आणीबाणी तिचा मेसेज आणि माझ्या कविता कवितेच्या शोधात १ क श्रीधर तिळवे नाईक
दहा वर्षे पूर्ण झालेल्या आणि अकरावे चालू असलेल्या मुलाला राजकीय गोष्टींच्या विषयी काय कळतं ? आणीबाणी जेव्हा जाहीर झाली तेव्हा ती काय असते हेही मला कळत नव्हते पण काही गोष्टीच अशा असतात की ज्या थेट तुमच्या घरात घुसतात आणिबाणी ही माझ्या घरात घुसलेली गोष्ट होती
आणीबाणीचा खरा प्रॉब्लेम एकच होता तो म्हणजे आपल्या विरोधकांना वाटेल त्या आरोपाखाली अटक करणे आणि त्यांची रवानगी तुरुंगात करणे . याबाबतीत जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर दाखल केलेले आरोप बघण्याजोघे आहेत .
माझ्यासाठी आणीबाणी म्हणजे वडिलांना झालेली अटक ! माझे वडील गांधीवादी होते आणि गांधीवादी असल्याने साहजिकच जयप्रकाश नारायण जे करत होते त्याला त्यांचा पाठिंबा होता. त्यामुळे त्यांच्याकडे आज ना उद्या नजर जाणे अटळ होते शिवाय ते काही कार्यकर्त्यांना मदत करत होते त्यामुळे जे अंगावर येईल असे त्यांना वाटत होते ते शेवटी त्यांच्या अंगावर आले .
माझ्यासाठी आणीबाणीची पहिली ओळख म्हणजे जेव्हा काहीच पुरावे मिळाले नाहीत तेव्हा काय करायचे म्हणून एक पैसा जास्त घेतला असा आरोप लावून दुकानाला लावले गेलेले टाळे आणि दाखल केली गेलेली दबाव पूर्ण केस ! घराची घेतली गेलेली झडती! या सगळ्या घटनांचा माझ्या कवितांच्यावर विशेषता 1982 ते 87 या कालखंडातील कवितावर प्रचंड प्रभाव आहे किंबहुना या कालखंडामध्ये हुकूमशाहीचा प्रतिकार करणाऱ्या अनेक कविता मी लिहिलेल्या आहेत . कदाचित सायकॉलॉजिकलीही आणीबाणीतून बाहेर येणे ही माझी गरज असावी आणि त्यासाठी हे सर्व लिहिले गेले असावे . आणीबाणी मुळे माझे बालपण करपले का हा एक फार मोठा प्रश्न कायमच माझ्या आयुष्यात असतो.
दुसरी ओळख मला हळूहळू या काळात झाली आणीबाणी म्हणजे काय ? इंदिरा गांधी यांच्या लोकांचा आणि अधिकाऱ्यांचा मूळ हेतू अर्थातच आणीबाणी विरोधकांना आणि विरोधात असलेल्या कार्यकर्त्यांना मदत करू नका असा दबाव निर्माण करणे . वडील कायमच गांधीवादी असलेले त्यामुळे साहजिकच ही स्वातंत्र्यावर गदा आहे असे त्यांचे प्रामाणिक मत ! दुकानांमध्ये आणीबाणी विरोधात असणाऱ्या कार्यकर्त्यांची दरवळ आणि त्यांच्यापर्यंत त्यांच्या घरापर्यंत योग्य तो किराणा जावा म्हणून करण्यात आलेली धडपड ! आणीबाणी विरोधी कार्यकर्त्यांना पकडण्यासाठी त्यांचा ठाव ठिकाण करण्यासाठी सतत येणाऱ्या विचारणा ! शिक्षा तर द्यायलाच हवी म्हणून मग जेलमध्ये असलेली सर्वच्या सर्व उधारी बुडवली गेली . माणूस पैशानेच खचला की आपोआपच शरण येतो हे त्या मागचे राजकारण ! आणीबाणी सामान्य माणसासाठी एवढीच असते . त्याच्या रोजंदारीवर आणि घरदार चालवण्यावर जी टाच पडते ती आणीबाणी !
अकरा आणि बारा रनिंग वय असलेल्या माझ्यासारख्या मुलाला आपल्या बापाला अशा तऱ्हेने जीवनातून जाताना बघून प्राप्त झालेले शहाणपण म्हणजे आणीबाणी असते दुकान बंद करायचे की उघडे ठेवायचे याबद्दल दुकानातल्या नोकरांशी केलेली चर्चा आणि नोकरांना सुद्धा अटक होऊ शकते का असा निर्माण झालेला प्रश्न म्हणजे आणीबाणी असते अर्थातच दुकान बंद करणे हे सर्वाधिक योग्य यावर नोकरांचे एकमत झालेले असते अशावेळी मग आपण दुकान चालू ठेवावे की नाही याबद्दल झालेला संभ्रम म्हणजे आणीबाणी असते शिवाय आता किराणा कसा पोचवायचा पोचवायचा की नाही यासारखे प्रश्न म्हणजे आणीबाणी असते पोलीस काठ्या आपटत येत जातच असतात त्यात आमचे तिळवे भांडार हे दुकान नेमके जेल समोर होते त्यामुळे आज कोणाला पकडून आणले आणि कोणाला सोडले याविषयीच्या सतत चर्चा म्हणजे सामान्य माणसासाठी आणीबाणी असते आणि ती आणीबाणी माझ्या दुकानाच्या आसपास अत्यंत मोठ्याने आवाज करत वावरत होती माझ्यावर संस्कार करत होती.
पुढे आणीबाणी विषयीचे अनेक दृष्टिकोन पुढे आलेले पाहिले पण तरीही स्वतःचा जो अनुभव असतो तो कविता लिहिताना कळत नकळत केंद्रस्थानी येतच राहिला .
इंदिरा गांधींना स्टॅलिन बनायचे होते का हा आणीबाणीच्या संदर्भातला सर्वात कळीचा प्रश्न आहे आणि मला असे वाटते की त्यांना बनायचे होते .भारताच्या इतिहासामध्ये त्यांना आपले नाव नोंदवायचे होते त्यामुळेच भारत ऑफिशिअली समाजवादी केला गेला साहजिकच कम्युनिस्टांचा आणीबाणीला पाठिंबा मिळत गेला पण समाजवादी लोकांच्या पैकी अनेक जण आणीबाणीच्या विरोधात गेले सर्वाधिक मोठा विरोध हा जयप्रकाश नारायण यांनी केला आणि त्यांना दहशतवादी घोषित करताना सरकारची जीभ कंपली नाही या सगळ्याचे पडसाद येणे अटळ होते
जयप्रकाश नारायण यांच्याभोवती यावेळी प्रचंड वलय निर्माण झाले होते ही वस्तुस्थिती आहे आणीबाणीला जनतेचा पाठिंबा नव्हता हीही वस्तुस्थिती ! कम्युनिस्टांच्या आजही हे लक्षात येत नाही. आंबेडकरवाद्यांच्यापैकीही नामदेव ढसाळ यांच्यासारखे इंदिरा गांधींच्या मध्ये स्टालीन आणि लेनिन शोधत होते आणि प्रियदर्शनी नावाची कविता ही लिहीत होते . ज्यावेळेला चीन समाजवादाचा त्याग करत होता त्या वेळेला इंदिरा गांधी स्टॅलिन होण्याची स्वप्ने बघत होत्या या परस्पर विरोधाला काय म्हणावे ? या परस्पर विरोधानेच पुढे चायना कोठे जाणार आणि इंडिया कुठे जाणार हे पक्के केले आणि भारत कायमचाच वीस वर्षे मागे गेला .इंदिरा गांधींनी या देशाची नासाडी केली हीच वस्तुस्थिती आहे दुर्दैवाची गोष्ट अशी होती की त्यांच्या जागी आणलेले मोरारजी देसाई हे इंदिरा गांधींच्या पेक्षा देखील वाईट नेतृत्व होते खरे तर विरोधकांच्याकडे यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे नेतृत्व आले होते पण मराठी माणसाला पंतप्रधान करायचे नाही हे कायमच ठरलेले असते तसे यशवंतराव चव्हाण यांच्या बाबतीतही ठरलेले होते जो विश्वास काँग्रेस मधून येऊन सुद्धा जगजीवनरामांच्यावर होता तो यशवंतराव चव्हाण यांच्यावर मात्र नव्हता हा विरोधाभास लक्षात घेण्यासारखा आहे. जॉर्ज फर्नांडिस मंत्री वाटत होते पण मुख्य प्रधान वाटत नव्हते. खरे तर जयप्रकाश नारायण पंतप्रधान झाले असते तर पुढचा सर्व जनता सरकार एपिसोड घडलाच नसता पण जी चूक महात्मा गांधी यांनी केली तीच जयप्रकाश नारायण यांनी केली. तुम्ही जर का सत्ता ताब्यात घेणार नसाल तर मग सत्तेच्या विरोधात आंदोलन करता कशाला असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला. सत्तेला फक्त विरोध करणाऱ्या लोकांना फार मान मिळत नाही कारण खरी कसोटी सत्ता राबवताना असते जयप्रकाश नारायण यांच्याकडे अशी क्षमता होती का हा एक फार मोठा प्रश्न आणीबाणीमुळे निर्माण झाला याच काळात गांधीवादी लोकांच्या पैकी विनोबा भावे आणीबाणीला अनुशासन पर्व म्हणत होते हे लक्षात घेण्याजोगे आहे गांधीवादी लोकांच्यातच फूट पडली होती त्याचे हे लक्षण ! इंदिरा गांधी भ्रष्टाचारी होत्या का हा एक फार मोठा प्रश्न या निमित्ताने चर्चेला आला आर्थिक पातळीवर भ्रष्टाचार त्या करत होत्या यावर माझा विश्वास नाही मात्र सत्तेच्या राजकारणात त्यांचा आचार हा भ्रष्टाचारच होता आणि लोकांनी त्या विरोधात निषेध नोंदवला . पुढे प्रशासकाने आणि प्रशासनाने आणीबाणीच्या नावाखाली जो दंगा केला त्याचे परिणाम इंदिरा गांधींना भोगावे लागले विशेषत: संजय गांधींच्या बाबतीत इंदिरा गांधी आंधळ्या झाल्या होत्या ही वस्तुस्थिती !अनेक शासक प्रशासकांनी आपली वैयक्तिक खुन्नस या काळात काढून घेतलेली आहे .हप्ते न देणाऱ्या दुकानदारांच्या वर कशा केसेस झाल्या हे मी फार जवळून बघितलेले आहे आणि नंतरही त्यांचे अनेक घरगुती किस्से या अंगाने ऐकलेले आहेत .तुम्ही कितीही प्रामाणिकपणे दुकानदारी करा कुठला ना कुठला तरी कारकूनी तपशील तुम्हाला बरोबर तुरुंगात धाडू शकतो हे आणीबाणीने सिद्ध केले .अनेक लोक यामुळे तुरुंगात गेलेले आहेत इंदिरा गांधींच्या विरोधी जे वातावरण तयार झाले त्याला कारण या गोष्टी होत्या. तुम्ही लोकांच्या स्वातंत्र्यावर घालाल तर लोक तुम्हाला माफ करणार नाहीत हा आणीबाणीचा खरा मेसेज आहे. प्रत्येक सरकारने तो लक्षात ठेवावा नाहीतर जे इंदिरा गांधींचे झाले तेच तुमचेही होईल मग तुम्ही कितीही मोठे नेतृत्व असा हे लक्षात ठेवणे हा आहे लोकशाहीचा खरा आधारस्तंभ स्वातंत्र्य आहे आणि त्यात अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य ही येते हे आणीबाणीच्या निमित्ताने लक्षात येते .
या काळामध्ये माझी पहिली कथा जी आली ती आणीबाणी वर होती याचे आता आश्चर्य वाटते अमेरिकेचे अध्यक्ष आले तेव्हाची गोष्ट या कथासंग्रहामध्ये त्यामुळेच पहिली कथा ही आणीबाणीवर आहे.
माझ्या कवितांच्याच मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणावर आणीबाणी वर अधिकार शाही वर कविता आहेत .
आणीबाणीने उदारमतवादाचा चेंदामेंदा केला आणि त्याला जबाबदार डावा विचार होता कारण हा डावा विचारच उदारमतवादावर या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आघात करत होता. काही लोकांच्या मते तर उदारमत वाद ही भांडवलशाहीने खेळलेली खेळी होती . हे लोक अनेकदा त्यामुळे स्टैलीनने केलेल्या हत्यांचे समर्थन करत होते . भारताच्या एकंदरस पिंडामध्ये इतका टोकाचा आग्रह बसत नाही तुम्हाला नेहमीच सुवर्ण मध्य काढावा लागतो इंदिरा गांधी हा सुवर्ण मध्ये काढण्यात अपयशी झाल्या पुढे मग नरसिंहराव आणि मनमोहन सिंग या जोडीने हा सुवर्ण मध्य काढला.
श्रीधर तिळवे नाईक
कवितेच्या शोधात १ ड आणीबाणी , संकल्पनांच्या भूगोलांचा झालेला अस्त आणि भटकत चाललेले मॅपिंग श्रीधर तिळवे नाईक
आणीबाणी मुळे नेमके काय झाले हा एक फार मोठा प्रश्न सतत विचारला जातो. माझ्या मते लोकांचा आयडॉलॉजी वर असलेला विश्वास उडणे हा आणीबाणीचा सर्वात मोठा परिणाम होता जेव्हा तुमची पंतप्रधानच लोकशाही समाजवाद नावाची स्वतःच्या पक्षाची आयडियालॉजी धुळीला मिळवते तेव्हा लॉजी या शब्दाला काहीही अर्थ उरत नाही. साहजिकच मग विचार प्रणाली जाऊन फक्त सत्ता प्रणाली उदयाला येते आणि हे सर्व आणीबाणी नंतर घडले. याचा सर्वाधिक खोलवर परिणाम हा माझ्या पिढीवर झाला कारण आम्ही जे राजकारण कळत्यावयात पाहायला लागलो तिथे कुठेही आयडिओलॉजी नावाची गोष्टच नव्हती. कोण कुठे जातोय याचा पत्ता लागत नव्हता आणि याच काळामध्ये आयाराम गयाराम ही संकल्पना आली. आज या संकल्पनेने अत्यंत मोठा भूगोल व्यापलेला आहे आणि संकल्पनांचा भूगोल पूर्णपणे विस्कळीत केलेला आहे .
आयडिओलॉजी म्हणजे शेवटी काय असते तर ती अनेक संकल्पनांचा सामूहिक भूगोल असते जो एका मॅपिंग मध्ये कन्व्हर्ट झालेला असतो आणि हे मॅपिंग आपणाला व्यवस्थित दिशा दाखवत असते . पण जेव्हा त्या मॅप मधले अनेक बिंदू आयाराम आणि गयाराम करत असतात तेव्हा मग सर्व गोष्टी नकाशाप्रमाणे घडणे अशक्य बनत जाते आणि "मॅपिंग प्रमाणे वॉकिंग" ही संकल्पना पूर्णपणे धुळीला मिळत जाते. अनेक राजकीय प्रवास मग अशक्य होत जातात भटकायला लागतात किंवा दारुडे बनतात . एका अर्थाने हा डाव्या विचारांचा अंत होता पण त्याचबरोबर हेही खरे की सहकारी चळवळीला आणि गांधीवादी चळवळीला सुद्धा यामुळे कळत नकळत छेद बसला .
प्रत्येक पिढीला स्वतःच्या म्हणून काही सामाजिक चिंता असतात तणाव असतात आमच्या पिढीमध्ये आमची पिढी रांगायला लागली तेव्हापासूनच भौगोलिक दिशेचा अभाव आणि भटकण्याची भीती या चिंतेने ग्रासून गेली . राजकीय करिअर करायचे म्हणजे नेमके आपण काय करायचे असते असा एक फार मोठा प्रश्न आयडियालॉजीच्या अंतानंतर निर्माण झाला. साहजिकच संधीसाधूपणा उदयाला आला आणि आज तो शिगेला पोहोचलेला दिसतो. इंदिरा गांधींनी एका इंटरव्यू मध्ये म्हटले होते की मी माझ्या वडिलांच्या सारखी नाही याचा खरा अर्थ आणीबाणीत कळाला म्हणजे असे की मी वडिलांच्या सारखी विचारप्रणालीशी एकनिष्ठ नाही मला जे काय जमते ती सत्ता प्रणाली आहे आणि सत्ता कारण आहे . अनेक लोकांनी या सत्तावादाला या काळात आणि नंतर ही मुलामा देण्याचा प्रयत्न केलेला आहे यातील सर्वाधिक यशस्वी प्रयत्न हा कुमार केतकर नावाच्या विचारवंताचा होता अर्थातच आमच्यासारख्यांना काही तो पटला नाही कारण आमचे अनुभव वेगळे होते .
प्रश्न असा होता की नंतर काय आणि दुर्दैवाने या प्रश्नाचे उत्तर फक्त कोलाहल असे होते. राजकारणामध्ये याचे स्वरूप जनता पक्ष आणि त्या जनता पक्षाचा कोलाहल या रूपात अवतरले . मुख्य म्हणजे जनसंघाची आयडॉलॉजी आणि समाजवादी यांचे कसे काय पटणार होते? पण काँग्रेस या कॉमन शत्रूला हरवण्यासाठी आयडिया लॉजी चे आत्तापर्यंत चालत असलेले मॅपिंग पूर्णपणे नाकारत हे लोक एकत्र आले आणि या वॉकिंगचा फायदा फक्त जनसंघाला आणि काँग्रेसला झाला . जनतेला सुद्धा असे वाटले की आता काँग्रेस खेरीज काहीही पर्याय नाही कारण काँग्रेस ही एकमेव संघटना अशी आहे की जी कोलाहल दूर करू शकते. म्हणजे ज्यांना हरवले त्यांच्या परतण्याची वाट खुद्द विरोधी पक्षानेच तयार केली . हा संपूर्ण कालखंड जर आपण पाहिला तर त्याला सहजरीत्या राजकीय कोलाहालाचा आरंभ म्हणता येते. एका अर्थाने भारतातल्या राजकीय पोस्ट मॉडर्निझमची ही सुरुवात होती.
साहजिकच पोस्ट मॉडर्निझम चा पहिला बिंदू धर्म हा राजकारणात आणीबाणी नंतर ताबडतोब अस्तित्वात ठळकपणे आला आणि त्याचे नाव होते खलिस्तान ! साहजिकच पंजाब वर मी या काळामध्ये अनेक कविता लिहिल्या. माझ्या दहशतवादावरच्या या काळातल्या कविता या प्रामुख्याने पंजाब आसाम नंतर अर्थातच खोमेनी यांचा असलेला इस्लाम आणि श्रीलंकेमधील तमिळ यांच्या अंगाने होत्या.
यातच इंदिरा गांधी यांची हत्या खलिस्तानवादी लोकांनी घडवून आणली . दहशतवादाने घडवून आणलेला हा पहिला पंतप्रधानी मृत्यू होता .
यातूनच डोक्यात घोंगावणारे पहिले मोठे वादळ चक्कर हेच होते की भारतानेच पार्टीशन केले आणि धर्माच्या राजकारणाला चक्क दोन देश निर्माण करून आरंभ केला आणि नंतर दहशतवादाचा अशा प्रकारचा अविष्कार सुद्धा खोमिनींच्या इस्लाम क्रांती नंतर ताबडतोब भारतात झाला . ही इस्लाम क्रांती 19 79 ला झाली आणि ताबडतोब भारतात खलिस्तान वादी क्रांती आणण्याचे प्रयत्न सुरू झाले हा योगायोग नव्हता .भारताच्या इतिहासामध्ये धर्म हा किती केंद्रस्थानी आहे हे दर्शवणारे हे सर्व वास्तव होते .साहजिकच या सगळ्या प्रकारावर माझ्या अनेक कविता आलेल्या आहेत . माझा या काळातल्या इस्लामिक क्रांतीला असलेला विरोध मला हिंदुत्ववादाच्या जवळ घेऊन गेला . मला वाटते केवळ मीच असा नव्हतो तर आमची अख्खी पिढीच हिंदुत्ववादाकडे सरकायला सुरू झाली होती आमच्या या पिढीचा हा कल बहुदा स्वतःला जनतेशी निगडित वगैरे मानणाऱ्या पुरोगामी वादी लोकांना कळला नाही . यामुळे शिवसेना वाढत गेली भाजप वाढत गेला . आजही पुरोगामी वाद साहित्याचे सर्व क्षेत्र बळकावून बसलेला आहे पण खरोखर त्यांना हा प्रश्न का पडला की नाही ? ही पिढी हिंदुत्ववादाकडे का सरकत आहे? असा प्रश्न त्यांनी स्वतःला तरी नीट विचाराला का आणि मुख्य म्हणजे उत्तर आयडियालॉजीच्या प्रश्नात न अडकता सोडवण्याचा प्रयत्न केला का ? खरे तर आपण खरोखर आत्मपरीक्षण केले पाहिजे असे वाटण्याचा हा काळ होता आणि मग साहजिकच माझी माझ्या पद्धतीने आत्मपरीक्षण करण्याची एक शैली विकसित झाली होती आणि तिचा प्रचंड प्रभाव या काळातल्या कवितांच्यावर पडलेला दिसतो .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment