तुम्ही दुर्दैवी आहात का या प्रश्नाचे मी दिलेले उत्तर श्रीधर तिळवे नाईक 


प्रश्न 

तुम्ही दुर्देवी आहात असे म्हटलं जातं तुम्हाला तसे वाटते का ?


श्रीधर तिळवे नाईक उत्तर: 

नाही! मी स्वतःला भाग्यवान आणि परम भाग्यवान समजतो .


प्रश्न : 

का?


श्रीधर तिळवे नाईक उत्तर: 

मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण मला मी व्यवहारिक जीवनामध्ये काय आहे ते कळाले होते. मला अकरावीलाच कळाले की मी कवी आणि तत्वज्ञ आहे भले त्या मागच्या सगळ्या गोष्टी मला कळाल्या नसतील पण मला हे आता नक्की सांगता येते की हो मला हे त्यावेळेला कळाले होते त्यामुळे या दोन गोष्टी एन्जॉय करत मी आयुष्य जगलो ज्या गोष्टींनी आनंद दिला त्याबद्दल कसला खेद आणि कसली खंत ? एका विशिष्ट काळामध्ये कवितेचं काय असा मला प्रश्न पडायचा पण आता तर तोही पडत नाही कारण जी गोष्ट करताना तुम्हाला आनंद मिळतो ना ती बेस्ट तुमच्यासाठी आणि आपल्यासाठी काय बेस्ट आहे हे कळणे म्हणजे भाग्य ! म्हणून मी स्वतःला भाग्यवान म्हणतो परम भाग्यवान मी यासाठी आहे की माझा शक्तिपात झाला . आणि ज्याला मोक्ष कळाला फळाला आला तो परम भाग्यवान ! आपण सगळेच परमभाग्यवान होऊ शकतो आणि त्या पातळीवर आपण सगळे समान आहोत भाग्य मात्र प्रत्येकाचे वेगळे असेल प्रत्येकाला वेगवेगळी गोष्ट आनंद देत असेल माझ्या दृष्टीने प्रत्येक नागरिकाला त्याला आनंद देणारी गोष्ट कधीही करता येणे म्हणजे मोक्ष राज्य ! असे राज्य आपणाला निर्माण करता आले पाहिजे की जिथे प्रत्येकाला त्याचे भाग्य सापडेल त्याचा आनंद सापडेल त्याला काय करायचे आहे ते सापडेल आणि त्याला ते कसलीही चिंता न करता श्रम करून तेही आनंदाने श्रम करून करता येईल . हे अवघड नाहीये पण दुर्दैवाने आपण ते अवघड करून टाकले आहे कारण आपण आपल्या भूका तृष्णा आणि निकडींना आपल्या आयुष्यात आणि आपल्या शरीरात इतके प्रभावी करून टाकलेले आहे , त्यांचा इतका प्रभाव पाडून घेतलेला आहे की आपल्याला काय आवडते हे सुद्धा आपल्याला कळत नाही. आणि कधी कधी आपल्याला ते कळू दिले जात नाही किंबहुना शोषण म्हणजे तुम्हाला आयुष्याचा आनंद घेऊ न देणे . तुम्हाला तुमचा आनंद कशात आहे हे कळून देणे हे सर्वात मोठे शोषण ! आणि तुम्हाला तुमच्या आनंदाने केलेल्या कामाचा आनंदाने मोबदला न देणे हे सुद्धा आणखी एक शोषण ! व्यवहार आनंदाने करता येणे म्हणजेच मोक्ष राज्य ! आज प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला काय आनंद देते हे आपणाला कळत नाही त्यामुळे सगळा गोंधळ आहे . प्रत्येक माणसा मध्ये किमान एक ना एक प्रतिभा आहेच आहे काही लोकांच्या अनेक असू शकतात त्यामुळे प्रत्येकाला ही प्रतिभा किंवा ह्या प्रतिभा नेमकी कुठली आहे नेमक्या कुठल्या आहेत हे सापडले पाहिजे आपण त्यासाठी त्याला मदत केली पाहिजे किंबहुना शिक्षणाचा हाच हेतू असला पाहिजे पण आपले शिक्षण हा हेतू साध्य करू देत नाही ते करिअर बनवायला सांगते अनेकदा तर करिअर काय करायचे हे सुद्धा लादते त्यामुळे शिक्षण देताना एखाद्या व्यक्तीला मग ती स्त्री असो अथवा पुरुष किंवा तृतीयपंथी किंवा आणखी तस्सम आपण आनंद निवडायला मदत केली पाहिजे त्या व्यक्तीच्या आनंद निवडीमध्ये आपला हस्तक्षेप होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे त्याला हे समजावले पाहिजे ज्या गोष्टीत आनंद आहेत ती गोष्ट करायला तुम्ही जन्मलेला आहात . हे असे शिक्षण निर्माण करणे तसे जगणे निर्माण करणे जीवन निर्माण करणे मुळीच अवघड नाही . एकदा का मनुष्य त्याच्या आनंदाचे काम करायला लागला की मग तो बाकीची कामे सुद्धा अत्यंत आनंदाने हळूहळू करायला शिकतो . पण माणसाला तुम्ही मूळ आनंदच सापडू देत नाही त्याला सापडू देण्यापेक्षा त्याला स्वतःच्या तावडीत कसे ठेवता येईल ते तुम्ही बघत बसता त्यातून मग विद्यार्थी सुद्धा तुमचे गुलाम आहेत अशा पद्धतीने तुम्ही त्यांना वागवायला लागता तुम्ही तुमची मुले सुद्धा गुलाम आहेत अशा पद्धतीने वागवायला लागता हे सर्व सूक्ष्म असेल पण ते आहे. तुमची शिक्षण व्यवस्था आनंदाच्या विरोधात असलेली व्यवस्था आहे मग ती कशी काय चांगले नागरिक निर्माण करणार जो आनंदात असतो तो चांगला नागरिक होऊ शकतो आज चांगले नागरिक नाहीत त्याचे कारण लोक आनंदीच नाहीत त्यांच्यापासून त्यांचा आनंद हिसकावून घेण्यात आलेला आहे आणि त्यांनी सुद्धा तो हीस्कू दिलेला आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीत स्वतःला सापडू न देणे असे एक सांस्कृतिक मिशनच आपण हातात घेतले आहे की काय असे वाटावे अशी आता स्थिती आहे . विद्यार्थ्यांना समाज नावाच्या एका मोठ्या मशीनचा स्क्रू समजणे अशी एक मेंटॅलिटी अनेकदा व्यवस्थेच्या नावाने डेव्हलप होत असते. त्यातूनच मग करिअर नावाची गोष्ट त्याला करायला लावली जाते. मूल्यमापन वगैरे त्यातूनच येते कारण मग एकदा प्रत्येक गोष्टीचे करिअर बनवले की मग तुम्ही तुमच्या तथाकथित मॅथेमॅटिकल फुटपट्ट्या लावणारच . आता शिक्षण या क्षेत्रामध्ये मुळात शिकवणे हा आनंद असला पाहिजे तरच तो शिक्षक चांगला असतो पण आपली काही ती कसोटी नाही . आपल्यातल्या अनेकांचा असा एक गैरसमज आहे की फिजिक्स किंवा केमिस्ट्री शिकवणे हा आनंद असू शकत नाही परंतु तसे नाही कुठलीही गोष्ट आनंद देऊ शकते माझ्या भवताली काही माणसे अशी नक्की झालेली आहेत किंवा आहेत की त्यांनी आपला हा आनंद गणितात रसायनशास्त्रात साजरा केला ते उत्तम शिक्षक आहेत पण आश्चर्याची गोष्ट अशी की त्या लोकांच्या वर सुद्धा आता नको ते दबाव टाकले जातात . असे सांस्कृतिक दबाव शिक्षणाला अशुद्ध करून टाकतात . जे शिक्षण आनंद उमलवते, आनंद कशात आहे ते सांगते आणि ज्या गोष्टीत आनंद आहे त्या गोष्टीबाबतचे संपूर्ण कौशल्य आणि कला आणि विद्या आणि ज्ञान आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि चिन्ह विज्ञान आणि चिन्ह तंत्रज्ञान उपलब्ध करून देते ते विद्यार्थ्याला आत्मसात करू देते ते सर्वात उत्तम शिक्षण होय .भारतीय शिक्षण प्रणालीचा मुख्य प्राण हाच आहे आपण करिअर नावाची गोष्ट पाश्चात्य देशातून आयात केली आणि आपल्याला आता ती इतकी सवयीची झालेली आहे की आपल्याला वाटते की हीच आपली शिक्षण प्रणाली आहे . भारतामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट स्वतःचे संपूर्ण उमलणे आहे ज्याला आपण अलीकडे मोक्ष म्हणतो आणि हे संपूर्ण उमलणे दंतकथांच्या मुळे विचार प्रणालींच्यामुळे शक्य होत नाही किंवा मॅनेजमेंट मुळे सुद्धा ते शक्य होत नाही. ते मुळातच त्या माणसाला स्वतंत्र करून किंवा त्याने स्वतंत्र होऊन करावे लागते प्रत्येक शिक्षणाच्या केंद्रस्थानी स्वातंत्र्य असले पाहिजे तरच ते विद्यार्थ्यांना स्वतंत्र करू शकते आपली स्थिती अशी आहे की आपले शिक्षक सुद्धा स्वतंत्र नाहीत मग ते विद्यार्थ्यांना काय स्वतंत्र करणार ? 


माझे हे सुदैव म्हटले पाहिजे की मला असे पालक लाभले ज्यांनी मला माझा आनंद शोधू दिला अर्थात त्यांनी दिला नसता तरी मी तो शोधलाच असता पण त्यांनी मला माझा आनंद कशात आहे ते शोधू दिले ही सुद्धा वस्तुस्थिती आहे . माझ्या पालकांनी जर का अडथळा आणला असता तर मला कदाचित घरातून पळून जाण्याची वेळ आली असती पण अशी वेळ आली नाही . बाकी शिक्षक तर माझ्या आयुष्यात खिजगणतीत पण नव्हते . एका अर्थाने मी शिक्षण व्यवस्थेच्या बाहेर होतो आणि त्याचा मला खूप फायदा झाला. मुख्य म्हणजे मी स्वतंत्र राहिलो . म्हणजे घरात पण स्वतंत्र शिक्षण व्यवस्थेपासून पण स्वतंत्र असे प्रचंड भाग्य मला लाभल्यावर मी कसा काय स्वतःला दुर्दैवी समजू ?


त्यामुळे जग काय म्हणते याबद्दल मला फार काही देणे घेणे नाही याच आसक्तीग्रस्त जगामध्ये मी कविता लिहिल्या तत्त्वज्ञान लिहिले मोक्षाची साधना केली आणि प्रचंड आनंद मिळवला आजही मिळवत आहे दुर्दैवी ते असतात ज्यांना आपला आनंद सापडत नाही माझ्याबाबत ही वस्तुस्थिती नाही 


श्रीधर तिळवे नाईक 

Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती