माणसाचा आहार ,काळ आणि ठरवण्याची कसोटी श्रीधर तिळवे नाईक
भारतामध्ये सध्या जे काही जबरदस्त वाद चालू आहेत त्यामध्ये आहाराचा वाद हा एक प्रचंड मोठा वाद आहे आणि आता श्रावण आला की तो पुन्हा चालू येईल म्हणून हा लेख लिहितोय .यावर मी इतरत्रही लिहिलेले आहे परंतु आज मी थोडा वेगळा अँगल पकडणार आहे .
आपण आहारावर बोलताना नेहमी अलीकडे विज्ञानाचा आधार घ्यायला बघतो किंवा इतिहासाचा आधार घ्यायला बघतो म्हणजेच एका अर्थाने आपण काळ बघतो कालिक होतो
आहाराबाबत असे कालिक होण्याची कसोटी खरोखर योग्य आहे का ? सर्वसाधारणपणे एक गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे आपण आहार वर्तमानात खातो त्यामुळे आपण जर का नैसर्गिक वर्तमानाच्या नैसर्गिक आहाराबद्दल विचार करायला लागलो तर काय दिसते ?
आपल्याकडे आहार दोन प्रकारच्या शेतीमुळे येतो पहिली शेती ही जमिनीची शाकाहारी शेती आहे तर दुसरी शेती ही प्राण्यांची मांसाहारी पशुपालन शेती आहे. आता आपण सर्वसाधारणपणे शिकार करून अन्न मिळवत नाही आपल्या मांसाहारी आहाराचा मुख्य source हा पशुपालन आहे . अपवाद फक्त अजूनही शिकार करून जगणारे काही लोक आहेत टोळ्या आहेत . पण या टोळ्या आपल्यापैकी बऱ्याच लोकांचा वर्तमान नाही आपण फक्त त्यांच्याविषयी ऐकून असतो जास्तीत जास्त आपण त्यांना जाऊन भेटू शकतो पण आपल्या आयुष्याचा विशेषत: आहारा संदर्भात निर्णय घेण्याइतपत त्यांचा आपल्यावर दबाव नाही म्हणजेच सर्वसाधारणपणे आपण असे म्हणू शकतो की आपला आहार हा शेती केंद्री आहे किंवा पशुपालन केंद्री आहे आता या मधून मिळणाऱ्या आहाराचे प्रमाण किती आहे हा एक मोठा प्रश्न ! किंबहुना मी मांसाहार सुद्धा चालू द्या असे म्हणण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण हेच दिले होते की माणसाचा जो शाकाहार आहे तो अजूनही संपूर्ण मानव जातीला आहार पुरवू शकत नाही आता याबाबत अशी स्थिती नेमकी कुठे आहे हे पाहिले पाहिजे म्हणजे शाकाहार खरोखरच मिळेनासा झालेला आहे असे काही कुठे घडलेले आहे का ? उदाहरणार्थ आपल्याकडे नेहमी बंगालच्या दुष्काळाचे उदाहरण मोठ्या प्रमाणात दिले जाते पण त्यावेळेला एक प्रश्न नेहमीच विचारायला हवा जो अनेकदा अर्थशास्त्रामध्ये विचारला जात नाही तो म्हणजे लोकांना अन्न मिळत नव्हते तर त्यामध्ये पशुपालना मधला आहार सुद्धा मिळत नव्हता अशी स्थिती होती का ? दुष्काळामुळे शेती गेली तसेच प्राणी मेले होते का की ज्यामुळे मांसाहाराची सोय सुद्धा अवघड होऊन बसली? कारण अनेकदा प्राण्यांना सुद्धा दुष्काळ बाधतो ही वस्तुस्थिती !
आता आपण हा सगळा भूतकाळ विसरून जाऊ आणि क्षणभर वर्तमानात स्वतःच्या येऊ आपण खरोखरच मांसाहार खाऊ शकतो का ?
याबाबतच्या आपल्या बाबतीतल्या नैसर्गिक कसोट्या काय आहेत काय असायला हव्यात १ पहिली कसोटी पकडण्याची २ दुसरी कसोटी ही अन्न चावण्याची तुकडे करण्याची आणि पोटात ढकलण्याची ३ तिसरी कसोटी ही अन्न पोटात गेल्यानंतर पचवण्याची या तिन्ही पातळीवर माणसाच्या मांसाहाराबाबत काय दिसते ?
आपण मुळात प्राणी पकडू शकतो का तर आपण फक्त छोटे प्राणी पकडू शकतो म्हणजे मांजरा इतके प्राणी आपण पकडू शकतो पण मग त्यानंतर दुसरा मुद्दा येतो ते पकडलेले प्राणी आपण मांसाहारी प्राण्यांच्या प्रमाणे खरोखर कच्चे खाऊ शकतो का आपल्या दातांच्या मध्ये त्यांना चावून खाण्याची क्षमता आहे का या प्रश्नाचे स्पष्ट आणि स्वच्छ उत्तर नाही असे आहे अगदी आपण उंदीर पकडून खायचे ठरवले तरी ते आपणाला शक्य आहे का तेवढी ताकद आपल्या हातांच्या मध्ये आहे का ? आणि समजा पकडले तरी ते आपणाला खाता येतात काय चावता येतात काय ? सर्वसाधारणपणे मांसाहारी प्राणी त्याचे दात पडायला लागले की शांतपणाने आपली आहार कमावण्याची क्षमता संपली असे गृहीतच धरतो आणि मरणाची तयारी करायला लागतो याचे कारण भक्ष पकडण्यासाठी आणि चावून खाण्यासाठी प्रथम ते पकडावे लागते अशा क्षमता नष्ट झाल्या की मग प्राणी विशेषत: मांसाहारी प्राणी स्वतःला मरण्यासाठी सिद्ध करतो .
या मांसाहारी प्राण्यांच्या कडे असणाऱ्या अशा काही क्षमता आपल्याकडे खरोखर आहेत का आणि यानंतरची गोष्ट खरोखर आपल्याकडे खाल्लेला कच्चा प्राणी पचवण्याची ताकद आहे का ? नैसर्गिक पातळीवर माणसाचे शरीर हे दुसरा प्राणी पचवण्याइतके सक्षम आहे का ?
आपला सगळा मांसाहाराचा खेळ आर्टिफिशियल तर नाही ? म्हणजेच आपण शोधलेल्या शस्त्रांच्यावर तर तो अवलंबून नाही? आज आपण प्राण्यांना बंदिस्त करतो हे नेमके कशाच्या जीवावर ? आपल्याजवळ शस्त्र आहे म्हणूनच ना ? म्हणजे संपूर्ण अहिंसा ही जवळजवळ अशक्यच दिसते . अगदी शेती म्हणजे सुद्धा एका अर्थाने वनस्पतींना जेलमध्ये ठेवणे नाही का ?
तुम्हाला इतर प्राण्यांच्या पासून वाचवण्यासाठी सुद्धा स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सुद्धा संरक्षणात्मक हिंसेची गरज लागतेच कारण तुम्ही कल्पना करा की तुम्ही जंगलात आहात तर तिथे वाघ आणि सिंह काय तुम्हाला सोडणार आहेत काय ? ते तुम्हाला शिकारच समजणार . माणूस टिकण्याचे सर्वात मोठे कारण त्याची हिंसा करण्याची क्षमता आहे ही वस्तुस्थिती आहे त्याने शस्त्रे शोधली नसती तर तो या जगण्याच्या लढाईत वाचलाच नसता. त्याचा आकार झुरळासारखा नाही की जो कुठेही लपू शकतो मध्यम आकारांचे प्राणी जवळजवळ या पृथ्वीवरून आता नाहीशे होत चाललेले आहेत याचे मोठे कारण त्यांना लपता येत नाही आणि स्वतःचे संरक्षणही करता येत नाही. त्यामानाने सश्यासारखे जे प्राणी आहेत ज्यांची प्रजनन क्षमता प्रचंड आहे ते जास्त टिकलेले दिसतात. झुरळ सुद्धा त्यामुळेच टिकलेले आहे . आपण पुन्हा आता वर्तमानात आलो तर आपण अजूनही स्वतःला सुरक्षित समजतो कारण आपण इतर सर्व प्राणी जे आपणाला खाऊ शकत असतात जवळजवळ नष्ट केलेले आहेत. पण हे सर्व नैसर्गिक ताकतीमुळे शक्य नाही झालेले तर आपल्या शस्त्रांच्या मुळे बौद्धिक शक्तीमुळे शक्य झालेले आहे. आपण जर का आपल्या आहाराचा बारकाईने विचार केला तर आपल्याला स्पष्ट दिसते की आपला सगळा आहार हा शस्त्रांच्यामुळे उभा राहतो . अगदी तवा सुद्धा तुमचे शस्त्र आहे . एका अर्थाने ते आहारातले सुदर्शन चक्र आहे . म्हणजे जर का आपण मांसाहाराचा बारकाईने विचार केला तर हा सगळा डोलारा शस्त्रांच्या आधारावर उभा आहे की काय असा प्रश्न पडतो अन्यथा साधी कोंबडी सुद्धा पकडताना आपल्याला धाप लागते अशी आपली वर्तमानकालीन स्थिती आहे. आपण कोंबड्यांची कैद त्यांच्या अंड्या पासूनच सुरू करतो एका अर्थाने आपण जेलर आहोत पशुपालन म्हणजे अनेकदा जेलर उद्योग आहे जो आपण बालपणापासूनच सुरू करतो आणि त्याचे बीज आपण जर पाहिले तर ते गुलामगिरीत आहे . एका अर्थाने आपण गुलामगिरीची सुरुवात पशुपालनापासून करतो फक्त हे आपल्या चटकन लक्षात येत नाही मोठ्या प्रेमाने आपण कुत्रे आणि मांजर पाळतो त्यासाठी प्रथम त्यांना गुलाम करतो आपण त्यांना विचारत नाही की त्यांना खरोखर आपल्याबरोबर राहायचे आहे की नाही आपण त्यांना आपली मुले करून टाकतो आणि ही सुद्धा एका अर्थाने कैदच ! ज्याला ही कैद आवडते तो पशु आपल्याबरोबर आपला फॅमिली मेंबर म्हणून राहतो पण आहाराच्या बाबतीत आपण त्याला वगळतो कारण आपण फॅमिली मेंबर खात नाही . म्हणजेच आपण असे म्हणू शकतो की सर्वसाधारणपणे माणसाने माणसाला खाऊ नये असा आपण एक व्यवस्थित नैतिक नियम पाळत असतो . हा नैतिक नियम माणसांमध्ये जन्मदत्त आहे की संस्कृतिदत्त आहे हे सांगणे कठीण आहे पण बहुदा तो जन्मदत्त असावा कारण सर्वसाधारणपणे दिसते असे की माणूस माणसाला खायला बघत नाही आणि म्हणूनच आपण माणसाची हत्या हा फार मोठा गुन्हा मानतो . परंतु आता थोडे इतिहासात गेले की असे दिसते की दुष्काळाच्या काळामध्ये टोकाच्या परिस्थितीत माणसाने माणसांना सुद्धा मारून खाल्लेले आहे . म्हणजे शेवटी महत्त्वाचे काय तर टिकणे महत्त्वाचे वाटते आणि म्हणून माणूस त्यासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो आपला आहार हा नेहमीच आपण गाठलेले टोक असते आणि अनेकदा तो आपण टोक काढलेल्या शस्त्रांच्या वर अवलंबून असतो तुम्ही आहाराची शस्त्रे पाहिली तर तुम्हाला बहुतेक शस्त्रांना टोक दिसेल भालाधनुष्यबाणापासून काट्यापर्यंत ! फक्त आपल्याला ते दिसत नाही कारण संस्कृती हे टोक अतिशय स्वाभाविक मानते . किंबहुना टोक तयार करणे हा माणसाच्या शस्त्र विद्येचा आद्य टॉपिक आहे . धार हे या टोकाचे पातळ चपटे रूप आहे . आणि आहाराबाबतची ही शस्त्रे या दोन्हींनी युक्त असतात . म्हणजे टोक आणि धार यांनी युक्त असतात .
आहार हा माणसाच्या टिकण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याने तो मूलभूत गरज म्हणून आपण मान्य करतो . माणसाचा मांसाहार हा असाच एका विशिष्ट पॉईंटला जन्माला आला आहे का हा ऐतिहासिक प्रश्न अजूनही पूर्णपणे सुटलेला नाही कारण सर्वसाधारणपणे एक थेरी अशी आहे की अत्यंत टोकाच्या काळात पाषाण खंड कोसळला आणि सर्व पृथ्वी झाकाळून गेली आणि त्यामध्ये सूर्यप्रकाश न पोचल्याने जवळजवळ सर्व वनस्पती मरून गेल्या ज्यांच्यावर माणूस जगत होता आणि याच काळामध्ये माणूस मांसाहारी झाला म्हणजेच एका अर्थाने माणसाचा उत्क्रांतीच्या एका विशिष्ट क्रायसेस मध्ये मनुष्य मांसाहारी झाला पण त्याला कधीही कच्चे मांस खाण्याची पूर्ण क्षमता प्राप्त झालेली दिसत नाही मग तो कच्चे मास खात नव्हता का तर खात असावा मुख्य म्हणजे मुंग्या, छोटे कीटक किंवा झुरळ खाणे हे त्याला जमत असावे आणि त्यामुळेच तो टिकला त्यामुळे शाकाहारी लोकांनी हे लक्षातच घेतले पाहिजे की ते मुळात जिवंत आहेत त्याचे सर्वात मोठे कारण एका विशिष्ट टप्प्यावर माणूस मांसाहारी बनला तो तसा बनला नसता तर मुळात तुमचे पूर्वजच टिकले नसते आणि तुमचे पूर्वज टिकले नसते तर तुम्हीही टिकला नसता
प्रश्न असा आहे की उत्क्रांतीच्या त्या टप्प्याची आत्ताच्या वर्तमान काळात गरज आहे का ? म्हणजे एकेकाळी माणूस चार पायावर चालत होता म्हणून आता सुद्धा त्याने चालावे असा आग्रह योग्य आहे का ? वस्तुस्थिती अशी आहे की माणसाने माणसाहर खाण्याची क्षमता आता पुन्हा एकदा गमावलेली आहे .आता त्याला व्यवस्थित भाजलेला मांसाहार किंवा उकळलेला मांसाहारच लागतो कच्चा मांसाहार खाणे माणसाने गमावलेले आहे मग त्याचे मांसाहार खाणे आता नैसर्गिक कसे मानायचे ?
वस्तुस्थिती अशी आहे की वर्तमानकालीन माणसाची शारीरिक नैसर्गिक स्थिती ही मांसाहाराला फारशी पूरक नाही. ती शाकाहारी पद्धतीने आता अस्तित्वात टिकलेली दिसते . कदाचित छोटे छोटे प्राणी तो आत्ताही खाऊ शकेल म्हणजे मुंग्या वगैरे पण एकंदरच हा काही त्याचा पहिला चॉईस असेल याची गॅरंटी आता राहिलेली नाही . माणूस एक तर फ्रिजमध्ये शाकाहार ठेवतो किंवा पशुपालनामधून आलेला मांसाहार ठेवतो मात्र हा मांसाहार तो शिजवूनच खाऊ शकतो शाकाहाराबाबतीत मात्र असे नाही तो फळे खाऊ शकतो इतकेच कशाला कच्चा भाजीपालाही खाऊ शकतो कदाचित धान्य आणि कडधान्यही नीट खाऊ शकतो मांसाहाराबाबत मात्र असे काही म्हणता येते का हा फार मोठा प्रश्न आहे अगदी प्राण्याचा मुलायम भाग सुद्धा त्याला पचतो की नाही हा प्रश्न आहे पण रक्त तो पिऊ शकतो दूध तर आपण पितोच पितो दूध हे सुद्धा एका अर्थाने रक्त आहे पण आपण त्याला रक्त मानत नाही कारण ते रक्तासारखे दिसत नाही . त्याची नैसर्गिक पातळीवर फारशी आवश्यकता नसते हीच वस्तुस्थिती आहे. निव्वळ दुधावर एखादा प्राणी जगू शकतो का तर नाही त्याला आपले शरीर चालवण्यासाठी वेगळे रक्त तयार करावे लागते म्हणूनच आपण दूध रक्तापेक्षा वेगळे काढतो आता दूध हा मांसाहार नाही का ? कारण दूध तर शेतीतून निर्माण होत नाही ते प्राण्यातून निर्माण होते आणि सर्वसाधारणपणे ते निर्माण करणारी मादी असते आता शरीरातून निर्माण होणारी गोष्ट शाकाहारी की मांसाहारी असा प्रश्न दुधाबाबत निर्माण होतो . आपण दुसऱ्या प्राण्यांच्यासाठी म्हणजे स्वतःच्या बाळांसाठी मातांनी माद्यांनी निर्माण केलेले हे दूध पीत असतो ही वस्तुस्थिती आहे
एका अर्थाने आपण दुधावर डल्ला मारतो . आता यात हिंसा नाही का ? म्हणजे एका अर्थाने बघायला गेले तर फळ हेच एका अर्थाने संपूर्ण शाकाहारी अन्न होय . म्हणूनच ॲडम आणि इवला दिलेल्या बागेत परमेश्वराने बहुदा फळ पाठवले म्हणजे आपल्या पूर्वजांना सुद्धा कुठेतरी हे माहीत होते की फळ हेच आपले नैसर्गिक अन्न आहे . आणि फळ हे आहार आहे . हे पुरुषाला कळलेले दिसत नाही ते बाईलाच कळलेले दिसते . एका अर्थाने आहाराबाबत बाईला जास्त अक्कल निसर्गाने दिलेली दिसते . मग फळ असो की दूध ! हे स्वाभाविक आहे कारण ती माता आहे शेवटी बाळाला पहिले अन्न ती देत असते. अन्नाबाबत पुरुषाचा i q किंवा food quotient बाई पेक्षा कमी आहे हे त्याने लक्षातच घ्यावे आणि मान्य करावे याला अपवाद असू शकतात पण तो नियम सिद्ध करणारा अपवाद समजावा . आपण ॲडम आणि ईव्हच्या कथेकडे या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो बाईलाच नेमके अन्न का दिसले हा प्रश्न ही कथा निर्माण करते. बाईलाच नेमकी अन्नाची जबाबदारी प्राचीन काळात का दिली गेली या प्रश्नाचे उत्तर त्याच्यामागे आहार आहे हे आहे. सर्वसाधारणपणे एक गोष्ट आपणाला दिसते ती अशी की मांसाहाराबाबत पुरुष जास्त उत्साही असतो कारण संस्कृतीच्या पातळीवर शिकार करण्याची जबाबदारी त्याच्यावरच होती. त्या उलट बाईला शाकाहार गोळा करण्याची म्हणजेच सर्वसाधारणपणे फळे गोळा करण्याची आणि भाजी सारखे तस्सम काही गोळा करण्याची जबाबदारी होती . गोळकरी अन्न आणि शिकारकरी अन्न असे अन्नाचे दोन आदिम प्रकारच होतात याचे कारण स्त्री ही आकाराच्या अंगाने आणि कदाचित शक्तीच्या अंगाने थोडी कमी असते म्हणून तिला शिकारीपेक्षा अन्न गोळा करायला लावणे हे जास्त योग्य वाटले असणार .पुरुषास तो आकाराने मोठा असल्याने त्याने मात्र सशक्त असल्याने शिकार करावी अशी कल्पना असावी .आज सुद्धा ही कल्पना आपल्या नेणीवे मध्ये वावरत असते याचे कारण असे की पूर्वीच्या काळात बाई गर्भवती झाली की तिची हालचाल करण्याची क्षमता कमी होत असे आणि त्यामुळे शिकार करण्यापेक्षा आपल्या पोटातला जीव वाढवणे तिला महत्त्वाचे वाटत होते साहजिकच बाईच्या नशिबात जे काही घर आलेले आहे त्याला कारण बाईची ही प्रेग्नेंसी आहे. सेकंड सेक्स मध्ये सीमांन द बुवाने म्हणूनच याला छेद देण्यासाठी म्हणून ही क्षमता नैसर्गिक नाही प्रेग्नेंसी नैसर्गिक नाही मातृत्व नैसर्गिक नाही स्त्रियांनी त्यापासून मुक्त व्हावे असे प्रतिपादन केले प्रत्यक्षामध्ये ते भंपक होते आता ते कोणी स्वीकारत नाही . पण त्याचबरोबर हेही खरे की आता बाईला अनेक मुलांना जन्म देण्याची गरज नाही म्हणजेच बाईचे फक्त मुलांना जन्म देण्यापुरते जे काम आहे ते दोन मुलांच्या मध्ये भागून जाते आणि नंतर मग ती पुन्हा करिअर कडे वळू शकते
प्राचीन काळ थोडा वेगळा होता आणि आजही असा काळ थोडा वर्तमानात उपस्थित आहे बायका पैसा असलेला पुरुष शोधतात कारण या गर्भवती काळामध्ये त्यांच्या आहाराची पूर्ण काळजी घेणारा मनुष्य त्यांना लागतो . पुरुषांच्या हे अनेकदा लक्षात येत नाही . आता आपण जंगलात राहत नाही आणि त्यामुळेच शेवटी मुलाला जन्म देताना त्याचे संगोपन करताना घर लागते . बाई ह्या गोष्टी अतिशय नैसर्गिक पातळीवर मागत असते तिची ती नैसर्गिक tendency आहे अलीकडे त्याला खूप लोक नावे ठेवत आहेत म्हणून हे सांगतो तो तिचा हक्क आहे मुले ही हवी आहेत आणि त्याच्या संगोपनाच्या जबाबदाऱ्या मात्र नकोत असे चालू शकत नाही .
अर्थात याला छेद देणाऱ्या प्रश्नांची यादी हल्ली आलेली आहे मुख्य म्हणजे खरोखरच नैसर्गिक पातळीवर नरावर संगोपन करण्याची जबाबदारी माणूस जातीत आहे का असा हा प्रश्न आहे अजून तरी या प्रश्नाचे नीट उत्तर मिळालेले नाही पण चुकून जरी या प्रश्नाचे उत्तर पुरुषावर अशी नैसर्गिक जबाबदारी नाही असे मिळाले तर पुरुष फक्त बायकांना प्रेग्नेंट करून गर्भवती करून पळून जाण्याची शक्यता आणि प्रमाण खूप वाढणार आहे . असो .
एकदा का बाईने माणसाला जन्म दिला की मग गोष्टी बदलायला लागतात आणि सर्वात पहिला प्रश्न हा नेहमीच बाळाच्या आहाराचा असतो. माणूस दुधावर जगतो बाळ दुधावर जगते याचा अर्थच दूध जे शाकाहारी आहे की मांसाहारी आहे हे कळत नाही अशा एका गुंतागुंतीच्या अन्नावर तो प्रथम जगतो आणि आहाराच्या बाबतीतले त्याची सगळी गुंतागुंत दुधापासून सुरू होते . मी त्यामुळे अनेकदा बाळाला मातृ आहारी किंवा स्तन आहारी म्हणतो कारण दूध शाकाहार की मांसाहार हे सांगणे फार कठीण आहे बरे हे दूध तयार व्हायला मांसाहार खाण्याची गरज नसते सगळे स्तनधारी शाकाहारी प्राणी शाकाहार खाऊन दूध निर्माण करू शकतात . माझे स्वतःचे स्पष्ट मत असे आहे की माणसाच्या मनामध्ये जो मनुष्य शाकाहारी की मांसाहारी हा अन्नाबाबतचा पेच आहे तो या दुधामुळे निर्माण झालाय . दुधापासूनच तो सुरू झालाय .
याबाबत सर्वसाधारण असे दिसते की प्राचीन काळात मनुष्य मुंग्या किंवा कीटक खात असल्यामुळे त्याला मिश्राहारी मानावे . प्रश्न असा आहे की पुन्हा वर्तमानामध्ये तो असा आहे का ? कारण तो असे प्राणी जे खातात म्हणजे मुंग्या वगैरे ते काही खाताना आता दिसत नाही . म्हणजे मुंग्यांची भाजी कोण करतो ? पण मनुष्य अंडी मात्र चोरत असावा त्यामुळे अंडे खायला काही हरकत नाही कारण ते फार नैसर्गिक अन्न असण्याची शक्यता आहे . दुसऱ्या प्राण्याची अंडी खाणे हे प्राकृतिक आहे . आणि मनुष्य अशी चोरी करत असण्याची बरीचशी शक्यता आहे किंबहुना माणसाची पहिली चोरी ही अंड्याची चोरी असावी म्हणूनच अनेकदा साहित्यिक लोक अंड्याच्या चोरीला फार महत्त्व देतात आणि प्रतीक म्हणून ते वापरत असतात . अंडी चोर हा त्यामुळेच फार प्रचलित शब्दप्रयोग आहे . आता या अंड्याच्या चोरीला चोरी म्हणावे की म्हणू नये ? कारण चोरीची व्याख्या काय असा प्रश्न त्यातून निर्माण होतो. म्हणजे माणसाने फक्त माणसाचे घटक चोरले तरच त्याला चोरी म्हणावी अशी काहीतरी माणसाची प्रवृत्ती आहे म्हणजेच एखादी गोष्ट जोपर्यंत प्रॉपर्टी म्हणून मान्य होत नाही तोपर्यंत एखादी चोरी चोरी ठरत नाही अगदी पशु सुद्धा माणूस चोरतो म्हणजे पशु जेव्हा मालमत्ता बनते तेव्हा त्या मालमत्तेची चोरी करणारा मनुष्य चोर ठरतो . म्हणजेच एका अर्थाने मालमत्तेमधूनच चोरी ही संकल्पना डेव्हलप झालेली दिसते . आणि त्याची पहिली चोरी ही आहाराची चोरी असावी . आपल्याकडे त्यामुळेच दही चोरी ही एवढी फेमस झाली असावी. मग दहीहंडी हा प्रकार माणसाने चोरी करू नये तर प्रत्यक्ष थोडी मेहनत करून हंडीबिंडी मिळवावी असे बिंबवण्यासाठी निर्माण झाला आहे का ? की हा चोरीचा उत्सव म्हणावा ?
प्राचीन काळी युद्धामध्ये मनुष्य जेव्हा शेती करत नव्हता तेव्हा पराभूत लोकांना गुलाम बनवले जाई तेव्हा माद्यांना मात्र जिवंत ठेवून स्वतःच्या कळपामध्ये गुलाम म्हणून नेले जाई म्हणजे एका अर्थाने बळकावणे आणि चोरी करणे यातून प्रश्न असा निर्माण होतो की युद्ध म्हणजे सामूहिक चोरी आहे का ? आणि त्याची सुरुवात क्षेत्र चोरण्यापासून प्रदेश चोरण्यापासून होते का ? तर हो असे त्याचे उत्तर आहे पूर्वीसुद्धा पराभूत टोळीचे सर्व क्षेत्र सर्व प्रदेश आणि पराभूत टोळीची सर्व मालमत्ता बिनधास्त ताब्यात घेतली जाई. थोडक्यात म्हणजे प्रॉपर्टी मध्ये सुद्धा आपल्या टोळीतली प्रॉपर्टी आणि परक्या टोळीतली प्रॉपर्टी असा फरक मनुष्य करत असतो आणि परक्या टोळीतली प्रॉपर्टी ही चोरी नाही उलट पराक्रम आहे असे तो ठरवतो आता इथे कायद्याचा प्रश्न येतो म्हणजे कायदा ठरवणार की कुठली प्रॉपर्टी आपल्या टोळीची आणि कुठली प्रॉपर्टी दुसऱ्याच्या टोळीची बरे इथेही जर का टोळ्यांच्या मध्ये समझोता झाला असेल तर कायदा बदलतो. कायद्याचा पहिला मुद्दा कदाचित याच अंगाने आला असावा की माझा प्रदेश कुठला तुझा प्रदेश कुठला आणि सर्वसाधारणपणे याच्यामागे पुन्हा आहारच दिसतो . माझ्या प्रदेशात तू शिकार करता कामा नये आणि तुझ्या प्रदेशात मी शिकार करता कामा नये हा कदाचित पहिला आंतरराष्ट्रीय करार असावा. कारण त्या काळामध्ये टोळी हेच राष्ट्र होते.
त्यामुळेच मोक्षाचा विचार करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे आहाराची व्यवस्था काय आहे . जर का एखाद्या प्रदेशांमध्ये वनस्पती निर्माणच होत नसतील तर तिथल्या साधकांना मांसाहार अटळ बनत जातो . परंतु जर का भारतासारखा देश असेल की जिथे जंगल प्रधान आहे तिथे मात्र साधक आरामात शाकाहारी होऊ शकतो माझे स्वतःचे स्पष्ट मत असे आहे की जैन धर्म भारतात जंगल प्रधान भारतात मर्यादित होता म्हणूनच तो शाकाहाराची मिजास करू शकतो तो जर का बाहेर बौद्ध धर्माप्रमाणे गेला असता तर आपोआपच मांसाहाराचा सुद्धा पुरस्कर्ता बनला असता कारण शेवटी अन्न उपलब्ध असणे नावाची एक फार मोठी गोष्ट आहाराच्या राजकारणामध्ये येते . आज सगळे जैन हे श्रीमंत व्यापारी असतात निदान मध्यमवर्गीय तर असतातच असतात म्हणूनच ते शाकाहार गाजवू शकतात माजऊ शकतात वाळवंटा जैन धर्म कसा काय टिकणार त्याला आपले नियम बदलावे लागले असते
प्रश्न असा आहे की वर्तमान काळाचे काय ? माणसाला आज वर्तमान काळात जवळजवळ सर्वच ठिकाणी शाकाहार उपलब्ध होऊ शकतो अशा वेळेला त्याने काय करायचे? तो जर सहजपणाने स्वाभाविकपणे शाकाहार उपलब्ध झाल्याने शाकाहार खाऊ शकत असेल तर मग अशा वेळेला त्याने प्राण्याच्या हिंसेला मांसाहार खाऊन का उत्तेजन द्यावे ? ही सुद्धा हिंसा नाही का ? म्हणजेच इथे आहाराच्या उपलब्धतेनुसार हिंसा मान्य करायची की नाही हे ठरते . आणि समजा आता जर का मांसाहार ही कोणाची तरी सवय झाली असेल तर काय ? आपण अनेकदा मांसाहार सवय म्हणून मान्य करतो का असा प्रश्न विचारायला हवा . तर त्याचे उत्तर हो अनेकदा केवळ घरामध्ये मांसाहार मिळाल्यामुळे आपणाला मांसाहाराची सवय होत जाते आणि म्हणून आपण त्याबाबत आग्रही होत जातो . म्हणजेच मांसाहार हा एका अर्थाने संस्कार आहे आणि असे मांसाहारी संस्कारी लोकच मांसाहाराचा आग्रह धरत असतात .
आजच्या काळामध्ये सहजरीत्या शाकाहार सर्वत्र उपलब्ध होतो त्यामुळे याबाबतीतला एक नियम निदान मोक्षाबाबतीत सांगता येतो तो म्हणजे मोक्षाची साधना करणाऱ्या माणसाने शाकाहार उपलब्ध असेल तर मांसाहार अजिबात करू नये . अलीकडच्या काळामध्ये तो असतोच म्हणूनच साधना करणाऱ्या बहुतांशी साधकांना शाकाहारीच असणे आवश्यक आहे .
आता गृहस्थ असलेल्या लोकांच्या बाबतीत मात्र हा नियम शिथिल करता येतो परंतु खरोखरच अशी स्थिती आहे का की शाकाहार उपलब्ध नाही . मला वाटते की इथे स्वातंत्र्य मान्य केले पाहिजे पण त्याचबरोबर हेही खरे आहे की खरोखरच मांसाहार करणे किती गरजेचे आहे याचा विवेक ज्याने त्याने बाळगावा . माणूस जेव्हा पशु होता तेव्हा तो मांसाहार कदाचित मिश्राहारी असल्याने करत असावा किंवा विशिष्ट उत्क्रांतीच्या टप्प्यात त्याला तो करायला लागला असावा परंतु आज सुद्धा माणसाचे शरीर खरोखर मांसाहारासाठी योग्य आहे की नाही हा प्रश्न आहे तो बारका बारका मांसाहारी असू शकतो म्हणूनच त्याला मिश्राहारी म्हणता येते परंतु मोठ्या किंवा मध्यम आकाराच्या प्राण्यांच्या बाबतीत शिकारी शिवाय कोणताच पर्याय त्याच्याजवळ नव्हता असे दिसते . त्याने शस्त्रे शोधली नसती तर त्याला शिकार शक्य झाली नसती . केवळ हातांच्या साह्याने हरणासारख्या पशूंची शिकार तो करू शकला असता का याबद्दल मला शंका आहे कारण माणसाच्या पळण्याचा वेग हरणाबरोबर किंवा सश्याबरोबर मॅच होताना दिसत नाही . बाकी जाऊ द्या झुरळा बरोबर सुद्धा अनेकदा मॅच होत नाही. अनेकदा झुरळे सुद्धा कीटक सुद्धा माणसाला चकवा देऊन पळून जातात . तेव्हा वर्तमानकालीन माणसाने फार काही मांसाहाराबाबत आपला पराक्रम सांगू नये . मॉलमध्ये किंवा दुकानांमध्ये आयता आलेला मांसाहार खाणे हा पराक्रम असत नाही ती खरेदी शक्ती असते. आणि त्यानंतरही तो जे काही करतो ते सर्व शस्त्रकाम असते. कच्ची कोंबडी किंवा बकरा खाऊन पचवण्याची क्षमता अजून तरी माणसात आलेली नाही. ती त्याच्याकडे पूर्वी सुद्धा होती की नाही याबद्दल शंका आहे. पण वर्तमानकालीन माणसांमध्ये मात्र ती नक्कीच नाही. माणसाच्या आहाराबाबतच्या विशेषत: मांसाराबाबतच्या सगळ्या फूशारक्या या त्याच्या हुशारक्यावर अवलंबून आहेत त्याने शोधलेल्या शस्त्रांच्यावर अवलंबून आहेत. आता तर अवस्था अशी आहे की बहुतेक माणसांना साधे दूध सुद्धा पचत नाही तरी यांचा आपला डीम डीम चालू . एका अर्थाने आत्ताच्या वर्तमानकालीन अवस्थेत मांसाहार हा माणसाचा आर्टिफिशियल आहार झालेला आहे आता सगळे आर्टिफिशियल नैसर्गिक झालेल्या काळामध्ये आपण ते खपवून घेऊ शकतोच.
थोडक्यात काय माणसाच्या संस्कृतीचा पाया अन्न आहे आहार आहे आणि आहाराबाबतचे यम नियम आहेत . एकंदरीतच आहार हलक्यात घेण्याची गोष्टच नव्हे .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment