आंदोलनातील कॉकरोच , घोडे आणि हत्ती श्रीधर तिळवे नाईक 

शैव श्रुतीचे राजकीय सिद्धांत हे नेहमीच काळानुसार योग्य ती भूमिका घेत असतात . सनातन असे काहीही नसते राजकारणामध्ये तर बिलकुल नसते आणि धर्मकारण हे राजकारणाचा भाग असल्याने त्यातही सनातन असे काही नसते. सनातन फक्त मोक्ष असतो धर्म नसतो ही शैव श्रुतीची गेली बारा हजार वर्षे अस्तित्वात असलेली मांडणी आहे त्यामुळेच कुठलीही राजवट ही द्वादशशीलयुक्त असली पाहिजे मात्र ही द्वादशशीलता राबवताना जे अनुशासन निर्माण होते जी शिस्त निर्माण होते ती प्रत्येक वेळेला काळानुरूप व्यवस्थित बदलली पाहिजे अनेकदा साधना करताना व्यक्तिगत पातळीवर बदल करावे लागतात तेही केले पाहिजेत 

त्यामुळेच दिल्लीत जे काही घडले ते अभूतपूर्व होते आणि मी त्याला नेहमीच पाठिंबा दिलेला आहे आणि कायमच भाजपला काय चालले आहे ते ओळखा असे सांगितलेले आहे मात्र भाजपाने ते ओळखले आहे की नाही याबद्दल मला अजूनही शंका आहे. मोक्षकेंद्री राजकारणाला कुठलाही पक्ष नसतो कारण त्यांचा पक्ष सत्य असतो. खऱ्या विधानांना प्रमाणाच्या आधारे तपासत तो खऱ्या खोट्याची चर्चा करतो आणि कुठल्याही पक्षाची बाजू न घेता सर्वच पक्षात आपल्या शैव श्रुतीचे लोक असू शकतात हे गृहीत धरून सर्वांनाच उपदेश केला जातो कारण शेवटी उपदेशाचा अंतिम उद्देश हा देश मजबूत करणे असतो . त्यामुळे सत्ताधारी पक्षाला वारंवार सावध करणे आणि विरोधकांना वारंवार कुठल्या आधारे तुम्ही आंदोलन उभे करू शकता कुठे विरोध करायला हवा याविषयी मार्गदर्शन करणे हे सर्व शैव श्रुतीच्या आचार्यांचे ,पुजाऱ्यांचे पंडितांचे ,गुरूंचे ( म्हणजेच गुरवांचे )कर्तव्य आहे .

या आंदोलनातील तरुणांनी स्वतःला कॉकरोच म्हणवून घेतले हे फार लक्षणीय आहे याचे कारण झुरळ हा प्राणी अत्यंत लपून राहतो तो दिसत नाही मात्र तो उपस्थित असतो आणि कुठल्याही आंदोलनाची सुरुवातीची स्थिती हीच असते किंबहुना आंदोलनाच्या लपून राहिलेल्या स्थितीला मी कॉकरोच स्थिती असे म्हणेन या कॉकरोच स्थितीमध्ये आंदोलन करतेधरते विचार करत असतात परंतु प्रत्यक्ष मैदानात ते उतरत नाहीत कारण मैदानात उतरण्यासाठी आपल्याला घोडे बनावे लागेल हे त्यांना माहिती असते .

या झुरळ स्थितीनंतर मग अचानक जेव्हा त्यांच्या अंगी लढण्याचे बळ येते आपण आता काफ्का च्या कथेप्रमाणे मेटामॉर्पिसेस करून स्वतःचे घोड्यामध्ये रूपांतर करू शकतो असा आत्मविश्वास प्राप्त झाला की फार विचार न करता मग अचानक कॉकरोच स्थितीतले लोक हळूहळू हालायला लागतात आणि तेव्हा त्यांचे रूपांतर घोड्यात होते आणि मग प्रस्थापित राजवटींना घोडे लावायला ही स्थिती सज्ज होते. हिला आपण घोडे स्थिती किंवा घोड स्थिती म्हणू . पुढे आंदोलन करते फक्त घोडे राहिलेले नसतात ते आता हातात तलवार घेतलेले आणि स्वतःच घोडे असलेले अभूतपूर्व वीर असतात त्यांच्याकडे स्वतःची म्हणून एक एनर्जी असते तिचे प्रेडिक्शन करता येत नाही कारण अनेकदा विरोधक त्यांना झुरळ समजत असतात अनेकदा तर ते झुरळ आहेत म्हणून गाफील होतात . याचा व्हायचा तो परिणाम होतो . अचानक सुरुवातीला मग हे विरोधक कुठे पाणी मार लाठीमार असले स्क्वेअर चौकोनी उद्योग करत बसतात पण हे घोडे (हा शब्द घोडा आणि घोडी या दोघांना लागू होतो)आता दाद द्यायला तयार नसतात साहजिकच हे जेव्हा मैदानात जमायला लागतात तेव्हा मग एक विचित्र आणि अभूतपूर्व स्थिती तयार होते आणि काय चालले आहे ते कळत नाही . यातील स्त्रियांच्या बाबतीत तर प्रश्नच पडायला लागतात ( या आंदोलनात भाग घेतलेल्या मुलींच्या मुळेच मला hips don't lie ही कविता सुचली अन्यथा ती सुचली नसती) 

या आंदोलनाला आता पुढे सरकायचे असेल तर त्यांना आता हत्ती स्थितीमध्ये स्वतःला रूपांतरित करावे लागेल कारण गणपती व्हायचे असेल तर घोड्याला हत्ती बनवून हत्तीवर स्वार व्हावे लागते कारण आता जंगलावर राज्य करण्याची वेळ येते. दोन पर्याय असतात हे मी नेहमीच मांडलेले आहे एक तर सिंह बनणे जे भाजप करत आलेला आहे किंवा हत्ती बनणे किंबहुना युरेशियन संस्कृती आणि शैव संस्कृती यांच्यामध्ये जो फरक आहे तो फरक हाच आहे की युरेशियन संस्कृती राज्यकर्त्याला सिंह बन असे सांगते आणि बनवते आणि शैव संस्कृती राज्यकर्त्याला गणपतीला हत्ती बन असे सांगते आणि बनवते .

मी कायमच भाजपाला आणि हिंदुत्ववादाला हत्ती बना असे सांगत असतो पण दुर्दैवाने अलीकडच्या काळामध्ये हा हिंदुत्ववाद इतका ब्राह्मणी होत गेला की त्यांना सिंह बनने जास्त आकर्षित करू लागले आणि त्याप्रमाणेच मग 56 इंच छाती पुढे करण्याची सवय लागली पण या आंदोलनाच्या बाबतीत ही छाती काही कामाला आलेली आहे असे दिसत नाही . मुळात सिंह हा प्राणी जंगलचा राजा फक्त युरेशियन राजवटीत असतो. तिकडून आलेली ही दंतकथा आहे भारतात मात्र जंगलचा राजा कायमच हत्ती राहिलेला आहे आणि मी नेहमीच सांगत आलेलो आहे की वन टू वन फाईट मध्ये हत्ती नेहमी सिंहाला जिंकतो . जेव्हा झुंडीचा प्रश्न येतो तेव्हा तर सिंहांची झुंड हत्तीच्या कळपावर हल्ला सुद्धा करायला जात नाही तसा प्रयत्न झाला तर आपला खात्मा होऊ शकतो याची त्यांना खात्री असते . ते नेहमीच एखादा हत्ती एकटा पडतो का पाडता येईल का अशा पद्धतीने विचार करत असतात आणि असा कोणी एकटा पडला की मग त्याच्यावर हल्ला करतात पण अनेकदा हा हल्ला सुद्धा यशस्वी होत नाही कारण हत्तींचे लक्ष फक्त पुढे असत नाही मागेही असते आणि आपल्या मागे कोणी रेंगाळणार असेल तर त्याला ते पुन्हा मुख्य प्रवाहात घेऊन येतात. त्यामुळे अनेकदा अशी पाठीमागे नजर असलेला कळप रेंगाळणाऱ्याला वाचवते .

इथे सुद्धा आंदोलनामध्ये रेंगाळत राहिलेल्या तरुणांच्या वर एकटे पाडत कसे हल्ले करता येतील तेच जास्त पाहिले गेले. अनेकदा शासन संस्थेला आणि प्रशासन संस्थेला आपण सिंह आहोत असा आभास होत असतो . अशोकाच्या काळापासून असा आभास आहे . पण प्रत्यक्षामध्ये अशोक स्वतः हत्ती बनत गेला होता याचा अनेकांना विसर पडलेला आहे . हत्ती एवजी जेव्हा काँग्रेस ने सिंह आणला आणि राष्ट्रीय पशु म्हणून जेव्हा वाघ आणला तेव्हाच काँग्रेस कुठल्या दिशेने जाणार हे स्पष्ट होते पुढे मग जेव्हा भाजपकडून त्रिसिंह आला तेव्हाच भाजपा आता पुन्हा कुठे जाणार हे स्पष्ट होते. म्हणजे २०१४ व २०१९ ला निवडून येताना हर हर महादेव आणि नंतर मात्र जय श्रीराम असा पद्धतशीरपणे नेहमीचा बहुजनांची फसवणूक करणारा प्रवास या लोकांनी केला असे आता स्पष्ट दिसत आहे. यामध्ये मोदींची जी गोची झाली ती स्पष्ट झालेली आहे एकेकाळी अत्यंत उत्स्फूर्तपणाने भाषण करणारे मोदी हळूहळू टेलिप्रिंटरवर लिहून आलेली भाषणे वाचून दाखवायला लागले तेव्हाच त्यांच्या उत्स्फूर्ततेचा शैवतेचा पूर्ण सत्यानाश करण्याची तयारी भाजपने चालवली आहे हे स्पष्ट झाले होते . हे काही आजचे नाही हे नेहमीचेच आहे ही वैष्णव राजकारणाची अत्यंत धुरंदर खेळी असते आणि बहुजन समाज आतापर्यंत नेहमीच याला बळी पडलेला आहे . त्यामुळे आता बहुजन समाजाला पुन्हा शैव हिंदुत्वाचा डोस देण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये कुंभमेळा आयोजित केला जाईल याविषयी मला शंका नाही कारण तेवढाच एक पर्याय आता भाजपच्या हातात आहे 

प्रश्न असा आहे की या सगळ्या प्रश्नावर घोडे झालेले कॉक्रोच करणार काय आहेत ? 

एकीकडे त्यांनी उभा केलेल्या संघटनेचा पूर्णपणे फायदा उठवण्यासाठी टपलेले विरोधी पक्षनेते आणि पत्रकार तर दुसरीकडे युरेशियन मानसिकतेमध्ये वावरणारे सत्ताधारी यांच्यामध्ये सापडलेला तिसरा पक्ष म्हणूनच सध्या तरी ते उभे आहेत . हा तिसरा पक्ष हत्ती बनणार आहे का हा खरा प्रश्न आहे. कारण गणपती होण्यासाठी व्हाया हत्ती जावे लागते .

त्यामुळे आता संपूर्ण स्वतःची वैचारिक जालकी सादर करावी लागेल . पुरोगामी लोकांची स्वातंत्र्य समता बंधुता आणि आधुनिक उत्तर आधुनिक लोकांची आधुनिकता आणि उत्तर आधुनिकता पचवत या लोकांना चौथ्या नवतेकडे यावे लागेल त्याशिवाय पर्याय नाही नाहीतर मग अत्यंत पारंपारिक राजवटीच्या अंगाने हा विकास वाढत राहिला तर त्याला फारसे भवितव्य राहणार नाही. मुळात ज्याची सुरुवातच महाजालापासून झालेली आहे असा हा एका अर्थाने हा चौथा नवतेचा स्थापित झालेला म्हणावा असा पहिला पक्ष आहे त्यामुळे जे जे चौथ्या नवतेचे लोक आहेत त्यांनी या पक्षाच्या घडामोडी कडे काळजीपूर्वकच पाहिले पाहिजे कारण अण्णा हजारे आंदोलनानंतर आता हे चौथ्या नवतेने चालवलेले देशातले राष्ट्रव्यापी असे दुसरे आंदोलन आहे.

माझा अंदाज चुकला नाही तर अण्णा हजारेंच्या आंदोलनामध्ये जशी व्यवस्थित फाटा फूट पाडली गेली नंतर भाजपची बी टीम अशी प्रतिमा तयार करून काही पत्रकार स्पॉन्सर केले गेले तशी फाटा फूट आता यांच्यात सुद्धा पाडण्याचा प्रयत्न होईल. हे आम्ही स्पॉन्सर केलेले आंदोलन आहे असेही सिद्ध करण्याचा प्रयत्न होईल. यांच्यातलेच कोणी किरण बेदी होईल आणि पक्षांतर करेल निदान तसा प्रयत्न केला जाईल. ज्यांना सत्तेचा शॉर्टकट हवा आहे ते निघून जातील मात्र ज्यांना दीर्घकाळ लढाईचे आत्मभान आहे ते टिकतील मात्र त्यांना हत्ती बनण्यावाचून पर्याय नाही . हत्तीचा संयम ही फार मोठी गोष्ट असते. तो अंगात बाणवावा लागेल . समाजवादी लोकांना कायमच वैचारिक फाटा फूट पाडण्याचा व वाढवण्याचा छंद असतो त्यामुळे त्यांच्या या दुर्गुणापासून सावध राहावे लागेल. आंबेडकरवादी लोकांना वितंड वाद करण्याचा शौक असतो संघटन करण्याऐवजी विघटन करण्याचा शौक असतो त्यापासूनही सावध राहावे लागेल . हत्ती सारखे भव्य व्हायचे असेल तर सर्वच्या सर्व पायांच्या मध्ये सर्व प्रकारच्या शारीरिक यंत्रणेमध्ये समतोल असावा लागतो . कुठल्या लोकांच्याकडून काय घ्यायचे हे नीट करायला हवे. समाजवादाकडून आर्थिक विषमते विरुद्धचा लढा घ्यावा आंबेडकर वादांच्या कडून सामाजिक समता आणि गौतम बुद्धाची करुणा घ्यावी आणि शैव लोकांच्याकडे हत्ती सारखे शहाणपण , काळाच्या आणि नवीन वास्तवांच्या अनुरूप अनुशासन शासन प्रशासन , त्यासाठी आवश्यक असलेला लढाऊ बाणा आणि पराक्रम , सर्व कल्याण वाद आणि द्वादश शीलता आहे ते सर्व घ्यावे . 

असे काही झाले तरच हत्तीरूप सिद्ध होईल आणि या देशाचा महागण महागणपती बनून सांभाळता येईल . अण्णा हजारे यांनी एक फार मोठी चूक केली होती ती म्हणजे त्यांनी आप पक्षाला पाठिंबा दिला नाही . राजकारणाशिवाय समाजकारण चालवता येत नाही ही मूलभूत गोष्ट त्यांना कळली नाही . ते काठावर उभे राहिले आणि त्यांना वाटले नदी आपल्या कंट्रोल मध्ये राहील तशी ती राहिली नाही . ती शेवटी भाजपाला जाऊन मिळाली. कॉकरोचवाल्यांची सुरुवात आश्चर्यकारकरीत्या राजकीय पक्षापासूनच झालेली आहे म्हणजेच अण्णा हजारे समाजकारणापासून समाजकारणापर्यंत राहिले केजरीवाल समाजकारणापासून राजकारणापर्यंत गेले पण कॉकरोच वाले मात्र राजकारणापासून समाजकारणाकडे जावणार आणि मग राज्यकारणाकडे जातील अशी चिन्हे आहेत त्यामुळे अण्णा हजारे यांची चुक ते करणार नाहीत असे वाटते पण भाजपने विशेषतः मोदी यांच्या भाजपने सिंह बनण्याची जी चूक केली ती चूक मात्र त्यांच्या हातून सुद्धा होऊ शकते . तेव्हा सावध रहा हत्ती व्हा आणि थंड डोक्याने पाऊल टाकत रहा .

मीडियामधल्या काही लोकांचा भाजप काहीतरी शून्य झालेला आहे असा भ्रम झालेला आहे प्रत्यक्षात हा भ्रमच आहे आणखीन काही महिन्यातच भाजप पुन्हा वापसी करेल तेव्हा तुमचा मुकाबला आता ढिल्या पडलेल्या भाजपशी असणार नाही तर पुन्हा बलवान बनलेल्या भाजपशी असणार आहे याचे भान बाळ आणि दात अधिक मजबूत बनवून सज्ज रहा अन्यथा भाजपने कधी पार्टी कळंकृत आणि नंतर गिळंकृत केली हे कळणार सुद्धा नाही .

श्रीधर तिळवे नाईक 



Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती