महात्मा फुले ह्यांचे कलाशास्त्र श्रीधर तिळवे नाईक 

मराठीचे मध्ययुगीन धर्म व मोक्षकेंद्री काव्यशास्त्र मराठी मानसावर आजही वर्चस्व गाजवत असले तरी ते हळूहळू कालबाह्य होत जाणे अटळ होते इंग्रज आले आणि स्वतःसोबत एक अर्वाचीन काव्यशास्त्र घेऊन आले हे काव्यशास्त्र आयडिआलॉजीवर आधारित होते अलबर्ट दि ग्रेट ,रॉजर बेकन निकोलोय मॅकायव्हली ह्यांचा निसर्गप्रमाण्यवाद फ्रान्सिस बेकन ह्याचा इंद्रियप्रामाण्यवाद हे त्याची सुरवात होती देकार्तचा बुद्धिप्रामाण्यवाद हा विस्तार होता तर लॉकचा अनुभवप्रामाण्यवाद हा कल्मिनेशन होता हे सगळेच निसर्गदेहप्रामाण्यवादी होते देकार्त हा ह्यांच्यातील बुद्धिप्रामाण्यवादी होता तर इतर इंद्रियप्रामाण्यवादी जास्त होते 

मोक्षतेचे तीन अविष्कार असतात 

१ उदासीन मोक्षता ह्यात मोक्ष मिळाला संपले अशी मोक्षकाची धारणा असते 

२ मोक्षकेंद्री मोक्षता ह्यात मोक्षक फक्त स्वतःचा मोक्ष बघत नाही तर इतरांनाही मोक्ष मिळावा म्हणून धडपड करतो त्यासाठी धर्मावर धार्मिक मानसिकतेवर हल्ले करतो उदा तुकाराम 

३ समाजसुधारणाकेंद्री मोक्षता ह्यात मोक्षक फक्त स्वतःचा मोक्ष बघत नाही तर इतरांनाही मोक्ष मिळावा म्हणून धडपड करतो त्यासाठी धर्मावर धार्मिक मानसिकतेवर हल्ले करतो पण त्याबरोबरच संपूर्ण समाजरचनाच अडथळा आहे हे लक्षात येताच तो प्रस्थापित समाजरचनेच्या विरुद्ध उभा ठाकतो उदा बसवेश्वर 

शैव मोक्षता सुधारणाकेंद्री मोक्षतेला प्राधान्य देते ही समाजसुधारणाकेंद्री मोक्षता हे बसवेश्वरांचे भारतीय परंपरेला सर्वात मोठे योगदान आहे बसवेश्वरांच्या ह्या समाजसुधारणाकेंद्री मोक्षतेला इंग्रजांच्या आगमनानंतर अचानक चांगले दिवस आले आणि राजा राममोहन रॉय ह्यांनी ती स्वीकारली व नवा वेदांत स्थापन केला ज्याचा प्रभाव थेट स्वामी विवेकानंदांच्यावर पडला महाराष्ट्रात न्यायमूर्ती रानडेंना संतांच्या कार्याची मर्यादा माहित होती म्हणूनच त्यांनी आपल्या आपल्या संप्रदायाला भागवत न म्हणता नवभागवत संप्रदाय म्हंटले आहे कारण त्यांनाही आता समाजसुधारणाकेंद्री मोक्षता हवी आहे फुले ह्यांचा मोक्षावर विश्वास न्हवता आणि असेल तर तो त्यांनी ठामपणे व्यक्त केलेला नाही मात्र फुल्यांचा धार्मिक पिंड सुटला नाही त्यांनी एकीकडे देशीवादी शैव धर्माचा आग्रह धरला तर दुसरीकडे मार्गीवादी सत्यशोधक समाज स्थापन केला ज्याचे स्वरूप प्रोटेस्टंट ख्रिश्चन धर्मासारखे होते 

१ सत्याने सुख प्राप्त होते आणि सत्यधर्माचे आचरण न केल्यास दुःख प्राप्त होते हा ज्योतीबांच्या अखंडाचा पाया आहे 

२सर्व माणसाचे सुख साधणे हा त्यांच्या सार्वजनिक सत्यधर्माचा पाया आहे 

३ सर्व स्त्रीपुरुष जन्मतः स्वतंत्र असून निर्मिकाने त्यांना मानवी अधिकाराचे धनी म्हणून जन्मास घातले आहे 

४ ज्या वस्तू निर्मिकाने उपभोगासाठी जन्माला घातल्या आहेत त्यांचा निर्मिकाविषयी कृतज्ञता बाळगून उपभोग घेणे आणि इतरांनाही तसा उपभोग घेऊ देणे , 

५ कुणाही प्राण्याला निरर्थक त्रास न देणे 

६ कुणाही माणसाचे हक्क त्याचे धार्मिक व राजकीय स्वातंत्र्य हिरावून न घेणे त्यासाठी बळजबरी न करणे 

७ निर्मिकाच्या जागी एखाद्या मूर्तीची स्थापना करून तिची देव म्हणून पूजा न करणे कुठल्याही देवाचे नामस्मरण न करणे व निर्मिकाचेही पोकळ नामस्मरण न करणे , 

८ प्रत्येक नवऱ्याने आपली बायको व प्रत्येक बायकोने आपला नवरा वजा करून इतर सर्वांशी बहीण भावंडांप्रमाणे वर्तन करणे 

९ विचारस्वातंत्र्य व अविष्कारस्वातंत्र्य ही निर्मिकाकडून लाभल्याने त्यांची कदर करणे , 

१० श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद न करणे व सर्वांना समान मानणे 

११ ज्ञानप्राप्तीचा अधिकार प्रत्येकाला असणे व प्रत्येक व्यक्तीला तिच्या योग्यतेप्रमाणे समाजात पदप्राप्ती व स्थानप्राप्ती होणे व तिला तशी संधी असणे प्रत्येक पदार्थाचे ज्ञान वैज्ञानिक ज्ञान प्राप्त करणे 

१२ सर्वांसाठी समान न्याय , समान अधिकार व समान दर्जा असणे 

१३ श्रमाला प्रतिष्ठा असणे रात्रंदिवस मेहनत करणे 

ही फुल्यांच्या सार्वजनिक सत्यधर्माची तत्वे आहेत आणि ती मोक्षतेचीही तत्वे आहेत हे सांगण्याचे कारण ज्योतिबा फुले कोणत्या नैतिकतेचा आग्रह धरत होते ते सांगणे हे आहे कारण ही नैतिकता त्यांच्या काव्यशास्त्राचा आत्मा आहे ह्याशिवाय 

१४ प्रत्येकाने आपल्या आईवडिलांचा म्हातारपणी सांभाळ केला पाहिजे व 

१५ प्रत्येकाने दीनदुबळ्यांना मदत केली पाहिजे 

१६ इहलोक हाच एकमेव लोक आहे स्वर्ग नरक अस्तित्वात नाहीत 

१७ राजा व राज्य न्याय करणारे असेल तर त्याविरुद्ध बंडाळी न करणे 

असे ते म्हणत 

मराठीचे सहावे कलाशास्त्र हे ज्योतिबा फुले ह्यांच्या सार्वजनिक सत्यधर्माची ही समाजसुधारणकेंद्री मोक्षता आणि युरोपियन निसर्गदेहप्रामाण्यता विशेषतः जॉन लॉक ह्यांच्या डायलेक्टिल नात्यातून जन्मले ही निसर्गदेहप्रामाण्यता हवेतून जन्मली न्हवती तिचा एक इतिहास होता आपण तो थोडा कलाशास्त्रावर भर देऊन थोडक्यात समजून घेऊ 

युरोपमध्ये अलबर्टीने व रॉजर बेकनने एम्पीरिकल नॅचरल फिलॉसॉफी मांडून निसर्ग हा धर्माच्या व मानवजातीच्या केंद्रस्थानी आणला पाहिजे व निसर्गविज्ञानांना महत्व दिले पाहिजे हा सिद्धांत मांडला कोपर्निकस क्रांतीने धर्म स्वर्ग नरक नाकारून सूर्यकेंद्री निसर्ग व मनुष्य केंद्रस्थानी आणले साहजिकच कवीकलावंत हा आता धार्मिक राहिला नाही तो इहलौकिक झाला सुरवातीला ग्रीकांचे मायमेसिस चे मॉडेल जे कलाकृती ही निसर्गाचे इमिटेशन आहे असं मानत होती फॉलो केले गेले कारण लिओ अलबर्टीने ऑन पेंटिंग (१४३५)ह्या ग्रंथात त्याचा केलेला स्वीकार ! कलेत नैसर्गिक परिणाम आणणे व नैसर्गिक वास्तवाचा शोध घेणे हा त्याच्या मते कलेचा उद्देश होता लिओनार्ड व्हिन्सीने तर पेंटिंगला निसर्गविज्ञानाची शाखा मानले त्याच्या मते कला ही निसर्गाचा आरसा आणि आत्म्याची खिडकी होती पुढे लिओनार्डला कलावंताने त्या निसर्गात तो स्वतःही निसर्गाचा भाग असल्याने स्वतःचा आत्मा स्वतःचे इंटरप्रिटेशन कलेत ओतणे आवश्यक वाटू लागले एकीकडे व्हिन्सी निसर्गवादाचा भाग म्हणून ऍनाटॉमी अभ्यासत होता तर दुसरीकडे हा अनाटॉमीकल गणितीय भौमितिक निसर्ग कलेत पेलतही होता फुले निसर्गकेंद्री इहलौकिकवाद स्वीकारतात त्याच्यामागे हा निसर्गवाद आहे जो जॉन लॉकने आत्मसात केला होता 

ह्याच काळात व्यापारवादाच्या व बाल्यावस्थेत असलेल्या भांडवलवादाच्या फायद्यातून एक बुर्जव्हा वर्ग उदयाला आला आणि त्याला फॉलो करणारा एक पेटी बुर्झवा वर्गही ! ह्या वर्गात राजे महाराजे होते सरंजामदार होते तसे नव्याने श्रीमंत झालेले व्यापारी होते मात्र त्यांच्या जीवनाच्या केंद्रस्थानी बुरसटलेली धार्मिक श्रद्धा न्हवती तर धर्माचे वैयक्तिक वाचन होते त्याला नव्या ज्ञानाचे जग एक्स्प्लोर करण्याची तमन्ना होती समुद्र हाका देत होता जहाजे पोहचत होती बुडत होती ह्या वर्गाची गरज भागवण्यासाठी राफेल(१४८३ -१५२०)सारख्या लोकांनी अनेक असिस्टंट्सकडून काम करून घेऊन त्यातून एक कलाकृती निर्माण करण्याचा एक व्यापार सुरु केला एका अर्थाने तो पहिला आर्ट डायरेक्टर होता ह्या प्रोसेसमुळं पेंटिंग महत्वाकांक्षी झालं आणि त्याचे स्केल आणि प्रोपोशन कित्येक पटीने वाढले 

Giorgio Vasari (१५११ ते १५७४) च्या The Lives of the Most Excellent Italian Architects, Painters and Sculptors ह्या १५५० साली आलेल्या पुस्तकाने कलावंताच्या चरित्रलेखनाची एक नवी परंपरा सुरु केली ह्या पुस्तकाने कलावंताचे वैयक्तिक व सामाजिक भावन अधोरेखित करून नव्या कलेला लिबरल आर्ट बनवले मुख्य म्हणजे कलावंताची ओरिजिनॅलिटी आणि क्रिएटिव्हिटी ह्यांची बंद पडलेली चर्चा ह्या ग्रंथाने पुन्हा ओपन केली कलावंतांच्याविषयी आकर्षण आणि गूढही निर्माण केले 

एका अर्थाने युरोपात गटेनबर्गने सुरु झालेल्या छापील क्रांतीचे व त्यामुळे सर्वदूर अवतरत असलेल्या ज्ञानयुगाचे हे फळ होते छापीलतेने इंटिग्रेट केलेले ज्ञान सर्वदूर पसरत चालल्याची ही निशाणी होती कलावंत ह्या नव्या कलेचा गॉड होता कारण तो क्रियेटर होता विषय धार्मिक असले तरी त्यांना नव्याने प्रोड्युस करणे सुरु झाले होते हे जग गॉड आणि किंग ह्यांचे होते अल्बेर्तीने १४३५ मध्ये म्हंटल्याप्रमाणे “The function of the painter is to draw given bodies in such a way that at a fixed distance and with a certain position what you see represented appears to be in relief and just like those bodies.” त्याचा व राज्यसत्तेच्या सर्वद्रष्टा डोळा आता प्रत्येक तपशिलावर वॉच ठेवणार होता 

निसर्गवादाचा सर्वाधिक प्रभाव पडला तो विल्यम शेक्सपियरवर विशेषतः निकोलाय मॅकियावलीचा निसर्गवाद शेक्सपियरवर प्रचंड प्रभाव टाकून गेला निकोलायने माणसाचे स्वरूप जे सांगितले ते कमालीचे वास्तववादी होते स्वार्थ , कारस्थाने , लोभ ह्यांनी भारला गेलेला वा त्यात फसला गेलेला मानवी स्वभाव ह्यांचे त्याने प्रिन्स ह्या ग्रंथात केलेले समर्थन व वर्णन शेक्सपियरच्या नाटकाचा आत्मा आहे निसर्गवाद शेक्सपियरने पर्सनल केला आणि प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे एक नेचर असते नैसर्गिक स्वभाव असतो हे गृहीत धरून त्याने माणसे नैसर्गिक स्वभावासकट उभी केली आणि त्यांचा हा नैसर्गिक स्वभावच त्यांच्या शोकांतिकेचे मुख्य कारण म्हणून दाखवले शेक्सपियरने आपल्या नाटकासाठी फक्त मार्गी कथा वापरल्या नाहीत तर स्वतःच्या व इतर देशातील अनेक कथांचा त्याने प्लॉट म्हणून वापर केला 

फुल्यांनी हा शेक्सपियरचा पर्सनल निसर्गवाद स्वीकारला नाही मानवी दुःखाचे मूळ मानवाच्या स्वभावात आहे हे त्यांना मान्य होणे शक्यच न्हवते त्याऐवजी ते ब्राह्मणी व्यवस्थेला बहुजन माणसाच्या दुःखाचे मूळ मानत होते त्यामुळे त्यांच्या काळात शेक्सपियरचा गाजावाजा सुरु होऊनही त्याचा कसलाही प्रभाव त्यांच्यावर पडलेला नाही त्यामुळेच नाट्यरचनेची रेखीवता त्यांना उमगलेली न्हवती . किंबहुना फुल्यांची कलाकृतीच्या सौंदर्यशास्त्राविषयीची बेफिकिरी पुढे बहुजनवादी साहित्याची सर्वात मोठी दुबळी जागा बनली असे आता दिसते 

 भारतात इंग्रज आले ते प्रथम व्यापारी साम्राज्यासाठी व नंतर बनले सर्वांगीण साम्राज्यकर्ते ! ते भारतीयांच्याकडे गुलाम नागरिक म्हणूनच जास्त बघत होते त्यांच्या दृष्टीने ग्रीकांच्या कॉलन्या असायच्या तशा ह्या कॉलन्या होत्या साहजिकच त्यांच्याबरोबर ते त्यांचीअर्वाचीन कलाशास्त्रेही घेऊन आले आणि सिलॅबसमार्फत त्यांनी ती एतद्देशीयांच्यावर लादली युरोपमध्ये ह्या काळात 

१ निसर्गप्रमाण्यवादी 

२ इंद्रियप्रामाण्यवादी 

३ बुद्धिप्रामाण्यवादी 

४ अनुभवप्रामाण्यवादी 

अशी चार कलाशास्त्रे सुरवातीला होती त्यातील रॉजर बेकनचा निसर्गप्रमाण्यवाद फ्रान्सिस बेकनचा इंद्रियप्रामाण्यवाद व लॉकचा अनुभवप्रामाण्यवाद हा इंग्लंडच्या मातीत रुजला मात्र बुद्धिप्रामाण्यवाद रुजला न्हवता साहजिकच त्याचा आगरकर वगळता फार प्रभाव रुजला नाही ज्याला आज आपण सायंटिफिक मेथड म्हणतो ते निसर्गवाद व इंद्रियप्रामाण्यवाद ह्यांचे अपत्य आहे 

ह्यातील निसर्गप्रमाण्यवादाला चित्रकलेत लॅण्डस्केप व स्टील लाईफच्या रूपाने प्रचंड प्रतिसाद मिळाला आबालाल रहमान हे ह्या बाबतचे उत्तम उदाहरण साहित्यात निसर्गकवितेच्या नावाखाली कृतक कविताच जास्त झाल्या अपवाद सावित्रीबाई फुल्यांची चाफ्यावरची कविता सावित्रीबाईंच्या कवितेवर मी स्वतंत्र लेख लिहिल्याने अधिक लिहीत नाही 

प्रश्न असा कि ह्या कृतक निसर्गवादाचे कारण काय ? ह्याचे कारण उथळ अनुकरणवाद होय . ब्रिटशांनी ग्रीक रोमन ह्यांचे अनुकरण केले तसे आपण संस्कृत वा ब्रिटिश साहित्याचे व काव्यशास्त्राचे अनुकरण केले कि काम भागेल असा ब्राम्हणांचा अंदाज होता साहजिकच १९ व्या शतकात अनुकरणाचे काव्यशास्त्रच जास्त प्रसार पावले काहींनी संस्कृत काव्यशास्त्राऐवजी शेक्सपिअर आदी आदर्श ठेवले मुळात इंग्रजांची वैचारिक ताकद आत्मसातच केली गेली नाही ह्याला अपवाद फक्त फुले होते कारण फुल्यांची भूमिका गोंधळलेली न्हवती पेशवाई नको हे त्यांना स्पष्ट होते आणि ज्याची इंद्रियांना प्रचिती तेव्हढेच खरे मानायचे अशी त्यांची इंद्रियप्रामाण्यवादी निष्ठा होती 

फ्रान्सिस बेकनने स्पष्ट व योग्य पद्धतीने विचार करायचा असल्यास चार प्रकारच्या मूर्तिकरणाचे मूर्तिभंजन आवश्यक म्हणून सांगितले होते ज्योतिबा फुले ह्यांनी ते केलेले दिसते माणसाला योग्य व स्पष्ट विचार करण्यास आडकाठी करणारी ही चार मूर्तीकरणे पुढीलप्रमाणे 

१ मानवजातीचे मूर्तिकरणं : माणूस एक रेस म्हणून त्याच्या नैसर्गिक मर्यादांनी व इंद्रियांनी बद्ध आहे अनेकदा तो तेच बघतो जे त्याला बघायचं आहे त्यामुळे इंद्रिये अनेकदा चुकीच्या पद्धतीने वास्तव पाहतात 

२ संस्काराचे मूर्तिकरण : माणूस अनेकदा खोलवर त्याच्यावर झालेले संस्कार वहात असतो आणि संस्कार व्यक्तिगत असतात अनेकदा आपण वैयक्तिक हितसंबंधांनी पछाडलेले असतो आणि हे पछाडणे व संस्कार ह्यांच्यामुळे वास्तव जसे आहे तसे आपण पहात नाही 

३ बाजाराचे मूर्तीकरण माणूस अनेकदा पब्लिकमध्ये योग्य अभिव्यक्ती वापरत नाही आणि आपण त्या कम्युनिकेशनचे भाग असू तर आपण चुकीचे ग्रहण करतो त्यातून सत्याचे व वास्तवाचे आकलन होत नाही 

४ नाट्यगृहाचे मूर्तीकरण अनेकदा आपल्याकडे जग असे आहे तसे आहे ह्याचे नाट्यमय प्रस्तुतीकरण केले जाते ते इतके प्रभावी असते कि आपण ते स्वीकारतो प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र वेगळी असते 

ही चारी प्रकारची मूर्तीकरणे आपणाला वास्तवाचे आकलन देत नाही हे बेकनचे म्हणणे होते आणि फुल्यांना व्हाया थॉमस पेन हे मान्य होते त्यामुळेच फुल्यांचे काव्यशास्त्र ह्या चारही प्रकारच्या मूर्तीकरणाचे भांडाफोड करायला सांगते आणि ह्या भांडाफोडीनंतर जे सत्य हाताशी लागते त्याला कलेत सादर करण्याचा आग्रह धरते 

साम्राज्यवादाचा सर्वात मोठा तोटा म्हणजे पराजित माणूस जेत्यांना देव समजतोच पण आपल्या पराजयाचे खापर तो आपल्यातीलच कुणावर तरी फोडतो फुल्यांचे असे काही झाले का हा प्रश्न अलीकडे वारंवार उपस्थित होतो आणि त्याला प्रतिवाद म्हणून इमोशनल उत्तरे दिली जातात वास्तविक हा काही फक्त फुल्यांचा प्रश्न नाही जिथे जिथे कलोनायझेशन झाले तिथल्या सर्वच समाज सुधारकांचे कितपत वसाहतीकरण झाले होते कुणी ते कितपत टाळले कोण ते टाळू शकले हे चिकित्सेचे प्रश्न आहेत ब्राह्मणेतरही ब्राह्मणांच्या प्रमाणे चिकित्सा टाळणार असतील तर त्यांच्यात आणि ब्राह्मणेतरांच्यात फरक काय राहिला फुल्यांसाठी ब्रिटिश राजा हा किंग होता व त्याचा गॉड हा निर्मिक होता इंग्रजांची राजवट ही देवाची योजना होती त्यांचे काव्यशास्त्र हे ब्राह्मणेतरांचे ज्यांना ब्राम्हण शूद्र म्हणत बंड होते अशाप्रकारचा विद्रोह कर्नाटकात कित्येक शतके आधी बसवेश्वरांनी केला होता तरीही त्याचा प्रभाव दक्षिण महाराष्ट्र वगळता उर्वरित महाराष्ट्रात अल्प पडला प्रश्न असा आहे कि फुल्यांना परकीय राजवट पेशव्याच्या राजवटीपेक्षा चांगली का वाटली ? कारण उघड आहे ही राजवट भीषण होती तिने मनुस्मृतीचे पुनर्जीवन केले अशी राजवट कोसळल्याबद्दल आनंद व्यक्त होणे स्वाभाविक पण ही राजवट कोसळवून त्या जागी बहुजन समाजाची एतद्देशीय राजवट आणावी असे फुलेंना का वाटले नाही? अशी राजवट खुद्द शिवाजी महाराजांनीच निर्माण केली होती फुलेंना शिवाजी महाराज व्हावेसे का वाटले नाही ? कुठे ना कुठे तरी बहुजन समाजाचा आत्मविश्वासच ढळला होता आणि फुले त्यांचे प्रतिनिधित्व करत होते काय ? कि इंग्रज केवळ राज्य निर्माण करत नसून ते नवीन व्यवस्थांचे जाळे निर्माण करत आहेत असं त्यांना वाटलं ? फुल्यांची राजकीय गुलामगिरी स्पष्ट दिसते पण पेशव्यांच्या समग्र गुलामगिरीपेक्षा ब्रिटिशांची राजकीय गुलामगिरी परवडली असा त्यांनी विचार केला तर ते चूक मानता येईल का ?

फुल्यांच्या मते कलेचे मुख्य उद्देश पारंपरिक धर्माला आव्हान देणे समाजसुधारणा करणे त्यासाठी लोकांना उद्युक्त करणे हे आहे गाहासत्तसईचे काव्यशास्त्र वास्तवाचे वर्णन करून थांबते फुले वास्तव कलेद्वारे बदलू पाहतात त्यातील शोषण दाखवून देतात फुले कळत नकळत कलावंताला समाजाची वा जगाची अनुकृती बनवायला सांगतात आणि हा अनुकृतीचा प्रयोग समाजसुधारणेच्या दिशेने जायला पाहिजे असा आग्रह धरतात फुल्यांचे काव्यशास्त्र हे ज्ञानकेंद्री व विचारकेंद्री आहे एखादी कलाकृती सुधारणावादी विचार मांडते कि नाही हे त्यांच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे जर कलाकृती प्रतिगामी विचार मांडणारी असेल तर त्यांचा तिला पाठिंबा नाही ह्याउलट पुरोगामी विचार मांडणारी कलाकृती ओबडधोबड असली सौंदर्यशून्य असली तरी फुल्यांचे काव्यशास्त्र तिला सुंदरच मानते ह्यामुळे मराठीत फार मोठे अनर्थ नंतरच्या काळात निर्माण झाले आहेत वर्तमानपत्रे आणि कला ह्यांच्यातील फरकच अनेकांना कळलेला दिसत नाही 

फुल्यांच्या काव्यशास्त्राची ही फार मोठी मर्यादा आहे 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय