महाराष्ट्र धर्म

 महाराष्ट्र धर्म , शिवाजी महाराज, स्वामी रामदास पंडीत ,तुर्क , हिंदवी आणि वस्तुस्थिती भाग पाच श्रीधर तिळवे 


महाराष्ट्रात अलीकडे काही लोकांनी महाराष्ट्र धर्म ही स्वामी रामदास यांची संकल्पना वापरायला सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर ते शिवाजी महाराजांचे गुरु होते की नव्हते यावरून वाद ही सुरू आहे त्यामुळे आपणाला या संदर्भात नेमके काय आहे ते पाहिले पाहिजे


मी एक वस्तुस्थिती नेहमीच मांडत आलेलो आहे ती म्हणजे पंडित वेगळे आणि ब्राह्मण वेगळे आणि सर्वसाधारणपणे इसवी सन ८०० नंतर पंडितांच्या ब्राह्मणीकरणाची सुरुवात झाली यातील पहिला टप्पा आद्य शंकराचार्य यांच्यापासून सुरू होऊन शेवटच्या यादवांच्या काळात पूर्ण झाला तर दुसरा टप्पा हा मुस्लिम राजवटींच्या काळात सुरू झाला पहिल्या टप्प्यामध्ये अगदी चक्रधरांचा महानुभव पंथ सुद्धा पंडितांनी चालवलेला आहे आणि महानुभव पंथ हा वर्ण जात व्यवस्थेवर विश्वास ठेवत नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. या काळामध्येच महाराष्ट्राचा मूलधर्म असलेला नाथ संप्रदाय हा हळूहळू वारकरी वैष्णव दिशेने नेण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे .


दुसरा टप्पा साधारणपणे एकनाथांच्या पासून सुरू होतो जनार्दन स्वामी हे शैव गुरु असून सुद्धा नाव नाथ असून सुद्धा एकनाथ हे हळूहळू ब्राह्मण बनत गेले आणि वारकरी बनले . मात्र चक्रधर जसे शैव असल्याने वर्ण जात व्यवस्था मानत नव्हते तसेच काहीसे एकनाथांचे सुद्धा होते पण नंतर स्वीकारलेल्या ब्राम्हण्याचा पगडा हा इतका होता की हळूहळू या संदर्भातील आवाज कमी होत गेला मात्र तरीही आज सुद्धा ते गोदावरी नदीमध्ये बुडाले की काय झाले हा प्रश्न आहे . याचे कारण असे की मोक्ष मिळाल्यानंतर "जो वारकरी तो ब्राह्मण "अशी ब्राह्मण या शब्दाची अत्यंत वेगळी व्याख्या त्यांनी केली तत्कालीन ब्राह्मणांनी ही व्याख्या स्वीकारली नाही आणि त्यांना ताप द्यायला सुरुवात केली कारण वारकरी संप्रदायामध्ये सर्व जाती जमातीचे लोक होते आणि एकनाथांच्या या नव्या व्याख्येमुळे त्या सर्वांना ते ब्राह्मण दर्जा मिळत होता 


ज्ञानेश्वर काय चक्रधर काय एकनाथ काय हे सर्वच्या सर्व मूळचेच पंडित आहेत हे लक्षात घेण्याजोगे आहे . यांच्यामुळे आपणाला लक्षात येते की पंडितांच्या ब्राह्मणीकरणाची चळवळ कशी हळूहळू यशस्वी होत गेली. स्वामी रामदास हे याला अपवाद नाहीत त्यांच्या घराण्याची आणि त्यांचीही मूळ कुलदेवता ही तुळजाभवानी आहे आणि यासाठी वेगळ्या पुराव्याची गरज नाही खुद्द रामदास यांनीच तुळजाभवानीची स्तोत्रे लिहिलेली आहेत जे स्तुती करते ते स्तोत्र अशी साधी व्याख्या आपणाला करता येते .साहजिकच तुळजाभवानीची स्तुती यामध्ये आहे .


देखिली तुळजा माता | 

निवालों अंतरी सुखें

तुटली सर्व हि चिंता | 

थोर आधार वाटला ||१||


असे त्यांनी म्हटलेले आहे . मात्र रामदासांचे वैशिष्ट्य असे आहे की त्यांच्यातला पंडित मेलेला नाही त्यामुळे ते तिला सुद्धा वर्तमान काळातल्या दृष्टांचा नाश कर अशी प्रार्थना करतात 


परंतु रोकडे काही 

मूळ सामर्थ्य दाखवी


असे ते तिला सुद्धा सांगतात म्हणजे तुझ्या कथा आहेत त्यात तू सामर्थ्य देतेस वगैरे ठीक परंतु आता मला रोकडे काही दाखव आत्ताच्या आत्ता म्हणजे रोकडे दाखव असे ते तुळजाभवानीला सुद्धा सांगतात.


त्यांना पूर्णपणे हे माहीत आहे की शक्ती नसता विटंबना होते त्यामुळे शक्ती ची प्रार्थना ते करतात ज्या वेळेला इतर सर्व संत फक्त भक्तीमध्ये बुडालेले होते तेव्हा समर्थ रामदास एकमेव असे होते की जे शक्तीची उपासना करायला सांगत होते 


याचा एक व्हायचा तो परिणाम झाला तो म्हणजे त्यांनी नंतर शक्ती बरोबर तुळजाभवानी बरोबर मारुतीची प्रार्थना करायला सुरुवात केली आणि ते स्वतःच मारुतीवादी झाले . म्हणजे सांगायला राम धर्म आणि प्रत्यक्ष संपूर्ण प्रसार मात्र मारुतीच्या देवळांचा ! मारुती हा शंकराचा अवतार असल्यामुळे त्यांच्यासाठी मारुती हा अधिक नैसर्गिक झालेला आहे . अनेक आखाडे त्यांनी उभा केले ही वस्तुस्थिती ! याचा फायदा नंतरच्या मराठा राजांना झाला नाही असे म्हणवत नाही कारण शेवटी आखाड्यात उतरणारा माणूस युद्धात सहज उतरू शकतो ही वस्तुस्थिती ! 


राम हा स्वतः तुळजाभवानीचा भक्त होता अशीही त्यांची धारणा आहे आणि त्यामुळेच रामाला जसा तू वर दिलास तसाच वर मला दे आणि वरदायिनी हो असे ते म्हणतात 


एका अर्थाने आद्य शंकराचार्यांनी जो हिंदू धर्म स्थापन केला त्याचा महाराष्ट्र धर्म बनवणारा संत म्हणून आपण रामदासांच्याकडे बघू शकतो . दुर्दैवाने हा महाराष्ट्र धर्म पूर्णपणे वैष्णव झालेला आहे . याला अपवाद फक्त शिवाजी महाराज आहेत आणि म्हणूनच मग शिवाजी महाराजांना जितके वैदिक सिद्ध करता येईल जितके वैष्णव सिद्ध करता येईल तितके ब्राह्मण्य वाढवता येईल याची कल्पना ब्राह्मणांना आहे आणि म्हणूनच शेवटी मग त्यांचे गुरु समर्थ रामदास होते अशा प्रकारचा एक मोठा पोकळ डोलारा ब्राह्मणांनी उभा केला प्रत्यक्षात खुद्द रामदास स्वामी यांनी कधीही असा दावा केलेला नाही . त्यांच्या लिखाणामध्ये शिवराज्याचे पडसाद आहेत ते नाकारता येत नाहीत किंबहुना छत्रपती शिवराय यांच्यामुळेच आनंदवन भुवन अस्तित्वात आले अशी त्यांची धारणा झाली होती 

मी मागेच म्हटल्याप्रमाणे ते एकमेव संत असे दिसतात की ज्यांना शिवाजी महाराजांनी नेमके काय कार्य केले हे कळाले होते . त्यांनी कधीही शिवरायांना वैष्णव करायचा प्रयत्न केलेला नाही मग नंतरच्याच ब्राह्मणांना हा उद्योग का सुचावा ? 


अनेकदा तर रामदास आतून शैवशाक्त आणि बाहेरून दाखवायला रामपंथी वैष्णव आहेत की काय अशी शंका येते कारण संपूर्ण वाङ्मय तपासले तर त्यात राम ,मारुती आणि तुळजाभवानी आहेत आणि प्रत्यक्ष कार्यामध्ये तर या शक्ती आणि मारुती या दोघांचीच उपासना करायला त्यांनी सांगितलेली दिसते . हे दोघेही शक्तीवर्धक आहेत आणि त्यामुळेच हे घडले आहे हे उघड आहे . याची मूळ प्रेरणा आपण शोधत गेलो तर आपणाला स्पष्ट दिसते की ही प्रेरणा खुद्द आद्य शंकराचार्य यांचे तुळजाभवानी अष्टक आहे त्यामध्ये आहे. वेदांत हा मूळचा शैव-धर्मातून जन्मलेला असल्यामुळे आणि खुद्द आचार्य शंकरांनी भक्तांना भक्ती करायला जी पाच देवते ज्याला पंचायतन म्हणतात ती दिलेली आहेत ती शैव आहेत. म्हणजे शिव ,पार्वती ,गणपती कार्तिकेय आणि सूर्य यातील जो सूर्य आहे तो यम आहे पुढे मग रामानुजाचार्य यांनी त्या सूर्याच्या जागी विष्णू आणला आणि सर्वकाही वैष्णवांच्या दिशेने फिरवले अन्यथा आद्य शंकराचार्यांची भक्ती ही स्पष्ट आणि स्वच्छपणाने शैव आहे हे बिंबवलेले आहे. साहजिकच त्यातूनच मग रामदास सुद्धा आलेले दिसतात . पण आद्य शंकराचार्यांनीच एक मूलभूत चूक केली ती म्हणजे त्यांनी स्मृती वाङ्मय स्वीकारले वर्ण जात व्यवस्था स्वीकारली आणि साहजिकच मग त्यांच्याबरोबर जे पंडित गेले त्या सर्वांनी ही वर्ण जात व्यवस्था स्वीकारून संपूर्ण शैव धर्माचा पायाच उखडला हलवला . इथेच हिंदू धर्माची स्थापना झाली . पुढे पुढे तर या लोकांनी सूर्याला रिप्लेस करून त्या जागी युरेशियन सूर्य विष्णू स्वीकारला किंबहुना रामानुजाचार्य हे वेदांत टेक ओवर करण्यासाठीच त्यांची चळवळ चालवत होते आणि ते यशस्वी झाले आणि तिथूनच हिंदू धर्माचे पतन सुरू होऊन तो पूर्णपणे वैष्णव बनत वर्ण जात व्यवस्था मानत शेवटी मुस्लिमांच्याकडून 100 वर्षातच पराभूत झाला 


स्वामी समर्थ रामदास यांचा मग प्रॉब्लेम कुठे झाला ? तर प्रॉब्लेम झाला तो वर्ण जात व्यवस्था स्वीकारली त्यामुळे झाला . म्हणजेच पुढे जे असत्य सांगण्यात आले त्याचे बीज कळत नकळत ब्राह्मण श्रेष्ठ या भावनेतून पडलेले आहे आणि रामदासांच्या ठाई हे बीज होते हे वस्तुस्थिती आहे त्याची कबुली त्यांनी अनेकदा स्वतःच्या लिखाणात दिलेली आहे. खुद्द तुकाराम यांनी सुद्धा एका अभंगात जरी तो ब्राह्मण झाला कर्म भ्रष्ट तुका म्हणे श्रेष्ठ तीही लोकी असे म्हटले आहेच . वस्तुस्थिती अशी आहे की संपूर्ण या काळातली वैष्णव चळवळ ही वर्ण जात व्यवस्था स्वीकारून चालली होती रामदास सुद्धा याला अपवाद नव्हते आणि म्हणूनच या काळामध्ये आपण वारंवार मुस्लिमांच्याकडून पराभूत होतो कारण क्षत्रियांची संख्याच मूठभर असल्याने आणि शूद्रांच्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन फार वाईट असल्याने राज्यनिष्ठ सैन्य निर्माण करणे अशक्य बनून गेले . एकदा का सैन्य धर्मनिष्ठ झाले की मग ते कुठल्याही राज्यासाठी काम करायला लागते आणि वैष्णो धर्माची शोकांतिका हीच आहे की तो धर्म सैन्य राज्यनिष्ठ न ठेवता धर्मनिष्ठ ठेवतो आणि याचे बीज सरळ सरळ महाभारतात आहे . भगवान श्रीकृष्ण हे धर्मासाठी लढतात राज्यासाठी नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि हेच बेसिक गृहीतक सैन्याचे सुद्धा बनले की तो धर्मनिष्ठ होत जातो. त्यामुळे आपोआपच सैनिक वैष्णव धर्मात धर्मनिष्ठ वा स्वामीनिष्ठ बनत जाते आणि हा स्वामी मग मुस्लिम असला तरी चालतो . बिभीषण सारखा पार्टी बदलणारा नेता आदर्श भक्त झाल्याने साहजिकच पार्टी बदलण्यामध्ये काही वावगे आहे असे वाटणे बंद होते आणि रामा सारख्या बाहेरून आलेल्या आक्रमकाला सुद्धा मदत करणे धार्मिक बनते त्यामुळेच या काळामध्ये अनेकदा हिंदू सैनिक बिनधास्तपणे आपले स्वामी बदलतील त्याप्रमाणे आपली निष्ठा बदलताना दिसतात . वर्ण व्यवस्थेतून याहून वेगळे काय निघणार ? एकदा का तुम्ही सैन्याला शूद्र दर्जा दिला तर हेच होणार फक्त तुमचे नेते तेवढे क्षत्रिय आणि बाकीचे फक्त त्यांचे नोकर तेही शूद्र हा तुम्ही दर्जा दिल्यानंतर आपोआपच मग तो शूद्र तुमच्याशी एकनिष्ठ राहणे शक्य नाही . शिवाजी महाराजांनी हे सर्व मोडीत काढले म्हणून शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करू शकले . पण आज काही अतिशहाण्या लोकांनी शिवाजी महाराजांच्या नावाने स्वतःचे पुन्हा एकदा तथाकथित वैष्णव स्वामित्व निर्माण करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे . त्यामुळेच हे लोक अनेकदा शूद्रांना सुद्धा ललकारत असतात . त्याचा परिणाम मध्ययुगात काय झाला होता याचा बहुदा यांना विसर पडलेला दिसतो . स्वतःच्या धर्मातल्या क्षत्रिया पेक्षा दुसऱ्या धर्मातला राजा आणि सेनापती जर का सैनिकांना अधिक महत्त्वाचा आणि विश्वास ठेवण्याजोगा वाटत असेल तर ते तुमच्या व्यवस्थेचे अपयश असते हे अपयश लक्षात न घेता पुन्हा एकदा जर का आम्ही स्वामी आहोत हा माजोरडेपणा दाखवणार असाल तर मग सैनिक तुम्हाला तुमची जागा व्यवस्थित दाखवणारच . भाडेकरू सैनिक ही संकल्पना वैष्णव धर्म प्रस्थापित झाल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढीस लागली हा काही योगायोग नाही . यातूनच मग अनेकदा युरोपियन लोक सुद्धा भाड्याने मिळालेले दिसतात . 


स्वामी समर्थ रामदास यांचे वैशिष्ट्य हे आहे की त्यांनी हा भाडोत्रीपणा कळत नकळत थांबवला आणि एक धार्मिक अधिष्ठान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी झाला नाही याचे एकमेव कारण त्यांच्या या सर्व प्रयत्नांमध्ये वर्ण जात व्यवस्था त्यांनी स्वीकारलेली होती साहजिकच बहुजन समाजाने समर्थ संप्रदायावर कधीही संपूर्णपणे विश्वास टाकलेला नाही त्यांना फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचाच विश्वास मिळालेला दिसतो कधी कधी वैश्यांचा ! 


सामर्थ्य आहे चळवळीचे 

जो जो करेल तयाचे 

परंतु तेथे भगवंताचे 

अधिष्ठान पाहिजे 


हे तत्त्वज्ञान त्यांनी सांगितले आणि हे तत्त्वज्ञान भगवंताचे अधिष्ठान मागत असल्याने धार्मिक आहे हे उघड आहे . हे भगवंताचे अधिष्ठान वर्ण जात मानणारे होते म्हणूनच पुढे गोंधळ निर्माण झाला. 


थोडक्यात काय आद्य शंकराचार्य यांनी वेदांत द्वारे स्थापन केलेल्या हिंदू धर्माचा आणखी एक वर्ण जात व्यवस्थेवर विश्वास ठेवणारा महाराष्ट्रातला आकार म्हणजे स्वामी समर्थ रामदास यांचा महाराष्ट्र धर्म होय . हा महाराष्ट्र धर्म शिवाजी महाराजांचा नाही हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे शिवाजी महाराजांचा राज्याचा जो आकार आणि प्रकार आहे तो हिंदवी आहे आणि हिंदवी स्वराज्य आहे त्यामुळे शिवाजी महाराजांचा धर्मच मानायचा असेल तर तो हिंदवी स्वराज्य धर्म मानायला हवा . यालाच मी शैव हिंदुत्व म्हणतो .


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय