मराठीची भावता ही आरती प्रभू ग्रेस आणि गझल यांच्या पुढे का सरकत नाही ? भाग १ श्रीधर तिळवे नाईक 

सावित्रीबाई फुले आणि केशवसुत यांच्यामुळे मराठीमध्ये विसाव्या शतकातील पहिली भावनवता सुरू झाली आणि तिला समीक्षकांनी नंतर सौंदर्यवादी नवता असे म्हटले. सौंदर्यवाद हा शब्द रोमँटिसिझम या युरोपियन शब्दाचे भाषांतर होते आणि हा सौंदर्यवाद प्रत्यक्षात सावित्रीबाई फुले यांनी सुरू केला होता अशी मांडणी मी एका लेखात केली होती आणि या लेखानंतरच सावित्रीबाई फुले यांच्या कवितेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. सावित्रीबाई फुले या महात्मा फुले यांच्या अनुयायी असल्या तरी सौंदर्यवादाच्या बाबतीत त्या थोड्या आपल्या पतीपेक्षा वेगळ्या होत्या आणि त्यामुळेच कवितेत मात्र त्यांची स्वायत्त ओळख उमटली .

सावित्रीबाईंचे हे स्कूल शैव होते हे तर उघडच आहे त्यांनी शिव आणि शंकरांवर कविता लिहिल्या याचे त्यामुळेच आश्चर्य वाटत नाही पण त्या शैव असल्यामुळेच मराठी समीक्षकांनी त्यांच्या कवितेला डावलले जे वारकरी संप्रदायाला साजेशे होते . वास्तविक सर्व शैव संत तुकाराम यांनासुद्धा फार मान देतात कारण मोक्ष मिळाल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये तुकाराम हे वैष्णव कमी आणि सामाजिक बाबतीत शैव किंवा नववैष्णव अधिक बनत गेले होते त्यामुळेच फुले जोडपे संत तुकाराम यांनासुद्धा मान देत होते. मुळातच या काळामध्ये विठ्ठल ही देवता मूळची शैव आहे याची कल्पना बहुतेक सर्वच शैव लोकांना होती . त्यामुळे वारकरी संप्रदायाशी थेट शत्रुत्व कुठल्याच शैव संप्रदायाने जाहीर केले नाही . वैष्णव लोकांनी मात्र उघडपणाने शैवधर्मावर हल्ले केलेले दिसतात अगदी तुकाराम सुद्धा याला अपवाद नाही. पण त्याचा प्रतिवाद सुद्धा कधी शैव लोकांनी केलेला दिसत नाही . त्याचे कारण वारकरी संप्रदाय हा नाथसंप्रदायातून उगम पावलेला आहे याची कल्पना बहुसंख्य शैव लोकांना होती . शैव लोकांचा विठ्ठल या देवते वर्षात ताबा पूर्णपणे सुटला आणि वैष्णव लोकांनी विठ्ठल पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतला तो विसाव्या शतकात आणि त्याचा परिणाम वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था दृढ होण्यात झाला . १९३० नंतर ब्राह्मण धर्माने याची व्याप्ती वाढवत नेली आणि त्यामुळेच वारकरी संप्रदायाची व्याप्ती वाढत गेली आणि यामागे कारण उघड होते. वैष्णव संतांच्या साहित्यात वर्णव्यवस्थेचे आणि जातीव्यवस्थेचे समर्थन होते आणि फुले यांनी सुरू केलेल्या आगरकर यांनी स्थापित केलेल्या सुधारणा वादाला शह देण्यासाठी वैष्णव वारकरी संत हाच सनातन लोकांच्याकडे उपाय होता .

दुसरा उपाय वेदांतांमध्ये उडी मारणे हा होता आपल्याकडे साहित्याच्या क्षेत्रामध्ये केशवसुत यांनी नेमके हेच केलेले आहे .त्यांनी वेदात आणि वेदांतात उडी मारली आणि वेदांती रोमँटिसीजम डेव्हलप केला. त्यांना अनेक ब्राह्मण कवींनी नंतर साथ दिलेली दिसते .

त्यांना छेद मिळणारच होता आणि तो छेद शाक्त असणाऱ्या पुरुषोत्तम शिवराम रेगे आणि बा भ बोरकर यांच्याकडून मिळाला त्यांना छेद देणारा तिसरा कवी हा सुद्धा शाक्तच होता तो म्हणजे विनायक दामोदर सावरकर ! त्यांना केशवसुत बोलघेवडे कवी वाटत होते आणि त्यांना स्वतःलाच क्रांती करायची होती हा क्रांतीप्रवण रोमँटिसीजम होता . तो मराठीला पेलला नाही हेच खरे . रेगे बोरकर यांची गोष्ट मात्र वेगळी होती दोघेही गोवेकर असल्याने यांनी एका अर्थाने शाक्त रोमांटिसीझमचा पाया घातला आणि त्यांचा हा शाक्तपणा जितका शैव होता तितका वैष्णव होता म्हणूनच ते कृष्ण आणि राधा यांचाही वापर करत होते . त्यांच्या कवितेचे बीज आपणाला थेट ज्ञानेश्वरांच्या मध्ये शोधता येते . मोगरा फुलला आणि बोरकर व पुरुषोत्तम शिवराम रेगे यांच्या कवितेमध्ये काही संबंध आहे . आणि हा संबंध नजाकतीचा आणि अलवार पणाचा आहे . शहनाज मध्ये त्याला मुस्लिम टचसुद्धा मिळालेला आहे . तर जपानी रमलाची रात्र मध्ये जापानी टच मिळालेला आहे. 

आरती प्रभू आणि ग्रेस या दोघांनाही त्यांच्या नजाकतेची आणि अलवारपणाची विरासत लाभली आणि या दोघांनी ती पुढे नेली 

ग्रेस व आरती प्रभू यांची कविता ही बोरकर आणि रेगे यांच्या खांद्यावर उभी आहे. त्यांची शब्दकळासुद्धा या दोघांच्या शब्दकळेच्या खांद्यावर उभी आहे . पण ग्रेस यांचा चेहरा वेगळा होण्याचे सर्वात मोठे कारण त्यांच्यावर पडलेल्या ख्रिश्चन प्रभावात सापडते . तिथेच ते या दोघांच्या पेक्षा वेगळे होतात . ख्रिस्ताच्या करुणेचा एकांत आणि आकांत त्यांच्या कवितेत अनेक जागी प्रकट झालेला आहे (त्यांच्या तुकारामावरच्या कवितेमध्ये जी राजपुत्र आणि डार्लिंग मध्ये आहे हा आकांत कमालीचा आहे )आणि त्याची प्रेरणा एमिली डीकन्सन आहे. म्हणजेच ग्रेस यांच्या कवितेचा तिसरा खांदा एमिली डीकन्सन आहे. 

याचे मूळ आपण तपासायला गेलो तर ब्रिटिश राजवटीमध्ये ते सापडते. ब्रिटिशांच्या कालखंडातच संपूर्ण भारतावरच मुळात ख्रिश्चन संस्कृतीचा प्रभाव पडायला सुरुवात झाल्यामुळे ग्रेस हा आपला वाटायला लागला . त्याच्या कवितेतली ख्रिस्तता अनोळखी वाटेनाशी झाली . त्यातून चंद्र माधवीचे प्रदेश मधली धर्मांतराच्या प्रार्थना सारखी एक अद्भुत कविता जन्मली . गोव्यात ख्रिश्चन संवेदनशीलतेचा प्रचंड प्रभाव होता पण बोरकर यांच्या कवितेवर किंवा रेगे यांच्या कवितेवर तिचा किती प्रभाव पडला होता? बोरकर यांच्या कवितेवर काही प्रमाणात तरी तो असावा असे वाटते पण रेगे यांच्या कवितेत त्याचा मागमूसपण दिसत नाही. ते गोव्याबाहेर जास्त वाढले याचा हा परिणाम होता. 

जी ख्रिस्तता रेगे यांच्यामध्ये मिसिंग आहे ती आपणाला ग्रेस यांच्यामध्ये मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात आलेली दिसते .मुळात हिंदी फिल्ममध्येसुद्धा ती अनेकदा बटबटीतपणे आलीच होती . आपल्या हिंदू नायकांना मुस्लिम लोकांच्या गाण्याचे मुखडे आणि ख्रिश्चन लोकांची प्रपोजल स्टाईल देण्यात या काळात हिंदी फिल्मंसनी कचूराई केली नव्हती. याचे कारण हिंदी फिल्म बनवणारे अनेकदा कॉन्व्हेंट स्कूलचे आणि चित्रपटांची गाणी लिहिणारे उर्दू परंपरेचे बाय प्रॉडक्ट होते . मेरा नाम जोकर मध्ये राज कपूरची पहिली प्रेयसी ख्रिश्चन आहे याचे त्यामुळेच आश्चर्य वाटत नाही . तत्कालीन बॉलीवूड संस्कृतीचा तो साईड इफेक्ट आहे. पुढे बॉबी मध्ये त्याचे कलमिनेशन झाले . बॉबी या चित्रपटाची आणि व्यक्तिरेखेची लोकप्रियता आणि ग्रेस यांची लोकप्रियता एकाच वेळेला सुरू झालेली आहे. शिवाय हॉलीवुडचे चित्रपट बघून आपले लोक ख्रिश्चन धर्माशी परिचित होत होते हीही वस्तुस्थिती!

मराठी साहित्याच्या क्षेत्रात विशेषत :कवितेत ग्रेसमुळे या ख्रिश्चन परंपरेला मानाची जागा मिळाली ज्याची सुरुवात रेव्हरंड टिळक यांच्यामुळे झाली होती.( इथे आपण असाही प्रश्न विचारू शकतो की मंगेश पाडगावकर यांच्या कवितेवर या ख्रिश्चन परंपरेचा ग्रेसइतका परिणाम का झाला नाही की फक्त वाईनपुरताच झाला?)

याचा अर्थ ग्रेस मराठी परंपरेच्या बाहेर आहेत असा नाही .ग्रेस मराठी परंपरेतच लिहितात . ते मराठी परंपरेविरोधात उठाव किंवा बंड करत नाहीत हे आपण लक्षात घेतले पाहिजे याबाबतीत ते कट्टर देशीवादी आहेत. त्यामुळे सनातन कर्मठ ब्राह्मणी मानसिकतेला सुद्धा ते मोहात टाकतात कारण अनेकदा हे लोक कॉन्व्हेंट मध्ये शिकलेले असतात किंवा कॉलेजमध्ये त्यांना ख्रिश्चन धर्माशी सलगी करण्याचे चान्स मिळालेले असतात . मुळात ख्रिश्चन धर्म अल्पसंख्यांक असल्यामुळे हे घडते का? तो मुस्लिम धर्म इतका आक्रमक नसल्यामुळे हे घडते का ? असे प्रश्न आपण विचारायला हरकत नाही. सर्वसाधारणपणे सार्वजनिक जीवनात ख्रिश्चन लोकांची टेंडन्सी ही जुळवून घेण्याची मात्र प्रायव्हेट सेक्टर मध्ये जास्तीत जास्त धर्मप्रचार करण्याची असते. ग्रेसच्या कवितेत धर्मप्रचार नाही पण ख्रिस्तता आहे .

ग्रेस यांना मराठी मध्ये असे सर्वच बाजूने अनुकूल वातावरण होते आणि या सामाजिक वातावरणाचा फारसा विचार मराठीमध्ये मराठी समीक्षेमध्ये केला जात नाही. जणू काय एखादा स्वयंभू देव अवतरतो तसा ग्रेस मराठी साहित्यात अवतरला अशीच समजूत आपल्याकडची समीक्षा करून देते म्हणून हे लिहिले . थोडक्यात काय ग्रेस यांना सर्वच बाजूंनी अत्यंत अनुकूल असे वातावरण होते . शिवाय ते दलित असल्याचा सुगावा दलित चळवळीला लागल्याने त्यांनी सुद्धा ग्रेस प्रमोटच केले . 

आणि अर्थातच सर्वात महत्त्वाची गोष्ट ग्रेस यांच्या कवितेची ताकद हीच आहे. तिच्यावर अनेकांनी लिहिले आहे . मीही इतरत्र लिहिले आहे.

ग्रेस यांनी आयुष्यात एकदाही बाबासाहेब आंबेडकरांच्या वर कविता लिहिलेली नाही याचे त्यामुळेच आपण आश्चर्य मानू नये . याचे कारण अतिशय उघड आहे. ख्रिश्चन आणि पुरोगामी शिक्षणाची परंपरा ही फुले आणि आंबेडकर यांच्या पूर्वीच ख्रिश्चन धर्मामध्ये सुरू झालेली असल्यामुळे ज्या प्रकारचे ऋण फुले आणि आंबेडकरांचे हिंदूंना आणि नवबौद्धांना वाटते तसे ख्रिश्चन लोकांना वाटत नाही. त्यामुळेच हिंदुत्ववादी लोकांनाही ग्रेस आपले वाटतात कारण ते फुले आंबेडकरवादी नाहीत अशी त्यांची ठाम समजूत आहे . तर फुले आंबेडकरवादी लोकांना ते दलित असल्यामुळे त्यांना संपूर्ण पाठिंबा दिला पाहिजे असे वाटते अर्थात काही दलित अपवाद आहेत. पण ते अपवादच आहेत.

साहजिकच ग्रेस रसिकांच्या अनेक सामाजिक स्तरांच्यावर सहजरीत्या स्वीकारले गेले . 

प्रश्न असा आहे की ग्रेस यांच्यापाशी हा सौंदर्यवाद थांबला का? सध्या तरी हीच स्थिती दिसते . मी स्वतः हा सौंदर्यवाद पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता पण मुळात मीच सौंदर्यवादाच्या पुढे गेलो मात्र इतर कुठला सौंदर्यवादी असा काही प्रकार करत असेल का याकडे मी बारीक लक्ष ठेवून राहिलो आहे. याबाबतीत किशोर कदम आणि अरुण म्हात्रे यांच्या कवितेत काही शक्यता आहेत पण त्या पूर्णपणे फळलेल्या दिसत नाहीत. याबाबतीत किशोर कदम यांच्याशी माझ्या मित्र म्हणून खूप चर्चा चालत असतात. मी त्याला कायमच आयन रँडचे उदाहरण देत असतो पण त्याच्या कवितेत ती कितपत उतरलेली आहे? त्याला माझी दुसरी शिफारस कायमच Umberto Eco उंबरतो इको असतो पण त्याला हाही विचारवंत आत्मसात करणे जमलेले दिसत नाही . मुळातच तात्विक पातळीवर आपण काही केले पाहिजे याची जाणीव अनेक रोमँटिक कवींना असत नाही. भावता ही सुद्धा काळानुसार वेगळ्या पद्धतीने डेव्हलप होत असते याचे भान अनेकांना नसते.याचे कारण मराठी लोकांचा एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे भावता म्हणजे सौंदर्य वाद असा एक त्यांचा ठाम गैरसमज झालेला आहे . वास्तविक कवितेचे जे दीर्घकालीन( मी शाश्वत हा शब्द किंवा सनातन हा शब्द इथे मुद्दामच वापरत नाही) सतत टिकलेले आयाम आहेत त्यातील एक आयाम म्हणजे भाव होय पण आपल्याकडे भावपूर्ण लिहितो म्हटले की तो माणूस रोमँटिक लिहितो असे म्हणणारे मूर्ख खूप आहेत . वास्तविक भाव हा आदिम काळात वेगळा होता , श्रद्धेच्या काळात वेगळा होता , मोक्ष काळात वेगळा होता ,धर्म काळात तो वेगळा झाला पुरोगामी काळामध्ये तो रोमँटिक झाला पण आधुनिक काळामध्ये तो रोमँटिक राहिला नाही त्याला फार वेगळ्या डायमेन्शन प्राप्त झाल्या उत्तर आधुनिकतेमध्ये तो आणखीन वेगळा झाला आणि चौथ्या नवतेमध्ये तो आणखीनच वेगळा होतो आहे आणि झाला . साधा प्रेम भाव घेतला तरी त्याच्या अनेक डायमेन्शन आपल्याला दिसतात . उदाहरणार्थ आंबेडकरवादी कवितेमध्ये स्त्री विषयीचे प्रेम दिसते पण त्याला जातीवास्तवाची जोड मिळालेली दिसते आता हा पुरोगामी भाव आहे आणि तो रोमँटिसीझमशी निगडित नसून तो वास्तववादाशी निगडित आहे जिथे प्रेम सुद्धा वास्तवाच्या तावडीत सापडते. ग्रेस अशा प्रकारची कविता कधीच लिहीत नाही .तो शुद्ध सौंदर्यवादी आहे .

ग्रेस यांची सर्वात मोठी अचिव्हमेंट कुठली असेल तर ती म्हणजे त्यांनी रेगे बोरकर यांच्याप्रमाणेच भाव पुरोगामी केला आणि बोरकर यांच्यापेक्षा तो अधिक उत्कट केला . एखादी गिटार किंवा सतार वाजावी तसा त्यांच्या कवितेत भाव वाजत राहतो . किंबहुना त्यांच्या कवितेतील भावतेला गिटारी भावता आणि सितारी भावता असे विभागता येते . धर्मांतराच्या प्रार्थना मध्ये ती गिटारी आहे तर ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत या आईवरच्या कवितेमध्ये ती सतारी आहे .

प्रश्न असा आहे की हा जो शुद्ध भाव कवितेचा आयाम आहे तो ग्रेसच्या आणि आरती प्रभू यांच्या पलीकडे का जात नाही आहे ? मी एक उत्तर लिहिलेलेच आहे ते म्हणजे मुळात तात्विक पातळीवर काही विचार करायचा असतो याचे भान नाही. दुसरी गोष्ट अनेकदा असे काही भान आले तर तो मनुष्य सौंदर्यवादात थांबतच नाही तो माझ्यासारखा पुढे निघून जातो . मग आपण असे म्हणायचे काय की निखळ भाव प्रधान कविता ही आता अशक्यच आहे . मग जे निखळ भावपिंडाचे कवी आहेत उदाहरणार्थ किशोर कदम त्यांनी करायचे काय ? कारण हा जो भावपिंड असतो तो काही समाज देत नाही अनेकदा तो जन्मदत्त असतो आता ज्यांना तो जन्मदत्त लाभलेला आहे त्यांनी मग करायचे काय फक्त ग्रेस आणि आरती प्रभू वाचत त्यांचे अनुकरण करत दिवस काढायचे काय ?

श्रीधर तिळवे नाईक 


साहित्य आणि व्यासंग श्रीधर तिळवे नाईक 


याचा अर्थ तुम्हाला ग्रेट साहित्य कसे निर्माण होते ते माहित नाही तुम्हाला असे वाटते का व्यासांचा व्यासंग नव्हता ? शेक्सपियरने किती वाचलं होतं हे त्याच्या नाटकातूनच दिसतं साहित्यात किंवा कलेत व्यासंग हा अनुभवाचा भाग बनून यावा लागतो जो अनेकांच्या बाबतीत होत नाही ज्या वेटिंग फॉर गोदोचं उदाहरण तुम्ही दिलेलं आहे त्यावर एकदा बेकेटने काय लिहिले आहे ते नीट वाचून पहा त्याने जेम जोईसशी फाईट करण्यासाठी काय काय उद्योग केले हे त्याने स्वतःच लिहिलेले आहे आधीच अर्धवट असणाऱ्या साहित्य संस्कृतीत ह्या अशा अर्धवट पोस्टी अर्धवट साहित्य निर्माण करायला हातभारच लावतील ऑफिशियल एज्युकेशन न होणे आणि व्यासंग नसणे या दोन भिन्न गोष्टी आहेत विजय तेंडुलकर हे त्याचे आधुनिक उदाहरण नामदेव ढसाळ हे दुसरे या दोघांचाही व्यासंग तगडा होता मराठी लेखकांचा खरा प्रॉब्लेम त्यांचे अनुभव विश्व अतिशय तोकडे असते. सामान्य माणसापासून दूर राहायचे समाजापासून दूर राहायचे गणिती जीवन जगायचे माणसांना भेटायचं नाही आणि साहित्यातल्या साहित्यात येरझऱ्या घालायच्या यामुळे अशा लोकांच्या साहित्याला खुजेपण आलेले आहे ज्या चंद्रशेखर सानेकरने येथे वा वा म्हटलेलं आहे त्याचा गजलेचा व्यासंग काय आहे ते तो गजलेवर अनेक पोस्ट टाकून सिद्धच करत असतो जो माणूस झेपत नाही त्याच्यावर अशा प्रकारच्या टीका आपल्याकडे केल्या जातात हे साहित्यिक राजकारण असते आणखी काही नाही कलेची प्रतिभा ही एक पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे ती काहींच्यात असते काहींच्यात नसते व्यासंग ती प्रतिभा देऊ शकत नाही ही व्यासंगाची मर्यादा आहे पण प्रतिभा आहे आणि व्यासंगपण आहे हे कॉम्बिनेशन डेडली साहित्य निर्माण करते अनेकांच्या जवळ काव्याला लागणारी प्रतिभा नसते अशा लोकांचं काय करायचं हाच प्रश्न असतो मी अशा लोकांच्या बाबत मौन पाळतो आणि पुढे जातो असो तुमच्या आतच एक रोमँटिक माणूस लपलेला आहे ही त्याची पोस्ट आहे असे म्हणून मी सोडून देतो

श्रीधर तिळवे नाईक 

आशुतोष दिवाण यांच्या पोस्टवर कॉमेंट

प्रतिभा आणि व्यासंग हे काँबिनेशन डेडली असतं 

हा तुझा मुद्दा मान्यच. ते डेडली साहित्य निर्माण करू शकतं ( पण करतंच असं नाही. ) व्यासंगाशिवायही मिरॅकल करणारे कलावंत आहेत. उदा. आरती प्रभू.


( मला तर बऱ्याचदा वाटतं, व्यासंग प्रतिभेला संशयास्पद बनवतो की काय ? )


असो.

चंद्रशेखर सानेकर 

चंद्रशेखर सानेकर आरती प्रभूंच्या जवळ अफलातून प्रतिभा होती या माणसाला थोडी व्यासंगाची शिस्त असती तर हा नेमाडे यांच्या तोडीस तोड झाला असता उलट व्यासंग नसला की प्रतिभेचे काय होते त्याचे आरती प्रभू हे उत्तम उदाहरण आहे जिथे जिथे केवळ भाव लागतो तिथे तिथे आरती प्रभू उत्तम लिहितात पण जिथे भाव व व्यासंग यांची गरज भासते तिथे आरती प्रभू कोलमडतात

श्रीधर तिळवे नाईक 

Shridhar Tilve होय, बरोबर आहे तुझं. मान्य.

चंद्रशेखर सानेकर





 




Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती