न्यू कॉलेजमधली वडील गिरी गेली श्रीधर तिळवे नाईक 

यादव सर गेले ते लोकांच्यासाठी न्यू कॉलेजचे प्राचार्य होते पण आम्हा विद्यार्थ्यांच्यासाठी विद्यार्थ्यांच्या मागे ठाम उभे राहणारे यादव सर होते .

त्यांच्या प्रथम भेटीतच माझ्यावर ठसला होता तो त्यांचा ठळकपणा आणि ठसठशीत पणा ! एखादा मलखांब जर बुद्धिमत्ता घेऊन जन्माला आला तर तो कसा दिसेल तसे ते दिसत . काळा सावळा वर्ण आणि धिप्पाड मूर्ती ठसठशीत नाक नजर एकदम भेदक उंचीही चांगलीच त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दिसता क्षणीच जड वजनी वजन दार इम्प्रेशन पडायचे आणि मग तो त्यांचा येणारा अत्यंत भारदस्त आवाज! तो कानावर पडला की हा माणूस प्राचार्य या पोस्ट शिवाय दुसरा काही या कॉलेजमध्ये असूच शकत नाही असे वाटायचे .

ते केमिस्ट्री चे प्राध्यापक होते त्यामुळे साहजिकच अकरावी बारावीला क्लासमध्ये कधीकधी ते आम्हाला रसायनशास्त्र शिकवायला यायचे . एक प्रकारे घाबरवणारे त्यांचे व्यक्तिमत्व होते पण तरीही मला गोष्ट कळली नाही तर मी त्यांना सरळ उभा राहून दोनदा आयुष्यात मला तुम्ही शिकवता ते कळले नाही असे सांगितले होते . आणि त्यांनीही न कंटाळता पुन्हा एकदा सर्व काही समजावून सांगितले होते . हा माणूस वरून कडक असला तरी प्रत्यक्षात आतून त्याला प्रचंड जिव्हाळा आहे याची खात्री त्यावरून पटली होती . सुरुवातीच्या काळात ते आमचे प्राचार्य नव्हते आमचे प्राचार्य होते कणबरकर सर ! ते एकदम ब्रिटिश काळातून आल्यासारखे दिसत यादव म्हणजे अस्सल देशी व्यक्तिमत्व ! रांगडेपणा संपूर्ण चेहऱ्यावर फाकलेला त्याचबरोबर बुद्धिमत्तेची झळाळी पण दिसायची . हळूहळू लक्षात आले की ते शिस्तीचे भोक्ते आहेत . त्यामुळे ते जेव्हा व्हरांड्यात हिंडत असंत तेव्हा आपोआपच वरांडा रिकामा होत जाई. त्यांच्यापुढे उभे राहण्याची कोणाची टापच नव्हती आमचे न्यू कॉलेज हे शिवाजी पेठे सारख्या मारामारीसाठी प्रचंड प्रसिद्ध असलेल्या एरियामध्ये सभ्यतेचा नमुना म्हणून उभे होते . बाहेरच्या मारामाऱ्या आमच्या कॉलेजमध्ये सहसा शिरत नसत . शिवाजी पेठेतली अनेक वावदुक पोरे न्यू कॉलेजमध्ये मात्र सरळ शिस्तीत राहात आणि त्याला कारण यादव सरांचा दरारा होता .

त्यांचा माझा संघर्ष तेव्हा उभा राहिला जेव्हा माझी तक्रार घेऊन दोन प्राध्यापक त्यांच्याकडे गेले मी मुळात त्यांना सायन्स साईडला गेलो हेच माहीत नव्हते साहजिकच मला बोलावणे आले आणि पहिले बोलणे सायन्स साईड का बदललीस यावरूनच होते. आपली बिन पाण्याने होणार हे मी गृहीतच धरलेले होते त्यामुळे शांतपणे ऐकत उभा राहिलो . पुढे मग त्यांनी विचारले की काय करणार तेव्हा मी सांगितले की मी सिविल सर्विस एगझाम देणार आहे . मग त्यांनी मला काय काय हवे ते विचारले आणि संपूर्ण न्यू कॉलेजची लायब्ररी माझ्यासाठी खुली करून टाकली. नंतर मी जेव्हा वक्तृत्व स्पर्धांच्या मध्ये यशस्वी व्हायला लागलो आणि कॉलेजच्या बोर्डवर कधीकधी नाव चमकायला लागले तेव्हा त्यांना थोडे समाधान वाटले अन्यथा कला शाखेत जाऊन स्वतःला वाया घालवले अशीच त्यांची माझ्या बद्दलची समजूत होती . पुढेही जेव्हा न्यू कॉलेजचा शिवाजी युनिव्हर्सिटी युथ फेस्टिवल साठी कॅप्टन निवडण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी मला कॅप्टनशिप दिली आणि तसे नंतर सर्टिफिकेट ही दिले जे मी आजही केवळ सरांची आठवण म्हणून जपून ठेवलेले आहे. 

मुळात मी कला शाखेला आलो तरी माझा सगळा कॉलेजमधला गोतावळा हा बीएससीला जोडला गेला होता त्यामुळे मी वर्गात फार बसत नसे. केवळ बसा असे कुठल्या प्राध्यापकाने (नलवडे सर हे आमच्या तिळवे भांडारचे मुख्य गिर्‍हाईक आणि माझ्या वडिलांचे मित्र असल्यामुळे त्यांची आज्ञा मला पाळावीच लागे तर शेलार सर हे डिबेटिंग डिपार्टमेंटसुद्धा चालवत असल्यामुळे त्यांचेही ऐकावे लागे) त्यामुळे यांच्यापैकी आणि यादव सरांनी सांगितले की मी आत अन्यथा मी कुठेतरी बाहेर ! या कला शाखेला माझे मित्र सुद्धा फारसे नव्हते. अनेकांची तर मला नावे माहिती नव्हती अलीकडे माझ्या वर्गाचा व्हाट्सअप ग्रुप जेव्हा मी जॉईन केला तेव्हा मला अनेकांची नावे कळाली. अपवाद कदाचित सरगरच असेल आणि एक वर्षा संघवी नावाची मुलगी ( ती तिच्या बॉबकट मुळे लक्षात राहिली) जयवंत पाटीलशी असलेली मैत्री ही त्याच्या शाहूपुरीतल्या दुकान गाळ्यात माझ्या फेऱ्या होत असल्यामुळे होती. या काळात एकाच वेळेला दुकान आणि शिक्षण असे माझे काम चाललेले होते. दुकानाचे काम आले की मी सरळ कॉलेजला दांडी मारत होतो कारण धंदा महत्त्वाचा होता त्याच्यावर पोट अवलंबून होते 

माझे मोक्षाच्या अंगाने जे काही चालले होते ते मात्र मी न्यू कॉलेजमधल्या कोणाशीही फारसे डिस्कस करत नव्हतो मुळात ते कोणी समजून घेऊ शकते असे मला वाटत नव्हते . आजही माझ्या वर्गात माझी प्रतिमा नेमकी काय आहे हे मला माहीत नाही. त्यामुळे या संपूर्ण घडामोडी मध्ये यादव सर हेच एक कॉलेजशी जोडणारे बलस्थान होते . मला एखादे पुस्तक हवे आहे आणि ते मला मिळाले नाही असे कधीही न्यू कॉलेजमध्ये झालेले नाही हे होण्यामध्ये न्यू कॉलेजच्या स्टाफ चा आणि यादव सरांचा प्रचंड मोठा वाटा होता. 

आमच्या बीएससीच्या गॅंगची सरांना कल्पना असल्याने सरांना जर का सांगितले की मी त्या झाडाखाली चाललेलो आहे किंवा झाडाकडे चाललेलो आहे तर सर फारसे ऑब्जेक्शन घेत नव्हते . या झाडाखाली कधी कधी चेस बोर्ड मांडला जात होता . त्या काळामध्ये अनेक कॉलेजेसना ग्राउंड असायचे तसे ते आमच्याही कॉलेजला होते . त्यामुळे खेळणे वगैरे चालत असायचे . सर दिसायला कितीही कडक शिस्तीचे असले तरी प्रत्यक्षात मात्र त्यांचे आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्यावर प्रचंड प्रेम होते एखादा हुशार विद्यार्थी दिसला तर ते त्याच्या मागे ठामपणे उभे राहत. त्यांच्या शिस्तीत बसेल अशी आणि त्यांच्या पद्धतीने जी जी मदत शक्य आहे ती ती मदत ते करत .

अर्थातच आमच्या संबंधांचा शेवट माझ्या अपयशापाशी झाला कारण मी कॉम्पिटिटिव्ह एगझाम मध्ये यशस्वी झालो नाही एका अर्थाने मी सरांचा अयशस्वी विद्यार्थी होतो आणि आहे . मुळातच मोक्षाची इतकी प्रबळ ओढ होती की सर्वच गोष्टी सामान्य होत गेल्या आणि त्याविषयी सरांशी बोलण्याची काही सोय नव्हती कारण त्यांच्या दृष्टीने या सर्व मोक्षीक गोष्टी फिजुल होत्या. वाया गेलेली असाधारण बुद्धी हे त्यांचे माझे असलेले मूल्यमापन ! माझ्या साहित्य क्षेत्रातल्या कामगिरी बद्दल त्यांनी कायमच मौन पाळले माझ्या कॉलेजमध्ये माझा साहित्याच्या संदर्भातला एकही कार्यक्रम कधीही झाला नाही . आणि मीही कधी सरांच्याकडे याबाबत तक्रार केली नाही. ऑफिसर व्हायचे सोडून कवी होणाऱ्या माणसाला कोण विचारतो ? शिवाय समोर विश्वास पाटील सारखे उदाहरण होते जो एकाच वेळेला लेखक आणि ऑफिसर होता. मी सुद्धा असेच काही करेन असे त्यांना वाटले होते पण त्यांच्या अपेक्षेला मी उतरलो नाही.वाया गेलेली असाधारण बुद्धी या त्यांनी केलेल्या माझ्या मूल्यमापनाचा मी नेहमीच आदर केला .

त्यांच्या कडक शिस्तीचा वचक कायमच ते समोर आले की असायचा . याबाबत आमचे वय वाढले तरी हा वचक कधी कमी झाला नाही . मात्र हा दरारा दादागिरीचा नव्हता तर वडील गिरीचा होता . आज अनेक विद्यार्थ्यांनी आपला दुसरा बाप गमावला असेल . कारण ते तसे होते. प्रेमळ शिस्त असलेले शिक्षणावर प्रेम असलेले आणि आतून जिव्हाळा असलेले. आज हे सर्व काही गेले .

माझी त्यांना नम्र आदरांजली ! 

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय