संन्यास घेताय आधी विचार करा श्रीधर तिळवे नाईक
संन्यास जीवनशैली आणि ज्यांनी संन्यास घेतलेला नाही त्यांनी संन्यास घेण्याआधी काय करावे श्रीधर तिळवे नाईक
भारतातल्या सर्वच आचार्यांच्या आयुष्यात एक परस्पर विरोधी जीवनशैली साकार होत असते एका बाजूला झोपडपट्टी आणि दुसऱ्या बाजूला फाईव्ह स्टार हॉटेल एका बाजूला शेतकरी आणि दुसऱ्या बाजूला उद्योगपती ही दोन्ही टोके त्यांना बोलवत असतात. बहुतांश आचार्य हे श्रीमंत टोकाला बळी पडत जातात आणि मग आश्रम थाटून अनेक जण तर चक्क व्यवसाय करायला लागतात. माझ्याही जीवनशैलीमध्ये गरीब आणि श्रीमंत ही दोन टोके हेलकावत राहिली आहेत आणि आजही राहतात तरी मी कधीही श्रीमंत टोकाला वाहवत गेलो नाही किंवा आश्रम थाटलां नाही. अनेक आचार्यांना तर श्रीमंत जीवनशैलीची सवय होऊन जाते आणि मग झोपडपट्टीशी किंवा शेतीशी अड्जस्ट होणे त्यांना कठीण जाते. हे लोक शेवटी मोक्षाकडे जाण्याऐवजी धर्माकडे जायला लागतात आणि काही तर अधर्माकडे जायला लागतात. अशा लोकांची जीवन साधना संपुष्टात येते मोक्ष साधना संपुष्टात येते आणि मग हे लोक केवळ उत्तम वक्ते बनतात . लोकांनाही मुळात मोक्ष नको असतो त्यांनाही धर्म नावाचा एक तात्कालिक दिलासा हवा असतो आणि हा दिलासा देण्यात हे लोक निपुण असतात . साहजिकच अनेकदा महाठकाला ठग भेटला अशी अवस्था असते . परस्पर संमतीने होणारी ही फसवणूक सर्वांच्याच फायद्याची असल्याने सर्वजण त्यामध्ये पैसा आणि वेळ गुंतवत बसतात.
या सगळ्या गोष्टीच्या विरोधात कायम बोंबा मारत राहणे याला पण काही अर्थ उरत नसतो कारण त्यातून अनेकदा काही साधत नसते . त्यापेक्षा खरोखर जे मुमुक्षु आहेत मोक्षक आहेत त्यांच्याबरोबर यात्रा करणे आणि मोक्ष मिळाल्यानंतर जे मुमुक्षु आहेत मोक्षक आहेत त्यांना त्यांनी मागितली तर मोक्षासाठी मदत करणे हेच कधीही साधनेसाठी किंवा मोक्षासाठी योग्य असते . उकिरडा स्वच्छ करत बसण्यापेक्षा ज्या जागा आधीच स्वच्छ होण्यासाठी तळमळत आहेत त्या जागांच्यावर काम करणे कधीही श्रेयस्कर असते
या दोन जीवनशैलींच्या पेक्षा तिसरी जीवनशैली ही अधिक कठीण असते सर्वसाधारणपणे या संन्यासी जीवनशैलीत श्रीमंत जीवनशैली जास्तीत जास्त टाळणे आणि व्यवस्थेच्या विरोधात बोलणे घडत जाते. हे जर करायचे असेल तर मात्र सर्व गणित बदलते. तुम्हाला उपलब्ध होऊ शकणारी प्रत्येक संधी व्यवस्थांच्या मध्ये डावलली जाते. तुमच्या सत्य बोलण्यामुळे अनेकांच्या हितसंबंधांना तडा जात जातो . अशावेळी मी नेहमी एक गोष्ट सांगतो की जर का शारीरिक कष्ट करण्याची तुमची तयारी असेल तरच तुम्ही अशा प्रकारची जीवनशैली आत्ताच्या काळात स्वीकारू शकता अन्यथा फार अवघड होते. कारण शारीरिक कष्टाची तयारी असली आणि गरजा फक्त अन्न वस्त्र इतक्याच मर्यादित राहिल्या तरच मग तुम्ही या मार्गावर जात साधना करू शकता. यात मी आरोग्य आणि शिक्षण हे सुद्धा टाकलेले नाही याचे कारण कधी कधी पैशाच्या अभावी यासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण होतात . तुम्हाला दरवेळी डॉक्टरांचे पैसे देता येतीलच असे होत नाही. थोडक्यात गरीब लोकांचे सर्व प्रॉब्लेम तुमच्या वाट्याला येणे अटळ असते . यात मी निवारा सुद्धा टाकलेला नाही कारण कधी कधी राहते घर ताबडतोब सोडावे लागते आणि रस्त्यावर यावे लागते . ही रस्त्यावर येण्याची तयारी नसेल तर ही संन्यास शैली फारशी कामाची ठरत नाही . मी माझ्या आयुष्यात रस्त्यावर आलेलो आहे आणि अनेकदा आलेलो आहे म्हणून हे सांगतो आहे. अनेक प्रकारचे दबाव टाकले जातात आणि जर का हे दबाव सहन करण्याची ताकद असेल तरच तुम्ही या पद्धतीने जीवन जगू शकता .
या सगळ्यात सर्वात मोठा प्रश्न नेहमी एकच विचारला जातो तो म्हणजे शारीरिक कष्ट करण्याची तयारी एका विशिष्ट वयापर्यंत असू शकते त्यानंतर काय ? तर या प्रश्नाचे साधे आणि सरळ उत्तर असे आहे की जे गरिबाचे होते तेच तुमचे होते. काही वेगळे विशेष आपल्या बाबतीत घडेल अशा भ्रमात राहण्याची गरज नाही . जेवढे आणि जसे पैसे येतील तेवढ्या प्रमाणात जसे शक्य होईल तसे जगणे हाच पर्याय अशावेळी असतो. जर मोक्ष मिळाला असेल तर मोक्ष अनेकदा काळजी घेतो हे खरे आहे. पण मोक्ष मिळाला नाही तर काय घडेल हे सांगता येत नाही . अशावेळी उपाशी राहण्याची आणि रस्त्यावर झोपण्याची तयारी असायला हवी . अनेकांची ती नसते. म्हणूनच किमान एक वर्षे तरी तारुण्यातच संन्यास जीवनशैलीची प्रॅक्टिस करा असा नियम घालून दिला आहे. हा नियम तुम्हाला म्हातारपणी खूप बळ देऊ शकतो . भिक्षा मिळाली उत्तम नाही मिळाली तरी उत्तम अशा प्रकारे तुम्ही जगू शकता . कुठल्याही मंदिरामध्ये कुठल्याही पायरीवर कुठल्याही धर्मशाळेत कुठल्याही खोलीत तुम्ही झोपू शकता . आणि एकदा का तुमच्या हे लक्षात आले की आपल्याला हे जमू शकते तर मग तुम्ही मोक्षाची साधना व्यवस्थेशी लढाई करत सुद्धा करू शकता. हे जर जमणे शक्य नसेल तर स्पष्टपणे प्रस्थापित धर्माने निर्माण केलेल्या सामूहिक संन्यास व्यवस्था स्वीकाराव्यात हेच उत्तम ! तिथे अनेकदा व्यवस्थित राहण्याची सोय असते . साधना करण्याची सोय असते. फक्त अनेकदा गुरु चांगला असेल तर फायदा होऊ शकतो पण कधी कधी गुरु चुकीचा असेल तर तो बोकांडी बसू शकतो . हे ऑफिसमध्ये चांगला किंवा वाईट बॉस मिळणे यासारखेच आहे आणि अलीकडे का इतका बदलला आहे की अनेकदा वाईट बॉस सुद्धा पदरी पडू शकतो . मात्र यामध्ये रिस्क कमी होते . अनेकांना हीच जीवनशैली सोयीची आहे. माझे स्वतःचे मत असे की किमान जोपर्यंत धारणा व्यवस्थित होत नाही तोपर्यंत तरी ही एक अत्यंत सुरक्षित अशी जीवनशैली आहे . खरा प्रॉब्लेम सविकल्प समाधीच्या वेळी निर्माण होऊ शकतो याचे कारण असे की सविकल्प समाधीमध्ये खोटे बोलणे फार अवघड जाते किंबहुना अशक्य बनते त्यामुळे त्या आश्रमातल्या किंवा व्यवस्थेतल्या प्रस्थापित गोष्टी तुम्हाला चुकीच्या वाटल्या तर तुम्ही त्याविषयी बोलायला लागता आणि तुमची हकालपट्टी निश्चित होते , अटळ होते. शेवटी त्यांना सुद्धा आपली व्यवस्था टिकवायची असते .
तेव्हा ज्यांना कोणाला मोक्षाची साधना करायची आहे त्यांनी रोमँटिक होऊ नये . अगदी स्वामी विवेकानंदांच्या पदरी सुद्धा कधी कधी उपवास पडलेले आहेत आणि शेवटच्या काळात त्यांना पैसे घेऊन व्याख्याने द्यावी लागलेली आहेत हे लक्षात ठेवा . तेव्हा सामाजिक ते बाबत वास्तववादी असावे. नेमके सामाजिक वास्तव काय आहे ते नीट पहावे. धार्मिक वास्तव हे नेहमीच सामाजिक वास्तवाचे भाग असते. अनेक लोक आपले आयुष्य अत्यंत कडक संन्यासात फेकतात आणि मग तो संन्यास त्यांना झेपत नाही म्हणून हेलपाटतात , झेलपाटतात आणि काही काही स्वतःच्या घरी परततात हे असे परत येणे अनेकदा नामुष्कीचे असते . हे असे नामुष्कीचे परतणे घडू नये असे वाटत असेल तर आधीच सर्व व्यवस्थेचा विचार नीट करावा. आपली मर्यादा काय आहे ते पाहावे शारीरिक कष्ट तयार करायची तयारी अजिबातच नसेल तर मग उगाच एकट्याच्या संन्यासाची कल्पना करू नये
. त्यापेक्षा सामूहिक संन्यास घेतलेल्या सामूहिक व्यवस्था स्वीकाराव्यात. आश्रम स्वीकारावे .नामुष्कीचे संन्यास हे अनेकदा चेष्टेचे विषय बनतात आपल्याकडे याचे सर्वात उत्तम उदाहरण ज्ञानेश्वरांचे वडील आहेत. तेव्हा संन्यास घेताना उगाच घाई करू नका कुठल्यातरी इमोशनल रँडमनेसला बळी पडू नका . सर्वात मुख्य गोष्ट जी मुद्दामच मी शेवटी सांगतो आहे ती म्हणजे मुळातच आता संन्यास घेण्याची फारशी गरज उरलेली नाही कारण पूर्वी ज्ञानीप्राप्तीसाठी अनेकदा गुरु शोधावा लागत असे. आता अशी गरज उरलेली नाही. अनेक प्रकारच्या मोक्ष संहिता आणि धर्म संहिता आता इंटरनेटवर उपलब्ध आहेत त्यांच्या साह्याने तुम्ही सुरुवातीच्या सर्व साधना करू शकता. प्राचीन काळी हे शक्य नव्हते म्हणून गुरू शोधला जाईल आता मात्र अनेक अवस्था पार केल्यानंतर जेव्हा वैयक्तिकच अडचणी यायला लागतात तेव्हाच गुरु लागतो कारण वैयक्तिक अडचणी अनेकदा तुमच्या तथाकथित चालत आलेल्या परंपरेत आणि पुस्तकात नसतात त्या स्वतःला सोडवाव्या लागतात अशावेळी मात्र कधीकधी गुरुची गरज भासते. मात्र अशावेळी अत्यंत काळजीपूर्वक गुरू निवडावा . कुठल्याही अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये . मुख्य म्हणजे गुरु डोळस असून आणि स्वतःला डोळस ठेवून निवडावा . मोक्षाच्या साधनेत श्रद्धा ही आऊट डेटेड झालेली गोष्ट आहे. त्यापेक्षा स्वतःच्या प्रचिती नेहमीच महत्त्वाच्या असतात हे लक्षात ठेवावे.
तुम्ही म्हणाल हे सर्व मी का सांगतो आहे याचे कारण उघड आहे आता कुंभमेळा आलेला आहे आणि रँडम संन्यास घेण्याची उर्मी अनेकांना येणे अटळ आहे. या उर्मी बहाद्दरांना सावध करणे एवढाच या पोस्टचा उद्देश आहे .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment