शिवाजी महाराज स्वामी रामदास तुर्क हिंदवी आणि वस्तुस्थिती भाग तीन श्रीधर तिळवे नाईक 

आपण मागील दोन भागात शिवाजी महाराज आणि स्वामी रामदास यांच्या संबंधविषयी काही निष्कर्ष काढले . सर्वसाधारणपणे हा निष्कर्ष काढणारे लोक एक गोष्ट गृहीत धरतात ती म्हणजे शिवाजी महाराज हे भक्त होते ते भाव मार्गी भावतंत्री होते प्रत्यक्षात हे सत्य आहे का ?

सर्वसाधारणपणे महाराजांचा आयुष्य क्रम बघितला तर आपणाला एक गोष्ट स्पष्ट दिसते ती म्हणजे ते क्रिया तंत्रांच्या अंगाने जातात अगदी समर्थ रामदास यांनी सुद्धा त्यांना भक्त म्हटलेले नाही तर श्रीमंत योगी म्हटलेले आहे. एकीकडे राजकीय ऐश्वर्य आहे आणि दुसरीकडे तरीही वैष्णव भाषेत योगी म्हणजे ज्ञान योगी ,भक्ती योगी वगैरे ते कर्मयोगी आहेत आणि श्रीमंत योगी आहेत महाराजांच्याकडे स्वामी रामदास यांचा बघण्याचा हा दृष्टिकोन मला फार योग्य वाटतो चुकून जरी रामदासांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख भक्त असा केला असता तर कदाचित प्रॉब्लेम झाला असता याचा अर्थ ते बिलकुल भक्त नव्हते असाही नाही ते तुळजाभवानीचे दर्शन घेत होते परंतु मागताना नेहमीच क्रिया योगी मागणे असायचे . पण यामुळेच एक गोष्ट अशी झाली की समर्थ संप्रदायाशी जास्त पटले गेले याचे कारण हा संप्रदाय कळत नकळत मारुतीची उपासना म्हणजेच बलाची उपासना करायला सांगत होता आणि मारुती हा स्वतः कर्मयोगी असल्याने कळत नकळत कर्मयोगाचा पुरस्कार होत होता . खुद्द राम हा शिवभक्त होता आणि या काळात सुद्धा सर्व शैव लोकांची रामाकडे बघण्याची नजर एक कर्मयोगी जो शिवाचा भक्त होता अशीच होती. रामायणातला वैदिक विष्णूचा अवतार हा नंतर अधिकाधिक प्रचलित करण्यात आला . विशेषतः ब्रिटिश काळात हा प्रसार जास्त झाला पुढे लोकमान्य टिळकांनी आश्चर्यकारकरीत्या राम स्वीकारण्याऐवजी श्रीकृष्णाच्या गीतेचा स्वीकार केला आणि याला कारण कळत नकळत शिवाजी महाराज होते कारण शिवाजी महाराज कर्मयोगी क्रिया तंत्री होते . आणि खुद्द लोकमान्य टिळक यांना सुद्धा कर्मयोगीच व्हायचे होते किंबहुना स्वातंत्र्य चळवळीमध्ये जवळजवळ सर्वच नेत्यांना कर्मयोगी व्हायचे होते शिवाजी महाराजांचे जे पुनरागमन या काळामध्ये झालेले आहे ते या कर्मयोगी प्रतिमेमुळे हे आपण लक्षात घेतले पाहिजे ते भक्त होते म्हणून हे पुनरागमन झालेले नाही. काँग्रेसच्या पुढे आर्यांनी पुढाऱ्यांनी ही जी शिवाजी महाराजांची कर्मयोगी प्रतिमा तयार केली त्याला छेद देण्यासाठी म्हणूनच ब्राह्मणी हिंदुत्व हे नेहमीच शिवाजी महाराजांनाच दैवत करायला बघते आणि त्यांच्या आधारे पुन्हा शिवभक्त वाढवायला बघते हा शिवभक्त भगवान शंकरांचा भक्त नसतो किंवा भगवान शिव यांचाही भक्त नसतो तो फक्त शिवाजी महाराजांचा भक्त असतो आणि त्याला हे कधीच सांगितले जात नाही की शिवाजी महाराज हे शैव होते त्याला वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न होतो की ते वैदिक होते आणि त्यांनी वैदिक धर्माचा कैवार घेतला त्याचे संरक्षण केले.

या ब्रिटिश काळामध्येच आपण जर का नीट पाहिले तर संत रामदास हे जास्त प्रभावीपणे ब्राह्मण लोकांच्यात लोकप्रिय होताना दिसतात कारण तेच एक असे ब्राह्मण संत होते जे शिवाजी महाराजांची संबंधित असणे दाखवणे सोपे होते . यामध्ये काँग्रेस मधले ब्राह्मण होते. न्यायमूर्ती रानडे यांनी संतांची सामाजिक फलश्रुती मांडताना कायमच भक्तिचा कैवार घेतला याचे कारण रानडे स्वतः ज्ञानाचा कितीही गवगवा करत असले तरी ते स्वतः भक्ती भावतंत्री होते .

प्रश्न असा आहे की भक्ती अचानक अशी प्रभावी का झाली आणि या भक्तीमुळे महाराष्ट्राचे इतके पतन का झाले? 

सर्वसाधारणपणे आपणाला या काळातले सगळे हिंदू इतिहासकार बघितले जे मूलतः स्वभावाने वैष्णव आहेत कायमच भक्तिमार्गाचा पुरस्कार करताना दिसतात आणि वारकरी संप्रदाय केंद्रस्थानी आणण्याची धडपड करत असतात मात्र या लोकांचा याबाबतीत झालेला नाईलाज असा आहे की भाव तंत्र हे प्रथम चळवळ म्हणून तमिळमध्ये अवतरले आणि हे या लोकांना माहिती होते आणि आहे . इतकेच नाही तर ते प्रथम शैव धर्मामध्ये आले हेही माहिती आहे . सर्वसाधारणपणे तमिळ मधील नयनाऱ्यांच्यापासून ही भक्ती चळवळ सुरू झाली असे मानले जाते तिथून मग ती कर्नाटक आणि आंध्र आणि पुढे महाराष्ट्र असा हा प्रवाह दिसतो . हा प्रवाह राजकारणामध्ये प्रभावी होण्याचा काळ दहाव्या शतकातच सुरू होतो पण वैष्णवांच्या अंगाने तो प्रभावी उत्तर यादवांच्या पासून होतो मूळचा शैव असलेला हा वंश अचानक वैष्णव होतो आणि स्वतःच्या शेवटच्या 33 वर्षात स्वतःला यादव समजतो आणि पुढे मुस्लिम लोकांच्याकडून पराभूत होतो . साहजिकच नेमक्या याच काळामध्ये ज्ञानदेव भावार्थदीपिका लिहितात आणि भक्तिमार्गाचा पुरस्कार करतात. या भक्तिमार्गाचे वैशिष्ट्य असे असते की ती वर्ण जात व्यवस्थेचा पुरस्कार करत असते याउलट चक्रधरांचा महानुभव पंथ हा वर्ण जात नाकारतो तर यादवांच्या काळापासूनच त्याची पीछेहाट झालेली दिसते याचे उघड कारण म्हणजे वर्ण जातीला महानुभव पंथाचा असलेला विरोध ! हा विरोध इतका तीव्र होता की हळूहळू महानुभव संप्रदायाला स्वतःचे अस्तित्व शाबूत ठेवण्यासाठी गूढ लिपी, सांकेतिक लिपी यांचा आश्रय घ्यावा लागला आणि याचा एक दुष्परिणाम असा झाला की हा संप्रदाय वैष्णव असून सुद्धा लोकांच्या पासून तुटत गेला त्याउलट वर्ण जात व्यवस्थेचे समर्थन करणारा वारकरी संप्रदाय मात्र सर्वांना सोयीचा होता विशेषता महाराष्ट्रातील ब्राह्मण आणि क्षत्रिया यांच्यासाठी तो फार सोयीचा होता कारण तो या दोघांनाही उच्च स्थान देत होता . त्यामुळे पद्धतशीरपणे यादवांच्या काळापासूनच मुख्य म्हणजे ब्राह्मण आणि क्षत्रिय यांनी तो स्पॉन्सर करायला सुरुवात केली .

या काळामध्ये जर का आपण शैव धर्म पाहिला तर तो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तंत्र आणि तंत्रातून येणाऱ्या अनेक वामाचारांना शरण गेलेला दिसतो आणि याचा प्रचंड फायदा वारकरी संप्रदायाला झालेला दिसतो .

हा काळ इस्लाम मुळे पूर्णपणे भक्तीचा असल्याने आणि इस्लाम फक्त इबादतच मानत असल्याने साहजिकच शासन पुरस्कृत मार्ग म्हणून भक्ती मार्ग हा शासकीय झाला . ही एका अर्थाने इस्लामची इबादत आणि वैष्णवांची भक्ती यांची युती होती

त्या उलट नाथ संप्रदाय हा योग संप्रदाय असल्याने आणि योग संप्रदायाच्या संदर्भात इस्लामचा कसलाही पाठिंबा नसल्याने शासनाकडून हा धर्म वारंवार फेटाळला गेला . त्यामुळेच या मुस्लिम शासकांची कृपादृष्टी आपल्यावर असावी असे सर्वच वैष्णव संतांना वाटलेले दिसते याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही त्यामुळेच आपणाला संत तुकाराम आणि संत रामदास या दोघांनीही अल्लावर अभंग रचलेले दिसतात. 

या काळामध्ये ज्ञानदेवांचा ज्ञानदेवी म्हणजेच अलीकडे ज्ञानेश्वरी आणि एकनाथांचे भागवत हे दोन्ही वैष्णवग्रंथ ज्यामध्ये भक्ती शिवाय काहीच नव्हते प्रचंड लोकप्रिय होताना दिसतात आणि कळत नकळत ते या वारकरी संप्रदायाचे धर्मग्रंथ बनताना दिसतात. त्याचबरोबर याच काळात रामायण आणि महाभारताची अनेक मराठी रूपे अनेक पंडित कवींनी दरबारामध्ये सादर केलेली दिसतात. या काळातले सर्वात मोठे महानुभव पंथाचे दुर्दैव असे होते की बहुतेक जण पंडित होते आणि साहजिकच त्यांचे पांडित्य नको तितके या पंथामध्ये घुसलेले दिसते. वारकरी संप्रदायामध्ये आपण लोकांप्रती लिहितो ही जाणीव होती पण महानुभव पंथी यांना ही लोकांप्रती जाणीव फारशी उरलेली दिसत नाही महानुभव पंथामध्ये गुरुचे प्रचंड स्त्रोम होते तर वारकरी संप्रदायांमध्ये गुरूंचे प्रचंड स्तोम नव्हते . संत तुकाराम यांच्या भाषेत सांगायचे तर 

मेघवृष्टीने करावा उपदेश 

गुरुने करू नये शिष्य 

अशी धारणा होती पण त्याचबरोबर कर्मयोगाला साजेशी जी काही कर्मकांडे होती त्याला सुद्धा तिलांजली दिली गेली उदाहरणार्थ रथ ओढणे, खेटी घालणे. तलवारी नाचवणे मुळात विठ्ठल हाच नि:शस्त्र देव असल्याने हे सर्व काही आपोआपच बाजूला झाले किंबहुना मुस्लिम बादशहांना खुश करणे मुस्लिम राजांना खुश करणे त्यासाठी हे शस्त्र उपचार पूर्ण पणे धार्मिक उपचारांच्या मधून बाजूला काढले गेले याचा एक परिणाम असा झाला की कळत नकळत एक बौद्ध परिणाम संपूर्ण अहिंसात्मक होत वारकरी चळवळीवर आणि हळूहळू मराठीतील समाज मानसावर पसरत गेला. 

या वारकरी संप्रदायाला वर्ण जात टिकवायची होते बेटी बंदी टिकवायची होती. त्यामुळे शक्ती तंत्राचा शिरकाव अजिबात होऊ नये म्हणून साहजिकच मधुराभक्ती टाळण्यात आली सर्व प्रकारचे तंत्र आचार टाळण्यात आले यांच्या विरोधात अपप्रचार करण्यात आला ब्रह्मचर्याचा पुरस्कार करण्यात आला . हे सर्व तंत्र टाळण्यासाठी आणि त्याद्वारे वर्ण जात व्यवस्था टिकवण्यासाठी करण्यात आले होते सर्वसाधारणपणे आपणाला असे दिसते की त्यामुळेच एकतर विठ्ठलाला मित्र मानावा म्हणजे सखा मानावा किंवा पाठीराखा मानावा किंवा माऊली म्हणावे. विठ्ठलाला कधीही प्रियकर मानले गेलेले नाही. त्यामुळे तंत्रातला वामाचार भक्तीमध्ये शिरू नये अशी ही घेतलेली काळजी आहे त्यामुळे सेक्सबाबत सोवळे पणा आला . तो येणे आवश्यक होते कारण वर्ण आणि जात मोडायची नाही तर वर्ण जात व्यवस्था टिकवायची आणि ही व्यवस्था जर टिकवायची असेल तर तंत्र अजिबात सामाजिक जीवनात येता कामा नये मधुरा भक्ती वगैरे येता कामा नये अशी काळजी घेणे आवश्यक आहे अशी या मागची धारणा होती . त्यामुळेच या काळामध्ये आंतरजातीय विवाह फारसे झालेले नाहीत. अगदी संत तुकाराम यांनी सुद्धा ते एवढे बंडखोर असून सुद्धा आपल्या एकाही मुलाचा किंवा मुलीचा विवाह जाती बाहेर केलेला नाही .

याबाबतीत जर का तुम्ही आजच्या गर्भाचा वारकऱ्यांच्या वारीशी तुलना केली तर तुम्हाला असे लक्षात येईल की या दांडियामध्ये खूप प्रकारचा लैंगिक आचार घडतो पण वारकरी संप्रदायाच्या वारीमध्ये असे घडत नाही याचे एकमेव कारण त्याला असलेली मनाई आहे . विषमता टिकवण्यासाठी अशा प्रकारची मनाई आवश्यक आहे.

त्यामुळे हे जे समतेचे वगैरे धडे दिले वगैरे सांगितले जाते ते सर्व काही खोटे आहे तो अपप्रचार आहे वैष्णव संत चळवळीमध्ये वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही प्रकारची सामाजिक समतेची रचना आणि त्या अंगाने चळवळ अस्तित्वात नव्हती आणि आजही नाही. फक्त मोक्षाबाबत समता आहे आणि मोक्षा बाबतीतली समता सामाजिक नसते. त्यामुळेच प्रत्यक्षात चोखामेळाला विठ्ठल मंदिरात प्रवेश देण्यात आलेला नाही त्यामुळे ती धार्मिक समतासुद्धा शंकास्पद आहे नंतर तुकारामाला जी अभंग बुडवण्याची वही बुडवण्याची शिक्षा झालेली आहे त्यामुळे सुद्धा खरोखर नेमकी स्थिती काय होती ते तपासले पाहिजे. जर समाजामध्ये समता होती तर मग संत तुकाराम यांना अभंग बुडवण्याची शिक्षा कशी काय दिली गेली ? हे धर्म मार्तंड एवढे कसे काय प्रभावी झाले ? 

प्रश्न असा आहे की या काळामध्ये खंडोबा लोकप्रिय नव्हता का? होता. तुळजाभवानी लोकप्रिय नव्हती का तर होती अन्यथा शिवाजी महाराजांच्या शैव-धर्माला वावच मिळाला नसता मात्र ज्या प्रकारचे व प्रतिभेचे कवी संत वाङ्मयांमधून पुढे आले त्या प्रकारचे कवी शैव भक्तीतून महाराष्ट्रात निर्माण झाले नाहीत हे असे का घडले याचे उत्तर यादवांच्या राजवटीत आहे आणि नंतर आलेल्या मुस्लिम राजवटीत आहे. कर्नाटकामध्ये लिंगायत धर्मामध्ये किंवा तमिळमध्ये नयनार संतांच्या भक्ती चळवळीमध्ये अनेक शैव कवी निर्माण होतात परंतु महाराष्ट्राची मुख्य परंपरा शैव असून सुद्धा या कालखंडामध्ये प्रचंड ताकतीचे शैव कवी मात्र निर्माण होताना दिसत नाहीत हे खरोखर आश्चर्यकारक आहे महाराष्ट्र हा कळत नकळत या काळातच वैष्णव झालेला होता त्याचा हा फार मोठा पुरावा आहे अर्थातच हे संपूर्ण वैष्णवीकरण महाराजांच्या मुळे टिकले नाही आणि लोक पुन्हा एकदा शैव-धर्माकडे वळले याचा एक परिणाम असा झाला की तुकारामानंतर आणि बहिणाबाईंच्या नंतर तुकाराम किंवा एकनाथ किंवा नामदेव यांच्या तोडीचा एकही कवी वैष्णव धर्मातून आलेला दिसत नाही कारण वैष्णव धर्माला मुळात तितकासा पाठिंबा मिळालेला नाही राम कृष्ण हरी ऐवजी हर हर महादेव पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलेले आहे पुढे मग पेशव्यांच्या काळामध्ये शक्यता निर्माण झाली होती परंतु इंग्रज आले आणि ही शक्यता खूप कमी झाली मुख्य म्हणजे वेदांताचा प्रभाव पुन्हा एकदा वाढत गेला 

याचा अर्थ स्पष्ट आहे शिवाजी महाराज आल्यामुळे संतांच्या चळवळीचा अस्त होत गेला. थोडक्यात काय संतांच्या चळवळीमुळे शिवाजी महाराज निर्माण झाले नाहीत तर शिवाजी महाराज निर्माण झाल्यामुळे या संतांच्या वारकरी संप्रदायाची वर्ण जात व्यवस्था टिकवणारी चळवळ हळूहळू क्षीण होत शेवटाकडे सरकत गेली . आणि म्हणूनच शिवाजी महाराज आज सुद्धा सनातनी कर्मठ ब्राह्मण लोकांना किंवा त्यांच्यासोबत असणाऱ्या अनेक लोकांना स्वतःचे शत्रू वाटतात .

श्रीधर तिळवे नाईक 


Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय