लोकप्रियता , क्रिया आणि क्रियात्मक लोकप्रियतेचे प्रकार श्रीधर तिळवे नाईक 

लोकप्रियतेसाठी तुम्ही जे कार्य करता किंवा कृती करता किंवा क्रिया करता त्यावरून सुद्धा काही प्रकार पडतात 

१ प्रायोगिक क्रिया : ही क्रिया न भूतो न भविष्यती असते आणि अशा प्रकारची क्रिया या प्रकारे कधीच कोणी केलेली नसते संस्कृत भाषेचा आधार घ्यायचा तर ती अनन्यसाधारण असते त्यामुळेच तिला प्रयोग म्हटले जाते प्रयोग कधी यशस्वी होतात कधी अयशस्वी होतात त्यामुळेच प्रयोग करताना लाभणारी जी लोकप्रियता असते तिला प्रायोगिक लोकप्रियता असे म्हटले जाते ज्याचे प्रयोग जास्त यशस्वी होतात अशा माणसाला जास्तीत जास्त प्रायोगिक लोकप्रियता सुरुवातीच्या कालखंडामध्ये लाभते आणि जर का लोकांनी या प्रायोगिक कृतीना आणि त्यांच्या अनुकरणांना स्वीकारले तर मग अशी माणसे अनेकदा दंतकथा म्हणून ओळखली जातात आणि हळूहळू त्यांची लोकप्रियता ही व्यावसायिक धंदेवाईक अशी बनत बनत शेवटी सांस्कृतिक लोकप्रियता होऊन जाते . जगातल्या अनेक कलावंतांना असे बनायचे असते आणि ज्यांना काही बनायचे असते त्यांची जागा मोक्षात नसते मोक्षात फक्त तेच लोक येऊ शकतात ज्यांना असायचे असते . त्यामुळेच प्रायोगिक कृती सुद्धा अनेकदा स्वतःला काहीतरी बनवण्यासाठीच केली जाते त्यामुळेच प्रायोगिक ते मागे लोकप्रियतेची आसक्ती असू शकते . सुरुवातीच्या प्रायोगिक कृतीवरून तुम्हाला मिळणारी म्हणजे प्रायोगिक लोकप्रियता! ही लोकप्रियता कायमच तुमच्या प्रयोगांना मिळत असते पण ती अतिशय अल्प असते अनेकदा ती एका विशिष्ट ग्रुपपुरतीच सर्कल पुरतीच मर्यादित असते याचे कारण अनेकदा प्रायोगिक कृती कळत नाही आणि सर्वसामान्यांच्या अलीकडे ती येत नाही त्यामुळे जे लोक कायमच सर्वसामान्यांच्या पलीकडे आहोत असे स्वतःला समजत असतात असे लोक अनेकदा अशा प्रकारची कृती करून अशा प्रकारची प्रायोगिक लोकप्रियता मिळवण्याची धडपड करत असतात अनेकदा हे ग्रुप ही लोकप्रियता स्पॉन्सर करण्याचा सुद्धा प्रयत्न करतात कारण त्यांच्या दृष्टीने ती प्रायोगिक कृती खूप महत्त्वाची असते परंतु जे व्यवसायिक किंवा धंदेवाई प्रस्थापित असतात त्यांना ही प्रायोगिक कृती आवडेलच असे नाही अलीकडच्या काळात अतुल पेठे यांच्या नाटकावरून आणि त्यावर संजय मोने यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून हा वाद नेमका काय पद्धतीचा असतो आणि लोकप्रियतेच्या संदर्भामध्ये गोष्टी प्रत्यक्षात स्पॉन्सर केल्या जातात की नाही असे प्रश्न पुन्हा निर्माण झालेले आहेत लोकप्रियतेच्या विज्ञानामध्ये हे एक सनातन कोडे आहे आणि ते लोकप्रियतेच्या विज्ञानाला त्या वैज्ञानिक पद्धतीने तपासावे लागेल प्रायोगिक लोकप्रियता सुद्धा स्पॉन्सर केली जाते की नाही अशा प्रकारचे प्रश्न त्यामुळेच लोकप्रियतेच्या विज्ञानामध्ये सुद्धा निर्माण झालेले आहेत. प्रायोगिक टाईपचे लोक चळवळ करणारे लोक हे नेहमीच एकमेकाला चढवत असतात असा हा आरोप असतो आता गमतीचा भाग असा असतो की जे लोक स्वतःला व्यवसायिक म्हणत असतात आणि ज्यांना लोकप्रियता लाभलेली असते त्यांना अनेकदा हे माहीत नसते की ते जे काही करत आहे ते सुद्धा एकेकाळी प्रायोगिक होते त्यांच्या प्रायोजित व्यवस्था या सुरुवातीच्या कालखंडात प्रायोगिकतेच्या जीवावरच उभ्या राहिलेल्या आहेत त्या प्रायोगिक जीवावर आजचे तुमचे व्यवसाय उभे राहिले आहेत आणि तुम्ही आता स्वतःच नव्याने निर्माण झालेल्या प्रायोजित कलेला नावे ठेवत आहात हा सांस्कृतिक क्षेत्रामधील आप्पलपोटेपणा आहे हा खरे तर एक विरोधाभास आहे पण अनेकदा हा विरोधाभास व्यवसायिक कलाकारांच्या लक्षात येत नाही कारण त्यांना व्यवसायिक कृती ह्या थेट व्यावसायिक म्हणून संस्कृतीत दाखल झाल्या असे वाटत असते आणि हे वाटणे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून अभ्यासाचा अभाव आणि अल्प किंवा स्वार्थ बुद्धी असते. याचा अर्थ प्रायोगिकतेला लोकप्रियता मिळतच नाही असा नाही आपल्याकडे अशी लोकप्रियता सखाराम बाईंडर आणि आशेराम कोतवाल या प्रायोगिक नाटकांना लाभलेली आहे त्यामुळे लोकप्रियतेचा संबंध हा प्रत्येक वेळी प्रायोगिकतेला कमी आणि व्यवसायिकतेला जास्त असा असतो तसे नाही उलट याच दोन नाटकांच्या कालखंडामध्ये अनेक व्यवसायिक नाटके सुपरफ्लॉप झालेली आहेत त्यांना लोकप्रियता लाभली नाही त्यामुळे लोकप्रियताचा संदर्भ हा प्रायोगिकतेशी किंवा व्यावसायिकतेची जोडणे हे अचूक असेलच असे नाही आपण फक्त ढोबळपणाने म्हणू शकतो की प्रायोगिकतेला सुरुवातीच्या कालखंडामध्ये कमी लोकप्रियता लागू शकते पण हे घडेलच असे नाही एखादी प्रायोगिक कलाकृती ही थेट संस्कृतीमध्ये दाखल होऊ शकते आणि दाखल झाल्यानंतर ती हिट होऊ शकते त्यामुळे याबाबतीत मूल्यमापन करताना खूप सावध असावे लागते .

२ समांतर कृती आणि तिच्यामुळे लाभणारी समांतर लोकप्रियता : ही लोकप्रियता प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्याच पद्धतीचे प्रयोग वेगळ्या आशयाच्या मार्गाने करणे अशा अंगाने समांतर कृतींच्या साहाय्याने मिळते . या कृतींच्या मधला आशय हा अनेकदा क्रांतिकारक नसतो तर प्रायोगिकतेमध्ये चालत आलेल्या क्रांतिकारक आशयाची ती उत्क्रांती असते किंवा विकास असतो किंवा वाढ असते किंवा त्याची घडवलेली प्रगती असते अनेकदा आता प्रायोगिक प्रस्थापित झाल्याने आपणाला सुद्धा चान्स आहे असे कृती करणाऱ्याला वाटत असते इथे बंडाचा प्रश्न नसतो तर बंड स्वीकारले गेलेले आहे पण त्याला लोकप्रियतेचा अजून पुरेसा आधार लाभलेला नाही म्हणून असे समांतर प्रयोग आपण करू शकतो असे वाटल्यामुळे असे प्रयोग केले जातात जे प्रायोगिक वाल्यांना यश मिळाले किंवा नाही मिळाले ते आता आपल्याला मिळू शकेल असे अनुमान लावून त्या बंडाप्रमाणे बंडाने निर्माण केलेल्या साच्याप्रमाणे कृती केली जात असते . आपल्याकडे अनेकदा समांतर कृती करणारे लोक समांतर उद्योग करणारे लोक अकारण मोठे केले जातात प्रत्यक्षात त्याने काहीही घंटा प्रायोगिक काम केलेले नसते . पण सांस्कृतिक हितसंबंध सांभाळणाऱ्या लागेबंधांना हे लोक फार व्यवस्थित पॉलिश करत असल्याने त्यांचे आपोआपच श्रेय लाटण्याचे उद्योग सुरू राहतात. मला असा एक चित्रपट नक्की माहिती आहे जो ऑस्कर पर्यंत पोहोचला आणि ज्याने तो लिहिला होता त्याला श्रेय मिळाले नाही त्या चित्रपटाच्या श्रेय नामावलीतील तिघाही लेखकांची आत्ताची अवस्था बघितली आणि लेखनाच्या क्षेत्रात नंतर त्यांनी काय दिवे लावले हे बघितले तर मी काय म्हणतो आहे हे सहज स्पष्ट होईल . फार पूर्वीपासूनच लगान वसूल करण्याची प्रथा आपल्याकडे आहे म्हणजे मेहनत शेतकऱ्याने करायची आणि पैसा जमीनदाराने घ्यायचा . लोकप्रियते बाबतीत सुद्धा असे घडू शकते .

३ व्यवसायिक कृती आणि व्यावसायिक लोकप्रियता : व्यवसायिक लोकप्रियता नेहमीच व्यावसायिक कृती करून लाभत असल्याने लोक ती करतात मात्र तिला धंदेवाईकपणा नसतो तर स्वतःची इच्छा असते तिथे गल्ला किती निर्माण होईल यावर लक्ष नसते पण जो करणारा असतो त्याला आता समांतर कृती लोकप्रिय होऊ शकते असे वाटते म्हणून तो ती प्रोफेशनमध्ये रूपांतरीत करून तशी कृती करतो आपल्याकडच्या प्रायोगिक रंगमंचावरच्या नाटकांच्या कृती या प्रत्यक्षात अनेकदा केवळ समांतर किंवा व्यवसाय कृती आहेत आणि त्या युरोपमधल्या प्रयोगांच्या यशस्वी सादरीकरणानंतर उत्पादित झालेल्या आहेत. 

४ धंदेवाईक लोकप्रियता ही लोकप्रियता मात्र धंदेवाईक कृती करून म्हणजेच पैसे मिळवण्यासाठी केल्या गेलेल्या कृतीतून निर्माण होते सर्वसाधारण सर्वच उद्योजक हे धंदेवाईक म्हणजे कमर्शियल असतात आपल्याकडे धंदेवाहिक हा शब्द फार निगेटिव्ह पद्धतीने वापरला जातो परंतु ते योग्य नव्हे धंदेवाईक याचा अर्थ कमर्शियल असा होतो तर व्यवसायिक याचा अर्थ प्रोफेशनल होतो उद्योगांच्या मध्ये सुद्धा आणि उद्योगपतींच्या मध्ये सुद्धा व्यवसायिक आणि धंदेवाईक असे दोन प्रकार असू शकतात आपल्याकडे टाटा हे व्यवसायिक होते अंबानी मात्र धंदेवाईकच होते आता मात्र अंबानी व्यवसायिक बनत चाललेले आहेत आणि ही आनंदाची गोष्ट आहे . धंदेवाईक लोकप्रियतेला अनेकदा कशाची ही चाड नसते त्यामुळे वाईट काम करून सुद्धा धंदेवाईक लोकप्रियता मिळू शकते फक्त ते काम कायद्याच्या चौकटीत बसवावे लागते .

५ बेकायदेशीर लोकप्रियता : ही लोकप्रियता कायदा मोडून मिळवली जाते प्रायोगिक लोकप्रियता प्रयोग करून उभा राहते बंड करून उभा राहते परंतु इथे बंड नसते तर फक्त धंदेवाईकपणा असतो परंतु हा धंदे वाईकपणा कायदे सुद्धा पाळायला तयार नसतो अनेकदा क्रिमिनल लोकांची जी लोकप्रियता असते तिला क्रिमिनल लोकप्रियता किंवा बेकायदेशीर लोकप्रियता म्हणावे लागते आपल्याकडे अशाच लोकप्रिय झालेल्या लोकांना जागा देणारे महाभाग कलावंत जन्मलेले आहेत. वास्तविक त्यांचे परखड परीक्षण करायला हवे पण ते होत नाही उलट त्यांची ताकद कशी मोठी आहे याच्याच दंतकथा निर्माण केल्या जातात आणि हे लोक सुद्धा आपली बेकायदेशीर लोकप्रियता कशी वाढत जाईल त्याची काळजी घेत असतात पूर्वीच्या अंडरबल मध्ये लोकप्रियता हा घटक नव्हता परंतु १९९० नंतर मात्र अंडरवर्ल्ड मध्ये सुद्धा लोकप्रियता महत्त्वाची होत गेली आणि मग बेकायदेशीर लोकप्रियतेचा उदय झाला . टेररिझम हा सुद्धा याच अंगाने येतो अर्थात काही लोक त्याला प्रायोगिक म्हणू शकतात पण मला तरी त्याला प्रायोगिक म्हणावे असे वाटत नाही . मला तो बेकायदेशीरच वाटतो आणि टेररिझमच्या द्वारे मिळणारी लोकप्रियता ही बेकायदेशीरच लोकप्रियता मानली पाहिजे असे मी मानतो .

थोडक्यात काय लोकप्रियतेच्या मागे अनेकदा अशा पाच प्रकारच्या कृती असतात आणि त्यांच्याच आधारे बऱ्याच गोष्टी उभ्या राहतात या सर्वांचा आपण अधिक खोलात जाऊन विचार करायला हवा आणि त्याचबरोबर त्याचा सांस्कृतिक जीवनावर काय परिणाम होतो तेही तपासावे लागेल .

श्रीधर तिळवे नाईक 

Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती