शिवाजी महाराज, स्वामी रामदास, तुर्क , हिंदवी आणि वस्तुस्थिती श्रीधर तिळवे नाईक 

गेला एक आठवडा संपूर्ण महाराष्ट्र शिवाजी महाराज आणि स्वामी रामदास यांच्यात काय संबंध होता या प्रश्नाने ढवळला गेला आहे. याबाबतीत दोन्ही बाजूने केले जाणारे युक्तिवाद काही प्रमाणात पूर्वग्रह दूषित असल्याने नेमके चित्र आपल्यापुढे येत नाही . हे चित्र आपल्याला कळणे फार आवश्यक आहे .

भारताच्या इतिहासात स्वराज्य या संकल्पनेची सर्वाधिक मोठी शक्ती जर कोणी प्रथम दाखवली असेल तर ती शिवाजी महाराजांनी दाखवली. इतर कोणालाही ती दाखवण्याची तितकी गरज पडली नाही कारण तोपर्यंत जे लोक बाहेरून आले ते नंतर इथले झाले . त्यांनी भारतीय धर्मांचा स्वीकार केला कोणी बौद्ध झाला कोणी शैव झाला .( यातली मिन्यांडरची केस फेमस आहे जो मिलिंद झाला)

मात्र भारतात पहिल्यांदाच भारतात येऊन राज्य स्थापन होऊनसुद्धा भारतीय धर्म न स्वीकारणारे जर लोक कुठले असतील तर ते म्हणजे मुस्लिम होय . त्या आधी ख्रिश्चन लोक होते परंतु ते मुळातच धर्मप्रसारासाठी येत होते. त्यांचे राज्य नव्हते. मुस्लिमांचे असे नव्हते ते इथे आले आणि त्यांनी राज्य सुद्धा स्थापन केले आणि आपल्या धर्माचा प्रसार सुद्धा केला जो बाहेरून आलेला आणि जो भारतीय धर्म नव्हता म्हणजेच भारतीय नसलेल्या धर्माचे मुस्लिम राजवट हे एका अर्थाने पहिले राज्य होते आणि पुढे त्यातून साम्राज्य सुद्धा निर्माण झाले .त्यामुळेच मुस्लिमांच्या बाबतीत सर्वच गोष्टी बदलत गेल्या आणि त्यामुळे हिंदवी स्वराज्य ही संकल्पना शिवाजी महाराजांना विकसित करावी लागली हे आपण लक्षात घेतले पाहिजे. 

भारतात मध्ययुगामध्ये इस्लाम ज्यांनी स्वीकारला होता असे लोक आले आणि हे लोक प्रामुख्याने इरानियन तुर्की आणि अफगाणिस्तानी होते . महाराजांचा जो विरोध आहे तो यातील तुर्की आक्रमकांच्या बाबतीत आहे आणि त्यांनी तुर्क हा शब्द इराण तुर्कस्तान अफगाणिस्तान वगैरे प्रदेशातून आलेल्या सर्व लोकांच्यासाठी वापरलेला आहे एका अर्थाने आजच्या भाषेत सांगायचे तर सर्व आक्रमक लोकांच्यासाठी हा शब्द तुर्क म्हणून वापरण्यात आलेला आहे . हा शब्द वापरण्याचे कारण त्यांच्या काळामध्ये जे आक्रमण झाले होते ते प्रामुख्याने तुर्कस्तान मधून झालेले होते आणि मुगल वंश हा तुर्कस्तानाला प्रमाण मानत होता. मुळात हा वंश प्रत्यक्षामध्ये मात्र तुर्कस्तानमध्ये नव्हता तर तो प्रथम मंगोलिया मध्ये होता आणि म्हणूनच त्यांना मंगोल नंतर मुघल म्हटले जात होते आणि हे स्वतःला चंगेज खान चे वंशज समजत. त्यामुळेच नैसर्गिक रित्या क्रूर आणि आक्रमक होणे ही या वंशाची परंपरा होती . महाराजांच्या दृष्टीने मात्र हे सर्व तुर्क होते. या सर्व लोकांची आपापसातली भाषा ही फारसी किंवा तुर्की होती आणि त्यांनी कधीही उर्दू वगैरे भाषा वापरली नाही जसा अनेकांचा समज आहे . साहजिकच या सर्व आक्रमकांच्यासाठी महाराज मुस्लिम आक्रमक असा शब्द वापरत नव्हते तर तुर्क असा शब्द वापरत होते त्याचा अर्थ अ हिंदवी, हिंदवी नसलेले असा होता आणि त्यांच्या विरोधात शिवाजी महाराजांनी आपणाला हिंदवी स्वराज्य ही संकल्पना मांडलेली दिसते. खरे तर हिंदुत्ववाद्यांनी शिवाजी महाराजांचा शब्द विकसित करून हिंदवीवाद असा शब्द घेतला असता तर फार बरे झाले असते ( मी स्वतः जेव्हा हिंदुत्ववाद हा शब्द वापरतो तेव्हा हिंदवी वाद म्हणूनच वापरतो)

शिवाजी महाराजांच्या या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेमध्ये जे लोक आधीच मुस्लिम धर्म स्वीकारून इथे राहत होते त्यांना त्यांनी सामील करून घेतलेले होते ही वस्तुस्थिती . शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम होते ही ही वस्तुस्थिती मात्र ह्या मुसलमानांच्या पैकी जवळजवळ सर्वांचीच मुळे ही शैव-धर्मामध्ये होती आणि हे लोक खंडोबाची पूजा सुद्धा करत होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे म्हणजे एका अर्थाने हे सर्व मुस्लीम शैव होते आणि तसे असण्यामध्ये कोणाला काहीही प्रॉब्लेम नव्हता नंतर हा प्रॉब्लेम सुरू झाला जेव्हा साधारणपणे १८५० नंतर pan इस्लामिक चळवळीच्या संदर्भामध्ये काम सुरू झाले याची बीजे मुळात औरंगजेबमध्ये सुद्धा होती . किंबहुना औरंगजेब निर्माण झाला म्हणूनच मुस्लिमांच्या बद्दलच्या शंका अधिक खोलवर जायला सुरुवात झाली. बाबर असो किंवा औरंगजेब असो हे स्वतःला कधीही हिंदुस्तानी मानत नव्हते ( अकबर मात्र स्वतःला हिंदुस्थानी मानत होता)त्यांच्या स्वतःच्या लिखाणामध्ये उदाहरणार्थ बाबरच्या बाबर नामामध्ये आपणाला स्पष्ट आणि स्वच्छ पणाने बाबर आपण इथले नाही आहोत हे अधोरेखित करताना दिसतो. हे लोक जिथून आले होते तिथले लोक तिथली संस्कृती किती भारी आहे हे सांगायला विसरत नव्हते . त्यांची तुलना ही अर्थातच त्यांच्या समकालीन असणाऱ्या वैष्णव संस्कृतीशी होत होती आणि वैष्णव संस्कृती ही वर्ण जात मानत असल्याने सती वैगेरे प्रथा मानत असल्याने साहजिकच त्यातून निर्माण होणाऱ्या सर्व सांस्कृतिक गोष्टी या अडाणीपणाच्या आहेत अशी त्यांची कल्पना होती . शिवाजी महाराज वैष्णव नव्हते ते शैव होते आणि साहजिकच त्यामुळेच ते हर हर महादेव म्हणत या तुर्क आक्रमणाच्या विरोधात उभे राहू शकले अन्यथा हे शक्य झाले नसते . गोविंद पानसरे यांच्या लिखाणामध्ये जो सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे तो हा आहे की ते शिवाजी महाराजांना हिंदू समजून त्या अंगाने लिखाण करतात वास्तविक त्यांना तरी निदान हे कळायला हवे होते की शैव धर्म वेगळा वैष्णव धर्म वेगळा आणि हिंदू ही एक सांस्कृतिक संकल्पना आहे . वैष्णव धर्माने अत्यंत जाणीवपूर्वक स्वतःला हिंदू धर्म म्हणून प्रोजेक्ट करायला नंतर सुरुवात केली आणि याला जवळजवळ सर्वच मार्क्सवादी बळी पडलेले दिसतात . हिंदू धर्माचा धर्मग्रंथ म्हणून जेव्हा गीता सांगितली जाते तेव्हा ती वर्णजात व्यवस्थेचा पुरस्कार करणाऱ्या स्मृती प्रमाण मानणाऱ्या महाभारत या वैष्णव महाकाव्याच्या भाग आहे ही गोष्ट सोयीस्कर रित्या सर्वजण विसरताना दिसतात . 

प्रश्न असा आहे की ब्राह्मण आणि वैष्णव धर्मी लोकांना शिवाजी महाराज हे हिंदूधर्म राजा म्हणून प्रोजेक्ट करणे गरजेचे का वाटत गेले . तर आपण या संदर्भामध्ये जर का बारकाईने इतिहास पाहिला तर असे दिसते की ज्यांचे राज्य गेले होते ते पेशवे होते आणि ते ब्राह्मण होते . ज्याने ते घालवले तो प्रामुख्याने वैष्णव तंत्रआहारी ब्राह्मण होता . साहजिकच तंत्राबद्दल एक प्रकारचा तिटकारा निर्माण झालेला दिसतो आणि हा तिटकारा आपणाला आपण जर का लोकहितवादी वाचले तर स्पष्टपणे दिसतो . वास्तविक या तंत्राचा शैव धर्माशी काडीचाही संबंध नव्हता आणि हे तंत्र वैष्णव धर्मातून नंतर जे उद्योग तयार झाले त्यातून तयार झाले होते. 

पहिला बाजीराव हा पूर्णपणे शैव होता तर दुसरा बाजीराव हा पूर्णपणे वैष्णव होता हा दोघांच्यातला फरक आहे . यातील शिवाजी महाराज यांना त्यामुळेच मानणारा असा पहिला बाजीराव पेशवा होता आणि म्हणूनच तो मस्तानी पर्यंत जातो. तिथे प्रेम आहे त्या उलट दुसरा बाजीराव जे काही करतो त्याला रासलीला म्हणतात किंबहुना तसेच म्हटले गेले आहे . आता रासलीला ही संकल्पना वैष्णव आहे हे तर स्पष्टच आहे .

यातूनच मग अनेक गोष्टी निर्माण झाल्या आणि शेवटी त्या या थराला गेल्या की न र फाटक यासारख्या इतिहासकाराने जे स्वतः ब्राह्मण होते रामदास यांचे नाव सुद्धा या अंगाने भोगी असल्याचे प्रोजेक्ट केले . 

यातून अनेक प्रश्न निर्माण होतात की असे काय झाले की रामदासांना गुरु म्हणून दाखवणे गरजेचे बनले? वस्तुस्थिती अशी आहे की महाराजांनी आग्र्याहून परतल्यानंतर पुन्हा सर्व किल्ले ताब्यात घेईपर्यंत रामदास आणि शिवाजी महाराजांचा संबंध निर्माण झाला नव्हता . म्हणजेच शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे रामदास यांचा संपर्क येण्याआधीच कितीतरी आधीच निर्माण झाले होते .

मग शिवाजी महाराज आणि स्वामी रामदास भेटीचे चित्र निर्माण कसे झाले तर त्याला कारण मुळात रामदास यांच्या शिष्यांची काही कागदपत्रे उपलब्ध झाली त्यामध्ये आहे . केशव गोसावी नावाच्या एका शिष्याने दिवाकर गोसावी नावाच्या दुसऱ्या शिष्याला चार एप्रिल १६७२ या रोजी जे पत्र लिहिले त्यामध्ये अशी अशी भेट होणार आहे अशी शक्यता आहे अशा प्रकारचा मजकूर आहे ब्राह्मण इतिहासकारांनी जणू काय नंतर अशी भेट झाली असेच गृहीत धरायला सुरुवात केले आता त्यांनी असे गृहीत का धरायला सुरुवात केली तर त्यामागे आपणाला गोष्ट दिसते ती अशी की आपण जर का त्या काळातल्या संतांचे विशेषत: वैष्णव संतांचे लिखाण तपासले तर आपणाला असे दिसते की शिवाजी महाराजांच्या विषयी प्रत्यक्ष लिखाण जवळजवळ नाही आणि जे लिखाण नंतर घुसवण्यात आलेले आहे ते नंतरच्या काळातले आहे हे स्पष्ट होते. फक्त रामदास स्वामी यांचे लिखाण मात्र रामदास स्वामी यांनी केले आहे असे स्पष्ट दिसते हे लिखाण आता प्रचंड प्रसिद्ध आहे आणि हे योगायोगाने ३एप्रिल १६७२रोजी खुद्द रामदास स्वामी यांनी महाराजांना जे पत्र पाठवले ते आहे. आपण एका गोष्टीचे श्रेय या पत्रामध्ये रामदास स्वामी यांना द्यायला पाहिजे ते म्हणजे महाराजांच्या कार्याची नीट ओळख त्यांना झाली होती असे दिसते मात्र या पत्रामध्ये ते महाराजांची चक्क क्षमा मागत आहेत हेही दिसते आता गुरु असलेला मनुष्य राजांची क्षमा कशाला मागेल ? एक गोष्ट मात्र रामदास स्वामी यांच्या बाजूने सांगता येते ती म्हणजे जे त्या काळातल्या अनेक भल्याभल्या संतांना साधली नव्हती ती म्हणजे शिवाजी महाराजांचे आकलन! शिवाजी महाराजांची महती कळत नकळत रामदास स्वामी यांना नीट कळली होती . पुढे संभाजी महाराजांना जे पत्र रामदास स्वामी यांनी लिहिलेले आहे ते स्पष्ट आणि स्वच्छपणाने शिवाजी महाराजांनी नेमके काय केले हे समजलेल्या माणसाचे पत्र आहे महाराष्ट्र धर्म ही संकल्पना इथेच आलेली दिसते. पण हे सर्व महाराजांना यश मिळाल्यानंतर झालेले आहे. याच पत्रामध्ये रामदास स्वामी शिवाजी महाराजांचा उल्लेख क्षत्रिय कुलवंत असा करतात म्हणजेच राज्याभिषेक झाल्यानंतर हे पत्र गेलेले आहे. काही इतिहासकारांच्या मते हे पत्र शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांना उपदेश करावा म्हणून लिहिले गेलेले आहे . याचा अर्थ स्पष्ट आहे की पुन्हा एकदा चंद्रगुप्त मौर्य याने राज्य स्थापन करावे आणि मग आम्ही ब्राह्मण तिथे येतो . शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन करावे आणि मग आम्ही ब्राह्मण तिथे येतो . जिकडे सत्ता तिकडे ब्राह्मण असे हे गृहीतक आहे आणि ते गृहीतक या संबंधांच्या मध्ये दिसते . अर्थातच नंतर शिवाजी महाराजांनी समर्थांना जी जी मदत हवी आहे ती ती दिलेली दिसते तसे आदेश दिलेले दिसतात त्यामुळे या दोघांचे संबंध वाईट होते असे जे काही प्रोजेक्शन येत आहे किंवा मांडणी येत होती येत आहे ती चुकीची दिसते. काही जणांनी रामदास आदिलशहाला मदत करत होते असा अपप्रचार सुरू केलेला आहे माझा प्रश्न साधा आहे जर असा काही प्रकार झाला असता तर तो शिवाजी महाराजांना कळाला नसता का ? शेवटी रामदास स्वामी हे शिवाजीं महाराजांच्या राज्यात होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे . महाराजांनी आणि नंतर महाराजांच्या वारसदारांनी सुद्धा समर्थ संप्रदायाला मदतच केलेली दिसते त्यामुळे हे संबंध बिघडलेले होते असे सांगणे वस्तुस्थितीला धरून आहे असे वाटत नाही .

 पण मुळात एका शिष्याने दुसऱ्या शिष्याला लिहिलेले पत्र आणि त्यानंतर खुद्द रामदास स्वामी यांनी शिवाजी महाराजांना लिहिलेले पत्र यातूनच मग स्वामी रामदास हे महाराजांचे गुरु होते अशी दंतकथा उदयाला आली आणि त्याला काही प्रमाणात डाव्या लोकांनी सुद्धा हातभार लावलेला आहे . हा हातभार कसा तर संत चळवळीचा सामाजिक अभ्यास करणाऱ्या काही मार्क्सवादी आणि समाजवादी लोकांना असे वाटत होते की संतांची सामाजिक फलश्रुती जर का तपासायची असेल तर आपणाला रामदासांच्या आणि शिवाजी महाराजांच्या या संबंधातून ती फलश्रुती अस्तित्वात आली असे दाखवता येईल. ब्राह्मणवादी इतिहासकारांना मग ते डाव्या विचारसरणीचे असोत किंवा उजवे हे फार सोयीचे असल्याने त्यांनी मग हे गृहीतक अधिक पुढे नेले आणि शिवाजी महाराजांच्या कामाची पार्श्वभूमी आधीच संत लोकांनी तयार केली होती अशी मांडणी केली . प्रत्यक्षामध्ये खरोखर अशा प्रकारचा काही संबंध होता याचा कसलाही ठोस पुरावा उपलब्ध नाही कारण हे सर्व संत वैष्णव दिशेने जात होते आणि शिवाजी महाराज हे शैव दिशेने चालले होते . एकीकडे वैष्णव लोकांचा विठ्ठल हा पूर्णपणे शस्त्र नसलेला देव होता तर दुसरीकडे शिवाजी महाराज हर हर महादेव म्हणत तलवार काढत चालले होते या दोन प्रवृत्तींचे जमावे कसे ? किंबहुना माझे मतच असे आहे की संतांचा काडी इतकाही प्रभाव शिवाजी महाराजांच्या वर झाला नाही म्हणून शिवाजी महाराज शिवाजी महाराज झाले . महाराष्ट्राने नंतर विठ्ठल हा निशस्त्र असलेला देव स्वीकारला आणि त्यातूनच मग जे काय व्हायचे ते होऊ लागले मराठी लोक आपला पराक्रम विसरले आणि आज त्यामुळेच मराठी भाषा आणि मराठी भाषिक कणाहीन झालेले दिसतात. आपल्या सगळ्या राजकारणी लोकांचा त्यामुळेच आदर्श हा श्रीकृष्ण आहे .

तेव्हा आपण जर का या कालखंडाची संतांच्या कार्याची सामाजिक फलश्रुती तपासायला गेलो तर खरोखर ती अस्तित्वात आहे असे म्हणता येत नाही . आपण जर हा कालखंड तपासला तर असे दिसते की संत तुकाराम हे एकमेव संत असे आहेत की जे शिवाजी महाराजांच्या आधी आपणाला मोक्षप्राप्ती झालेले संत म्हणून दिसतात. पण जर का आपण शिवाजी महाराजांचा जन्म आणि तुकाराम महाराजांचा मृत्यू पाहिले तर काय दिसते? शिवाजी महाराजांचा जन्म 1630 साली झाला तर तुकाराम महाराजांचा मृत्यू 1650 यावर्षी झाला म्हणजे शिवाजी महाराज जेव्हा ऍक्च्युली वाढत होते तेव्हा त्यांचा तुकाराम महाराजांची काही संबंध येणे शक्यच नव्हते परंतु मग तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज यांची सुद्धा भेट झाल्याचा कसलाही पुरावा आपणाला दिसत नाही फक्त एक अभंग आहे आणि तो तुकाराम महाराजांनी लिहिला असा दावा केला जातो परंतु प्रत्यक्षामध्ये तो तसा तपासायला गेलो तर खात्री वाटत नाही . या अभंगातली भाषा खूप अर्वाचीन वाटते.

एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये फक्त वीस वर्षेच कॉमन आहेत म्हणजे शिवाजी महाराज वीस वर्षाचे असतानाच तुकाराम महाराजांचा मृत्यू झालेला आहे आणि यासंदर्भात दिसते ते असे की मुळात या कालखंडामध्ये शिवाजी महाराज स्वतःच रायरेश्वरच्या मंदिरामध्ये शपथ घेत स्वराज्य स्थापनेला सुरुवात करत होते त्यामुळे या काळामध्ये ते तुकाराम महाराजांना भेटण्याची कसलीही शक्यता नाही . पण आपल्याकडचे अनेक लोक यामध्ये चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासारखे लोक सुद्धा आहेत महाराजांची भेट त्यांच्या उत्तर काळामध्ये तुकाराम यांच्याशी झाल्याचे सांगतात दाखवतात . अनेकांना हे लक्षातच येत नाही की महाराज वीस वर्षाचे झाले तोवर संत तुकाराम यांचा मृत्यू झाला होता .

मग शिवाजी महाराजांचे गुरु कोण ? याचे निर्विवाद उत्तर जिजामाता हे आहे . मी हे खूपदा सांगितले आहे की खरे शैवधर्मिलोक सती प्रथा स्वीकारत नाहीत त्यामुळे साहजिकच जिजामाता या शहाजी महाराजांच्यानंतरसुद्धा शिवाजी महाराजांच्यासाठी मार्गदर्शक म्हणून काम करत होत्या ही वस्तुस्थिती आहे. त्यांनीच शिवाजी महाराजांची जडणघडण केली. त्यांना स्वतःला लिहिता वाचता येत होते या काळातील स्त्रीला शिकवू नये ही वैष्णव आणि ब्राह्मण परंपरा आहे. पण शैव स्त्रिया या काळामध्ये शिकत होत्या ही वस्तु स्थिती! साहजिकच हे सर्व शिक्षण शिवाजी महाराजांना खुद्द त्यांच्या आईकडूनच मिळालेले आहे पण स्त्रीला श्रेय देणे युरेशियन परंपरेच्या जीवावर येते म्हणून मग अस्तित्वात असलेल्या लोकांच्या मधून पुरुष गुरू निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला .

म्हणजेच आपणाला दिसते असे की सर्वसाधारणपणे वैष्णव धर्माचा या काळामधला एकच प्रयत्न सतत सुरू झालेला आहे आणि तो म्हणजे काहीही करून शिवाजी महाराजांचे वैष्णवीकरण करणे . यातूनच मग वैष्णव संत किंवा रामदास हे वैष्णव गोसावी महाराजांचे गुरु होते असे दाखवण्याचा प्रघात सुरू करण्यात आला कारण अशा प्रकारची पहिली सहिता ही संत रामदास यांनी लिहिलेली आहे .

आता यासंदर्भात सुद्धा भेट झाली असे दिसत नाही. म्हणजेच भेट होणार आहे असे पत्र आहे परंतु भेट झाली अशा अंगाने मात्र काहीही कागदपत्र उपलब्ध नाही दुसरी गोष्ट शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला एकदा सुद्धा संत रामदास हे महाराजांच्यासाठी ते क्षत्रिय आहेत म्हणून उभे ठाकलेले दिसत नाही . वास्तविक शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रामदास स्वामी किंवा समर्थ संप्रदायातील ब्राह्मण करू शकले असते परंतु असा राज्याभिषेक या लोकांनी केला नाही हीच एक परखड वस्तुस्थिती आहे त्यातून अनेक गंभीर प्रश्न निर्माण होतात जर का १६७४ हे वर्ष आपण राज्याभिषेक वर्ष म्हणून स्वीकारले आणि या पत्राचे वर्ष १६७२ म्हणून स्वीकारले तर या पहिल्या पत्रामध्ये क्षत्रिय कुळवंत अशी मान्यता रामदास स्वामी यांनी दिलेली नाही. मात्र राज्याभिषेक झाल्यानंतर संभाजी महाराजांना जे पत्र लिहिलेले आहे त्यामध्ये मात्र संत रामदास शिवाजी महाराजांचा उल्लेख क्षत्रिय कुलावंत असा करतात म्हणजेच काशी कडून मान्यता आल्यानंतर गागाभट्टाने राज्याभिषेक केल्यानंतर महाराज क्षत्रिय कुळवंत झालेले आहेत तोवर नाही . यातून प्रश्न निर्माण होतो की हे लोक राज्याभिषेक करण्यासाठी पुढे का आले नाहीत की इतर कोणी ती मान्यता द्यावी म्हणून हे लोक वाट बघत बसले? माझा प्रश्न असा की तुम्हाला काशीकडून मान्यता का लागते ? कळत नकळत उत्तरिकरणाची दुसरी सुरुवात महाराजांच्या राज्याभिषेकापासून होते( पहिली सुरुवात यादव काळ आहे ) उत्तरेची सत्ता कळत नकळत इथे स्वीकारली गेली .

मात्र एकदा राज्याभिषेक झाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी बदलत गेलेल्या आहेत. मुळातच रामदास महाराजांनी जे काही लिहिलेले आहे त्यामध्ये "हृदय स्थान झाला नारायण" असे म्हणून वैष्णवीकरणाची प्रक्रिया सुरू केलेली दिसते . म्हणजेच महाराजांना नारायणाचा अवतार करण्याची सुरुवात इथेच झालेली आहे. हे मान्यता मिळाल्यानंतर लिहिलेले आहे म्हणूनच त्यांच्या लिखाणांमध्ये जो शिवाजी महाराजांचा उल्लेख आहे तो ते क्षत्रिय कुळवंत म्हणून ब्राह्मण लोकांनी मान्य केल्यानंतर झालेला उल्लेख आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की हे जे काही लिखाण आहे ते शिवाजी महाराजांचे राज्य पूर्णपणे प्रस्थापित झाल्यानंतर आहे मग शिवाजी महाराजांचे रामदास गुरु होण्याचा प्रश्न येतोच कुठून ? 

मग शक्यता काय उरते तर आपणाला अशी गोष्ट दिसते की शिवाजी महाराज हे कट्टर शैव असल्यामुळे त्यांनी सर्वधर्मसमभाव स्वीकारला होता .साहजिकच या धोरणानुसार त्यांनी त्यांच्या काळामध्ये असलेल्या सर्व धर्मांना उदार आश्रय दिलेला दिसतो आणि त्याचबरोबर सर्व धर्माच्या संत लोकांना धर्मपुरुष धर्म स्त्री असणाऱ्या लोकांना राज्याच्या वतीने करण्याची जी एक कर्तव्ये असतात ती कर्तव्ये पार पाडलेली दिसतात . या संदर्भात जे लिखाण उपलब्ध आहे ते लिखाण कोणत्याही अर्थाने रामदास गुरु होते हे दर्शवत नाही. मात्र समर्थ संप्रदायाचे शिवाजी महाराजांशी आणि नंतर संभाजी महाराजांशी असलेले संबंध चांगले होते असे दिसते .

महाराजांनी जितकी काळजी शैव मंदिरांची घेतलेली आहे तितकीच काळजी या काळामध्ये वैष्णव मंदिरांची सुद्धा घेतलेली दिसते अर्थातच त्यांचा मूलधर्म शैव धर्म होता त्यामुळे साहजिकच शैव मंदिरांच्याकडे त्यांचे जास्त लक्ष आहे . महाराजांनी राज्याभिषेक वैदिक पद्धतीने करून घेतल्यामुळे ते वैदिक झाले असा गृहीतकाचा प्रकार हिंदुत्ववाद्यांनी अवलंबलेला आहे . आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शिवाजी महाराजांचे २ राज्याभिषेक शैव पद्धतीने जसे झाले तसाच एक वैदिक पद्धतीने झाला . भारतातल्या शैव श्रुती आणि वैदिक श्रुती या दोन्ही श्रुतींचा त्यांनी मान ठेवला ही वस्तुस्थिती आहे आपल्याकडे आता ही वस्तुस्थिती नाकारण्याकडे सुद्धा काही लोक चाललेले आहेत ते बरोबर नव्हे .महाराजांचा वैदिक राज्याभिषेक झाला हे आपण स्वीकारले पाहिजे मात्र त्यासाठी म्हंटले गेलेले मंत्र नेमके कोणते होते या संदर्भातला तपशील अजूनही उपलब्ध नाही. हे मंत्र वैदिक होते की पुराणोक्त होते हा आज सुद्धा इतिहासकारांच्या पुढचा फार मोठा प्रश्न आहे. शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणामध्ये जी काही वस्तुस्थिती पुढे येते त्यामध्ये एक वाद स्पष्ट दिसतो तो म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक वेळी वेदोक्त मंत्र म्हटले गेले होते की पुराणोक्त? कारण यामध्ये ब्राह्मणांच्यात दुफळी पडलेली स्पष्ट दिसते. किंबहुना या काळात यावेळी पुराणोक्त मंत्र म्हटले गेले म्हणूनच शाहू महाराजांना अधिकार नाही असा stance घेणारे ब्राह्मण होते आणि म्हणूनच वेदोक्त प्रकरण घडले अनेकदा ही गोष्ट बाजूला केली जाते 

मात्र हे सर्व मंत्र संस्कृत भाषेत म्हंटले गेले होते हे मान्य करावे लागते आणि साहजिकच त्यामुळे जर का शिवाजी महाराजांच्या बद्दल सर्व सनातन कर्मठ ब्राह्मणांना सुद्धा आस्था निर्माण झाली असेल तर ते आपण समजून घेतले पाहिजे. शिवाजी महाराज हे एका अर्थाने सर्वांचे होते आणि मुळातच शैव परंपरेमध्ये हे असेच असले पाहिजे . भारतामध्ये जन्मलेल्या प्रत्येक धर्माला आपण नीट वागवावे तेच बरे बाहेरून आलेल्या धर्माचा स्वीकार करणाऱ्या लोकांना आपण धर्मांतर करून आपल्या धर्मात आणावे ही सुद्धा शैव पॉलिसी आहे आणि महाराजांनी ती सुद्धा अवलंबलेली दिसते . नेताजी पालकर यांचे उदाहरण यासंदर्भात प्रसिद्ध आहे. म्हणजेच एका बाजूला शिवाजी महाराज मुस्लिम धर्माचा आदर ठेवत आहेत त्यांच्या धर्मग्रंथाचा आदर ठेवत आहेत आणि त्याचबरोबर शैव-धर्म कसा वाढवता येईल तेही पाहत आहेत . महाराज तुळजाभवानीचे भक्त होते ही वस्तुस्थिती त्याचबरोबर त्यांच्या पत्राच्या आरंभाला श्री शंकर प्रसन्न असेच होते ही ही वस्तुस्थिती मग ही वस्तुस्थिती नाकारत वैष्णव लोकांना नेमके काय साधायचे असते ? महाराजांच्या कडून लिहिल्या गेलेल्या पत्रांच्या मध्ये आपणाला विठ्ठलाचा उल्लेख शोधावा लागतो इतका तो दुर्मिळ आहे . वस्तुस्थिती अशी आहे की ज्याला आज आपण वारकरी संप्रदाय म्हणतो हा वारकरी संप्रदाय तुकारामांच्या नंतरच संप्रदाय म्हणून भरभराटीला आणला गेला आणि तो तसा का आणला गेला हे स्पष्ट आहे नानासाहेब पेशवे जेव्हा प्रथम वैष्णव झाले तेव्हापासून हा संप्रदाय वाढीला लागला आणि या संप्रदायांमध्ये वर्ण जात व्यवस्था स्वीकारण्यात आली हीच वस्तुस्थिती आहे म्हणजेच महाराजांनी ज्या वर्ण जात व्यवस्थेला नकार दिला त्या व्यवस्थेला नानासाहेब पेशवे यांच्यापासून पेशव्यांनी मान्यता दिली एका अर्थाने हा शिवद्रोह आहे . अर्थातच हा वैष्णव धर्म स्वीकारण्यात आल्यानंतर साहजिकच मग शैव असलेल्या होळकर यांना जितका ताप देता येईल तितका ताप द्यायला सुरुवात झाली . होळकर बलाढ्य होते म्हणून टिकले . पण शेवटी इंग्रजांशी युती करून होळकरांना हरवण्याचा प्रकार केला गेला . माधवराव पेशवे यांच्याच काळात विठ्ठलाच्या मंदिराच्या चाव्या आणि मालकी ज्यांच्याकडे होती त्या कोळी समाजाच्या पुरोहितांना काढून टाकण्यात आले आणि तिथे ब्राह्मण पुरोहित आणले गेले . याच काळामध्ये आपणाला अस्पृश्यांना विठ्ठल मंदिरात प्रवेश करण्याला मनाई करण्यात आलेली दिसते म्हणजे त्या प्रथेचे पुनर्जीवन झालेले दिसते ( चोखामेळा हा मंदिरात प्रवेश न मिळालेला अस्पृश्य संत होता हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि हे यादवकाळाच्या वेळी घडलेले आहे)एकेकाळी यादवांच्या उत्तर काळामध्ये हे झाले होते माधवराव पेशवे यांच्या काळामध्ये हे पुन्हा एकदा सर्व पुनर्जीवित झालेले दिसते . पेशवाई नष्ट झाली त्याबद्दल महात्मा फुले यांनी उगाच आनंद व्यक्त केला नव्हता. 

प्रश्न असा आहे की हा प्रचार नेमका खोलवर पोहोचला का तर त्याचे उत्तर हो असे आहे आणि त्यामुळेच आपण जर का महात्मा फुले यांच्या काळामध्ये आलो तर मात्र रामदास हा शिवाजी महाराजांचा गुरु होता ही दंतकथा खुद्द महात्मा फुले यांनी स्वीकारलेली आहे असे त्यांच्या लिखाणावरून स्पष्ट होते त्यामुळेच महात्मा फुले रामदासांच्या बद्दल त्यांनी ब्राह्मणी कसब पणाला लावून शिवाजी महाराजांना स्वतःच्या अंकित केले अशा प्रकारची मांडणी करताना दिसतात . याचा अर्थ स्पष्ट आहे १८५० नंतर हळूहळू रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु होते ही दंतकथा हळूहळू स्वीकारण्यात आली आणि खुद्द महात्मा फुले या दंतकथेच्या प्रभावाखाली आलेले दिसतात 

विसाव्या शतकात या दंतकथेला एका ब्राह्मणानेच आव्हान दिले त्याचे नाव न र फाटक! त्यांनी विविध नयांना विस्तार ज्ञान  विस्तार या मासिका मध्ये एक मोठा लेख लिहून स्वामी रामदास शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते अशी मांडणी पुन्हा केली . साहजिकच 1960 नंतर बहुजन समाजातून जे इतिहासकार आले त्यांनी आणखी काही पुरावे शोधून स्वामी समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांची  यांचे गुरु नव्हते हे अधिक प्रवाहीपणाने प्रभावीपणे मांडले . काँग्रेसमधल्या अनेक फुले आणि आंबेडकरवादी असणाऱ्या ुढार्‍यांनी याला खतपाणी घातले काही वर्षांपूर्वी पर्यंत खुद्द शरद पवार यांनी सुद्धा रामदास हे गुरु होते ही मांडणी मान्य केली होती मात्र आता ते पुन्हा एकदा बाजू बदलताना दिसतात हे मांडणे का स्वीकारली गेली ही मांडणी का स्वीकारली गेली याचे कारण खुद्द शिवाजी महाराजांची पॉलिसी अशी होती की ब्राह्मणांना सोबत घेऊन जावे आणि राज्य करण्यासाठी त्यांच्या प्रतिभेचा वापर करावा . यशवंतराव चव्हाण यांनी हे केले होते आणि पुढे शरद पवार यांनी केले . मात्र जे ब्राह्मणे तर इतिहासकार होते उदाहरणार्थ जयसिंगराव पवार त्यांनी मात्र सातत्याने एक मांडणी लावून धरली.

1980 नंतर मात्र मुस्लिम धर्माबाबतच एकंदर सर्व हिंदु लोकांची मानसिकता बदलत गेली आणि हिंदुत्वाचा प्रभाव वाढत गेला साहजिकच मग एक नवे ब्राह्मणी हिंदुत्व जे उदयाला आले त्याने पुन्हा एकदा रामदास गुरु होते अशी मांडणी करायला सुरुवात केली ज्याच्यामुळे आता हे सर्व निर्माण झाले आहे अन्यथा हा वाद निर्माण झालाच नसत पण उत्तरेतल्या एका ब्राह्मण शहाण्याने हा वाद निर्माण केला 

 याबाबतीत ब्राह्मण लोकांच्या स्पष्टपणे दोन तट दिसतात जो सनातन कर्मठ आहे तो नेहमीच रामदास हे कसे गुरु आहे हे सांगत असतो आणि अलीकडचे पुरोगामी ब्राह्मण मात्र इतिहास प्रमाण मानत ही गोष्ट नाकारत असतात .

प्रश्न असा आहे की मग आता आपण निष्कर्ष काय काढायचा माझे स्वतःचे मत असे आहे की जे काही पुरावे दिसत आहेत त्यावरून स्पष्ट दिसते की स्वामी समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते मात्र शिवाजी महाराजांचे राजकीय कर्तृत्व नेमकेपणाने ओळखणारे जे काही मोजक लोक त्यांच्या काळामध्ये होऊन गेले त्यामध्ये समर्थ रामदास एक होते . एका अर्थाने शिवाजी महाराजांचे कर्तुत्व ओळखण्याचे कर्तुत्व स्वामी रामदास स्वामी यांनी दाखवले हे आपण मान्य केले पाहिजे . यासाठी त्यांना आदर दिला पाहिजे पण त्याचबरोबर हेही खरे की ते जो धर्म मांडत होते तो धर्म ब्राह्मण धर्म होता आणि त्याचा वर्ण जात व्यवस्थेवर विश्वास होता . त्यामुळेच त्यांच्या ब्राह्मण धर्माला आपण विरोधच केला पाहिजे पण त्याचबरोबर मराठीमध्ये व्यवहार वाद मांडणारे जे काही मोजके दोन संत झाले म्हणजे तुकाराम आणि रामदास यांच्यापैकी ते एक होते. मात्र रामदास यांचा सर्व व्यवहार वाद हा वर्ण जात प्रमाण मानत असल्याने तो स्वीकारता येत नाही त्यातील काही गोष्टींचा थोडा विचार करता येतो.

आता समजा जर का ब्राह्मण धर्माने आणि ब्राह्मण लोकांनी शिवाजी महाराजांना क्षत्रिय कुलावंत म्हणून मान्यता दिली नसती तर मग रामदास महाराजांनी त्यांना एवढी मोठी दाद दिली असती का त्यांचे हे कर्तृत्व इतक्या मोकळेपणाने मान्य केले असते का तर या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे म्हणजे असे की त्यांनी त्यांचे कर्तृत्व मान्य केले असते परंतु ज्या प्रकारचा त्यांचा वर्ण व्यवस्थेवर विश्वास आहे आणि ज्या प्रकारची त्यांची त्यासंदर्भातील मानसिकता आहे ते लक्षात घेता ज्या मोठ्या प्रमाणात त्यांनी त्यांची स्तुती केलेली आहे ती स्तुती स्वामी रामदासांनी केली नसती कारण शेवटी मग त्यांच्या दृष्टीने महाराज म्हणजे महात्मा फुले यांच्या भाषेत सांगायचे तर कुळवाडी भूषणच राहिले असते . 

थोडक्यात काय शिवाजी महाराजांचे कर्तुत्व ओळखण्याचे कर्तुत्व स्वामी समर्थ रामदास यांनी दाखवल्यामुळे आपण त्यांना आदर दाखवावा त्याचबरोबर त्यांनी काही ठिकाणी जो व्यवहारिक उपदेश केलेला आहे त्यातला व्यक्तिगत पद्धतीचा उपदेश विचार करायला घ्यावा मात्र त्यांनी जो वर्ण जात स्वीकारणारा ब्राह्मण धर्म स्वीकारला आहे तो मात्र आपण स्पष्टपणे नाकारावा .

आपण मग एक बाजू म्हणू शकतो की त्यांना त्यांच्या काळाची मर्यादा पडली होती पण मग याचबरोबर प्रश्न असा निर्माण होतो की हीच मर्यादा त्या काळामध्ये निर्माण होऊन सुद्धा शिवाजी महाराज यांना का पडली नाही ? तर या प्रश्नाचे उत्तर कारण शिवाजी महाराज हे शैव-धर्माचे पालन करणारे राजे होते असे आहे . शिवाजी महाराज यांची गुरु जिजामाता होती आणि जिजामातांनीच त्यांना शैवधर्म दिला होता आणि या शैव धर्मामुळेच अशा प्रकारची कोणतीही मर्यादा शिवाजी महाराजांना पडली नाही उलट त्यांनी शैव राजवट कशी असावी याचा आदर्श निर्माण केला .

श्रीधर तिळवे नाईक 

शिवाजी महाराज स्वामी रामदास तुर्क हिंदवी आणि वस्तुस्थिती भाग तीन श्रीधर तिळवे नाईक 

आपण मागील दोन भागात शिवाजी महाराज आणि स्वामी रामदास यांच्या संबंधविषयी काही निष्कर्ष काढले . सर्वसाधारणपणे हा निष्कर्ष काढणारे लोक एक गोष्ट गृहीत धरतात ती म्हणजे शिवाजी महाराज हे भक्त होते ते भाव मार्गी भावतंत्री होते प्रत्यक्षात हे सत्य आहे का ?

सर्वसाधारणपणे महाराजांचा आयुष्य क्रम बघितला तर आपणाला एक गोष्ट स्पष्ट दिसते ती म्हणजे ते क्रिया तंत्रांच्या अंगाने जातात अगदी समर्थ रामदास यांनी सुद्धा त्यांना भक्त म्हटलेले नाही तर श्रीमंत योगी म्हटलेले आहे. एकीकडे राजकीय ऐश्वर्य आहे आणि दुसरीकडे तरीही वैष्णव भाषेत योगी म्हणजे ज्ञान योगी ,भक्ती योगी वगैरे ते कर्मयोगी आहेत आणि श्रीमंत योगी आहेत महाराजांच्याकडे स्वामी रामदास यांचा बघण्याचा हा दृष्टिकोन मला फार योग्य वाटतो चुकून जरी रामदासांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख भक्त असा केला असता तर कदाचित प्रॉब्लेम झाला असता याचा अर्थ ते बिलकुल भक्त नव्हते असाही नाही ते तुळजाभवानीचे दर्शन घेत होते परंतु मागताना नेहमीच क्रिया योगी मागणे असायचे . पण यामुळेच एक गोष्ट अशी झाली की समर्थ संप्रदायाशी जास्त पटले गेले याचे कारण हा संप्रदाय कळत नकळत मारुतीची उपासना म्हणजेच बलाची उपासना करायला सांगत होता आणि मारुती हा स्वतः कर्मयोगी असल्याने कळत नकळत कर्मयोगाचा पुरस्कार होत होता . खुद्द राम हा शिवभक्त होता आणि या काळात सुद्धा सर्व शैव लोकांची रामाकडे बघण्याची नजर एक कर्मयोगी जो शिवाचा भक्त होता अशीच होती. रामायणातला वैदिक विष्णूचा अवतार हा नंतर अधिकाधिक प्रचलित करण्यात आला . विशेषतः ब्रिटिश काळात हा प्रसार जास्त झाला पुढे लोकमान्य टिळकांनी आश्चर्यकारकरीत्या राम स्वीकारण्याऐवजी श्रीकृष्णाच्या गीतेचा स्वीकार केला आणि याला कारण कळत नकळत शिवाजी महाराज होते कारण शिवाजी महाराज कर्मयोगी क्रिया तंत्री होते . आणि खुद्द लोकमान्य टिळक यांना सुद्धा कर्मयोगीच व्हायचे होते किंबहुना स्वातंत्र्य चळवळीमध्ये जवळजवळ सर्वच नेत्यांना कर्मयोगी व्हायचे होते शिवाजी महाराजांचे जे पुनरागमन या काळामध्ये झालेले आहे ते या कर्मयोगी प्रतिमेमुळे हे आपण लक्षात घेतले पाहिजे ते भक्त होते म्हणून हे पुनरागमन झालेले नाही. काँग्रेसच्या पुढे आर्यांनी पुढाऱ्यांनी ही जी शिवाजी महाराजांची कर्मयोगी प्रतिमा तयार केली त्याला छेद देण्यासाठी म्हणूनच ब्राह्मणी हिंदुत्व हे नेहमीच शिवाजी महाराजांनाच दैवत करायला बघते आणि त्यांच्या आधारे पुन्हा शिवभक्त वाढवायला बघते हा शिवभक्त भगवान शंकरांचा भक्त नसतो किंवा भगवान शिव यांचाही भक्त नसतो तो फक्त शिवाजी महाराजांचा भक्त असतो आणि त्याला हे कधीच सांगितले जात नाही की शिवाजी महाराज हे शैव होते त्याला वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न होतो की ते वैदिक होते आणि त्यांनी वैदिक धर्माचा कैवार घेतला त्याचे संरक्षण केले.

या ब्रिटिश काळामध्येच आपण जर का नीट पाहिले तर संत रामदास हे जास्त प्रभावीपणे ब्राह्मण लोकांच्यात लोकप्रिय होताना दिसतात कारण तेच एक असे ब्राह्मण संत होते जे शिवाजी महाराजांची संबंधित असणे दाखवणे सोपे होते . यामध्ये काँग्रेस मधले ब्राह्मण होते. न्यायमूर्ती रानडे यांनी संतांची सामाजिक फलश्रुती मांडताना कायमच भक्तिचा कैवार घेतला याचे कारण रानडे स्वतः ज्ञानाचा कितीही गवगवा करत असले तरी ते स्वतः भक्ती भावतंत्री होते .

प्रश्न असा आहे की भक्ती अचानक अशी प्रभावी का झाली आणि या भक्तीमुळे महाराष्ट्राचे इतके पतन का झाले? 

सर्वसाधारणपणे आपणाला या काळातले सगळे हिंदू इतिहासकार बघितले जे मूलतः स्वभावाने वैष्णव आहेत कायमच भक्तिमार्गाचा पुरस्कार करताना दिसतात आणि वारकरी संप्रदाय केंद्रस्थानी आणण्याची धडपड करत असतात मात्र या लोकांचा याबाबतीत झालेला नाईलाज असा आहे की भाव तंत्र हे प्रथम चळवळ म्हणून तमिळमध्ये अवतरले आणि हे या लोकांना माहिती होते आणि आहे . इतकेच नाही तर ते प्रथम शैव धर्मामध्ये आले हेही माहिती आहे . सर्वसाधारणपणे तमिळ मधील नयनाऱ्यांच्यापासून ही भक्ती चळवळ सुरू झाली असे मानले जाते तिथून मग ती कर्नाटक आणि आंध्र आणि पुढे महाराष्ट्र असा हा प्रवाह दिसतो . हा प्रवाह राजकारणामध्ये प्रभावी होण्याचा काळ दहाव्या शतकातच सुरू होतो पण वैष्णवांच्या अंगाने तो प्रभावी उत्तर यादवांच्या पासून होतो मूळचा शैव असलेला हा वंश अचानक वैष्णव होतो आणि स्वतःच्या शेवटच्या 33 वर्षात स्वतःला यादव समजतो आणि पुढे मुस्लिम लोकांच्याकडून पराभूत होतो . साहजिकच नेमक्या याच काळामध्ये ज्ञानदेव भावार्थदीपिका लिहितात आणि भक्तिमार्गाचा पुरस्कार करतात. या भक्तिमार्गाचे वैशिष्ट्य असे असते की ती वर्ण जात व्यवस्थेचा पुरस्कार करत असते याउलट चक्रधरांचा महानुभव पंथ हा वर्ण जात नाकारतो तर यादवांच्या काळापासूनच त्याची पीछेहाट झालेली दिसते याचे उघड कारण म्हणजे वर्ण जातीला महानुभव पंथाचा असलेला विरोध ! हा विरोध इतका तीव्र होता की हळूहळू महानुभव संप्रदायाला स्वतःचे अस्तित्व शाबूत ठेवण्यासाठी गूढ लिपी, सांकेतिक लिपी यांचा आश्रय घ्यावा लागला आणि याचा एक दुष्परिणाम असा झाला की हा संप्रदाय वैष्णव असून सुद्धा लोकांच्या पासून तुटत गेला त्याउलट वर्ण जात व्यवस्थेचे समर्थन करणारा वारकरी संप्रदाय मात्र सर्वांना सोयीचा होता विशेषता महाराष्ट्रातील ब्राह्मण आणि क्षत्रिया यांच्यासाठी तो फार सोयीचा होता कारण तो या दोघांनाही उच्च स्थान देत होता . त्यामुळे पद्धतशीरपणे यादवांच्या काळापासूनच मुख्य म्हणजे ब्राह्मण आणि क्षत्रिय यांनी तो स्पॉन्सर करायला सुरुवात केली .

या काळामध्ये जर का आपण शैव धर्म पाहिला तर तो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तंत्र आणि तंत्रातून येणाऱ्या अनेक वामाचारांना शरण गेलेला दिसतो आणि याचा प्रचंड फायदा वारकरी संप्रदायाला झालेला दिसतो .

हा काळ इस्लाम मुळे पूर्णपणे भक्तीचा असल्याने आणि इस्लाम फक्त इबादतच मानत असल्याने साहजिकच शासन पुरस्कृत मार्ग म्हणून भक्ती मार्ग हा शासकीय झाला . ही एका अर्थाने इस्लामची इबादत आणि वैष्णवांची भक्ती यांची युती होती

त्या उलट नाथ संप्रदाय हा योग संप्रदाय असल्याने आणि योग संप्रदायाच्या संदर्भात इस्लामचा कसलाही पाठिंबा नसल्याने शासनाकडून हा धर्म वारंवार फेटाळला गेला . त्यामुळेच या मुस्लिम शासकांची कृपादृष्टी आपल्यावर असावी असे सर्वच वैष्णव संतांना वाटलेले दिसते याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही त्यामुळेच आपणाला संत तुकाराम आणि संत रामदास या दोघांनीही अल्लावर अभंग रचलेले दिसतात. 

या काळामध्ये ज्ञानदेवांचा ज्ञानदेवी म्हणजेच अलीकडे ज्ञानेश्वरी आणि एकनाथांचे भागवत हे दोन्ही वैष्णवग्रंथ ज्यामध्ये भक्ती शिवाय काहीच नव्हते प्रचंड लोकप्रिय होताना दिसतात आणि कळत नकळत ते या वारकरी संप्रदायाचे धर्मग्रंथ बनताना दिसतात. त्याचबरोबर याच काळात रामायण आणि महाभारताची अनेक मराठी रूपे अनेक पंडित कवींनी दरबारामध्ये सादर केलेली दिसतात. या काळातले सर्वात मोठे महानुभव पंथाचे दुर्दैव असे होते की बहुतेक जण पंडित होते आणि साहजिकच त्यांचे पांडित्य नको तितके या पंथामध्ये घुसलेले दिसते. वारकरी संप्रदायामध्ये आपण लोकांप्रती लिहितो ही जाणीव होती पण महानुभव पंथी यांना ही लोकांप्रती जाणीव फारशी उरलेली दिसत नाही महानुभव पंथामध्ये गुरुचे प्रचंड स्त्रोम होते तर वारकरी संप्रदायांमध्ये गुरूंचे प्रचंड स्तोम नव्हते . संत तुकाराम यांच्या भाषेत सांगायचे तर 

मेघवृष्टीने करावा उपदेश 

गुरुने करू नये शिष्य 

अशी धारणा होती पण त्याचबरोबर कर्मयोगाला साजेशी जी काही कर्मकांडे होती त्याला सुद्धा तिलांजली दिली गेली उदाहरणार्थ रथ ओढणे, खेटी घालणे. तलवारी नाचवणे मुळात विठ्ठल हाच नि:शस्त्र देव असल्याने हे सर्व काही आपोआपच बाजूला झाले किंबहुना मुस्लिम बादशहांना खुश करणे मुस्लिम राजांना खुश करणे त्यासाठी हे शस्त्र उपचार पूर्ण पणे धार्मिक उपचारांच्या मधून बाजूला काढले गेले याचा एक परिणाम असा झाला की कळत नकळत एक बौद्ध परिणाम संपूर्ण अहिंसात्मक होत वारकरी चळवळीवर आणि हळूहळू मराठीतील समाज मानसावर पसरत गेला. 

या वारकरी संप्रदायाला वर्ण जात टिकवायची होते बेटी बंदी टिकवायची होती. त्यामुळे शक्ती तंत्राचा शिरकाव अजिबात होऊ नये म्हणून साहजिकच मधुराभक्ती टाळण्यात आली सर्व प्रकारचे तंत्र आचार टाळण्यात आले यांच्या विरोधात अपप्रचार करण्यात आला ब्रह्मचर्याचा पुरस्कार करण्यात आला . हे सर्व तंत्र टाळण्यासाठी आणि त्याद्वारे वर्ण जात व्यवस्था टिकवण्यासाठी करण्यात आले होते सर्वसाधारणपणे आपणाला असे दिसते की त्यामुळेच एकतर विठ्ठलाला मित्र मानावा म्हणजे सखा मानावा किंवा पाठीराखा मानावा किंवा माऊली म्हणावे. विठ्ठलाला कधीही प्रियकर मानले गेलेले नाही. त्यामुळे तंत्रातला वामाचार भक्तीमध्ये शिरू नये अशी ही घेतलेली काळजी आहे त्यामुळे सेक्सबाबत सोवळे पणा आला . तो येणे आवश्यक होते कारण वर्ण आणि जात मोडायची नाही तर वर्ण जात व्यवस्था टिकवायची आणि ही व्यवस्था जर टिकवायची असेल तर तंत्र अजिबात सामाजिक जीवनात येता कामा नये मधुरा भक्ती वगैरे येता कामा नये अशी काळजी घेणे आवश्यक आहे अशी या मागची धारणा होती . त्यामुळेच या काळामध्ये आंतरजातीय विवाह फारसे झालेले नाहीत. अगदी संत तुकाराम यांनी सुद्धा ते एवढे बंडखोर असून सुद्धा आपल्या एकाही मुलाचा किंवा मुलीचा विवाह जाती बाहेर केलेला नाही .

याबाबतीत जर का तुम्ही आजच्या गर्भाचा वारकऱ्यांच्या वारीशी तुलना केली तर तुम्हाला असे लक्षात येईल की या दांडियामध्ये खूप प्रकारचा लैंगिक आचार घडतो पण वारकरी संप्रदायाच्या वारीमध्ये असे घडत नाही याचे एकमेव कारण त्याला असलेली मनाई आहे . विषमता टिकवण्यासाठी अशा प्रकारची मनाई आवश्यक आहे.

त्यामुळे हे जे समतेचे वगैरे धडे दिले वगैरे सांगितले जाते ते सर्व काही खोटे आहे तो अपप्रचार आहे वैष्णव संत चळवळीमध्ये वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही प्रकारची सामाजिक समतेची रचना आणि त्या अंगाने चळवळ अस्तित्वात नव्हती आणि आजही नाही. फक्त मोक्षाबाबत समता आहे आणि मोक्षा बाबतीतली समता सामाजिक नसते. त्यामुळेच प्रत्यक्षात चोखामेळाला विठ्ठल मंदिरात प्रवेश देण्यात आलेला नाही त्यामुळे ती धार्मिक समतासुद्धा शंकास्पद आहे नंतर तुकारामाला जी अभंग बुडवण्याची वही बुडवण्याची शिक्षा झालेली आहे त्यामुळे सुद्धा खरोखर नेमकी स्थिती काय होती ते तपासले पाहिजे. जर समाजामध्ये समता होती तर मग संत तुकाराम यांना अभंग बुडवण्याची शिक्षा कशी काय दिली गेली ? हे धर्म मार्तंड एवढे कसे काय प्रभावी झाले ? 

प्रश्न असा आहे की या काळामध्ये खंडोबा लोकप्रिय नव्हता का? होता. तुळजाभवानी लोकप्रिय नव्हती का तर होती अन्यथा शिवाजी महाराजांच्या शैव-धर्माला वावच मिळाला नसता मात्र ज्या प्रकारचे व प्रतिभेचे कवी संत वाङ्मयांमधून पुढे आले त्या प्रकारचे कवी शैव भक्तीतून महाराष्ट्रात निर्माण झाले नाहीत हे असे का घडले याचे उत्तर यादवांच्या राजवटीत आहे आणि नंतर आलेल्या मुस्लिम राजवटीत आहे. कर्नाटकामध्ये लिंगायत धर्मामध्ये किंवा तमिळमध्ये नयनार संतांच्या भक्ती चळवळीमध्ये अनेक शैव कवी निर्माण होतात परंतु महाराष्ट्राची मुख्य परंपरा शैव असून सुद्धा या कालखंडामध्ये प्रचंड ताकतीचे शैव कवी मात्र निर्माण होताना दिसत नाहीत हे खरोखर आश्चर्यकारक आहे महाराष्ट्र हा कळत नकळत या काळातच वैष्णव झालेला होता त्याचा हा फार मोठा पुरावा आहे अर्थातच हे संपूर्ण वैष्णवीकरण महाराजांच्या मुळे टिकले नाही आणि लोक पुन्हा एकदा शैव-धर्माकडे वळले याचा एक परिणाम असा झाला की तुकारामानंतर आणि बहिणाबाईंच्या नंतर तुकाराम किंवा एकनाथ किंवा नामदेव यांच्या तोडीचा एकही कवी वैष्णव धर्मातून आलेला दिसत नाही कारण वैष्णव धर्माला मुळात तितकासा पाठिंबा मिळालेला नाही राम कृष्ण हरी ऐवजी हर हर महादेव पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलेले आहे पुढे मग पेशव्यांच्या काळामध्ये शक्यता निर्माण झाली होती परंतु इंग्रज आले आणि ही शक्यता खूप कमी झाली मुख्य म्हणजे वेदांताचा प्रभाव पुन्हा एकदा वाढत गेला 

याचा अर्थ स्पष्ट आहे शिवाजी महाराज आल्यामुळे संतांच्या चळवळीचा अस्त होत गेला. थोडक्यात काय संतांच्या चळवळीमुळे शिवाजी महाराज निर्माण झाले नाहीत तर शिवाजी महाराज निर्माण झाल्यामुळे या संतांच्या वारकरी संप्रदायाची वर्ण जात व्यवस्था टिकवणारी चळवळ हळूहळू क्षीण होत शेवटाकडे सरकत गेली . आणि म्हणूनच शिवाजी महाराज आज सुद्धा सनातनी कर्मठ ब्राह्मण लोकांना किंवा त्यांच्यासोबत असणाऱ्या अनेक लोकांना स्वतःचे शत्रू वाटतात .

श्रीधर तिळवे नाईक 


Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय