सावरकर , श्रद्धा, मोक्ष, धर्म, विज्ञान आणि राष्ट्र श्रीधर तिळवे नाईक 

मी एक गोष्ट सातत्याने मांडत आहे ती म्हणजे श्रद्धा वेगळी, मोक्ष वेगळा आणि धर्म वेगळा आणि महाश्रद्धा म्हणजेच रीलिजन मजहब वेगळा ! सावरकर यांच्या संदर्भात थोडीशी चर्चा झालीच होती आता नेमकी गोची काय होती आणि पुरोगामी नेमके कुठे थकले आणि चकले या अंगाने अधिक खोलात जाऊ .

सर्वसाधारणपणे पुरोगामी कालखंडामध्ये एक नवीन गोष्ट उदयाला आली ती म्हणजे विज्ञान ! किंबहुना विज्ञानानेच पुरोगामी वाद सुरू केला. पुरोगामी वादाने विज्ञाननिष्ठता जेव्हा स्वीकारली तेव्हा त्याच्या असे लक्षात आले की विज्ञानामुळे धर्म महाश्रद्धा रेलिजन मजहब नाहीसा होतो आणि मजहब नाहीसा झाला की मग जी त्यांच्या मुळे अस्तित्वात असलेली प्रस्थापित राज्यव्यवस्था होती तिला सुद्धा भोके पडायला लागतात. साहजिकच मग प्रश्न निर्माण होतो की धर्माशिवाय रिलिजन शिवाय राज्यबांधणीसाठी लोकांना एकत्र बांधायचे कसे ? धर्म ,महाश्रद्धा ही एक अशी राजकीय प्रणाली होती की जी लोकांना बांधून ठेवत होती आणि ती जर का आपण विज्ञाननिष्ठतेच्या आधारे नष्ट करणार असू तर तिला पर्याय काय असू शकतो ? आणि या विचारसरणीतूनच पुढे राज्य State ऐवजी "राष्ट्र" Nation ही संकल्पना उदयाला आली आणि त्या अंगाने मग राष्ट्र हाच धर्म किंवा राष्ट्र प्रथम यासारख्या घोषणा पुढे यायला लागल्या पण राज्य या संस्थेबाबतच एक मोठा घोळ असा आहे की या संस्थेचा आधार श्रद्धा होता आणि टोळी राज्य निर्माण होत होते त्याचे कारण त्या टोळी राज्याची स्वतःची म्हणून काही श्रद्धा असायची त्यातून निर्माण झालेल्या परंपरा असायच्या. पुढेही जेव्हा टोळी राज्यातून गणराज्यात प्रवेश झाला तेव्हा महाजन श्रद्धेच्या आधारे तर गणराज्य मोक्षाच्या आधारेच काम करत होते पुढे मग भारतात माणसाला मोक्ष आणि श्रद्धेतूनच धर्म नावाची एक राजकीय प्रणाली विकसित करता आली आणि त्या राजकीय प्रणालीने सर्वच राज्यांना स्वतःच्या अधिराज्याखाली आणायला सुरुवात केली . 

युरोपमध्ये या काळामध्ये रोमन कॅथोलिक धर्म अस्तित्वात यायला सुरुवात झाली आणि त्याची रचना ही च रोमन राज्यासारखीच होत गेली म्हणजे असे महाराजांचासुद्धा महाराजा कोण तर ईश्वर गॉड ! त्याचे किंगडम कुठले तर पर लोकात ! God's kingdom! त्याचा राजपुत्र कोण तर आमचा प्रेषित अशा प्रकारची मांडणी करणारे प्रमेय ज्युदाइक श्रुतीने विकसित केले आणि त्यातूनच महाश्रद्धा या राज्यांच्या आणि साम्राज्यांच्या केंद्रस्थानी आल्या. प्रश्न असा होता की नव्या युगात काय करायचे? कारण पुरोगामी युग हे मुळातच व्हॅटिकन सिटीला आव्हान देत चॅलेंज देतच अवतरत होते आणि स्वतःच्या राष्ट्राचा धर्म किंवा स्वतःच्या राष्ट्राची स्वतंत्र चर्च ही धर्म संस्था पुरोगामी वादाने सुरुवातीच्या काळात निर्माण केली उदाहरणार्थ इंग्लंडचे चर्च काही वेळा नवीन मजहब निर्माण करण्यात आला उदाहरणार्थ युरोपमध्ये निर्माण झालेला प्रोटेस्टंट किंवा महात्मा फुले यांनी निर्माण केलेला प्रोटेस्टंट शैव मजहब !

यातली गुंतागुंत अशी होती की सर्वसाधारणपणे धर्म महाश्रद्धा या राजकीय विचार प्रणालीचा नवीन राष्ट्रवादी राजकीय प्रणालीवर प्रचंड मोठा प्रभाव पडला आणि या नवीन राष्ट्रवादी राजकीय प्रणाली महाश्रद्धांच्या सारख्याच धर्मासारख्याच काम करायला लागल्या जे अगदीच अनपेक्षित होते वास्तविक यांनी आपला आधार विज्ञान ठेवायला हवा होता पण प्रत्यक्ष फंक्शनल स्वरूपात मात्र विज्ञान हा आधार ठेवता येणे अशक्य झाले हे असे का झाले याचे कारण सत्ता ही वैज्ञानिक आहे हे सिद्ध करणे फार अवघड आहे त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीच्या ठाई किंवा एखाद्या प्रतिनिधीच्या ठाई सगळे लोक मिळून आपल्या आतली सत्ता प्रतिष्ठित करतात आणि तो त्या लोकांच्या आतील सत्तेचा रिप्रेझेंटेटिव्ह बनतो ही गोष्ट गृहीतक म्हणून ठीक आहे परंतु तिचा वैज्ञानिक आधार काय ? म्हणजे एका अर्थाने हे असे होते की ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे आणि त्याच्यामध्ये ईश्वराची सत्ता अवतरलेली आहे मग प्रत्येक लोकसभेचा निवडून आलेला उमेदवार हा असा प्रेषित असतो काय की ज्याच्या मध्ये सर्व मतदारांची सत्ता अवतरलेली असते आणि ही सत्ता मतदानाच्या पेटीतून मतदानातून त्याच्यात गेलेली असते ? तर कळत नकळत प्रत्यक्ष व्यवहारामध्ये फंक्शन असेच झालेले दिसते आणि हे फंक्शन एका अर्थाने धार्मिक पद्धतीचे आहे वैज्ञानिक पद्धतीचे नाही आणि खरी गोची आज सुद्धा हीच आहे . धर्माच्या कचाट्यामधून आपणाला राजकीय विचार प्रणाली मुक्त करता आली नाही कारण राजकीय विचार प्रणालीचे नवताकेंद्री इन्स्टॉलेशन मांडताना आपण सत्ता या गोष्टीचा वैज्ञानिक आधार शोधला नाही प्रश्न असा आहे की असा आधार मुळात असतो काय किंवा नसतो की काय ? कोणत्या आधारे एखादा लोकप्रतिनिधी माझ्यासारख्या सामान्य मतदाराला आज्ञा देतो? त्याला ही ताकद दिली कोणी ? म्हणजेच माझ्या मतदानातून निर्माण झालेली ताकद नंतर मलाच गुलाम बनवायला बघते मग धार्मिक गुलामगिरी मध्ये आणि आत्ताच्या विचार प्रणालीच्या आधारे निर्माण झालेल्या गुलामगिरी मध्ये काही फरक असतो का ? असे तर नव्हते ना की सत्तेसाठी तिच्या प्रतिष्ठेसाठी तिला प्रमाण करण्यासाठी विज्ञाननिष्ठता पुरत नव्हती ? युरोपमधल्या अनेक राजे लोकांची आणि त्यांची चाकरी करणाऱ्या विचारवंतांची एक गोची होती ती म्हणजे स्वतःच्या ताब्यात असणारा जो भौगोलिक प्रदेश आहे त्याला आपण जर राष्ट्र म्हणणार असू तर त्याला वैज्ञानिक आधार कसा द्यायचा कारण वस्तुस्थिती अशी होती की ज्याप्रमाणे ईश्वर सर्वत्र होता तरीही धर्म या संज्ञेच्या नावाखाली काही का प्रमाणात एक संस्था निर्माण करत राज्याला ओळख देत होता आणि ही ओळख अनेकदा व्हॅटिकन सिटी देत होती तशी तशी व्हॅटिकन सिटी अस्तित्वात येणार कशी ? याला एक तोड म्हणून लोकसभा आणि राजधानी अस्तित्वात आली आणि आपल्याकडे लोकसभेचे दिल्लीचे महत्त्व वाढत गेले एका अर्थाने लोकसभा ही नवीन व्हॅटिकन सिटी झाली त्यातूनच राज्यांच्या राजधानीचे म्हणजे महाराष्ट्रात मुंबईचे महत्त्व वाढत गेले पण या सगळ्या प्रोसेसचे वैज्ञानिक अधिष्ठान कुठे आहे ? 

एकीकडे पुरोगामी वाद व्हॅटिकन सिटी ची मान्यता राष्ट्रासाठी आवश्यक नाही असे म्हणत होता आणि दुसरीकडे मात्र पूर्णपणे धर्माच्याच पद्धतीने आपली विचार प्रणाली फंक्शनल करत होता . आपण जर या काळातले रुसो वगैरेंचे राज्याविषयीचे सिद्धांतन बघितले तर तुम्हाला त्यामध्ये धार्मिक टच दिसेल इस्लामने करार ही संकल्पना जी आणली ती करार ही संकल्पना राज्याच्या संदर्भात या लोकांनी अतिशय मोठ्या प्रमाणात राबवली . लोकांच्यात आणि राज्यांमध्ये करार असतो पण हा करार कसा काय वैज्ञानिक असतो ?

म्हणजे धर्म ही राजकीय विचारप्रणाली म्हणून बिनकामाची गोष्ट झाली म्हणायचे पण प्रत्यक्षात राष्ट्राला आधार देताना सर्व प्रकारचे धर्मशास्त्रातले संकेत पाळायचे अशी ही गोची होती 

भारतामध्ये सुद्धा या प्रश्नाचा जितका खोलात जाऊन विचार करता यायला हवा होता तितका आपल्या भारतीय पुरोगामी लोकांनी केला का ? म्हणजे फुले यांचे विचार आपण जर का तपासले तर ते सरळ सरळ अमेरिकन आणि युरोपियन विचारवंतांची उसनवारी केल्यासारखे आहेत. त्यात ओरिजिनल किती आहे हा प्रश्न आता विचारायला पाहिजे . पण फुले यांचे श्रद्धास्थान तुम्ही केले म्हणजेच एका अर्थाने फुले धार्मिक झाले की मग तुम्ही प्रश्न विचारणार कसे ? कारण एखादी व्यक्ती जेव्हा श्रद्धास्थान होते तेव्हा तिचे अस्तित्व धार्मिक बनते आणि तिचे वैचारिक अस्तित्व धार्मिक बनले की मग तिला प्रश्न कसे काय विचारायचे ?

यात पुन्हा भारतामध्ये एक आणखी वेगळी गोची होती ती म्हणजे मुळातच या काळामध्ये राजे म्हणून ब्रिटिश लोक अस्तित्वात होते आणि ब्रिटीश लोकांचे साम्राज्य आणि त्यांनी या साम्राज्याचे केलेले तुकडे हा आपल्या राष्ट्रवादाचा भौगोलिक आधार होता समजा ब्रिटिश युरोपियन आले नसते तर मग आपल्याकडच्या राज्यांच्या मध्ये राष्ट्रवाद कसा विकसित झाला असता ? विज्ञान आले असते तर धर्म नाहीसा झाला असता का? की हिंदुत्ववाद जसा आपल्याला धर्माकडे खेचत चालला आहे तसाच त्या काळामध्ये तो आपणाला धर्माकडे खेचत नेला असता ? आजही जर आपण पाहिले तर शीख धर्माच्या आधारे स्वतंत्र राष्ट्र मागितले गेलेच आणि त्याआधी पाकिस्तान आणि बांगलादेश यांची निर्मिती शेवटी धर्माच्या आधारेच झाली मग काँग्रेस जेव्हा म्हणते की राष्ट्रवादाचा आधार धर्म असू शकत नाही तर प्रत्यक्षामध्ये तो विसाव्या शतकामध्ये फंक्शनल होता असे दिसते उलट राष्ट्रवादाचा काँग्रेसने प्रस्तुत केलेला सेक्युलरिझम हा जो आधार आहे तोच फंक्शनल झालेला दिसत नाही खुद्द संविधानामध्येच याबाबतीत गोंधळ झाला आतून प्रश्न निर्माण होतो की मग धर्म वगळला परंतु सगळा काँग्रेसचा राष्ट्राच्या आधाराचा जो विचार आहे तो कल्पना विलास होता काय ? आणि समजा सेक्युलर वगैरे काही अस्तित्वात होते तर ते कुठे अस्तित्वात होते इंग्लंडमध्ये अमेरिकेमध्ये? तिथे खरोखर ते सेक्युलर पद्धतीने होते की सर्व आधार मुळात ख्रिश्चन धर्माचा होता? काँग्रेस कधी या सगळ्यांमध्ये खरोखर खोलात उतरली का ? स्वातंत्र्यलढा लढवण्यासाठी तुम्हाला मुस्लिम लोक आवश्यक होते ही गोष्ट मी समजू शकतो त्यासाठी दिलेली हिंदी मुस्लिम भाई भाई ही घोषणा मी समजू शकतो परंतु तलवार इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी आवश्यक असते म्हणून तुम्ही जर म्हणाला की तुम्ही त्या तलवारीला गुलाब म्हणा तर कसे काय त्या तलवारीला गुलाब म्हणणार ? शेवटी ती तलवार गुलाब झालीच नाही तिने बरोबर देश कापला. आता त्याची जबाबदारी सुद्धा तुम्ही घेत नाही. तुम्ही आजही असे म्हणत नाही की आम्ही चुकलो. तुम्ही कधीही फाळणीसाठी माफी मागितली नाही . त्याचे खापर नेहरूंनी सतत हिंदुत्ववादी लोकांच्यावर आणि सावरकरांच्या वर फोडलेले दिसते . तुम्ही असे म्हणत नाही आहात की मुस्लिम धर्माबाबत आम्ही चुकलो मग तुम्हाला मते कशी मिळणार? कारण अजूनही तुमचा आग्रह चालूच आहे की तलवारीला गुलाब म्हणा तलवारीला गुलाब म्हणा. हिंदू म्हणजे जैन बौद्ध वैष्णव शैव जनतेला काय येडे समजला काय समजता काय ? तुमचा सेक्युलर कल्पनाविलास टिकला नाही आणि आता तुम्हाला तो पुन्हा परत आणायचा आहे पण तो आणताना तुम्ही प्रॅक्टिकल होणार आहात की नाही ? तुम्ही विज्ञान निष्ठता स्वीकारणार आहात की नाही? कारण सेक्युलर वाद विज्ञानवाद स्वीकारत नाही तो फक्त तशा गप्पा मारतो परंतु सर्व धर्मातल्या अंधश्रद्धा जश्याच्या तशा शाबूत ठेवतो समान नागरी कायदा तो होऊ देत नाही . आणखीन सातशे वर्षांनी इस्लाम सुधारेल म्हणून भाकड आश्वासन देतो आता ही भाकड गिरी हिंदू लोकांनी स्वीकारावी काय ? मी स्वतः या संदर्भात एक कसोटी सांगितली होती ती म्हणजे तुर्कस्तान कारण हा एक कमालीचा सुशिक्षित देश होता पण प्रत्यक्षात शिक्षणाने सुद्धा काही फरक पडला नाही आणि इस्लाम पुन्हा तिथे आला इस्लामिक राजवट पुन्हा तिथे आली याचा अर्थच असा आहे केवळ शिक्षणाने इस्लाम सुधारणार नाही . तेव्हा नेमका जगामध्ये काय बदल झाला आहे हे ओळखायला शिका . 

मुळातच पुरोगामी वाद कसा काय धर्माच्या राजकीय विचार प्रणालीच्या चौकटीत अडकत गेला त्याचे डि कन्स्ट्रक्शन करणे अत्यंत आवश्यक झालेले आहे. विज्ञानाच्या आधारे एकही राष्ट्र निर्माण झालेले नाही भारत म्हणजे बांगलादेश आणि पाकिस्तान मध्ये समाविष्ट न झालेला उर्वरित प्रदेश अशीच भौगोलिक स्थिती आहे आणि तिथे सुद्धा जेव्हा शिख धर्माचा प्रश्न आला तेव्हा स्वतंत्र शीख धर्माचे राष्ट्र असायला हवे असे वाटणारे लोक निर्माण झालेच. तुम्हाला असे वाटते की धर्म ही अंधश्रद्धा आहे आणि ती हळूहळू नष्ट होईल पण मी तुम्हाला सांगतो की मुळातच तुम्ही जी नवीन पुरोगामी राजकीय विचार प्रणाली विकसित केली तिला सगळा सोर्स पुरवठा हा धर्माने केलेला आहे म्हणजेच मागील दाराने एका अर्थाने सत्तेचा मेटा फिजिकल धर्मशास्त्रीय धंदाच थाटला गेला आणि म्हणूनच रशियामध्ये सुद्धा सर्व काही फाटत गेले . 

थोडक्यात काय ज्याला आपण आज पुरोगामी राजकीय विचार प्रणाली म्हणतो ती प्रत्यक्षात धर्माच्या धर्मशास्त्रीय गूढवादाच्या तावडीमध्ये सापडली जोवर आपण राजकीय विचार प्रणाली धर्मापासून धर्मशास्त्रापासून पूर्णपणे मुक्त करू शकत नाही आणि तिला काही वैज्ञानिक आधार पुरवू शकत नाही तोवर तुमचा सत्तेविषयीचा सर्व हंगाम हा कळत नकळत अमूर्त आणि गूढ होत जाणार . एका अर्थाने माणसाच्या वैचारिकतेची ही एक शोकांतिका आहे .

श्रीधर तिळवे नाईक


Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय