सावरकर ४ सावरकर, विज्ञानशीलता आणि स्वातंत्र्य श्रीधर तिळवे नाईक 


मागील दोन लेखात आपण हे पाहिले की धर्मशास्त्र कसे पुरोगामी राज्यशास्त्रावर राज्य करत होते सत्ता प्रणालीला प्रभावित करत होते .त्यामुळे युरोपमधील प्रत्येक विचार प्रणालीवर कळत नकळत ख्रिश्चन धर्माचा प्रभाव पडला. भारतामध्ये हा प्रभाव हिंदू धर्माचा होता आणि त्यामुळेच हिंदू वाद आणि हिंदुत्ववाद अशा दोन धारा जन्मल्या तिसरी धारा अर्थातच शैव आहे .


सर्वसाधारणपणे आपणाला मोक्षशीलता माहिती आहे आणि हेही माहित आहे की त्यांचा आधार शैव लोकांची द्वादशशीलता यमनियम किंवा जैन बौद्धांची पंचशीलता आहे .


प्रश्न असा आहे की मग विज्ञानाचा उदय झाल्यानंतर विज्ञानशीलता नावाची काही गोष्ट जन्मली काय ? या प्रश्नाचे उत्तर हो असे आहे 


विज्ञानाला सर्वात प्रथम लक्षात आलेली गोष्ट म्हणजे जर का खरोखर ज्ञानप्राप्ती सत्यप्राप्ती करायची असेल तर मनुष्य स्वतंत्र असला पाहिजे त्यामुळेच माणसाचे सत्य शोधण्याचे स्वातंत्र्य हे मूल्य म्हणून प्रस्थापित करण्याची धडपड सर्वच विज्ञाननिष्ठ विचार प्रणालींच्या मध्ये सुरू झाली .


विज्ञानाच्या हेही लक्षात आले की सत्य शोधण्याची मक्तेदारी एका विशिष्ट खास वर्गाकडे देता येणार नाही कारण सत्य कुठल्याही माणसाला सापडू शकते मग तो गरीब असो किंवा श्रीमंत त्यामुळे साहजिकच सत्य शोधाच्या कार्यक्रमांमध्ये समता ही अत्यंत आवश्यक झाली.


त्याचबरोबर वैज्ञानिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी केवळ एक मनुष्य उपयोगाला येत नाही तर अनेक वैज्ञानिक जेव्हा एकमेकाला परस्पर पूरक काम करायला लागतात तेव्हा विज्ञान अधिक चांगले रीतीने फंक्शन करते म्हणजेच वैज्ञानिक ज्ञानाच्या संदर्भामध्ये स्वातंत्र्य समता आणि बंधुता असल्याशिवाय वैज्ञानिक ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही हे लक्षात आले. हे वैज्ञानिक सत्य अथवा ज्ञान प्राप्त होण्यासाठी शिक्षण व्यवस्था ही सर्वांच्यासाठी खुली असणे फार आवश्यक होते त्यामुळेच मग राष्ट्र शासनाला शाळा काढण्याचा उपक्रम हातात घ्यावा लागला शिक्षण फार महत्त्वाचे बनले आणि त्यामुळे शिक्षण घेणे हा प्रत्येकाचा हक्क आहे ही संकल्पना उदयाला येऊ लागली आणि यातूनच पुढे हक्क म्हणजे काय आणि त्याहूनही पुढे नागरिकाचे हक्क काय कोणते असा प्रश्न उपस्थित झाला म्हणजेच स्वातंत्र्य समता बंधुता यांच्या बरोबरीने हक्कता नावाची गोष्ट निर्माण झाली . यानंतरचे विज्ञानाने मूल्य दिले ते प्रामुख्याने प्रगती या नावाने ओळखले जाते म्हणजे असे की विज्ञान हे सतत प्रगती करत असते कोणीतरी एक सिद्धांत मांडतो मग त्यानंतर आणखी एक सिद्धांत येतो असे करत एक संपूर्ण भौतिकशास्त्र निर्माण होते आणि भौतिकशास्त्र हे सतत प्रगती करत असते ज्ञानाची प्रगती हीच नंतर समाजाची प्रगती होत जाते. पण ही प्रगती व्हायची असेल तर मुळात प्रथम विज्ञानाला स्वतःचे सिद्धांत मांडण्याचे स्वातंत्र्य हवे त्यावर चर्चा करण्याचे स्वातंत्र्य हवे आणि याबाबतीतला सर्वात मोठा अडथळा धर्माचा होता त्यामुळे साहजिकच धर्माला कसे घरात बसवता येईल त्या अंगाने चर्चा सुरू झाली आणि त्यातूनच पुढे धर्म घरी ठेवा आणि सार्वजनिक जीवनात विज्ञान स्वीकारा ही विचारसरणी पुढे आली . त्याचबरोबर जर का ज्ञान वाढले आणि त्याचे रक्षण केले तरच ते प्रगतीला कारणीभूत होते आणि त्यासाठी शांती शांतता आवश्यक आहे हे कळून चुकले. आजही युद्धामुळे विज्ञान वाढते की नाही हा एक फार वादाचा प्रश्न होऊन बसलेला आहे . काही लोक चक्क युद्ध चांगले म्हणतात त्याचे कारण युद्धातल्या संघर्ष भूमीतूनच अनेक महत्त्वाचे वैज्ञानिक शोध लावले गेलेले आहेत आणि त्यातून तंत्र वैज्ञानिक शोध पुढे आलेले आहेत मात्र एकंदर पुरोगामी काळामध्ये कल असा होता की शांततेच्या काळामध्ये ज्ञान जास्त प्रगती करते . हे सर्व करायचे असेल तर मग साहजिकच व्यक्तिगत स्वातंत्र्य असणे आवश्यक होते आणि म्हणूनच त्यातून व्यक्तिवाद उदयाला आला व्यक्तीचे हक्क नावाची एक गोष्ट उदयाला आली ही सर्वच विज्ञानशीलता आहे आणि आपल्याकडे तिचा अधिक खोलात जाऊन विचार झाला पाहिजे राज्य आणि राष्ट्र यांच्यातला सर्वात मोठा फरक ही विज्ञानशीलताच आहे.प्राचीन काळातली जी राज्य होती ती धर्मकेंद्री किंवा महाश्रद्धाकेंद्री होती आणि राष्ट्र ही संकल्पना विज्ञानशिलतेभोवती फिरते धर्म आणि विज्ञान यांच्या संघर्षामध्ये अनेकदा युरोपमधल्या राजे लोकांनी विज्ञानाच्या बाजूने आपले मत टाकले आणि त्याचा विज्ञानाच्या प्रगतीसाठी खूप मोठा फायदा झालेला आहे . मुळातच राजेशाही धार्मिक वर्चस्व स्वीकारायला आता तयार नव्हती कारण धर्माचे अनेक सिद्धांत विज्ञानामुळे कोसळत चालले होते खुद्द राजे लोकांचा पारंपारिक धर्मावर विश्वास राहिला नव्हता धर्मगुरूंच्या पेक्षा वैज्ञानिक त्यांना अधिक उपयुक्त वाटत होते. सावरकरांचा सुद्धा त्यामुळेच पारंपारिक धर्मावर विश्वास नाही . ते वैयक्तिक आयुष्यात नास्तिक होते . आणि हे स्वातंत्र्य त्यांना विज्ञानशीलतेमुळे अधिक मिळाले होते त्याची त्यांना जाणीव होती.


सावरकरांच्या विचाराच्या केंद्री यामुळेच युरोपियन प्रबोधनातून विज्ञानशीलतेमधून आलेली स्वातंत्र्य ही संकल्पना दिसते स्वतःला ते जेव्हा स्वातंत्र्यवीर म्हणवून घेतात तेव्हा त्यांना कळत नकळत स्वातंत्र्य हेच केंद्रस्थानी ठेवावेसे वाटत असते . या देशात बंधुता आणि समता आणायची असेल तर सुद्धा स्वातंत्र्य असावे याची त्यांना कल्पना होती फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये सुद्धा मुख्य गोष्ट स्वातंत्र्यच होती . आणि अमेरिका सुद्धा स्वातंत्र्यासाठी लढूनच स्वतंत्र झाली. या गोष्टींचा सावरकर यांच्यावर प्रभाव होता आणि आपणाला ही अमेरिकेसारखे स्वातंत्र्य मिळू शकते याची त्यांना कल्पना होती. अमेरिकेची क्रांती ही सशस्त्र क्रांती होती आणि भारताला सुद्धा सशस्त्र क्रांती करूनच युद्ध करूनच स्वातंत्र्य मिळेल असे त्यांना वाटत होते . जर अमेरिकन लोक स्वतःच्या भूमीवर संघटित होऊन युरोपियन लोकांशी लढू शकतात तर आपण का नाही असा हा तर्क आहे .


या काळातल्या युरोपियन सत्तांच्या मधला सर्वात मोठा विरोधाभास हाच होता की स्वतःच्या देशात जे हक्क ते देत होते ते सारे हक्क ते जिथे त्यांचे साम्राज्य होते तिथे ते नाकारत होते . अपवाद काही प्रमाणात शिक्षणाचा हक्क होता . आणि हा हक्क त्यांना नाईलाज म्हणून द्यावा लागला होता कारण साम्राज्य चालवण्यासाठी त्यांना एज्युकेटेड लोक हवे होते . याचे कारण त्यांच्याकडे पुरेशा प्रमाणात लोकसंख्या नव्हती त्यामुळे कॉलनी मधल्या वसाहती मधल्या लोकसंख्येची गरज वसाहती चालवण्यासाठी निर्माण झाली होती आणि साहजिकच मग निदान पक्षी शिक्षण द्यावे पण त्याचबरोबर या लोकांची आपल्या साम्राज्याबरोबर वफादारी निर्माण करावी असे धोरण स्वीकारले गेले आणि त्यातूनच मग शेक्सपियर सारखा वफादारी शिकवणारा नाटककार मोठा करण्यात आला . सावरकरांच्या वाङ्मयाकडे पाहिले तर एक वेगळी गोष्ट आपणाला दिसते ती म्हणजे ते कदाचित त्या काळातले ते एकमेव भारतीय साहित्यिक आहेत ज्यांच्यावर शेक्सपियर चा प्रभाव नाही .


सावरकरांना एका बाजूला इंग्रजांच्या कडून स्वातंत्र्य हवे होते आणि दुसऱ्या बाजूला हिंदू लोकांच्यात बंधुता कशी निर्माण होईल तेही पाहायचे होते मुस्लिम धर्माबाबत आणि ख्रिश्चन धर्माबाबत बंधुता ही गोष्ट अशक्य आहे असे समीकरण ते वारंवार मांडताना दिसतात विशेषतः अंदमान मधला जो अनुभव त्यांना होता त्यामुळे मुस्लिम लोकांशी बंधूता अशक्य आहे असा निष्कर्ष त्यांनी काढला त्याची कारणे त्यांनी शोधली ही कारणे म्हणजे म्हणजे हे धर्म शेवटी बाहेरून आलेले आहेत हे भारतीय नाहीत आणि यांची श्रद्धास्थाने सुद्धा बाहेर आहेत 


एकदा मुस्लिम आणि ख्रिश्चन वगळले की जे उरलेले हिंदू आहेत त्यांच्यात बंधुता वाढावी म्हणून काय करावे ? हिंदुत्व हे असे बंधुत्व वाढवण्यासाठी होते . सर्व हिंदू एकमेकांचे बंधू आहेत हा त्यामागे विचार आहे . त्यामुळे हिंदुत्ववादी सतत वर्ण जात बाजूला ठेवा आणि आपण सर्व हिंदू बंधू आहोत हे लक्षात ठेवा असे सांगत असतात हा सावरकरांचाच प्रभाव आहे .


खरा प्रश्न समतेचा आहे आणि तिथेच कळत नकळत सावरकर ब्राह्मणवादाच्या आणि ब्राह्मण धर्माच्या तावडीत सापडतात. ते समते बाबत पुरेसे ठाम आहेत असे कुठेच वाटत नाही ब्राह्मण श्रेष्ठ आहेत हा श्रेष्ठ गंड सुपेरीयर कॉम्प्लेक्स जात नाही अगदी आजही तो ब्राह्मण वर्गाच्या ठाई असतो आणि आश्चर्यकारकरीत्या सावरकर त्याला जोपासतात . आपण जर का युरेशियन धर्माची परंपरा घेतली तर तिथे हे वारंवार घडते या लोकांच्या दृष्टीने फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय हेच फक्त श्रेष्ठ आहेत वैश्य नोकर आणि सर्विस प्रोव्हायडर आहेत तर शूद्र दास आहेत अतिशूद्र गुलाम आहेत आणि आदिवासी सर्विस प्रोव्हायडर आहेत जे अधून मधून कधीतरी येत असतात . बाकी जाऊ द्या पण मोक्ष सुद्धा ते फक्त ब्राह्मण आणि क्षत्रियांना देऊ इच्छितात . अगदी बौद्ध धर्म सुद्धा यातून वाचत नाही आणि शेवटी बुद्ध हे नेहमी ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोन वर्णातच जन्मतात अशी मांडणी करतो. त्यामुळेच विष्णूचे सर्व मानवी अवतार हे फक्त ब्राह्मण तरी असतात किंवा क्षत्रिय तरी असतात विष्णूचा एकही अवतार वैश्य शूद्र अति शूद्र आणि आदिवासी असत नाही. आपल्याकडे हे अजूनही बहुजन समाजामधील (म्हणजे वैश्य शूद्र अति शूद्र आणि आदिवासी) अनेकांच्या लक्षात येत नाही. एक वेळ विष्णूचे अवतार प्राणी असू शकतात म्हणजे मासा किंवा वराह असू शकतो परंतु वैश्य शूद्र अति शूद्र आणि आदिवासी असू शकत नाही . हे लोक बहुजन समाजाकडे नेमके कोणत्या दृष्टिकोनातून बघतात हे इथे स्पष्ट व्हावे . सावरकरांच्यावर हे सगळे संस्कार आहेत ते त्यातून बाहेर येण्याची धडपड करतात खरी परंतु त्यांना यश मिळाले असे वाटत नाही . मुळात ब्राह्मणांनाच हे शक्य होत नाहीये अगदी डॉक्टर असणारा एखादा ब्राह्मण सुद्धा स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेण्यात धन्यता मानतो . शरीरामध्ये मेडिकल लेवलला ब्राह्मण असण्याचा एकही पुरावा नाही हे तो लक्षात घेत नाही .


आज हिंदुत्वामधला सर्वात मोठा जो पेच निर्माण झालाय तो या ब्राह्मणी आणि क्षात्र हिंदुत्वामुळे निर्माण झालेला पेच आहे .अगदी ब्राह्मणेतर चळवळी मधून उदयाला आलेले प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारखे विचारवंत सुद्धा यातून पुरेसे मुक्त झालेले नसतात. त्यामुळेच ते गीता स्वीकारतात आणि गीता फक्त ब्राह्मण आणि क्षत्रियांना श्रेष्ठ मानते . क्षत्रिय सत्ता संघर्षातील सोयीनुसार ब्राह्मण विरोधी असतो किंवा ब्राह्मणांचा मित्र असतो कारण समाजावर वर्चस्व कुणाचे ब्राह्मणांचे की क्षत्रियांचे हा या दोन वर्गांच्या मधला सनातन वाद आहे त्यामुळेच सत्तेच्या बाबतीत क्षत्रियांचे ब्राह्मण हे सनातन शत्रू आहेत किंवा सनातन मित्र आहेत मित्र की शत्रू हे हे त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार ठरत असते. किंबहुना अनेकदा क्षत्रियांना ब्राह्मणेतर चळवळ ही केवळ ब्राह्मणांना नामोहरम करण्यासाठी पाहिजे होती आणि पाहिजे असते .


म्हणूनच मग या सगळ्या पार्श्वभूमीवर एक तर तुम्ही हिंदूवादाच्या सहाय्याने हिंदुत्वाविरोधात लढू शकता किंवा मग हिंदुत्वामध्येच शैव हिंदुत्व निर्माण करून हिंदुत्वाचा आत्मा बदलू शकता . 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय