युरोशियन विरुद्ध नॉन युरोशियन असा संघर्ष का
आशुतोष दिवाण प्रश्न : सर,
आपण नेहमीच शैव आणि वैष्णव यात विरोध दाखवून आताच्या बय्राच आजारांना वैष्णव यांना जबाबदार धरत यातून बरे होण्यासाठी शैव मार्ग प्रबळ होण्याची गरज सांगत असता.
इतर कोणी इतके या विषयाला महत्त्व देताना वरवर तरी दिसत नाही.
शैव आणि वैष्णव यांच्यात प्रत्यक्ष तत्त्वज्ञान,आचरण पद्धती वगैरे यांत कोणते असे फरक आहेत की ही गोष्ट आपल्या मते इतकी क्रूशली महत्वाची आहे?
मला आणि बहुतेक इतर सर्व लोकांना या दोन गोष्टींमध्ये इतका लाईफ ॲन्ड डेथ चा फरक वाटत नाही.
श्रीधर तिळवे नाईक: प्रत्येक वाचक हा आपल्या पद्धतीने एखादा विचारवंत घेत असतो आणि त्याला तो अधिकार असतो गेले कित्येक महिने तुम्ही वारंवार हे सांगत आहात की मी शैव विरुद्ध वैष्णव अशी द्वि ध्रुवात्मकता मांडत आहे आणि ते करण्याचा तुमचा अधिकार मान्य आहे. प्रश्न असा आहे की हे खरे आहे का ?
प्रत्यक्षात मी तशी मांडणी मांडत नाही मांडलेली नाही मी नेहमीच युरेशियन विरुद्ध नॉनयुरोशियन अशी जागतिक द्विध्रुवात्मकता जागतिक पातळीवर मांडत असतो कारण जगभरातच युरेशियन श्रुतीने त्यांच्या आधी अस्तित्वात असलेल्या सर्व संस्कृतींना नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे उदाहरणार्थ युरोपमध्ये त्यांनी त्यांच्या आधी अस्तित्वात असलेल्या ग्रीक संस्कृतीला पूर्णपणे नष्ट करून ग्रीक संस्कृतीमध्ये असलेले सर्व तत्त्वज्ञान आत्मसात करत रोमन संस्कृती विकसित केली आणि नंतर रोमन कॅथोलिक असा युरेशियन धर्म सुद्धा विकसित केला . त्यानंतर मग हे रोमन युरेशियन लोक अमेरिकेत गेले आणि तिथल्या सर्व स्थानिक संस्कृती त्यांनी नष्ट केल्या किंवा प्रयत्न केला याच लोकांनी आफ्रिकेमधल्या संस्कृती सुद्धा पराभूत करून तिथे सुरुवातीच्या कालखंडामध्ये रोमन संस्कृती व नंतरच्या कालखंडामध्ये ख्रिश्चन संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न केला .
हेच लोक भारतामध्ये आले आणि त्यांनी त्यांच्याशी लढणारी शैव संस्कृती पूर्णपणे उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि काही प्रमाणात का होईना ती नष्ट केली आणि तिला रिप्लेस करण्यासाठी म्हणून ब्राह्मण ब्राह्मण ब्राह्मण असा गाजावाजा करून सुरुवातीला ब्राह्मण धर्म हाच हिंदू धर्म आहे असे विचित्र समीकरण रूढ केले प्रचलित केले नंतर हिंदूधर्म हिंदू धर्म हिंदू धर्म असा गाजावाजा करून हिंदू धर्म अक्षरशः इथल्या शैव लोकांच्यावर लादला . याला ब्राह्मण लोकांनी साथ दिली कारण त्यांना काही करून शैव धर्म हा स्वतंत्र होऊ द्यायचा नव्हता त्याची स्वायत्त ओळख प्रस्थापित करू द्यायची नव्हती इंग्रजाच्या कालखंडामध्येच प्रामुख्याने शैव हा स्वतंत्र धर्म न राहता वैष्णव हा स्वतंत्र धर्म न राहता हे दोन धर्म एकाच हिंदू धर्माचे दोन उपपंथ आहेत अशा प्रकारचा सिद्धांत उदयाला आला आणि प्रस्थापित झाला त्याआधी तो इस्लाम मुळे प्रस्थापित झालाच होता परंतु त्याला खरा तात्विक आकार हा ब्रिटिश लोकांनी दिला . तुम्ही जे गृहीतक आत्ता मांडत आहात हे गृहीतक ब्रिटिश लोकांनी प्रस्थापित केलेले गृहीतक आहे . त्यांनीच मुळात हे दोन्ही एका हिंदू धर्माचे चेहरे आहेत त्यांच्यात फारसा फरक नाही अशी मांडणी केली . तुम्ही तेच सांगत आहात . लोकांच्या मध्ये मुळातच अज्ञान असल्याने त्यांनीही हे स्वीकारले कारण राज्यकर्ते जे होते तेच ब्रिटिश होते आणि ते मांडतील तेच खरे अशी भारतातल्या गुलाम झालेल्या जनतेची मानसिकता तयार झाली होती . आजही हीच मानसिकता आपल्यावर राज्य करत असल्याने आपण हे गृहीतच धरून बसलेलो आहोत की मुळातच हे सर्व एकच आहे ते एक आहे नाही असे नाही पण ज्या अर्थाने युरोपात एक आपणाला एकता दिसते त्याच पद्धतीची ही एकता आहे . मुळातच वैष्णव धर्माने यज्ञ संस्कृतीचा लोप केल्याने आता पूर्वी दिसत असणारा यज्ञ संस्कृतीचा वैष्णव चेहरा सुद्धा नाहीसा झालेला आहे आणि म्हणूनच वैष्णव अधिकच शैव धर्मासारखे आणि त्यामुळेच एकसारखे दिसायला लागले आहेत .
याच यूरोशिअन लोकांनी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये जाऊन तिथले सगळे स्थानिक संस्कृतीचे प्रकार जवळजवळ नष्ट केले आता फक्त दाखवायला अवशेष उरलेले आहेत .
तेव्हा तुम्ही समजता तशी ही मांडणी फक्त शैव विरुद्ध वैष्णव अशी नाही जगभरात युरेशियन संस्कृतीने जिथे जिथे ती गेली तिथे तिथे कसे स्थानिक कल्चर आणि स्थानिक संस्कृती नष्ट केली हे समजून घेण्यासाठी म्हणून ती युरेशियन विरुद्ध नॉन युरेशियन अशी आहे . ज्यांना तुम्ही युरोपियन संस्कृती म्हणता ती प्रत्यक्षात ग्रीक संस्कृतीचा विकास आहे पण तिथे सुद्धा रोमन संस्कृतीचा प्रादुर्भाव झाला की आपोआपच युरोपियन रोमन कॅथोलिक आक्रमक व्हायला लागतात. ही रोमन संस्कृती अमेरिकेमध्ये सुद्धा जागृत आहे आणि त्यामुळेच त्यांना संपूर्ण जगभर युद्ध खेळायची असतात . रोमन साम्राज्याचे राज्यकारण आणि अमेरिकेचे राज्यकारण यांची एकदा तुलना होणे आवश्यक आहे . इस्लाम हा या रोमन कॅथोलिक संस्कृतीचा अधिक पुढचा धार्मिक विध्वंसक असा आकार आहे . रोमन साम्राज्याप्रमाणे इस्लामचे सुद्धा राज्यकारण चाललेले असते . ज्यांना कोणाला युरेशियन संस्कृतीचे हे प्रताप माहित आहेत त्यांना हा सांस्कृतिक संघर्ष जगभर कसा चाललेला आहे हे सहज कळू शकते .
भारतामध्ये ही युरेशियन संस्कृती प्रथम वैदिक लोकांच्या द्वारे आली आणि त्यामुळेच भारतातही हा सांस्कृतिक संघर्ष पोहोचला आणि म्हणूनच मी युरेशियन श्रुती विरुद्ध शैव श्रुती अशी अशी द्विध्रुवात्मकता मांडत असतो यातील शैव श्रुतीमध्ये १ आदिशैव २ लोकशैव ३ नवशैव ४ तंत्रशैव ५ जाल शैव असे पाच टप्पे विकसित झालेले आहेत आणि यातील प्रत्येक टप्प्यामध्ये वेगवेगळे अनेक्त शैव धर्म उदयाला आलेले आहेत त्यातील पाशुपत , नाथ , लिंगायत, शिख वैगरे किमान २१ धर्म अतिशय महत्त्वाचे झालेले आहेत त्या उलट वैदिक श्रुतीमध्ये १ वैदिक धर्म २ ब्राह्मण धर्म ३ वैष्णव धर्म ४ वेदांत धर्म ५ हिंदू धर्म ६ नववैदिक आर्य समाज ७ नव वैष्णव महानुभव ८ नववेदांत ब्राह्मो समाज ९ नव ब्राह्मण ज्याप्रमाणे ब्राह्मण धर्माचा संस्थापक नाही तसा नवब्राह्मण धर्माचाही संस्थापक नाही मात्र ब्राह्मण वर्ण विशिष्ट पद्धतीने संघ म्हणून वावरतो ब्राह्मण लोक संस्थापक नाही असे म्हणतात कारण त्यांच्या स्वतःच्या धर्माला संस्थापक नाही आणि हे गृहीतक ते इतर धर्मांच्या वर सुद्धा लाजायला बघतात पण प्रत्यक्षात सर्व प्रकारच्या शैव-धर्मांचे संस्थापक आहेत नवब्राहमणधर्माची संघटना म्हणून आरएसएस सुरुवातीच्या कालखंडामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अस्तित्वात आला हिंदुत्वाची स्थापना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेली नाही ते प्रथम तत्त्वज्ञान म्हणून विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी मांडले. लोकमान्य टिळक यांनी त्याचा विस्तार केला आणि नंतर मग सावरकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी त्याची हिंदुत्ववाद म्हणून मांडणी केली १० नव हिंदू स्वामी विवेकानंद यांनी हा नवं हिंदुधर्म स्थापन केला रामकृष्ण मिशन ११ जैन १२ बौद्ध असे बारा धर्म टप्पे म्हणून विकास पावलेले आहेत वैष्णव धर्म हा केवळ या बारा धर्मांच्या मधला एक धर्म आहे तो तिसरा टप्पा आहे तो काही श्रुती नाही त्या उलट शैव ही श्रुती आहे अलीकडे तिला तंत्रशैव टप्प्यात तंत्र श्रुती म्हणायचा पायंडा पडलेला आहे. याचे कारण तंत्र वांग्मयाच्या स्वरूपामध्ये जास्त लिखित पुरावे उपलब्ध आहेत जे आता पूर्णपणे छापील स्वरूपामध्ये हळूहळू उपलब्ध होत चाललेले आहेत .
त्यामुळे सर्वात प्रथम हे डोक्यातून काढून टाका की मी शैव विरुद्ध वैष्णव असा संघर्ष मानतो आहे हा संघर्ष मी तेव्हाच मानतो जेव्हा प्रत्यक्षात या दोघांच्या मध्ये हा संघर्ष अस्तित्वात येतो परंतु हा संघर्ष एका व्यापक संघर्षाचा भाग असतो हा संघर्ष इसवी सन १००० नंतर अस्तित्वात आलेला असला तरी त्याचा कालखंड अधून मधून गुप्त होतो आणि प्रकट होतो किंबहुना वैष्णव धर्म म्हणजे दुसरे तिसरे काही नसून पूजा आणि तंत्र आत्मसात करण्याचा प्रयत्न आहे वैदिक धर्माच्या टप्प्यामध्ये युरेशियन लोकांनी भगवान शंकर आत्मसात करण्याचा प्रयत्न त्यांचे रुद्रकरण करून तर त्यांचे तत्त्वज्ञान शिव आणि शक्ती ही दोन तत्वे ही पुरुष आणि प्रकृती ब्रह्म आणि माया असे करून आत्मसात करण्याचा प्रयत्न केला होता . त्यातूनच उपनिषदे अस्तित्वात यायला लागली वैदिक श्रद्धा , सांख्य धर्म आणि ब्रम्हधर्म या तीन गोष्टींनी मिळून वैदिक धर्म बनतो वैष्णव धर्माने नंतर तंत्र सुद्धा योग म्हणून आत्मसात केले . असे करायला माझी हरकत नाही पण मतभेद तेव्हा होतात जेव्हा बाहेरून येऊन सुद्धा एखादा समुदाय स्वतःला विजेता म्हणून सादर करायचा प्रयत्न करत स्वतःला स्थानिक लोकांच्या पेक्षा अधिक उजवा अधिक श्रेष्ठ मानायचा प्रयत्न करतो आणि संपूर्ण सामाजिक व्यवस्था वर्ण जात व्यवस्थेच्या आधारे उभा करतो . तुम्हाला या धर्मांच्या मध्ये नेमके कुठले साम्य कधी दिसते हे एकदा मला तुम्ही सांगा . कारण तुम्ही ज्याला साम्य म्हणता ते साम्य नसून प्रत्यक्षात वैष्णव धर्माच्या नावाखाली युरेशियन लोकांनी शैव धर्म आत्मसात करण्याचा केलेला प्रयत्न आहे . सर्वात वाईट गोष्ट म्हणजे आपले स्वतःचे इंद्र वैगरे देव सुद्धा या लोकांनी सोडले आज वेदातला एक विष्णू सोडला तर एकही देव या लोकांनी आपल्या देव्हाऱ्यात ठेवलेला नाही विष्णूची सुद्धा विष्णू म्हणून पूजा फार कमी वेळा होते त्यापेक्षा राम आणि कृष्ण हे मूळचे शैव असलेले शिवभक्त रामायण आणि महाभारत यांच्याद्वारे आत्मसात करण्याचा प्रयत्न केलेला आहे . माझा सर्वात जास्त विरोध ब्राह्मणी करणाला आहे. कारण प्रत्येक वेळेला युरेशियन लोकांच्या मधील काही गौतम बुद्ध किंवा भगवान महावीर यासारख्या पुरोगामी लोकांनी पुढे यावे काही नवे स्वीकारावे आत्मसात करावे त्याचा विस्तार करावा आणि मग नंतर ब्राह्मण लोकांच्या मधल्या कर्मठ लोकांनी येऊन त्याचा सत्यानाश करावा हे वारंवार ह्या प्रोसेस मध्ये घडलेले आहे. आपण पुन्हा एकदा अशा प्रोसेस पुढे उभे ठाकलेलो आहोत म्हणून आता वारंवार त्या विरोधात बोलायची गरज निर्माण झालेली आहे .
माझा खरा लढा हा ब्राह्मण धर्माशी आणि वैष्णव धर्माशी आहे कारण हेच दोन धर्म असे आहेत जे स्पष्ट पणाने आणि स्वच्छ बनाने मनुस्मृतीचे समर्थन करतात आणि करत आहेत . यामध्ये ब्राह्मण धर्मामधील लोकांची संख्या फक्त सहा करोड आहे पण वैष्णव लोकांची संख्या १२ करोड आहे म्हणून मुख्य विरोध वैष्णव धर्माला करावा लागतो तुमचा वर्ण व्यवस्थेला पाठिंबा आहे का हे एकदा तुम्ही जाहीर करावे आणि त्याला काय पुरावे आहेत का पाठिंबा देत आहात ते जाहीर करावे आणि जर का तुमचा या वर्ण व्यवस्थेला पाठिंबा नसेल तर शांतपणाने मला ब्राह्मण वर्ण आणि ब्राह्मण धर्म मान्य नाही असे तुम्ही सांगावे पण जोवर तुम्ही असे स्पष्ट सांगत नाही तोपर्यंत तुम्ही काय आहात हे कळणे शक्य नाही. या व्यवस्थेला काय मेडिकल पुरावे आहेत हे तुम्ही सांगा . मुळात ब्राह्मण म्हणून संस्कार केले म्हणून ब्राह्मण ! एवढाच त्याचा खरा अर्थ असतो . प्रश्न असा असतो की जर एकदा हे कळाले की हे संस्कार खोटे आहे तर मग ते फेकायला नकोत का? म्हणजे पृथ्वी ही ब्रह्मदेवाने निर्माण केली किंवा विष्णूच्या नाभीपासून तयार झाली अशा प्रकारचे सिद्धांत विज्ञान वाचून नाकारताच ना ? मग मी ब्राह्मण आहे हे का नाकारता येत नाही ? हे नाकारता येत नाही याचे कारण ब्राह्मण धर्म वैष्णव धर्म आणि श्रुती स्मृती पुराणोक्त गीता केंद्री हिंदू धर्म तुमच्यावर वर्ण जात व्यवस्थेचे संस्कार करतात आणि हे योगायोगाने सगळेच युरेशियन धर्म आहेत सर्वात वाईट गोष्ट म्हणजे आता हिंदू हा धर्म निर्माण करून आणि तो शैव लोकांना स्वीकारायला लावून त्यांच्याकडून सुद्धा गेल्या हजार वर्षात वर्ण व्यवस्थेला समर्थन प्राप्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे मला हे पटत नाही म्हणून मी विरोध करतो बसवेश्वर, शिवाजी महाराज किंवा पहिला बाजीराव यांच्यासारख्या ज्या लोकांनी याला विरोध केला त्या लोकांच्या संदर्भात ब्राह्मण धर्माने काय केले हे इतिहासात नमूद आहे . प्रत्येक वेळी स्वतःच्या वळणाने इतिहास फिरवायचा हे तुम्ही किती चालवून घेणार ? या सगळ्याला आता मर्यादा पडणे अटळ आहे कारण बहुजन समाजामधील सर्वजण आता सुशिक्षित आणि साक्षर होत चालले . यातून काय निर्माण होऊ शकते याचा अंदाज ब्राह्मण धर्मातल्या आणि त्याचे समर्थन करणाऱ्या लोकांना येत नाहीये ही खरी शोकांतिका आहे .
आता जग युरेशियन आणि इस्लाम यांच्या अत्यंत कर्मठ आणि सनातन प्रोसेस मध्ये अडकताना दिसते आहे त्यातून काय प्रकारचे संघर्ष निर्माण होत आहेत हे आपण पाहत आहोत . हे लोक आपापसात लढताना सुद्धा इतरांना आपल्यात खेचतात इतर संस्कृतींना आपल्यात खेचतात हा इतिहास आहे . तेव्हा व्यापक पातळीवर जगभर चाललेली युद्ध बघितली तर त्यामध्ये कुठे ना कुठेतरी युरेशियन अथवा इस्लाम ही दोन युरेशियन रूपेच जगभर जी युद्धजन्य परिस्थिती झालेली आहे त्याला जबाबदार असलेली दिसतील. भारतामध्ये सुद्धा हा संघर्ष नेहमी युरेशियन संस्कार झालेले लोकच अनेकदा निर्माण करतात आणि तीव्र करतात . हे थांबवायचे असेल तर जो दुसरा नॉन युरेशियन ध्रुव आहे तो घट्ट होणे बळकट होणे गरजेचा आहे असे मला वाटते म्हणून भारतामध्ये मी कायमच शैव संस्कृतीच्या व ध्रुवाच्या बाजूने उभा असतो .
मला वाटते की एवढे स्पष्टीकरण पुरेसे आहे .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment