समता, गुणवत्तेची समता आणि गुणवत्तेची संधी श्रीधर तिळवे नाईक 

सर्वसाधारणपणे मार्क्सवादाने अनेक पद्धतीने गुणवत्तेचा शोध घेतलेला आहे आणि अलीकडच्या काळातील उत्तर मार्क्सवादाने सुद्धा गुणवत्ता ही वैयक्तिक नसते तर आर्थिक आणि सामाजिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या जीवावरच उभी असते असे प्रतिपादन केलेले आहे.

दुसऱ्या बाजूला ब्राह्मण्यवादी लोक आहेत जे सातत्याने गुणवत्ता ही फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय या उच्च वर्णीय लोकांच्याकडे असते असे प्रतिपादन करत असतात आणि वैश्य शूद्र या मध्यवर्णीय आणि अतिशूद्र आदिवासी या निम्नवर्णीय किंवा अवर्णीय लोकांना डावलत असतात बाजूला करत असतात . वैदिक हिंदुत्ववाद मात्र कर्मदत्त मांडणी करत असतो परंतु त्याचा फारसा प्रभाव हिंदू धर्मावर पडलेला दिसत नाही . अलीकडच्या काळात या संदर्भात आर्य समाजाने केलेले कार्य उल्लेखनीय आहे आणि शैव श्रुती आणि आर्य समाज यांच्या कॉम्बिनेशन मधून उदयाला आलेल्या शाहू महाराजांनी वर्ण व्यवस्था आणि जातीव्यवस्था यांच्या अंताची भूमिका मांडली आहे . आपण ती सर्वांनी स्वीकारली पाहिजे .

प्रश्न असा आहे की नेमका गोंधळ कुठे आहे ? माझ्या मते खरा गोंधळ प्रत्येक माणसाकडे जन्मदत्त म्हणून गुणवत्ता असते हे मूलभूत गृहीतकच डाव्या विचारात आणि ब्राह्मण धर्मातही अनेकदा नाकारले गेले असल्याने दोन्ही बाजूने गोंधळ आहे . मार्क्सवादी लोक माणसाकडे जन्मदत्त अशी काही गुणवत्ता असते हेच नाकारतात आणि हा प्रॉब्लेम आहे कारण प्रत्यक्ष जनुकीय पुरावे असे सांगत नाहीत. अगदी प्रयत्न करून सुद्धा संगीत न आलेल्या अनेक व्यक्ती असतात . काही सूर घेऊनच जन्मलेल्या असतात उदाहरणार्थ लता मंगेशकर यांचा गंधार! त्यामुळे जन्मदत्त म्हणून काही गुणवत्ता असते हे स्वीकारावे लागते वर्ण जात व्यवस्था ही गोष्ट नाकारते किंबहुना वर्ण जात व्यवस्था एका अर्थाने मार्क्सवादी आहेत कारण ती तुम्हाला असेच सांगते की तुम्ही ज्या वर्ण किंवा जातीमध्ये जन्मता तिचे कौशल्य जन्मदत्त नसते तर जातीदत्त असते वर्ण दत्त असते आणि तुम्ही ते प्राप्त करू शकता. वर्ण जात व्यवस्था कधी असे म्हणत नाही की कुंभार असलेल्या माणसाला कुंभार बनता येणे शक्यच नाही .तो कुंभार कसा बनणार तर कुंभार हे कौशल्य आहे आणि ते कोणीही आत्मसात करू शकत असल्याने कुंभार जातीतला प्रत्येक जण कुंभार म्हणू शकतो असेच हे गृहीतक आहे म्हणजेच एकीकडे गुणवत्ता जन्मदत्त आहे असे म्हणायचे, त्याचे श्रेय मागच्या जन्मातल्या पुण्याला द्यायचे आणि दुसरीकडे प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना मात्र हे कौशल्य कर्मदत्त ,जात दत्त ,वर्णदत्त, समाज दत्त आहे हे मान्य करायचे कारण त्याशिवाय ती व्यवस्था चालू शकत नाही . हा वर्ण जात व्यवस्था मधला विरोधाभास कोणाच्या लक्षात येत नाही आणि त्यातूनच खरा गोंधळ उडालेला आहे 

वस्तुस्थिती अशी आहे की प्रत्येक मनुष्य स्वतःचे असे जन्मदत्त कौशल्य आणि प्रतिभा घेऊन जन्मत असतो. वर्ण जात व्यवस्थेचा खरा प्रॉब्लेम असा आहे की ती प्रत्येक मनुष्याला त्याचे जन्मदत्त कौशल्य आणि प्रतिभा यांचा विकास करण्याची संधी नाकारते . समजा एखाद्या चांभार समाजातील माणसाकडे पुरोहित होण्याचे संपूर्ण जन्मदत्त कौशल्य असेल तर ते कौशल्य सिद्ध करण्याची आणि प्राप्त करण्याची संधी वर्ण जात व्यवस्था नाकारते आणि खरा प्रॉब्लेम हाच आहे. म्हणजेच वर्ण जात व्यवस्था गुणवत्ता विरोधी आहे . ती गुणवत्तेबाबत समान संधी देत नाही. ती फक्त ब्राह्मणांनाच पुरोहित बनण्याची संधी देते आणि ज्या ब्राह्मणांना पुरोहित बनता येत नाही त्यांना सुद्धा तुम्ही ब्राह्मण म्हणून मान्यता द्या मान द्या असे सांगते . त्यामुळे मूर्ख असलेल्या ब्राह्मणाची ही पूजा करा अशा प्रकारची मांडणी आपल्याकडे काही विषमतावादी लोकांनी केलेली आहे .

शैव कल्याण वाद असे सांगतो की सर्वांच्या ठाई समान शक्ती आहे समान प्राण आहे त्यामुळेच समता असलीच पाहिजे. प्रत्येक माणसाजवळ प्रतिभा आहे गुणवत्ता आहे आणि ह्या गुणवत्तेला विकसित करण्याची तिच्या संदर्भातील सर्व कौशल्य अवगत करण्याची, प्राप्त करण्याची संधी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या त्याच्या गणात त्याच्या त्याच्या राज्यात आणि राष्ट्रात त्याच्या त्याच्या समाजात मिळालीच पाहिजे . संधीची समानता नसेल तर संपूर्ण राष्ट्र फापलत जाते . याचा अर्थ असा की प्रत्येक जण गुणवत्तेबाबत अद्वितीय असतो आणि सामाजिक बाबतीत त्या अद्वितीयतेला विकसित करण्याबाबत समान हक्क आणि समान संधी प्राप्त करण्याचा हकदार असतो . जे राष्ट्र जे जग जे राज्य जे समाज अशा प्रकारची संधी नाकारतात ते शिवधर्म विरोधी, शक्ती धर्मविरोधी असतात, ते शैवविरोधी असतात ते मोक्ष विरोधी असतात . 

कारण जेव्हा तुम्ही गुणवत्ता विकसित करण्याची संधी नाकारता तेव्हा तुम्ही कळत नकळतपणे त्या व्यक्तीचे स्वातंत्र्य सुद्धा नाकारत असतात आणि जे स्वातंत्र्य नाकारतात जे स्वतंत्र होऊ देत नाहीत ते तंत्रविरोधी असतात ते शिवविरोधी असतात ते शक्ती विरोधी असतात ते शैवविरोधी असतात . तंत्राची पहिली अटच स्वतंत्र असणे ही आहे . कुठलीही व्यक्ती जोपर्यंत स्वतंत्र असत नाही तोपर्यंत ती आपल्या गुणवत्तेसाठी लागणारे तंत्र प्राप्त करू शकत नाही. त्यामुळे गुणवत्तेची संधी म्हणजे स्वातंत्र्य सुद्धा असते .

तेव्हा माणसा मधली अद्वितीयता आणि सामाजिक समता यांचा योग्य तो मिलाफ करणे म्हणजेच कल्याणतेचा शिवतेचा पुरस्कार करणे होय आणि प्रत्येकाचे हे कर्तव्य आहे की अशी जी गुणवत्ता प्रत्येक व्यक्तीच्या ठाई असते तिला आपण सन्मान दिला पाहिजे आदर दिला पाहिजे आणि मुख्य म्हणजे सर्व गुणवत्ता समान असतात हे आपण मान्य केले पाहिजे. अमुक एक गुणवत्ता श्रेष्ठ आणि अमुक एक गुणवत्ता कनिष्ठ असा गुणवत्तेमध्ये भेद करता येत नाही . सर्वच गुणवत्ता श्रेष्ठ असतात आणि सर्वच गुणवत्तांना विकसित करण्याचे चान्सेस मिळालेच पाहिजेत संधी मिळालीच पाहिजे. तेव्हा तीन मुख्य गृहितके 

पहिले प्रत्येक माणसाकडे जन्मदत्त म्हणून काही ना काही गुणवत्ता असतातच काही लोकांच्याकडे अनेक गुणवत्ता असू शकतात 

दुसरे या गुणवत्तांना विकसित करण्याची संधी प्रत्येकाला मिळालीच पाहिजे संधीमध्ये समानता असली पाहिजे समता असली पाहिजे 

तिसरे सर्वच गुणवत्ता समान असतात त्यांच्यामध्ये गुणवत्ता भेद करता येत नाही सर्वच गुणवत्तांना आपण आदर दिला पाहिजे म्हणजे एखादा उत्कृष्ट कचरा काढत असेल तर त्याला आणि त्याच हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरला समान आदर मिळाला पाहिजे .

सर्व गुणवत्तांचा , प्रत्येक गुणवत्तेचा आणि प्रत्येक गुणवंताचा सर्वात मोठा शत्रू हा नेहमीच आळस असतो हे लक्षात ठेवले पाहिजे दुसरा शत्रू व्यसन असते अनेक लोक केवळ व्यसनापोटी आपले कौशल्य आपली गुणवत्ता विकसित करत नाहीत भलत्याच गोष्टींच्या नादाला लागतात. तेव्हा अशा लोकांना सुद्धा आपण हे समजावून सांगितले पाहिजे की स्वतःच्या गुणवत्तेचे वाटोळे करून घेऊ नकोस. 

गुणवत्ता विकसित करण्यासाठी अनुशासन अत्यंत आवश्यक आहे शिस्त अत्यंत आवश्यक आहे म्हणूनच गुणवत्तेबरोबरच अनुशासन आणि शिस्त यांना पाळण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांवर प्रत्येक कुटुंबीयांवर असते प्रत्येक विद्यार्थ्यावर असते प्रत्येक शिक्षकावर असते . 

तेव्हा विवेक बाळगा आणि समान संधी द्या प्रत्येकाची अद्वितीयता मान्य करत प्रत्येकाच्या कौशल्याला विकसित होण्यासाठी मदत करा एकमेकाला एकमेकाची गुणवत्ता विकसित करण्यासाठी मदत करा आपण सर्वात शेवटी एकच आहोत जो जीव आहे तो शेवटी शिव आहे इतके लक्षात ठेवा आणि प्रत्येक जीव शेवटी शिव आहे हे लक्षात ठेवा मग तो कुठल्याही वर्णाचा असो जातीचा असो किंवा धर्माचा असो किंवा राष्ट्राचा असो . गुणवत्ता पाहताना फक्त गुणवत्ता पहा बाकी कसल्याही भिंती मधी आणू नका . भिंती गुणवत्तेला हानिकारक असतात.

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती