सत्य , सूर्य , वैद्यकीय व्यवसाय, सूर्य ज्ञान प्रणाली , तिचा उदय आणि अस्त श्रीधर तिळवे नाईक
अनारीय शैव आणि युरेशियन आर्य अशा दोन्ही श्रुतींच्या मध्ये आपणाला एक गोष्ट कॉमन दिसते ती म्हणजे दोन्हीमध्ये वारंवार सत्याचा विचार केला गेलेला दिसतो आणि हा विचार अनेकदा सूर्य विचाराशी निगडित असलेला दिसतो . या सगळ्या विचार करण्याच्या प्रक्रियेला मी सूर्यज्ञानप्रणाली असे म्हणतो . भारतानेच प्रथम सूर्य सिद्धांत मांडला हे तर आता स्वयं स्पष्ट आहे त्यामुळे त्यात जास्त घुसत नाही पण या सूर्य ज्ञान प्रणालीच्या संदर्भात काही गोष्टी सांगणे आता आवश्यक वाटते म्हणून बोलत आहे
शैव श्रुतीमध्ये सत्य शिव म्हणजे शून्य आहे . ज्ञानाचा अंत झाल्याशिवाय तुम्ही शिवाला उपलब्ध होऊ शकत नाही असे स्पष्ट प्रतिपादन या श्रुतीमध्ये केले गेलेले आहे . काम अर्थ मोक्ष हे तीन अक्ष इथे स्वीकारले गेलेले आहेत . धर्म मात्र स्पष्टपणे नाकारला आहे आणि त्या ऐवजी दंड स्वीकारला गेला आहे आणि पुढे त्यातूनच अर्थविद्या जिला पुढे अर्थ शास्त्र म्हंटले गेले आहे ती आलेली आहे. वैदिक परिभाषेत सांगायचे तर शैव श्रुतीमध्ये धर्म हा अर्थाचा दास आहे ( महाभारतामध्ये शेवटी भीष्म हेच म्हणतात )अर्थाचा भाग आहे तो अर्थापेक्षा वेगळा नाही आणि तो अर्थातून निर्माण होतो.
सत्य दिसावयाला सूर्यासारखे असते ते प्रकाशमान असते ही अनारीय शैव लोकांची धारणा आहे .भारतात आलेले युरेशियन मात्र इंद्राला प्रमुख मानत होते हे ऋग्वेदावरून स्पष्टच आहे किंबहुना ऋग्वेदामध्ये असुर परंपरा आणि सूरपरंपरा यांच्यामध्ये जो संघर्ष आहे तो देवतांचा संघर्ष आहे म्हणजे असुर सूर्याला प्रमुख मानतात कारण ते शैव आहेत तर सूर इंद्राला प्रमुख मानतांना दिसतात .
ऋग्वेदिक काळामध्येच मूळ युरेशियन परंपरेमध्ये असणारा पण शैव श्रुतीशी आपला संबंध जोडणारा विश्वामित्र हा पहिला ऋषी निर्माण झाला. त्यांनी सूर्य हे पृथ्वीवरील लोकांच्यासाठी मुख्य शिवलिंग आहे ही शैव संकल्पना स्वीकारली ( भारतातली सूर्य मंदिरे ही त्यामुळे निर्माण झालेली आहेत याची अनेकांना कल्पना नाही) विश्वामित्रांनी स्वतःचा गायत्री मंत्र सांगून युरेशियन लोकांच्या मध्ये सूर्य आणि सत्य यांच्यामधील हे अद्वैत प्रस्थापित करणे सुरू केले पुढे मग उपनिषदांच्या मध्ये
"हिरण्यमयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् ।"
(ईशावास्योपनिषद्, १५)
अशा रीतीने ते प्रकट होत राहिले.
पुढे याच ऋग्वेदिक विश्वामित्र परंपरेमधून पुढे आलेले याज्ञवल्क्य म्हणतात,"धर्म आणि सत्य वेगळे नाहीत जो धर्म बोलतो तो सत्य बोलतो जो सत्य बोलतो तो धर्म बोलतो "
"यो वै स धर्मः सत्यं वै तत् ।
तस्मात् सत्यं वदन्तमाहुर्धर्मं वदतीति । धर्म वा वदन्तं सत्यं वदीति ।"
( बृहदारण्यक उपनिषद् १ । ४ । १४)
धर्म आणि मोक्ष या दोन ज्या भिन्न गोष्टी होत्या त्या एकत्र करण्याची प्रथा ज्या काही मोजक्या उपनिषदांनी सुरू केली त्यात हे उपनिषद येते आणि विश्वामित्र परंपरा ही याज्ञवल्क्यमध्ये त्यामुळे जिवंत राहत सळसळते
सत्य विषयी बोलता येते पण सत्य बोलता येत नाही आपण जास्तीत जास्त खरे बोलू शकतो ही वस्तुस्थिती आहे .ती त्या काळात तितकी स्पष्ट नसली तरी सत्य शब्दात पकडणे अवघड आहे हे शैव अनार्य आणि वैदिक या दोन्ही भारतीय श्रुतींना माहिती होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे .
वैदिक आणि उपनिषदिक काळानंतर मग ब्राह्मण केंद्रस्थानी येतात त्यांचा ब्राह्मण धर्म येतो आणि तो हे सर्व ताब्यात घेऊन एक नवा धर्म निर्माण करतो तो म्हणजे ब्राह्मण धर्म होय
हा ब्राह्मण धर्म सूर्य केंद्रस्थानी आहे हे स्वीकारतो इतकेच नव्हे तर त्या अंगाने असलेले ज्योतिष ही स्वीकारतो आणि त्यातून फल ज्योतिष निर्माण करतो . फल ज्योतिषामध्ये ज्याला लग्न स्थान म्हणतात ते सूर्यामुळे निश्चित होते हेही स्वीकारतो .( ही गोष्ट महत्त्वाची आहे कारण त्या काळामध्ये या ब्रह्मांडा विषयी जगाविषयी जी काय संकल्पना होती ती फल ज्योतिषामध्ये आपणाला जास्त प्रॅक्टिकल स्वरूपात दिसते आणि भारतात जगाच्या केंद्रस्थानी सूर्य आहे हे स्वीकारण्यात आलेले होते हे लक्षात घेण्याजोगे आहे नंतर मग त्याच्याच आधारे सूर्य सिद्धांत शास्त्रीय आणि वैज्ञानिक स्वरूपात आला )
ब्राह्मण धर्म फक्त तिथेच थांबत नाही तो मग आता ब्राह्मणे, अरण्यके आणि स्मृती निर्माण करतो मोक्ष सुद्धा धर्माच्या अंडर आणायला बघतो . इथेच जैमिनीच्या मीमांसा दर्शनाचा पाया घातला जातो जे यज्ञ करून मोक्ष मिळवून देण्याची गॅरंटी देते . म्हणजेच धर्म आणि मोक्ष दोन्ही ब्राह्मणांच्या अधीन होतात आणि याचे माध्यम यज्ञसंस्था असते .
परंतु शैव श्रुतीचे युरेशियन लोकांच्यावर झालेले आक्रमण थांबत नाही. युरेशियन लोकांच्या पैकी जिला विश म्हटले जाते ती जनता स्पष्ट आणि स्वच्छ पणाने मूर्तिपूजा आणि शिवशक्तीईश्वरलिंग पूजा स्वीकारते.
त्यामुळे जेव्हा महाकाव्यांचा काळ सुरू झालेला दिसतो तेव्हा आपणाला यज्ञ आणि पूजा अशा दोन्ही गोष्टी एकत्र नांदताना दिसतात . या महाकाव्यातले नायक आणि खलनायक दोघेही यज्ञ आणि पूजा दोन्ही करतात . धर्म आणि मोक्ष यांना एकत्र करणारा ब्राह्मण धर्म इथे स्पष्टपणे नाकारला जातो त्यामुळेच महाभारतामध्ये व्यासांनी राजन सत्य आणि ब्रह्म सत्य असे सत्याचे दोन प्रकार केलेले आहेत आणि त्यातील राजन सत्य हे कालनिष्ठ तर ब्रह्म सत्य हे काळाच्या अतित आहे असे स्पष्ट सांगितलेले आहे . ते म्हणतात ," राजन् सत्यं परं ब्रह्म सत्यं च समयः परः । मा त्याक्षी समयं राजन् सत्यं संगतमस्तु ते ॥ ४ ॥"( महाभारत, आदिपर्वणि सम्भवपर्व )
त्यामुळेच महाभारतात राजन सत्य आणि ब्रह्म सत्य अशी दोन्ही प्रकारची सत्ये सांगितली जात असताना दिसतात म्हणजे ज्याला आज यक्षप्रश्न म्हटले जाते ते जास्तीत जास्त ब्रह्म सत्य सांगते इथे शैव-धर्माचे रूपांतर ब्रह्म धर्मात झालेले स्पष्टपणे दिसते. अगदी नंतर लिहिलेल्या भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्ण स्वतःला रुद्र म्हणवतो इतकेच नव्हे तर स्वतः पुत्र व्हावा म्हणून शंकराची साधना करतो आणि पुत्र झाल्यावर आपल्या मुलाचे नाव सांबा असे शैव ठेवतो .
ऋग्वेदामध्ये अश्व हा शब्द घोडा म्हणून येतो हे खरे आहे परंतु कधीकधी तो शैव अर्थाने सुद्धा येतो . शैव श्रुतीमध्ये अश्व या शब्दाचा अर्थ पूर्ण पणे वेगळा आहे इथे अश्व म्हणजे जो श्वासांचाही कर्ता आहे जो माणसाचे शरीर आश्वस्त करतो ज्याच्यामुळे शरीराला स्वास्थ प्राप्त होते आणि जो नसला की शरीर अस्वस्थ होते असा प्राण आहे. हा शब्द श्वासापासून श्वसनापासून तयार झालेला आहे . ज्याच्यात श्वास असतो ते श्वापद होय कारण त्याच्यात मुख्य पद म्हणजे मुख्य पाय हा श्वास असतो . युरेशियन लोकांनी आणलेला घोडा शैव लोकांनी सुद्धा नंतर स्वीकारला त्याचे कारण त्याच्या श्वास क्षमता अफाट आहेत त्यामुळेच त्याला प्रचंड वेग प्राप्त होऊ शकतो जो हत्तीकडे नाही . अर्थातच युरेशियन परंपरेने सुद्धा नंतर हत्ती स्वीकारलेला दिसतो आणि इंद्राला त्यामुळेच ऐरावत नावाचा हत्ती दिला गेला . लक्षात घ्या शैव श्रुतीमध्ये ज्या काही सत्याविषयीच्या कल्पना आहेत त्यामधली एक कल्पना म्हणजे सत्य हे हत्तीप्रमाणे म्हणजे नागाप्रमाणे असते . इथे नाग या शब्दाचा अर्थ हत्ती आहे पुढे तो युरेशियन लोकांनी बदलून टाकला . मूळ शैव श्रुतीमध्ये साप हा कुंडलिनीचा प्रतीक आहे आणि म्हणून तो शंकराच्या गळ्यात असतो . ही कुंडलिनी जागृत झाली की तुमच्या शरीरात असलेले सर्व विष बाहेर फेकते . त्यामुळेच शंकराच्या गळ्यात असलेला नाग म्हणजेच कुंडलिनी आणि या कुंडलिनीने फेकलेले आणि गळ्यात असलेले विष एकत्र दाखवले जाते. पुढे मग त्याच्या आधारे समुद्रमंथनाची भाकडकथा निर्माण केली गेली पण तिला काहीही अर्थ नाही. हा नाग आणि हे विष दोन्ही शंकर आदियोगी असल्याचे लक्षण आहे. ज्याने कुंडलिनी वर संपूर्ण प्रभुत्व मिळवलेले आहे असा तो आहे. कुंडलिनी हे सत्य प्राप्त करण्याचे सर्वात सोपे माध्यम आहे मुख्य म्हणजे ते शास्त्रीय साधन आणि माध्यम आहे . त्याच्यासाठी कुठल्याही ईश्वराची किंवा देवाची गरज भासत नाही. ते तुम्हाला थेट मोक्षाकडे घेऊन जाते .
या सगळ्या विकासामध्ये साहजिकच मग नंतर देव म्हणजे जे प्रकाशित करते ते असा अर्थ झाला . साहजिकच
"देवस्य त्वा सवितुः प्रसवेऽश्विनोर्बाहुभ्यां पूष्णो हस्ताभ्यां प्रसूत आ रथे ।"
( अथर्ववेद १९ । ५१ । २ )
ही धारणा पुढे आली .
इंद्रिय रुपी अश्वांना जो पूर्ण पणे स्वतःच्या नियंत्रणात आणतो तो अश्विन असा इथे मूळ अर्थ आहे . त्यामुळेच पुढे आश्विन याचा एक अर्थ वैद्य झाला कारण तुमची इंद्रिये वैद्य म्हणजेच अश्विन कुमार नीट करतो .
पुढे मग या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या लक्षात आले की सूर्यामुळे कधी कधी वनस्पतींच्या मधल्या औषधी गुणधर्मांचा नाश सुद्धा होतो आणि म्हणूनच मग चंद्र सुद्धा अश्विन झाला कारण अनेक औषधी सावल्यांच्या मध्ये टिकतात त्यामुळेच
"यद् व्यश्नुवाते सर्व रसेनान्यो ज्योतिषान्यः सूर्याचन्द्रमसौ अश्विनौ ।"
(निरुक्त १२ । १ । १)
इथे सूर्य आणि चंद्र दोन्हीही अश्विन आहेत .
आता या प्राणरूपी सूर्याचे सात घोडे कोणते पंचंद्रिये हे पाच हात आणि पाय हे दोन असे मिळून हे सात घोडे होतात
यांचे आरोग्य पूर्णपणे आश्विन म्हणजेच वैद्याच्या ताब्यात असते .
एका अर्थाने मोक्षिक सत्याकडून मेडिकल सत्याकडे झालेला हा प्रवास आहे .
प्रश्न असा आहे की मग चंद्राकडे काय आहे . तर चंद्राकडे मन आहे . त्यामुळेच मग सोम या ऋग्वेदिक शब्दाचा मद्य हा अर्थ पूर्णपणे बदलून शेवटी सोम या शब्दाचा अर्थ औषधीयुक्त पेय असा झालेला आहे . आणि चंद्राला या अर्थाने सोम म्हटले गेले . पूर्वी त्याला फार वेगळ्या अर्थाने सोम म्हटले जात होते .
हळूहळू युरेशियन परंपरेला कळून चुकले की शक्ती ही सुद्धा उगम स्थान म्हणून स्वीकारावी लागेल कारण सर्वात मोठा प्रश्न प्रजनन क्षम इंद्रियांचा होता . आणि त्यांना पृथ्वीशी जोडण्याखेरीज पर्याय राहिला नाही त्यामुळेच वैष्णव लोकांनी शैव लोकांचा शाक्त विचार सुद्धा नंतरच्या काळात स्वीकारायला सुरुवात केली आणि महालक्ष्मीची शक्तीरूप पूजा सुरू झाली . एका अर्थाने शिव आणि शक्ती या दोघांना स्वीकारण्यात आले आणि त्यांचा पुत्र गणपती जो दोघांच्यापासून तयार झाला आहे त्याला ज्ञान देणारा म्हणून स्वीकारण्यात आले .
अर्थातच वर्णव्यवस्था आणणार नाहीत ते ब्राह्मण कसले त्यामुळेच पृथ्वीला माता म्हणणारे उदाहरणार्थ "भूमि:माता पुत्रोऽहं पृथिव्या: ।"
( अथर्व १२ । १ । २ )
म्हणणारे नंतर मात्र पृथ्वीला सुद्धा शूद्र देवता म्हणायला लागले. कारण मनुस्मृतीनुसार स्त्री ही शूद्र होते कारण ती आपल्या मुलांचे मलमूत्र काढत होती तिच्या अंगावर मलमूत्र केले जात होते. पृथ्वी हीसुद्धा तिच्या माणूस या पुत्रांचे ,मुलांचे मलमूत्र आपल्या अंगावर घेऊन वावरत असल्याने तिला सुद्धा या मूर्ख ब्राह्मण धर्माने शूद्र करून टाकले . त्यातूनच पुढे आपण जन्माने सर्व शूद्रच असतो असा सिद्धांत पुढे आला पण काही ब्राह्मण लोकांनी काही तो स्वीकारला नाही उलट या सिद्धांताला आणि इतर काही सिद्धांतांना काउंटर म्हणून त्यांनी क्षत्रिय आणि वैश्य नाहीसे केले आणि जगात फक्त ब्राह्मण आहेत आणि शूद्र आहेत असा सिद्धांत मांडला म्हणजे जन्मदत्त सर्व शूद्र असतात पण ब्राह्मण शूद्र नसतात हेच या लोकांना सांगायचं होतं
एकदा पृथ्वी शूद्र झाली ना की मग तिचे ज्ञान सुद्धा महत्त्वाचे राहत नाही यातूनच मग ज्ञानाच्या क्षेत्रात जो अधःपात सुरू झाला तो अद्यापही सुरूच आहे . म्हणजे झाले असे की सूर्यज्ञानप्रणाली विकसित होता होता थांबली आणि पृथ्वीज्ञानप्रणाली विकसित झालीच नाही बाकी जाऊ द्या या ज्ञान प्रणालीने पुढे पुढे तर वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या लोकांना सुद्धा शूद्र वर्णात टाकून दिले पुढे पुढे मग जेवण करणारे ब्राह्मण सुद्धा ब्राह्मण लोकांनी शूद्र वर्णात टाकून दिले . म्हणजे भटार खाण्यात काम करणाऱ्या लोकांना भट म्हटले जात होते आणि सारे भट व्यास स्मृतीनुसार शूद्र आहेत त्यामुळेच जे पेशवे आले ते मूळचे भट होते म्हणजेच शूद्र होते आणि ते शैव होते त्यामुळेच महाराजांनी त्यांना आपल्या शैवधर्माच्या तत्त्वज्ञानानुसार सहजरित्या सामील करून घेतले.पहिल्या बाजीरावपर्यंत याचा एहसास याची जाणीव भट घराण्याला होती ती नानासाहेब पेशव्यांच्या काळापासून राहिली नाही पेशवे स्वत:ला पंडित (तत्कालीन मराठी शब्द पंत )समजण्याऐवजी ब्राह्मण समजू लागले म्हणून सगळा गोंधळ झाला .
हाताला कृती करणारा म्हणजे सर्जन करणारा मानणारा विचार गेला उलट हाताने काम करणारा मनुष्य शूद्र होत गेला.
"अयं मे हस्तो भगवान् अयं मे भगवत्तरः
अयं मे विश्वभेषजः अयं शिवाभिमर्शनः ॥"
( अथर्ववेद ४ । १३ । ६ )
असा हाताला दिव्य साक्षात शिव समजणारा आणि हाताला आजार बरा करणारा समजणारा शिवविचार मागे पडला अथर्ववेदातला
"हस्ताभ्यां दशशाखाभ्यां जिह्वा वाचः पुरोगवी ।
अनामविलुभ्यां हस्ताभ्यां ताभ्यां त्यागि मृशामसि ॥"
(अथर्ववेद ४ । १३ । ७) हा मंत्र एकेकाळी हस्तचिकित्सेचा आद्य मंत्र होता हात हा नाडी परीक्षा करतो . म्हणून तो महत्त्वाचा होता . पण नंतर हाताचे महत्व कमी करण्यात आले त्यामुळे वैद्याचे महत्त्वही कमी झाले अनामयित्नुभ्याम् वैद्य भगवत्स्वरूप असतो हा विचार मागे पडला
(वैद्यः चिकित्सकः । अतः चिकित्सकः विष्णुः )
जिथे साक्षात विष्णू मानला गेलेला वैद्य शूद्र झाला तिथे मग इतर श्रमिकांना काय म्हटले जाणार ? साहजिकच पुढे सर्व श्रमिकांचा दर्जा अत्यंत कमी होत युरोशियन समाज रसातळाला पोहोचला आणि उत्तर पेशवाईत स्वतः सोबत तो सर्व शैव लोकांना सुद्धा घेऊन बुडाला .
सूर्यापासून सुरू झालेली ही ज्ञान प्रक्रिया पुढे वैद्याला अश्विन म्हणू लागली अश्विन कुमार मानू लागली आणि नंतर हाताला शिव आणि त्या हाताच्या साह्याने नाडी परीक्षा करणारा वैद्य हा विष्णू मानू लागली पण मेडिकल सायन्स मध्ये विष्णू( ऋग्वेदामध्ये विष्णू ही सूर्यदेवता आहे हे कृपया लक्षात घ्या ) आला आणि वैद्य शूद्र झाला . यालाच मी वैष्णव धर्माचा साईड इफेक्ट म्हणतो .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment