आज प्राकृत भाषा दिवस असल्याने साहजिकच प्राकृतवर चर्चा होणे अटळ आहे. भारताच्या इतिहासामध्ये ब्रिटिश काळामध्ये प्रामुख्याने सर्व भाषा संस्कृत पासून तयार झाल्या असा सिद्धांत आर्य लोकांनी अत्यंत जाणीवपूर्वक तयार केला आणि मराठी ही भाषा सुद्धा संस्कृत पासून तयार झाली असे सिद्ध करण्याचे खटाटोप सुरू झाले .


१९६० नंतर मात्र चित्र बदलत गेले आणि देशीवाद आला तो भाषेत सुद्धा आला या देशीवादाने प्राकृत आधी होते आणि संस्कृत नंतर आले अशी मांडणी करायला सुरुवात केली . प्राकृत म्हणजे नैसर्गिक आणि संस्कृत म्हणजे संस्कारीक ! संस्कार हे नेहमी प्रकृतीवर नंतर केले जातात त्यामुळे प्राकृत भाषेवर नंतर संस्कार करून त्यातून संस्कृतचा ढाचा तयार झाला अशी मांडणी पुढे आली . विशेषत: जैन आणि बौद्ध या दोन धर्मांची भाषा ही प्राकृत भाषा (अर्ध मागधी आणि पाली) आहे साहजिकच या दोन धर्मातले अनेक आचार्य लोक वारंवार प्राकृत भाषेविषयी वेगवेगळ्या गोष्टी मांडत राहिले. अलीकडे तर काहींनी संस्कृत भाषा ही पाचव्या आणि दहाव्या शतकापासून अस्तित्वात आली अशी सुद्धा मांडणी करायला मागेपुढे पाहिलेले नाही . यांच्या मते ऋग्वेद सुद्धा पाचव्या शतकानंतर लिहिला गेला आहे .


मला स्वतःला नेहमी असे वाटते की प्रत्यक्षात प्रत्येक प्राचीन भाषेचे आदिवासी भाषा, प्राकृत भाषा आणि संस्कृत भाषा असे तीन टप्पे होतात . म्हणजे काय तर आदिवासी भाषा या फक्त मौखिक असतात पण कालांतराने लेखनाचा शोध लागतो आणि लेखनासाठी म्हणून तिच्यामध्ये काही बदल आपोआप घडत जातात त्यातूनच प्राकृत बनते . पण एकदा भाषा तयार झाल्यानंतर तिचे व्याकरण तयार करणारे काही लोक पुढे यायला लागतात आणि हे व्याकरण तयार करणारे लोक या प्राकृत भाषांना संस्कृतीची भाषा बनवण्यासाठी म्हणून एक शिस्त देतात जिला व्याकरणी शिस्त म्हणता येते आणि मग भाषा या शिस्तीखालीच बोलायला लागते लिहिली जाते. त्यातूनच त्या भाषेचा संस्कारिक फॉर्म तयार होतो .


आपल्याकडे फार मोठा गैरसमज आहे की ऋग्वेद हा संस्कृत मध्ये लिहिला गेला आहे माझे स्वतःचे स्पष्ट मत असे आहे की जेव्हा युरेशियन लोक आले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची स्वतःची अशी एक भाषा होती जिला आपण त्यांच्या आदिवासी टोळीची आदिवासी भाषा म्हणू शकतो या भाषा कदाचित अनेक असाव्यात त्यांच्यातून मग ज्याला जिला आज आपण ऋग्वेदाची भाषा म्हणतो किंवा ऋग्वेदिक भाषा म्हणतो ती प्राकृत भाषा तयार झाली असावी नमीसाधू (हा रुद्रटाचा टीकाकार होता )याने व्याकरणाची संस्कार न झालेली भाषा म्हणजे प्राकृत असे म्हटलेच आहे आणि पुढे मग तिच्यावर पाणीनी वगैरे अनेक व्याकरणकारांनी संस्कार करत शिस्त दिली आणि या शिस्तीमधून हळूहळू संस्कृत निर्माण झाली त्यामुळेच काही ऋग्वेदाचे अभ्यास करणारे लोक संस्कृतचे वैदिक संस्कृत आणि लौकिक संस्कृत असे दोन प्रकार मानतात आणि वेदांची भाषा ही वैदिक संस्कृत आणि रामायण महाभारताची भाषा ही लौकिक संस्कृत असे मानतात .


आता प्रश्न असा आहे की आर्य किंवा युरेशियन लोक येण्यापूर्वी भारतात काय भाषा अस्तित्वात नव्हत्या ? तर त्या होत्या आणि त्यांच्यापैकी तमिळ सारख्या भाषेने स्वतःचे व्याकरण सुद्धा तयार केलेले होते . इथल्या काही भाषा सुद्धा आदिवासी , प्राकृत आणि सुसंस्कृत अशा तीन टप्प्यातून गेल्या होत्या . त्यामुळे इथल्या लोकांनी आर्यभाषा स्वीकारल्या असे मानणे म्हणजे वडाचे झाड गवताला चिटकवणे आहे. पुढे या दोन्ही भाषांकुलांच्यामध्ये भाषा समूहांच्या मध्ये देवाण-घेवाण झाली . त्यामुळेच ऋग्वेदाची जी भाषा आहे ती फक्त युरोशियन युरोपियन नाही तिच्यामध्ये द्रविडीयन घटक सुद्धा सामील आहेत आणि म्हणूनच तिला युरोशियन युरोपियन न ठरवता इंडो युरोशियन म्हणावे लागते जो इंडो युरोपियन भाषांच्या समूहाचा आता एक भाग मानता येतो .


आपली मराठी सुद्धा मराठी प्राकृत पासूनच तयार झालेली आहे आणि मराठी प्राकृत ही प्रामुख्याने माझा स्वतःचा अंदाज असा आहे की गोंडी भाषेपासून तयार झालेली आहे. मराठी भाषेचा मुख्य भाषा प्रवाह सुरुवातीला गोंडी असावा आणि मग या भाषेने हळूहळू अनेक भाषांशी देवाण-घेवाण करत मराठी प्राकृत डेव्हलप केलेली असावी . या मराठी प्राकृतला नंतर संस्कृत रूप देण्याचे अतोनात प्रयत्न वैष्णव आणि हिंदू ब्राह्मणांनी अकराव्या शतकापासून सुरू केले त्यातूनच 19 व्या शतकामध्ये संस्कृतनिष्ठ मराठी तयार झाली . इतकेच कशाला आपली मोडी लिपी सुद्धा मराठीने सोडली आणि संस्कृतची देवनागरी लिपी स्वीकारली हा ब्राह्मणांचा ब्राह्मण धर्माचा पडलेला अत्यंत वाईट परिणाम आहे . आज मराठीची जी सर्वत्र वाईट परिस्थिती व हालत झालेली आहे तिला जबाबदार मराठी ब्राह्मणांनी मराठी प्राकृताची केलेली मराठीच्या प्राकृत मोडी लिपीची केलेली हत्या आहे .


प्रश्न असा आहे की मग आता काय मोडी लिपीचे पुनर्जीवन करायचे काय ? तर त्याचे उत्तर हो असे आहे पण हे करणे त्यासाठी लागणारी सांस्कृतिक आणि राजकीय इच्छा तयार होणे हे एक अत्यंत अवघड असे कर्म आहे . उत्तर भारताच्या श्रीकृष्ण आणि श्रीरामांमध्ये रामायण आणि महाभारतामध्ये स्वतःची मराठी संस्कृती भिजवत तिला डुबवायला चाललेले बुडवायला चाललेले ब्राह्मण लोक आणि ब्राह्मणे तर पण ब्राह्मणी झालेले लोक जोपर्यंत आहेत तोपर्यंत महाराष्ट्राला हे जमेल असे मला वाटत नाही .


तेव्हा प्राकृत फक्त दिवस म्हणूनच साजरा करा . मराठी संस्कृतीची आत्ता तरी सध्या लायकी तीच आहे . अर्थात ही लायकी बदलली तर माझ्यासारखा आनंदी प्राणी नसेल.


श्रीधर तिळवे नाईक

 



Comments

Popular posts from this blog

भारतीय राजकारण स्थिती आणि गती