माया ,तंद्रा आणि जालात्मता श्रीधर तिळवे नाईक 

माया म्हणजे शिव आणि शक्ती यांनी निर्माण केलेल्या संसाराचे जीवाला दिसणारे आणि त्याला वास्तव वाटणारे जीवन होय . हे जीवन त्याला नेहमीच प्रत्यक्ष, आप्तात्मक , अनुमानात्मक आणि चिन्हात्मक पद्धतीने अनुभवायला येत असते . प्रत्येक उपकरणाला प्रत्येक जीवाला जीवन वेगळे दिसत असते किंबहुना जीवन म्हणजे जीवाला किंवा त्याने बनवलेल्या उपकरणाला दिसणारे वन होय. माणसाची मर्यादा अशी की त्याला सर्वकाही नात्यात्मक relational पद्धतीने दिसते म्हणजे असे की प्रत्येक वेळेला हे जीवन कुठल्या ना कुठल्या नात्यांमध्ये असते आणि या नात्यांच्याद्वारे तो हे सर्व अनुभवत असतो . हे अनुभवणे इंद्रियांच्याद्वारे शरीराच्या मार्फत होत असते यामध्ये सर्वच प्रकारची इंद्रिये सामील असू शकतात.

प्रश्न नेहमीच नात्यांच्या मध्ये काय असावे हा असतो आणि जर का प्रेम असेल तर मग गोष्ट वेगळी होत जाते अन्यथा नेहमीच आसक्ती आणि तिने निर्माण केलेली वासना हीच असते त्यामुळेच नाते नेहमीच हितसंबंधांच्या आधारे चालत राहते आणि यामध्ये अनेकदा ही जी माया असते ती माया कधीही आपणाला स्पष्टपणे दिसत नाही. ती नेहमी हितसंबंधांनी पूर्वग्रह दूषित होत जाते . आपली भूक आपली तहान आपली निकड ही तिन्ही रूपे आसक्तीची असतात आणि आसक्ती नेहमीच हव्यासाला जडलेली असते अनेकदा हा हव्यास नातेसंबंधातून आणि आपण अपूर्ण आहोत या गैरसमजातून निर्माण झालेला असतो माणसाला आपण स्वतः परिपूर्ण जीव वाटत नाही कारण तो शिव होत नाही .म्हणून तो मग बाहेर परिपूर्ती शोधत राहतो आणि प्रत्यक्षामध्ये अशी परिपूर्ती कधीही होत नाही . शक्तीचे स्वरूपच असे आहे की ती अनंत अनंतत असते त्यामुळे तिने मांडलेला हा सगळा संसार अनंत आणि अफाट असतो . या संसाराशी जीवाचा आलेला संबंध म्हणजे जीवन होय आणि संपूर्ण संसाराशी कधीही जीवाचा संबंध येत नाही म्हणून त्याचे जीवन कधीही परिपूर्ण होत नाही. त्याला नेहमीच संसारातील सर्व गोष्टींचे एका बाजूचे आकलन होत राहते आणि त्यातूनच सापेक्षता निर्माण होत राहते अनिश्चितता निर्माण होत राहते. संसार हा नेहमीच मितींनी बद्ध असतो आणि जीवाचा तोच मितवा असतो . पण जेव्हा हा मितवा नीट वागत नाही त्याला त्याच्या आसक्तीला हवे ते देत नाही तेव्हा मग तो शत्रू वाटायला लागतो . संसार हा नेहमीच जीवाशी खेळत राहतो . कधी कधी हा खेळ जीवघेण पण होतो . पण संसाराला अनेकदा हा खेळ जीवघेणा झालेला आहे हे कळत सुद्धा नाही तो आपला आपल्याच मितींच्या तालामध्ये नाचत राहतो. याची तंद्रा जेव्हा सृजनशील बनते तेव्हा त्याची तंद्री तीन पायऱ्यांनी म्हणजे धारणा , ध्यान , सविकल्प समाधी अशी लागते पण ही तंद्रा जेव्हा विनाशशील बनते तेव्हा ती तांडव करत जाते. तंद्री आणि तांडव एकाच तंद्राच्या दोन बाजू असतात . अनेकदा हे तांडव आतले मी नाहीसे करत गेले की शेवटी मोक्षा पर्यंत नेऊ शकते .

तंद्रा जेव्हा प्रत्यक्ष जीवामध्ये उतरत जाते तेव्हा तो संसाराशी किंवा संसारातील कशाशी तरी एकरूप होण्याची धडपड करतो त्यातूनच तल्लीनता निर्माण होते पण यामुळेच जीव अधिकाधिक मायेमध्ये सापडत जातो आणि त्यातूनच मग अनेक अवस्था निर्माण होत जातात या अवस्थांना जीवात्मता असे म्हणतात या जीवात्मता पुढीलप्रमाणे असतात 

१ सर्वसाधारणपणे जीव जेव्हा आदिम असतो त्याचा अहंकार तयार झालेला नसतो तेव्हा त्याला आपण निसर्गापेक्षा वेगळे आहोत याची जाणीव नसते साहजिकच त्याला निसर्ग आणि आपण एकच आहे असे वाटत असते किंबहुना त्याच्यासाठी हे जीवन एकात्म असते यालाच आपण एकात्मता असे म्हणतो आज सुद्धा आपण जेव्हा निसर्गामध्ये सहली काढतो तेव्हा आपणाला ही एकात्मता कधीकधी लाभते आणि कित्येक वेळेला तर माणूस एकात्म होण्यासाठी म्हणूनच निसर्गात जात असतो.

२ माणूस जेव्हा संपूर्ण संसाराच्या पलीकडे जातो तेव्हा त्याच्याजवळ काहीही शिल्लक नसते असतो तो फक्त प्राण ज्याच्यामुळे तो जिवंत असतो ही मोक्षाची अवस्था असते इथे शेवटी तंद्राही नाहीशी होते या अवस्थेला प्राणता म्हणता येते पुढे मग जेव्हा धर्माची स्थापना झाली आणि आत्मा ही संकल्पना दृढ झाली तेव्हा मात्र मग अनात्मता ही संकल्पना रुजवावी लागली विशेषत: बौद्ध तत्त्वज्ञानाने हा प्रयत्न फार मोठ्या प्रमाणात केला याचे कारण आत्मा हा मोक्ष मिळवण्यामध्ये फार मोठा अडथळा असतो 

३ आत्मता खरे तर आत्म्याची संकल्पना ही एक अत्यंत अमूर्त कल्पना आहे आत्मा म्हणजे मृत्यूनंतरही जो जिवंत राहतो आणि कुठल्या ना कुठल्या परलोकांशी म्हणजे स्वर्ग नरक ब्रह्म लोक वगैरे निगडित राहतो आणि कधी कधी अपवादात्मक वेळेला अपवादात्मक संस्कारामध्ये त्याचा पुनर्जन्म होतो असा प्राण होय . महाश्रद्धा आणि धर्माने ही संकल्पना वारंवार वापरलेली आहे आणि त्याच्या आधारे आपल्या सगळ्या राजकीय विचार प्रणालीला आधार दिलेला आहे इतकेच कशाला वर्णव्यवस्थेचा आधार सुद्धा आत्मा आहे कारण आत्मा आहे म्हणून परलोक आहे आणि परलोकात कोणाला प्रवेश मिळणार ते पाप आणि पुण्यावर ठरणार आहे आणि पाप काय आणि पुण्य काय हे धर्म ठरवतो आणि पाप आणि पुण्यविषयी संकल्पना ज्या असतात त्या नेहमीच राजकीय असतात इतकेच नव्हे तर पुढे जाऊन उच्च वर्ण म्हणजे ज्याने मागील जन्मात पुण्य केलेले आहे असे लोक आणि निम्न वर्ण म्हणजे ज्यांनी मागच्या जन्मात खूप पाप केलेले आहे आणि ज्यांना शिक्षा म्हणून खालच्या वर्णात प्रवेश मिळालेला आहे असे लोक अशी ही व्याख्या तयार होते . याच्या आधारे वर्णव्यवस्थेचे समर्थन केले जातात प्रत्यक्षामध्ये आपण जर विचारले की कुठले पाप केले होते तर त्या पापाचा आणि पुण्याचा कसलाही पुरावा सापडत नाही केवळ पुरोहिताने ठरवून दिले म्हणून सर्व होत असते प्रत्यक्षात हा सर्व कल्पना विलास असतो पुरोहित लोकांना स्वतःच्या तथाकथित पुण्याची पण आठवण राहिलेली नसते यातल्या अनेक लोकांना आपला मागील जन्म कुठला ते पण आठवत नसते प्रत्यक्षात हे पुरोहित मग ते कुठल्याही महा श्रद्धेचे म्हणजे रेलिजनचे असोत किंवा धर्माचे असोत राजकीय असतात आणि राजकारण खेळत असतात ज्याला ते धर्मकारण कल्पनेच्या आधारे कसलाही प्रत्यक्ष पुरावा न देता लादलेले राजकारण म्हणजे धर्मकारण होय पण माणूस असा प्राणी आहे जो कल्पनाविलास करत जगत असतो आणि त्यातूनच मग तो वर्ण व्यवस्था सुद्धा स्वीकारतो . त्यामुळेच बुद्धासारख्या लोकांनी सरळ सरळ आत्मता ही संकल्पनाच नाकारली जेणेकरून आत्मा सुद्धा नाकारता यावा . परलोक सुद्धा म्हणजे स्वर्ग आणि नरक सुद्धा नाकारता यावेत . पुढे बौद्ध धर्मामध्ये या सर्व गोष्टी शिरल्या आणि बौद्ध धर्माचा सत्यानाश झाला 

४ जेव्हा माणसाला स्वतःला आपली तल्लीनता ही नीट ॲडजस्ट करता येत नाही तेव्हा परात्मता निर्माण होते जसे जसे विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगत होत गेले तसे तसे समाजामध्ये माणसाला आपण परके आहोत उपरे उपरे आहोत असे वाटायला लागले त्यातूनच त्याला त्याच्या तल्लीनतेला परात्म वाटायला लागले मग एक परात्मता निर्माण झाली त्याच्या आत्म्याला समाज आपला वाटेनासा झाला तो करत असलेले काम आपले वाटेनासे झाले . ही एक नवीन अशी तल्लीनता होती जी स्वतःतच मोडून पडली होती तल्लीन व्हावे असे वाटते आणि प्रत्यक्षात मात्र होता येत नाही अशी ही परात्म स्थिती आहे . ही परात्मक स्थिती म्हणजे दुसरे तिसरे काही नसून त्यानेच निर्माण केलेल्या आत्मतेला आलेला उपरेपणा असतो ही त्याने त्याच्या तल्लीनतेने साधलेली प्रगती किंवा अधोगती असते.

५ माणूस फार काळ परात्मक आयुष्य जगू शकत नाही त्यामुळे साहजिकच त्यावर उपाय शोधायला लागतो आणि हा उपाय नेहमीच तादात्मतेचा असतो तो आपण करत असलेल्या कामाशी तादात्म होण्याचा प्रयत्न करतो तो आपल्या समाजाशी आपल्या कुटुंबाशी तादात्म होण्याचा प्रयत्न करतो आणि यातूनच मग तादात्मता निर्माण होते तल्लीनता नैसर्गिक असते तर तादात्मता ही त्याला स्वतःला तल्लीनतेमधून विकसित करावी लागते हा दोन्हींच्या मधला फरक आहे 

६ जालात्मता ही अलीकडच्या काळामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात जन्मलेले असली तरी प्रत्यक्षामध्ये धर्माय गोष्टीमध्ये फार पूर्वीपासूनच ही होती स्वतःच्या नेटवर्कशी पूर्णपणे तल्लीन पावणे आणि तल्लीनता साधने म्हणजे जालात्मता होय. ही सुद्धा तल्लीनतेला जालवत अस्तित्वात येत असते यामध्ये चिन्ह सृष्टीमधील अनेक जाले येतात फेसबुक , ब्लॉग वगैरे सुद्धा यातच येतात आणि माणसे स्वतःला फेसबुक पण समजायला लागतात हे या तल्लीनतेचे फार मोठे यश असते अनेकदा यातून एक खोटी चिन्ह प्रतिमा तयार होते आणि त्या चिन्ह प्रतिमेशी तो माणूस एकरूप होऊन जातो तल्लीन होऊन जातो तो इतका की ती चिन्ह प्रतिमा आणि तो एकच आहे असे समजू लागतो यातून फार मोठे घोटाळे माजतात . अनेकदा चिन्ह प्रतिमा जाणीवपूर्वक निर्माण केल्या जातात अभिनेते आणि नेते हा उद्योग फार मोठ्या प्रमाणात करत असतात कधीकधी त्यांच्या मुळावर सुद्धा या सर्व गोष्टी येतात आरटीफिशियली फॅब्रिकेटेड असे हे स्वरूप असते.


प्रश्न असा आहे की जीव आत्मा का निर्माण करतो ? त्याचे उत्तर कारण नेटवर्किंग आहे त्याला स्वतःच्या भोवतालच्या संसाराची त्यातून प्रत्ययाला येणाऱ्या जीवनाची एक व्यवस्था लावावीच लागते त्याला केऑस मध्ये जगणे शक्य होत नाही कारण तो अत्यंत असुरक्षित जगत असतो त्यामुळे त्याला स्वतःच्या सुरक्षिततेसाठी एक नेटवर्क निर्माण करावेच लागते आणि त्यामधूनच मग तो आपल्यामध्ये एक आत्मा निर्माण तयार करतो पण प्रत्यक्षात असा प्रत्येक वेळेला एक आत्मा तयार करता करता करता त्याच्या आत मध्ये अनेक आत्मे तयार होतात आणि त्यामुळे एकाच वेळेला त्याच्यात अनेक जीवात्मता तयार होतात त्यांनाच मी बहुमी म्हणतो उत्तर आधुनिक कालखंडामध्ये मी मेला अशी घोषणा झाली पण प्रत्यक्षामध्ये चौथ्या नवते मध्ये अनेक मी निर्माण झाले त्यांचे नेटवर्क निर्माण झाले आणि मनुष्य हा असा प्राणी आहे जो नेहमी शिकत असतो आणि त्यामुळेच आपले हे अनेक मिं चे नेटवर्क सहजरीत्या माणूस हाताळायला शिकला . आज आपल्याला आपलीच मुले कळत नाहीत त्याचे एक मोठे कारण ती अनेक मी घेऊन वावरत असतात . त्यांचा कुठला मी कधी ऍक्टिव्ह होईल हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळेच जिवात्मतेचा प्रश्न हा आता अधिक गुंतागुंतीचा होत चाललेला आहे . पूर्वी अस्तित्ववादी आणि मार्क्सवादी परात्मता हा शब्द वैचारिकतेत फेकून देत त्याच्या आधारे फार मोठी मांडणी करत आता केवळ परात्मतेच्या आधारे विश्लेषण करायला तुम्ही गेलात तर फार मोठ्या प्रॉब्लेम मध्ये फसू शकता ज्याला त्याच्यातील अनेक मिं चे त्यांनी निर्माण केलेल्या जालात्मतांचे नेटवर्क हॅण्डल करता येते तो आजकाल आरोग्यवान असतो आणि ज्याला ते हँडल करता येत नाही तो मनोजालरुग्ण बनत जातो .

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती