सावरकर ३ सावरकर , रचित आणि धर्म हाच आधार असणे श्रीधर तिळवे नाईक 


मागील लेखात आपण सत्तेचे प्रमाणीकरण या अंगाने काही मुद्दे घेतले आणि युरोप मधला पुरोगामी कालखंडामधला संपूर्ण सत्ता विचार हा कसा धार्मिक सत्ता विचार आहे ते पाहिले. पुरोगामी वादाला धर्मशास्त्र आणि धर्म टाळता आला नाही आणि तो प्रामुख्याने राज्य आणि सत्ता विचार यांच्या बाबतीत टाळता आला नाही ही गोष्ट अधोरेखित केली 


प्रत्यक्ष पुरोगामी कालखंडामध्ये ही गोष्ट पुरेशा प्रमाणात इतिहासकारांना लक्षात आली नाही पण आधुनिक काळामध्ये फ्रेडरिक नीत्शे नावाचा एक मोठा विचारवंत निर्माण झाला त्याने सर्व काही रचित असते त्यात इतिहास पण येतो असे प्रतिपादन करून आत्तापर्यंत चालत आलेले सर्व पुरोगामी सिद्धांत नाकारले. त्यांचा पाया उध्वस्त केला . ही उत्तराधुनिकतेची सुरुवात होती आणि आधुनिकतेचीही ! अस्तित्व स्वतःला हवे तसे स्वतःला रचत असते की काय असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला . सावरकरांच्या बाबतीत हा प्रश्न वारंवार निर्माण होतो कारण सावरकर यांचा जीवन प्रवासाने वैचारिक प्रवास पाहिला तर सावरकर स्वतःला वारंवार रचत असतात आणि वारंवार त्यांना स्वतःला हवे तसे रचत असतात असे लक्षात येते आपणाला त्यांच्या विचारातली चंचलता पाहिले की सहज लक्षात येते. याचे मूळ आपणाला शोधायला गेलो तर ते ब्राह्मण धर्मामध्ये सापडते. ब्राह्मण धर्मामध्ये एक प्रकारचा सोयीस्कर वाद आणि संधी साधू वाद सुरुवातीपासूनच आहे जे लोक स्वतःचा धर्म फेकून देतात स्वतःचा मुख्य देव इंद्रदेव फेकून देतात ते काय पद्धतीने धर्मात ठाम आणि मजबूत असणार आहेत ? त्यांच्यासाठी धर्म ही फक्त सत्ता प्राप्त करण्यासाठी रचलेली सत्ता प्रणाली असते आणि ही मूलभूत गोष्ट लक्षात न आल्याने ब्राह्मण जेव्हा वैष्णव धर्म ताब्यात घेतात जेव्हा शैव धर्म ताब्यात घेतात जेव्हा नंतर हिंदू धर्म ताब्यात घेतात तेव्हा ते काय करतात हे अनेकदा लक्षात येत नाही वास्तविक ते फक्त स्वतःचे रचित जे त्यांना सोयीचे असते निर्माण करत असतात त्यांचे अनेक वर्जन निर्माण करत असतात आणि त्याच्या तालावर इतरांनी निर्माण केलेले धर्म स्वतःच्या ताब्यात घेत असतात . त्यांना नाचवत असतात . पुराण ही अशी रचिते आहेत जी ब्राह्मणांनी केवळ वैष्णव आणि शैव धर्म ताब्यात घेण्यासाठी निर्माण केलेली आहेत हेच अनेकांच्या लक्षात येत नाही आणि अवस्था अशी आहे की आज सुद्धा सामान्य जनता या पुराणांच्या पौराणिक धर्माच्या प्रभावाखाली आहे . सतत त्यांच्या विषयी बोलून बोलून त्यांच्या विषयी प्रचार करून हा प्रौराणिक धर्म सर्वसामान्य जनतेच्या बोडक्यावर लादण्यात ब्राह्मण धर्म ब्राह्मण वर्ग यशस्वी झालेला आहे. साहजिकच हा जो स्वतःच स्वतःला रचण्याचा ब्राह्मणांचा इतिहास आहे तो सावरकरांच्या मध्ये सुद्धा उपस्थित आहे . 


हे सर्व पूर्वी व्यवस्थित चालले होते पण प्रश्न तेव्हा निर्माण झाला जेव्हा ब्राह्मणांची सर्व सत्ता ब्रिटिश लोकांनी धुळीला मिळवली . १८३० ते १८७० पर्यंत ब्रिटिश लोक ब्राह्मणांना उभे सुद्धा करायला तयार नव्हते पण नंतर जेव्हा वैश्यल मर्कंटाइल इंग्रजांची सत्ता जाऊन क्षत्रिय इंग्रजांची राणी सत्ता आली तेव्हा त्या सत्तेला मात्र ती सत्ता चालवण्यासाठी देशीय कारकूनांची गरज निर्माण झाली आणि ही गरज फक्त ब्राह्मणच पुरी करू शकतात हे लक्षात आल्याने या क्षत्रिय इंग्रज सत्तेने ब्राह्मणांना कवटाळायला सुरुवात केली . ही इंग्रजांची क्षत्रिय मानसिकता आर्थिक शोषण करायला तयार होती परंतु त्याचबरोबर तिला आपली साम्राज्य सत्ता ही कायमस्वरूपी प्रस्थापित करायची होती आणि ही शक्यता १८५७ नंतर जेव्हा निर्माण झाली तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की आपण हवे तसे इथले क्षत्रिय नाचवू शकतो आणि खरोखरच त्यांनी भारतातल्या त्या काळातल्या क्षत्रियांना आपल्या मर्जीप्रमाणे डान्स करायला लावला . 


म्हणजे एकीकडे प्रशासकीय कामे करण्यासाठी ब्राह्मण हवेत आणि भारतातले क्षत्रिय आणि त्यांच्याकडे चाकरी करणारे सैनिक सांभाळण्यासाठी राजपदे असलेले क्षत्रिय हवेत . म्हणजेच भारताच्या 1000 वर्षाच्या इतिहासामध्ये जी ब्राह्मण क्षत्रिय युती अस्तित्वात होती तीच पुन्हा एकदा इंग्रजांनी भारतामध्ये आधुनिक रूपात निर्माण केली त्यातूनच इंग्रजांची मर्जी सांभाळण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि हे प्रयत्न ब्राह्मण आणि क्षत्रिय दोघेही करत होते . म्हणजेच या काळामध्ये आपणाला इंग्रज आणि क्षत्रिय असे दोघेही राज्य करत होते असे दिसते पण मुख्य सत्ता इंग्रजांची होती यातूनच पुढे मग सावरकर यांनी संस्थानिकांना चीतावणी देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. हे क्षत्रिय लोक काहीतरी करतील अशी त्यांची भ्रामक समजूत होती जी प्रत्यक्षामध्ये कधीही फळली नाही. लोकमान्य टिळक असो किंवा सावरकर असो या दोघांना जो क्षत्रियांच्या विषयी राग आहे तो राग त्या काळातील क्षत्रियांच्या इन ऍक्टिव्ह असलेल्या आणि कर्तव्य पार न पडणाऱ्या वंशज्यांच्या बद्दलचा राग आहे . आता ही जी गोची आहे ती स्वतः ब्राह्मणांनीच निर्माण केलेली आहे कारण त्यांनीच लढण्याची जबाबदारी क्षत्रिय यांच्यावर टाकली होती. आता क्षत्रिय इंग्रजांच्या विरोधात लढण्या ऐवजी इंग्रजांच्या साम्राज्याची पाठ राखण करत होते त्याला कोण जबाबदार होते ? मुळात मुस्लिमांनीच मांडलिक बनवणे आणि आपल्यासाठी राबवणे ही सवय इथल्या अनेक क्षत्रियांना लावलेली होती इंग्रजांनी फक्त त्याचे सातत्य टिकवले . स्वतःच्या जनतेविरोधात असणारे असे हे लोक होते जे परकीयांना मालक मानत होते आधी मुस्लिम मग ख्रिश्चन युरोपियन ! 


काँग्रेस स्थापन करण्याचा जो प्रयत्न झाला तो प्रयत्न एका युरोपियन माणसानेच केला होता कारण त्याला भारतीय जनतेचा आवाज ऐकण्याची एक सोय निर्माण करायची होती आणि काँग्रेस ही अशी सोय आहे सोय होऊ शकते असे त्याला वाटत होते .


सावरकरांची जडणघडण ही या पार्श्वभूमीवर झालेली आहे . या काळामध्ये दोन प्रकारचे ब्राह्मण होते पहिले ब्राह्मण जे पुन्हा एकदा पेशवाई आणायचे आणण्याचे स्वप्न पाहत होते तर दुसरे ब्राह्मण हे ब्रिटिशांचे राज्य आपल्या मुठीत कसे राहील आणि आपण त्यांच्या मर्जी मध्ये कसे राहू या दिशेने प्रयत्न करत होते . सावरकरांचा प्रवास हा पहिल्या प्रकारच्या ब्राह्मणांच्या मधून सुरू झाला आणि त्याला कारण लोकमान्य टिळक होते टिळक हे त्यांचे गुरु होते आणि त्यांना आता किमान होमरूल स्वराज्य तरी मिळावे असे वाटायला लागले होते . मात्र सावरकर आणखी एक पाऊल पुढे गेले त्यांना फक्त स्वराज्य नको होते तर स्वातंत्र्यच हवे होते आणि यासाठी त्यांची प्रेरणा गॅरीबालडी होता आपण असे काही करू शकू असे त्यांना वाटत होते याचे कारण उघड होते इंग्रजांची लोकसंख्या ही खूपच कमी होते आणि एवढ्या अल्पसंख्याक असलेल्या इंग्रजांना जर का भारतीय लोक एकत्र आले तर सहजरीत्या उखाडू शकतात याची गणिते त्यांना पटलेली होती . या सगळ्यांमध्ये ते एक गोष्ट विसरले ती म्हणजे जाती व्यवस्था वर्ण व्यवस्था ! खुद्द पेशवाईनेच हळूहळू ओबीसी वर्गाला लढण्याच्या पेशापासून दूर काढायला सुरुवात केली होती आणि अस्पृश्यांना तर आपल्या सैन्यांमध्ये शिवाजी महाराजांनी जे स्थान दिले होते ते स्थान त्यांची संख्या कमी करत त्यांना सैन्यांच्या व्याप्तीत अल्पसंख्य करून टाकले होते यातूनच अनेक पूर्वाश्रमीचे महार आणि मांग हे सैनिक म्हणून बेकार सैनिक झाले जे पुढे इंग्रजांना जाऊन मिळाले . पेशव्यांचे या मागचे जे गृहीतक होते ते चुकीचे होते त्यांना असं वाटत होते की हे लोक गावातली कामे करत राहतील पण प्रत्यक्षात ज्या लढाऊ जमाती असतात त्या गप्प बसत नाहीत पूर्वाश्रमीचे महार मांग यांच्या बाबतीत हेच झालेले आहे ते गप्प बसले नाहीत त्यांनी आपली जागा इंग्रजांच्याकडे निर्माण केली. त्यामुळे सावरकरांना सैनिक कुठून मिळणार ? जे क्षत्रिय होते किंवा संस्थानिक होते ते तर इंग्रजांची मांडलीकी किंवा चाकरी करत होते त्यांच्या तालावर नाचत होते . त्यामुळे वर्ण व्यवस्थेची पाचरच अशी होती की फक्त ब्राह्मण लोकांच्यातूनच सावरकरांना आवश्यक असलेले सैनिक मिळण्याची शक्यता होती आणि या काळातले ब्राह्मण फार काही स्वातंत्र्यवादी नव्हते थोडक्यात काळ अनुकूल नव्हता तो पुढे काही प्रमाणात अनुकूल झाला तो सुभाष चंद्र बोस यांना ! त्यामुळे सावरकरांचे सशस्त्र क्रांतीचे स्वप्न फसणे अटळ होते आश्चर्याची गोष्ट ही होती की यामागे वर्णव्यवस्था आहे ही गोष्टच सावरकरांच्या लक्षात आली नाही . याचा परिणाम व्हायचा तो झाला आणि ते पकडले गेले आणि शेवटी अंदमानमध्ये गेले . साधारण 1930 च्या आसपास त्यांच्या लक्षात आले की आपणाला सैनिकांची कमतरता भासते आहे आणि म्हणूनच मग त्यांनी सैन्यामध्ये भरती व्हा असे फर्मान काढले आणि त्यांच्या या फर्मानांमुळे अनेक ब्राह्मण लोक सैन्यामध्ये भरती झालेले दिसतात. भविष्यात आपणाला सैनिकीकरण आवश्यक आहे हे कळलेले सावरकर हे कदाचित पहिले द्रष्टे होते . मुस्लिमांशी लढताना किंवा चायनाशी लढताना आपणाला सैनिकच लागतील हे त्यांना फार आधी कळले होते आणि यासाठी त्यांना तुम्हाला एक सॅल्यूट द्यावाच लागतो .


सावरकरांना जे कळाले नाही ते गांधींना कळाले आणि साहजिकच गांधींच्या हे लक्षात आले की आपला समाज सशस्त्र क्रांतीच्या मूडमध्ये नाही त्याच्यासाठी आपण नि:शस्त्र लढा उभा केला पाहिजे साहजिकच गांधी यशस्वी झाले . गांधींची ही थोरवी सावरकरांनी कधीही मान्य केली नाही एका अर्थाने ते गांधींच्या बाबतीत आंधळे होते अधुदृष्टीचे होते .


नंतर काळ बदलला आणि फक्त सावरकरांनीच नाही तर गांधींनी सुद्धा सैन्यात ब्रिटिशांच्या वतीने भरती व्हा असे सांगितले याचे कारण त्यांनाही आता कल्पना येऊन चुकली होती की स्वातंत्र्यानंतर आपणाला आपली मिलिटरी लागणार . त्यामुळेच नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या कामाला गांधीजींचा आतून पाठिंबा आहे अशी अफवा पसरली आणि तिचा बोस यांना फायदाच झाला .


या सगळ्या घटना क्रमात वर्ण आणि जाती व्यवस्थेचा विचार करावा लागणे अटळ होते आणि हा विचार करताना सावरकरांनी एक अत्यंत विचित्र गोष्ट केली त्यांनी वर्ण व्यवस्थेला पाठिंबा दिला आणि जातीव्यवस्थेला मात्र मोडीत काढले पाहिजे असे म्हणायला सुरुवात केली . आता आपण याच्या खोलात गेलो तर स्पष्ट दिसते की वर्णव्यवस्थेला पाठिंबा का तर ही वर्णव्यवस्था ब्राह्मण धर्माने निर्माण केली होती म्हणजे ब्राह्मण धर्माने निर्माण केलेली वर्णव्यवस्था हवी परंतु वैष्णव धर्माने निर्माण केलेली जाती व्यवस्था ही फक्त ब्राह्मणांनी निर्माण केलेली नसून ती ब्राह्मण आणि क्षत्रिय अशा दोन्ही वर्णांनी निर्माण केलेली व्यवस्था असल्याने ती मात्र मोडीत काढली पाहिजे असे हे गृहीतक आहे . आज सुद्धा क्षत्रियांच्या मधली जाती व्यवस्था ही ब्राह्मणांच्या पेक्षा अधिक कट्टर आहे कारण क्षत्रियांचा जातीव्यवस्था निर्माण करण्यामध्ये आणि बळकट करण्यामध्ये सर्वाधिक वाटा आहे . त्यामुळेच क्षत्रिय आणि ओबीसी यांच्यातली जातिव्यवस्था काही केल्या नष्ट होत नाहीये त्या उलट ब्राह्मण आणि वैश्य या दोन वर्णांच्या मध्ये मात्र आता हळूहळू जातिव्यवस्था नष्ट होताना दिसते आहे ब्राह्मण वर्णांमध्ये तर ती जवळजवळ ८० टक्के नष्ट झालेली आहे. अर्थातच याला जबाबदार टिळक आहेत कारण प्रथम हे प्रमेय टिळकांनी मांडले आणि ब्राह्मणांना ब्राह्मणांच्या मधली जाती व्यवस्था नष्ट करण्याचे आवाहन केले आणि ते फळलेले दिसते मी नेहमीच हे प्रमेय मांडलेले आहे की ओबीसी बीसी आदिवासी लोकांच्या मध्ये ज्या जाती आहेत त्या सर्वप्रथम नष्ट झाल्या पाहिजेत . त्याशिवाय ऐक्य शक्य नाही. ब्राह्मणांनी या संदर्भात जेवढे काम केले तेवढे काम सुद्धा करायचे नाही आणि उठसूठ ब्राह्मणांना शिव्या घालायच्या हे बरोबर नाही त्यांनी स्वतः मधल्या जाती कशा नष्ट केल्या हे पाहण्याजोगे आहे जाती भले कशाही निर्माण झालेल्या असो परंतु आता त्या शाबूत आहेत त्यामध्ये सगळ्यांचाच वाटा आहे . सावरकर यांनी जातिव्यवस्थेबाबत ती नष्ट झाली पाहिजे असे ठाम विधान केलेले दिसते मग त्यांना वर्णव्यवस्था का शाबूत ठेवावीशी वाटते? ते याबाबतीत कळत नकळत तत्कालीन जनुक शास्त्राच्या चुकीच्या संकल्पनांच्या प्रेमात पडलेले दिसतात. उदाहरणार्थ ब्राह्मण या वर्णांमध्येच काहीतरी जेनेटिकली ज्ञानवर्धक आहे अशी त्यांची समजूत होती. प्रत्यक्षामध्ये याला कसलाही आधार नाही . ते एका अर्थाने अत्यंत प्राथमिक अवस्थेत असलेल्या जनुक शास्त्रात फसले असे म्हणता येते. आत्ता जर का सावरकर जिवंत असते तर त्यांनी वर्ण जाती व्यवस्था आणि जे काही त्यामुळे आले आहे ते सर्व काही नष्ट केले पाहिजे अशी भूमिका घेतली असती याबद्दल माझ्या मनात शंका नाही . 


अलीकडे काही सावरकरवादी लोकांनी त्यांचा विचार अधिकच विकृत केला म्हणजे या लोकांनी अलीकडे असे प्रतिपादन करायला सुरुवात केली आहे की जातीव्यवस्था ब्रिटिशांनी निर्माण केली प्रत्यक्षामध्ये ती व्यवस्था भारतामध्ये इसवी सन 1000 पासूनच मजबूत व्हायला मजबूत करायला वैष्णव धर्माने आणि हिंदू धर्माने सुरुवात केली होती. याबाबतीत जो इतिहासाचा विपर्यास केला जातोय तो बरा नव्हे ब्राह्मणांना एक गिल्ट आहे पण तो गिल्ट त्यांच्यात राहायलाच पाहिजे अन्यथा ही व्यवस्था नष्ट करायला ते धडपडणार नाहीत . एखाद्या गोष्टीचा फायदा तुम्हाला मिळाला तो हवा आणि आता त्याचे सगळे तोटे स्पष्ट झाल्यानंतर त्याची जबाबदारी मात्र घ्यायला नको हे चालणार नाही ब्राह्मणांना वर्ण जाती व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी घ्यावी लागेल त्यांनी घेतलीच पाहिजे. हे ब्रिटिशांना ब्लेम करण्याचे धंदे बंद करावेत हे उत्तम! सावरकरांनी ही जबाबदारी कधीच झटकली नाही त्यांनी वर्णव्यवस्थेची पूर्ण जबाबदारी घेतलेली दिसते मात्र जाती व्यवस्था मात्र फक्त ब्राह्मणांनी निर्माण केलेली नाही याची त्यांना कल्पना होती पण त्यामध्ये जो अंशिक सहभाग होता तो त्यांना मान्य होता आणि म्हणूनच ते जातीव्यवस्था काही करून नष्ट केली पाहिजे अशा मताला पोहोचले होते. 


या वर्ण जाती व्यवस्थेचा विचार करणाऱ्या प्रत्येकालाच एका गोष्टीचा मग विचार करावा लागतो तो म्हणजे एवढा चिरफाळ्या झालेला समाज एकत्र कसा बांधायचा ? याचे पुरोगामी उत्तर आयडिओलॉजी होते . म्हणजे आंबेडकरवाद किंवा मार्क्सवाद किंवा लोकशाही समाजवाद या विचार प्रणाली संपूर्ण राष्ट्र उभे करू शकतात असा पुरोगामी लोकांचा विश्वास होता आणि म्हणूनच ते विचार प्रणालीच्या साह्याने राष्ट्र उभा करू इच्छित होते प्रत्यक्षामध्ये त्यांना किती पाठिंबा होता तर स्पष्ट सांगायचे तर पाठिंबा नव्हता काँग्रेसला सुद्धा जो पाठिंबा होता तो विचार प्रणालीमुळे नाही तर गांधी यांच्या नेतृत्वामुळे होता आणि गांधी धार्मिक होते हिंदूवादी होते . अधिक स्पष्ट सांगायचे तर राजा राम मोहन राय यांचा ब्राह्मणी हिंदूवाद रानडे गोखले यांचा ब्राह्मणी वैष्णव हिंदूवाद स्वामी विवेकानंद यांचा क्षात्र वेदांत केंद्री हिंदूवाद यांच्यानंतरचा चौथा टप्पा नव वैष्णव हिंदूवाद हा गांधींनी गाठला होता सादर केला होता आणि लोकांना या टप्प्याच्या आधारे जोडलेले होते. म्हणजेच नववैष्णव हिंदू धर्म हाच काँग्रेसचा सुद्धा आधार होता आयडियालॉजी नाही.( त्यातूनच मग महाराष्ट्रामध्ये वारकरी चळवळीचे सातत्याने समर्थन करण्यात आले तिला प्रमोट करण्यात आले ) हा नव वैष्णव हिंदू धर्म सेक्युलर वाद मानत होता आणि म्हणूनच नेहरू यांच्यासारखे डावे लोक गांधींच्या कडे ओढले गेले . आपल्या अमूर्त अशा लोकायतवादी विचाराकडे लोक खेचले जात नाहीत याची पुरेपूर कल्पना पंडित जवाहरलाल नेहरू यांना होती . किंबहुना जसा जसा गांधीवाद काँग्रेस मधून बाजूला काढला गेला तसा तसा काँग्रेसचा पराभव अधिकाधिक अधोरेखित होत गेला . कारण या नववैष्णव हिंदूवादी सेक्युलरवादाचे फटके फक्त हिंदू समाजालाच पडले होते आणि मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकांचा एकतर्फी फायदा होत गेला . हा तोटा सहन करण्याच्या मनस्थितीमध्ये 1990 नंतरचा हिंदू राहिला नाही आणि भारतातले राजकारण हिंदू वादाकडून हिंदुत्ववादाकडे सरकले . एका अर्थाने सावरकरांचा पुन्हा जन्म झाला .


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय