विवेकानंद स्मृतीचे करायचे काय श्रीधर तिळवे नाईक 

४ जुलै २०२६ ला विवेकानंद स्मृती प्रकाशित होऊन चार वर्षे पूर्ण होतील खुद्द विवेकानंद यांनी भारतासाठी नवीन स्मृती निर्माण करण्याची गरज १९ व्या शतकातच प्रतिपादित केली होती. स्वामी विवेकानंद हे अनेकदा पारंपारिक भाषेत पुरोगामी वाद मांडत होते त्यामुळे त्यांची ही त्या काळातली भाषा आपण या काळात समजून घेतली पाहिजे . प्रश्न असा आहे की संविधान निर्माण केल्यानंतर तब्बल ७४ वर्षांनी ही स्मृती का आणावीशी वाटली ?तिच्यामध्ये काय आहे? आणि तिचा खरोखरच या चार वर्षात काही प्रभाव पडला का? आणि अर्थातच पहिला प्रश्न स्वामी विवेकानंद यांनी स्मृती परंपरेचा वापर का केला त्यांनी थेट कॉन्स्टिट्यूशन घटना किंवा संविधान सारखा नवीन एखादा शब्द का वापरला नाही ? 

स्वामी विवेकानंद हे नेहमीच हिंदू परंपरेत वावरत होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यांची ही हिंदू परंपरा आद्य शंकराचार्य यांनी निर्माण केली होती मी अनेकदा म्हटले आहे की हिंदू धर्माचा संस्थापक शोधायचा म्हटला तर मग तो आद्य शंकराचार्य आहे असेच म्हणावे लागते या अंगाने मी एक मालिकाच लिहिली होती . प्रत्यक्षामध्ये आद्य शंकराचार्य यांनी हिंदू हा शब्द वापरला नाही तो पुढे मुस्लिम लोकांच्यामुळे प्रचलित झाला पण त्याही आधी त्यांच्या मांडणीला वेदांत किंवा उत्तरमीमांसा म्हंटले जाऊ लागले हेही शब्द आद्य शंकराचार्य यांनी वापरलेले नाहीत ते नंतरच्या शंकराचार्य यांनी त्यांच्या पुस्तकाचे संपादन करताना कधी कधी वापरलेले आहेत कारण ही मांडणी ताब्यात घेण्यासाठी ब्राह्मण लोकांच्यासाठी हे आवश्यक होते 

ब्राह्मण लोकांनी काय केले तर त्यांनी या वेदांताचे वैष्णवीकरण सुरू केले प्रत्यक्षामध्ये आद्य शंकराचार्य यांनी ज्या पंचदेवतेची पंचायतनाची पूजा सांगितलेली आहे ते पंचायतन पुढील प्रमाणे होते 

१ शिव 

२ शक्ती 

३ गणपती 

४ सूर्य 

५ स्कंद 

हे पंचायतन स्पष्ट आणि उघड पणाने शैव आहे .

नंतर आलेल्या शंकराचार्यांनी हे पंचायतन बदलले आणि सूर्य पंचायतन मध्ये आहे याचा फायदा घेऊन वैदिक धर्मामध्ये सूर्याला जी देवता दिलेली आहे त्यापैकी एक देवता विष्णू असल्याने तिचा समावेश या पंचायतनामध्ये केला आणि शक्तीमध्ये अत्यंत जाणीवपूर्वक पार्वती जितकी बाजूला काढता येईल तितकी बाजूला काढणे सुरू करून तिच्या जागी महालक्ष्मी आणि सरस्वती आणायला सुरुवात केली . हे सरळ सरळ शैवजैव-धर्माच्या विरोधात कारस्थान होते आणि ते व्यवस्थित पार पाडले गेले आणि आद्य शंकराचार्य यांच्या मांडणीचा वेदांत झाला आणि त्यामध्ये पुन्हा एकदा ब्राह्मण धर्माचा शिरकाव झाला . आजही आद्य शंकराचार्यांचा जन्म कधी झाला आहे ही साधी गोष्ट माहित नाही त्यामुळे त्यांचे आयुष्यात नेमके काय घडले हे सांगणे कठीण आहे मात्र नाव आद्य शंकराचार्य यांचे घ्यायचे त्यांना शंकराचा अवतार म्हणायचे आणि प्रत्यक्ष व्यवहारात मात्र वैदिक ब्राह्मण धर्म वैष्णव धर्म यांचा पुरस्कार करायचा असा उद्योग सर्व शंकराचार्यांनी सुरू केला. या उद्योगातूनच पुढे मग आजचा हिंदूधर्म उदयाला आला. म्हणजेच आद्य शंकराचार्य यांनी सांगितलेला हिंदू धर्म बाजूला झाला . आज सुद्धा आद्य शंकराचार्य यांनी खरोखरच स्मृतींना पाठिंबा दिला होता की नाही हे तपासून बघण्याची वेळ आलेली आहे . स्वामी विवेकानंद यांच्या काळामध्ये यासंदर्भात फारसे संशोधन नव्हते त्यामुळे साहजिकच त्यांनी आद्य शंकराचार्य यांनी स्मृती परंपरा स्वीकारली असे ब्राह्मण धर्मातून चालत आलेले गृहीतक गृहीत धरले आणि नवीन स्मृती मांडली पाहिजे अशी पारंपारिक भाषेत मांडणी केली. दुसरी एक गोष्ट याला जबाबदार होती ती म्हणजे ब्रिटिश राजवट ! ब्रिटिश राजवटीने स्वतःचे संविधान आणले होते आणि त्या संविधानानुसार राज्यही सुरू होते त्यामुळे संविधान किंवा घटना किंवा कॉन्स्टिट्यूशन हे शब्द वापरावेत की नाहीत याबद्दल स्वामी विवेकानंद यांच्या मनामध्ये संदिग्धता असणे स्वाभाविक होते कारण शेवटी ब्रिटिशांची राजवट ही परकीयांची राजवट होती आणि अनेकदा ती सुप्त ख्रिश्चन राजवट होती . त्यामुळे त्या राजवटीला त्या काळामध्ये विरोध करणे आवश्यक असल्याने साहजिकच त्यांनी संविधान किंवा घटना अशा प्रकारचा कुठला शब्द वापरला नाही वास्तविक त्यांनी जर का शैव परंपरेचा अधिक खोलात जाऊन अभ्यास केला असता तर त्यांना कळाले असते की खुद्द योगामध्ये त्याला शब्द आहे अनुशासन ! अनुशासन हा खास शब्द आहे आणि तो पतंजली यांनीसुद्धा वापरलेला आहे मुख्य शासन हे शिलतेचे ( पंचशील किंवा द्वादशशील किंवा सप्तशील पण शीलच) असायला हवे आणि त्यानुसार मग काळानुसार जी शिस्त निर्माण केली जाते ती शिस्त त्या शिस्तीविषयीचे नियम, विधी नियम आणि अधिनियम म्हणजे अनुशासन होय . नियम वैयक्तिक असतात विधी नियम म्हणजे कायदा आणि अधिनियम म्हणजे कुठल्याही घटनेच्या किंवा संविधानाच्या चौकटीत ज्या काही समस्या संस्था संघटना निर्माण होतात मग त्या शासकीय असत किंवा गैरशासकीय त्यांच्यासाठी त्यांच्यातल्या सभासदांसाठी त्या संस्थेने कायद्याच्या चौकटीत राहून निर्माण केलेले नियम म्हणजे अधिनियम होत .

स्वामी विवेकानंदांचा या शैव परंपरेशी जितका परिचय असायला हवा होता तितका परिचय नव्हता ही एक परखड वस्तुस्थिती आहे वास्तविक ते स्वतः कालीचे भक्त होते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते तरीसुद्धा त्यांनी शैव परंपरा जितकी अवगत करायला हवी होती तितकी अवगत केली नाही आणि त्याचा परिणाम त्यांच्या सर्व मांडणीवर झालेला दिसतो किंबहुना युरेशियन परंपरेपासून त्यांना मुक्त होता आले नाही ही त्यांची फार मोठी मर्यादा होती आणि ही मुळात त्यांच्या काळाचीच मर्यादा होती. हिंदू धर्मामध्ये वैष्णव धर्म आणि शैव धर्म हे दोन पंथ आहेत असे सांगणारे जे काही विचारवंत निर्माण झाले त्यामध्ये स्वामी विवेकानंद सुद्धा येतात आणि ही मांडणी जिला मी उत्तर पुरोगामी वाद म्हणतो तिची आहे . भारतामध्ये पुरोगामी वाद बसवेश्वर यांच्यापासून सुरू होतो गुरुनानक शिवाजी महाराजांच्या मुळे तो विस्तारतो आणि महात्मा फुले यांच्या मांडणीमध्ये तो सत्यशोधक होतो 

भारतातला दुसरा पुरोगामी वाद हा चक्रधर यांच्यापासून सुरू होतो त्यांचा जन्म बसवेश्वरांच्या मृत्यूच्या आसपासच होता आणि ते स्वतः शैव परंपरेत जन्मले होते निगडित होते आणि त्यांचा कृष्ण हा वैष्णव होता की शैव परंपरेतला होता हा माझ्या मते वादाचा विषय आहे . दुर्दैवाने त्यांचा नववैष्णवाद हा फारसा फोफावला नाही कारण वैष्णव वादाने जुना प्राचीन वर्ण जात वादी चेहरा ताबडतोब धारण केला चक्रधरांच्या धर्माला साईडलाईन केले किंबहुना ब्राह्मणांची जी वारकरीबाबत घाई झाली त्यात चक्रधरांचा प्रभाव वाढत होता तो कमी केला पाहिजे म्हणून सुद्धा झाली होती अनेक लोक असे समजतात की नातपंथातून किंवा चक्रदारपंथातून वारकरी पंथ निर्माण झाला आहे पण वस्तुस्थिती अशी आहे की या दोन पंथांचा प्रभाव प्रचंड वाढत चालला होता आणि तो कमी करावा म्हणून वारकरी पंथ अत्यंत जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आला आणि वाढवण्यात आला आता सुद्धा भारतातील पुरोगामी चळवळीचा प्रभाव नष्ट करण्यासाठी म्हणूनच महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला पण हे कळायला अक्कल लागते आणि ती पुरोगामी लोकांच्याकडे नाही . किंबहुना महाराष्ट्र वैष्णव बनला आणि ताबडतोब अल्लाउद्दीन खिलजी कडून पराभूत झाला.

स्वामी विवेकानंद हे या नववैष्णव परंपरेमध्ये मोडत होते का हा एक फार मोठा प्रश्न आहे माझ्या मते त्यांनी वेदांत थेट राजा राम मोहन राय यांच्यापासून जी बंगाली परंपरा निर्माण झाली तिच्यातून आत्मसात केला होता आणि प्रत्यक्ष अध्यात्मिक प्रचिती त्यांना कालीभक्त असलेल्या रामकृष्ण परमहंस यांच्यापासून झालेली होती. त्यामुळेच ते एका बाजूला वेदांत सांगत होते आणि दुसऱ्या बाजूला मात्र कालीचे भक्त होते हा वेदांत जास्तीत जास्त आद्य शंकराचार्य यांच्या वेदांताशी प्रामाणिक असावा असा त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळेच ते वर्ण जात विरोधी होते आणि म्हणूनच त्यांनी नव हिंदू धर्म निर्माण केला . या नव हिंदू धर्माची सुरुवात सुद्धा तेच वेदांच्या पासून करत होते आणि प्रामुख्याने वेदांता पासून सुरू करत होते साहजिकच स्मृती प्रमाण मानणे किंवा नवीन स्मृति निर्माण करणे असे दोन पर्याय त्यांच्याकडे उभे होते आणि त्यांनी दुसरा पर्याय निवडला पण हा पर्याय संकलित स्मृतीस्वरूपात येण्यासाठी मात्र शेकडो वर्षे लागली . भाजपला सध्या अशा प्रकारच्या नव्या स्मृतीची गरज होती आणि भाजप ही नवीन स्मृती प्रमाण मानून आधीच्या सर्व मनुस्मृति वगैरे स्मृतींना आम्ही नाकारत आहोत असे स्पष्ट सांगेल असे वाटले होते पण प्रत्यक्षात असे काहीही घडलेले दिसत नाही याचे एकमेव कारण म्हणजे भाजप हा नको तितका परंपराजडीत पक्ष आहे त्यामुळेच कसल्याही प्रकारच्या नवतावादी सुधारणा या पक्षाने आपल्या राजवटीत केल्या नाहीत अगदी हिंदू संरक्षणासाठी म्हणून जे लोक सत्तेवर आले त्यांना हिंदूंच्या रक्षणासाठी साधा ख्रिश्चन मुस्लिम लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायदा सुद्धा आणता आला नाही किंबहुना त्यांनी शक्य असून सुद्धा तो आणलेला नाही याचे कारण शेवटी भाजप हा सुद्धा मुस्लिम धार्जिणा पक्ष झालेला आहे मुस्लिम लोकांच्या नावाने फक्त शिमगा केला म्हणजे कोणी हिंदुत्ववादी होत नाही त्यासाठी मुळातच इस्लाम जसा आहे तसा मांडावा लागतो इस्लाम मधल्या पवित्र ग्रंथा मधून जे काही लिहिले गेले आहे ते सातत्याने मांडावे लागते आणि मग आम्ही का विरोध करत आहोत त्याची मांडणी करावी लागते भाजप हे मनापासून करत नाही कारण त्याला हे करायचे नाहीये हे आता स्पष्ट झालेले आहे. 

या सगळ्याचा जो परिणाम व्हायचा तो झालेला आहे तो म्हणजे विवेकानंद स्मृती निर्माण झाली परंतु भाजपने ती अडगळीत टाकलेली आहे. तिच्याविषयीचा कसलाही विचार विमर्श भाजपच्या कुठल्या शिबिरामध्ये झाला आहे असे वाटत नाही तसा जर का तो झाला असता तर भाजपने काही चार पावले पुढे टाकली असती. त्यामुळेच विवेकानंद स्मृती निर्माण झाली परंतु तिचा विस्तार झाला नाही आणि तिच्यावर जशी चर्चा व्हायला हवी तशी चर्चा सुद्धा झाली नाही याला एक कारण म्हणजे ही स्मृती संस्कृत मध्ये निर्माण करण्यात आलेली आहे आणि तिचे अनुवाद दिलेले आहेत वास्तविक ज्या भाषेत विवेकानंद बोलले आहेत त्याच भाषेत म्हणजे प्रामुख्याने इंग्लिश आणि बेंगाली ती निर्माण व्हायला हवी होती त्यामुळे ती कदाचित अधिक लोकांच्या प्रसरण पावली असती. असो .

ही सर्व कारणे कार्यान्वित होती म्हणूनच गेल्या चार वर्षात विवेकानंद स्मृतीचा कसलाही परिणाम भारतीय जनमानसावर झालेला आहे असे वाटत नाही. 

यात आणखी एक फॅक्टर असा आहे की अचानकपणे स्वामी विवेकानंद हे हिंदुत्ववादी लोक ताब्यात घेत आहेत हे लक्षात आल्यानंतर पुरोगामी लोकांनी स्वामी विवेकानंदांना हिंदुत्वविरोधी ठरवायला सुरुवात केली आणि ते कसे हिंदूवादी परंपरेत होते हे सांगायला सुरुवात केली आता यामध्ये तथ्य आहे की नाही हा एक फार मोठा वादाचा प्रश्न होऊन बसलेला आहे पण कळत नकळत भाजपला विवेकानंदांचे आता करायचे काय असा प्रश्न नक्की पडलेला आहे. विवेकानंद कधीही कुठेही हिंदुत्व शब्द वापरत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. मात्र ते हिंदू हा शब्द सातत्याने वापरतात आणि तो ते प्रामुख्याने शैव आणि वैष्णव यांच्यासाठी वापरतात . मुख्य म्हणजे त्यांच्या हिंदू या शब्दांमध्ये जुदाइक धर्मांचा समावेश होतो की नाही हा फार मोठा प्रश्न आहे बहुदा तो होत नाही त्यांच्या नव हिंदू धर्मामध्ये शाक्त सुद्धा एक वेगळा संप्रदाय म्हणून पुढे केला गेला आहे जे अत्यंत चुकीचे आहे .शाक्त हा मुळापासूनच शैव आहे आणि शैव लोकांच्यात फूट पाडण्यासाठी म्हणून वैष्णव लोकांनी हा जाणीवपूर्वक नवीन संप्रदाय म्हणून निर्माण केला . काहीही करून शैव धर्म स्वतंत्र म्हणून टिकू द्यायचा नाही त्याला गिळून टाकायचे असा हा डाव आहे गेली हजार वर्षे आद्य शंकराचार्य यांच्या नावाखाली हा सर्व प्रकार सुरू झालेला आहे आणि नेहमीप्रमाणे बहुजन समाज झोपलेला असल्याने त्याला काही यातले कळत नाही . त्याला मुळात युरेशियन ब्राह्मण असलेल्या लोकांचे काय कारस्थान चाललेले असते तेच कळत नाही. या युरेशियन ब्राह्मण असलेल्या लोकांनी प्रथम ब्राह्मण धर्म स्थापन करून वैदिक धर्म संपवला मग वैष्णव धर्म स्थापन करून जैन आणि बौद्ध धर्म संपवले आणि नंतर हिंदू धर्म स्थापन करून वेदांत म्हणजेच मूळचा ब्रह्म सांख्य धर्म आणि इथल्या इंडियन लोकांचा शैव धर्म संपवायला सुरुवात केली अजूनही यांना पूर्ण यश आलेले नाही पण यांचे प्रयत्न सुरूच आहेत. याच लोकांनी युरोपमध्ये मूळ ख्रिश्चन धर्म संपवून रोमन ख्रिश्चन धर्म स्थापन केला . याच रोमन ख्रिश्चन धर्माने आणि या धर्माचा प्रभाव पडून निर्माण झालेल्या इस्लाम धर्माने आफ्रिका आणि अमेरिका या खंडातले स्थानिक धर्म आणि श्रद्धा संपवल्या .

स्वामी विवेकानंद या सर्व युरेशियन प्रभावातून मोकळे झाले नाहीत वास्तविक त्यांच्या रामकृष्ण परमहंस या गुरुने स्पष्ट आणि स्वच्छपणाने त्यांना नवीन धर्म स्थापन करण्याचा आदेश दिला होता . मूळ सत्य मूळ वेदांत जो शैवश्रुती प्रेरित ब्रह्म सांख्य धर्म होता त्याचा प्रचार करण्याचा आदेश दिला होता हा आदेश स्वामी विवेकानंद यांना मरणापूर्वी व्यवस्थित लक्षात आला होता आणि त्यामुळेच मग शेवटी शेवटी ते भारताचा मुख्य देव शिव आहे असे प्रतिपादन करू लागले . वर्ण जात व्यवस्थेला कट्टर विरोध करू लागले . त्यांच्या या प्रतिपादनानंतरच बंगालमध्ये त्यांना मिळणारा ब्राह्मण लोकांचा पाठिंबा कमी होत गेला त्यांना पैसे मिळेनासे झाले मुख्य म्हणजे ते ब्राह्मण नाही कायस्थ असल्याने शूद्र आहेत असा मोठा प्रचार सुरू झाला . शिकागोच्या परिषदेमध्ये सुद्धा ते कायस्थ आहेत ब्राह्मण नाहीत म्हणून त्यांना धर्मावर बोलण्याचा अधिकार नाही अशीच भूमिका घेण्यात आली होती. 

विवेकानंदांच्यावर पडलेला जो काही राजा राम मोहन राय यांचा प्रभाव आहे तो अनेकांना दिसत नाही यातील सर्वात मोठा प्रभाव हा मुस्लिम राजवटीचा होता . राजा राम मोहन राय हे स्पष्ट आणि स्वच्छपणाने मुस्लिमधार्जिणे होते स्वामी विवेकानंद यांनी नंतर राजाराम मोहन राय यांना विरोध केला असला तरी त्यांच्या मुस्लिम विषयक धोरणाचा प्रचंड मोठा प्रभाव विवेकानंद यांच्यावर पडलेला दिसतो मुख्य म्हणजे इस्लाम मध्ये बंधुता आहे हा त्यांचा झालेला गैरसमज ! त्यांना हे माहीतच नव्हते की इस्लामने गुलामगिरी स्वीकारलेली आहे आणि इस्लामच्या दृष्टिकोनातून हिंदू हे गुलाम आहेत किंबहुना हिंदू म्हणजे गुलामच असा मुस्लिम लोकांच्या दृष्टीने अर्थ आहे. आता गुलामगिरी स्वीकारणारे लोक कसे काय बुवा समतेचे आणि बंधुतेचे प्रतिक असतात ? प्रत्यक्ष सुन्नी आणि शिया यांच्या संघर्षामध्ये सुद्धा दोघे मुस्लिम असले तरी सुन्नी लोक काय करतात हे स्पष्ट आहे जे लोक पैगंबरांच्या नातेवाईकांना सोडत नाहीत ते इतर मुस्लिमांना सोडतील हा भ्रम आहे. मुस्लिमांच्या मध्ये बंधुता असती तर मुस्लिम राजवटींच्या मध्ये राज्य मिळवण्यासाठी भावा-भावांच्या इतक्या मारामाऱ्याच झाल्या नसत्या. खुदा महंमद पैगंबर यांच्या काळामध्ये इतक्या लढाया आणि आपापसातल्या मारामाऱ्या झाल्या नसत्या . अनेकदा तर खुद मोहम्मद पैगंबर यांनीच मारण्याचा आदेश दिलेला आहे. वस्तुस्थिती अशी आहे की हिंदू धर्म असो किंवा इस्लाम असो दोघांचाही बंधूतेशी काडीचाही संबंध नाही . दोघांनाही गुलामगिरी मान्य आहे . ( शैव लोकांच्या मात्र गुलामगिरीला विरोध आहे कारण मुळात हा धर्म जेव्हा निर्माण झाला तेव्हा गुलामगिरीची प्रक्रियाच अस्तित्वात नव्हती त्यामुळे तिचे समर्थन करण्याचा प्रयत्न कधीच उद्भवला नाही उलट गुलामगिरी चा नेहमीच विरोध करण्यात आलेला आहे ) त्यामुळे या संदर्भात इस्लाम बाबत बंधुतेचा खोटा भ्रम बाळगणे ही जी राजा राम मोहन राय यांनी पुरोगामी परंपरा सुरू केली तीच विवेकानंद यांनी जारी ठेवली पण आपले नशीब म्हणायचे की विवेकानंद यांनी कधीही गुलामगिरीचा पुरस्कार केला नाही त्यांनी सातत्याने सर्व प्रकारच्या गुलामगिरीचा निषेधच केला त्यामुळे स्वामी विवेकानंद यांनी जी काही शिस्त दिली ती निर्विवादपणे बंधुता सांगणारी होती प्रश्न असा आहे की ही स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेली बंधुता स्वीकारायची हिंदुत्ववादी लोकांची तयारी आहे का की त्यांना पुन्हा वर्ण जात व्यवस्थाच आणायची आहे ?

विवेकानंद स्मृतीचा झालेला परिणाम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष भागवतांच्या वर आहे का? तर तशी शक्यता बरीच दिसते . जर का भागवतांच्या दिशेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वाटचाल करेल आणि मुख्य म्हणजे आपल्या ब्राह्मणी हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या अनुयायांना भागवत आणि नंतरचे संघचालक विवेकानंद यांची बंधुता समजावून सांगतील तर मग कदाचित असे म्हणता येईल की विवेकानंद स्मृती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वीकारली भागवतांच्या भाषणामध्ये असे नेहमी आढळते आणि काही प्रमाणात असे वाटते खरे पण प्रत्यक्ष आचरणाच्या पातळीवर अजूनही हे सर्व काही जितके अमलात यायला हवे होते तितके अंमलात आलेले नाही . विवेकानंद स्मृती ही जर का हिंदुत्वाचे भविष्य असेल तर सध्या तरी तिला विरोध करण्याचे काही कारण नाही. काही ठिकाणी ऑब्जेक्शन्स आहेत ती मात्र सतत नोंदवली पाहिजे स्वामी विवेकानंद यांना काळाच्या पडलेल्या मर्यादा स्पष्ट आहेत त्या आपण सातत्याने मांडल्या पाहिजेत मात्र माझे स्वतःचे स्पष्ट मत असे की याचे नाव विवेकानंद स्मृती असे ठेवण्यापेक्षा विवेकानंद अनुशासन असे ठेवावे म्हणजे काळाच्या ओघात तिच्यात सुद्धा बदल करता येतील अन्यथा पुन्हा एकदा नवीन साचलेपणा येणे अटळ आहे हिंदुत्व ही एक सतत उत्क्रांत होणारे गोष्ट आहे की डबके करणारी गोष्ट आहे हे स्वतः हिंदुत्ववादी लोकांनीच ठरवायचे आहे माझ्या मते हिंदुत्व वाद हा सतत उत्क्रांत होणारा वाद आहे आणि त्याच्यात नवीन नवीन बदल सामावून घेतले जातात पण हे बदल खूप सावकाश होतात आणि हा वेग परवडणारा नाही. कारण समोरच्या इस्लामचा वेग संघटित करण्याचा वेग तुमच्या वेगापेक्षा किमान दहा पट आहे 

श्रीधर तिळवे नाईक 


Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती