व्यवस्था ,धर्म , मिशेल फुको याची उत्तरसंरचना आणि मोक्ष श्रीधर तिळवे नाईक
मिशेल फुको याने कधीही स्वतःला उत्तराधुनिक म्हणवून घेतले नाही याचे कारण त्याची मांडणी ही पूर्णपणे उत्तररचनावादी होती आणि त्याला हे नीट माहीत होते . दुर्दैवाने त्याला उत्तराधुनिक मध्ये घालण्यात आले आणि त्याच्या आकलनाच्या बाबतीत मग अनेकांचे अनेक पद्धतीचे आडाखे चुकले . उत्तरचनावाद हा नेहमीच संपूर्ण अर्वाचीन व्यवस्थांचे विकेंद्रीकरण करून विश्लेषण करतो. त्यासाठी अनेकदा जागरिक परंपरेतून हे अर्वाचीन परंपरा विकसित झाली तिचेही डी कन्स्ट्रक्शन करतो .
सर्वसाधारणपणे पुरोगामी अर्वाचीन कालखंडाच्या आधी जो धार्मिक कालखंड सर्वत्र होता त्यामध्ये धर्म केंद्रस्थानी आला आणि मोक्ष हळूहळू परिघावर गेला होता. अगदी वारकरी पंथामध्ये सुद्धा आपणाला असे दिसते की सर्वच वारकरी संतांना ते वर्ण जात व्यवस्थेच्या संदर्भात मौन पाळून बसले असून सुद्धा परिघावर ठेवण्यात आले . ( बसवेश्वर आणि निवृत्तीनाथ यांच्या बाबतीत फार वेगळ्या गोष्टी घडलेल्या असाव्यात )कारण मोक्षाबाबतीतली समता सुद्धा वैष्णव धर्माला मान्य नव्हती आणि आजही नाही . त्यामुळेच दहा अवतारांच्यापैकी होऊन गेलेला नऊ अवतारांच्या मध्ये विष्णूचा एकही अवतार वैश्य , शूद्र , अतिशूद्र आणि आदिवासी यांच्यामध्ये जन्मलेला नाही . वैष्णव धर्माच्या ईश्वराला यांच्यामध्ये जन्म घ्यायला आवडत नाही तो या जाती-जमातीत फक्त भक्तांना जन्म घ्यायला सांगतो जेणेकरून या जाती जमातीतून फक्त भक्त निर्माण व्हावेत .
साहजिकच जेव्हा बसवेश्वर यांनी प्रबोधन सुरू केले तेव्हा त्यांनी या धर्मांच्या विरोधात बंड करून एक नवा शैव धर्म स्थापन केला ज्याला आज आपण लिंगायत धर्म म्हणून ओळखतो ही भारतीय प्रबोधनाची सुरुवात होती आणि पुरोगामी वादाचे फाउंडेशन या चळवळीने टाकले .
पाश्चात्त्य देशांमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा पाया साधारणपणे रॉजर बेक्कन आणि त्याच्या गुरुने टाकला होता हळूहळू साहजिकच या लोकांची चळवळ यशस्वी होत गेली युरोपमध्ये नवजागरण होत गेले आणि प्रबोधन होत गेले आणि पुढे यातून एक पुरोगामी व्यवस्था निर्माण करणारी नेटवर्कस निर्माण झाली
मिशेल फुको याने या सर्वच्या सर्व अर्वाचीन व्यवस्थांचे हळूहळू डी कन्स्ट्रक्शन करायला सुरुवात केली. मात्र त्याची पद्धत ही पूर्णपणे विज्ञान निष्ठ होती त्याने पुरोगामी वादाने निर्माण केलेल्या सर्वच्या सर्व व्यवस्थांना एका नव्या विश्लेषणाच्या परिप्रेक्ष्यामध्ये आणून ठेवले . मुळातच या कालखंडामध्ये हळूहळू पुरोगामी कालखंडातले अनेक पेपर अनेक दुर्मिळ ग्रंथ उपलब्ध झाले अनेक हस्तलिखिते उपलब्ध झाली आणि त्यामुळे साहजिकच ह्या व्यवस्था नेमक्या कशा पद्धतीने चालत होत्या ते आपणाला कळायला लागले भारतामध्ये आज या गोष्टीची अत्यंत आवश्यकता आहे मुळात वर्तमान काळातल्या लोकांना कधीही त्यांचा वर्तमान कळत नाही कारण त्यांच्यासाठी इतर हा पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध असत नाही अनेकदा इतर मधला फार मोठा भाग हा अदृश्य असतो जो नंतरच्या इतिहासकारांना हस्तलिखित किंवा इतर तत्सम संहितांच्या मधून उपलब्ध होतो. म्हणजेच इतिहासकारांना नेहमीच जो अदृश्य भाग वर्तमान जगणारा लोकांना उपलब्ध होत नाही तो उपलब्ध होतो उदाहरणार्थ मुंबईत आत्ता काही घडले तर त्या संदर्भातल्या सर्व वर्तमानाने काय म्हटले आहे हे मी कधीही वाचत नाही पण इतिहासकार मात्र सर्व वर्तमानपत्रांनी मासिकांनी लोकांनी काय काय म्हटले आहे ते जाणू शकतो याचाच अर्थ असा की वर्तमान काळातील लोकांना वर्तमानाचा पुरेसा डाटा कधीच उपलब्ध असत नाही . आणि म्हणूनच वर्तमान काळामध्ये वर्तमान काळाविषयीचे निर्णय घेणे हे सर्वाधिक अवघड जाते . फुकोचे लिखाण वाचताना हे सातत्याने जाणवते . विशेषता वेडा विषयी त्याने जे काही लिहिले आहे ते नंतरच्या लोकांनाच जास्त उपलब्ध झाले. त्या काळातल्या लोकांना madness ह्या प्रकारावर इतका मोठा गोंधळ आहे चालू आहे हेच कळाले नव्हते . साहजिकच फुको असे अनेक पुरावे वेचत वेचत आपल्याला हा सगळा अर्वाचीन प्रोजेक्ट नेमका कसा आकाराला येत गेला आणि अंतिम ता हे सगळे ज्ञान सत्तेला कसे मदत करत होते ते सिद्ध करत जातो. किंबहुना आता आपण खात्रीने म्हणू शकतो की सगळा पुरोगामी प्रोजेक्ट अर्वाचीन प्रोजेक्ट हा ज्ञान आणि सत्ता यांच्याभोवतीस फिरत होता आणि संपूर्ण ज्ञान सत्तेने आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी वापरले हितसंबंधांच्यासाठी वापरले.
भारतामध्ये हा पुरोगामी प्रोजेक्ट कसा आकाराला आला हे सुद्धा आता अधिक स्पष्ट होते आहे कारण या काळातली काही डॉक्युमेंट्स आपल्याला अधिक चांगल्या रीतीने उपलब्ध होत आहेत . आमच्या कोल्हापुराला बसवेश्वर यांचा एक विशिष्ट प्रभाव आहे आणि लिंगायत धर्म स्वीकारणाऱ्या लोकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे . तिथे प्राचीन काळातल्या लिंगायत धर्माची काही डॉक्युमेंट उपलब्ध होतात आणि ती वाचताना अनेक गोष्टी नव्याने कळत जातात. हीच गोष्ट आपणाला शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या संदर्भात म्हणता येते .
बसवेश्वर यांनी जी सुरुवात केली तिला काही प्रमाणात शिवाजी महाराजांनी एक राजकीय व्यवस्था निर्माण करून पुढे नेले पण दुर्दैवाने ही क्रांती यशस्वी झाली नाही कारण नानासाहेब पेशवे यांच्या काळामध्ये पेशव्यांनी आणि पुण्यातल्या ब्राह्मणांनी प्रतिक्रांती केली या प्रतिक्रांतीने वारकरी संप्रदाय केंद्रस्थानी आणला आणि वैष्णव धर्म हा संपूर्ण महाराष्ट्राचा धर्म आहे असा प्रचार करायला सुरुवात केली . आपल्याकडे वारकरी संप्रदाय हा ब्राह्मण नरमाने स्पॉन्सर केलेला संप्रदाय आहे हे अजूनही लोकांच्या लक्षात आलेले नाही . मात्र याच लोकांनी या काळामध्ये शैव लोकांच्या देवता सुद्धा ज्या त्यांच्या मूळ देवता होत्या त्या कुठेही न हलवता त्यांना वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था यांच्या चौकटीत बसवायला सुरुवात केली यातूनच मग एक विचित्र गुंतागुंतीचा असा हिंदू म्हणावा असा धर्म निर्माण झाला . वैष्णव धर्म हा प्रामुख्याने पुराणोक्त महाकाव्यात्मक धर्म होता आणि शैव धर्म आणि वैष्णव धर्म हे पूर्णपणे वेगळे होते पण आता काही लोकांनी यांची सांगड घालायला सुरुवात केली आणि या सगळ्याला सर्वात मोठा हातभार ब्रिटिश लोकांनी लावला . आश्चर्याची गोष्ट अशी की ब्रिटिश लोक या धर्माला हिंदू म्हणत नव्हते तर ब्राह्मणधर्म म्हणत होते पण हळूहळू त्यांच्या लक्षात आले की हा धर्म फक्त ब्राह्मणांच्या पुरता मर्यादित नाही आणि तो त्यांच्या कह्यात नाही हेही त्यांच्या लक्ष्यात आले आणि हळूहळू का होईना पण हिंदू धर्म ही संकल्पना प्रस्थापित होत गेली. म्हणजेच आपण असे म्हणू शकतो की पुरोगामी कालखंडामध्ये शैव श्रुती मध्ये लिंगायत धर्म आणि शीख धर्म असे दोन धर्म निर्माण झाले तर युरेशियन श्रुतीमध्ये हिंदू हा धर्म अतिशय व्यवस्थितपणे निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले . आणिि या हिंदू धर्माने शैव धर्माचे स्वतंत्र अस्तित्व मोडीत काढायला सुरवात केली या तिन्ही धर्मांचे वैशिष्ट्य असे होते की या केवळ संघटना नव्हत्या या लोकांनी एक पूर्णपणे व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. ब्रिटिश काळात स्वामी विवेकानंद यांनी हिंदू धर्म ही एक व्यवस्था आहे हे सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले वैचारिक प्रबोधन आणि आकलन पुरवले. त्यांनी हिंदू धर्माची मुळे थेट आद्य शंकराचार्यांच्या वेदांतापर्यंत नेली म्हणजेच एका अर्थाने त्यांनी आद्य शंकराचार्य यांना हिंदू धर्माचे संस्थापक मानले मात्र ज्याला आज आपण हिंदू म्हणतो त्या धर्माचा खरा आकार स्वामी विवेकानंद यांनी घडवलेला आहे मात्र हा आकार घडवताना त्यांनी हिंदू धर्मातल्या श्रुती स्मृती पुराणोक्त अंधश्रद्धांच्या वर प्रचंड हल्ला केला साहजिकच एका अर्थाने हा एक नव हिंदू धर्म होता याला शह देण्यासाठी म्हणूनच विष्णू चिपळूणकर, लोकमान्य टिळक आणि सरसंघचालक गोळवलकर गुरूजी यांनी एक प्रतिक्रांती घडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन झाला . संघाला नेमके कोणते कोणत्या दिशेने न्यायचे याबद्दल सुरुवातीपासूनच संघामध्ये दोन दिशा होत्या पहिली दिशा विवेकानंदांची होती तर दुसरी दिशा ही गोळवलकर गुरुजी यांची होती आजही या दोन दिशा एकमेकांशी सतत भांडताना दिसतात पुढे या व्यवस्थेमधून आपणाला असे दिसते की एक राजकीय व्यवस्था सुद्धा उदयाला आली आहे
प्रश्न असा आहे की आपण मिशेल फुको याची विश्लेषण करण्याची जी एक उत्तर संरचनावादी पद्धत आहे तिच्या कक्षेमध्ये या सर्व घडामोडी आणणार आहोत काय ?
फुको याने युरोप मधल्या मनोविश्लेषण , मेडिसिन , शिक्षण , लैंगिकता , सत्ता आणि जेल व्यवस्था यांचा अत्यंत खोलात जाऊन तपास केला आणि या व्यवस्था कशा ज्ञान केंद्री आणि सत्ता केंद्री होत्या आणि त्यातून काय प्रकारचे शोषण होत होते हे अतिशय व्यवस्थित मांडले .
त्याच्या या मांडणीनुसार पुरोगामी वादाचे दोन प्रकल्प सातत्याने कार्यरत असताना आपणाला दिसतात पहिला प्रकल्प हा ज्ञान विज्ञानाचा प्रकल्प होता तर दुसरा प्रकल्प हा सत्तेचा आणि राजकीय व्यवस्थेचा होता . तो असे सिद्ध करतो की सेक्स सारखी अत्यंत प्रायव्हेट गोष्ट सुद्धा ही या काळाच्या प्रभावाखाली होती . मिशेल फुको याचे महत्त्वाचे म्हणणे हे होते की सेक्सच्या संदर्भामध्ये आपण म्हणजे युरोपियन लोक जी कन्फेशन्स देत होतो ती आता हळूहळू सरकत आपण सायको अनालिसिस करणाऱ्या डॉक्टरकडे नेली आहेत . म्हणजेच धर्मगुरूची जागा ही आता मनो विश्लेषकाने घेतलेली आहे . प्रश्न असा आहे की भारतीय समाज व्यवस्थेमध्ये असे काही घडले नाही याचे काय कारण असावे ? याच्या खोलात जाऊन आपण जर का बघितले तर आपणाला दिसते की आपल्याकडे धार्मिक व्यवस्थेमध्ये ब्राह्मणांच्या कडे जाऊन कन्फेशन हे अशक्यप्राय आहे म्हणजेच ज्या प्रकारची पुरोहित व्यवस्था ख्रिश्चन धर्मामध्ये निर्माण झाली त्या प्रकारची पुरोहित व्यवस्था आपल्याकडे निर्माण न झाल्याने आपल्याकडे त्या व्यवस्थेचा सुधारित अवतार निर्माण झाला नाही याचा एक परिणाम म्हणून आपल्याकडे एक दुसरी व्यवस्था निर्माण झाली ती व्यवस्था म्हणजे बाबा व्यवस्था. या बाबा लोकांना काडीचेही मनोविश्लेषण येत नव्हते येत नाही पण आपल्याकडे आलेल्या क्लायंटचे मन कसे ताब्यात घ्यायचे लोकांच्या मनांना कसे घडवायचे हे यांना येत होते साहजिकच ज्या लोकांना कन्फेशन देण्याची ,सेक्सुअल कन्फेशन देण्याची आवश्यकता भासत होती असे सर्व लोक बाबांना शोधायला लागले आणि आपल्या बाबांच्या पुढे जाऊन किंवा गुरूंच्या पुढे जाऊन कन्फेशन देऊ लागले प्रश्न असा आहे की यामध्ये पाप आणि पुण्य या दोन संकल्पनांचा काही भाग होता का तर आपल्याकडे पाप आणि पुण्य ह्या दोन संकल्पनाच वेगळ्या असल्यामुळे साहजिकच यांच्यापासून सुटका नाही तुम्ही जे काही कर्म कराल त्याचे फळ तुम्हाला भोगावे लागणार म्हणजे अगदी देव सुद्धा या कर्मफळातून सुटत नाही साहजिकच तुम्ही समजा लैंगिक पातळीवर एखादा गुन्हा केला असेल तर त्या संदर्भात तुम्हाला कन्फेशन द्यायचे असेल तर तशा प्रकारचे कन्फेशन तुम्ही गुरुजन गुरु माणसा पुढे बाबा माणसापुढे देऊ शकता परंतु हा बाबा त्या कन्फेशनचे काय करेल हे सांगता येत नाही या संदर्भामध्ये एक अत्यंत विचित्र गोष्ट आठव्या आणि नवव्या शतकामध्ये झाली होती ती म्हणजे आचार्य वामन यांचे झालेले पुनरा आगमन . या संदर्भामध्ये ऐतिहासिक पुरावा पुरेसा उपलब्ध नाही परंतु सर्वसाधारणपणे पर्शियन आणि ग्रीक आक्रमणामध्ये जेव्हा भारतीय स्त्रियांच्या वर बलात्कार झाले तेव्हा त्यांना पुन्हा समाजामध्ये सामावून घेण्यासाठी म्हणून योनी शुद्धीकरण नावाची एक प्रक्रिया जन्मली म्हणजे असे की लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या तुझ्या स्त्रीला किंवा तू तुझ्या बायकोला सोडू नकोस फक्त तिची योनी शुद्ध करून घे. अर्थातच याला वामाचार म्हणून प्रसिद्धी मिळत गेली कारण त्या काळामध्ये अशा प्रकारच्या संकल्पना तंत्राच्या साह्याने दृढ केल्या गेल्या .
वास्तविक मूळ तंत्रांमधली संकल्पना अशी आहे की स्त्री ही रजस्वला असल्याने म्हणजेच तिला पाळी येत असल्याने तिच्या शुद्धीकरणाची आवश्यकता नाही. ती पाळी आली की आपोआपच दिव्य होते . तिला एकदा पाळी येऊन गेली की कि ती पुन्हा जशीच्या तशी बनते जशीच्या तशी शुद्ध होते परंतु आपल्याकडे लैंगिक अत्याचाराच्या संदर्भात काही लोकांचा प्रॉब्लेम असा असतो की सर्व जीवन पावित्र्याशी आणि स्त्रीच्या संदर्भात योनीशुचितेशी निगडित केल्याने त्यांना या संदर्भात असे काही झाले की मग आपली स्त्री अशुद्ध झाली अपवित्र झाली असावी असा प्रचंड फील आणिि कधी कधी गिल्ट मोठ्या प्रमाणात यायला लागतो आता यावर सायकॅट्रिक उपाय काय करणार? म्हणून तत्कालीन परिस्थितीमधून ही योनी शुद्धीकरणाची संकल्पना उदयाला आली खरी परंतु रोगापेक्षा उपचार भयंकर असा कधी कधी प्रकार झाला. मुळातच तंत्रामध्ये या संदर्भात एक संकेत आणि नियम होता तो म्हणजे हा विधी करताना जो हा विधी करेल त्याने कंपल्सरी ब्रह्मचारी असले पाहिजे . इतकेच नव्हे तर त्याने आजन्म ब्रह्मचर्य पाळण्याची शपथ घेतली पाहिजे खुद्द आचार्य वामन हे असे ब्रह्मचारी होते त्यांचे ब्रह्मचर्य अतिशय कडक होते त्यामुळे त्यांनी जेव्हा हा संकेत आणि ही पद्धत प्रचलित केली तेव्हा त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या घटना घडत नव्हत्या . मुळातच त्या स्त्रीला शुभ्र वस्त्राने किंवा कृष्ण वस्त्राने झाकून ठेवणे अत्यंत आवश्यक मानले गेलेले होते. विसाव्या शतकामध्ये जेव्हा बाबा व्यवस्था अधिकाधिक दृढ होत गेली तेव्हा तिने हा ही संकेत धुडकवायला सुरुवात केली असावी आणि याचा परिणाम असा झाला की अत्यंत भोंदू आणि उथळ लोकांच्या हातामध्ये हा सर्व प्रकार गेला माझे स्वतःचे स्पष्ट मत असे आहे या योनी शुद्धीकरण वगैरे गोष्टींच्यावर आता शासनाने बंदी घालावी. ज्या स्त्रियांना किंवा पुरुषांना या संदर्भामध्ये गिल्ट वाटत असेल किंवा अपराधी वाटत असेल त्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया मनोविश्लेषणाकडे जावे चांगला मनोविश्लेषक शोधावा आणि आपले मन या संदर्भामध्ये आरोग्यपूर्ण करून टाकावे . कुठल्याही बाबा व्यवस्थेपेक्षा मनोविश्लेषणाची व्यवस्था ही अधिक वैज्ञानिक आहे हे कृपया लक्षात घ्या निदान इतर धर्माबाबत माझा बोलण्याचा अधिकार नाही असे मानले तर शैव-धर्माबाबत तरी मी सांगेन की कृपया तुम्ही जर का शैव असाल तर कृपया मनोविश्लेषकाकडे जा. त्यातच तुमचे हित आहे मुख्य म्हणजे कुठल्यातरी पुरुषाच्या नीच आणि नालायकपणामुळे आपण अशुद्ध होतो किंवा आपण अपवित्र होतो हेच मुळात डोक्यातून काढून टाका . यदा कदाचित आपल्या मुलीच्या संदर्भात आपल्या दुर्दैवाने असे काही घडले असेल किंवा आपल्या बायकोच्या संदर्भात असे काही घडले असेल आपल्या स्त्रीच्या संदर्भात असे काही घडले असेल तर कृपया त्या अपवित्र किंवा अशुद्ध झाल्या असे समजू नका अशा अत्याचारांच्या मुळे कुठलीही स्त्री प्रदूषित होत नाही किंवा अशुद्ध होत नाही किंवा काहीच होत नाही स्त्री ही नेहमीच शुद्ध असते.
काही काही गोष्टी ह्या त्या काळामध्ये निर्माण झालेल्या असतात कारण त्या काळामध्ये काहीतरी विचित्र समजूतींचे विश्व तयार झालेले असते त्याचे परीक्षण करून आपण ते विश्व तपासले पाहिजे वास्तविक ही त्या काळातल्या समाजाची युद्धजन्य परिस्थिती म्हणून निर्माण झालेली गरज होती . परंतु नंतर सातव्या आणि आठव्या शतकामध्ये या सगळ्या प्रकाराला अत्यंत वेगळा आकार मिळत गेला
अलीकडच्या काळामध्ये रजनीश यांच्यामुळे भलत्याच आकारात हा सगळा प्रकार गेला. मुळातच ओशो रजनीश्यांचा सिग्मंड फ्रॉइड च्या रेप्रेशन थेरीवर विश्वास होता आणि फुको नेमका हाच विश्वास हलवतो . मुळात सत्तेचे राजकारण कसे चालते हे दाखवतो.
सिग्मंड फ्राईड आणि सायको एनालिसिस याबाबत सर्वात मोठा प्रॉब्लेम असा झाला की जे मन आपले आहे त्या मनाचे विश्लेषण आपल्याला करता येत नाही असा समज निर्माण झाला आणि आपल्या मनाचे विश्लेषण आपल्याकडे आपल्यापेक्षा अधिक ऑब्जेक्टिव्ह पणाने कोणीतरी पाहून करू शकतो असा एक गैरसमज प्रचलित झाला . म्हणजेच ज्याप्रमाणे आपण आपले शरीर एखाद्या डॉक्टरकडे देतो त्याचप्रमाणे आपण आपले मन सुद्धा एखाद्या मनोविश्लेषकाकडे देणे गरजेचे आहे असा एक संकेत रूढ झाला ही सर्व पद्धत नेमकी कशी चालते याचे अत्यंत वेगळे विश्लेषण फुको सादर करतो आपण जेव्हा मनोविश्लेषकाकडे जातो तेव्हा एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ही एक तात्कालीक मलमपट्टी आहे ती करणे आवश्यक असते कारण प्रथम जखमे मधला रक्तस्त्राव थांबवणे आवश्यक असते. मात्र आपले सर्वच्या सर्व मन कृपया मनोविश्लेषकाच्या ताब्यात देऊ नका . अन्यथा होते काय की तुम्हाला तुमच्या मनोविश्लेषकाचे किंवा मनोविश्लेषणाचे व्यसन लागते . हे व्यसन दारू इतके स्पष्ट दिसत नसले तरी प्रत्यक्षामध्ये ते असते.
तेव्हा मुळातच आपण कशामुळे तरी पापी होतो ही गोष्ट डोक्यातून काढा मात्र जास्तीत जास्त नैतिक असणे हे मनासाठी खूप आरोग्यपूर्ण ठरते हे लक्षात घ्या. यदा कदाचित आपल्या हातून काही अनैतिक घडले असेल तर आपल्या हातून अशी गोष्ट पुन्हा घडणार नाही याची काळजी घेणे हा सर्वोत्तम उपाय आहे . मनुष्य हे करू शकतो . माणसाला मोह पडतात आणि माणूस कधी कधी दुसऱ्याच्या मोहाचा शिकार होतो. दोन्ही वेळी आपणच हे सर्व नीट समजून घेतले पाहिजे मुख्य म्हणजे कुठल्याच गोष्टीला डोक्यात बसवून घेऊ नका . डोक्यावर तर अजिबातच बसवून घेऊ नका .
तुमच्याजवळ जी शक्ती आहे ती सर्वाधिक महत्त्वाची आहे तुमचा जो प्राण आहे तो सर्वाधिक महत्त्वाचा आहे आणि यांना कलंकित करण्याची ताकद जगातल्या कुठल्याच गोष्टींमध्ये नाही याची खात्री बाळगा .
कधी कधी आपल्या आवाक्या बाहेरच्या गोष्टी घडतात पण त्या घडल्या तरी त्यांना नंतर आपल्या आवाक्यात आणता येते किंवा निदान आपल्याला आपल्या मनाला आवाक्यात ठेवता येते क्रिया बाहेर असतात पण प्रतिक्रिया आपण नियंत्रित करू शकतो.
मनोविश्लेषकाच्या ज्ञानाची सत्ता आपल्यावर चालते परंतु त्याचबरोबर हेही खरे की ही जी ज्ञानाची सत्ता आहे ती तात्कालीक असते आपण तिच्यापासून मुक्त होऊ शकतो. त्यामुळे यासाठी बाबा लोकांच्याकडे जाण्याची गरजच नाही कारण हे बाबा लोक अनेकदा फालतू असतात . भगवान शंकर यांनी ज्ञानाचा अंत म्हणजे मोक्ष अशी व्याख्या केली होती. फुकोने ती वाचलेली नाही आणि त्याला ती कळणे शक्य पण नाही पण अगदी मनोविश्लेषकाच्या ज्ञानाचाही अंत होऊ शकतो हे नेहमीच लक्षात ठेवा .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment