लोकप्रियता विज्ञान , चौथी नवता आणि लोकसुद्धा नायकांना वापरत असतात का ? श्रीधर तिळवे नाईक
लोकप्रियता विज्ञान हे चौथ्या नवतेमधले एक नव्याने उदयाला आलेले विज्ञान आहे. त्याला विज्ञानाचा दर्जा द्यावा की नाही त्याचा विकास कसा होणार वाढ कशी होईल वगैरे वगैरे प्रश्न सतत चर्चेला घ्यायलाच हवेत. समाज विद्येमध्ये याची सुरुवात सेलिब्रिटी स्टडी या शाखेमधून झाली पण हळूहळू हा एक संपूर्ण अर्थशास्त्रासारखाच मोठ्याच्या मोठा व्यापक विषय आहे हे आता लक्षात येत आहे. त्यामुळेच त्याच्या अंगाने त्याला स्वतंत्र विज्ञानाचा दर्जा देऊन लोकप्रियतेचा स्वतंत्र अभ्यास केला पाहिजे हे आता स्पष्ट झालेले आहे. या विज्ञानामध्ये सर्वात प्रथम लोकप्रियता म्हणजे काय हा प्रश्न उपस्थित होतो त्यानंतर मग ती कशी मिळते कोणाला मिळते का मिळते कुठल्या कुठल्या क्षेत्रात कशी कशी मिळते केव्हा मिळते आणि तेव्हाच का मिळते अशा प्रश्नांचा उहापोह करावा लागतो .
लोकप्रियता म्हणजे लोकांच्या शरीरात विशेषत: मेंदूत असलेली एखाद्या शारीरिक व्यक्तिमत्त्वाची चिन्हीक आणि संस्कारिक उपस्थिती होय .
लोकांच्यामुळे एखाद्या व्यक्तिमत्त्वाला एखाद्या शरीराला लोकप्रियता मिळते की एखाद्या शरीराने किंवा व्यक्तीने स्वतःच्या जीवावर निर्माण केलेली ती असते हा एक फार सनातन प्रश्न आहे . माझे स्वतःचे यासंदर्भातले उत्तर लोकप्रियतेची उत्क्रांती असे आहे आणि या लोकप्रियतेची सुरुवात सर्वात प्रथम विशिष्ट व्यक्तीच्या अभूतपूर्व आशा कृतींच्या मधून किंवा अभूतपूर्व वाटणाऱ्या कृतींच्या मधून होते आणि हळूहळू सर्वच लोक जेव्हा तिची कॉपी करू लागतात तेव्हा मग ती लोकप्रिय व्हावी लागते किंबहुना उत्क्रांती म्हणजे दुसरे तिसरे काही नसून कॉपी-पेस्टिंग असते आणि हे कॉपी पेस्टिंग करण्याचा माणसाचा मूलभूत स्वभाव असल्याने साहजिकच ते सहजरीत्या होत जाते वाढत जाते आणि त्यालाच आपण मग लोकप्रियता म्हणायला लागतो . अनेकदा मूळ ओरिजिन आपल्याला सापडत नाही आणि आपण फक्त कॉप्या आणि कॉप्या यांच्यामध्येच वावरायला लागतो आणि त्यामुळेच अनेकदा लोकप्रियता ही फ्लॅट स्क्रीनची आणि स्किनची आणि सरफेस ची उत्पत्ती आहे काय असा प्रश्न निर्माण होतो . कॉपी मधून कॉपी कॉपी मधून कॉपी असा प्रकार ज्याला आपण कॉपी करण म्हणतो त्या कॉपीकरणामुळेच ही उत्क्रांती होत जाते आणि ते यशस्वी होत जाते किंवा कधीकधी अयशस्वी होते . लोकप्रियतेचा ग्राफ कधी चढतो कधी उतरतो आणि ही जी फ्लक्च्युएशन्स असतात त्यांचा परिणाम त्या त्या व्यक्तीवर होत असतो . किंबहुना अशा प्रकारच्या चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या ग्राफचा आणि स्थिर राहणाऱ्या घराचा नेमका काय काय परिणाम होतो याचा सुद्धा अभ्यास लोकप्रियता विज्ञानामध्ये करावा लागतो.
लोकप्रियता पूर्वीच्या काळामध्ये व्यक्त करण्याच्या पद्धती खूप मर्यादित असल्याने त्यांचा नीट वैज्ञानिक अभ्यास करता येत नव्हता परंतु आता मात्र अशा प्रकारचा अभ्यास करता येणे चिन्हसृष्टीमुळे शक्य झालेले आहे किंबहुना चिन्हसृष्टीमध्ये हे शक्य झाले म्हणूनच जो तो आता स्वतःची लोकप्रियता कशी वाढवता येईल या अंगाने चाचणी करत असतो चाचपणी करत असतो आणि त्या अंगाने काही ऍक्टिव्हिटीज सुद्धा करत असतो म्हणजेच अनेक क्रियांचा उदय हा लोकप्रियते मधून होतो किंवा लोकप्रियतेच्या प्राप्तीच्या आसक्ती मधून होतो . लोकप्रियता कोणाला कशी द्यावी यासंदर्भातल्या कल्चरल एजन्सीज नेमक्या कोणत्या असतात त्या नेमक्या कशा फंक्शन करतात यामध्ये मीडियाचा रोल काय आहे आणि मीडिया हाच लोकप्रियतेचा मुख्य वाहक आहे का मीडिया खेरीज लोकप्रियतेचा दुसरा काही वाहक अदृश्य असा आहे का आणि तो अदृश्य असेल तर त्याला तपासायचे कसे यासारखे सुद्धा प्रश्न या लोकप्रियताविज्ञानामध्ये विचारासाठी घ्यावे लागतात. मीडियातल्या सर्वच माणसांना त्यामुळे लोकप्रियतेचा वैज्ञानिक अभ्यास करावा लागतो आणि या विज्ञानाशी त्यामुळे जोडून घ्यावे लागते . किंबहुना अलीकडच्या काळामध्ये आपण जर का मीडियाची टेंडनसी तपासत गेलो तर आपणाला दिसते असे की मीडिया हा लोकप्रियतेला सर्वाधिक महत्त्व देतो मग ती लोकप्रियता तुम्ही कशी मिळवता त्या मागची नैतिक तत्वे काय आहेत आणि जर काय ही तत्वे नैतिक नसतील तर काय करायचे या संदर्भातल्या कसल्याही प्रश्नांची उत्तरे अलीकडे मीडिया फारसा चर्चेला घेत नाही परंतु लोकप्रियता विज्ञान या विज्ञानामध्ये या सर्व प्रश्नांचा ऊहापोह करावा लागतो चर्चा करावी लागते विश्लेषण करावे लागते. नीतिशास्त्र आणि लोकप्रियता यांचा संबंध नेमका काय आहे हे तपासावे लागते. बदनाम होंगे तो भी नाम होगा असा सुद्धा अलीकडे एक कल वाढत चाललेला आहे हा कल नेमके काय दर्शवतो असाही प्रश्न आहे . समाजाच्या खालावलेल्या नीतिमत्तेतून अशा प्रकारच्या घटना उदयाला येत आहेत काय असाही प्रश्न येतो कारण अलीकडे काही सिरीयल किलर च्या संदर्भामध्ये त्यांनी हे सर्व लोकप्रियता प्राप्तीसाठी केले होते काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यातूनच मग लोकप्रियता विकृतीचा सुद्धा विचार करावा लागतो . ही लोकप्रियता विकृती आपण सर्वच एकमेकांमध्ये कल्टीवेट करत आहोत काय असाही प्रश्न त्यातून निर्माण होतो .
या मधला सर्वात मोठा प्रश्न असा आहे की लोकप्रियता अलीकडे अर्थशास्त्र या विषयाशी जोडली गेलेली आहे कारण लोकप्रियतेमधून अलीकडे पैसा मिळतो आणि ह्या पैशाला लोकप्रियता पैसा म्हणजेच फेममनी असे म्हणावे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे यालाच कीर्ती विज्ञान असे म्हणता येईल का असाही प्रश्न निर्माण होतो लोकप्रियता शब्द खूप दीर्घ वाटल्याने असा प्रश्न निर्माण होतो परंतु आपण हे लक्षात घेतले पाहिजे की कीर्ती हा लोकप्रियतेचा फक्त एक प्रकार आहे प्रसिद्धी प्रतिष्ठा आणि स्टेटस हे सुद्धा लोकप्रियतेचे आणखी काही प्रकार आहेत त्या सर्व लोकप्रियतेच्या प्रकारांची चर्चा करावी लागते त्यांचे विश्लेषण करावे लागते .
यातूनच पुढे होणारा प्रश्न म्हणजे जाहिराती निर्माण करताना लोकप्रियता हा निकष असतो का? तर तो असतो ही वस्तुस्थिती आहे मग जाहिरात आणि लोकप्रियता यांचा काय संबंध आहे आणि जाहिरात आणि लोकप्रियता यांचा आणखीन लोकप्रियता वाढवण्यासाठी काही फायदा होतो का आपले उत्पादन अधिक लोकप्रिय होण्यासाठी इतरांच्या लोकप्रियतेचा विशेषत: माणसांच्या लोकप्रियतेचा फायदा घेता येतो का आणि तो कसा घेता येतो हा आणखीन प्रश्नांचा जमावळा आता निर्माण होतो आहे .
सर्वसाधारणपणे या संदर्भात एक समजूत प्रचलित आहे ती म्हणजे लोक लोकप्रियता देतात. प्रत्यक्षामध्ये मात्र हा प्रश्न विचारायला हवा की लोक खरोखर लोकप्रियता देतात की जी व्यक्ती असते तिच्या विविध गोष्टींच्या आणि गुणांच्या मधून आणि कृती मधून कृतीच्या गुणवत्तेमधून ही लोकप्रियता निर्माण होते? म्हणजेच लोकप्रियतेचे मूळ कारण काय असा हा प्रश्न आहे . याबरोबरच आणखी एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे लोकप्रिय व्यक्ती स्वतःच्या लोकप्रियतेला वापरत असते का? आपल्या आसपासच्या लोकांना वापरत असते का ? या वापराचे नेमके स्वरूप काय आहे असे प्रश्न निर्माण होतात .
सर्वसाधारणपणे आजकाल लोकप्रिय व्यक्ती स्वतःच्या लोकप्रियतेला वापरत असतेच परंतु आपली ही लोकप्रियता वापरायलाही देत असते याला मी रेंटल पॉप्युलरिटी म्हणतो प्रश्न असा आहे की तिचा वापर करण्यासंदर्भातल्या अटी कशा ठरतात त्या संदर्भात पैसे कसे मिळतात यांचाही अभ्यास या लोकप्रियता विज्ञानामध्ये करावा लागतो . याही पुढचा आणखी एक प्रश्न असा निर्माण होतो जो सहसा चर्चेला घेतला जात नाही तो म्हणजे लोक सुद्धा नायकांना वापरत असतात का ?
अनेकदा दिसते असे की लोकच नेत्याला वापरत असतात आणि यामागे लोकांची सामूहिक आसक्ती म्हणजे सामूहिक भूक सामूहिक तृष्णा आणि सामूहिक निकड असते . लोक अनेकदा एखाद्या व्यक्तीला नेता बनवतात कारण त्यांना स्वतःला त्या नेत्यांमध्ये आपल्या आसक्तीची परिपूर्ती दिसत असते . त्यातूनच मग मेधा पाटकर सोनम वांगचूंक सारखे अण्णा हजारेंच्या सारखे नेते निर्माण होतात आणि नंतर हे नेते पायदळी तुडवले जाण्याची शक्यता असते . लोक काम झाले की त्यांना वापरतात आणि सोडतात याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महात्मा गांधींचा जवळजवळ लोकांनी त्याग करायला सुरुवात केली होती असे स्पष्ट दिसते त्या उलट इंग्लंडमध्ये याच काळामध्ये winston चर्चिल या नेत्याला लोकांनी चक्क युद्धपुरता वापरला आणि फेकून दिला . आज त्यामुळेच लोकांच्यावर सुद्धा नेत्यांचा विश्वास राहिलेला नाही त्यांना हे कळून चुकलेले आहे की लोक सुद्धा आपणाला वापरत असतात काम असेल तर आपल्याला भेटायला येतात पण काम नसेल तर ओळख सुद्धा दाखवत नाहीत आणि जर का आपण इलेक्शन मध्ये पडलो तर आपल्याला लोक जाऊ द्या लोकांचे कुत्रे सुद्धा विचारत नाही. नेत्यांना विसाव्या शतकामध्ये झालेला हा साक्षात्कार फार मोठ्या प्रमाणात राजकीय नैतिकतेवर परिणाम करून गेलेला आहे. सामाजिक जीवनातील राजकीय नैतिकता संपण्याची जी काही महत्त्वाची कारणे आहेत त्यामध्ये लोक सुद्धा नेत्यांना वापरात असतात हे काय नाही आणि ते नवीन प्रस्थापित झालेले समीकरण म्हणून मान्यता पाहुणे हे आहे.
अलीकडच्या काळामध्ये आता हळूहळू या गोष्टी स्पष्ट दिसत आहेत की इतिहासाच्या संदर्भामध्ये लोकप्रिय व्यक्तींना आपल्या उत्पादनाची आपल्या वादाची ism ची आपल्या मॅनेजमेंट ची लोकप्रियता वाढवण्यासाठी वापरणे हे आता फॅशन झालेले आहे म्हणजेच इतिहासाच्या राजकारणामध्ये लोकप्रियतेचे राजकारण सुद्धा फार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आणि असते असे आता स्पष्ट होते आहे त्यामुळेच त्याही प्रश्नांची चर्चा या विज्ञानामध्ये घेतली पाहिजे . किंबहुना इतिहास आणि लोकप्रियता यांचा संबंध तपासणे हे या विज्ञानामध्ये गरजेचे आहे. लोकप्रियतेची उत्क्रांती ही सुद्धा एक महत्त्वाची कल्पना आपण वापरली पाहिजे कारण या संकल्पनेतून आपणाला काही गोष्टी कळतात. मुख्य म्हणजे एखाद्या लोकव्यक्तीची लोकप्रियता कशी उत्क्रांत होत गेली त्यासाठी कोणते घटक जबाबदार होते आणि अंतिमत: आत्ताच्या जगामध्ये त्या व्यक्तीच्या लोकप्रियतेचे स्वरूप काय आहे आणि कोण कोण या लोकप्रियताला कसे कसे वापरत आहे याचा अत्यंत खोलात जाऊन अभ्यास करणे आवश्यक आहे
याबरोबरच दुसरी गोष्ट म्हणजे लोकप्रियता फक्त निर्माण आहे की लोकप्रियतेचे उत्पादन करता येते तेही तपासण्याची गरज आता निर्माण झालेली आहे . उदाहरणार्थ मोदी यांनी लोकप्रियतेचे उत्पादन केले असा आरोप त्यांच्यावर वारंवार केला जातो .आता हा आरोप कसा तपासायचा त्यासाठी खरोखर त्यांनी काही केले का की त्यांच्या आसपास असलेल्या लोकांनी केले की त्यांच्या आसपास असणाऱ्या संघटनेने हे अत्यंत जाणीवपूर्वक केले हे सर्व तपासायला लागतं केवळ ढगात राहून काहीतरी निष्कर्ष काढणे याला काहीही अर्थ उरत नाही यासाठी नेट चाचण्या आणि चाचपण्या कराव्या लागतात .
सर्वसाधारणपणे एक गोष्ट तर अतिशय स्पष्ट आहे ती म्हणजे अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची लोकप्रियता कशी वापरता येईल ते पाहत असते .आपला अलीकडचा जो लोक व्यवहार असतो त्या लोक व्यवहारावर आपल्या व्यक्तिगत स्वार्थाचे विशेषत: लोकप्रियतेच्या वापराच्या संदर्भातील व्यक्तिगत स्वार्थाचे प्रमाण प्रचंड वाढलेले दिसते . जो तो दुसऱ्याला दुसऱ्याच्या लोकप्रियतेला स्वतःच्या लोकप्रियता वाढवण्यासंदर्भात वापरत असतो म्हणजेच अलीकडच्या काळामध्ये इतर other हे फक्त इतर नसते तर ते इतरची लोकप्रियता असते .
याचा नेमका वेगवेगळ्या क्षेत्रांच्यावर काय परिणाम होतो याची सुद्धा तपासणी करण्याची वेळ आता आलेली आहे म्हणजे उदाहरणार्थ कवितेच्या क्षेत्रामध्ये आपणाला असे दिसते की सर्वसामान्य माणसाला ज्याच्याकडे फारसा पैसा नाही त्याच्याकडे शब्द हे माध्यम असते आणि साहजिकच कविता हे निर्माण आणि उत्पादन फार कमी मेहनतीत तयार करता येत असल्यामुळे अनेक कंगाल आणि वंचित समुदायातून आलेले लोक कविता हे माध्यम सर्रास लोकप्रियतेसाठी वापरताना दिसतात त्यामध्ये खरोखर काही अफलातून कवी असू शकतात परंतु त्यांची संख्या फारच कमी असते उलट कविता या माध्यमातून त्याचा फार अनिष्ट परिणाम जास्त झालेला आहे कारण ज्यांना कवितेचा क सुद्धा माहित नसतो असे लोक सुद्धा आपले संग्रह काढतात आणि या लोकांनी कवितेचे संपूर्ण क्षेत्र बरबाद केलेले आहे. अलीकडे तर आम्ही तुमच्या वतीने कविता लिहितो असे सांगणारे लोक हे उदयाला येताना दिसतात पीएचडीचे प्रबंध लेखक तर अतिशय सहज रित्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि ते तुम्हाला पैसे घेऊन प्रबंध लिहून देऊ शकतात.
हीच गोष्ट आपणाला अभिनयाच्या संदर्भात दिसते आपणाला अभिनय येऊ शकतो असे प्रत्येकाला वाटते पण प्रत्यक्षामध्ये धड एक टक्का लोकांना सुद्धा अभिनय येत नाही पण 99 टक्के लोक कुठल्याही मार्गाने आम्ही अभिनय करू शकतो असे सिद्ध करायला बघतात आणि लोकप्रिय व्हायला बघतात त्यातूनच मग लोकप्रियतासाठी लोकप्रियतेसाठी शॉर्टकट तयार होतात आणि हे शॉर्टकट वापरावेत की नाही यातूनच आता नैतिकतेविषयीचे अनेक प्रश्न निर्माण होतात. विशेषत: सर्वसाधारणपणे जे कामगार लोक असतात आणि ज्यांच्याकडे फक्त शब्द हेच माध्यम असते असे लोक कविता वापरतात तर ज्यांच्याकडे पैसा असतो ज्यांना नवीन तंत्रज्ञान मास्टर करता आलेले आहे असे लोक सर्वसाधारणपणे अभिनय निवडतात आणि त्यामुळेच अलीकडच्या काळात अशा प्रकारची सोशल ॲप्स प्रचंड लोकप्रिय होत गेली आणि त्यातून अनेक इन्फ्लुएन्सर उदयाला आलेले दिसतात आणि त्यांच्या मधून त्यांची एक कम्युनिटी पण तयार झालेली दिसते हा एक नवीन समुदाय आहे. काही लोकांना अभिनय येत नाही परंतु सादरीकरण येते असे लोक वास्तवाचा आधार घेत उत्तम सादरीकरण करत लोकप्रियता मिळवतात .
यातूनच काही विकृती ही निर्माण होतात यांना लोकप्रियताविकृती म्हणता येते. यातूनच मानसशास्त्रामध्ये सुद्धा आता नवीन शाखा निर्माण होणे अटळ आहे जिला लोकप्रियता मनोविज्ञान सायकॉलॉजी ऑफ पॉप्युलरिटी किंवा फेम असे नाव देता येते.
अलीकडच्या काळात आणखी एक नवीन प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे लोक सुद्धा आता यामुळे इतरांना वापरण्याच्या नादामध्ये आपल्या नेत्यांना सुद्धा वापरत आहेत का आणि जर का लोक सुद्धा नेत्यांना वापरत असतील तर मग नेते सुद्धा लोकांना वापरतात यात खरोखर काय चूक आहे थोडक्यात नेते आणि लोक एकमेकांना वापरतात आणि वापर संपला की फेकून देतात अशी आत्ताची राजकीय स्थिती निर्माण होताना दिसते आहे आणि ही चौथ्या नवतेची राजकीय स्थिती आहे जिची कल्पना साधारण मला आधीच आली होती . चिन्ह सृष्टीचे काही फायदे असतात तसे तोटेही असतात त्यातील एक तोटा म्हणजे हे अत्यंत गुंतागुंतीचे बनलेले वापरावापरीचे राजकारण होय.
प्रश्न असा असतो की लोकप्रियतेचीसुद्धा नशा चढते का ? लोकप्रियतेचे सुद्धा व्यसन लागते का? माझ्या मते हे व्यसन लागते त्याला आपण लोकप्रियताव्यसन fame addiction म्हणू आणि त्यातून अनेक गुंतागुंतीचे प्रश्न अलीकडे निर्माण झालेले आहेत . या लोकांच्यासाठी आता स्वतंत्र केंद्रे उभारण्याची वेळ आलेली आहे . लोकप्रियता एका अर्थाने इथे ड्रगमध्ये रूपांतरीत झालेली आहे . लाईक किती हा प्रश्न किक झालेला आहे किंबहुना एक लाईक म्हणजे एक किक असेही होते . या लोकप्रियता किकचे(fame kick)स्वरूप काय ? त्यामुळेच आपल्या नेत्या विषयी obsession निर्माण होते का ? त्याचा नेमका काय परिणाम होतो मुख्य म्हणजे राजकीय निवडणुकीच्या निकालावर याचा होणारा परिणाम काय आहे याची सुद्धा आता चर्चा करण्याची वेळ आलेली आहे . कारण लोकप्रियताव्यसन हे दारूच्या व्यसना इतकेच घातक असते . त्यामुळे सतत आपल्याला कोण लोक लाईक करते त्याची चाचपणी केली जाते आणि आपल्याला लाईक करणाऱ्या लोकांनाच आपण लाईक करायला लागतो . हा एक अत्यंत घातक प्रकार असतो कारण तिथे सत्याचा बळी जातो . अनेकदा लोकप्रियतेमुळे स्वतःच्या आकलनामध्ये प्रचंड अडथळे आलेले आहेत येताना दिसत आहेत. लोकप्रियतेचा फुगा फुटला की त्याचे होणारे मानसिक परिणाम अत्यंत घातक होतात .
लोकप्रियतेचे अनेक निकष असतात हे निकष सुद्धा कसे जन्मले त्यांचा इतिहास काय आणि ते आता कसे फंक्शनल असतात आणि त्यांची मोडस ऑपरँडी काय आहे याचा सुद्धा अभ्यास लोकप्रियतेच्या विज्ञानामध्ये करावा लागतो अनेक लोक आपल्याला मानसन्मानाचे भुकेलेले असलेले दिसतात अनेकांना वेगवेगळ्या देशातले मान सन्मान हवे असतात आणि ते त्यासाठी जगभर हिंडत असतात त्यासाठी फिल्डिंग लावत असतात .
आणि अर्थातच सर्वात शेवटी माझ्यासारख्या माणसाला उपस्थित करावा लागणारा प्रश्न म्हणजे लोकप्रियता मोक्षाच्या यात्रेमधला अडथळा आहे का? तर या प्रश्नाचे उत्तर स्पष्टपणे हो असे आहे . ज्यांना मोक्ष मिळवायचा असतो त्यांना लोकप्रियता आणि लोकप्रियतेचे सर्व निकष फाट्यावर मारावे लागतात तरच मोक्ष मिळण्याची शक्यता आहे अन्यथा मोक्ष मिळणे शक्य नाही . लोकप्रियता ही अनेकदा वास्तवाचे जे मायारूप असते त्याची विविध रूपे प्रकट करणारी गोष्ट असते. अनेकदा तर ती आभासात्मक असते . आम्ही तुम्हाला लोकप्रियता मिळवून देऊ अशी गॅरंटी देणारे लोक सुद्धा त्यातूनच निर्माण होतात आणि लोकप्रियता हा सुद्धा एक व्यवसाय म्हणून आणि धंदा म्हणून उदयाला येतो . लोकप्रियता मिळवल्याशिवाय तुमचा व्यवसाय होऊच शकत नाही हे असे एक व्यवसायिक समीकरण यातूनच तयार होते .विशेषत: चित्रपट क्षेत्रांमध्ये अलीकडे हे फार प्रबळ आहे आणि अभिनेत्यांना मिळणारे पैसे हे त्यांच्या या खऱ्या आणि खोट्या लोकप्रियतेचे असतात . असे लोक जेव्हा मोक्षावर बोलायला लागतात तेव्हा समजून जावे की हे मोक्षाचा सुद्धा अभिनय म्हणजेच धंदा करायला लागले . अशा लोकांच्या पासून साधकांनी दूर राहावे
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment