शिवारी श्रीधर तिळवे नाईक 

१ 

वैशाखाचा प्रचंड वणवा

आणि पावसाची गॅरंटी नाही 


तुझ्या डोक्यावरील शिवलिंगावर 

चार थेंब टाकले 

की पाऊस पडतो 

असे म्हणतात 


माझा त्या अंधश्रद्धेवरही विश्वास नाही 


आशेचे डिंकासारखे राजकारण 

माझ्यात नेहमीच झोप घेण्याचा प्रयत्न करते 

पण अजून तरी आत्मवंचना माझी सवय नाही 


पंढरपूर म्हणजे पंढरीनाथाचे पूर 

तिथे नक्षत्रांचे दिवे लावले पाहिजेत 

असं तुला नेमकं कधी वाटलं ?


उदासीच्या झाडावरच्या दोन पक्षांची कहाणी 

एक शिव एक जीव 

एक शिवलिंग एक विठ्ठल 


स्वतःला देखणे करण्याचा मौसम शिव पाहिल्याशिवाय सुरू होत नाही 


मला जेजुरीला पाठवण्याची शिक्षा 

मी नेहमीच नाकारली 

मी म्हणालो 

आधी पंढरीनाथाचा आणि विठ्ठलाचा प्रश्न सोडवा 


डोक्यावरचे शिवलिंग का काढले कारणे द्या 


देव सुद्धा पॉलिटिकल करणारे लोक 

पुरोहित बनले 

की मोक्षाचा नाश केल्याचा भास धर्माच्या ताब्यात जातो 


देव फळत नसलेले लोक 

नेहमीच धर्माची झाडे 

वाढवत बसतात 


मी तुझ्या पायरीवर बसायला आलेलो नाही 


मला ती शिडी चढायची आहे 

जी थेट शिवापाशी पोहोचते 


२ 


विठ्ठला 

तू माझ्याप्रमाणे साधक होतास 

म्हणून मी तुझा कधी देव करत नाही 


भयाने चलबीचल करणारा एकांत 

थेंबभर भयाने ही कापत जातो 


 तुझी त्वचा खरडली की मोक्ष सापडतो

आणि मी मोक्ष खरडला की तुझी त्वचा सापडते 


शरीर धर्म पाळणारा धर्म मला आवडतो 

बाकी सर्व कल्पनेचा खेळ 


सर्व क्रयशक्ती कलियुगाने विकत घेतलेली आहे 

मी जाणतो 

क्रियाशक्ती क्रयशक्तीच्या पलीकडे आहे 


माझी शिवारी 

क्रियाशक्ती पासून सुरू होते 



सांडत जातात क्षण 

तिथे पेटतात रक्ताचे कण 


तिथे येतात फळे 

जिथे आधी पिकतात मुळे 


उडतो पारावरून पारा 

तिथेच पार्वतीचा दरारा 



निघालेले पाय 

काढलेले पाय 


भटकंती उन्हात वाळवत घालण्याची तयारी करत 


पायपीट फक्त पायांचे पीठ करत नाही 

ती काळजाला दळून काळजाचे शक्तिपीठ करते 


 ५


तुझा काळा सावळा रंग 

आता झाला माझा अंग 


तुझी न दिसणारी उंची 

मला पुरवतीये आभाळकंची 


तुझ्या डोक्यावरचे शिवलिंग 

आता माझ्यासाठी शिवभिंग 



मी अस्पृश्य होणारच होतो 

पण मी चोखामेळा होणार नाही 

ही ही माझी प्रतिज्ञा होती 


एकट्याने प्रवास करणाऱ्याला 

समाज वश नसतो 

आणि म्हणूनच तो सर्व प्रकारच्या वशीकरणापासून 

वाचू शकतो 


जगण्यासाठी फक्त जगणे पुरेसे नाही 

हे तर मला शिवाने सांगितले 

शक्तिपात करताना 


तू असणे आहेस 

आणि तू असणारच 



तुझ्या रूपांतराच्या भेसूर कहाण्या 

सुरुवातीला मला दचकवायच्या 


मला आता निघरघट्टपणा आलाय 

असे नाही 

पण आपल्या सशांची काळजी आपणच घ्यायची असते 

अन्यथा ते कासवांच्या पुढे झोपी जातात 

इतका धडा मीही शिकलो आहे 



कान ऐकत नाहीत 

आणि जीभ बोलायला लागते 


त्वचा उन्हात वाळत नाही ना पावसात भिजत 

आणि सेक्स सुरू होतो 


ज्यांना आरंभ पण सापडला नाही 

असे लोक थेट मोक्ष नावाच्या शेवटावर बोलतात 


मी या दिंडीत कधीच सामील झालो नाही 

व्हाया संत प्रवासाला निघालेले लोक 

अभंगांच्यात वाया जातात 



मला विष्णूचा राग नाही 

पण त्याचे दोन्ही अवतार 

राम आणि कृष्ण 

वर्णव्यवस्था सांगतात 

हे मी टाळत नाही 


विष्णू म्हणजे आकाशातला सूर्य 

हे कळण्याइतपत मी नीट वेद वाचले आहेत 


या सूर्याखाली भगभगताना 

मी भगत होत नाही 


मांत्रिकी मी कोळून प्यायलो आहे 

पण तरीही मी तिच्या नादाने ऋषीच्या काळजातला कोळसा होत नाही 

आणि कोळसा बिलकुल विकतही नाही 


जगाला फसवणूक आवडते 

कारण आत्मा नावाची दंतकथा 

शरीराला आभासात्मक टिकाव देते 


मी क्षणभंगुरपणाला कधीच घाबरलो नाही 

या ब्रम्हांडाचा अवाढव्य पसाऱ्यात 

स्वतःच्या धर्माचा प्रचार करणारे लोक 

मला विनोदी वाटतात 


१०


मला वारीत सामील व्हायचे नव्हते 

म्हणून मी माझीच शिवारी काढली 


पाण्याचा ओरिजनल सोर्स सापडला 

की तुम्ही पाण्याचे आर्टिफिशल नखरे सहन करत नाही 


लोक विचारतात 

या वैशाखात कोण पंढरपूरला जातो 

त्यापेक्षा आषाढ स्वीकार 

एकादशीला पवित्र हो 


मी म्हणतो 

गर्दीत जाऊन मिळायला काय अक्कल लागते ?


११


प्रत्येक आंबा थांबा असतो उन्हाचा 

प्रत्येक फळ सफलच असते 

सूर्याचा सफलीकरणाचा बेत पार पाडते 


मी आंबा खाऊन 

साल भिरकावतोय


माझी तब्येत खुश झाली आहे 

आणि पाय म्हणतात 

असला थांबा आम्ही पाहिला नव्हता 


१२


तू सरस 

तू आकार 


तू सार्थक 

तू सार्थ असण्याचा एकक 


तू शिव पाहण्याची कला 

तू अस्तित्वात भेसळ होऊ न देणारी बला 


तू अंतरंगातले शिवलिंग 

तू गाठी सोडवणारे मोरमोकळे भिंग 


तू विटेवर थांबलेला 

पण तरीही कधीही कुठल्याही उन्हात न आंबलेला 


माझे तुझ्यापाशी येणे अटळच होते 

फक्त जग फाट्यावर मारायला मला थोडा उशीर झाला 


१३


मोक्षाचे स्वप्न भयानन वाटते 

कारण माणसे आळशी असतात 


त्यांना मोक्ष भूछत्रासारखा उगवणारा हवा असतो 


मला शॉर्टकट नको आहे 


कलियुगात मेलंकली हाच कली 


गुरूंची खाणेसुमारी वाढते आहे 

आणि शिष्यांचा पत्ता सुद्धा नाही 


आहेत ते फक्त कमर्शियल सॅटिस्फॅक्शन शोधणारे अदृश्य भामटे 


भामट्यांना भेटतात भामटे 

गायब होतात त्वचा विरघवळणारे चिमटे 


भंडार्यासाठी भांडणारे लोक 

मिरवणुकीत तू आधी की मी आधी 

म्हणून मंडळांना भांडायला लावणारे लोक 

बारमाही निवडुंगांना आमंत्रण देत असतात 


माझे सुदैव असे 

की समोर तुझा वडवृक्ष आहे 


जोवर तुझ्या डोक्यावर शिवलिंग आहे 

तोपर्यंत माझे ताळ्यावर राहणे अटळ आहे 


१४


शेपूट नसलेल्या देहाला 

लंका समजून जाळणारे लोक 

आता फक्त अनुमानापुरते उरलेत 


माझी आई म्हणायची,"मी तुला विषही पाजले आणि अमृतही 

प्रत्येक बाईचा देह जन्म देताना अमृत मंथन असतो 


तू माझे विषही पिले आणि अमृतही 

तुझ्या वेळी मी तू जिवंत रहावेस म्हणून काहीही केले नाही 


आधीचा मेलाच होता 

आणि तू जन्मण्याआधीच 

मी तुला मेलेला म्हणून स्वीकारण्याची तयारी केली होती 


तू पोटात असताना लाथ सुद्धा मारली नाहीस 

आणि मला वाटले 

आत जे आहे ते मेलेलेच असेल 


त्यामुळेच तू जेव्हा जिवंत बाहेर आलास 

तेव्हा माझ्यासाठी तो अतिशय आनंदाचा क्षण होता 


तू जन्मताना रडलाही नाहीस 

शेवटी तुला चिमटा काढून आम्ही रडवले "


आजही मला ठरवता येत नाही 

भाषा हा मला काढलेला चिमटा 

की माझे रडणे 


१५


तुझ्या आई वडिलांना तू कधीच सोडले नाहीस 

तुझा विटांचा कारखाना होता 

इतकेच सत्य आता उपलब्ध आहे 

तुझ्या पायाखाली असलेल्या विटेमुळे 


28 युगे मोजतो कोण ?


आणि 280 म्हटले म्हणून कुठे काय बिघडते?


एकदा दंतकथाच तयार करायची म्हटले 

की कितीही शून्य वाढवता येतात 


खरी कसोटी तेव्हा लागते 

जेव्हा शून्यात पोहोचायचे असते 


१६


तू शिवाचा केलेला पाठलाग 

आणि स्वतःच तयार केलेल्या विटेवर 

स्वतःलाच उभे करून शोधलेले आसन 


तुझ्या काळात राज योगाला राजयोग म्हटले नव्हते कोणी 

एक योग हा शब्दच पुरेसा होता 


तुझ्या साधनेच्या पारंब्या 

आजही या वडावर आपला आब राखून आहेत 


१७


माझ्या डोळ्यात मी पाणी येऊ देत नाही 

कारण कधी ना कधी ते दगड बनते हे मी जाणतो 


आयुष्य चलन फुगवट्यासारखे आता असत नाही 

दुर्मिळ झालेल्या नाण्यासारखे 

ते आता वावरत असते 


जे जिवंत आहे त्याचा आदर करत 

मी चालतो आहे 


रस्त्यावर उडणारी धूळ 

खपाखप वाढणाऱ्या बिल्डिंगा 


काही गिळून फेकून द्यावे म्हटले 

तर चूळ सुद्धा मचूळ वाटते 


कंठा पाशी थांबणारे विष अद्याप तरी मला सापडलेले नाही 


म्हणूनच मी दंतकथांना 

विष पाजणारा कंठ समजतो 


१८


तुझ्या विहिरींना सील लावले म्हणून काय झाले 

तुझे पाणी दिसायचे थोडेच बंद होणार आहे 


तुझ्या पालख्या निघणे 

बंद झाले 

म्हणून त्यांचा तामझाम

थोडाच लपणार आहे 


भक्ताची सावली देवापेक्षा लांब असते 

कारण देवाला देह नसतो 


म्हणून तर शिवलिंग फक्त प्रतिक असते 

मूर्ती नसते 


१९


देवापाशी विसावा मागणारे तुकोबा 

आणि विटेवर उभा राहणारा विठोबा 

मला एकच वाटतात 


मोक्षात आधी कोण हा प्रश्नच नसतो 

कारण मोक्षात कोणी नंतर नसतो 


जे सर्वत्र आहे त्याला आरंभ देणारे लोक 

फक्त गणिती असतात 


तुला विटा तयार करताना गणित माहीत असणारच 

पण तुला हेही माहित होते 

की तुला तुझे पाय शेवटी अनंतात उभे करायचे आहेत 


तू एक असा मनुष्य होतास 

ज्याला कुठे उभे राहायचे 

हे नीट कळालेले होते 


२०


मी शिवारातली कामे सोडून आलेलो नाही 

तर तुला पाहून शिवारात काम करायचे 

म्हणून आलो आहे 


पावसाळा आकाशात लटकत असताना 

कोण पृथ्वीवरचा देव पाहील? 


वैशाखात उन्हाळा झेलावा लागेल 

म्हणून पावसाळ्यात निघणारा शिवारकरी मी नव्हे 


मला पेरण्या करण्याआधीच 

तुला भेटायचं आहे 


उन्हाळा तहान तीव्र करतो 

आणि गळ्याला पाण्याचे महत्व पटवतो 


ऊन सूर्याचा अलंकार आहे 

मी तो घालून निघतो तेव्हा 

माझा मलाच देखणा वाटतो 


तू कर्नाटकातून आलेला 

सावळा भक्त होतास 

तू नेमके किती उन्हाळे खाल्लेस याचे रेकॉर्ड नाही 


तू लिहिलेले अभंग 

इंद्रायणीत बुडले 

आणि वर आले नाहीत 


मी चाललोय 

आणि माझ्या डोळ्यात तू कचकचित हिरवा आहेस 



२१


माझ्याजवळ संतांच्या पादुका नाहीत 

कारण विसाव्या शतकात सुद्धा संत होऊ शकतो 

यावर माझा विश्वास आहे 


पादुका त्यांना लागतात 

ज्यांच्यात संत निर्माण करण्याची क्षमता 

नाहीशी झालेली असते 


जोवर माणसे मोक्षाला पोहोचतात 

तोवर संतांच्या पादुका अस्तित्वात असत नाहीत 


माणसे मोक्षाला पोहोचायची बंद झाली 

किसन तर अस्तित्वात येत नाहीत 

आणि उरतात 

जे अस्तित्वात होऊन गेले 

ते संत आणि त्यांच्या पादुका 


माझ्या पायात चप्पल आहे कोल्हापुरी 

आणि माझा चालण्याचा बाज कन्नड आहे 


२२


पहिली शिवारी तू केलीस 

आणि नंतर लोकांनी 

तुलाच वारी करायला सुरुवात केली 


या देशात मोक्षाला पोहोचणारे पुरुष देव बनतात 

आणि पुरोहित मग मोक्षाला रसातळाला पोचवत 

त्यांच्या मेलेल्या कण्यावर मंदिर बांधतात 


निवृत्तीनाथांच्या वडिलांचे नाव

विठ्ठल ठेवले गेले 

इतका तू या मातीत रुजला होतास 


तू कर्नाटकु आहेस हेही सर्वांना माहीत होते 


तुझा वर्ण जातीविरुद्धचा उठाव 

मोडीत काढून 

नंतर रचला गेलेला एक बनाव 

आता जाळे झाला आहे 


एकमेळा चोखोमेळा केला गेला आणि भिंतीत गाडला गेला 


आता लोक मेळ घालण्याऐवजी स्वतःच्या जाती जतन करत 

सर्वत्र


तुझ्या नावाचे मंदिर सर्वत्र 


तुला थेट कृष्णाचा अवतार करण्याचा आव सर्वत्र 


यमुनेने इंद्रायणी वर केलेली मात सर्वत्र 


उत्तर नेहमीच दक्षिणेची मुंडी आवळते 

आणि मुंडी आवळणारा हात 

नेहमीच ब्राह्मण धर्मातून उगवलेला असतो 


मी चालतोय 

आणि आसपासच्या अनेक भिंती 

मला इतिहास दाखवतायेत 


परंपरांच्या विषयी मला कधीच आदर नव्हता 

त्या फक्त धर्म मजबूत करायला वापरल्या जाणाऱ्या स्क्रीनशाली आहेत 

मी जाणतो 


रेग्युलर रोबो तयार करण्याचे घाऊक कंत्राट 

भविष्यात रोबोंनाही वारी करायला लावेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही 


स्वातंत्र्य पेलण्याची जबाबदारी नाकारणारे लोक बहुसंख्यांक झाले 

की गुलामी सुरू होते 


निर्मिक आणि निर्माण 

यांच्यात भेद नसतो 

वेद भेद निर्माण करतात 

आणि मग निर्वाणाखेरीज पर्याय राहत नाही 


जो वेद निवडतो तो भेद निवडतो 

जो अभेद होतो 

तो वेद डावलतो 


२३


फ्रॉड लोकांच्या हातात पडलेल्या अभंगांच्या गॅलरीज 

गॉड गॉड म्हणत गोडवा नाकारणारे कृष्णवैभव 


तू शिवपाषाणातून निर्माण केलेला समांतर चंद्र 

स्मृतींची कबुतरे शीटशूटिंग करत 


फोटो काढावेत की न काढावेत 


माझ्या बापाचा एकुलता एक जर्मन कॅमेरा 


खिडकी शून्य आकाशाचा न आलेला परतावा 


तुझा पडताळा ठाई ठाई 

राई राई शांत 

मिटलेली घाई 


डोंगर जिंदाबाद म्हणण्याइतका शाबूत 

जखमांचा तजेलदारपणा काबुत 


झोपी गेलेला मी जागा केलेला नव्हता 

तो शिवानेच येऊन जागा केला 


तुला नेमकी कधी जाग आली आणि कशी ?


२४


आयुष्य टाईप करणारे हात काय काय मुद्रित करत असतात?


हस्त वळण मुद्रितात काय करते ?

की कविता म्हणजे शेवटी मेंदूचा ठसा ?

व्हाया हात किंवा व्हाया टायपिंग मशीन 

काय फरक पडतो ?


डावीकडून उजवीकडे जाण्याचा धोका 

कागदा इतकाच टायपिंग मशीन वर पण 


तुझी सुरुवात डावी होती 

आणि तुझा शेवट उजव्या लोकांनी केला 


२५


आपण अमावस्येची शिव रात्र केली 

आणि जगाला ती झेपली नाही 


आतल्या प्रकाशासाठी सुद्धा 

पोर्णिमा टाईप करत असणारे लोक 

खरा सामना अमावस्येशी असतो 

हे तू ही ओळखले होतेस 

म्हणून तर सावळा असलेला तू आधी काळा पडलास 

आणि मग अख्खी अमावस्या उजळवून थेट सूर्य झालास 


शेंगा खाऊन संपल्या की 

फुल फोटो पोलपटांचा 


तू नाथ झालास 

आणि शेवटी पंढरीनाथ 


स्वतःला सिद्ध करण्याऐवजी 

स्वतःच सिद्ध झालास 


प्रसिद्धीच्या मागे लागण्याऐवजी 

मोक्षाचा ऐवजच कमावलास 


तुझ्या सावळ्या देहातून निघालेला प्रकाश 

मला उजळवतो आहे 


आणि मी अजूनही आपण टॉर्च कसे 

असा प्रश्न विचारत संकटकंटक 


२६

ढापाढापी करणारे लोक नेहमीच गुळाची ढेप घेऊन येतात 

आणि गुळ लावत अख्खी जमीन ढापतात 


राजकारण म्हणजे लोकांच्या पैशाची श्रमांची अधिकृत चोरी 


या चोरीत देव मध्ये पडू नये म्हणून धर्म नावाची केली गेलेली मॅनेजमेंट 


कोण ढेप लावतोय 

कोण टेप लावतोय 

कोण खेप लावतोय 

कोण झेप लावतोय 


शेवटी लावालावी 


कोण आग लावतोय 

कोण माग लावतोय 

कोण नाग लावतोय 

कोण झाग लावतोय 

कोण राग लावतोय 

कोण अनुराग 


शेवटी लावा लावी 


लावण्य कुठेच नाही 

फक्त लावा लावी 

आणि तिची लावणी 


फड कुठेही उगवतच असतात 

ऑफिसात ,हॉटेलात आणि रस्त्यावरही 


मी त्यांच्याकडे पाठ करून 

तुझ्या पुढे पाठपोट 


राजकारण टाळल्याशिवाय मोक्ष मिळू नये 

अशी समाजव्यवस्था कोणी निर्माण केली 


शिवारी श्रीधर तिळवे नाईक 


२७


लोक म्हणतात ,"मुळे शोधा"

मग मी विठ्ठलाची मुळे शोधली 

आणि म्हणालो ,

"विठ्ठलाची मुळे शैव आहेत "

तर म्हणतात 

"अलीकडची मुळे शोधा "


एकदा शैव नाकाराचेच ठरवल्यानंतर 

काय मूळ आणि काय फळ?


२८


तू म्हणतोस काय फरक पडतो 

मोक्ष मिळणे हेच महत्त्वाचे 

प्रश्न म्हातारी मेल्याचा नसतो 

प्रश्न काळ सोकावल्याचा असतो 


सुरुवात तुझ्यापासून झाली 

म्हणून ती तिथेच थोडी थांबणार आहे ?


आताच म्हणायला लागलेत 

कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी आहे  


तुझ्या नावाने वर्ण व्यवस्था प्रस्थापित केली 

हे मी विसरू काय ?


२९

सोसाट्याचा वारा साठमारी खेळतोय

मला माझ्यातला हत्ती सापडत नाही 

जो झुंजतोय 


वाळवंटातले झाड मृगजळच असते 


जंगल छापले जाऊ शकत नाही वाळूत

सिलिकॉन हा काही मंत्र नाही 

अमेरिकेतून आयात करता येईल असा 


जो तो कसा बसाच असतो 


आयुष्य वाघासारखे मागे लागत असेल 

तर आपण वाळवंटात उभे आहोत की जंगलात 

या प्रश्नाने काय फरक पडतो ? 


जगावर सही केली म्हणून 

जग थोडेच माणसाच्या मालकीचे होते 


माणसाला काय 

झाडांच्या पासून कागद तयार करायचे 

आणि कागदांच्या पासून मालकी हक्क 


देवाचा सुद्धा कॉपीराईट आपल्याकडे ठेवायला धडपडणारे हे लोक 


यांच्या उंचीला तू काय झेपणार?


३०


प्रथम तुझ्या मंदिरावरचा हक्क गेला 

मग तू 

नाथ म्हणून उभा असलेला 

तुझे योगासन विटे सकट ढापले गेले 

तुझी तपश्चर्या मात्र वगळली गेली 


माणसाला देव करण्याची ही तऱ्हा आजची नाही

राजाच गुन्हेगारीत सामील होतो तेव्हा 

देवाला सुद्धा शिक्षा होते 


मला तुझ्या मंदिरावरचा हक्क मिळणार नाही 


जिथे वैष्णव होऊन सुद्धा 

हक्क तिसरीकडेच गेला  

तिथे पहिल्या हक्काला विचारतो कोण ?


३१


तुझी आंधळी भक्ती करायला माझा जन्म नाही 

कारण मला माहित आहे 

तू योगी होतास भक्त नाही 


नाथ त्याला म्हणावे ज्याला मोक्ष मिळतो 

आता तर नावात सुद्धा नाथ ठेवतात 

आणि पतिराज सुद्धा नाथ होतो 


हे लोक अद्यापही तुला पंढरीनाथ म्हणतात हेच नशीब 


ज्या शंकराच्या मंदिरात तू तपश्चर्या केली 

तो शंकर अद्याप शाबूत आहे हेच नशीब 


त्यांना नदी बदलता आली नाही 

पण लोक बदलता आले 

याचा अर्थ अजूनही पाणी माणसापेक्षा मजबूत आहे 


३२


लोक मला 

परक्या ग्रहावरून आलेला माणूस म्हणायला लागलेत 


स्वतःचा ग्रह एखादा माणूस खतऱ्यात आणत असेल तर लोक त्याला परग्रहावर पाठवायला बघतात 


मी अद्याप तरी तू ज्या भूमीवरून चाललास 

तिच्यावरच उभा आहे 


कालबाह्य व्हायला मुळात काळ अस्तित्वात असावा लागतो 

मला तू काळात दिसत नाहीस कालातित दिसतोस


३३


वैष्णव चक्रव्यूहाचे आर्काइव्हज 

जोवर माणसात युद्ध जिवंत 

तोवर हटवणे कठीण 


हा देश 5000 वर्षे शांततेत जगत होता 

यावर आता कोण विश्वास ठेवेल?


भावा भावांच्या मारामारीला 

भारतयुद्धाचे स्वरूप देणारे लोक 


कल्पनेच्या भराऱ्या 

आणि खास तयार केलेला थरार 


ज्ञानेश्वरी स्पॉन्सर केलेल्या काळाला 

मी सामावून घेत नाही 


मला माहित आहे 

ह्या चक्रव्यूहाची सुरुवात तिथूनच झालेली आहे 


मी माझी सुरुवात गाथासप्तशतीपासून करतो 


भगवान शंकरांचा फोबिया अध्याप नाहीसा झालेला नाही 

म्हणून तर हा सारा खेळ 


ज्याला पराजित करता येत नाही 

त्याला नवा देव बनवा 

आणि मग त्याच्या नावाने बनवाबनवी करा 


तुझ्या काळात ही बनवाबनवी अस्तित्वात नव्हती 

हा केवढा मोठा दिलासा 


आता मी तिच्यातून मार्ग काढत माझी एकट्याची दिंडी सर्वत्र सांडत चालतो आहे 


माझा ठोका हाच माझा टाळ 

माझे आसन हाच माझा अभंग 


तुझ्या डोक्यात उमललेले शिवलिंग 

माझ्यापुढेही उमलते आहे 


ज्यांनी ते डोक्यावरून नाहीसे केले 

ते लोक आता मला वेडे वाटतायेत 


मी उमलत चाललोय 

ब्रह्मकमळासारखा 

तुझ्यापुढे पुन्हा एकदा साक्षात 


अनंताचा आनंद कालातीत 


माझी शिवारी तुझ्यात नाहीशी होत चालली आहे 


मी थेट आदि

नाथाच्या पायापाशी जाऊन पडतो आहे 


तुझी वीट भगवान शंकरांचे अनंतात उभे असलेले पाय होते 

हे मला कळतंय 


मी उभा आहे 

माझ्याच देहाच्या विटेवर 

शिव पायात 


श्रीधर तिळवे नाईक 

( डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन: अनकॅटेगरीकल: भक्ती या काव्यफायलीतून)

 

Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती