फडणवीसांची भाषा ,एकंदरीत राजकीय भाषा आणि अमेरिकन भाषा 

भारतामध्ये ज्या काही गोष्टी आमच्या पिढीत बदलल्या त्यातील एक गोष्ट म्हणजे शिव्या ! सर्वसाधारणपणे भाऊ पाध्ये यांच्या सारख्या लोकांच्या कृपेमुळे जी भाषा साहित्याच्या बाहेर होती ती साहित्यामध्ये आली आणि नामदेव ढसाळ यांनी त्या भाषेवर कळस चढवला. ही बोलीभाषा होती ती शिवराळ पण होती. साहजिकच हळूहळू प्रचलित भाषेमध्ये जे समाज ही भाषा वापरत नव्हते ते सुद्धा ही भाषा सहजरीत्या स्वीकारायला लागले . यामध्ये सर्वात मोठा वाटा हा ब्राह्मण समाजाचा होता. माझ्या पिढीतल्या माझ्या ब्राह्मण मित्रांना मी नेहमीच व्यवस्थित शिव्या देताना पाहिलेले आहे . हे घडण्याचे एक मोठे कारण म्हणजे हॉलीवुड होय .याचवेळी सर्वात मोठा स्फोट झाला तो अमेरिकन फिल्मचा त्यातून आलेल्या अमेरिकन भाषेचा ! अमेरिकन फिल्म मधून लहानपणापासूनच आमच्या कानावर जी इंग्रजी पडली तिच्यामध्ये अनेक असे शब्द होते ज्यांचा अर्थ मराठीतल्या शिवीशी जुळत होता साहजिकच ते सगळे शब्द मग आमच्या लोकांनी आमच्या पिढीतल्या लोकांनी जसेच्या तसे वापरायला सुरुवात केले आणि तरुणाईची भाषाच बदलली. आता झाले असे की ही जी आमच्या काळातली तरुणाई होती आणि आमच्या नंतरची पिढी होती ती राजकारणात आली आणि तिला या राजकारणात स्वतःच्या भाषेत बोलायला लाज वाटेनाशी झाली . याचे एक आणखी कारण असे होते की यातील काही जण इंग्लिश माध्यमात शिकले होते आणि इंग्लिश माध्यमात शिकताना तिथे अशा प्रकारची अमेरिकन भाषा ही फार कॉमन गोष्ट झालेली आहे .

साहजिकच हीच त्यांची कार्यकर्त्यांच्या बरोबर बोलण्याची भाषा झाली विशेषता जे लोक प्रथमच राजकारणात आले होते त्यांना भाषिक सभ्यतेची राजकीय सवय नव्हती साहजिकच या लोकांनी आपल्या या भाषेचा तिखट जाळपणा आणि शिवराळपणा आपल्या भाषणांच्या मध्ये आणायला सुरुवात केली .यामध्ये ब्राह्मण घराण्यातले आणि वैश्य घराण्यातले अत्यंत सुसंस्कृत भाषेच्या वातावरणात वाढवलेले वाढलेले अनेक लोक होते जे अमेरिकन बोलीमुळे आणि आसपासच्या वातावरणामुळे बिघडले होते. माझ्या स्वतःच्या घरामध्ये अत्यंत सभ्य कोकणी आणि मराठी भाषा बोलली जात होती अपवाद फक्त कधी कधी राग आला तर मात्र भाषा बदलायची .

यावर अधिक भर पडली ती बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाची ! बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणी माणसाने भाषेविषयी सभ्यता पाळली पाहिजे ही संकल्पनाच मोडून काढली अर्थातच याची सुरुवात प्रल्हाद केशव अत्रे यांनी केली होती साहजिकच बाळासाहेब ठाकरे यांच्याकडूनच मुळातच अशा चमचमीत आणि झणझणीत भाषेची लोकांना पण अपेक्षा वाटायला लागली आणि मुळातच त्यांचे कार्यकर्ते हे बहुजन समाजातले प्राधान्याने असल्याने साहजिकच त्यांना या भाषेचे काही वाटत नाही नव्हते . किंबहुना त्यामुळेच ठाकरे आपल्या भाषेत बोलतात असे त्यांना वाटत होते .

आता या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर जी पिढी नवीन आलेली आहे ती कुठलीतरी १९६०ची ब्राह्मणी भाषा किंवा प्रमाण भाषणे ठरवून दिलेली सभ्य भाषा वापरेल अशी जर का तुमची अपेक्षा असेल तर तुम्ही भाषेबाबत मागासलेले आहात असेच म्हणावे लागेल . अमेरिकेमध्ये सर्वसाधारणपणे चित्रपटांमध्ये अनेक साधे साधे शिव्या मानले जाणारे शब्द सहजरित्या येतात आणि जोडप्यांच्या संभाषणात तर ते सहजच येतात ही आत्ताची सुद्धा मराठी आणि भारतीय कपल्स मधली जोडप्यांच्या मधली भाषिक अवस्था आहे ती कधी ना कधीतरी बेडरूम मधून बाहेर येऊन बोर्डरूम मध्ये प्रवेश करणारच होती आता हा प्रवास तुम्हाला असभ्य वाटला तरी जर का या नवीन पिढीला मात्र तो नैसर्गिक वाटला तर तुम्ही काय करणार आहात ? शेवटी भाषा काय कोणाच्या बापाच्या सॉरी पालकांच्या मालकीची नसते . ती आपल्याच पद्धतीने व्यक्त होत राहते . मी स्वतः या भाषेचा २०१० नंतर त्याग केला आणि सभ्य भाषेत पुन्हा एकदा बोलायला लागलो परंतु माझे भाषिक शुद्धीकरण झाले म्हणून मी सुद्धा इतरांच्यावर ते का लादावे असे कसे म्हणू . २०१० नंतरच्या माझ्या कवितांच्या मध्येसुद्धा तुम्हाला भाषिक पातळीवर असभ्य भाषा दिसणार नाही . मुळात हे आतून झालेले परिवर्तन आहे. मात्र आज सुद्धा अपवादात्मक वेळेला संभाषणात ही भाषा कधी कधी येते पण मी लगेच सावरतो . कधी कधी समोरच्या व्यक्तीच अशा काही भाषेत आणि असे काही प्रेशर टाकून बोलत असतात की त्यांना थांबवण्यासाठी अनेकदा क** भाषा वापरावी लागते .


तेव्हा फडणवीस यांना जे लोक सभ्य भाषेचा सल्ला देत आहेत त्यांना मी इतकेच म्हणेन की ही भाषा सहन करण्याची तयारी आता ठेवा कारण पुढच्या पिढ्या यापेक्षा अधिक भाषेबाबतीत असभ्य बनणार आहेत . मला मुळात फडणवीस यांनी असभ्य भाषा वापरलेली आहे असे वाटत नाही त्यांनी अगदी प्रतिष्ठित सभ्य भाषेतच जे बोलले जाते ते थोडे अधिक उग्र करून सांगितले . मुख्य म्हणजे ही भाषिक प्रतिक्रिया आहे त्यांच्या संदर्भात काय प्रकारची भाषा वापरली गेली ते स्पष्टपणे दिसते आहे तेव्हा कधीतरी प्रतिक्रिया येणारच होती त्यावरून एवढा गोंधळ आणि वाद घालण्याची गरज नाही . तुम्हाला हिंदुत्वाशी भांडायचे असेल तर तुम्ही भांडा तुमचा तो हक्कच आहे परंतु असे मुद्दे उपस्थित करून तुम्ही हिंदुत्वाला हरवू शकाल असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही भ्रमात आहात . शिवाय मी मागेच सांगितल्याप्रमाणे हिंदुत्वात सुद्धा वैदिक हिंदुत्व ,ब्राह्मणी हिंदुत्व ,वैष्णव हिंदुत्व आणि शैव हिंदुत्व असे प्रकार आहेत ब्राह्मणी हिंदुत्वाचा आणि वैष्णव हिंदुत्वाचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा मी स्वतः त्यांच्याशी भांडत असतो बहुजनांच्या शैव हिंदुत्वाची बाजू मांडत असतो त्यामुळे भांडायला हरकत नाही किंबहुना वाद आणि संवाद ही भारतीय संस्कृती आहे ती आपण पुढे नेलीच पाहिजे . 

भाषा हा मुद्दा पूर्वी ब्राह्मण वाद जोपासणारे लोक पुढे आणत होते पण आश्चर्यकारकरित्या आता हा मुद्दा काही ब्राह्मणेतर लोकांनी पुढे आणलेला आहे आता या लोकांचे ब्राह्मणीकरण झाले असे म्हणावे का ?

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती