निर्माण करायची अशा पद्धतीने एक मध्यम मार्ग निर्माण केला आणि त्या मध्यम मार्गाचे आपण सर्वच बळी पण आहोत आणि फायदे घेणारे पण आहोत .
यातूनच पुढे मग मोठा वाद निर्माण झाला कारण इंग्रजांची व्यवस्था १८८० पर्यंत सेटल झाली आणि मग प्रश्न निर्माण झाला की आता जर काही कायद्याची व्यवस्था प्रस्थापित झालेली आहे तर तिचे करायचे काय ?
दोन मार्ग होते एक तर आपली सगळी सामाजिक व्यवस्था पूर्णपणे बदलायची किंवा मग राजकीय व्यवस्था उधळून लावून आपले स्वतःचे स्वातंत्र्य मिळवायचे आणि मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सामाजिक सुधारणा करायला सुरुवात करायची . याच वादाला पुढे मग अधिकृत रूप आगरकर विरुद्ध टिळक फुले विरुद्ध टिळक आणि शाहू विरुद्ध टिळक अशा पद्धतीने लाभलेले दिसते . सामाजिक सुधारणा आधी की राजकीय स्वातंत्र्य आधी हा एक फार कळीचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न सहजासहजी सुटत नाही . यातूनच मग लोकमान्य टिळक यांना सामाजिक संघटन राजकीय कारणासाठी निर्माण करायचे असल्याने सामाजिक पातळीवर अत्यंत मागासलेली आणि ब्राह्मण्यवादी भूमिका घ्यावी लागलेली दिसते . म्हणजे एकीकडे प्रायश्चित घ्यायचे पण परदेशी जाणे काही सोडायचे नाही वर्ण व्यवस्था टिकली पाहिजे म्हणायचे आणि स्वतःच्या घरामध्ये मात्र सर्व अस्पृश्यांना प्रवेश द्यायचा असा एक फार मोठा विरोधाभास लोकमान्य टिळक यांच्या बाबतीत निर्माण झालेलां दिसतो . आपण जर का सामाजिक सुधारणांच्या मागे लागलो तर राजकीय संघटन करणे शक्य होणार नाही असा टिळकांचा फार दृढ समज होता आणि त्या पोटी मग त्यांनी काही अक्षम्य तडजोडी केल्या . किंबहुना भारतीय राजकारणाचे पहिले मॉडेल टिळक यांचे आहे आणि टिळकांच्याकडे बघितले की पुढचे भारतीय राजकारणी असे का झाले हे आपल्याला सहज कळू शकते साहजिकच हे राजकीय पुढाऱ्याचे जे मॉडेल आहे ते मॉडेल आपल्याकडच्या अनेक पुढाऱ्यांनी नंतर फॉलो केले परंतु त्याला सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रातले जे पुढारी होते त्यांनी कायमच दांभिक आणि मागासलेले म्हणायला सुरुवात केली आणि म्हणत राहिले . पुढे गांधी यांनी यामध्ये काही समतोल निर्माण केला
या सर्वच लोकांच्याकडे आपण पाहिले तर आपणाला असे दिसते की हे लोक धर्माची परंपरा आपली म्हणत होते आणि आश्चर्यकारकरीत्या इतिहासाला सुद्धा आपणावत होते . मी नेहमीच म्हणतो की भारतीय वैचारिकता ही नेहमी भारतीय भोजनाप्रमाणे एकाच ताटात सर्व काही वाढून घेत असते आपल्याकडे पुरोगामी कालखंडामध्ये नेमके हेच घडलेले दिसते आणि बहुतांशी इतिहासकार आपल्या ताटामध्ये एकाच वेळेला परंपरा आणि इतिहास असे दोन्ही वाढून घेत होते . अर्थातच याला छेद देणारे काही लोक होते विशेषत: केतकर आणि आंबेडकर हे लोक मात्र जास्तीत जास्त उपलब्ध असलेल्या वैज्ञानिक पुराव्याच्या आधारे इतिहास मांडण्याचा प्रयत्न करत होते आणि हिंदू धर्माचा अभ्यास करताना सुद्धा त्या धर्माकडे ते सामाजिक व्यवस्था किंवा राजकीय व्यवस्था म्हणून पाहत होते अपवादात्मक वेळेला सांस्कृतिक व्यवस्था म्हणून सुद्धा ते पाहताना दिसतात . बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्राचे विद्यार्थी असल्यामुळे त्यांनी या सगळ्या हिंदू धर्माच्या व्यवस्थांमध्ये एक अर्थव्यवस्था सुद्धा शोधून काढली त्यांच्या मते वर्णव्यवस्था म्हणजे फक्त डिव्हिजन ऑफ लेबर नाही तर डिव्हिजन ऑफ Labourars पण आहे . आता प्रत्येक जण आपापल्या विद्येच्या दृष्टिकोनातून या सर्व व्यवस्थांना पाहत होते . लोकमान्य टिळक हिंदू धर्मशास्त्राच्या आधारे संपूर्ण व्यवस्था पाहत होते मात्र त्यांचे धर्मशास्त्र हे प्रामुख्याने तत्त्वज्ञानाच्या आधारे उभे राहत होते कारण तोपर्यंत युरोपमध्ये रिलिजन स्टडी नावाचा प्रकार सुरू झाला होता तो त्यांनी आत्मसात केला . राजकारणामधल्या माणसाला कृती फार महत्त्वाची म्हणूनच त्यांनी मग गीता रहस्य लिहिताना गीता हे पूर्णपणे कर्मयोगाला उत्तेजन देणारे पुस्तक आहे अशी मांडणी केली ही त्यांच्या राज्यकारणाला पूरक अशी होती म्हणजेच एका अर्थाने लोकमान्य टिळक हे पॉलिटिकल सायन्स च्या सत्ताकारणाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातूनच सर्व गोष्टी बघत होते . त्या उलट बाबासाहेबांच्या मांडणीमध्ये आपणाला प्रामुख्याने समाजशास्त्र आणि त्यापेक्षाही अधिक अर्थशास्त्र दिसते. त्या उलट केतकर मात्र अर्थशास्त्रापेक्षा आपणाला समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून मांडणी करताना दिसतात साहजिकच इतिहास लेखन करताना अनेकदा या लोकांनी आपल्या या दृष्टिकोनाचा कळत नकळत पुरस्कार केलेला आहे .
या सगळ्याला जो छेद मिळाला तो विज्ञानाकडून मिळाला आणि अचानक विज्ञानामध्ये एक पारंपारिक क्लासिकल विज्ञान जाऊन त्या जागी नवे विज्ञान आले ज्याला ते न्यू सायन्स म्हणत होते या नव्या विज्ञानामधून आधुनिकता जन्मली . याला एक मोठे कारण मी मागेच म्हटल्याप्रमाणे अणु फुटणे होते त्याचबरोबर प्रकाश हा फक्त पार्टिकल नाही तर तो वेव पण आहे हा सिद्धांत आला आणि मग बरेच काही बदलले कारण प्रकाश हा नेहमीच ज्ञानप्रकाश म्हणून पाहिला गेला होता .
या आधुनिकतेच्या पार्श्वभूमीवर खरे तर एखादे नवे शब्दप्रयोग वापरले जायला हवे होते आणि सुरुवातीच्या कालखंडामध्ये असे प्रयोग केले गेले परंतु नंतर मात्र उत्तराधुनिक कालखंडामध्ये गडबड व्हायला सुरुवात झाली आणि यामुळेच अत्यंत जुनाट अशी धर्माच्या आधारे चालणारे शब्दप्रयोग पुन्हा एकदा आधुनिकतेत दाखल झाले आणि ते नंतर केंद्रस्थानी आले . वास्तविक अस्तित्ववादाने सब्जेक्ट व व्यक्तीऐवजी अस्तित्व केंद्रस्थानी आणले होते आणि जे इतर होते त्याला other असे व्यवस्थित नाव दिले होते .याच काळामध्ये फ्रेडरिक निश्ते याने फार चांगला शब्द आणला होता तो म्हणजे कन्स्ट्रक्शन दुसरा एक शब्द आला होता स्ट्रक्चर पण दुर्दैवाने अचानक उत्तर आधुनिकता आली आणि तिने हे दोन्ही प्रश्न बाजूला करत संस्कृती असा शब्द आणला इतकेच नव्हे तर कार्पोरेट सेक्टर मध्ये सुद्धा वर्क कल्चर नावाचा प्रकार अस्तित्वात आला . आपण अशा प्रकारचे जुनाट प्रयोग वापरून कळत नकळत धर्माचे पुनर्जीवन करण्याला उत्तेजन देतोय हेच अनेकांना कळाले नाही विशेषता विज्ञानामधल्या क्वांटम सिद्धांतानंतर मुळातच विज्ञान निश्चित सत्य सांगू शकत नाही असे काहीतरी प्रस्तावित झाले आणि सर्व काही सापेक्ष झाले आणि सर्व काही सापेक्ष झाल्यामुळे साहजिकच मग एखादा ठोस शब्द आणण्यापेक्षा संस्कृतीसारखा मानवी शब्द आणणे अनेकांना गरजेचा वाटला याचा परिणाम व्हायचा तो झाला परंपरा आणि संस्कृती हे आधुनिकतेचे आणि उत्तराधुनिकतेचे नको असलेले मुख्य आयाम बनत गेले माझे स्वतःचे स्पष्ट मत असे आहे की आधुनिकतेने जे दोन शब्द दिले कन्स्ट्रक्शन आणि स्ट्रक्चर हे फार व्यवस्थित चांगले शब्द होते आणि त्याला रचना आणि संरचना असे दोन चांगले शब्द मराठीमध्ये आपण आणले होते पुढे मग उत्तर संरचना आणि विरचना असे दोन शब्द उत्तराधुनिकतेमध्ये आले जे प्रामुख्याने उत्तर सरचनावादामधून आले होते यामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम जर कोणी केला असेल तर तो समाजशास्त्रात काम करणाऱ्या लोकांनी केला त्याने कारण नसताना समाजशास्त्र मध्ये उत्तरआधुनिकतेच्या संदर्भात संस्कृतीचे प्रकरण पुढे आणले आणि आपण अचानक आता संस्कृतीच्या प्रश्नांमध्ये दाखल झाल्यासारखे सर्वजण बोलत आहोत . माझ्यावर अनेकदा संस्कृती हा शब्द का वापरत नाही असा प्रश्न दबाव म्हणून टाकला जातो पण मी हा दबाव घेतला नाही याचे कारण एकदा तुम्ही संस्कृती घेतली की तुम्ही आपोआपच धर्म घेता .
साहजिकच मग मी नवीन क्रांतीसाठी चिन्ह सृष्टी व नेटवर्क हेच दोन शब्द वापरले जेव्हा अनेक लोक संस्कृती असा शब्द वापरत होते आहे तेव्हा मी जाल महाजाल चिन्हसृष्टी असे शब्द वापरत होतो
उत्तर आधुनिकच्या या कालखंडामध्ये आपोआपच त्यामुळे संस्कृतीचा अभ्यास केंद्रस्थानी होत गेला आणि जगभरातल्या सर्व संस्कृतींचा अभ्यास सुरू झाला आणि आपल्याकडे याचाच प्रभाव पडून भालचंद्र नेमाडे यांचे सारखे लोक मराठी संस्कृती आणि हिंदू संस्कृती यांचा गाजावाजा करू लागले.
गमतीचा भाग असा की १९९० नंतर सुद्धा क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन आले क्लॅश ऑफ कल्चर आले इतका हा उत्तराधुनिकतेचा प्रभाव पडलेला होता . आणि इतक्या मोठ्या प्रमाणात धर्माने पुन्हा एकदा जागा बळकावयाला सुरुवात केली होती.
आपण जर का साठोत्तरी पिढी पाहिली तर आपणाला असे दिसते की ती सातत्याने परंपरा आणि संस्कृती यांच्या भाषेत बोलत असत. एका अर्थाने भारतामध्ये हा पॅराडाइंम शिफ्ट पूर्ण झालेला आहे प्रश्न असा आहे की चौथ्या नवतेने यासंदर्भात काय करायचे तर याचे उत्तर आधीच दिलेले आहे ते म्हणजे आपण नवीन सामूहिक कलेक्टिव्ह गोष्टीसाठी आपल्याशिवाय अस्तित्वात असलेल्या इतर साठी चिन्हसृष्टी हा शब्द वापरावा आणि स्वतःसाठी आत्मजाल . जेव्हा आपणाला टीका करायची असेल किंवा संस्कृतीचाच उल्लेख करायचा असेल तेव्हा मात्र संस्कृतीचा उल्लेख करायला हरकत नाही . अन्यथा नेटवर्क चिन्हसृष्टी नेट महाजाल इंटरनेट हे शब्द आपण वापरावेत हे उत्तम अन्यथा आपण पुन्हा एकदा हा देश विसाव्या शतकात दाखल करू . आणि असे विसाव्या शतकात दाखल होणे म्हणजे स्वतःच्या धर्मात स्वतःच्या परंपरेत दाखल होऊन स्वतःच्याच वाटा बुजवणे असा असतो . आपण आत्मजालाला स्वतंत्र जाल करणारा मोक्ष स्वीकारावा पण आत्मला गुलाम करणारा धर्म स्वीकारू नये . आधुनिक आणि उत्तर आधुनिक यांनी परंपरा आणि संस्कृती यांचा जो काही गौगवा मांडला तो खूप झाला आता यापुढे जाण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment