कॉक्रोच जनता पार्टी , भारतीय जनता पक्ष ,वर्ग , आणि शिक्षण श्रीधर तिळवे नाईक
सर्वसाधारणपणे जगामध्ये अनेकांची अशी समजूत असते की एकरेषीय वर्गजालना समाजात अस्तित्वात आहे पण प्रत्यक्षामध्ये असे कधीच नसते प्रत्येक युग स्वतःची वर्गजालना (class netology)घेऊन आलेले दिसते.
आदिम युगामध्ये स्त्री आणि पुरुष एवढे दोनच वर्ग होते पुढे श्रद्धा युगामध्ये माणसाला वाढीची जाणीव झाली आणि माणसाच्या वाढीनुसार १ बाल२ कुमार ३ तरुण ४ प्रौढ ५ वृद्ध असे पाच वर्ग उदयाला आले त्यानंतर आलेल्या मोक्षयुगात गृहस्थ आणि संन्यासी असे दोनच वर्ग निर्माण झाले त्याचा सर्वोच्च आकार आपणाला मोक्ष युगानंतर धर्म युगानंतर आलेल्या धम्मयुगात बौद्ध धर्मात दिसतो जगात सर्वत्रच महाश्रद्धा व धर्मयुगात पुरोहित ,शासक, व्यापारी, सेवक आणि गुलाम असे स्पष्ट पाच वर्ग उदयाला आले आणि प्रत्येक धर्माने (अपवाद फक्त शैव) गुलामगिरीचे समर्थन केलेले दिसते यानंतर आलेल्या वैज्ञानिक युगात मात्र अनेक वर्ग निर्माण झालेले दिसतात त्यात प्रामुख्याने ज्ञानीक ,सामाजिक, आर्थिक, राजकीय वर्गीकरण केंद्रस्थानी आलेले दिसते . प्रत्येक वर्गाची एक व्यवस्था निर्माण झालेली दिसते उदाहरणार्थ शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी वर्ग यांच्यातून निर्माण झालेला शैक्षणिक वर्ग ज्यामध्ये संस्थाचालक आणि सरकार पण येते काही समाजवादी लोकांनी भांडवलदार मध्यमवर्ग आणि श्रमिक अशी वर्ग व्यवस्था मांडलेली आहे आणि ती प्रामुख्याने आर्थिक वर्ग व्यवस्था आहे आधुनिक काळामध्ये मात्र वर्गांची संख्या अधिक वाढत गेली आणि वर्ग कार्यक्षेत्रानुसार ठरायला लागले . म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये फक्त विद्यार्थी आणि शिक्षक राहिले नाहीत तर बालक -चालक-पालक असेही आले आता मात्र फक्त जालना उरलेल्या आहेत आणि जालना सर्वच वर्गांना सांभाळून घेत जातात . प्रत्येक वर्गाची स्वतःची जालना आहे नेटवर्क आहे आणि त्यामुळेच त्यांचे असेसमेंट करणे खूप कठीण जाते कारण तुम्हाला अनेक प्रकारचे फॅक्टर लक्षात घ्यावे लागतात आदिवासी पाड्यातला शिक्षक वर्ग वेगळा गावातला वेगळा शहरातला वेगळा आणि महानगरातला शिक्षक वर्ग विद्यार्थी वर्ग वेगळा हे ध्यानात ठेवावे लागते त्यामुळे पुरी नेटवर्क सिस्टीम कशी ऑपरेट होते आहे झाली आहे हे लक्षात घ्यावे लागते त्या त्या वर्गाचे नेटवर्क नेमके काय पद्धतीने चाललेले आहे ते बघावे लागते आणि मुख्य नेटवर्कशी या सगळ्याला जोडून घ्यावे लागते. त्यामुळेच कनेक्टिव्हिटी आणि लिंक्स फार महत्त्वाच्या असतात कारण भ्रष्टाचाराची सगळी सोय या लिंक मधून वाहत असते . आणि ही सोय जेव्हा वाहते तेव्हा ती समग्र नेटवर्कमध्ये वाहते त्यामुळे भ्रष्टाचाराची व्याप्ती प्रचंड झालेली दिसते .
चौथ्या नवतेमध्ये अनेक नवीन आंदोलने उभी राहिली तिच्या केंद्रस्थानी अनेकदा चिन्हसृष्टी होती आणि या चिन्हसृष्टीनेच ही आंदोलने वाढवत नेली त्यांची व्याप्ती प्रचंड करत नेली आणि या व्याप्तीचा वेग आतापर्यंतच्या कुठल्याही युगामध्ये आलेल्या वेगापेक्षा प्रचंड होता कॉकरोच जनता पार्टीच्या संदर्भात हे अधिकच स्पष्ट झाले अवघ्या दहा दिवसात एक पार्टी बघता बघता नेटवर्क म्हणून उभी झाली . मागच्या कुठल्याही युगामध्ये हे शक्य नव्हतं हे फक्त चिन्हसृष्टी युगामध्येच चौथ्या नवतेमध्येच शक्य आहे याचे कारण चिन्हसृष्टी मध्ये नेटवर्क हे अत्यंत वेगाने फंक्शन करते करू शकते फक्त तो वापरणारा माणूस तेवढा वेगवान असावा लागतो.
एक काळ असा होता की एक रेषीय असणे हे सहज होते परंतु आता प्रत्येक युग स्वतःची वर्ग रेषा घेऊन येते आणि अशा अनेक युग रेषा दिसतात यातूनच युगरेषियता निर्माण होते आणि जालना समजून घ्यायची असेल तर तुम्हाला सर्व युगरेषांचा अभ्यास करावा लागतो या जालनेने अचानकपणे श्रद्धा युगातली नैसर्गिक मानली जाणारी आणि वाढ केंद्रस्थानी असणारी बालक ,कुमार ,तरुण ,प्रौढ आणि वृद्ध ही युगरेषा पुढे आणली .अचानक आंदोलन करत असलेल्या काही पिढ्या म्हाताऱ्या दिसायला लागल्या आणि कॉक्रोच जनता पार्टीतले तरुण "तरुण" हा वर्ग अत्यंत ठळकपणे अधोरेखित करू लागले साहजिकच सगळ्या म्हाताऱ्यांची तारांबळ उडाली काही ताबडतोब सपोर्ट करायला धावले कारण आपण तरुण आहोत असे दाखवणे या लोकांच्यासाठी खूप गरजेचे होते त्याउलट काही म्हातारे म्हणाले की जरा वाट बघू . मला त्या वर्ग जालनेमध्ये कुमार आणि तरुण यांची सांगड होणार आहे का हा एक फार मोठा प्रश्न आहे असे वाटते .
आपल्याकडे पुरोगामी व्यवस्थेच्या केंद्रस्थानी अनेकदा आयडियालॉजी असते साहजिकच पुरोगामी वर्ग व्यवस्थेच्या संदर्भात ज्यांचे डोके काम करते अशा अनेक लोकांनी प्रश्न विचारला की या लोकांची आयडियालॉजी काय आहे आता प्रॉब्लेम असा आहे की श्रद्धायुगात विचारसरणी विचार प्रणाली या दोन्ही गोष्टी अस्तित्वात नसतात तिथे असतो तो फक्त शहाणपणा अनुभवातून आलेला आणि तारुण्याचा उत्स्फूर्त जल्लोष ! शिक्षण आणि सेक्स हे तारुण्याचे मुख्य आयाम आहेत त्यातील शिक्षणा आयामाच्या अंगाने हे सर्व लोक अचानकपणे नीट परीक्षेच्या संदर्भात जे काही झाले जो काही भ्रष्टाचार झाला त्यामुळे लटपटले, गळपटले ,सटपटले आणि त्यातूनच अचानक यांची जालना निर्माण झाली आणि ती विद्युत वेगाने वाढत गेली त्यामुळे आयडिया लॉजी असणे शक्यच नाहीये याचे कारण असे आहे की आधुनिकतेमध्ये आयडियालॉजीला फारसे स्थान नाही आधुनिकता आणि उत्तराधुनिकता या दोन्ही गोष्टी मॅनेजमेंट व्यवस्थापन आणि पोस्ट मॅनेजमेंट उत्तर व्यवस्थापन यांच्या अंगाने जातात . आणि इथला मुख्य प्रश्न हा मॅनेजमेंटचा आहे . या परीक्षांचे मॅनेजमेंट नीट झाले नाही आणि म्हणूनच हा सगळा उद्रेक आहे तिथे आयडिओलॉजी शोधणे हा आंधळेपण आहे मुळात शिक्षणाच्या मागे कोणती विचार प्रणाली काम करत असते हे कळायला माणसाला थोडेसे प्रौढ व्हावे लागते असा प्रौढ पणा या लोकांच्या नेतृत्वात आहे की नाही हा फार मोठा प्रश्न आहे पण तो असायलाच हवा हा अट्टाहास सुद्धा चुकीचा आहे या लोकांना मॅनेजमेंटचे प्रश्न नीट कळलेले आहेत आणि शैक्षणिक संरचना ही पूर्णपणे मिस मॅनेज झालेली आहे याची त्यांना कल्पना आलेली आहे आणि म्हणूनच त्या अंगाने जो या मिस मॅनेजमेंटच्या केंद्रस्थानी माणूस म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री आहे त्याचा राजीनामा मागितला जात आहे . कुठल्याही व्यवस्थापन प्रणालीमध्ये हे घडत असते ज्याला काम जमत नाही त्या मॅनेजरला काढून टाकले जाते इथे तेच मागणे आहे खरे तर हा राजीनामा नरेंद्र मोदी यांनी ताबडतोब घ्यायला पाहिजे होता परंतु एकंदरच गेल्या पाच वर्षांमध्ये नरेंद्र मोदी यांचा कारभाराचा वेग पूर्णपणे मंदावलेला आहे याचे कारण मुळातच मॅनेजमेंट करायला जे अत्यंत अव्वल दर्जाचे मॅनेजर लागतात ते मॅनेजर भारतीय जनता पक्षाकडे नाहीत आणि सारा गोंधळ हा भारतीय जनता पक्षामधील मॅनेजमेंटच्या अभावातून उत्तम मॅनेजरच्या अभावातून निर्माण झालेला आहे या संदर्भात मुळात पार्टीने आपल्या पार्टीमध्ये असलेल्या आणि मॅनेजमेंट उत्तम करणाऱ्या लोकांना वेचून वेचून आणायला हवे होते परंतु ते करण्याऐवजी फक्त सत्ता प्रणालीला पूरक काय आहे हे सतत बघितल्याने आज मॅनेजमेंटचे एवढे दुर्भिक्ष पसरलेले भारतीय जनता पक्षाच्या कारभारात दिसते आहे . देवेंद्र फडणवीस यांना अजित पवार हवे होते याचे कारण अजित पवार अत्यंत अफलातून मॅनेजर होते त्यामुळे आपल्याला सरकार चालवायचे असेल तर अव्वल दर्जाचे मॅनेजर हवेत हे देवेंद्र फडणवीस यांना कळालेले होते आणि त्यांच्या पार्टीत असा माणूस नव्हता म्हणून ते अजित पवारांना घेऊन जात होते. स्वतः देवेंद्र फडणवीस उत्तम मॅनेजर आहेत पण सर्वच खाती ते कसे काय चालवणार ? खरंतर मुख्यमंत्र्याकडे खाते असता कामा नये कारण इतकी खाती झालेली आहेत की त्यांना एकत्र मॅनेज करणे हेच मुख्यमंत्र्याचे मुख्य काम आहे परंतु अजूनही पारंपारिक विचारप्रणालीच्या तत्त्वज्ञानात अडकल्यामुळे काही लोक अजूनही व्यवस्था चालवण्यासाठी म्हणून एका व्यवस्थेची एक बाजू किंवा एका खात्याची व्यवस्था आपल्या ताब्यात ठेवत असतात पण त्यामुळे नेटवर्किंग करण्याकडे दुर्लक्ष होते शेवटी वेळ मर्यादित असतो पण आपल्याकडे मुख्य मंत्री आणि पंतप्रधान हे दोघेही ही गोष्ट लक्षात घेत नाहीत त्यामुळेच मुख्यमंत्र्यांकडे किंवा पंतप्रधानाकडे कुठलेही खाते असता कामा नये ही जी आजच्या नव्या युगाची गरज आहे ती आपल्याकडे पूर्ण होत नाही .
नरेंद्र मोदी यांच्याकडे शैक्षणिक पर्याय नव्हता का मी हे खूपदा म्हटले आहे की तुमच्याकडे अविनाश धर्माधिकारी यांच्यासारखा माणूस असताना त्याच्याकडे हे सर्व द्यायचे सोडून तुम्ही फक्त सत्ता प्रणालीच्या अंगाने दरवेळेला विचार कसा करता? धुरंदर चित्रपट काढला म्हणून धुरंदर माणसे मिळत नाहीत ती शोधावी लागतात आणि त्यांना मॅनेजमेंट साठी वापरावे लागते पण इतका सुद्धा पोच अलीकडे अनेक नेत्यांच्याकडे राहिलेला नाही. कोण निवडून येतोय हेच फक्त बघावे लागत नाही तर कोण कुठले खाते सांभाळू शकतो हेही बघावे लागते . जेव्हा मंत्रिमंडळ बनेल तेव्हा तुमच्याकडे किमान दोन ऑप्शन प्रत्येक खात्यासाठी असायला हवेत पण अशा प्रकारचा मॅनेजमेंट विचारच भाजपमध्ये अस्तित्वात नाही. स्वतःला विचारवंत म्हटले म्हणून तुम्ही विचारवंत होत नाही त्यासाठी डीप इनसाईट लागते ती उमेदवार निवडताना असते असे दिसत नाही . त्यामुळे शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला जात नाही कारण पर्याय काय याही प्रश्नाचे उत्तर राजीनामा मागताना शोधावे लागते .माझे स्वतःचे स्पष्ट मत आहे की तुमच्याकडे दोन पर्याय असतील तर आज ही स्थिती निर्माण झाली नसती. एकाचा राजीनामा घेऊन त्या जागी दुसरा आला असता पण पर्याय ठेवायचाच नाही ही मूर्खपणाची कमाल असते आणि मग ती अडचणीत टाकते स्वतःच्या लोकांना प्रोटेक्शन द्यावे पण त्या प्रोटेक्शनची लिमिट क्रॉस करू नये . इथे ती लिमिट वारंवार क्रॉस होताना दिसते . भाजपाला अनेकदा बाहेरच्या पक्षातून लोक घ्यावे लागतात याचे एक मोठे कारण मॅनेजर लोकांचा अभाव आहे पण भाजपने मॅनेजर तयार का केले नाहीत असा प्रश्न त्यामुळेच निर्माण होतो .याचे स्पष्ट उत्तर धर्म या राजकीय विचार प्रणालीच्या आधारे तुम्ही जेव्हा पक्ष चालवता तेव्हा तुमचे लक्ष धर्माकडे जास्त असते तथाकथीत आचार्यांच्याकडे जास्त असते व्यवस्थापनाकडे आणि मॅनेजमेंट कडे कमी असते हे आहे .
साहजिकच मग एखाद्या नेटवर्कमध्ये प्रचंड मोठा गोंधळ निर्माण होतो तेव्हा भांबवलेली स्थिती निर्माण होते आणि मग कॉक्रोच जनता पार्टी जन्माला येते आणि त्याला कारण आजच्या शैक्षणिक जालनेमधील प्रचंड मोठा मिस मॅनेजमेंटचा मिस कनेक्टिव्हिटी चा मिस नेटवर्किंग चा गोंधळ निर्माण झाला हे आहे आणि त्यातून हे सर्व आलेले आहे . वास्तविक ज्या ज्या लोकांनी या शैक्षणिक लिंक्स आणि कनेक्टिव्हिटी मिसलीड केल्या त्या सर्वांना शिक्षा व्हायला हवी आणि त्या शिक्षेचा भाग म्हणूनच शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा ताबडतोब घेतला गेला पाहिजे होता . कधी कधी अशी तातडी आवश्यक असते ही तातडी दाखवली गेली नाही . त्यातूनच शासनाची कातडी गेंड्याची आहे अशी प्रतिमा तयार होते झालेली पण आहे . प्रशासनावरचा संपूर्ण ताबा कसा काय सुटला आणि हा निखळत गेलेला ताबा कोणी चुकीच्या लोकांच्या हवाली हँड ओव्हर केला याचीच खोलात जाऊन तपासणी होणे आवश्यक आहे .
आता हे आंदोलन एकदा कुमार आणि तरुणांचे आहे हे कळाल्यानंतर सर्व प्रौढांनी म्हाताऱ्या लोकांनी थोडीफार परिपक्वता दाखवणे आवश्यक होते तशी ती काहींनी दाखवली नेहमीप्रमाणे आपल्याकडे डाव्या लोकांना क्रांती दिसत असते आणि ते तरुण वर्गाने काहीही केले की प्रचंड उत्साही होतात तसे ते यावेळी ही झाले अण्णांच्या वेळीही झाले होते यात चुकीचे काही नाही एक प्रकारचा डेसिपरेटपणा फक्त दिसत असतो . आपल्या हयातीत प्रस्थापित व्यवस्थेला एकदा तरी संपूर्ण हादरा बसावा असे प्रत्येक डाव्या कार्यकर्त्याला वाटत असते साहजिकच आला तो क्षण असे त्यांना प्रत्येक वेळी वाटत असते तेच इथे घडलेले आहे. काँग्रेसला मात्र हा मुद्दा स्वतःचा विरोधी पक्षाचा मुद्दा म्हणून पुढे न्यायचा होता पण अचानक तो मुद्दा दुसऱ्याच पार्टीकडे गेलेला आहे त्यामुळे अवघडलेपण आलेले आहे. कॉजप हा आपल्याला पर्याय म्हणून भाजपने तर निर्माण केलेला नाही ना असाही संशय आहे . माझ्या मते असे काही झालेले नाही आपल्याकडे अण्णांच्या आंदोलनाच्या झालेल्या परिणामामुळे एक मूर्ख असा संशय निर्माण झालेला आहे वास्तविक तिथे सुद्धा मी खूपदा सांगितले आहे की अण्णांचा उद्देश भ्रष्ट सरकार खाली खेचणे एवढाच होता त्याचा साईड इफेक्ट म्हणून भाजप सत्तेवर आले पण त्या साईड इफेक्ट साठी संपूर्ण मुख्य इफेक्ट लाच आणि ज्यांनी तो आणला त्याला नावे ठेवणे हा नीचपणा आहे पण हा नीचपणा प्रत्येक जण करताना दिसतो अनेकदा साईड इफेक्ट नेहमीच मुख्य होतात उदाहरणार्थ फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये ती क्रांती करणाऱ्या लोकांना काही नेपोलियन बोनापार्ट आणायचा नव्हता परंतु त्या फ्रेंच राज्यक्रांतीचा साईड इफेक्ट म्हणून नेपोलियन उदयाला आला आपल्याकडे नेमके हेच अण्णांच्या आंदोलनामुळे घडले अचानक भाजपाला आणि नरेंद्र मोदी यांना फायदा झाला आणि नरेंद्र मोदी नेपोलियन सारखेच उदयाला आले आणि वावरायला लागले . पण म्हणून कोणी फ्रेंच राज्यक्रांतीच्या क्रांतिकारकांना त्यांचा उद्देश नेपोलियन सत्तेवर आणणे हा होता असे म्हणत नाही तेवढी परिपक्वता त्यांच्याकडे आहे आपल्याकडे ती नाही त्यामुळे हा गोंधळ होतो
कॉजप हा सुद्धा असाच आलेला आहे त्याचा मुख्य उद्देश शैक्षणिक व्यवस्था शैक्षणिक जालना बदलणे आहे . यासंदर्भामध्ये आता ते कशी मांडणी करतात हा उत्सुकतेचा विषय आहे आपल्याकडे विचार प्रणालीवादी लोक त्यांना मदत करू इच्छितात पण त्यांची ही मदत आउट डेटड आहे त्यापेक्षा मॅनेजमेंटच्या अंगाने आणि नेट वर्कच्या अंगानेच नवीन पिढीने विचार केला पाहिजे . अर्थात हे आपण सांगू नये की त्यांनी काय विचार करावा तो त्यांनाच करू द्या प्रत्येक वेळी म्हाताऱ्या वर्गाने पुढे यायची गरज नाही . कोणी सांगावे कदाचित आपल्याला नेटवर्कच्या माहीत नसलेल्या एखादा पैलूचा त्यांना परिचय असेल आणि आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल उठ सूट आपणच ज्ञानाचे डोस पाजले पाहिजे असे समजण्याचे कारण नाही आपण सुद्धा ज्ञानासाठी नेहमी ओपन राहिले पाहिजे.
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment