अग्रलेखाचे गायब होणे श्रीधर तिळवे नाईक 


कुठल्याही युगाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आयुष्याचा अंतिम उद्देश ! प्रत्येक युग स्वतःचा अंतिम उद्देश घेऊन येते . श्रद्धा युगात स्वर्गप्राप्ती हाच उद्देश होता . अनेकदा या स्वर्गामध्ये पितर असत . नंतर मग अनेक गोष्टी धर्मयुगात आल्या. मोक्ष युगात अंतिम उद्देश मोक्ष झाला आणि स्वातंत्र्य झाले पुरोगामी किंवा विज्ञान युगात अंतिम उद्देश ज्ञान होते तंत्रज्ञान युगात किंवा आधुनिक युगात हा उद्देश बदलला आणि पैसा आला . आत्ताच्या नव्या चौथ्या नवतेच्या युगात ज्याला मी जाल युग म्हणतो अंतिम उद्देश प्रसिद्धी आहे . साहजिकच आजच्या युगामध्ये ज्याला मोक्ष मिळवायचा आहे त्याला सर्वात प्रथम प्रसिद्धीवर विजय मिळवावा लागतो . मग पैशावर ! ज्यांना अध्यात्माचा धंदा करायचा असतो असे लोक मग आपोआपच पैसा हा पाप वाटेल म्हणून पैशाचे समर्थन करायला लागतात आणि पैसा मिळवणे वाईट नाही असे बिंबवायला लागतात आता असे भामटे प्रसिद्धी वाईट नाही असे म्हणायला लागलेले आहेत जिथे मोक्षच वाचत नाही तिथे वर्तमानपत्रे कशी वाचणार ? साहजिकच वर्तमानपत्रांच्यातसुद्धा पैसा ही गोष्ट केंद्रस्थानी आली .


वर्तमानपत्रांचा जन्म जो झाला तो पुरोगामी युगामध्ये ज्या वेळेला ज्ञान हे अंतिम उद्देश होते . साहजिकच वर्तमानपत्राने वर्तमानाचे ज्ञान द्यावे म्हणजेच बातमी द्यावी अशी संकल्पना उदयाला आली पण त्याचबरोबर विज्ञानाचा वैज्ञानिक मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करावा अशीही अपेक्षा काही लोकांनी करायला सुरुवात केली साहजिकच त्यामुळेच वर्तमानपत्रातून अंधश्रद्धांच्या वर सुद्धा हल्ला सुरू झाला . धर्म अथवा महाश्रद्धा अथवा मजहब हा परलोकप्राप्ती वर स्वर्गप्राप्ती वर विश्वास ठेवतो त्यामुळे साहजिकच इहलोकापेक्षा सगळा भर हा परलोकावर होता वर्तमानपत्रे आली तेव्हा त्यांनी धर्माबरोबर कॉम्प्रोमाइज करायला सुरुवात केली आणि धर्माला थोडीशी जागा दिली मात्र विज्ञान आणि ज्ञान हेच केंद्रस्थानी आले पाहिजे याबद्दल वर्तमानपत्रांना जाण होती अनेकदा संपादक सुद्धा विचारवंत मानला जाईल किंवा कधीकधी विचारवंतांना संपादकाची जागा दिली जाई. प्रभाकर पाध्ये यांच्यासारखा विचारवंत किंवा नंतर गोविंद तळवलकरांच्यासारखा विद्वान त्यामुळेच संपादक होऊ शके. 


तंत्रज्ञान युग आले आणि माहिती आली ज्ञानाचे रूपांतर माहितीत करणे सुरू झाले ज्ञानाभोवती जे वलय होते ते नाहीसे झाले आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट पैसा बनली . पूर्वी किती खप याचा हिशेब ठेवला जाई परंतु हा हिशेब ज्ञानावर मात करत नव्हता . आता मात्र गोष्टी बदलत गेल्या कारण आता फिल्म आणि टीव्ही अशा दोन अनुक्रमे आधुनिक आणि उत्तराधुनिक गोष्टी आल्या त्यातील टीव्ही आल्यानंतर प्रामुख्याने वर्तमानपत्रांचे काम संपत चालले . माहिती देण्याची ताकद टीव्ही मध्ये जास्त होती कारण टीव्ही वर्तमाननिष्ट जास्त होता त्याची वर्तमानात पोहोचण्याची ताकद आणि वेग जास्त होती . त्यात भरीत भर म्हणून नंतर डिजिटल टीव्ही आला आणि वर्तमानपत्राची गरजच संपली . लोक बातमीसाठी वर्तमानपत्र विकत घेत होते ते आता घरात टीव्ही चॅनेल वरूनच बातम्या मिळवू लागले . याचा एक परिणाम असा झाला की खप कमी आणि खर्च जास्त बरं जो वाचक होता तो काही जास्त पैसे देऊन प्रिंटेड मीडिया खरेदी करायला तयार नव्हता त्याला अजूनही वर्तमानपत्र दोन रुपयात आणि नंतर पाच रुपयात हवे होते प्रत्यक्षात खर्च मात्र १०-१२ रुपये कधी कधी १५ रुपये व्हायला लागला आणि हा जो गॅप आला तो कोणी भरून काढायचा हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला. म्हणजेच केवळ खपावर वर्तमानपत्र चालवण्याची जी लकब होती ती बंद पडली. प्रसिद्धी मिळवण्याचे एक एक्स्ट्रा माध्यम एवढेच स्थान चौथ्या नवतेमध्ये वर्तमानपत्रांना उरले याशिवाय मुख्य टीव्ही माध्यमांमध्ये ज्यांची दखल घेतली जाऊ शकत नाही असे जे साईडलाईन झालेले समुदाय होते समाज होते त्यांचा आवाज म्हणून सुद्धा वर्तमानपत्र महत्त्वाचे बनले . पण नंतर काही टीव्हीवाल्यांनी पोटी संस्कृतीलाही योग्य ती जागा द्यायला सुरुवात केली . त्यामुळे या समाजाचे जे थोडेफार पाठबळ उरले होते तेही नाहीसे व्हायला लागले . साहजिकच मग संपादकपदी विद्वत्ता आवश्यक उरली नाही त्याऐवजी खपवण्याची क्षमता ही जास्त महत्त्वाची झाली त्यामुळे साहजिकच जो विद्वान खप पण देऊ शकतो तो महत्त्वाचा ठरत गेला. आपल्याकडे कुमार केतकर आणि गिरीश कुबेर यांना अशा प्रकारचे स्थान मिळाले परंतु आज अवस्था अशी आहे की वर्तमानपत्रे सरकारी जाहिराती शिवाय किंवा पेड न्यूज शिवाय चालवणे अशक्य बनलेले आहे दुसरी गोष्ट वर्तमानपत्राची जागा आता सोशल मीडियाने घेतलेली आहे. वाचनाच्या बाबतीत जितका सोशल मीडिया अद्ययावत असतो तितकी वर्तमानपत्रे असत नाहीत असे निरीक्षण आहे. अग्रलेखातले विचार अनेकदा जुनाट असतात आणि त्यावर चर्चा आधीच सोशल मीडियावर झालेली असते याला फार कमी संपादक अपवाद असतील पण ते अपवादच आहेत खरे तर ते सुद्धा किती अपवाद म्हणून शिल्लक आहेत हा ही प्रश्न आहे आज अवस्था अशी आहे की जालयुगामध्ये जो फास्ट तो टिकतो जो मंद स्लो तो नाहीसा होतो . जो वर्तमानात जेवढा उपस्थित तेवढे त्याचे अस्तित्व घनदाट जो जितका वर्तमानाच्या बाहेर तितका तो आयुष्याच्या ही बाहेर ! त्यामुळे साहजिकच वर्तमानपत्र शेवटी कालचीच बातमी देत असल्याने वर्तमानपत्रांचे सर्व काही अवघड होऊन बसले यावर उपाय फक्त एकच होतात तो म्हणजे शोध पत्रकारिता ज्या गोष्टी कधीही टेलिव्हिजनच्या पत्रकारांना सापडणे शक्य नाही अशा गोष्टी शोधून त्या वर्तमानपत्रांच्या हेडलाईन म्हणून येणे फार आवश्यक बनले आहे. पण यासाठी खूप जिगरी पत्रकार पाहिजेत त्यांची संख्या फार आहे असे वाटत नाही . जोपर्यंत वर्तमानपत्रात अशा प्रकारचे पत्रकार आणि संपादक येत नाहीत जे टेलिव्हिजन पेक्षा अधिक फास्ट असतील आणि टेलिव्हिजनच्या आधीच न्यूज शोधतील तोपर्यंत वर्तमानपत्रांना फार भवितव्य आहे असे वाटत नाही .


आज अवस्था अशी आहे की खुद्द टेलिव्हिजन चॅनेलसुद्धा सरकारच्या मदतीशिवाय चालवणे अशक्य बनत चाललेले आहे आणि मोदी यांना हे फार व्यवस्थित कळालेले होते त्यामुळेच त्यांनी हळूहळू जाहिरातीच्या जीवावर एक एक चॅनेल आपल्या तालावर नाचवायला सुरुवात केली . किंबहुना चॅनेल सुद्धा प्रॉफिट मध्ये आली पाहिजे हे लक्षात घेऊन त्यांनी चॅनेल्सना रेट वाढवायला सुरुवातीच्या काळात मदत केली होती . अशा प्रकारचा विचार काँग्रेसच्या लोकांनी केला नाही त्यांनी फक्त लोक पाहिले पण जे चॅनेल चालवतायेत ते यामध्ये रसातळाला चाललेत हे त्यांच्या लक्षात आले नव्हते मोदी हे वैश्य असल्यामुळे साहजिकच त्यांना व्यापार ताबडतोब कळतो आणि त्यांच्या असे लक्षात आले की चॅनेल हा डबघाईला आलेला व्यापार आहे त्यांनी ताबडतोब यासंदर्भातली पॉलिसी बदलली आणि आपणाला जी चॅनेल्स 180 ते 280 रुपयांमध्ये मिळत होती ती त्यांनी नंतर 500 पर्यंत उपलब्ध केली आणि ही भाव वाढ करताना त्यांनी ती अशा काही पॅकेज मध्ये केली की लोकांना प्रत्यक्षात भाव वाढ झाली हे कळलेच नाही. गरीब लोकांना फार चॅनल्स लागत नाहीत याची त्यांना जाण होती त्यामुळे त्यांना डीडीची सर्व चॅनल फुकटात दिली आणि खाजगी चॅनेलस महागडी केली त्यावेळीही मी यावर एक लेख लिहिला होता पण तो बहुदा लोकांना समजला नाही. मोदी हे नेहमी एखाद्या उद्योगपती सारखे खेळत असतात आणि प्रत्यक्षात रिझल्ट आल्यानंतर कळते की त्यांना काय करायचे होते . त्यांच्यामुळेच बऱ्यापैकी चॅनेल प्लस मध्ये आली अन्यथा अनेक प्रायव्हेट चॅनेल्स कदाचित बंद पडली असती . 


याचा एक दुष्परिणाम असा झाला की सरकारी जाहिराती ज्या वर्तमानपत्रांच्याकडे अधिक मोठ्या प्रमाणात सरकत होत्या त्या आता मोदींच्या काळामध्ये स्पष्ट आणि स्वच्छ पणाने टेलिव्हिजनकडे सरकल्या . आज अवस्था अशी आहे की वर्तमानपत्रांना मुळात सरकारी जाहिराती सुद्धा मिळतात त्या फारशा मिळत नाहीत . स्थानिक राजकीय लोकांचा आधार घेत अनेक वर्तमानपत्रे वाटचाल करण्याचा प्रयत्न करत आहेत पण एकंदरच या सगळ्या गोष्टीला यश येईल असे वाटत नाही . माझा अंदाज चुकला नाही तर भविष्यात महाराष्ट्रामध्ये फक्त पाच ते दहा वर्तमानपत्रे टिकलेली असतील आणि उरलेली हळूहळू गायब होत जातील.


अग्रलेख गायब होणे ही केवळ याची सुरुवात आहे . एका अर्थाने विद्वान गायब होण्याचे किंवा करण्याचे ते प्रावधान आहे . जेव्हा धर्म हीच आयडियालॉजी बनते आणि पॉलिटिकल विचारसरणी बनते तेव्हा विद्वत्तेची गरज संपुष्टात आणणे हा तिचा मुख्य अजेंडा असतो . विद्वत्ता धर्मापुढे अनेक विवेकी प्रश्न उपस्थित करते आणि असे प्रश्न धर्माला नको असतात . अनेकदा अग्रलेखांच्या मध्ये सर्वात मोठी जी ताकद असायची ती या विवेकाची असायची . अग्रलेख नाहीसा होणे याचा अर्थ विवेक नाहीसा होणे असा सुद्धा होऊ शकतो .


मुळात लोकांना विवेकाची गरज भासत आहे का हा सर्वात मोठा आजच्या काळातला प्रश्न आहे . मोक्ष हा विवेकाशिवाय शक्य नाही पण धर्म फक्त विवेकाशिवायच शक्य आहे विवेक असेल तरच तुम्हाला स्वातंत्र्याची किंमत कळते विवेक नसेल तर गुलामीसुद्धा गोड वाटायला लागते . ज्ञानतंत्रांच्या साह्याने मोक्ष मिळवता येतो पण हा मोक्ष मिळवण्यासाठी दोन गोष्टी अतिशय मूलभूतपणे लागतात पहिली गोष्ट स्वातंत्र्य आणि दुसरी गोष्ट विवेक या दोन गोष्टी नसतील तर मोक्ष मिळणे किंवा मोक्षाची साधना करणे अवघड होऊन बसते .


केवळ भाव व्यवस्थेच्या जीवावर राज्य चालवता येईल असा एक फार मोठा गैरसमज अलीकडे काही लोकांचा झालेला आहे इस्लाम हा फक्त मशिदीच्या भूगोलापुरताच भावविवश असतो कुराणापुरताच भावविवश असतो परंतु जेव्हा इतर लोकांशी डील करण्याचा प्रश्न येतो तेव्हा तो भयंकर रॅशनल आणि प्रॅक्टिकल असतो. हिंदुत्ववादी लोकांच्या हे लक्षात येत नाही आणि त्यामुळेच त्यांच्यासारखे भाव विवश होवून आपण सुद्धा इस्लामला हरवू असा जर काही भ्रम असेल तर प्रथम इस्लाम काय आहे ते समजून घेणे आवश्यक आहे . इस्लामशी नको तिथे स्पर्धा करणे तेही इस्लाम काय आहे ते समजून न घेता हा मूर्खपणा आहे .


त्यामुळेच भारतातले प्राचीन ऋषी फक्त धर्म म्हणत नव्हते ते कायमच धर्म आणि मोक्ष यांची सांगड घालायला बघत होते . हिंदुत्ववादी ही सांगड घालत असताना फक्त धर्मवादी होत चाललेत मोक्षवादी होणे त्यांनी जवळजवळ बंद केलेले त्यामुळेच अत्यंत रानटी पणाला उत्तेजन देणे सुद्धा सुरू झालेले आहे एक गोष्ट लक्षात ठेवा हे रानटीपण एक ना एक दिवस तुमच्या घरात उगवल्याशिवाय राहणार नाही तुमच्याच माजघरात शिरल्याशिवाय राहणार नाही जनावर फक्त जनावर असते आणि ते कोण माणूस आहे ते कधीच बघत नाही तेव्हा जनावराला पाळायला निघालाय खरा पण जनावर कधीही उलटू शकते एवढे लक्षात ठेवा . विवेक बुद्धीला सोडचिट्टी देणे हे काही तुमचे आजचे उद्योग नाहीत. यादव राजाने ते केलेच होते नंतर अनेक हिंदू राजांनी ते केले परिणाम इतकाच झाला की तुम्ही गुलाम झाला तुम्ही एका नवीन आक्रमकासाठी जागा तयार करत आहात फक्त हा नवीन आक्रमक जाल युगातला असेल एवढेच लक्षात ठेवा आणि नेहमीप्रमाणे सगळं गेल्यावर आपल्यामुळे झाले हे तुम्ही नाकारालच कारण जबाबदारी कसली घ्यायची नाही आणि फायदे मात्र सर्व हवेत अशी काहीतरी मानसिकता डेव्हलप झालेली आहे . सांड सोडणे सांड पाळणे हे कुठल्याही व्यवस्थेला अंतिमतः परवडत नसते परवडत नाही तेव्हा आत्ताच सावध व्हा . वर्तमानपत्रांना पुरेशा प्रमाणात सरकारी जाहिराती मिळतील याची काळजी घ्या विवेकाचा अंकुश आवश्यक आहे . आम्ही फक्त आमच्याच बाजूला तुमच्याच पक्षाच्या बाजूला असणाऱ्या लोकांना जाहिराती देऊ असा आग्रह धराल तर विवेक कुठे गेला ते कळणार नाही आणि इतिहास सांगतो की विवेक गेला की हमखास हत्ती चिखलात बुडतो .


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय