सावरकर आणि मनुस्मृति ५ श्रीधर तिळवे नाईक
भारतीय इतिहासामध्ये मनु इतकी गुंतागुंतीची गोष्ट नसावी हा शब्द मन या शब्दापासून तयार झालेला आहे असे दिसते काहींच्या मते मनन पासून !
मनूचा प्रथम उल्लेख ऋग्वेदात दिसतो ( १:८०:१६ १: ११४:२ २:३३:१३) ऋग्वेदात तर मनुने दाखवलेल्या मार्गापासून मी च्युत होऊ नये अशी प्रार्थना ही केलेली दिसते काहींच्या मते मनुनेच प्रथम यज्ञ शोधला आणि पहिला यज्ञ मनुनेच केला आणि ही परंपरा चालवणाऱ्या सर्वांनाच पुढे मनू म्हटले गेले मात्र त्यासाठी त्यांचे प्रजापती असणे ही एक अनिवार्य अट मानली गेली म्हणजेच प्रजापती सुद्धा अनेक होते परंतु जे धर्मशास्त्र जाणत होते अशा प्रजापतींना मनु म्हटले जात होते त्यामुळेच महाभारतात शांती पर्वात स्वायंभुव मनू आणि प्राचेतस मनू यांचा उल्लेख येतो त्यावरून मनु अनेक असावेत हे स्पष्टच दिसते वैष्णव लोकांच्या मधील एक गट असा आहे जो महाभारताला मनुस्मृति नंतरची वैष्णव लोकांच्यासाठी लिहिली गेलेली वेगळी स्मृती असा दर्जा देतो. त्यामुळेच नवव्या शतकानंतर अनेकदा महाभारत धर्मप्रमाण मानले गेलेले आहे कारण ती वैष्णव लोकांची स्मृती आहे . खुद्द भीष्मांनी युधिष्टरला मनुस्मृतीप्रमाणे चालण्याचा उपदेश केलेला दिसतो
ब्राह्मण ग्रंथांमध्ये शतपथ ब्राह्मण हा पहिला ब्राह्मण ग्रंथ मानला जातो त्यामध्ये जगबुडीच्या( जगप्लावन) संदर्भात जगाला तारणारा असा तो मनू आहे. महाभारत शांतीपर्वात पहिले धर्मशास्त्र एक लक्ष श्लोकाचे होते असे सांगते आणि त्यांचे प्रवर्तन मनुने केले असे सांगते मात्र इथे ब्रह्माला ही श्रेय दिले जाते म्हणजे हा प्रजापती आहे ज्याला मनुसुद्धा मानले गेले
मनुस्मृतीबद्दलचा आजच्या काळातला सर्वात मोठा गोंधळ म्हणजे मानव धर्मशास्त्र हे पूर्णपणे वेगळे आहे आणि ते उपलब्धच नाही. अनेक ब्राह्मण लोक दिशाभूल करण्यासाठी मनुस्मृतिलाच मानवधर्म शास्त्र म्हणून सादर करतात. प्रत्यक्षामध्ये मानव धर्मशास्त्र म्हणून एक वेगळे धर्मशास्त्र होते आणि बहुदा तेच प्रथम होते आणि बहुधा तेच मनू ने लिहिलेले होते . त्यातले जे काही श्लोक आढळतात विशेषत: प्राचीन वाङ्मयात त्यांचा मनुस्मृतीशी मेळ बसत नाही मग आत्ताची जी मनुस्मृती आहे ती कधी लिहिली गेली असा प्रश्न यातूनच निर्माण होतो .
माझ्या मते पहिले मानव धर्मशास्त्र हे मनुने लिहिले आणि तो क्षत्रिय होता आणि मग नंतर वैदिक धर्मशास्त्राच्या जागी ब्राह्मण धर्मशास्त्र निर्माण करण्यासाठी म्हणून मनुस्मृती लिहिली गेली आणि ती बहुदा मानव धर्मशास्त्राच्या आधारे नंतर लिहिली गेली असावी आणि क्षत्रिय मनुने लिहिलेले मूळ मानव धर्मशास्त्र नष्ट करण्यात आलेले असावे .
प्रश्न असा आहे की हे मूल मानवधर्म शास्त्र कधी लिहिले गेले आणि नंतरची मनुस्मृति कधी लिहिली गेली ? बहुदा शक्यता असे आहे की मूळ मानव धर्मशास्त्र हे आधीच भारतात येण्याआधीच लिहिले गेले असावे आणि कदाचित ते ऋग्वेदाला समांतर असावे त्यामुळेच ऋग्वेदात सुद्धा मनुचा उल्लेख येतो .
मनुस्मृतीच्या काळाबद्दल मात्र खूपच मतभेद आहेत .आपल्याकडे अनेक लोकांनी एक ठाम निष्कर्ष काढलेला आहे तो म्हणजे पुष्यमित्र शृंग यांच्या काळामध्ये मनुस्मृती लिहिली गेली यांची मांडणी अशी की हा शृंग बृहदत मौर्य याचा सेनापती होता आणि त्याने आपल्या राजाची हत्या करून राज्य बळकावले आणि ब्राह्मणी राज्य आणले या घटनेला बाबासाहेब आंबेडकर प्रतिक्रांती म्हणतात पण प्रत्यक्षामध्ये अलीकडे जे काही पुरावे आलेत ते फारसे पूरक नाहीत पण हे कोणी आता लक्षात घेत नाही याचे कारण अख्खा प्रतिक्रांतीचा सिद्धांतच या पुष्यमित्र शृंगाच्या आधारे उभा आहे आणि तो जर का खोडीत किंवा मोडीत काढला तर फार काही कोसळेल म्हणून पुरोगामी लोक त्याकडे फारसे लक्ष देत नाहीत मुळात हा पुष्यमित्र ब्राह्मण होता ही दंतकथा भविष्य पुराणांमध्ये येते आणि भविष्य पुराणा मध्ये अगदी राणी विक्टोरिया चा सुद्धा उल्लेख असल्यामुळे ते साधारणपणे 19 व्या शतकामध्ये लिहिले गेले असे स्पष्ट दिसते म्हणजे इंग्रजांच्या आधी ब्राह्मणांची पेशवाई होती आणि त्याचप्रमाणे प्राचीन काळी सुद्धा ब्राह्मणांची सत्ता एकेकाळी भारतात आली होती हे सिद्ध करण्यासाठी ब्राह्मण लोकांच्या पैकीच कोणीतरी हा खटाटोप केलेला दिसतो .
त्या उलट बौद्ध वाङ्मयात अशोक वंशाविषयी जे काही लिहिले जाते त्यात पुष्यमित्र याचा उल्लेख मौर्य असाच आहे माझ्या मते तो मौर्यच असावा कारण भविष्य पुरानावर विश्वास ठेवण्यापेक्षा याबाबतीत बौद्ध वाङ्मयावर विश्वास ठेवणे अधिक चांगले आहे
हे जे मौर्य राजघराणे होते ते मी आधीच सांगितलेले आहे की नंद घराणे होते ते मुद्दाम वेगळे करण्याचा प्रयत्न नंतरच्या इतिहासकार लोकांनी केला कारण त्यांना काही झाले तरी नंद राज घराणे मान्य करायचे नव्हते याचे कारण नंदाचा थेट शैवांशी असलेला संबंध होय . भारतातील हे दुसरे साम्राज्य होते शिवाय या साम्राज्याचा संस्थापक पद्मशाली नंद हा वैदिक नव्हता हे निश्चित आहे आणि तो बहुदा शूद्र मानला गेला होता काहींच्या मते तर तो न्हावी होता . तसा उल्लेख झालेला आहे एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे तो वैदिक युरोशियन नाही . हेच घराणे पुढे पुष्यमित्रापर्यंत चालत आलेले आहे फक्त पुष्यमित्राच्या काळात फरक असा पडला की जो बौद्धांनी प्रचंड असा हिंसक असा टोन पकडला होता तो जवळ जवळ मौर्य साम्राज्याच्या मुळावर आला आणि त्यामुळे साहजिकच युद्धाला मान्यता देणे गरजेचे बनले आणि त्यामुळेच त्याने काही प्रमाणामध्ये जाजवल दृष्टिकोन पकडला आणि म्हणूनच त्याला ब्राह्मणांनी आपला नेता करून टाकले
प्रत्यक्षात तो ब्राह्मण होता का तर नाही आपणाला असे दिसते की पुष्यमित्र मौर्य याच्या काळामध्ये जे शिलालेख लिहिले गेले ते सर्वच्या सर्व प्राकृत भाषेत आहेत त्याने कुठेही संस्कृत वापरलेली नाही कारण मुळात तत्कालीन प्रोसेसिंग संस्कृत मध्ये असलेल्या वैदिक श्रुतीशी त्याचा काडीचाही संबंध नव्हता . त्याच्या नावावर अश्वमेध वगैरे खपवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु त्याला कसलाही पुरावा नाही जो काही पुरावा आहे तो पौराणिक आणि काल्पनिक आहे थेट पुरावा नाही . दुसरी गोष्ट या काळामध्ये आपण लक्षात घेतली पाहिजे की अशोकाच्या काळातच आपण जर का त्याचे शिलालेख वाचले तर ब्राह्मण आणि श्रमण या दोघांनाही आदर दिला जात असावा आणि मौर्य लोक ब्राह्मण लोकांचाही आदर करत असल्याने कधी कधी यज्ञ करत असावेत किंवा मग हे लोक पंडित असावेत ब्राह्मण नसावेत .(यावर मी स्वतंत्र लेख लिहिलेलाच आहे ) साहजिकच संस्कृत मध्ये शिलालेख सुद्धा या पुष्यमित्राने लिहिलेले नाहीत म्हणजेच मग यदाकदाचित आपण असे मानले की जर का मनुस्मृती त्याच्या काळात लिहिली गेली तर मग असे म्हणावे लागते की जी मनुस्मृती या काळामध्ये लिहिली गेली ती मूळ मानव धर्मशास्त्राचे भ्रष्ट रूप होते आणि हे रूप पुन्हा लिहिले गेले याचे सर्वात मोठे कारण आता बौद्ध साम्राज्य उलथून टाकावे असा कट हळूहळू ब्राह्मण धर्म पाळणाऱ्या काही कट्टर ब्राह्मणांच्यात शिजत असावा . एकदा ही गोष्ट लक्षात आली तर मग आपणाला सहज कळू शकते की नंतर बौद्ध धर्मामध्ये का ब्राह्मण आणि क्षत्रिय वर्ण महत्त्वाचे झाले ? म्हणजे साम्राज्य सुरू करायचे तेव्हा हे वैदिक नसलेले लोक शैव धर्म स्वीकारून बसायचे आणि एकदा का यांचे साम्राज्य प्रस्थापित झाले की मग हे युरेशियन धर्मांच्या दिशेने वाटचाल करायचे. नंदांच्या बाबतीत हे घडलेले आहे नंतर मग जैन आणि बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारलेला दिसतो कनिष्काच्या बाबतीत सुद्धा हेच दिसते सुरुवातीला त्याचे आजोबा आणि वडील शैव आहेत नंतर मग कनिष्का पासून हे घराणे बौद्ध झालेले दिसते याला दोन कारणे आहेत पहिले कारण म्हणजे साम्राज्य प्रस्थापित झाले की प्रत्येक सम्राटाला शांतता हवी असते आणि या शांततेसाठी बौद्ध धर्म हा सर्वात बेस्ट धर्म आहे तो उठाव करण्याची प्रेरणाच दाबून टाकतो आणि साम्राज्य शाबूत ठेवतो किंबहुना जगभरामध्ये बौद्ध धर्म हा सुरुवातीच्या कालखंडामध्ये कधीच कुठल्या घराण्याने स्वीकारलेला दिसत नाही नंतर मग साम्राज्य टिकवण्यासाठी बौद्ध धर्म आवश्यक होतो जैन धर्म आवश्यक होतो अगदी इंग्रजांनी सुद्धा साम्राज्य प्रस्थापित झाल्यानंतर बौद्ध आणि जैन धर्म व्यवस्थित पुढे आणला . दुसरे कारण मनुस्मृतीने दिलेला क्षत्रिय वर्णाचा दर्जा या लोकांना हवाहवासा वाटला हेच आहे. नंद आणि कनिष्क घराण्यांनंतर यादवांच्या बाबतीतही हेच दिसते ते प्रथम शैव आहेत आणि नंतर शेवटी शेवटी ते वैष्णव झालेले दिसतात पुढे मग शिवाजी महाराज सुद्धा हर हर महादेव म्हणत सुरुवात करतात आणि राज्याभिषेक वैदिक होतो सुदैवाने त्यांना काय घडले ते कळते आणि मग ते पुन्हा शैव राज्याभिषेक करतात आणि त्यांच्या नंतर जवळजवळ पहिल्या बाजीरावा पर्यंत शैव राजवट असते तोपर्यंत मनुस्मृति येत नाही आणि नंतरच्या काळात मग उत्तर पेशवाई आणि मनुस्मृतीची सत्ता आपोआप आलेली आहे म्हणजेच संघर्ष करणारे अनेक लोकांना विरांना भारतातील राज्यकारणात चंचू प्रवेश मुळातच शैव लोकांनी किंवा शैव राजांनी दिलेला आहे . बहुदा आपण कुणाला प्रवेश देतोय याची कल्पना शैव लोकांना आलेली दिसत नाही स्वतःच्या कर्तुत्वाच्या जीवावर राज्य निर्माण करायचे असेल तर प्रथम शैव व्हायचे जय भवानी हर हर महादेव म्हणायचे जय एकलिंगजी म्हणायचे शैव लोकांना साम्राज्य उभे करायला सैनिक म्हणून उभे करायाचे आणि नंतर मग सावकाश पाठीमागून क्षत्रिय व्हायचे आणि ज्यांच्या जीवावर आपण राज्यावर आलो त्यांच्याच डोक्यावर मीऱ्या वाटायला सुरुवात करायची ही जवळजवळ सर्वच बाहेरून आलेल्या लोकांची प्रवृत्ती दिसते मात्र जेव्हा ते एरोशियन होतात तेव्हा त्यांचे साम्राज्य धड दोन पिढ्या पण टिकत नाही असे दिसते याचे कारण मुळातच जात वर्ण व्यवस्था स्थिर आणि पराक्रमी राजवट निर्माणच करू शकत नाही . म्हणजे सुरुवातीला आश्चर्यकारक रित्या जेव्हा पाठबळ नसायचे किंवा संघटित नव्हते किंवा यांचे कर्तृत्व नव्हते तेव्हा मात्र यांना वैदिक लोकांनी ब्राह्मण लोकांनी आपल्या धर्मात प्रवेश दिलेला दिसत नाही तेव्हा मात्र यांना शैव-धर्मच लागतो नंतर मग मनुस्मृतीनुसार क्षत्रिय बनण्याचे सगळे डोहाळे यांना लागलेले दिसतात यातूनच मग अलीकडचे शिंदे आणि अजित पवार प्रकरण घडलेले दिसते. जे भाजपा बरोबर येतात सवलती नाकारतात ते क्षत्रिय आणि जे सवलती घेतात ते शूद्र अशी विभागणी होताना आता दिसत आहे .
आत्ताची प्रचलित असलेली मनुस्मृती कोणी लिहिली हे आजही सांगता येणे कठीण आहे परंतु एक गोष्ट नक्की आहे तिने शासनकर्त्या लोकांना आपल्या तालावर नाचवलेले आहे मग हा शासनकर्ताधर्ता वर्ग शैव असो की युरेशियन तो मनुस्मृतीच्या तालावर नाचतानाच दिसतो याचे कारण मनुस्मृती ब्राह्मण आणि क्षत्रियांना विशेष दर्जा देते आणि प्रत्येकाला अहंकार आवश्यकच असतो अस्मिता आवश्यकच असते आणि कसलेही कर्तुत्व न गाजवता ब्राह्मण आणि क्षत्रिय आई-बाबांच्या पोटी जन्मलो म्हणून ही मोठी अस्मिता मिळून जाते ती प्रत्येकाला हवीहवीशी वाटते . खोट्या अहंकाराचे खोटे समाधान ही एक अशी गोष्ट आहे जी मानसशास्त्रीय पातळीवर खोटे राज्य निर्माण करते आणि अस्तित्वाचा पोकळपणा भरून काढते
साहजिकच तुम्ही जेव्हा ब्राह्मण किंवा क्षत्रिय वर्ण जातीत जन्मता तेव्हा तुम्हाला हा सगळा प्रकार हवाहवासा वाटतो . प्रत्यक्षामध्ये गेल्या हजार वर्षांमध्ये या देशाचे या देशातील राज्यांचे आणि जनतेचे किती वेळा क्षत्रिय लोकांनी संरक्षण केले असा प्रश्न विचारला तर मग सगळे पितळे उघडे पडते . मुस्लिमांनी या जनतेला किती ताप दिला आहे सांगणारे लोक हे सांगत नाही की या जनतेला संरक्षण देण्याची जबाबदारी या देशातल्या क्षत्रियांची होती आणि ती त्यांनी पार पाडलेली नाही लोकमान्य टिळक हीच गोष्ट कायमच अधोरेखित करत होते म्हणूनच त्यांच्यावर जास्त खार आहे . आक्रमक लोकांची सेवा आणि गुलामी करण्यामध्ये आयुष्य घालवणारे लोक जेव्हा पराक्रमाच्या गोष्टी करायला लागतात तेव्हा त्यांचे काय करायचे हा एक फार मोठा प्रश्न असतो .
मनुस्मृती वर्तमानात येऊ देत नाही ती तुम्हाला भूतकाळातल्या अहंकारांमध्ये आणि पूर्वजांनी गाजवलेल्या आणि न गाजवलेल्या पराक्रमामध्ये खेळवून ठेवते खीळवून ठेवते .
त्यामुळे सावरकर यांच्यासारखा विचारवंत सुद्धा स्वतःला विज्ञाननिष्ठ म्हणवत असताना सुद्धा कळत नकळत मनुस्मृती समर्थन करतो .
सावरकर यांना मनुस्मृतीचा इतिहास माहिती होता का ? त्यांच्या लिखाणात तरी तो फारसा सापडत नाही मग ते मनुस्मृतीचा आधार कशाला घेत होते ? केवळ परंपरेचा अभिमान म्हणून? भारतीय समाज व्यवस्थेमध्ये सगळे प्रश्न म्हणून स्मृती मुळे निर्माण झालेले आहेत हे माहीत असताना सुद्धा एक विज्ञाननिष्ठ घटना संविधान आवश्यक आहे हे कळालेले असताना सुद्धा केवळ आपल्या अनुयायांना खुश करण्यासाठी अशी विधाने त्यांनी का करावीत असाच प्रश्न पडतो . हे टिळकांच्या प्रमाणे झाले . ब्राह्मण अनुनयांच्या कचाट्यात सापडणे यासारखे दुर्दैव नाही याला उपाय एकच असतो तो म्हणजे मी ब्राह्मण आहे पण मी फक्त कागदोपत्री ब्राह्मण आहे प्रत्यक्षामध्ये माझा माझ्या अस्तित्वाचा ब्राह्मण असण्याची काहीही संबंध नाही अशी स्पष्ट भूमिका घेणे . आज सुद्धा ही भूमिका घेणे अनेक ब्राह्मणांना शक्य होत नाही आणि मला कायमच याचे आश्चर्य वाटत आलेले आहे. अगदी स्वतःला कम्युनिस्ट म्हणवणारे लोक सुद्धा स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेताना मी पाहिलेले आहेत . मग हिंदुत्ववाद्यांनी स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेतले तर आश्चर्य ते काय ?
सावरकरांचे सुद्धा काहीसे असेच झालेले आहे. त्यांना ब्राह्मण असण्याचा अभिमान असावा हे स्पष्ट दिसते मात्र त्यांना मनुस्मृती आणावीशी वाटत असेल असे मला तरी वाटत नाही पण ब्राह्मण अनुयायांना खुश करण्यासाठी म्हणून त्यांनी मनुस्मृतीच्या बाजूने विधाने केली परंतु या विधानांच्या मुळेच आता तो पुरावा होतो आणि सावरकरांचा सगळा विचार परस्पर विरोधाच्या पुन्हा एकदा तावडीत सापडतो . मी हे नेहमीच सांगत आलेलो आहे की जोपर्यंत तुम्ही शैव हिंदुत्व स्वीकारत नाही तोपर्यंत तुम्हाला मनुस्मृती संपूर्ण नाकारता येणे शक्य होणार नाही कारण तिचे युरेशियन संस्कार घनदाट आहेत .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment