मोक्ष शेवटच्या कविता

 इच्छा साधी होती 

जाण्यापूर्वी जग बदलेन आणि जाईन


मनुष्य नावाचा जो प्राणी आहे त्याला सिद्ध बनविन 


विज्ञानाने बळ दिले पंख दिले पण विवेक दिला नाहीं 

थोडासा विवेक देईन आणि जाईन 


विज्ञानाने कॅमेरा दिला पण न्याय दिला नाही 

मनुष्याच्या ठायी असलेले अद्वितीयता उमलु दिली नाही फक्त फॉलोवर बनवण्याचे युक्तिवाद झाले 

वॉलवर चालण्याचे जिम्नॅस्टिक झाले

भक्तांच्या झुंडी झाल्या आणि देवांच्या पार्ट्या

वाटलं होतं मनुष्यालाच देव बनविन आणि मग जाईन

जाण्यापूर्वी जग बदलेन मग जाईन


मनुष्य ज्याने नेहमीच निराश केले 

व्यवस्था जिने फक्त फ्रस्ट्रेशन दिले 

तिला कन्स्ट्रक्शन शिकवीन आणि मग जाईन 


सतत जनावरे दाखवणारे व्हिडिओ 

हिंसा दाखवणारे व्हिडिओ 

बलात्काराला नैसर्गिक मान्यता मिळवून देणारे व्हिडिओ 

मी बाजूला धाडायला शिकवीन

शिकवीन की तू किंगडम प्लांट नाहीं आहेस 

तू किंगडम ॲनिमल नाहीस 

तू किंगडम मोक्ष आहेस 

प्रत्येकातला सिद्ध जागृत करेन आणि मग जाईन


प्रगतीचे अवाढव्य नकाशे गुगलणारे 

विकासाचे ताशे नेटणारे 

स्पॉन्सर केलेले पडघम 

प्रपोगंडाचा लार्जर दॅन लाईफ उगम


नुसत्या बिल्डिंगा 

आणि आत काँक्रीटची माणसे  

एफएसआय वाढवणारी


आता तर फ्लाय ओवर बिल्डींगाही बनवतील

शेवटी आकाश पक्षांचे कुठे उरले 

ते कधीच माणसाने खाल्ले 


कुठे काय माणूस शिकतो?

 तो फक्त सिलॅबस पाठ करतो 

वाटलं होतं त्याला करुणा शिकवीन 

पाठीच्या कण्यात मोक्ष भरीन

पण त्याने करूणेच्यासुद्धा पाट्या टाकल्या

मार्क्स मिळवण्यापुरत्या 

वाटलं होतं बुद्ध बनेन अनेकांना बुद्ध बनवून जाईन 

जगात आलोय तर जग थोडे चांगले बनवून जाईन


निघतोय 

जग जसं होतं तसंच ठेवून 

फक्त प्लास्टिक सर्जरीज झाल्या 

पेशंट तेच ररोग तेच आणि हॉस्पिटल ही तशीच 

माझे नशीब किती थोर आहे कि 

जाताना मी ह्यातले काहीही घेऊन जात नाही 


जनुकांचा ढिग म्हणून आलो होतो 

शून्यत्व घेऊन चाललोय 


तुम्ही मांडा प्लास्टिक सर्जरींचे हिशेब 

नीटनेटकं दिसण्यात हयात घालवणाऱ्यांनो 

मी निघालो


श्रीधर तिळवे नाईक 

(मोक्ष सिरीजमधील शेवटच्या कविता या काव्यफायलीतून)


तुझ्या कवितांची भीती वाटते श्रीधर..आत्ममग्न अवस्था शब्दात मांडता येते काय.?

बाळकृष्ण Shirke 

Balkrishna Shirke ह्या कवितेची भीती वाटणे नैसर्गिक आहे कारण जग प्लास्टिक सर्जरीला परिवर्तन म्हणतंय माझ्या डोळ्याच्या ऑपरेशननंतर लॅपटॉपवर आलेली ही कविता आहे मात्र मी ती टेबलवरच मेंदूत लिहिली लेसर टेबलवर कट घेतांना जे वाटले ते लिहून काढलंय कारण काहीच घेऊन जाण्याची परमिशन न्हवती ऑपरेशन स्क्रीनवर पाहण्याची मुभा सतीशला व पूजाला होती मोतीबिंदूनंतर काळी जाळी अक्षरश उपसून उचकटवून काढावी लागली मला ऍनेस्थेशिया फार चढत नाही हे तुला माहीत आहेच त्यामुळे डॉक्टरांच्या चर्चा एन्जॉय केल्या विशेषतः एकाच्या xxx वर कॉमेंट्स चालू होत्या मी ऑपरेशन एन्जॉय केले मी तसं म्हणालोही तर एखादा माणूस ऑपरेशन कस काय एन्जॉय करू शकतो असा चेहरा होता मी तोही एन्जॉय केला ओप्रेशनच्यावेळी लाईट्स व सररियल ऍबस्ट्रॅक्ट दृश्ये आली ती मला भारी वाटली काहीतर फारच सुंदर होती 


ह्याला आत्ममग्नता म्हणता येईल का तर नाही कारण आत्ममग्नतेत आत्म असते आणि मग्नता असते दोन्हीही काल्पनिक असतात मेंदूने स्वतःच्या डोळ्यावर ऑपरेट होण्यापूर्वी जगाचा निरोप घेतांना जगाविषयी त्याला जे वाटते त्याची ही नोंद इतकेच त्याचे स्वरूप ! घाबरून जावे असे त्यात काय आहे आपला आनंद हिसकावून घेण्याची ताकद जगातल्या कुठल्याच सत्तेत नाही आपण आनंदी व्हायला शिकत नाही ही शोकांतिका तेव्हा एन्जॉय कर भिऊन तर अजिबात जाऊ नको आनंद भयाला सहज पराभूत करतो आनंद शोध आनंदी हो

श्रीधर तिळवे नाईक 

झुरळ होऊन गेल्यानंतर श्रीधर तिळवे नाईक 



तो राजीनामा देऊन चालता झालाय 

आणि त्याला माहीत नाही त्याने कशा कशाचा राजीनामा दिला 


तो राजा होता 

आणि त्याने प्रजेचा राजीनामा दिला 

की तो प्रजा होता 

आणि प्रजेतल्या राजाने त्याचा राजीनामा घेतला ?


तो माज होता 

आणि त्याने आपल्या माजाचा राजीनामा दिला 

की प्रजेचा आवाज होता 

ज्याने त्या माजाचा राजीनामा घेतला ?


त्याने आम्ही राजीनामा देत नाही 

या वचनाचा त्याग केला 

की लोकशाहीत सर्वकाही जनता असते 

या वचनाचा पुनर्जन्म राजीनामा देऊन जिवंत केला ?


गोष्टी कठीण असतात

नेहमीच 

विशेषत: त्या सिल्याबस मध्ये नसतील 

आणि शिकवल्या गेल्या नसतील तर 


असे नसते 

की त्यानेच गुन्हा केला 

पण त्याने थांबवता येणे शक्य होते तरी 

गुन्हा थांबवला नाही 

हाच गुन्हा ठरला 


इतिहासाकडे कदाचित खूप फूटपट्ट्या असतील 

कदाचित नवीन सिल्याबस तयार होईल 

आणि इतिहास आणखी एक नवीन फूटपट्टी तयार करील 


पण तोपर्यंत तरी 

तो अडाणी अशिक्षित होता 

ज्याला काळ वाचता आला नाही 



जे जिंकले 

ते डान्स करतायेत 

सध्या तरी त्यांचा आंदोलनाशी चाललेला रोमान्स 

पीकवर आहे 


त्यांनी अख्खा समुद्रच डेक बनवलेला आहे 


त्यांच्या हँडशेकमध्ये भूकंप होते 

आणि त्यांना बहुदा त्याची जाणीव नव्हती 


त्यांच्या पायांची साईज मोठी होती 

आणि बहुदा त्यांना त्याची कल्पना नव्हती 


आता त्यांना त्यांच्या साईजच्या हिशेबाने 

एक जोडा मिळालाय 


मात्र कोणालाच माहित नाही आणखी किती जोडे बाकी आहेत 


कदाचित त्यांनाही 



इरेज झालेल्या कित्येक आयडेंटिटीज 

आता नवा जन्म शोधतायत


ये तो होना ही था 

असाही आव 


डिलीट करायला काय अक्कल लागते 

नेटवर्क तयार करायला अक्कल लागते 


संगणक जळायला खूप वेळ घेतात 

राजीनामा मिळायला वेळ लागला 


राख झालीये 

कि शिक्षण व्यवस्थेचा मर्डर 

फक्त एक्टिंग करून 

नवा मुखवटा घालायला विंगेत गेलाय ?



ताण पडलेली भोवळ 

आता भेल खातीये 

काही वेळाने ती कदाचित भोंगळ वाटायला लागेल 


वेळ प्रत्येक गोष्ट चविष्ट करते आणि बेचवही 


हॉस्पिटलमध्ये दाखल झालेला आजार 

नवे अन्न खाऊन परतू शकतो 


हृदयातील तीव्रतेचा व्यभिचार 

कधीही कोणाचा हात पकडायला लावू शकतो 


सततचे चेकअप 

मेकअपला शह देऊ शकतात 


अन्यथा राजकारण डेकोरेशन मांडत जाते 

रेशन पाणी देत जाते 

आणि लोक 

लाडक्या बहिणींच्या फक्त प्लॅनिंगवरच खुश होतात 


व्हिडिओ कितीही खाजगी असले तरी 

सार्वजनिक करायचे नसतात 

म्हणून मी गप्प आहे 

मात्र आजार मला नक्की माहित होते 


त्यामुळेच हातातून निसटलेल्या औषध योजना 

पायातून निसटलेले शक्तीचे मानदंड 

मी कानात घातले नाही 


काळ असा आलाय की 

कोण माजी 

कोण आजी 

कोण पाजी 

ठरवता येत नाही 


शेवटी सनातनचा काढा पिला 

की प्राचीन शमन झाल्याचे 

मन सांगते 


इतका खोटा दिलासा कुठल्या काळात उपलब्ध होता ?



मी आनंदी आहे 

कारण मी मोक्षात आहे 

पण समाज आनंदी आहे का 

की त्याला बैल बनवून 

दारात बसवलेले आहे ? 



राजीनामा काहीच प्रमोट करत नाही 

राजीनामा घेतल्यानंतर जो आजीनामा येतो 

तो महत्त्वाचा 


शांततेचे किस किती पायऱ्या उतरले 

प्रेमाच्या वाटाघाटी किती घाट चढल्या 

घरात परतलेली शरीरे 

पुन्हा किती विश्वासार्ह झाली 


चंद्र ॲमेझॉनवर मिळत नाही 

तो ज्याला त्याला आतल्या आत कमवावा लागतो 

तेव्हा कुठे पोर्णिमा होते 



कपडे काढून कर्मणूक करा 

कपडे घालून दमणूक करा 

पण जे काय करा 

ते आमच्या ऑनलाइन सेलमध्ये करा 



दिवस अनंत गुंतागुंतीचे आहेत 

एक पेशी कळत नाही 

तिथे हा देहाचा कुतुब मिनार काय कळणार ?


कळ दाबले की कळण्याचे दिवस संपले 

आता अख्खे नेटवर्क दाबावे लागते 

तेव्हा कुठे एक चेस बोर्ड कळतो 


मुव्ह फास्ट मुव्ह फास्ट 


ऑर्डर देणारे कोण आहेत ?

हालचाल करणारे किती स्वतंत्र आहेत ?

की आतल्या आवाजाचे 

हे स्वयंभू नवे तंत्र आहे ?


सत्तेला स्वातंत्र्य दिले 

कि ती व्यवस्थित कळते 


सत्तेने काय केले ?


लाठी मार - पोरांच्यावर 

दगडफेक - पोरांच्यावर 


मिळालेल्या अद्भुत स्वातंत्र्याने तुमचा चेहरा एक्सपोज केला 

एवढे तरी कळते का रे 

की तेवढा ही इंटेलिजन्स कोशंट उरला नाही 


मॉनिटरिंग होईपर्यंत वफादारी यात नवीन काय आहे ?

आदर नव्हता विवशता होती यात नवीन काय आहे ?


जेव्हा तिला कोणी पहात नसते 

तेव्हा सत्ता जे करते 

ते तिचे खरे स्वरूप


तुम्हाला कोणीच पाहत नाही अशी तुमची गैरसमजूत का झाली ?


की मीडिया खरेदी केला म्हणजे आपल्या बापाचा झाला 

असे तुम्हाला वाटले ?


मीडिया हा सुद्धा झुरळासारखा असतो 

तो कुठेही लपलेला असू शकतो 

आणि कुठूनही बाहेर येऊ शकतो 


कॉकरोच रूप म्हणजे काय वडापाव वाटला काय ?

खाल्ला आणि सोडून दिला 


कोणत्याही क्षणी कोणत्याही अवकाशाच्या जागेमधून येण्याची ताकद 

हीच खरी झुरळांची ताकद असते 


ते आले 

आणि त्यांनी तुम्हाला किचन पॉलिटिक्स रिकामे करायला लावले 



नवे लावण्य होते 

तुम्हाला झेपले नाही 

तुम्ही आपली जुनी लावणी लावत बसला 

आणि त्यामुळेच तुमचे लागले 


आता मी आख्खा फडच कॅन्सल करावा का ? 


श्रीधर तिळवे नाईक 

( मोक्ष या सीरीज मधील मोक्ष : शेवटाच्या शेवटच्या कविता या काव्यफायलीतून)

Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती