लोकचैतन्य ,धर्म,वर्ण व्यवस्था आणि एलिट समाज श्रीधर तिळवे नाईक
आदिम काळामध्ये संपूर्ण टोळी व्यवस्था होती जिच्यामध्ये निसर्ग आणि टोळी वेगळे नव्हते इतकेच कशाला टोळी आणि टोळीचे सभासद वेगळे नव्हते त्यामुळे या टोळीचे म्हणून एक लोकचैतन्य होते ज्याला आपण टोळीचैतन्य म्हणू शकतो हे टोळीचैतन्य सामूहिकरित्या काम करत होते त्यातूनच मग हळूहळू एक आदिम समाज निर्माण झाला आणि त्यातून निर्माण झाल्या दोन गोष्टी भाषा आणि कला या दोन गोष्टींनी हळूहळू स्वतःची जाण आणि स्वतःचे शहाणपण एकमेकाला पोहोचवण्यासाठी मदत करायला सुरुवात केली. एकमेकाचे अनुभव एकमेकाला सांगायला सुरुवात केली त्यातूनच कला निर्माण झाली. एकमेकांचे अनुभव एकमेकाला सांगणे हाच कलेचा सर्वात आदिम हेतू आहे पण हे सर्व फक्त अनुभव सांगणे यापुरते मर्यादित राहिले नाही तर त्या अनुभवातून आपण कोणत्या शहाणपण शिकले आणि आपणाला काय जाण आली ते सुद्धा सांगण्यात येऊ लागले आणि तिथेच कला आणि जाण कला आणि शहाणपण यांचे नाते प्रस्थापित झाले त्यामुळेच संस्कृतीच्या सुरुवातीच्या आदिम पाऊल खुणा हळूहळू विकसित होत गेल्या आदिम संस्कृती ही पूर्णपणे अनुभवकेंद्री होती .
या लोकांच्या पुढे निसर्ग हा एखाद्या देवासारखाच होता सूर्य हा देवासारखा होता चंद्र हा देवासारखा होता बाईच्या पोटातून निर्माण होणारे आणि बाहेर पडणारे बाळ हा काहीतरी विलक्षण चमत्कार होता त्यामुळे साहजिकच अनेक ठिकाणी मातृसत्ताक पद्धती उदयाला आल्या आणि अनेक टोळ्या मातृसत्ताक पद्धतीने स्वतःचे चैतन्य जतन करायला लागल्या संपूर्ण पृथ्वीचे चैतन्य जणू काय टोळीमध्ये संचारत होते जोपर्यंत माणूस केवळ शिकारी होता तोपर्यंत या टोळी चैतन्याला हलवण्याची ताकद कुठल्याच गोष्टीत नव्हती परंतु माणसाला अचानक लक्षात आले की काही पशु पाळता येतात आणि अचानक मनुष्य पशुपालनाकडे वळला आणि पशुंचा साठा करण्याची त्याची क्षमता निर्माण झाली आणि एकदा साठा निर्माण झाला की त्याला हळूहळू आपण संपत्ती समजायला लागतो पशूंच्या बाबतीत हेच घडले आणि पशुधन नावाची संकल्पना उदयाला आली . त्याचे फार मोठे प्रतिबिंब आपणाला ऋग्वेदामध्ये दिसते. तुमच्याकडे किती गायी आहेत बैल आहेत पशुधन आहे त्यावर तुमची श्रीमंती ठरू लागली आणि यातूनच मग सुरुवातीचा वैश्यवर्ग तयार झाला जो विशपती होता तोच राजा बनू लागला एकमेकांचे पशु पळवण्याचे उद्योग सुरू झाले यातच मग स्त्रीला सुद्धा आणि माणसाला सुद्धा पशु समजून पळवण्याचे उद्योग सुरू झाले आणि त्यांना गुलाम बनवण्याची प्रथा ही हळूहळू तयार झाली यामुळे जी टोळी साधी टोळी होती ती आता महाटोळी बनू लागली या महाटोळीला एकत्र बांधणारे शहाणपण गरजेचे बनू लागले मुळातच पिढ्यान पिढ्या चालत आलेले शहाणपण काही ठिकाणी हळूहळू रूढी म्हणून रिवाज म्हणून प्रस्थापित होऊ लागले
मात्र प्रॉब्लेम तेव्हा सुरू झाला जेव्हा दुष्काळ सुरू झाले पाऊस पडेनासा झाला आणि याचा फायदा घेणारे लोक निर्माण झाले हे लोक ठग होते यांनी लोकांना असे सांगायला सुरुवात केले की शब्दांच्या मध्ये मांत्रिक ताकद असते आणि तिच्या साहाय्याने देव सुद्धा वश करता येतात आणि त्यांच्याकडून आपल्याला हवी ती कामे करवून घेता येतात हा मांत्रिकांचा वर्ग होता हा वर्ग मग मग आकाशातल्या देवांना पाऊस पाडायला भाग पाडता येईल असा विश्वास निर्माण करू लागला आणि मांत्रिकीचा उदय झाला ही मांत्रिकी हळूहळू बोडक्यावर बसली आणि या मांत्रिकीतून श्रद्धा निर्माण झाली या श्रद्धेतून महाश्रद्धा ( religion )निर्माण झाली किंवा धर्म निर्माण झाला या मांत्रिकीचा सर्व आधारच आकाशातले देव होते आपण त्यांना प्रसन्न करून घेऊ शकतो अशी गॅरंटी हे लोक देऊ लागले साहजिकच अनेकदा पाऊस न पडल्याने हवालदिल झालेले टोळीप्रमुख या लोकांना हळूहळू माणसन्मान देऊ लागले आधीच टोळी युद्धामध्ये संरक्षण करणारा एक एलिट वर्ग निर्माण झाला होता आता मांत्रिकांचा दुसरा एलीट वर्ग तयार झाला हा सुरुवातीच्या कालखंडामध्ये जन्मदत्त नव्हता तर कर्म दत्त होता.
माणसाचा सर्वात मोठा जो काही प्रॉब्लेम आहे तो यामध्ये अधिक गहन होत गेला तो म्हणजे त्याचे आपल्या कुटुंबावर असणारे प्रेम साहजिकच जे काही आहे ते फक्त आपल्यालाच मिळायला पाहिजे आपल्याच वारसांना मिळायला पाहिजे असे त्याला आता वाटू लागले मुख्य म्हणजे परक्या टोळ्यांच्या मधून आणलेले लोक त्यांना वारसा देण्याची तयारी आता मानसिक पातळीवर राहिली नाही आपल्याच टोळ्यातल्या लोकांना फायदा झाला पाहिजे या विचारातूनच वारसा हक्काची सुरुवात झाली दुसरी टोळी ही एका अर्थाने इतरिकरणाची सुरुवात होती . विशेषता या टोळीतून पराभूत झालेले लोक जेव्हा गुलाम बनवले गेले तेव्हा हे जास्त मोठ्या प्रमाणात घडत गेले . या सगळ्याचा फायदा घेणारे राजकारणी लोक वाटच पाहत होते त्यांच्याकडे युद्ध कौशल्य नव्हते पण बुद्धिमत्ता होती . साहजिकच हे लोक त्यांना सोयीस्कर अशी समाजव्यवस्था कशी निर्माण करता येईल त्या संदर्भात काही विचार करत होते काही नियम तर आलेच होते थोडे मग या लोकांनी नियम स्वतःच्या पद्धतीने सोयीस्कर रित्या फिरवायला सुरुवात केली. यातूनच महा श्रद्धा जन्मली आणि पुढे यातूनच धर्म तयार झाला
कुठलीही धर्म व्यवस्था धर्माच्या आधारे एलिट समाज निर्माण करते आणि सर्व सत्ता या एलिट समाजाच्या प्रदेशात आरक्षित होईल याची काळजी घेते भारतासारख्या ठिकाणी ब्राह्मण धर्म ही आरक्षितता उघड उघडपणाने सादर करतो तर इतर सर्व ठिकाणी अप्रत्यक्ष आरक्षण असते फरक केव्हा पडतो जेव्हा एलिट वर्ग हा कर्मदत्त न राहता जन्मदत्त होतो भारतामध्ये समाज व्यवस्था ब्राह्मण धर्माने निर्माण केली खरी परंतु ती व्यवस्था जन्मदत्त केली . तोंडाने अपवादात्मक वेळेला बचावाला जेव्हा जावे लागले तेव्हा हे लोक बोंबलायचे की नाही नाही वर्णव्यवस्था कर्मदत्त आहे प्रत्यक्षामध्ये इतिहासामध्ये ही व्यवस्था कधीही कर्मदत्त नव्हती आज सुद्धा जेव्हा चर्चा होते तेव्हा वर्णव्यवस्था कर्मदत्त नसते आज सुद्धा कोणीही बाबासाहेब आंबेडकर यांना ब्राह्मण म्हणत नाही ते कसे दलितांचे पुढारी आहेत हेच सांगितले जाते त्यामुळे याबाबतीत बोलाचीच कडी बोलाचाच भात हीच अवस्था दिसते
श्रद्धा जेव्हा निर्माण झाली तेव्हा सुरुवातीच्या कालखंडामध्ये सर्व काही समान होते परंतु नंतर टोळी युद्धांच्या मध्ये काही योद्धे वारियर वर आले आणि त्यांना काही विशेष कौशल्य लागत असल्याने ते स्वतःला प्रथम एलिट समजू लागले त्या लोकांना व्हॅलिडीटी प्रमाणीकरण हवे होते आणि मग या प्रमाणीकरणासाठी म्हणून या लोकांनी काही लोकांच्या अपॉइंटमेंट निश्चित केल्या आणि त्यातूनच भगत नावाची शैव-धर्मामध्ये एक सोय निर्माण झाली आणि पुढे पुढे हा वर्ग सुद्धा एलिट मध्ये सामील झाला जगभरामध्ये तुम्हाला ही गोष्ट कायम होताना दिसते म्हणजेच सर्व जगामध्ये मांत्रिक आणि योद्धे हे एलिट क्लास म्हणून हळूहळू उदयाला आले आणि मग त्यांनी धर्म किंवा रिलिजन मजहब नावाची राजकीय विचार प्रणाली स्थापन करून स्वतःला प्रस्थापित करून घेतले असे तुम्हाला दिसेल
तेव्हा सर्वात प्रथम वर्णव्यवस्था ही ब्राह्मण आणि क्षत्रियांनी स्वतःला एलिट बनवण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे मात्र दोघेही एकमेकांच्या डोक्यावर खापर फोडण्यामध्ये एक्सपर्ट झालेले आहेत कारण फायदे हवेत पण जबाबदारी नको हा एलिट वर्गाचा बाणा असतो . त्यामुळे निगेटिव्ह काही टीका झाली की लगेच ब्राह्मण क्षत्रिय लोकांच्याकडे बोट दाखवतात आणि क्षत्रिय ब्राह्मणांच्याकडे बोट दाखवतात जबाबदारी मात्र स्वतःहून कोणीच घेत नाही याला अपवाद कदाचित फक्त समाजवादी आणि साम्यवादी ब्राह्मण असतील. अगदी आहा साळुंखे यांच्यासारखे लोक सुद्धा अतिशय व्यवस्थितपणे क्षत्रियांच्यावरची जबाबदारी झटकायला बघतात आणि सर्व जबाबदारी ब्राह्मण लोकांच्यावर टाकायला बघतात . आश्चर्यकारकरीत्या भारतामध्ये दोघेही सुटतात याचे कारण वैश्य आणि शूद्र नेहमी या दोघांच्या लढाईत नेहमीच कन्फ्युज होतात
ब्राह्मणांना तोपर्यंत क्षत्रिय चांगले वाटतात जोपर्यंत ते संरक्षण करतात पण जर का ते संरक्षण धर्माला चुकले की ब्राह्मणांच्या दृष्टीने सर्व क्षत्रिय धर्महीन कर्म हीन होऊन जातात त्यामुळेच क्षत्रिय अस्तित्वात कुठे आहेत असा प्रश्न ते विचारायला लागतात त्या उलट जेव्हा मांत्रिकीचा काहीही फायदा होत नाही तेव्हा खरे मांत्रिक कुठे आहेत त्यांची जाज्वलता कुठे आहे खरा ब्राह्मण आहे कुठे असा प्रश्न क्षत्रिय विचारायला लागतात इंग्रजांच्या काळामध्ये ब्राह्मणांचा उपयोग संपला म्हणूनच अनेक ब्राह्मणेतर विशेषत :क्षत्रिय लोक ब्राह्मणेतर चळवळीला पाठिंबा द्यायला लागले कारण ब्राह्मणांचे ज्ञान आपल्या कामाचे नाही उलट युरोपियन लोकांनी आणलेले विज्ञान जास्त कामाचे आहे हे क्षत्रियांना हळूहळू कळू लागले . पुढे मग ब्राह्मण लोकांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान आत्मसात करायला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा मग ब्राह्मणांचे क्षत्रियांच्याकडे रिस्टोरेशन झाले . विशेषता मेडिकल फील्ड मधल्या अनेक ब्राह्मण इंजिनीयर डॉक्टरांनी ब्राह्मणांची गेलेली इज्जत पुन्हा एकदा प्राप्त करून दिली.
आपले ढळलेले स्थान मांत्रिक लोकांच्या लक्षात आल्यानंतर साहजिकच मग आता मांत्रिकी परत प्रस्थापित करण्यासाठी धर्माची पुन्हा एकदा स्थापना केली पाहिजे हे लक्षात येऊन काही ब्राह्मण लोकांनी वेगळ्या प्रकारचे संघटन निर्माण करायला सुरुवात केली आणि त्यातूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सारखे संघ निर्माण झाले . त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा सुरुवातीच्या कालखंडामध्ये स्पष्टपणाने ब्राह्मणी हिंदुत्वाचे धोरण स्वीकारताना दिसतो अगदी गोळवलकर गुरुजींच्या काळापर्यंत हे खूप मोठ्या प्रमाणात चाललेले दिसते
प्रश्न असा आहे की धर्माचे पुनर्जीवन करायचे असेल तर मग काय करायचे ही समस्या उभी राहते आणि त्याचे उत्तर म्हणून मग संपूर्ण लोकांच्या मध्ये धर्मचैतन्य निर्माण व्हावे म्हणून धडपड सुरू होते आणि अशी धडपड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुन्हा पुन्हा केलेली आहे. म्हणजेच टोळी चैतन्यानंतर जे लोक चैतन्याचे स्वरूप होते ते मोक्षचैतन्य होते त्याला नाहीसे करून पुढे धर्मचैतन्य आणले गेले आणि मग धर्मचैतन्य केंद्रस्थानी होते आणि हे धर्मचैतन्य काही करून आपल्या ताब्यात ठेवत त्याचा वापर राष्ट्र निर्माण करण्यासाठी करायचा असे हिंदुत्वाचे सुरुवातीचे धोरण दिसते मात्र हे करताना ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचे एलीट असणे त्यागायचे नाही असेही धोरण स्पष्ट दिसते . याचे कारण आपण दोन वर्ण एलिट आहोत हे या वर्णातील लोकांना व्यवस्थित माहिती आहे .
प्रश्न असा आहे की भारतीय समाज व्यवस्थेमध्ये प्रत्येक वर्ण स्वतःचे वर्ण चैतन्य म्हणून काही बाळगून असतो का ? आपणाला एक गोष्ट स्पष्ट दिसते ती म्हणजे अशा प्रकारचे वर्ण चैतन्य जागृत व्हावे विशेषत: क्षत्रिय लोकांच्यात जागृत व्हावे म्हणून ब्राह्मण लोक नेहमी धडपड करताना दिसतात याचे कारण संरक्षणाची जबाबदारी शक्यतो घेऊ नये कारण त्यामध्ये शेवटी जीव जाण्याची शक्यता असते म्हणून हे काम दुसऱ्यांच्याकडून व्हावे यासाठी ब्राह्मण जास्त उत्सुक असतात आज सुद्धा ब्राह्मण लोक शक्यतो सैनिक होत नाहीत ते नेहमी सैन्यामध्ये अधिकारी घ्यायला धडपडतात कारण सैनिकाची जीव जाण्याची शक्यता सर्वाधिक असते आणि सैन्य अधिकाऱ्याचा जीव जाण्याची शक्यता फार कमी असते एका अर्थाने इथे ब्राह्मण माणूस ब्राह्मण वर्णाचे वर्ण चैतन्य त्याच्याही न कळत आतमध्ये बाळगूनच काम करत असतो. अर्थात याला अनेक अपवाद आहेत पण ते अपवाद असतात बहुतेकांचा कल अधिकारी होणे असाच असतो .
अलीकडच्या काळामध्ये मराठ्यांच्या सर्व चळवळी आपण पाहिल्या तर आपणाला असे लक्षात येते की हे लोक सातत्याने हिंदुत्वाच्या प्रभावाखाली येऊन क्षत्रिय चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत . आता जर का वर्ण चैतन्य निर्माण होणार असेल आणि ते जर का सर्वच वर्णांच्या मध्ये निर्माण होणार असेल तर मग वर्णव्यवस्थेचा कमबॅक होणे अटळ आहे आणि मग यामध्ये संपूर्ण देशाचा सत्यानाश होणे पण अटळ आहे.
तेव्हा मी म्हणेन की ब्राह्मणांनो आणि क्षत्रियांनो जरासे कुठल्या प्रकारच्या चैतन्याला तुम्ही फुंकर घालत आहात ते पहा . असे होऊ नये की आग भडकली आणि तुमचे स्वतःचेच घर जळाले इसवी सन 1000 नंतर हे घडलेले आहे तुम्ही स्वतःचीच घरे जाळलेली आहेत आता इतिहासच रिपीट करायचा असेल तर गोष्ट वेगळी .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment