भिन्नता , भेद आणि स्तर श्रीधर तिळवे नाईक 

भारतामध्ये जेव्हा जेव्हा वर्ण जात व्यवस्थेची चर्चा होते तेव्हा तेव्हा अनेकदा केवळ परिभाषेमुळे गोंधळ उडालेला दिसतो . पारंपारिक शब्दांचा विशेषत: शैव शब्दांचा अर्थ बदलल्याने अनेक गोंधळ उडालेले आहेत आणि जोपर्यंत आपण हे गोंधळ नि:स्तारत नाही तोपर्यंत ते आपल्या सामाजिक जीवनात अधिकच कोलाहल माजवत राहणार घालत राहणार . 

सर्वात पहिली गोष्ट म्हणजे भिन्नता ही निसर्गदत्त असते त्यामुळेच वर्गीकरण शक्य होते माणूस माकडा पेक्षा वेगळा असतो माकड अस्वलापेक्षा वेगळे असते याला आपण नैसर्गिक जाती आणि प्रजाती म्हणतो. पोर्तुगीज लोकांनी या बाबतीत जातीला असलेला शब्द काष्टा हा स्तरीकरणाच्या संदर्भात वापरला आणि सत्यानाश केला . पण हा सत्यनाश आपण का स्वीकारावा ? पोर्तुगीज हे कट्टर कृष्णधर्मीय होते त्यांना या देशांमध्ये धर्मांतर घडवायचे होते त्यामुळे या देशांमध्ये कशी जातीव्यवस्था अस्तित्वात आहे तुम्हाला कसे हीन मानले जात आहे हे अधिकाधिक सांगत आणि बिंबवत धर्मांतर घडवायचे असल्याने त्यांनी मुद्दा म्हणून जाणीवपूर्वक हा शब्द वापरलेला आहे हा शब्द पोर्तुगीज निघून गेल्यामुळे आपण स्वीकारण्याची अजिबात गरज नाही त्याऐवजी आपण समाज हा पारंपार्याने आलेला शब्द हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला शब्द वापरावा हे उत्तम म्हणजे कुंभार समाज चांभार समाज व्यापारी समाज , पणी समाज, वाणी समाज वैगरे आणि हा समाज जन्मदत्त नसून जो कोणी त्या त्या व्यवसायात आहे त्याला त्या समाजाचे सभासदत्व द्यावे म्हणजे गडबड होणार नाही आता ही प्रोसेस सुरू करण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे एखादा पूर्वाश्रमीच्या महा समाजात असणारा कोणी व्यापारी झाला असेल तर त्याला आता व्यापारी समाजाने आपल्या समाजामध्ये प्रवेश द्यावा हे जोपर्यंत घडणार नाही तोपर्यंत या देशातली वर्ण जात व्यवस्था नष्ट होणार नाही जर एखादा पुरोहित झाला असेल विशेषत: आर्य समाज अशा तऱ्हेने काम करत आहे तर त्याला आता पंडित समाजात प्रवेश द्यायला हरकत नाही . आणि त्याने ही बिन दिक्कत जाणीवपूर्वक हा त्याचा नवा समाज वापरावा जात हे सर्टिफिकेट वरून काढून त्या जागी समाज असे टाकावे त्यामुळे जास्त मदत होईल . काही काळ प्रवर्ग चालू ठेवावे लागतील तर जात काढावी त्या जागी समाज आणावा आणि मग प्रवर्ग ठेवावा जेणेकरून आरक्षणाचा जो काही उद्योग सुरू आहे तो काही का चालू राहील कालांतराने तो सुद्धा काढून टाकावा . आज हे घडत नसल्यानेच खरे प्रॉब्लेम झालेले आहेत.

भेद ही संकल्पना प्रामुख्याने अभेद तंत्रातून आलेली आहे आणि तिचा अर्थ पूर्णपणे मोक्षाशी निगडित आहे मोक्षाची अवस्था ही अभेदावस्था असते . तोपर्यंत मनुष्य हा भेदाभेद करत राहतो पण दुर्दैवाने हा अर्थ नंतर युरेशियन श्रुतीतल्या लोकांनी स्तरीकरणाशी निगडित केला आणि स्तरीकरण नियमित करण्यात आले. त्यामुळे शैव समाजांच्या मध्ये जी भिन्नता होती तिच्यात स्तरीकरण आणले गेले त्यामुळे अचानकपणे भेद म्हणजे स्तर असा अर्थ प्रस्थापित झाला जेणेकरून मोक्षाच्या नावाखाली सर्व लोकांनी स्वतःला शूद्र , अतिशूद्र मानावे . यातील शूद्र हा शब्द मी मागेच म्हटल्याप्रमाणे शुद्ध (मूळ प्राकृत शब्द सुद्द असा आहे आणि त्याचे संस्कृतकरण शुद्ध असे झाले )या शब्दाचा अपभ्रंश आहे आणि हा सतत आंघोळ करणाऱ्या शैव श्रुतीतल्या लोकांनी स्वतःला आंघोळ न करणाऱ्या युरेशियन लोकांच्या पासून वेगळे काढण्यासाठी म्हणून वापरायला सुरुवात केली होती . शुद्द पासून सुद्ध व त्यापासून पुढे संस्कृत शुद्ध आणि त्यापासून नंतर मग शूद्र असा शब्द रूढ झाला. जर का भारतामध्ये खरोखर समता नांदावायची असेल तर समाजशास्त्रामध्ये आता शुद्ध आणि अतिशुद्ध असे दोन शब्द शूद्र आणि अतिशूद्र यांच्यासाठी वापरणे योग्य आहे . जर का युरेशियन लोक आपले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे तीन शब्द जसेच्या तसे वापरत असतील तर शैव लोकांना सुद्धा त्यांचे स्वतःचे मूळ शब्द वापरण्याचा अधिकार असलाच पाहिजे आणि त्यांनी तो अधिकार आता वापरालाच पाहिजे आणि हे सर्व राजकीय आणि सामाजिक पातळीवर घडवून आणणे आवश्यक बनलेले आहे .

एकदा का मोक्षासाठी असलेला पूर्णा भेद , भेद , विभेद, अभेद आणि शेवटी नि: भेद हा शब्दांचा गोतावळा आपण मोक्षासाठीच वापरायला सुरुवात केली तर फार बरे होईल . फरक या उर्दू शब्दासाठी आपल्याकडे भिन्नता असा शैव श्रुतीतला शब्द आहे आणि तोच आपण वापरायला सुरुवात करावी. 

प्रश्न खरा जो उद्भवतो तो स्तरापासून सुरू होतो स्तरांच्या मध्ये मात्र कायमच वरचा स्तर खालचा स्तर मधला स्तर असे स्तरीकरण गृहीतच धरलेले असते हेच स्तरीकरण अनेकदा वैज्ञानिक पातळीवर सर्रास वापरले जाते पण जेव्हा ते सामाजिक पातळीवर येते तेव्हा मग त्याला उच्च आणि निच्च दर्जा प्राप्त होतो त्यामुळेच आपल्याकडे समाजशास्त्रामध्ये अलीकडे सामाजिक स्तरीकरण नावाची संकल्पना वर्ण जात व्यवस्थेसाठी स्वीकारण्यात आलेली आहे आणि हाच शब्द आपण सर्वांनी स्वीकारावा हे उत्तम ! हे एका दिवसात होणार नाही हे तर उघड आहे पण हे करावे लागेल कारण स्तरीकरण विशेषतः सामाजिक स्तरीकरण हे वर्गांच्या संदर्भामध्ये लागू होणे अटळ आहे कारण तिथे ते आर्थिक बाबतीत असते आणि अर्थशास्त्रात किंवा समाजशास्त्रामध्ये त्याची चर्चा होणे अटळ आहे. वर्ण आणि जात या दोन स्तरीकरणच्या गोष्टी आहे आणि म्हणूनच त्या सोडायला युरेशियन लोक तयार होत नाहीत कारण त्या वापरून त्यांना स्वतःला वर ठेवता येते . या जन्मदत्त वर्ग व्यवस्था आहेत जिथे तुमचा वर्ग जन्मानुसार आधीच निश्चित झालेला आहे आणि तुम्हाला जे काही अधिकार दिलेले आहेत आणि त्यांच्या मर्यादा दिलेल्या आहेत त्या प्रामुख्याने आर्थिक आहेत . मुख्य म्हणजे तुम्ही जन्मानुसार कोणता व्यवसाय करावा कोणत्या व्यवसायाद्वारे तुम्ही पैसे मिळवावे हे इथे स्पष्टपणे सांगितलेले आहे . बाबासाहेब आंबेडकरांनी याला सामाजिक केले खरे परंतु प्रत्यक्षामध्ये हा वर्गच आहे फक्त हा वर्ग जन्मदत्त वर्ग आहे आंबेडकरांना स्वतःचा वर्ग हा जन्मदत्त वर्ग असल्याने त्यातून मुक्तता हवी होती पण प्रत्यक्षात या वर्गाच्या कामाचे स्वरूप वर्ण जात व्यवस्थेमध्ये आधीच निश्चित झाले होते आणि या कामाच्या स्वरूपावरूनच मग त्यांना वेगळे काढले गेले . ब्राह्मणी अर्थशास्त्रामध्ये काही कामे ही उच्च ठरवली जातात आणि काही निच्च ! हे सर्व कामांच्या स्वच्छतेच्या अंगाने होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे म्हणजे शेतामध्ये माती लागते म्हणून ते शूद्र ! युद्धभूमी सोडली तर क्षत्रियांच्या अंगाला माती लागत नाही . अपवाद फक्त कुस्ती सारखे खेळ पण ते सुद्धा युद्धासारखेच मानले जातात . ब्राह्मण तर आपल्या अंगाला कसल्याच प्रकारचा मळ आणि माती लावून घेत नाहीत . त्याउलट हगणे मुतणे हे मल असल्याने आणि त्याला अत्यंत घाणेरडा वास येत असल्यामुळे अशा प्रकारच्या घाण वास मारणाऱ्या सर्व कामांना अति शुद्र दर्जा देण्यात आला . यामध्ये खाटीक आणि चांभार लोकांनी करावयाची कामे येतात कारण चमड्याला वास येत असतो त्यामुळेच अशा प्रकारची कामे करणारे लोक व गटार साफ करणे असो किंवा संडास साफ करणे असो ही सर्व कामे करणाऱ्या लोकांना अस्पृश्य या कॅटेगरीमध्ये मांडण्याचा उद्योग सुरू झाला . वास्तविक एकदा आंघोळ केल्यानंतर अगदी व्यवस्थित केल्यानंतर या सर्व गोष्टी शुद्धतेच्या पातळीवर दूर करता येतात परंतु अत्यंत जाणीवपूर्वक या लोकांना शुद्धतेची साधने पुरवायची नाहीत आणि हंगामा करत बसायचा असा उद्योग सुरू झाला . नाही निर्मळ जीवन तेथे काय करेल साबण हे नंतर येते सर्वात प्रथम आधी विकत घ्या साबण आणि करा शरीर निर्मळ हे प्रथम येते . ते स्वीकारायला हवे होते . पण उपाय शोधण्याऐवजी अस्पृश्यतेचा शॉर्टकट काढला गेला . कदाचित हे लोक स्वतः आंघोळ करत नसल्याने त्यांना हा शॉर्टकट सुचला असावा . म्हणजे आम्ही आंघोळ करत नसल्याने आम्ही उच्च राहतो आणि ही कामे टाळतो आणि तुम्ही ही कामे टाळू नका पण तुमच्या हा कामांच्यावरून आम्ही तुम्हाला अस्पृश्य करतो असा काहीतरी विचार झालेला दिसतो . आश्चर्याची गोष्ट म्हणजे असा विचार शैव लोकांनी केलेल्या दिसत नाही उलट आंघोळ करणे आणि अनेक झाडांचे पाले स्वच्छतेसाठी वापरणे असा उपाय शोधला होता .

म्हणजेच झाले काय ? शैव श्रुतीमध्ये असणारे स्वच्छता हे मूल्य व्यवस्थितपणे राजकीय पातळीवर वापरले गेले आणि त्याचा वापर चक्क वर्ण आणि जातीव्यवस्था निर्माण करण्यासाठी करण्यात आला . शत्रूचेच सर्वात मोठे शस्त्र त्याच्या विरोधात वापरायचे हा एक ब्राह्मण धर्माचा कायमच अजेंडा राहिलेला आहे त्यातून हे घडलेले आहे. म्हणजे शाकाहार हा इथल्या नाथ संप्रदायामध्ये काही लोकांच्या आणि साधनांच्या मध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेला होता कारण आपण जर का हिंसा केली तर मोक्ष मिळणार नाही असा या मोक्षाची साधना करणाऱ्या साधकांचा ठाम विश्वास होता त्यातूनच अहिंसा जन्मली ही अहिंसा भगवान महावीर यांनी आपल्या नवीन धर्मात कायम ठेवली आणि ब्राह्मणधर्माने ही अहिंसा आत्मसात करत नंतर तीच नाथ तंत्राने जगणाऱ्या लोकांच्या विरोधात वापरायला सुरुवात केली . नाथ तंत्र जे प्रामुख्याने शरीर केंद्रीय असल्याने साहजिकच लढाईमध्ये सर्वोत्कृष्ट कौशल्यासाठी आवश्यक मानले गेले होते आणि त्यामुळेच ते जीवनशैली म्हणून स्वीकारलेले अनेक शैव योद्धे ज्यांना प्रामुख्याने पूर्वाश्रमीचे महार चांभार मांग वगैरे म्हटले जाते त्यांनाच अस्पृश्य करून टाकले . या उलट ज्याच्या अंगाला माती लागते त्याला मुद्दाम म्हणून पूर्वाश्रमीचा जो वैश्य होता विश या वर्गामध्ये मोडत होता आणि याच वर्गांमधून जो राज्यकर्ता म्हणून उदयाला येत होता त्या वर्गातल्या माणसाला केवळ त्याच्या अंगाला माती लागते आणि त्या मातीला कधी कधी घामाचा वास येतो म्हणून या लोकांनी त्याला शूद्र म्हणायला सुरुवात केली . वास्तविक हा स्वतःला शुद्ध समजणारा शैव वर्ग ब्राह्मण आणि क्षत्रिय आणि वैश्य यांना फार वेगळा ठेवत होता याचे कारण त्यांच्या दृष्टीने हे बिनकामाचे युद्धखोर लोक होते . हा शेती आणि पशुपालन करणारा वर्ग स्वतःला शुद्ध समजत होता कारण तो सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळेला आंघोळ करत होता . शेतावर किंवा कुरणावर काम करून संपले की नदीवर पोहायला जाणे हे एक नित्याचे काम होते म्हणजे सकाळचे आंघोळ घरी करून शेताच्या किंवा पशुपालनाच्या कामावर जाणे आणि शेतावरून पशुपालना वरून परत येताना कुठल्यातरी विहिरीत किंवा नदीत किंवा ओढ्यात आंघोळ करणे ही एक अत्यंत कॉमन अशी शेतकरी पशुपालक वर्गातली प्रथा होती त्यामुळेच हे लोक स्वतःला शुद्ध समजत कारण त्यांचे नाते थेट शक्तीशी म्हणजे मातीशी म्हणजेच धरतीशी होते . आपले काम हे सर्वात पुण्याचे काम आहेत अशी ही शैव श्रद्धा आहे त्या उलट युरेशियन लोक मात्र केवळ पशुपालक असल्याने व शेतीमध्ये धरतीला शस्त्र लागते आणि ती दुखावली जाते असे मानत असल्याने प्रामुख्याने पशुपालक होते . पुढे मग त्यांनी शेती स्वीकारली पण ती करण्यासाठी अधिकाधिक गुलाम बनवणे सुरू केले. कारण शेती करणे पाप आहे असेच काहीतरी यांच्या डोक्यात होते . अन्यथा ते आले तेव्हा त्यांनी शेती स्वीकारलेली नव्हती ते पशुपालक होते म्हणून तर भटकत भटकत भारतामध्ये आले अन्यथा ते भारतामध्ये आलेच नसते . यानंतर आलेल्या लोकांनी हा खेळ नेमका उलटा केला आणि युरेशियन लोकांचे संपूर्ण जगभर तुम्हाला हेच उद्योग दिसतील ते ग्रीक व इतर उर्वरित युरोपमध्ये गेल्यानंतर त्यांनी तिथला ग्रीक धर्म नेमका उलटा केला आफ्रिका जिंकता यावी म्हणून आफ्रिकेतले मूळचे धर्म उलटे केले आणि तिथलाच एक माणूस नंतर इजिप्त मधून हाकलला गेला होता असे मानत एक नवीनच धर्म निर्माण केला. ज्यांनी उपकार केले ज्याने आधार दिला आश्रय दिला त्यांनाच नंतर मृत्यूच्या घरी पाठवणे असा एक नीच खेळ नेहमीच युरोपियन लोक खेळत असतात पुढे त्यांनी मग अमेरिकेत जाऊन हाच उद्योग केला आणि तिथल्या स्थानिक आधी आलेल्या लोकांना अक्षरश: गोळ्या घालून मारले, त्यांना गुलाम बनवले आणि आपली व्हाईट ख्रिश्चन संस्कृती त्यांच्यावर लादली . भारतामध्ये सुद्धा हाच प्रयत्न केला गेला परंतु त्यांच्या दुर्दैवाने इंडियात त्यांच्यापेक्षा अतिशय मजबूत असे शैवधर्म शैव श्रुती मध्ये अस्तित्वात होते . त्यामुळेच मग तिला आत्मसात केल्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात आल्यानंतर मोक्ष स्वीकारण्यात आला .

थोडक्यात काय वर्ण आणि जात या स्तरीकरणाच्या गोष्टी आहेत . त्या उलटमध्ये शैव श्रुती मधल्या समाज आणि गण या व्यवस्था भिन्नतेमध्ये मोडतात . सामाजिक स्तरीकरणाची चर्चा करताना जर का हा मुद्दा लक्षात घेतला गेला नाही तर मग आपोआपच तुम्ही युरेशियन पद्धतीच्या पठडीमध्ये यायला लागता आणि अनेकदा तर वर्ण जाती व्यवस्थेचे समर्थन करायला लागता.अनेक लोक अर्वाचीन काळामध्ये आताही लागू होत नाही परंतु प्राचीन काळी ती लागू होत होती अशा पळफुटा स्टान्स घेतात. काहीजण त्या काळामध्ये ती कशी योग्य होती हे सिद्ध करायला धडपडतात पण स्पष्ट सांगायचे म्हणजे कुठल्याच काळामध्ये वर्ण जात व्यवस्था भारतासाठी योग्य ठरली नाही 

थोडक्यात काय वर्ण आणि जात हे स्तर आहेत हे आपण आता स्वीकारायला हवी आणि ते मोडीत काढायला हवेत . त्या उलट व्यवसायिकांचे समाज म्हणजे कुंभार समाज व्यापारी समाज हे सर्व तुम्ही नष्ट करतो म्हटले तरी नष्ट होणे शक्य नाही याचे कारण व्यवसायनिष्ठ संघ कायमच सर्वच देशांमध्ये वावरत राहतात . प्रत्येक व्यवसायाचे म्हणून स्वतःचे प्रॉब्लेम असतात आणि ते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी म्हणून अशा प्रकारचे समाज आणि त्यांचे संघ अस्तित्वात राहणे अटळ आहे . यामध्ये रोटी-बेटी व्यवहार मिश्र करून ब्राह्मण लोकांनी या समाजांच्या पासून जात व्यवस्था बनवली हे आपण लक्षात घेतले पाहिजे अन्यथा जवळजवळ १००० पर्यंत अशा प्रकारचे रोटी बेटी व्यवहार सर्व प्रकारच्या शैव समाजांच्यामध्ये आरामात होत होते कारण समाजामध्ये रोटी बेटी व्यवहार आपापसात करणे शैव श्रुती मधल्या कुठल्या धर्मामध्ये कोणीही चुकीचे मानत नव्हते वेगवेगळ्या भिन्न समाजामध्ये सुद्धा ते व्हायचे एका समाजातून दुसऱ्या समाजात स्थलांतर करण्याची परमिशन असल्यामुळेच अनेक शेतकरी , धनगर किंवा तसे उद्योग करणारे लोक शैव श्रुतीच्या आधारे राजे झालेले दिसतात आणि त्याला कोणीही विरोध केलेला नाही.

तेव्हा निदान समाजशास्त्रातल्या लोकांनी तरी याबाबतीत आता भान बाळगणे आवश्यक होऊन बसले आहे . माझी सरकारला नम्र विनंती आहे की सरकारने आता ब्राह्मण,क्षत्रिय ,वैश्य ,शुद्ध आणि अति शुद्ध अशा कॅटेगरी स्वीकाराव्यात आणि शूद्र आणि अतिशूद्र या कॅटेगरीज हटवाव्यात . हा देश सर्वात प्रथम शैव श्रुतीतील लोकांचा आहे हे कोणीही विसरू नये आणि जर का कोणाला याचा विसर पडणार असेल तर मग हर हर महादेव म्हणत त्यांना आठवण कशी करून द्यायची हे आम्हाला नीट माहिती आहे.

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती