शिव्या देण्याचे प्रकरण , सन्मान आणि वर्ण जातीव्यवस्था श्रीधर तिळवे नाईक 

सर्वसाधारणपणे वर्ण जाती व्यवस्थेचा विचार करताना ती एक सामाजिक व्यवस्था आहे असे गृहीत धरले जाते आणि अनेकदा ती सर्वांनी मान्य केली आहे असेही गृहीत धरले जाते. परंतु या व्यवस्थेचे सन्मानाशी जे नाते आहे ते अनेकदा लक्षात घेतले जात नाही आणि मग त्यातूनच आत्ताचे जे संजय गायकवाड प्रकरण घडलेले आहे तसे प्रकरण घडत जाते .

मुळात सन्मान ही एक माणसाची अत्यंत मूलभूत आसक्ती आहे . ही माणसांमध्ये कशी निर्माण होते ?

माणसांमध्ये जे शिव तत्व असते ते प्राण म्हणून उपस्थित असते आणि हे तत्व अनेकदा आत्मा निर्माण करते आणि हा आत्मा सन्मान आणि मान्यता मागत राहतो याचे कारण आत्मा (मी)हा काल्पनिक असतो. प्रत्यक्षात त्याला कसलेही अस्तित्वात नसते साहजिकच जेव्हा तुम्हाला अस्तित्व नसते तेव्हा तुम्ही अस्तित्व प्राप्त करायला सिद्ध करायला धडपडायला लागता . आता ही धडपड कोणत्या माध्यमातून सिद्ध होणार म्हणजे काय झाले म्हणजे मी सिद्ध होणार असे कळीचे प्रश्न साहजिकच निर्माण होतात . मी अस्तित्वात आहे हे मला कसे कळणार ? तर त्याची माध्यमे दोन आहेत पहिले सन्मान आणि दुसरे मान्यता ! सर्वसाधारणपणे मान्यता ही एका प्रतिष्ठित गटामध्ये असते तर सन्मान हा सर्वसाधारणपणे अधिक व्यापक समाजामध्ये असतो. अनेकदा तर तो जाहीर स्वरूपात दिला जातो . वर्ण व्यवस्था ही एका अर्थाने जाहीररित्या सन्मान देण्याची गुंतागुंतीची उतरण असलेली ब्राह्मणी व्यवस्था आहे.

त्यातूनच मग पुढचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे मान्यता मिळाली आहे हे कसे ठरणार आणि कोण ठरवणार ? आपल्याकडे कोण ठरवणाऱ्या प्रश्नाचे उत्तर ब्राह्मण लोकांनी दिले आणि ही मक्तेदारी आपल्याकडे वळवण्याचा आणि ठेवण्याचा वारंवार प्रयत्न केला तर जे ब्राह्मणांचे विरोधक होते त्यांनी कायमच ब्राह्मणांचा हा अधिकार नाकारला. 

यातूनच मग वर्ण व्यवस्थेचे एक वेगळे रूप भारतामध्ये अस्तित्वात आलेले दिसते आणि अनेकदा या रूपावर चर्चा होत नाही. आपल्याकडे हे गृहीतच झालेले आहे की ब्राह्मण धर्माने जे रूप आपणाला वर्ण व्यवस्थेचे दिलेले आहे ते जसेच्या तसे स्वीकारले गेलेले आहे होते पण दुर्दैवाने सामाजिक वस्तुस्थिती राजकीय वस्तुस्थिती अशी नव्हती आणि नाही .

ब्राह्मण धर्माने वर्ण निर्माण केले असले तरी या वर्ण संस्थेच्या बाबतीतले मान्यतेचे संकेत मात्र हे पूर्णपणे ब्राह्मणांच्या हातून निसटलेले आहेत आणि अनेकदा ब्राह्मणांना हे कळत नाही .

समाजामध्ये नेमके काय झाले हे आपण यासंदर्भामध्ये लक्षात घेतले पाहिजे .

ब्राह्मणधर्माने चार वर्ण निर्माण केले आणि त्यामध्ये मान्यता आणि सन्मान प्रथम ब्राह्मण वर्णाला दिला . नंतर क्षत्रिय नंतर वैश्य नंतर शूद्र अशा तऱ्हेने सन्मानाची एक उतरंड रचली आणि क्षत्रियांना हे सांगितले की तुम्ही देवाचे अवतार आहात परंतु तुमचा जो सन्मान आहे तो ब्राह्मणानंतर आहे . क्षत्रियांनी ही गोष्ट कशी काय आणि का स्वीकारली? तर त्याचे कारण परलोकावर त्यांचा विश्वास होता आणि आपण ब्राह्मणाच्या मदतीशिवाय त्याच्या मंत्राशिवाय त्याने यज्ञ केल्याशिवाय त्याने पूजा पाठ केल्याशिवाय आपण स्वर्गात पोहोचू शकणार नाही याची खात्री असल्याने साहजिकच त्यांना ब्राह्मण आपल्या डोक्यावर ठेवावा लागला ( इजिप्त च्या पिरॅमिड बाबतीत सुद्धा हे खूप घडलेले दिसते त्यातले तिथले जे क्षत्रिय होते ते याच व्यवस्थेला बळी पडले) किंबहुना क्षत्रियांच्या डोक्यावर प्रथम ब्राह्मण बसले आणि म्हणूनच त्यांची उत्पत्ती डोक्यापासून झाली . इहलोक आणि परलोक यामध्ये परलोक का महत्त्वाचा झाला तर इथे आपणाला आयुष्याची संकल्पना महत्त्वाची ठरलेली दिसते म्हणजे असे की पृथ्वीवरचे माणसाचे जास्तीत जास्त आयुष्य हे शंभर वर्षे 200 वर्षे असू शकते परंतु परलोकात मात्र त्याला हजारो आणि लाखो वर्षे जगावे लागणार आणि साहजिकच त्यामुळे पृथ्वीवरच्या शंभर-दोनशे वर्षापेक्षा आपली पुढची हजारो लाखो वर्षे जास्त सुखी जावी असे प्रत्येक माणसाला वाटणे हे साहजिक होते शिवाय ब्राह्मण ही खात्री देत होते की त्याने जे काही पृथ्वीवर ऐश्वर्य कमावलेले आहे त्याच पद्धतीचे ऐश्वर्य त्याला स्वर्गामध्ये मिळणारे उलट अधिकच्या अप्सरा मिळण्याची शक्यता सुद्धा त्याला दाखवली जात होती. साहजिकच क्षत्रियाचा ब्राह्मणावर आणि त्यांच्या आपल्यापेक्षा अधिक असलेल्या सन्मानावर विश्वास होता . क्षत्रियाची मूळ प्रवृत्ती ही सत्तेची असते आणि साहजिकच त्यामुळे त्याला आता स्वर्गावर सत्ता हवी होती(पुराणांच्या मध्ये त्यामुळेच वारंवार क्षत्रिय लोक स्वर्गावर स्वारी करत असतात ) आणि म्हणूनच स्वर्गावर म्हणजे स्वर्गातल्या राज्यावर म्हणजे स्वर्गातल्या अवकाशावर त्याला राज्य करायचे असल्याने त्यातला एखादा भूगोल आपल्या वाट्याला कमवायचा असल्याने त्याने ब्राह्मणांना सर्वाधिक सन्मान दिला क्षत्रियांनी यामुळेच ब्राह्मण आपल्यापेक्षा वर असले आहेत हे स्वीकारले 

या ब्राह्मण धर्मामध्ये इतरांच्या सन्मानाची काय स्थिती होती ? ह्या ब्राह्मण धर्मामध्ये वैश्य हे जरी क्षत्रियांच्या खाली असले तरी ते पापी नव्हते त्यामुळे त्यांनाही स्वर्ग मिळण्याचा चान्स जास्त होता मात्र जितका तो चान्स राजाला होता तितका त्यांना नव्हता तरीसुद्धा यज्ञ करून आपण स्वर्गाला जाऊ शकतो याची खात्री असल्याने त्यांनी सुद्धा ब्राह्मणांचा वरचा दर्जा मान्य केला आणि त्याचबरोबर क्षत्रिय आपले या पृथ्वीवर संरक्षण करत असल्याने त्यांनाही आपल्यापेक्षा वर ठेवणे मान्य केले . या सगळ्या प्रकारामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे द्विज झाले आणि उरलेला जो वर्ण होता तो शूद्र होता आणि त्याचे स्थान सर्वात खालचे ठरले . त्याला पापी ठरवण्यात आले . त्याचा सर्व प्रकारचा सन्मान हिसकावून घेण्यात आला.

वैष्णव धर्मामध्ये आणखीनच परिस्थिती वाईट झाली तिथे वैश्य सुद्धा पापी झाले याचे कारण उघड होते कारण वैष्णव धर्म हा प्रामुख्याने गुप्त कालखंडात निर्माण झाला आणि हे गुप्त लोक वैश्य असल्याने साहजिकच ते ब्राह्मणांना आणि क्षत्रियांना प्रचंड खटकत होते . गुप्तांचा पराभव व्हावा म्हणून ब्राह्मण आणि क्षत्रिय मनोमन धडपडत होते . किंबहुना वैष्णव धर्माची स्थापनाच मुळात वैश्य पराभूत व्हावे म्हणून करण्यात आली . साहजिकच वैश्यांना सुद्धा पापी करणे ही त्यांची आवश्यकता होती कारण मुळातच वर्धन विशेषतः हर्षवर्धन आणि नंतर गुप्त कुळ हे वैश्य होते आणि त्यांची दादागिरी आपण क्षत्रिय असून सुद्धा सहन करत आहोत याचा एक अपमान क्षत्रिय वर्ण सुद्धा आपल्या आत बाळगून होता. त्यामुळेच भगवान कृष्ण गीतेमध्ये वैश्य वर्णाला पापी वर्ण पापी योनी या कॅटेगरीमध्ये टाकतात .त्यामुळेच वैष्णव धर्मामध्ये फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय हेच सन्मानजनक झाले आणि वैश्य आणि शूद्र असणे हे अपमान जनक झाले. अर्थात वैश्य गप्प बसले नाहीत ते शांतपणाने जैन धर्मात गेले .( आपण काहीही केले तरी चालेल त्याची रिएक्शन येणार नाही असा एक फार मोठा गैरसमज ब्राह्मण आणि क्षत्रिय वर्णाचा असतो प्रत्यक्षामध्ये प्रचंड मोठ्या रिएक्शन कायमच वैश्य शूद्र लोकांनी दिलेल्या आहेत .) त्यामुळेच युरेशियन लोकांच्या पैकी जे काही थोडेफार वैश्य उरले होते ते आता जैन धर्मात गेलेले आहेत.

पुढे हिंदू धर्मामध्ये नेमके काय घडले तर तिथे पुन्हा इंग्रजांच्या राजवटीमध्ये पुन्हा एकदा ब्राह्मण धर्माचेच आगमन झाले आणि या लोकांनी 1915 यावर्षी ठराव पास करून वैश्यांना पुन्हा एकदा ब्राह्मण धर्मातला उच्च वर्णाचा दर्जा दिला म्हणजे पुन्हा एकदा ब्राह्मण धर्मात असलेला तृतीय दर्जाचा सन्मान वैश्य लोकांनी प्राप्त केला याचे कारण मुळातच आता इंग्रजांच्या राजवटीत जे राज्य करणारे लोक होते त्यातले बरेचसे लोक व्यापारी होते मुळात व्यापारी लोकांनीच साम्राज्य स्थापन केले होते त्यामुळे वैश्य लोकांना खालचा दर्जा देणे ब्राह्मण लोकांना परवडणारे नव्हते शिवाय आवश्यक असणारा पैसा आता जितका क्षत्रियांच्याकडे होता त्यापेक्षा अधिक पैसा आता वैश्य वर्णाकडे यायला लागला पुढे पुढे तर क्षत्रियांच्या पेक्षा वैश्य लोकांना अधिक प्राधान्य देणे सुरू झाले आणि त्यातूनच पुढे मग मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाला मान्यता देण्यात आली . एका अर्थाने गुप्त कालखंडाचे हे पुनराआगमन आहे याचे कारण जिथे जिथे ब्राह्मण जातात तिथे तिथे त्यांना पैशाची आवश्यकता असते आणि ही पैशाची आवश्यकता आता वैश्य लोक पूर्ण करत आहेत . 

प्राचीन काळामध्ये या सर्व गोष्टीला सर्वात प्रथम छेद दिला गेला तो बळी वंशा कडून ! या वंशाने ब्राह्मणांचे वर्चस्व पूर्णपणे नाकारले आणि क्षत्रिय हा वर्ण सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट ठरवला इतकेच नव्हे तर त्यांनी शैव श्रुतीतील पाशुपत धर्म स्वीकारला . याच वंशातील कपिल याने ज्याला नंतर सांख्य धर्म म्हटले गेले तो धर्म स्थापन केला .

पुढे मग जैन आणि बौद्ध धर्माचा उदय झाला या बौद्ध धर्मामध्ये जेव्हा वर्णव्यवस्था पुन्हा एकदा आणली गेली तेव्हा वर्णव्यवस्थेचा सन्मान क्रम बदलण्यात आला आणि सर्वात वरती क्षत्रिय वर्ण ठेवण्यात आला. आज सुद्धा जर का तुम्ही थायलंडमध्ये गेलात तर तिथे क्षत्रिय हा वर्ण ब्राह्मण वर्णाच्या वर आहे . जपानमध्ये सामुराई या क्षत्रिय वर्णाला जास्त सन्मान होता. साहजिकच ब्राह्मणांना कधीही बौद्ध धर्म आवडणे शक्य नव्हते मात्र तरीसुद्धा त्यांनी ही तडजोड स्वीकारली कारण त्याशिवाय पर्याय नव्हता कारण यज्ञसंस्थेला भरभराटीचे दिवस येत नव्हते . सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये सुद्धा सम्राट अशोक सर्वात वर आहे आणि मग त्याच्या खालोखाल बमन आणि श्रमण आहेत . यातील बमन ( बम बम भोले नाथ हा यांचा उद्घोष आहे होता) हे पंडित आहेत तर श्रमण हे बौद्ध आहेत . साहजिकच पुढे पुढे बमन मध्ये ब्राह्मण घुसले आणि त्यांनी बौद्ध धर्म बळकवायला सुरुवात केली. त्यामुळेच आपणाला पुढे सन्मानाच्या दुसऱ्या स्थानावर ब्राह्मण लोक प्रस्थापित झालेले दिसतात.

सुरुवातीच्या कालखंडामध्ये जैन धर्मात सुद्धा ही स्थिती होती परंतु हळूहळू जैन धर्म बदलत गेला याचे कारण महावीर यांनी दिलेले अहिंसेचे तत्व नंतर अतिरेकी होत गेले आणि शेतीमध्ये हिंसा होते म्हणून ती नाकारण्यात आली साहजिकच पर्याय एकच उरला तो म्हणजे व्यापार पण यातूनच एक अत्यंत विलक्षण अशी घटना घडली ती म्हणजे सन्मानाच्या क्रमामध्ये बदल झाला याचवेळी ब्राह्मण धर्मातून सन्मान नसल्यामुळे अनेक वैश्य लोकांनी जैन धर्मात प्रवेश केला . त्यामुळेच आता जर का तुम्ही जैन धर्मामध्ये गेलात तर तुमच्या लक्षात येईल सर्वाधिक सन्मान हा वैश्य वर्णाला आहे . बहुतांशी जैन हे आता व्यापारी बनलेले त्यामुळेच दिसतात आणि हा एका अर्थाने वैश्य लोकांचा धर्म झालेला आहे आणि इथे वैश्य हा सन्मानाच्या बाबतीत टॉपला आहे. इंग्रजांच्या राजवटीमध्ये तर हे अधिकच प्रस्थापित होत गेले आणि सन्मानाचा क्रमांक आता जैन लोकांच्या मध्ये वैश्य प्रथम क्षत्रिय द्वितीय ब्राह्मण तृतीय आणि शूद्र चौथ्या क्रमांकावर राहिले . याच लोकांनी पाचव्या क्रमांकावर पंचम या नावाने सर्व अस्पृश्य ठेवले .

आजच्या काळामध्ये आपणाला असे दिसते की हळूहळू जैन लोकांच्या मध्ये निर्माण झालेली ही व्यवस्था संपूर्ण हिंदुस्तान देशाने स्वीकारलेली आहे आणि कळत नकळत आज वैश्य हा प्रथम क्रमांकावर आला आहे . त्यामुळेच अंबानी आणि अदानी हे सर्वाधिक सन्माननीय आहेत आणि त्यांच्या खालोखाल नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोघेही सन्माननीय आहेत . योगायोगाने हे चौघे वैश्य आहेत . 

यानंतर मग आपणाला दिसते की दुसऱ्या क्रमांकावर हळूहळू ब्राह्मण येताना दिसतात पूर्वी हे स्थान क्षत्रिय लोकांना होते . पण ते आता राहिले नाही .

त्यातच तुम्ही जर का असे क्षत्रीय असाल ज्यांच्याकडे पैसा नाही तर मग तुमची किंमत फारशी राहत नाही .

संजय गायकवाड यांचा जो धूसमूसळेपणा आहे तो एका अर्थाने एका स्वतःच्याच सन्मानाच्या व्यवस्थेवर नाराज असलेल्या अनकॉंसेस माईंड्चा आहे . तिसऱ्या क्रमांकाचे स्थान घेणे हे आता क्षत्रियांना सन्मान जनक वाटत नाही पण या व्यवस्थेमध्ये कळत नकळत ते आलेले आहे. कारण शासन संस्था हीच मुळात वैश्य लोकांनी स्वतःच्या ताब्यात ठेवलेली आहे . (अगदी अमेरिकेतही डोनाल्ड ट्रम्प हा वैश्य अध्यक्षपदावर आलेला आहे) काळाची ही पावले एकनाथ शिंदे यांनी ओळखली आणि सर्वाधिक ओळखली ती शरद पवार अजित पवार यांनी. साहजिकच अजित पवार यांनी प्रचंड पैसा सुद्धा कमवायला सुरुवात केली होती. 

एकीकडे एकनाथ शिंदे अजित पवार ज्यांनी काळाची पावले ओळखून आता वैश्य बनण्याकडे वाटचाल सुरू केली आहे तर दुसरीकडे एक असा क्षत्रियांचा गट तयार झालाय जो वारंवार पाठीमागे बघतो आहे .मराठा हा कधीच जात व्यवस्था नव्हता तो समाज व्यवस्था होता पण दुर्दैवाची गोष्ट अशी की ब्राह्मण लोकांनी त्यांना त्यांची ढासळत चाललेली आर्थिक स्थिती ओळखून क्षत्रिय म्हणायला सुरुवात केली आणि या लोकांना असे वाटले की आपण पुन्हा एकदा ब्राह्मणांच्या नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहोत . हा इतिहासाकडे आणि धर्माकडे नेत दिला जाणारा ब्राह्मणी सन्मान होता . तो आभासी आहे पण सध्याच्या आभासी जगामध्ये अनेकदा अशा प्रकारचे आभासी सन्मान हे शक्तिदायक वाटतात प्रत्यक्षात ते शक्तीदायक असत नाहीत . साहजिकच हा जो मराठा समाज आहे तो सध्या आपली प्रतिष्ठा आपला सन्मान शोधतो आहे आणि हा सन्मान त्याला फक्त शिवाजी महाराज आणि त्यांचे भोसले कुळ यांच्यामध्येच सापडत असतो . साहजिकच भोसले कुळाच्या संदर्भात काहीही झाले की आता असा मागे पाहणारा जो मराठी मराठा समाज आहे तो अनेकदा संतापायला लागतो पूर्वी खरोखर असे काही घडले की संतापत असे आता तर अवस्था अशी आहे की कसलेही निमित्त आले की हा संतापायला लागतो किंवा मग राग काढण्यासाठी निमित्त शोधायला लागतो . अशी शोधली गेलेली निमित्तकारणे ही खरोखर सन्मान परत आणून देणार आहेत का? हा प्रश्न सर्वच मराठी मराठा लोकांनी विचारायला हवा. मुळातच तुमची सर्वात मोठी ताकद ही तुमची लोकसंख्या होती आणि ब्राह्मण धर्माने तुम्हाला व्यवस्थित रित्या आरक्षणाच्या प्रश्नावर विभागून टाकले . तुमचा जो पस्तीस टक्के लोकसंख्येचा भाग आहे तो आता कुणबी तुम्हीच वजा केल्याने गेल्यामुळे धड 18% सुद्धा उरलेला नाही . जर कुणबी मराठा नाही धनगर कोळी मराठा नाही तर केवळ 96 कुळीच फक्त मराठा आहे अशी जेव्हा तुम्ही भूमिका घेता तेव्हा कळत नकळत तुम्ही स्वतःची लोकसंख्या पाच टक्के वर आणायला लागता. आणि पाच टक्के लोकसंख्येच्या जीवावर राज्य करायला ब्राह्मणांच्या सारखी फार मोठी ज्ञानात्मक ताकद तुमच्याजवळ असायला लागते केवळ संघटनात्मक ताकतीच्या जीवावर हे होऊ शकत नाही याबाबतीतली सर्वात वाईट गोष्ट जर कुठली असेल तर तुमचे संबंध वैश्य समाजाशी नेटनीट नाहीयेत. किंबहुना तुमच्यापैकी एक मोठा भाग हा व्यापारी लोकांची उधारी बुडवणारा भाग अशी तुमची प्रतिमा बनवत चाललेला आहे ती प्रतिमा बदलण्यासाठी या भागाने सर्वात प्रथम सर्वांचे पैसे हिशेब मांडून चुकते करून नीट करावी लागेल . जुन्या काळामध्ये तुमच्याकडे सत्ता होती त्यामुळे लोक टॅक्स म्हणून तुम्हाला पैसे देत. पण आता जर तुमच्याकडे सत्ताच नसेल तर लोक का पैसा देतील . कारण लोक आता सरकारला टॅक्स देत आहेत . तेव्हा एक तर तुम्हाला स्वतःचा पैसा उद्योगधंद्यातून निर्माण करावा लागेल म्हणजेच तुम्हाला स्वतःलाच वैश्य व्हावे लागेल . किंवा मग नोकरी करून पैसे कमवावे लागतील त्यासाठी प्रतिष्ठेच्या नोकऱ्या मिळवाव्या लागतील . त्याची तयारी आहे का ? व्यापार करणाऱ्या आणि नोकरी करणाऱ्या माणसाला आपली भाषा प्रचंड सुसंस्कृत आणि सभ्य ठेवावी लागते . तुम्ही ज्या पद्धतीची भाषा वापरता ती भाषा जर सुसंस्कृत आणि सभ्य नसेल तर तुम्हाला आता कोणीही स्वतःच्या दारात उभे करणार नाही हे लक्षात घ्या याबाबतीत यशवंतराव चव्हाण शरद पवार आणि अजित पवार यांचाच आदर्श तुम्हाला ठेवावा लागेल. शिवाजी महाराज यांची भाषा अतिशय सुसंस्कृत आणि सभ्य होती हे लक्षात ठेवा कडक भाषा म्हणजे असभ्य शिवराळ भाषा नसते हे लक्षात घ्या . तुम्हाला साधी शिवाजी महाराजांची सुसंस्कृत आणि सभ्य भाषा सुद्धा आत्मसात करता येत नसेल तर मग त्यांच्यासारखे स्वराज्य तुम्ही काय निर्माण करणार ? ज्या माणसाची भाषा नियंत्रणात नसते त्याची तलवार सुद्धा कोणाची तरी गुलाम बनून जाते. अनेकदा लढाऊ जमात स्वतःची तलवार दुसऱ्यांच्यासाठी भाड्याने देऊन बसलेली आहे भारताचा हा इतिहास आहे त्यामुळेच मुघलांच्याकडे आणि मुसलमानांच्याकडे अनेकदा हिंदू धर्मातल्या भारतीय धर्मातल्या लढणाऱ्या जमाती प्रत्यक्षामध्ये नोकरी करताना दिसतात. अशी चाकरी करण्याची वेळ आली कशी ? की नेहमीच तुम्ही जो शासनात आहे त्याची चाकरी करायला लागला होता ? तुम्ही तुमच्या चाकरीचा भाग म्हणून कोणाला शिव्या देत आहात का हा प्रश्न विचारा कारण लोक तुम्हाला वापरायला टपलेलेच असतात .

आता या सगळ्या परिस्थितीचे फ्रस्टेशन तुम्हाला येऊ शकते परंतु हे फ्रस्ट्रेशन तुम्ही कोणावर काढणार आणि का काढणार आणि ज्याच्यावर तुम्ही काढणार तो थोडेच तुमचे ऐकायला बसलेला आणि फ्रस्टेशन सहन करायला तयार आहे ? आणि समजा हा जो ऐकणारा माणूस आहे ज्याला तुम्ही विचारता की तो ब्राह्मण आहे का तो ब्राह्मण असता तर तुम्हाला असे वाटते की आत्ताच्या काळामध्ये ब्राह्मणांशी उघड शत्रुत्व घेऊन तुम्ही टिकू शकाल ? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि ते ब्राह्मण आहेत याचा तुम्हाला विसर पडला का ? 

सन्मान मागायचा नसतो सन्मान मिळवायचा असतो . त्यासाठी लोकहिताची अनेक कामे करावे लागतात . किमान शिवाजी महाराजांच्या कडून इतकी सिम्पल साधी सरळ गोष्ट तुम्ही शिकलात तरी खूप झाले . तुमच्या मतदारसंघात अतिशय चांगली कामे करा नीट राज्यकारभार करा लोक आपोआप सन्मान द्यायला शिकतात.

मुख्य म्हणजे आता वारंवार इतिहासाकडे बघणे बंद करा . शिवाजी महाराज इतिहासाकडे बघत नव्हते तर त्यांच्या वर्तमान काळामध्ये जी परिस्थिती होती ती कशी हाताळता येईल ते बघत होते . इतिहास हा फक्त चुका काय झाल्या हे तपासण्यासाठी असतो ज्यामुळे भविष्यामध्ये आपल्याकडून चुका होऊ नये . किंवा मग इतिहासामध्ये काय काम झाले आणि त्याच्या पुढे जाऊन आपणाला काय काम करता येईल ते तपासण्यासाठी इतिहास असतो. इतिहास हा अस्मितेसाठी असत नाही तुम्ही जर का इथे वारंवार अस्मिता घेऊन येणार असाल तर तुमचे काहीही कल्याण होणे शक्य नाही कारण इतिहास ज्या गोष्टीसाठी आहे त्यासाठी तुम्ही तो वापरतच नाही तुम्ही फक्त एक पॉलिटिकल वेपन राजकीय शस्त्र म्हणून जर इतिहास वापरणार असाल तर फार काळ तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहणे शक्यच नाही . कारण अशा प्रकारची भांडणे तुमची आर्थिक स्थिती मजबूत करू शकत नाहीत .आर्थिक स्थिती ही वर्तमानातली वस्तुस्थिती असते तिला तोंड द्या ती कशी सुधारता येईल ते पहा . तुमची शेती जर तोट्यात जात असेल तर त्या तोट्यात जात असलेल्या शेतीला फायद्यात कसे आणता येईल ते पहा . इतिहासाकडे बघून आत्ताच्या शेतीचे प्रश्न किंवा आत्ताच्या व्यवसायाचे किंवा तुमच्या आत्ताच्या नोकरीचे प्रश्न सुटणार नाहीत त्यासाठी तुम्हाला वर्तमानातच यावे लागेल .

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

बॉलीवूड आणि अभिनय