भारतातील बहुओळखींचा प्रश्न आणि त्यातून निर्माण होणारी राजकीय गुंतागुंत श्रीधर तिळवे नाईक
सर्वसाधारणपणे जगामध्ये एक अशी समजूत आहे की आपली जी ओळख असते ती एकच असते. प्रत्यक्षामध्ये असे घडेलच असे नाही. भारतासारख्या देशांमध्ये तर वैचारिक नेतृत्व ज्यांच्या हातात आहे तेच लोक बहुओळखवाले असतात आहेत. साहजिकच मग ओळखींचा कोलाहल Chaos तयार होतो . याचा एक दुष्परिणाम असा होतो की एकसंध राष्ट्र किंवा एकसंध राज्य निर्माण करणे किंवा एकसंध समाज निर्माण करणे अतिशय अवघड होऊन बसते किंवा गुंतागुंतीचे बनते . या बहुओळखवाल्यांच्यात सुद्धा दोन प्रकार असतात
१ परस्पर पूरक बहु ओळखी असलेला समुदाय
२ परस्पर विरोधी बहु ओळखी असलेला समुदाय
उदाहरणार्थ ब्राह्मण धर्म ही एक ओळख आणि हिंदू धर्म ही एक ओळख अशी ओळख सर्वसाधारणपणे आपणाला अनेक ब्राह्मण लोकांची दिसते त्यांना जी तिसरी ओळख आहे ती जातीची आहे जी असतेच म्हणजे देशस्थ कराडे वगैरे तिचा आता फार परिणाम राहिला नाही परंतु ब्राह्मण ओळख हिंदू ओळख या ज्या दोन ओळखी आहेत त्या युरेशियन ओळखी असल्याने अनेकदा परस्पर पूरक होऊन जातात .
या उलट जर का आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा प्रश्न घेतला तर सुरुवातीपासूनच तिथे परस्परविरोधी बहु ओळख आढळते ठाकरे घराण्यामध्ये मुळातच सुरुवातीला हिंदुत्व ही ओळख प्रस्थापित होती परंतु महाराष्ट्र आंदोलनानंतर अचानक प्रबोधनकार ठाकरे यांनी मराठी भाषेवरून जो लढा झाला त्यात भाग घेतला आणि मराठीचा प्रश्नही त्यांच्या घरात शिरला म्हणजेच दोन ओळखींचा शिरकाव झाला आणि या दोन ओळखी परस्पर विरोधी होत्या कारण मराठी ओळख ज्या गुजराती ओळखीशी लढत होती ती गुजराती ओळख प्रामुख्याने हिंदू होती म्हणजेच इथे हिंदू ओळखीचेच लोक आपापसात दुसऱ्या भाषिक ओळखीवरून लढत होते नंतर मराठी ही प्रमुख ओळख घेऊन शिवसेना नावाची संघटना स्थापन झाली पण या ओळखीने सत्ता ताब्यात येणे अशक्य आहे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या लक्षात आले आणि त्यांनी पुन्हा त्यांच्या घराण्याची जी पहिली ओळख आहे ती हिंदुत्व ही ओळख पुन्हा धारण केली आणि इथे मग पुन्हा एकदा दोन परस्पर विरोधी ओळखी शिवसेनेमध्ये आल्या. यामध्ये सर्वात मोठा गोंधळ हा होता की भारतीय जनता पक्ष हा स्वतःचे हिंदुत्व घेऊन आल्याने हिंदुत्व ही ओळख भाजपची होती आणि हिंदुत्व या समान ओळखीच्या पायावर भाजप आणि शिवसेना यांची युती झाली . भाजप हा एका अर्थाने मराठी विरोधी पक्ष आहे त्यामुळे साहजिकच शिवसेनेच्या मराठी या ओळखीशी त्याचा संघर्ष आज ना उद्या होणे अटळ होते किंबहुना शिवसेना हा प्रादेशिक पक्ष असल्याने तो राष्ट्रीय पक्षात राष्ट्रीय ओळखीत विलीन करून घेणे हे उद्दिष्ट खरे तर फार सुरुवातीपासूनच स्पष्ट होते . म्हणजे एका अर्थाने शिवसेनेची हिंदुत्ववादी ओळख हीच राष्ट्रीय हिंदुत्व ओळखीत विलीन होणे अटळ होते जोपर्यंत भाजप हा किरकोळ पक्ष होता तोपर्यंत शिवसेनेची भाजपवर दादागिरी चालली पण जसा जसा राष्ट्रीय पातळीवर भाजपचा दरारा, व्याप्ती आणि विस्तार वाढत गेला तसा तसा भाजपला शिवसेना विरोध वाढवत जाणे गरजेचे बनत गेले . जर हिंदुत्व हीच आयडॉलॉजी असेल तर दोन पक्ष कशाला ? याबाबतीत शिवसेनेने फार प्राचीन काळापासून चालत आलेला ब्राह्मण विरुद्ध क्षत्रिय हा संघर्ष आणला आणि आमचे हिंदुत्व हे ब्राह्मणी हिंदुत्व नाही असे वारंवार सांगितले इथे ओळखीचाच संघर्ष होता आमचे हिंदुत्व तुमच्या हिंदुत्वापेक्षा वेगळे आहे हे ओळख प्रस्थापित करण्यासाठी सांगणे पक्षाच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी शिवसेनेला गरजेचे होते प्रॉब्लेम एवढाच होता की लोकांना हे पटवून कसे देणार ?
शिवसेनेपुढचा प्रश्न तेव्हा उग्र बनला जेव्हा त्यांनी सेक्युलर या ओळखीशी युती केली मी त्यावेळी ही म्हणालो होतो की ही वैचारिक आत्महत्या आहे. यामध्ये भाजपची चूक होती पण प्रश्न असा होता की भाजप ही चूक मुद्दाम म्हणून घडवत होता की त्याच्याकडून अजाणता ही घडली ? काहीही झाले तरी काँग्रेस बरोबर उद्धव ठाकरे यांनी जायला नको होते. कारण भाजप हा सत्तेवर होता त्याला बहुमत होते अशावेळी अल्पसत्ता असलेल्या केंद्रीय पक्षाशी राज्यातील सत्तेसाठी युती केली तर ओळखींच्या बाबतीत फार मोठे घोळ निर्माण होतात आणि तसे सर्व घोळ निर्माण झाले. ठाकरे यांनी जे काही केले ते सर्वसामान्य शिवसैनिकाला आवडले नव्हते .(शिंदे यांनी जे केले तेही त्याला आवडलेले नाही) वास्तविक मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची कामगिरी नक्कीच चांगली झाली होती परंतु ओळखीचे आणि अस्मितेचे राजकारण जेव्हा प्रभावी असते तेव्हा तुम्ही कितीही चांगले प्रशासकीय काम केले याचा हिशेब आंधळी झालेली जनता लावत नाही . तामिळनाडूमध्ये जे काय झाले ते अलीकडचे उदाहरण होय . लोकांनाच मुळात लोक कल्याणाविषयी काही पडलेले नाही . ही मानसिकता मुळातच इसवी सन 1000 पासूनच अत्यंत पद्धतशीरपणे तयार करण्यात आली होती आणि आजही भारतीय समाज त्यातून बाहेर पडलेला नाही. अपवाद फक्त शिवाजी महाराज ते पहिला बाजीराव हा कालखंड ! यातच भरीसभर म्हणून उद्धव ठाकरे यांनी जय श्रीराम म्हणायला सुरुवात केली . आता आंबेडकर आणि फुले या दोघांनाही रामा विषयी प्रेम नाही. फुले यांच्यासाठी राम हा आर्यांचा देव आहे तर आंबेडकरांनी रिडल्स लिहिलेलेच आहे . आश्चर्यकारकरीत्या शिवसेनेने बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आणि तिथेच हे स्पष्ट झाले की शिवसेना कितीही स्वतःला वर्ण मुक्त मानो ती फुले आंबेडकरवादी नाही त्यामुळे साहजिकच एक फार मोठा फुले आंबेडकरवादी वर्ग शिवसेनेपासून आपोआपच दूर झाला . आदिवासी किंवा भटक्या समूहा मधून सुषमा अंधारे यांना पुढे आणले तरी त्यांचे वोटिंग किती ? तुमचे हिंदुत्व जर का क्षात्र हिंदुत्व असेल तर मग ब्राह्मण धर्माचा कट्टर पुरस्कार करणाऱ्या रामायणातील रामाला तुम्ही कसा काय पाठिंबा देता ? की केवळ तो जन्माने क्षत्रिय आहे म्हणून हा पाठिंबा दिला गेला ? काय झाले ते सांगणे कठीण असले तरी एक गोष्ट मात्र झाली ती म्हणजे फुले आंबेडकरवादी ओबीसीबीसी वर्ग थोडासा दुरावत गेला . फुले यांचे नाव घ्यायचे आंबेडकर यांचे नाव घ्यायचे पण त्यांची रामाविषयीची भूमिका घ्यायची नाही असे काहीतरी इथे झाले. हे सर्व कमी पडले म्हणून की काय नंतर सेक्युलर पक्षाशी युती केली गेली इतकेच नव्हे तर सेक्युलर भूमिकेचे समर्थन केले गेले आणि ते कधी कधी इतके वाढत गेले की उद्धव ठाकरे काँग्रेस पक्षात तर नाहीत ना अशी शंका यावी त्यामुळेच सेक्युलर शिवसेना अशी तिसरी ओळख आता पुढे आली आणि या तिसऱ्या ओळखीने आधीच्या दोन्ही ओळखी झाकोळायला सुरुवात केलेली आहे. यातच भाजप विकासाच्या कामाला पैसेच देत नाही अशी ही तक्रार होती तर या तक्रारी विषयी काही स्पष्ट आंदोलनात्मक भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेणे आवश्यक होते पण ते घडले नाही याबाबतीत ते काँग्रेससारखेच काहीसे निष्क्रिय झालेले दिसतात . आज अवस्था अशी आहे की उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी आहेत असे त्यांच्याच पक्षातल्या अनेकांना वाटत नाही आणि त्यामुळेच त्या पक्षातले अनेक लोक पक्षांतर करताना दिसतात. हा फक्त गद्दारीचा मुद्दा नाही हा ओळखीचा आणि त्या ओळखीचे प्रक्षेपण कसे झाले आहे त्याचा मुद्दा आहे. भाजपचे सर्वात मोठे यश म्हणजे त्यांनी मराठी हिंदुत्वामध्ये व्यवस्थित फूट पाडली आणि राष्ट्रीय भारतीय हिंदुत्वामध्ये स्वतःला विलीन करायला तत्पर असणारा मराठी हिंदुत्वाचा एक मोठा भाग निर्माण केला आणि तो नंतर आपल्याबरोबर युतीत आणला . आज ना उद्या हा सर्वच्या सर्व मराठी हिंदुत्वाचा भाग भाजपमध्ये भाजपच्या राष्ट्रीय हिंदुत्वामध्ये विलीन होणार आहे मग एकनाथ शिंदे यांना काहीही वाटो . कदाचित स्वतः एकनाथ शिंदेच भाजपमध्ये जातील कारण त्यांचाही नाईलाज झालेला असेल. या संदर्भातले पहिले पाऊल श्रीकांतराव टाकतील असा माझा अंदाज आहे .वाईट फक्त याचेच वाटते की असे काही झाले तर उद्धव शिवसेनेचे ओळख असलेले धनुष्य घेऊन ते विलीन होणार आहेत . म्हणजे तेलही नेले आणि तूपही नेले अशी ही अवस्था आहे. एका अर्थाने शिंदे यांनी मिर्झाxx xxxx यांचा रोल पार पाडलेला आहे आणि स्वतःला शिxxx म्हणूनही दिल्लीच्या दरबारात सादर केले आहे .
हे सर्व काही हिंदुत्व ही राष्ट्रीय ओळख स्वतःच्या प्रादेशिक पक्षाला दिल्यामुळे घडलेले आहे . कोणी कितीही सांगितले तरी हिंदुत्व ही ओळख मूळची स्वभावानेच राष्ट्रीय ओळख आहे त्यामुळे कुठलीही प्रादेशिक हिंदुत्ववादी ओळख ही आज ना उद्या तिच्यात विसर्जित होणे अटळ आहे.
उद्धव ठाकरे यांना शिवसेना पुन्हा उभी करायची असेल तर त्यांनी सर्वात प्रथम आपली हिंदुत्ववादी ओळख शाबूत ठेवण्यासाठी सर्व सेक्युलर पक्षांशी संबंध संपवायला हवेत . तुम्ही एकाच वेळेला हिंदुत्ववादी आणि सेक्युलर असू शकत नाही . यासाठी फार मोठे धाडस लागते ठाकरे हे धाडस दाखवणार आहेत का हा खरा प्रश्न आहे.
अन्यथा मग हिंदुत्ववादी ही ओळख टाकून त्यांनी पूर्णपणे मराठी या ओळखीचा स्वीकार करायला हवा . या दोन गोष्टी एकत्र जाणे शक्य नाही . त्यासाठी ही उद्धव ठाकरे यांना धाडस करावे लागेल. प्रश्न तोच आहे हे धाडस ठाकरे यांच्याकडे आहे का ?
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment