लोकप्रियता विज्ञान आणि कालिक लोकप्रियता श्रीधर तिळवे नाईक
भारतामध्ये लोकप्रियतेचे काळानुसार तीन प्रकार घडतात
१ जन्मपूर्व लोकप्रियता : ही अनेकदा अमुक येणार तमुक येणार म्हणून आधीच तयार झालेली असते उदाहरणार्थ बुद्धाचा मैत्रय आणि विष्णूचा कलकी हा अवतार ! जन्माला आल्यानंतर त्या लोकांना याचा किती फायदा होतो आणि किती तोटा होतो हे सांगणे कठीण आहे अनेकदा यामध्ये ज्योतिषाचा वाटा असतो मी स्वतः यातून गेलेलो आहे म्हणून सांगतो अनेकदा हल्ले होतात कारण काही लोकांच्यासाठी तुमचा जन्म अनवांटेड असतो .
२ वर्तमान लोकप्रियता : या जन्मातली लोकप्रियता त्याबद्दल बोलण्याची गरज नाही कारण आपल्याला ती चीर परिचित आहे किंबहुना आपण जेव्हा जेव्हा लोकप्रियतेचा विषय जिवंत असणाऱ्या माणसाच्या बाबतीत चर्चेला घेतो तेव्हा आपण त्याच्या वर्तमान लोकप्रियते विषयी अधिक बोलत असतो. कधी कधी भूतकाळात एखाद्याची लोकप्रियता प्रचंड असते आणि ती कोसळते तेव्हा सुद्धा आपण वर्तमानाच्या संदर्भातला त्याच्या लोकप्रियतेचा घसरलेला किंवा नंतर उंचावलेला ग्राफ विचारात घेत असतो म्हणजेच सर्वसाधारणपणे लोकप्रियताही वर्तमानकालीन अधिक घटना असते . कोणाच्या लोकप्रियतेचा इतिहास लिहिला जाऊ शकतो आणि तिथे भूतकाळ महत्त्वाचा असू शकतो परंतु तो इतिहास असतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे . एखाद्या माणसाची लोकप्रियता भविष्यामध्ये काय होईल याचा अंदाज घेता येतो नाही असे नाही आणि त्यामुळेच आपणाला भविष्यकालीन लोकप्रियता विचारात घ्यावी लागते ही भविष्यकालीन लोकप्रियता नेट कॅल्क्युलेट करणारे लोक आहेत आणि मी स्वतः त्यामध्ये एक होतो त्यामुळे अनुभवातून सांगतो की भविष्यात एखादा नट लोकप्रिय होईल की नाही हे सांगणे हे फार अवघड असते कारण त्या व्यक्तीच्या वर्तमानात असलेल्या उपस्थितीच्या आधारे तुम्हाला भविष्यकालीन लोकप्रियतेचा अंदाज घ्यावा लागतो आणि हे एक फार अवघड काम असतं पण ते उपस्थित असते एवढे मात्र खरे पण ते वर्तमानातच उपस्थित असल्यामुळे भविष्यकालीन लोकप्रियतेच्या संदर्भामध्ये वर्तमान लोकप्रियतेपासून भविष्यकालीन लोकप्रियता काढता येईल का? असा एक फार मोठा प्रश्न आहे .
४ मृत्यूनंतरची लोकप्रियता : माणूस हा एक असा प्राणी आहे ज्याला नेहमीच मृत्यूनंतर सुद्धा आपण अस्तित्वात असावे असे वाटत असते माणसाच्या या आसक्तीला अमरतेची आसक्ती म्हटले जाते त्यामुळेच आपल्या मृत्यूनंतरच्या लोकप्रियतेसंदर्भात मनुष्य विचार करू शकतो या लोकप्रियतेचे आकर्षण वर्तमानात प्रचंड लोकप्रियता लाभून सुद्धा ओसरत नाही असे दिसते उदाहरणार्थ पु ल देशपांडे यांच्या मृत्यूनंतरच्या लोकप्रियते संदर्भात सुनिता देशपांडे यांनी जे सहज जाता जाता लिहिले आहे ते पाहण्याजोगे आहे त्या पु ल देशपांडे यांच्या विषयी म्हणतात,
"असा तू देवमाणूसही; आणि माझ्या वाट्याला आलेला आळशी नवराही. हाती येईल ते स्वीकारायचं आणि त्याच्याशी खेळत बसायचं. पुढे तू अभिमानानं ते नावही स्वीकारलंस, पण खरं तर तू जन्मजातच 'खेळिया' होतास. अशा माणसासाठी इतर कुणाला काही करावं लागतच नाही.
तुझ्यासाठी मी काय केलं? तुझ्या तहान-भुकेचं वेळापत्रक सांभाळलं, माझ्या परीनं नवी-जुनी खेळणी पुरवली, अंगण सारवून स्वच्छ ठेवत गेले. त्यात फार तर क्वचित कधी एखादं स्वस्तिक रेखलं. चित्रांची रांगोळी काढायला मला येतच कुठे होती? कलावंत 'तू' होतास. शब्दकळेची गर्भश्रीमंतीही 'तुला' लाभली होती. येताना कंठात आणि बोटात सूर घेऊनच तू जणू जन्माला आलास. अंतर्बाह्य आनंद सोबतीला आणलास. तू गेलास, तो दीर्घायुष्यी सोबती अजून बराच काळ मागे राहणार आहे. तू गेलास, उद्या मीही नाहीशी होणार. पण आपल्या मायबोलीचा एक कंठमणी झालेला तुझा शब्द, मराठी भाषा जिवंत असेपर्यंत, स्वतःच्या तेजानं चमकतच राहील ना?"
यामध्ये शेवटच्या ज्या ओळी आहेत त्या सरळ सरळ मरणोत्तर सुद्धा तुझी कीर्ती टिकून राहील अशी आशा व्यक्त करणाऱ्या आहेत . म्हणजेच मरणोत्तर लोकप्रियतेचा विचार जिवंत असणाऱ्या व्यक्ती करू शकतात प्रश्न फक्त ती स्वतः विचार करत आहे की तिच्या आसपासचे लोक असा विचार करत आहेत हा असतो अनेकदा त्या व्यक्तीपेक्षा त्या व्यक्तीच्या कुटुंबांना कुटुंबीयांना या संदर्भात अधिक प्रश्न पडू शकतात
अनेकदा जिवंत असताना ज्यांना लोकप्रियता मिळत नाही आणि तरीही ज्यांना आपल्या प्रतिभेविषयी शंका नसते त्यांना हीच एक लोकप्रियता दिलासा वाटत असते. पण हा दिलासा खरोखर खरा असतो का ?
त्याचा खरोखर फायदा काय ?
मरणोत्तर लोकप्रियता म्हणजे काय? तर केवळ आधी ज्यांना मृत्यूनंतर लोकप्रियता मिळालेली आहे त्यावरून आपल्या लोकप्रियतेचे काढलेले अनुमान असते . म्हणजे अमुक एक मनुष्य अशा तऱ्हेने मरणोत्तर कीर्तीला पात्र झाला तसा मीही माझ्या त्याच प्रकारच्या कामामुळे पात्र होईल असा हा आशावाद असतो . किंबहुना मरणोत्तर लोकप्रियता हा आशावादच असतो प्रत्यक्षात तसे घडेल याची कसलीही खात्री आपल्या या जगात नाही . मोक्षाच्या संदर्भात त्याचे काहीही महत्त्व नाही परंतु जे लोक या जगात लौकिक पद्धतीने जगत असतात त्यांना मात्र हा दिलासा फार मोठा असू शकतो . माणसाला मेल्यानंतरही माणसांच्या मध्ये मानसन्मान हवा असतो हे फार विनोदी आहे पण तो हवा असतो हेच खरे ! एका अर्थाने ही अमरत्वाची आसक्ती आहे आणि ती प्रत्येकाच्या मनामध्ये ठाण मांडून बसलेली असते . मुळातच आपण जेव्हा आपली जनुके पुढच्या पिढीला देतो तेव्हा एका अर्थाने आपण अमरच करत असतो आणि म्हणूनच अमर करण्याची आम्हाला असण्याची मरणोत्तर टिकून राहण्याची जी आसक्ती आहे ती मी नैसर्गिक समजतो
मेल्यानंतर तुम्हाला लाभलेली लोकप्रियता ही नेमकी कशामुळे लाभते याचे मात्र विश्लेषण करावे लागते पण त्याचबरोबर हेही खरे की या लोकप्रियतेचा फायदा घेऊन स्वतःची लोकप्रियता वाढवू पाहणारे लोक मरणोत्तर लोकप्रियतेनंतर वाढत जातात आणि त्यांच्या संदर्भात मेल्यानंतर तुम्ही काहीच करू शकत नाही .
मरणोत्तर लोकप्रियता जितकी चिन्ह शरण असते तितकी कदाचित इतर नसेल कारण इतरांना काही ना काही तरी जिवंत कृती करण्याचा चान्स असतो परंतु मरणोत्तर लोकप्रियतेमध्ये असा चान्स नसल्याने जे काही चिन्ह रूपाने उरलेले असते तेच ऍक्टिव्ह राहते आणि त्याच्याद्वारेच काही होऊ शकते . म्हणजेच एका अर्थाने तुमची लोकप्रियता ही इतिहासकाराच्या ताब्यात जाते आणि इतिहासकार तुमचे काय करतो तुम्ही निर्माण केलेल्या चिन्ह शक्तीचे काय करतो चिन्ह कृतीचे काय करतो चिन्हसृष्टीमध्ये तुमच्या अस्तित्वात असलेल्या चिन्ह-संदर्भांचे काय करतो यावर हा सारा खेळ अवलंबून राहतो . माणसे त्यामुळे जिवंत असताना आपल्याविषयी अधिकाधिक चिन्हसृष्टी निर्माण करत जातात कारण आपण चिन्हसृष्टी जितके आता ओतू तितकेच आपण मेल्यानंतर उगवू याची त्यांना समीकरणात्मक खात्री असते .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment