निवडणुकीनंतरच्या गोष्टी 2026 १ तामिळनाडू श्रीधर तिळवे नाईक
दक्षिणेकडे तामिळनाडू मध्ये जे घडले आहे ते अनेकांच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे. त्याबाबत काही गोष्टी बोलल्या पाहिजेत .
पहिली गोष्ट विजय जोसेफ हा फक्त ख्रिश्चन नाही तो हिंदूही आहे कारण त्याची आई हिंदू आहे आणि त्याच्यावर सर्वाधिक प्रभाव आईचा आहे वडिलांचा नाही . त्यामुळे तो साई नाथबाबाचा प्रचंड भक्त आहे . शैव लोकांच्या दृष्टीने साईनाथ हे शैव होते त्यामुळे कळत नकळत शैव मते त्याच्या बाजूने फिरलेली आहेत.
दुसरी गोष्ट अनेकांना जसे वाटते की त्याला राजकारण कळत नाही तर स्पष्ट सांगायचे तर गोष्ट अशी नाही ज्यांना विजय जोसेफ फार जवळून माहिती आहे त्यांना तो सुरुवातीपासूनच राजकीय आहे हे माहित आहे. अत्यंत हुशारीने त्याने आपले करिअर रचले वेळप्रसंगी आपल्या आई-वडिलांच्या वर सुद्धा केस टाकली आणि जेव्हा वेळ आली तेव्हा तो स्पष्ट आणि स्वच्छपणे ख्रिश्चन म्हणून ठामपणे उभा राहिला पण जसे त्याच्या लक्षात आले की ख्रिश्चन असणे परवडणारे नाही तेव्हा शेवटच्या १५ दिवसात त्याने संपूर्णपणे टोपी फिरवलेली आहे. या पंधरा दिवसांमध्ये त्याने जवळजवळ सर्व महत्त्वाच्या मंदिरांना भेटी दिल्या . त्याच्या फॅन्ससाठी हे पुरेसे होते. त्यामुळे त्याच्या ख्रिश्चन असण्याचा मुद्दा अचानक मतदान होण्याच्या आधीच बाजूला गेला .
विजयला मिळालेला विजय हा भाजपचा विजय नाही किंवा काँग्रेसचाही विजय नाही तामिळनाडू ने दोन्ही राष्ट्रीय प्रवाह पूर्णपणे नाकारलेले आहे विजयने कायमच तामिळ अस्मितेचा पुरस्कार केलेला आहे त्यामुळे जी लढाई झाली आणि पुढे आता असेलच आपापसात झाली
विजयच्या विजयाचे सर्वात मोठे कारण त्याने दिलेली मोठी मोठी आणि अशक्यप्राय अशी आश्वासने आहेत तो ही आश्वासने कशी पूर्ण करणार आहे हे मला तरी कळत नाही . त्याच्या उलट स्टालीन यांनी काम केले होते परंतु त्यांनी जे काम केले ते फार मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट केले नाही ते थोडेसे बेसावध राहिले मुळातच माझे स्वतःचे स्पष्ट मत असे की त्यांनी विजयला अंडर एस्टिमेट केले भाजप हा मुख्य शत्रू मानला आणि भाजप त्यामुळे पूर्णपणे उखडला गेला आपल्या शेजारच्या युद्धभूमीमध्ये एक वटवृक्ष उगवतो आहे हे त्यांना कळलेच नाही .
अनेक लोक असे सांगतात की जे रजनीकांत आणि कमल हसन यांना जमले नाही ते विजय याने करून दाखवले हा मुद्दाच चुकीचा आहे कारण मुळात रजनीकांत यांनी राजकारणामध्ये फार रस घेतलाच नव्हता . कमल हसन यांनी मुळातच राष्ट्रीय पातळीवर राहण्याचा प्रयत्न केला आणि तामिळनाडू मध्ये राष्ट्रीयला काहीही किंमत नाही . कमल कळत नकळत मुलीच्या बॉलीवूडच्या उत्तरे मधल्या करिअरच्या प्रेमात होते त्यामुळे त्यांनी संपूर्ण भारत समोर ठेवला आणि त्यांना त्यामुळेच पूर्णपणे नाकारले गेले एका अर्थाने पेरियार यांनी निर्माण केलेली संपूर्ण द्रविड संस्कृती आणि तिची अस्मिता त्यांनी नाकारली त्यामुळे त्यांना यश मिळणे शक्यच नव्हते. त्यात भरीसभर म्हणून त्यांनी स्वतःला ब्राह्मण म्हणून प्रोजेक्ट केले त्याचा परिणाम त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर तर झालाच पण फिल्मी करिअर वर सुद्धा झालेला आहे . जय ललिता यांचे शहाणपण त्यांच्याकडे नव्हते हेही कमी होते म्हणून की काय त्यांनी मी नास्तिक आहे असे सांगून धर्म नाकारला . म्हणजेच द्रविड अस्मिता नाकारली संस्कृती नाकारली धर्म नाकारला आणि त्यांची लैंगिक नीतिमत्ता कायमच अत्याधुनिक असल्याने संशयास्पद होती या सगळ्या गोष्टींच्यामुळे कमल हासन नाकारले गेले होते विजयचे तसे नव्हते सार्वजनिक जीवनामध्ये आपल्या फॅनच्या प्रेमात पडून लग्न करण्याचे धाडस त्याने दाखवल्याने फॅन्समध्ये विशेषतः स्त्रियांच्या मध्ये तो जादाच लोकप्रिय होता त्याची आणि त्रिशाची जोडी इतकी लोकप्रिय आहे की लोकांना हे अफेअर सुद्धा मान्य होते . हे काहीसे एमजीसारखे होते . तेव्हा विजय जो राजकारणात पुढे आलेला आहे त्याचे प्रमुख कारण त्याला रजनीकांत यांच्यापेक्षा राजकारणात प्रचंड रस होता किंबहुना रजनीकांत यांनी फिल्म कधीच सोडली नाही तसे विजयने केले नाही त्याने फिल्मसृष्टीचा त्याग केला (आणि खरे तर मी त्यामुळेच त्याला विरोध केला होता त्याने फिल्म इंडस्ट्री सोडायला नको होती असे मला वाटत होतं )पण याबाबतीतला त्याचा प्रामाणिकपणा आणि पारदर्शकपणा इतका होता की त्याने चक्क अत्यंत टॉपला असलेले आपले फिल्मी करिअर सोडले आणि त्यामुळे रजनीकांत राजकारणाबाबत जेन्यूइन आहेत की नाही याबद्दल जी शंका होती ती शंका विजय बाबत राहिली नाही त्याने रजनीकांत यांच्यासारखे तळ्यात मळ्यात केले नाही. उलट मी फुल टाइम राजकारण करणार हे त्याने आधीच डिक्लेअर केले त्यामुळे एमजी रामचंद्रन यांना जो फायदा मिळाला तोच फायदा त्याला मिळाला . लोकांना त्याचा निर्णय ऑथेंटिक वाटला आणि रजनीकांत याबाबतीत ऑथेंटिक वाटत नव्हतेच . त्यांची जनतेबद्दलची तळमळ खरी होती आणि आहे परंतु राजकारणाबाबतची शंभर टक्के निष्ठा जी अपेक्षित होती ती लोकांना दिसत नव्हती ते तळ्यात मळ्यात करतात असेच वाटत होते . विजयबाबत ही शंका राहिली नाही . एक परिणाम असा झाला की त्याचे सगळे फॅन्स आपोआपच फुल टाइम कार्यकर्ते झाले . मुळात साउथ इंडिया मध्ये जेव्हा फिल्म रिलीज होत असते तेव्हा त्या सुपरस्टार चे सगळे फॅन हे कार्यकर्तेच असतात . त्यामुळे विजयला (किंवा जर का रजनीकांत राजकारणात पडले असते तर रजनीकांत यांना) फुल टाईम कार्यकर्ते हा प्रॉब्लेम कधीच नव्हता . त्यांचे फॅन इतके आंधळे आहेत की ते फुल टाईम कार्यकर्ते बनतात. विजयच्या बाबतीत हेच घडले. आणि ज्याच्याकडे कार्यकर्ते असतात त्याला संघटना उभा करणे फार अवघड होत नाही . किंबहुना त्या सुद्धा फॅन्स संघटना असल्याने त्याच हळूहळू राजकीय संघटनांच्या मध्ये कन्व्हर्ट होत गेल्या . यासाठी लागणारा पैसा स्वतःच्या खिशातून टाकण्याची तयारी विजय याने दाखवलेली होती. त्यामुळे फक्त वेळ नाही तर तो पैसा सुद्धा देत होता. या सगळ्याचा फायदा त्याला निवडणुकीमध्ये झाला . तेव्हा विजयला मिळालेला विजय हा काही आकस्मिक वगैरे नाही त्या मागे एक पद्धतशीरपणे प्लॅनिंग आहे .
आणि मी आधीच म्हटल्याप्रमाणे विजयने दाखवलेले आश्वासनांचे भले मोठे गाजर हे सर्वाधिक काम करणारे ठरले. महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना राबवली तर एवढे वोटिंग फिरले विजयने जी आश्वासने दिलेली आहेत ती तर दहा पट लाडकी बहीण भाऊ योजना आहे . तो ती कशी पुरी करणार हा खरोखरच प्रश्न याचे कारण असे की यासाठी लागणारा पैसा त्याच्याकडे नाही तो तो सरकारकडूनच घेणार आणि या योजना राबवल्या तर सरकारची दिवाळखोरी अटळ आहे. यामध्ये उपाय जो आहे तो सर्वात डेंजरस आहे आणि तो म्हणजे रोमचा पैसा ! मला सर्वाधिक धोका जो दिसतो तो इथेच आहे कारण गोव्यात हे घडलेले आम्ही पाहिलेले आहे. गोव्यामध्ये काँग्रेसला प्रमुख पक्ष करण्यात रोमन कॅथोलिक व्हॅटिकन सिटी या फॅक्टरचा फार मोठा वाटा होता जर इथे सुद्धा हा फॅक्टर असेल तर मात्र पैशाची कमी होणार नाही मात्र एक गोष्ट नक्की ख्रिश्चन धर्मांतर गतिमान होईल . किंबहुना तामिळनाडू मधल्या ख्रिश्चन धर्मांतरांच्यावर आता लक्ष ठेवावे लागेल . रोमन व्हॅटिकन संस्कृतीने नेहमीच तमिळ संस्कृती ही स्वतंत्र संस्कृती आहे हे मान्य केलेले आहे . त्यामुळे विजयच्या तमिळ पणाला त्यांचा पाठिंबाच आहे . भाषेबाबत ही त्यांना प्रॉब्लेम नसतोच. प्रॉब्लेम फक्त असेल तो धर्माचा असेल . आणि हा सर्व डाव जर का रोमन कॅथोलिक व्हॅटिकन सिटीने आखला असेल तर मग विजय हा ख्रिश्चनिटीचा प्रतिनिधी म्हणूनच काम करेल. तामिळनाडूचे ख्रिश्चनिकरण हे कायमच रोमन व्हॅटिकन सिटी चे स्वप्न राहिलेले आहे त्यासाठीच त्यांनी मल्याळम भाषा निर्माण केली स्वतंत्र लिपी निर्माण केली मल्याळम संस्कृती निर्माण केली आणि नंतर मग तमिळ संस्कृती पासून तोडून केरळ नावाचे राज्य ही निर्माण केले . जर का तामिळनाडू ख्रिश्चन बनवण्याचा हा डाव असेल तर पहिला डाव निश्चितपणे यशस्वी झालेला आहे . आपल्याकडच्या पुरोगामी लोकांना अजूनही जुड्याईक धर्म संस्कृती कशी काम करते हे कळत नाही . त्यामुळे विजयला हवा असलेला पैसा जर इकडून येणार असेल तर मग समजून चालावे तामिळनाडू आज ना उद्या स्वतंत्र द्रविड देशाची मागणी करणार . पूर्वेकडे ख्रिश्चन स्थान हवेच होते आणि ते निर्माण करण्यात आले आता दक्षिणेकडे वाटचाल सुरू आहे याचा फायदा अर्थातच नंतर कधीतरी भाजपालाच होणार आहे . कारण काँग्रेस ही व्हॅटिकन सिटीकडेच गहाण असते त्यामुळे एकंदरच विजयला हा लेख येईपर्यंत ऑर्डर आलीच असेल की काँग्रेस बरोबर युती करा .
स्टालिन यांनी केलेली सर्वात मोठी चूक म्हणजे त्यांनी केलेला धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार ! त्यांनी थेटपणाने जर का शैव धर्माचा कैवार घेतला असता तर कदाचित ते वाचले असते. पण त्यांनी जेव्हा सनातन संस्कृती नष्ट करणार असे म्हटले तेव्हा लोकांना वाटले की ते धर्म नष्ट करायला निघालेले आहेत आणि त्यात शैव धर्म ही येतो . याबाबत त्यांनी अधिक स्पष्टीकरण देणे आवश्यक होते . कट्टर नास्तिक माणसाला निवडून देण्याच्या मनस्थितीमध्ये भारतीय माणूस सामील व्हायला तयार नाही. स्टालीन यांना हे भान राहिले नाही आणि त्याची फार मोठी किंमत त्यांनी चुकवलेली आहे. आजच्या रजनीकांत यांच्याबरोबर झालेल्या भेटीत रजनीकांत यांनी त्यांना हे समजावलेले असेलच .
श्रीधर तिळवे नाईक
निवडणुकीनंतरच्या गोष्टी 2026 2 केरळ श्रीधर तिळवे नाईक
तमिळ अस्मिते सारखा केरळ अस्मितेचा प्रकार घेऊन केरळ मध्ये का पक्ष स्थापन झाला नाही हा एक फार मोठा प्रश्न आहे माझे स्वतःचे स्पष्ट मत असे आहे की अशा प्रकारचे अस्मिता निर्माण होऊ नये याची काळजी ख्रिश्चन धर्माने घेतली त्यामुळे हे झालेले नाही पण या प्रश्नाचे आणखी एक उत्तर केरळ मध्ये आहे केरळ कधीही प्रादेशिक नव्हता तो कायमच राष्ट्रीय होता याचे कारण आद्य शंकराचार्य ! त्याआधी ख्रिश्चन लोकांनी सुद्धा इथेच प्रथम धर्मप्रसार आणला आणि माझी स्मृती धोका देत नसेल तर भारतातला पहिला ख्रिश्चन राजा इथलाच होता . पहिली मशीद इथे आली. बाहेरच्या पैशाचे प्रचंड आकर्षण , व्यापार केंद्री मनोवृत्ती आणि त्यामुळे धार्मिक बाबतीत परदेशी व्यापारी लोकांशी करावी लागलेली उदारमतवादी तडजोड हे केरळचे वैशिष्ट्य आहे त्याला शह देण्यासाठी म्हणूनच आद्य शंकराचार्यांनी आचार्य शंकर यांचे शैव तत्त्वज्ञान स्वीकारून पण त्यांचा स्वातंत्र्य समता बंधुता विचार नाकारून इथे नवीन हिंदू धर्म निर्माण केला आणि तो स्मृती प्रधान केला त्यामुळे वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था यांचा प्रचंड त्रास इथल्या बहुजनांना झाला . यामुळेच आर्य ब्राह्मण धर्माच्या लोकांचे सर्वाधिक स्थलांतर इथे झाले त्यामुळेच पुढे दक्षिण भारतामध्ये हे एकच राज्य असे होते जिथे वैष्णव धर्म सर्वाधिक प्रबळ होता. याला प्रतिक्रिया म्हणून साहजिकच बहुजन समाजाचे ख्रिश्चन धर्मांतर होत गेले.
याच बहुजन समाजाला नंतर आणखी एका धर्मासारख्याच असणाऱ्या विचार प्रणालीची ओढ लागली ही विचार प्रणाली म्हणजे मार्क्सवाद ! त्यामुळेच इथली लढाई कायमच ब्राह्मण वैष्णववाद विरुद्ध इतर अशी होत गेली . याचा सर्वात मोठा फायदा मार्क्सवादाला झाला कारण एका बाजूला ख्रिश्चन मतदान आणि दुसऱ्या बाजूला बहुजनांचे मतदान मिळत राहिले. ब्राह्मण विरुद्ध इतर सर्व ब्राह्मणे तर शूद्र हा सिद्धांत प्रथम केरळ मध्येच अमलात आणला गेला आणि तो मग महाराष्ट्रात गेला आणि तिथून संपूर्ण भारतभर गेला . साहजिकच या संदर्भात बहुजन वर्गाच्या प्रतिक्रिया तीव्र होत्या .
त्यामुळेच गुरुवायूर कृष्ण मंदिर असून सुद्धा भारतीय जनता पक्षाची उमेदवार इथे तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली . वैष्णवांच्याबद्दल एक प्रकारचा तीटकारा इथे सर्वाधिक मोठ्या प्रमाणात आहे. त्या उलट ब्राह्मण वर्णाला मात्र वैष्णव धर्मच योग्य वाटतो. कंजिरापल्ली मध्ये जॉर्ज कुरियन सारखा ख्रिश्चन उमेदवार नास्तिक असल्याचे कळताच ख्रिश्चन मतांची संख्या जास्त असूनही ते ख्रिश्चन असूनही मतांची संख्या घटून ते चक्क पराभूत होतात याचे कारण ते वैष्णव धर्माला मदत करून भाजपाच्या मार्फत वैष्णव धर्म आणतील असा झालेला गुप्त प्रचार ! हीच गोष्ट के टी जलील यांची आहे . ते नास्तिक असल्याने देवावर विश्वास न ठेवणाऱ्या मुस्लिम माणसापेक्षा देवावर विश्वास ठेवणारा ख्रिश्चन परवडला या धारणेने मलप्पुरम मध्ये विरोधात मतदान गेलेले दिसते
हा धार्मिक साईड इफेक्ट कसा काय आला तर त्याचे श्रेय आपणाला भाजपाला द्यावे लागेल एकंदरच भाजपमुळे केरळमध्ये धार्मिकता हळूहळू केंद्रस्थानी आली हीच वस्तुस्थिती आहे . केरळमधले लोक राहुल गांधी यांना अर्धा ख्रिश्चन समजतात त्याचा फायदा काँग्रेसला झाला . नास्तिक कम्युनिस्टांच्या पेक्षा आजकाल राहुल गांधींच्या सारखे लोक परवडले अशी धारणा ख्रिश्चन लोकांची सुद्धा होत चाललेली आहे . साहजिकच कधी नव्हे ते बहुजन आणि ख्रिश्चन यांचे वोटिंग कम्युनिस्टांच्या विरोधात एकत्रितपणे गेले .
एकंदरच नास्तिक विचारांच्या बाबतीत लोक पुन्हा विचार करू लागलेले आहेत एवढेच दिसते . कम्युनिस्ट पार्टीला सुरुवातीपासूनच फॉर असलेला असा हा एकमेव प्रदेश आता मात्र तसा राहिलेला नाही.
मला स्वतःला लोकायतवादी विचार नाहीसा व्हावा असे वाटत नाही कारण धार्मिक गोष्टींच्यावर कर्मकांडांच्या वर नियंत्रण ठेवणारे जे काही विचार आहेत त्यामध्ये लोकायत विचार हा फार आघाडीचा विचार आहे दुसरी गोष्ट कुठल्याही संस्कृतीची फक्त मेटा फिजिकल मीमांसा होता कामा नये तर जडवादी चिकित्सा सुद्धा होणे अत्यंत आवश्यक असते त्यासाठी हा डावा विचार फार उपयुक्त असतो . त्यामुळे हा विचार जिवंत राहणे खूप आवश्यक आहे अन्यथा आपण कधी इस्लाम सारखे होऊ हे सांगता येणार नाही . भारत हा जर का हत्ती असेल तर हा जडवादी लोकायतवादी विचार त्या हत्तीला नियंत्रित करणारा अंकुश आहे आणि त्याची गरज आहे . तो माहूत बनण्याची शक्यता मात्र मला पूर्वीही फारशी दिसली नव्हती आणि आताही फारशी दिसत नाही.
दुर्दैवाने भारतातल्या कम्युनिस्ट लोकांनी लोकायतांशी नाते जोडले नाही . कार्ल मार्क्सचे फोटो लावण्यापेक्षा डाव्या वादाने विरोचन ,चार्वाक आणि बृहस्पती यांचे फोटो लावले पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे . कार्ल मार्क्स हा आता हळूहळू कुठलातरी जर्मनीचा दुरस्थ चेहरा वाटायला लागलेला आहे . यातच इराण अमेरिका युद्धामध्ये डाव्यांची भूमिका जशी स्पष्ट व्हायला पाहिजे होती तशी झाली नाही. केरळ हा कायमच व्यापार प्रधान प्रदेश राहिलेला आहे . मुख्य म्हणजे हा व्यापार परदेशांशी चालतो . परदेशामध्ये या युद्धामध्ये केरळ लोकांची कुचंबना झाली असं वाटणारा एक कामगार वर्ग केरळमध्ये आहे तो कधी नव्हे तो कम्युनिस्ट पक्षाच्या विरोधात गेलेला दिसतो . पण स्पष्ट सांगायचे तर डावे लोक पुन्हा इथे विजयी होऊ शकतात कारण फार मोठे वोटिंग हातातून गेलेले नाही. त्यामुळे डाव्या लोकांनी जे अलीकडे अचानक शेवटचे डावे राज्य संपले म्हणून आक्रोश केला आहे तो त्यांनी करू नये केरळ पुन्हा एकदा फिरू शकते . लोकसभेला पुन्हा एकदा जोर लावायला हरकत नाही .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment