सदानंद रेगे यांची कविता श्रीधर तिळवे नाईक 

मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये "मराठी वाङ्मय परपुष्ट आहे परंतु ते परेसे पुरेसे परपुष्ट नाही " या मर्ढेकर यांच्या निरीक्षणाला ज्या काही मोजक्या कवींनी छेद दिला त्यापैकी एक म्हणजे सदानंद रेगे होय. त्यांचे लिखाण परपुष्ट होते परंतु सशक्त होण्याइतके ते परपुष्ट होते . हा परपुष्टपणा अस्तित्ववादी तत्त्वज्ञानातून आणि साहित्यातून त्यांच्याकडे आला होता किंबहुना सुरुवातीच्या कालखंडामध्ये त्यांनी काही कविता पु शि रेगे यांच्या प्रमाणे सुद्धा लिहिण्याचा प्रयत्न केला काही बोरकरांच्या वाट्याने गेल्या होत्या . मात्र ते नंतर परपुष्ट झाले आणि म्हणूनच सशक्त झाले अन्यथा कदाचित ते रोमँटिक परंपरेत काहीतरी फालतुगिरी करत बसले असते आणि मराठीला कदाचित पाडगावकरांच्या आधीच एक पाडगावकर मिळाला असता .

रेगे फक्त कविता करत नव्हते तर त्यांच्या कविते सारख्याच असणाऱ्या कथा सुद्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत .

जगामध्ये आधुनिकतेची सुरुवात ज्या काही गोष्टींनी केली त्यातील सर्वात साहित्यावर प्रभाव टाकणारी जर गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे अस्तित्वमीमांसा! हीची सुरुवात कांट पासून झाली की नाही हा एक वादाचा प्रश्न असला तरी ज्याला खऱ्या अर्थाने अस्तित्व मीमांसा म्हणता येईल तिची सुरुवात निश्चितपणे सोरन किर्केगार्द या तत्त्वज्ञाने केली . अलीकडे डॅनिश तत्त्वज्ञ Fredrik Christian Sibbern याने या मीमांसेची सुरुवात केली असेही पुरावे पुढे येत आहेत 

या अस्तित्वमीमांसेच्या केंद्रस्थानी अस्तित्वाचे प्रश्न होते त्यातील काही प्रश्न मुख्य होते तर काही मुख्य प्रश्नांना अनुषंगिक म्हणून येणारे आप्तप्रश्न होते. 

१ अस्तित्ववादाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने पुरोगामी वाद नाकारला . त्यामुळेच सर्वप्रथम पुरोगामी वाद मानतो त्याप्रमाणे निसर्ग नाही,बुद्धी नाही ,इंद्रिये नाहीत, वास्तव नाही ,भाव नाही , विचारप्रणाली नाही, सिस्टीम नाही तर सर्वप्रथम स्वतःचे अस्तित्व jean paul sartre च्या भाषेत सांगायचे तर माणूस सर्वप्रथम अस्तित्वात असतो हे आद्य प्रमेय मांडले. सदानंद रेगे यांनी त्यांच्या पहिल्या संग्रहानंतर हे प्रमेय स्वीकारलेले आहे. त्यामुळेच एका अर्थाने आधुनिक माणसाची अस्तित्वस्थिती ते मांडत राहतात.

२ पुरोगामी वादाने सार्थक चर्चा केली सार्थक आहेच असे समजून चर्चा केली पण अस्तित्ववादाने अस्तित्व निरर्थक आहे या दुसऱ्या आद्य प्रमेयापासूनच सुरुवात केली ( मला स्वतःला absurd या शब्दासाठी नि: अर्थता हा शब्द सुचवावासा वाटतो )परंतु त्याचबरोबर अस्तित्वाला सार्थक करण्याची जबाबदारी माणसाची आहे असेही सांगितले .माणसाचा जन्म धर्म सांगतो त्याप्रमाणे ईश्वराने दिलेल्या कमांडमेंट पाळण्यासाठी झालेला नाही . माणसाचा जन्म कशासाठी आहे हे स्वतःच्या अस्तित्वाच्या संदर्भात माणसानेच ठरवायचे आहे असे अस्तित्व वादाने सांगितले आता जर का एखाद्या माणसाने या 10 कमांडमेंट प्रमाणे जगणे म्हणजेच सार्थक जगणे असे ठरवले तर ते सुद्धा अस्तित्व वादात बसते पण ही निवड त्याने स्वतः केली पाहिजे केवळ धर्म सांगतो म्हणून त्याने ते ऐकता कामा नये . धर्म म्हणतो त्याप्रमाणे चांगल्या माणसांच्या आयुष्यात सर्व गोष्टी चांगल्या घडतील असे नाही चांगल्या माणसांच्या आयुष्यात वाईट गोष्टी पण घडू शकतात आणि वाईट माणसांच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी पण घडू शकतात त्यामुळे तुम्ही धर्माप्रमाणे वागलात म्हणून तुमच्या वाट्याला चांगल्या गोष्टी येतील या भ्रमात राहू नका . आयुष्य तुम्हाला न्याय द्यायला बसलेले नाही जन्मलेले नाही . तेव्हा अन्याय आला तर तो सुद्धा सहन करण्याची तयारी असली पाहिजे . त्यामुळेच आत्महत्येच्या प्रश्नाला माणूस सतत तोंड देत असतो कारण जग आकलनात येत नाही आणि जग न्याय्य नाही अशी ही अस्तित्व मीमांसा मानते . ही ही गोष्ट रेगे यांच्या कवितेत दिसते त्यामुळेच ते पारंपारिक धर्माची आणि पारंपारिक वारकरी पंथाची सुद्धा कधी कधी टर उडवतात टवाळी करतात . त्यांच्यातली निरर्थकता सतत अंडरलाईन करत राहतात उदाहरणार्थ त्यांची उपनिषदांच्या संदर्भातली कविता पहा . हे एका अर्थाने अस्तित्वाचे नवे उपनिषद आहे परंतु जुन्या उपनिषदाची शैली ते अत्यंत निरर्थक पद्धतीने सादर करत एक संपूर्ण अस्तित्वमीमांसा इथे सादर होते.

३ अस्तित्वाचे आणि इतरांचे संपूर्ण आकलन माणसाला कधीही होणार नाही तेव्हा अनाकलन स्वीकारावे आणि आपण ते अत्यंत ऑथेंटिकली अस्सलतेने हाताळावे . आपण या जगात फेकले गेलेलो आहोत हे माणसाने स्वीकारावे. सदानंद रेगे यांच्या कवितेमध्ये जो माणूस आहे तो असा फेकला गेलेला माणूस आहे असे सतत वाटत राहते . माणसाला त्याच्या अस्तित्वाला या अस्तित्वाच्या आसपास असणाऱ्या जगाला वास्तवाला ते जसे आहे तसे स्वीकारावे आपल्या अस्तित्वाला मर्यादा असतात हे ही स्वीकारावे . सदानंद रेगे त्यांच्या कवितेमध्ये हे नक्की करतात परंतु त्या अस्तित्वाला ते आपल्या कल्पनाशक्तीने पूर्ण पणे पालटून टाकतात . एका अर्थाने निरर्थक अस्तित्वाला सार्थक करण्याचा हा निरर्थक प्रयत्न असतो .

४ खोटे जगण्यापेक्षा ऑथेंटिक अस्सलपणाने जगणे अतिशय महत्त्वाचे आहे . थोडे काव्यात्मक भाषेत सांगायचे तर खोट्या श्रीमंती पेक्षा अस्सल गरिबी केव्हाही अधिक उत्तम. हेही गृहीतक आपणाला सदानंद रेगे यांच्या कवितेत दिसते 

५ आपल्या अस्तित्वाला कोणताही हेतू नाही त्यामुळे अस्तित्वाचा हेतू शोधण्या ची जबाबदारी आपली आहे म्हणजेच आपल्या जगण्याचा हेतू आपणच तयार करावा सदानंद रेगे यांच्या कवितेत त्यामुळे सतत आयुष्याला हेतूच नसणे हे येत राहते 

६ अंतिमतः सर्व तर्क नि:अर्थतेकडे जातात रेगे यांच्या कवितेत ते अनेकदा दिसते. पुढे एका कवितेत हे मी दाखवणार आहे 

७ चिंता अटळ आहे ती येणारच पण ही चिंता जाज्वल स्वरूपामध्ये आलेली नाही अगदी त्यांचे गोची हे नाटक सुद्धा या अंगाने जसे यशस्वी व्हायला पाहिजे तसे झालेले नाही याचे कारण ही चिंता जेवढी ग्रासायला हवी तितकी ग्रासलेली नाही यांच्या साहित्याची ही एक मर्यादा आहे 

८ जे दुसरे आहे ते नरक आहे हाही घटक फार प्रमाणात आलेला नाही 

९ माणसाला अपरिहार्यपणे निवड करावी लागते . अनेकदा निवड करणे म्हणजेच जगणे होते . ही निवड कधीही खोट्या श्रद्धेच्या दडपणाखाली येऊन करू नये . तर ती आपणच करावी आणि आपल्या अस्तित्वासाठी करावी हा नाटकामध्ये जास्त आहे कवितेमध्ये कमी आहे कथेमध्ये खूप आहे 

१० माणसाला फक्त स्वातंत्र्य आहे आणि या स्वातंत्र्याला फक्त निवड करण्याचे सर्वाधिक स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य हे अस्तित्ववादामध्ये सर्वाधिक मूल्यवान आहे याचे कारण हे स्वातंत्र्यच अस्तित्वाला काही मूल्यवान देऊ शकते . या स्वातंत्र्यांबरोबर जबाबदारी पण येते आणि माणसाने ही जबाबदारी घेतली पाहिजे अनेकदा माणसे स्वतःच्या स्वातंत्र्याची जबाबदारी घेत नाही विशेषतः भारतामध्ये हे खूपदा घडते. भारतीय माणूस स्वातंत्र्य गहाण टाकायला टपलेला असतो की काय अशीच शंका येते .

११ नैराश्य अपरिहार्य आहे जोवर आशा आहे तोवर ते येतच राहते याच्या पलीकडे जाणे शक्य आहे का याचा शोध माणसाने नक्की घ्यावा. ही सदानंद रेगे यांच्या कवितेत अनेकदा सातत्याने आढळणारी थीम आहे 

१२ मृत्यू अटळ आहे तेव्हा या सत्याला तोंड द्यावे हे उत्तम. हेही गृहीतक सतत दिसते .

या अस्तित्वावादाच्या मुख्य थीम्स आहेत आणि सदानंद रेगे यांच्या कवितेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कवितांच्या मधून ह्या थीम्स सतत वाहताना दिसतात .

१९८२ च्या अभिरुचीच्या अंकात विलास सारंग यांनी सदानंद रेगे यांच्या कवितेची काही वैशिष्ट्ये व्यवस्थित टिपलेली आहेत. ते म्हणतात त्याप्रमाणे खरोखरच विमुक्त कल्पनाशक्ती हे सदानंद रेगे यांच्या कवितेचे एक आद्य प्रमेय म्हणता येईल पण हे प्रमेय अस्तित्व वादातूनच आलेले आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. अस्तित्व वादाचे स्वातंत्र्य हे मूल्य खऱ्या अर्थाने कवितेत जर कोणी मिरवलेले असेल तर ते म्हणजे सदानंद रेगे यांनी मिरवलेले आहे .

आणि एकदा का तुम्ही स्वतंत्र असला की मग अनेकदा सर्वसमावेशक सुद्धा होत जाता. सदानंद रेगे यांच्या बाबतीत हे घडलेले आहे. त्यामुळेच देशीवादी लोकांच्या लिखाणामध्ये ज्या प्रकारचा एकारलेपणा एकांगीपणा आला तो रेगे यांच्या कवितेत आला नाही हे विलास सारंग यांचे निरीक्षण बरोबर आहे पण त्याचबरोबर हेही खरे की देशी परंपरेचा प्रभाव पुरेशा प्रमाणात पडला नाही आणि त्यामुळेच त्यांच्या कवितेला जे मराठी वजन प्राप्त होऊ शकले असते ते प्राप्त झाले नाही. काही वेळा असे वाटते की परंपरा पचवल्या असत्या तर जास्त बरे झाले असते किंबहुना माझ्यासारख्या माणसाला त्यांच्यामुळेच एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे परंपरांकडे दुर्लक्ष करून चालत नाही तर त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष देऊन त्यांना व्यवस्थित पचवून पुढे जावे लागते . म्हणजेच वैष्णव वारकरी तुम्ही व्यवस्थित पचवावे लागतात मगच तुम्ही ओशो रजनीश होऊ शकता आणि ओशो रजनीश पचवले तरच तुम्ही मग स्वतःची वाट चालू शकता . अर्थातच एक विशिष्ट वेळ अशी येते की ज्या वेळेला सर्वच्या सर्व परंपरा धुळीला मिळवाव्या लागतात आणि स्वतःची पायवाट स्वतः निर्माण करावी लागते . रेगे सर्वसमावेशक झाले तरी ते कळत नकळत सॉक्रेटिसच्या आणि उपनिषदांच्या परंपरांशी खेळत राहिले ही ही वस्तुस्थिती आहे आज अवस्था अशी आहे की अस्तित्व वादाचे नाते सॉक्रेटीसशी जुळवलेले जास्त बरे किंबहुना अस्तित्व वादाला पोस्ट सॉक्रेटिक म्हणावे असा आग्रह धरणारे सुद्धा अनेक लोक आता निर्माण होत आहेत. सॉक्रेटिसचे जगणे हे ऑथेंटिक जगणे होते असे मांडणारे हे लोक आहेत . त्यामुळेच आपल्याकडे पुढे श्रीराम लागू यांनी सॉक्रेटिस सादर केला . त्यांची संपूर्ण पिढीच अस्तित्ववादी होती का असा प्रश्न त्यामुळे मला कधी कधी पडतो.

सॉक्रेटिस प्रमाणे रेगे स्वतः असे ऑथेंटिक होते का असा प्रश्न आपण विचारू शकतो . त्यांची कविता मात्र नक्की ऑथेंटिक च्या आसपास होती मात्र तिच्यावरचा पाश्चात्त्य प्रभाव हा स्पष्टपणे दिसतो. अस्तित्व वादामध्ये स्वतःच्या कल्पनाशक्तीला प्रचंड उधळणारे असे अनेक कवी निर्माण झाले या कवींच्या अनेक कविता रेगे यांनी व्यवस्थित पचवलेल्या होत्या आणि म्हणूनच ते मग अस्तित्ववादाचे कल्पनाकेंद्री आधुनिक केंद्री मराठीकरण ते सहजरीत्या साजरे करू शकले . ते सुरुवातीच्या पहिल्या संग्रहामध्ये रोमँटिक होते ही वस्तुस्थिती पण ते रोमँटिक होते म्हणूनच पुढे मग आधुनिकतेमध्ये ते आपोआपच अस्तित्ववादाकडे सरकले कारण बहुतेक सर्व अस्तित्ववादी लोकांच्या संपूर्ण विकासामध्ये रोमँटिक तत्त्वज्ञानाचा आरंभीच्या काळात खूप मोठा वाटा होता हे आता अधिक स्पष्ट झालेले आहे. 


ते एका कल्पने कडून दुसऱ्या कल्पनेकडे कसे जातात हे बघायचे असेल तर पुढील कविता पहा 


कवीला कवितेचा पिंड द्यावा

म्हणजे तो आपली

धिंड काढीत नाही


अन् डोहांत पडलेल्या चंद्राची

खिंडही अडवीत नाही…


कवितेचा पिंड ठेवला

की कवीचा पटकन्

कावळा होतो


सदानंद रेगे


कवीला कवितेचा पिंड द्यावा

म्हणजे तो आपली

धिंड काढीत नाही

इथे पिंड हा शब्द एका अर्थाने स्वतःच्या अस्तित्वाची ऑथेंटीसिटी म्हणून येतो . पण नंतरची कल्पनाशक्ती आहे ती चक्क यमक जुळवण्याच्या अंगाने आलेली आहे म्हणूनच पिंडला धिंड जोडला जातो 

पुन्हा मग शब्द चमत्कृतीसाठी खिंड येते पण मग कल्पनाशक्ती काय करणार तर ती कल्पनाशक्ती चंद्राला आणते आणि मग चंद्राची खिंड तयार होते आता खिंड कोणाला जाऊ देत नाही आणि चंद्राची खिंड असेल तर पाहायलाच नको बरं मग हा चंद्र कसा आहे तर तो डोहातला चंद्र आहे म्हणजे प्रत्यक्ष नाहीच प्रतिबिंब आहे आता प्रतिबिंबाची खिंड कशी काय तुम्ही पार पाडणार कारण प्रतिबिंबात तर घुसताच येत नाही म्हणजेच अस्तित्वमीमांसेमध्ये मांडलेला अनाकलनाचा मुद्दा इथे येतो . साहजिकच इथे बाजीरावाची सुद्धा आवश्यकता नाही . कारण तो असला तरी आणि नसला तरी तुम्ही स्वतः बाजीराव असला तरी किंवा नसला तरी तुम्हाला ही आकलनाची खिंड लढवता येणे शक्य नाही .


त्यामुळेच रेगे म्हणतात 

"अन् डोहांत पडलेल्या चंद्राची

खिंडही अडवीत नाही…"


पुढे मग अचानक श्राद्ध विधी जोडला जातो आणि आता या पिंडाचा अर्थ बदलतो कारण सर्वांनाच माहिती आहे की पिंड आणि कावळा यांचा काय संबंध आहे 

त्यामुळेच 


कवितेचा पिंड ठेवला

की कवीचा पटकन्

कावळा होतो


असे सदानंद रेगे म्हणू शकतात. इथे पुन्हा पराचा कावळा आठवतो. म्हणजे छोट्या गोष्टीचा मोठा गलबला होणे तसे काहीतरी शेवटी घडते .

एका अर्थाने कवी कवितेमध्ये आपला पिंड साजरा करून आपल्या अस्तित्वाला सार्थकता देतो .

त्यांच्या तुकारामावरच्या कविता या त्यांच्या पिढीला साजेश्या आहेत म्हणजे करंदीकर तुकारामा बाबत एका पद्धतीने जातात त्याला आणि शेक्सपिअरला समकालीन बनवतात तर रेगे आधुनिकतेची निरर्थकता वारकरी पंथाच्या पारंपारिक सार्थकतेत मिक्स करतात आणि तीची absurdity साजरी करतात. ( मी मागे एका लेखात आधीच लिहिलेले आहे की सत्य कथेची तुकारामाशी नाळ तुटली वगैरे मांडणी हा सगळा देशीवादी लोकांचा कांगावा आहे प्रत्यक्षामध्ये कुठल्याच महत्त्वाच्या मराठी कवीची नाळ तुकारामांपासून तुटली नव्हती स्वतःची स्वतंत्र जागा तयार करायला या देशीवादी लोकांनी नाळ तुटली वगैरे उगाच केलेली भुरटेगिरी समीक्षेत मांडून हा खोटेपणा बिंबवला.) मुख्य म्हणजे जणू काय आत्ताचे जे वास्तव आहे तेच तुकारामाच्या काळाचे वास्तव आहे असा काळ जुळणीचा नवाच खेळ सदानंद रेगे या तुकारामावरच्या कवितेमध्ये करतात . कल्पनाविलास असा की जो डोंगर वास्तव आहे तो तुकारामाने तयार केला असे ते म्हणतात . या कविता खूपच जागा व्यापतात म्हणून इथे देत नाही.

मराठीमध्ये अतिवास्तववादाची खरी सुरुवात ही कवी मनमोहन यांच्यापासून होते . त्यांचे युगायुगांचे सहप्रवासी ही मराठीतली खऱ्या अर्थाने पहिली ऑथेंटिक अतिवास्तववादी कविता आहे सदानंद रेगे ही परंपरा अधिक पुढे घेऊन जातात ते एका बाजूला अस्तित्ववादाच्या थीम्स घेतात आणि त्या themes साजऱ्या करताना ते मनमोहन यांच्याप्रमाणेच अतिवास्तववादी तंत्र वापरतात ज्यांना absurd थिएटरचा इतिहास माहिती आहे त्यांना हे सांगायला नको की हे टेक्निक युजीन आयनेस्कोच्या नाटकांमध्ये त्याने अत्यंत मोठ्या प्रमाणावर वापरलेले आहे . म्हणजे आशय अस्तित्व केंद्री आणि तंत्र अतिवास्तव असा हा युजीन आयनेस्कोचा नाटकीय खेळ आहे . या खेळापासून सदानंद रेगे प्रभावित झालेले स्पष्टपणे दिसतात . युजीन आयनेस्कोच्या नाटकाचे हे सादरीकरण आपणाला त्यांच्या वेड्या कविता मध्ये जास्त मोठ्या प्रमाणात दिसते . गंधर्व मध्ये सुद्धा ते येते देवा पुढचा दिवा मध्ये पण ते आहे . एक प्रकारची वेडी कल्पनाशक्ती ते आपल्या कवितेत खेळवत राहतात . अस्तित्ववादामध्ये तर्क केंद्रस्थानी नसल्याने ते तर्कशुद्ध राहत नाहीत त्यामुळेच एका ओळीनंतर दुसरी कविता काही तर्क पाळत येईलच असे नाही. आपण त्यांच्या कवितेला बा सी मर्ढेकर यांनी सांगितलेला काव्यांतर्गत तर्क सुद्धा अप्लाय करू शकत नाही कारण तो सुद्धा अनेकदा मिसिंग आहे. कधी कधी त्यामुळे कविता निश्चित स्वरूपाच्या अर्थाकडे घेऊन न जाता अस्तित्ववादाने सातत्याने मांडलेल्या निरर्थकतेकडे घेऊन जाते आपण असेही म्हणू शकतो की त्यांच्या कवितेचा तोच उद्देश आहे .

एक गोष्ट मात्र नक्की आहे मराठीत प्रत्येक कवीने आणि वाचकाने एकदा तरी हा कवी समग्र वाचणे आवश्यक आहे आणि म्हणूनच पॉप्युलर प्रकाशन जर सदानंद रेगे यांच्या कविता समग्रपणे प्रकाशित करत असेल तर आपण त्याचे स्वागत केले पाहिजे. 

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती