अज्ञेय तंत्र, ज्ञायक आणि आण्विक्षीकी अर्थातच आण्विक्षिकीकडून मोक्षाकडे श्रीधर तिळवे नाईक
मागच्या लेखांमध्ये आपण आण्विक्षिकीच्या संदर्भात काही चर्चा केली होती पण या आण्विक्षिकीच्या मुळापाशी आपण पोहोचलो नव्हतो. आता आपण थोडे याच्या मुळाशी असलेल्या एका तंत्रापाशी जायचे आहे .
भगवान शंकर यांनी जी ११४ तंत्रे दिली त्यातील सर्वच्या सर्व तंत्रे त्यांच्या आसपासच्या लोकांना कळालीच असे नाही . या तंत्रांच्या पाच पद्धती होत्या या पाच पद्धतीना अलीकडे आपण पंचतंत्र म्हणतो . अर्थातच काळाच्या ओघात पुढे त्याचेही डिस्टर्बॅशन झाले पण मुळात या पंचतंत्रापैकी जे ज्ञानतंत्र आहे त्याच्या अंगाने अनेक तंत्रे दिली गेली आणि त्यातील एक महत्त्वाचे तंत्र म्हणजे अज्ञेय तंत्र होय.
ज्ञान तंत्रांपैकी अनेक तंत्रे अशी होती की ती ज्यांना दिली होती त्यांनाच कळाली पण नंतर अनेक तंत्रांची वाट लागत गेली असेच एक वाट लागलेले तंत्र म्हणजे अज्ञेय तंत्र होय . आपल्याकडे नंतर यातूनच अज्ञेय वाद निर्माण झाला.
आज आपल्याकडे साधारणपणे एक शब्द प्रचलित आहे तो म्हणजे नायक पण या शब्दाचा मूळ अर्थ आदिवासी लोकांच्यात एकेकाळी खूप वेगळा होता. ज्ञायक असणारा आणि न्याय देणारा तो नायक ! त्यातूनच पुढे नाईक सरनाईक पटनाईक वगैरे आडनावे आलेली आहेत आणि तुम्हाला ती संपूर्ण भारतभर दिसतात याचे कारण सर्वच ठिकाणी आदिवासी होते आणि त्यांचे नायक होते .
ज्ञायक हा शब्द काही प्रमाणामध्ये अजूनही जैन परंपरेमध्ये शाबूत आहे पण व्यवहारात मात्र तो आज अस्तित्वात दिसत नाही. याचा मूळ अर्थ ज्याला ज्ञात असते तो ज्ञायक ! अर्थातच ज्ञायक हा फक्त माणसांच्यात असत नाही तर तो हत्तींच्यामध्येसुद्धा असतो लांडग्यांच्यामध्येसुद्धा असतो हत्तींच्यामध्ये तर अनेकदा हत्तीणच ज्ञायक असते .
भारतातल्या आदिवासी आणि शैव श्रुतीमध्ये साहजिकच जो नेता असेल तो ज्ञायक असणे कंपल्सरी होते . त्या काळामध्ये माणसांच्या टोळ्या भटकत होत्या हे आपण लक्षात घेतले पाहिजे अनेकदा पाणी संपले की निघा असाच प्रकार होता .याच लोकांनी प्रामुख्याने सुरुवातीची आण्विक्षिकी विकसित केली होती . भगवान शंकर यांनी ती प्रामुख्याने ते स्वतःच अनेक गणांचे नायक असल्याने तिला नीट आकार दिला अन्यथा पूर्वी ती फक्त शहाणपणाच्या क्षेत्रातच कार्यान्वित होती . शंकर किंवा शंभू किंवा शंभो किंवा लिंग देव किंवा लिंगो देव ही एक नंतर संस्था बनत गेली ( काही आदिवासी परंपरेनुसार त्यांच्या गणामध्ये किमान 88 शंकर किंवा शंभू किंवा शंभो किंवा लिंगो होऊन गेलेले आहेत)आणि अनेकदा हे लोक अनेक गणपतींचे प्रमुख असायचे आणि गण संघर्षांच्या मध्ये त्यांचा निर्णय अंतिम मानला जायचा. यातूनच पुढे लिंगो देव ही संकल्पना आली आणि याच देवाला नंतर बडा देव किंवा बुड्ढा देव म्हणण्यात आले आणि याच बडा देवमधून महादेव ही संज्ञा अस्तित्वात आली . बुढ्ढा या शब्दाला आत्ताचा जो म्हातारा असा जो अर्थ आहे तो सुरुवातीला नव्हता. उलट जो बडा आहे वाढलेला आहे जो वडासारखा आहे त्याच्यासाठी हा शब्द आहे.
या आण्विक्षिकीचे मुख्य दर्शन म्हणजे अर्थविद्या होय. शास्त्र या शब्दाचा मुख्य अर्थ न कळल्याने पुढे वैदिक श्रुतीने खूप घोळ घातले आणि कुठल्याही गोष्टीला शास्त्र म्हणायला सुरुवात केली म्हणजे उदाहरणार्थ नाट्यविदाला किंवा नाट्य विद्येला नाट्यशास्त्र म्हंटले जेणेकरून आमचे जे काय चालले ते शास्त्रानुसार चालले आहे असे सांगत पब्लिकला लुटता येईल. प्रत्यक्षात मी मागेच म्हटल्याप्रमाणे गणित भूमिती आणि आण्विक्षिकी एवढीच शास्त्रे होती आणि अर्थ हा विद्या किंवा विद होता. पुढे जाऊन विद हा शब्द तज्ञ म्हणून प्रचलित झाला त्याचे मूळ यातच आहे . अर्थातच मूळ शब्द वैदू आहे जो आज सुद्धा तामिळमध्ये आहे . अपवादात्मक वेळेला काही इतर भाषांच्यातपण तो वापरला जातो .हळूहळू तो वैद्य झाला आणि फक्त आरोग्यापुरता मर्यादित राहिला .
आज आपल्याला जे न्याय दर्शन दिसते त्याचे मूळ यातच आहे अर्थातच त्याचे वैदिकीकरण करण्यात आले आणि त्यामुळे फार घोळ झाले .
नायकाने न्याय द्यायचा असतो त्यामुळे साहजिकच त्याला आण्विक्षिकीशास्त्र आलेच पाहिजे अशी अट होती. आण्विक्षिकी ही तर्क,विधी, अनुशासन आणि न्याय अशा चार शाखांनी युक्त आहे .
तर्कातच प्रमाण विचार दडलेला आहे पुढे तो विकसित झाला आणि प्रमाण विचार म्हणून उदय पावला . सुरुवातीच्या कालखंडामध्ये प्रत्यक्ष , आप्त ही दोन प्रमाणे जास्त महत्त्वाची मानली गेली आणि त्यानंतर मग चिन्ह प्रमाण किंवा शब्द प्रमाण महत्त्वाचे मानले गेले.
यातील आप्त प्रमाण हे अनेकांना कोड्यात पाडते पण त्या काळामध्ये कुठल्याही व्यक्तीवर विश्वास ठेवता येत नव्हता कारण कोण बोलते हे फार महत्त्वाचे असते साहजिकच आप्त या शब्दाचा मुख्य अर्थ विश्वासार्ह व्यक्ती असा आहे आणि होता. प्रत्येक माणसाजवळ नातेवाईक आणि आप्तवाईक पाहिजे त्यातून त्याचा गोतावळा तयार होत असे . मुख्य म्हणजे विश्वासार्हता आहे की नाही हे यामुळे तपासता येत होते . कुठलीही व्यक्ती आली आणि आप्त झाली असे होत नसे. पुढे पुढे हा शब्द नातेवाईकांच्या पुरता मर्यादित करून शैव लोकांनी आपल्या पायावर धोंडा मारला . वास्तविक नातेवाईक सुद्धा विश्वासार्ह असेलच असे नाही. आणि एखादा नातेवाईक दोन्ही पक्षांचा नातेवाईक असू शकतो त्यामुळे त्याची साक्ष तपासायची कशी ? इथे नातेवाईक किंवा नाते प्रमाण नाही तर तो आप्त आहे की नाही म्हणजे तो विश्वासार्ह trustworthy आहे की नाही त्याची साक्ष विश्वासार्ह आहे की नाही हे महत्त्वाचे आहे. या आप्त लोकांच्यामुळेच आप्तावळा तयार होई. त्यामुळेच भारतीय लोकांच्या मध्ये आज सुद्धा आप्त प्रमाण खूप प्रमाण मानले जाते . ( विशेषतः लग्न ठरवताना हे खूपच चालते) मी नेहमी सांगतो की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण पूर्णपणे शैव असतो फक्त आपल्याला ते कळत नाही .
शैव श्रुतीमध्ये शब्द प्रमाण किंवा चिन्ह प्रमाण हे मात्र फार मोठे प्रमाण कधीही मानले गेले नाही. जर का प्रत्यक्ष प्रमाण आणि आप्त प्रमाण उपलब्ध नसेल तर मग याचा विचार केला जाई. पण याचा एक दुष्परिणाम असा झाला की शैव श्रुतीमध्ये तुम्हाला फारसे ग्रंथ दिसणार नाहीत सर्व काही मौखिक परंपरेने चाललेले दिसेल लिखित परंपरा त्यामुळे जितकी विकसित व्हायला पाहिजे होती तितकी ती झाली नाही आणि यामुळेच आज शैवांच्या अनेक गोष्टी जिथे मौखिक परंपरा शाबूत राहिली तिथेच जिवंत आणि सळसळत राहिल्या . पुढे शैव श्रुतीला छेद देण्यासाठी म्हणून वैदिक श्रुतीने किंवा युरेशियन श्रुतीने अत्यंत जाणीवपूर्वक शब्द प्रमाण केंद्रस्थानी आणले इसवी सन 1000 नंतर लिखित परंपरा आणली आणि या देशाचा पद्धतशीरपणे ताबा घेतला आणि त्यांच्या ह्या ताब्यानेच या देशाचा सत्यानाश केला . मांत्रिकीच्या प्रचारासाठी प्रसारासाठी शब्द प्रमाण केंद्रस्थानी येणे हे फार आवश्यक असते कारण मांत्रिकीचा आधारच मुळात शब्द आहे . शब्द प्रमाण माना याचा अर्थ प्रत्यक्ष व्यवहारांमध्ये मांत्रिकी प्रमाण माना आम्ही म्हणतो ते मंत्र प्रमाण माना असा असतो. वर्णव्यवस्थेनुसार अर्थातच ब्राह्मणाचा शब्द सर्वात महत्त्वाचा त्याच्या खालोखाल क्षत्रियाचा अशी ही व्यवस्था आहे . प्रत्येक क्षेत्रात आपले नाक लांब ठेवण्याचा हा मूर्ख प्रयत्न होता आणि त्यातून भारताच्या ज्ञान व्यवस्थेमध्ये कसलीही भर पडली नाही. फक्त पोपट निर्माण झाले .
त्यामुळेच आपल्याकडे राजकारणी लोक शब्द प्रमाण फुलवत बसतात. शब्दांशी खेळत बसतात . सर्वात वाईट गोष्ट म्हणजे दिलेली वचने पाळली पाहिजेत याचे कसलेही भान नाही . याचे कारण मुळातच आण्विक्षिकीचे प्रशिक्षणच नाही नैतिकतेचे प्रशिक्षण नाही. शब्द देणे आणि वचन देणे यांच्यामध्ये पूर्वी फरकच नव्हता . पुढे मग तो पडला कारण वचने पाळलीच पाहिजे अशी वैष्णव लोकांच्या मध्ये सुद्धा सक्ती होती प्राण जाय पर वचन न जाये हे त्यातूनच आलेले आहे . असो.
या सगळ्याचा विचार जेव्हा मोक्ष मिळवताना काय करायचे असा प्रश्न आला तेव्हा भगवान शंकरांना करावा लागला आणि यातूनच जे तंत्र विकसित झाले ते म्हणजे ज्ञानतंत्र होय. प्रत्येक ज्ञान तंत्रापुढे अनेक पेच असतं आणि त्यातील एक पेच म्हणजे खरोखरच आपणाला किती ज्ञात होऊ शकते ?
या एकाच प्रश्नाभोवती जे फिरत राहिले ते तंत्र म्हणजे अज्ञेय तंत्र होय आणि अर्थातच दुसरा प्रश्न प्रमाण कोणाला म्हणायचे .
तंत्र याबाबतीत सर्वात प्रमाण फक्त प्रत्यक्षाला मानते प्रत्यक्ष अनुभवाला मानते हे आपण लक्षात घेतले पाहिजे जास्तीत जास्त प्रमाण म्हणजेच विश्वासार्ह गुरु होय . एखादा स्वतःला गुरु म्हणत असेल तर त्याला गुरु म्हणता येत नाही तो गुरु विश्वासार्ह आहे की नाही हे प्रत्येक शिष्याने तपासलीच पाहिजे आणि ते त्याने प्रत्यक्ष वर्तनावरून तपासावे. म्हणजेच गुरु आप्त असला पाहिजे विश्वासार्ह असला पाहिजे .
या तंत्राच्या मते जे अंतिम सत्य आहे ते अज्ञान आहे आणि म्हणूनच अज्ञेय होणे म्हणजेच मोक्ष प्राप्त करणे . या संसारात जगताना आपण कायमच ज्ञेय असतो किंवा ज्ञाता असतो. पण जे अंतिम आहे ते मात्र अज्ञेय आहे .त्याचे ज्ञान होऊ शकत नाही म्हणूनच जे अंतिम सत्य आहे त्यालाच ह्या तंत्रामध्ये अज्ञेय म्हटलेले आहे
या तंत्राची सुरुवात अज्ञात पासून होते . कारण आपणाला या संसारामध्ये जगताना आपल्या आसपासच्या संसाराविषयी ज्ञान असावे लागते आणि संसार जास्तीत जास्त ज्ञात असावा लागतो . प्रत्यक्षात आपण सर्वच आईच्या पोटात असताना अनेकदा मोठ्या प्रमाणात अज्ञानी असतो आणि हळूहळू आपण या संसाराविषयी ज्ञानी बनत जातो . त्यातूनच मग आपल्या शरीरात ज्ञाता तयार होतो . ज्ञानाचा अहंकार वाढत गेला की हा अनेकदा स्वतःला सर्वज्ञ समजायला लागतो. प्रत्यक्षात कोणीही सर्वज्ञ असत नाही . पण याचा अहंकार त्याला स्वतःला सर्वज्ञ समजण्याची चूक करायला भाग पाडतो.
म्हणजेच एका अर्थाने सर्वात प्रथम अज्ञेय मग अज्ञान त्यानंतर मग ज्ञान त्यानंतर मग ज्ञाता त्यातूनच मग सर्वज्ञ समजण्याची माया आणि यातूनच बाहेर पडण्यासाठी मग केली गेलेली साधना ! त्यातूनच ज्ञानशक्तीच्या मर्यादांची झालेली जाणीव आणि मग जे आहे ते अज्ञेय आहे सत्य हे अज्ञेय आहे हे कळणे आणि साहजिकच मग सर्वात शेवटी अज्ञेय होणे .
संसारामध्ये जे अफाट पसरलेले असे अज्ञेय आहे ते संपूर्णपणे कधीही ज्ञेय होऊ शकत नाही. त्याचा एखादा भागच ज्ञेय होऊ शकतो कारण तुमच्यापुढे नेहमीच जे ज्ञेय असते ते मर्यादित असते. किंबहुना तुमचे ज्ञेय जितके वाढत जाते तितके तितके तुम्हाला कळत जाते की त्याच प्रमाणामध्ये कित्येक पटींच्या मध्ये अज्ञेय वाढत जाते एका अर्थाने
xज्ञेय = x x x अज्ञेय
असा एक फॉर्म्युला आपल्याला मांडता येईल मग शेवटी पर्याय काय उरतो? तर मेंदूला जे साध्य होत नाही ते प्राणाने साध्य करणे आणि म्हणूनच मग प्राण
अज्ञेय हे ज्ञेय कसे होईल ते पाहत नाही तर स्वतःच आपण अज्ञेय कसे होऊ ते पाहतो त्या अंगाने साधना करतो आणि शेवटी स्वतःच शिव म्हणजेच अज्ञेय म्हणजेच असणे होतो. हे असण्याला उपलब्ध होणे असते . हाच मोक्ष असतो . त्याचा आपण सर्वज्ञ असण्याचा भ्रम नाहीसा होतो माया नाहीशी होते त्याला हे कळून चुकते की संसारामध्ये आण्विक्षीकी कितीही महत्त्वाची असली तरी तिला मर्यादा आहेत प्रत्यक्षामध्ये मोक्षाच्या क्षेत्रामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा या काम केंद्री आणि अर्थ केंद्री आण्विक्षिकीचा त्याग करत तिला ओलांडत जावे लागते. इतकेच नव्हे तर आपण सर्वज्ञ आहोत हा भ्रम काढून टाकावा लागतो आणि आपण अज्ञ आहोत आणि राहणार हे स्वीकारावे लागते . आपले सगळे ज्ञान हे केवळ माया आहे याची प्रचिती त्याला येते. किंबहुना ही प्रचिती येते म्हणूनच तो मग अज्ञेय होण्याच्या प्रवासाला निघतो . त्यामुळेच या तंत्राला अज्ञेयतंत्र म्हणतात
प्रश्न असा आहे की हे तंत्र कोणासाठी आहे तर जे लोक अत्यंत विद्वान असतात त्यांच्यासाठी हे अज्ञेय तंत्र फार महत्त्वाचे आहे कारण त्यांच्यासाठी ते अधिक सोपे आणि सहज असू शकते. मात्र ज्ञानी असण्याचा अहंकार फेकून द्यावा लागतो मी हे खूपदा सांगितले आहे की शेवटी मोक्ष म्हणजे ज्ञानाचा अंत असतो तो इथेही होतो आणि शेवटी तुम्ही ते अज्ञेय बनता जे ज्ञेयाच्या पलीकडे आहे तेच शिव आहे तेच शून्य आहे . ते शून्य ते शिव तुम्हाला प्राप्त होवो अशी शुभेच्छा देऊन हे सर्व संपवतो .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment