फुले यांच्यानंतर ओबीसी आणि शैव समाजाने काय करावे ५ अर्थात क्षत्रियांशी कसे वागावे श्रीधर तिळवे नाईक
महात्मा फुले यांनी जी काही मांडणी केली आहे त्यामध्ये ब्राह्मण समाज हा मुख्य शत्रू मानलेला होता मात्र राज्यकर्ता असलेला वर्ग ते कळत नकळत वगळत होते याचे कारण खुद्द त्यांच्या काळामध्येच इंग्रज सत्ताधारी म्हणून आले होते. या सत्ताधारी इंग्रजांशी त्यांना पंगा घ्यायचा नव्हता . ओबीसी लोकांच्या समस्या या इंग्रजांशी जुळवून घेऊन सुटू शकतील अशी त्यांना खात्री होती. पेशवाई पेक्षा इंग्रजांचे राज्य हे अधिक चांगले आहे याविषयी त्यांना संशय नव्हता आणि त्यामुळेच अनेकदा त्यांनी ब्रिटिश राज्याचे समर्थन केलेले दिसते. प्रत्यक्षामध्ये या सगळ्या साम्राज्यवादामध्ये काय प्रकारचे शोषण चालू होते याचा पुरेसा अंदाज महात्मा फुले यांना आला नाही आणि साहजिकच मग ते कळत नकळत ब्रिटिशांच्या बाजूने मांडणी करत राहिले .आज ही मांडणी आपणाला खटकत राहते पण आपण जर का त्यांच्या काळात जन्मलो असतो तर कदाचित आपणही हेच केले असते . वस्तुस्थिती अशी आहे की
१ शिवशाही ही शैव होती
२ पेशवाई ही सुद्धा शैव होती आणि पहिल्या बाजीरावापर्यंत तीच टिकली होती पण पहिल्या बाजीरावाच्या काळातच ती वैष्णव होत गेली
३ नानासाहेब पेशवे यांच्यापासून उत्तर पेशवाईमध्ये जी राजवट आली तीच स्मृतीप्रधान वर्णजातव्यवस्था पाळणारी राजवट होती . ( माधवराव पेशवे यांनीच विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेश बंद करायला सुरुवात केली) या राजवटीचे वर्णन खुद्द लोकहितवादी यांनी केले आहे त्यासाठी शतपत्रे पहा तुम्हाला आपोआपच उत्तर पेशवाई काय करत होती हे कळू शकेल आणि मग महात्मा फुले का ब्रिटिश राज्याचे समर्थन करत होते हेही कळेल. अलीकडे महात्मा फुले यांच्यावर ब्रिटिशांच्या निमित्ताने भरपूर बाण मारले जात आहेत या लोकांना उत्तर पेशवाई मध्ये ब्राह्मणांची राजवट आली होती म्हणजे नेमके पुण्यामध्ये काय चालले होते हे सुद्धा माहित नाही विशेषत: हिंदी बेल्ट मध्ये याबाबतीत एक प्रकारचा मूर्खपणा आढळत आहे. महात्मा फुलेच काय पण या काळामध्ये जे इतर विचारवंत होते त्यामध्ये ब्राह्मण विचारवंत सुद्धा होते या सर्वांनाच ब्रिटिश राजवट ही चांगली वाटत होती हे आपण लक्षात घेतले पाहिजे खरे तर या निमित्ताने परखड परीक्षण आपण उत्तर पेशवाईचे करायला हवे . असे काय झाले की उत्तर पेशवाई नको, ब्रिटिश राजवट परवडली असे लोकांना वाटले ? पण हा प्रश्न कोणी विचारत नाही आणि केवळ ब्रिटिश विरोध या एका गोष्टीच्या आधारे फुले यांच्यावर टीका केली जात आहे ही टीका त्या काळाला धरून नाही आणि योग्य तर अजिबातच नाही . फुले यांना काळाच्या मर्यादा पडल्या होत्या ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे . अर्थातच जर का फुले यांनी विरोध केला असता तर जास्त बरे झाले असते याबद्दल माझ्याही मनात शंका नाही परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे या काळामध्ये आदिवासी शैव लोकांची बंडे होत होती आणि त्यांचे काय होत होते हे फुले पाहत होते . प्रश्न असा आहे की फुले यांनी मग त्या काळात असलेल्या क्षत्रिय लोकांच्यावर का टीका केली नाही ? या लोकांनी ब्रिटिशांच्या पुढे जे लोटांगण घातले होते त्या लोकांचे कठोर विश्लेषण फुले यांनी का केले नाही ? की एकंदरीत राज्यकर्त्या वर्गावर टीका करायची नाही असे त्यांचे धोरण होते ? माझ्या मते हो त्यांचे धोरण असे/ होते. शासन करणाऱ्या लोकांच्यावर टीका करायची नाही हा जवळ जवळ अनेक सामाजिक सुधारणा करू इच्छिणाऱ्या लोकांचा पिंड असतो . विशेषत: जर का सामाजिक सुधारणा करण्यासाठी राज्यकर्त्या वर्गाचा पाठिंबा असेल तर त्या राज्यकर्त्या वर्गाशी पंगा घ्यायचा नाही हे अनेक सामाजिक सुधारणा करू इच्छिणाऱ्या लोकांचे धोरण असते. फुले यांचे नेमके असेच धोरण होते आणि याचे पुढे अनेक दुष्परिणाम झाले
त्यामुळेच ब्रिटिशांशी किंवा एकंदरीत शासन करणाऱ्या लोकांशी फुले यांनी का पंगा घेतला नाही असा प्रश्न खरं तर आपण विचारायला हवा पण हा प्रश्न न विचारता आपण फक्त टीका करायला पाहतो आहे आणि हे चुकीचे आहे . भारतामध्ये सध्या वैचारिक समतोलपणा हा आढळत नाही आणि त्याचे अनेक दुष्परिणाम होतात. प्रत्येक विचारवंत हा त्याच्या त्याच्या काळाशी निगडित असतो आणि त्या काळाने बद्ध असतो . फुले याला अपवाद नव्हते हे आपण लक्षात घेतले पाहिजे .
मग फुले यांनी क्षत्रियांच्या साठी काही वेगळी मांडणी केलीच नाही का? तर या प्रश्नाचे उत्तर फुले यांनी अशी मांडणी केली हे आहे ही मांडणी काय होती ?
क्षत्रियांसाठी फुले यांनी केलेली सर्वात मोठी मांडणी जर कुठली असेल तर ती आहे बळीवंशाची ! हा वंश शैव होता आणि तो कसा ब्राह्मण वर्गाने कारस्थान करून धुळीला मिळवला याचे अत्यंत व्यवस्थित विश्लेषण त्यांनी केलेले आहे. त्यांनी हा संपूर्ण बळीवंश आर्य लोकांशी लढणाऱ्या सेनापतींचा वंश म्हणून प्रोजेक्ट केलेला आहे .किंबहुना त्यांची ही मांडणी हा भारतीय इतिहास लेखनातला एक अतिशय महत्त्वाचा टर्निंग पॉईंट आहे . त्यामुळे साधारणपणे अनार्य हा ध्रुव पराभूत कसा होत गेला याचे विश्लेषण फुले करत राहतात आणि शेवटी एका निष्कर्षाला पोचतात तो निष्कर्ष म्हणजे आर्य आणि ब्राह्मण लोकांचे विजय झाले कारण त्यांनी कपटनीती ज्याला ते बामणी कावा म्हणतात ती अवलंबली आणि दुसरे कारण अर्थातच अनार्य लोकांच्या मधला विद्येचा अभाव होय . पण एक गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे की मुळातच ब्राह्मण धर्माने ही विद्या हिसकावून घेतली होती का? तर स्पष्ट सांगायचे तर नाही . वस्तुस्थिती अशी आहे की मनुस्मृति ही एवढी कट्टर ब्राह्मणवादी वर्ण जात वादी असून सुद्धा तिच्यामध्ये वार्ता ही प्रमुख विद्या ब्राह्मणांच्या पासून नव्हे तर राजाने ती वाणीपणी , उत्पादक आणि आदिवासी लोकांच्याकडून शिकावी असा उपदेश करण्यात आलेला आहे . म्हणजे ज्याला खरोखर मूल्यवान ज्ञान म्हणता येईल ते फक्त वार्ता रुपात बहुजन समाजाकडेच होते शैव समाजाकडेच होते प्रश्न असा आहे की मग ब्राह्मण राजाला नेमके काय शिकवत होते किंवा शिकवू पाहत होते ? त्यांना खरोखर शस्त्रविद्या येत होती का ? वस्तुस्थिती अशी आहे की ते फक्त धर्म ज्ञान आणि राजकीय बाबतीत काही मर्यादित प्रमाणात सल्ला देत होते धर्माच्या नावाखाली ते फक्त कायदे देत होते किंवा काय कायदे आहेत हे सांगत होते आणि त्या कायद्यांच्या द्वारे आपला ब्राह्मण धर्म स्थापन करत होते . माझ्या मते या काळामध्ये ब्राह्मण धर्माने एक अत्यंत व्यवस्थित पद्धतशीर असा राबवलेला एक कावा दिसतो फुले यांच्या भाषेत बामणी कावा आखलेला दिसतो तो म्हणजे कायदा काय आहे ते आम्ही राजाला शिकवणार राजाने आम्ही शिकवलेलेच कायदे जे स्मृतीद्वारे आले होते ते राज्याचे कायदे करावेत आणि हे राज्याचे कायदे या कायद्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी याबाबतीत न्याय करण्याची जबाबदारी ब्राह्मण वर्गावर सोपवावी इतकेच नव्हे तर सर्व मंत्री पदे ही ब्राह्मण वर्गाला द्यावी . म्हणजेच एका अर्थाने सर्वोच्च शासन संस्था क्षत्रिय लोकांनी आपल्या ताब्यात ठेवावी त्यांनी युद्ध करावीत त्यांनीच युद्धात मरावे आणि मारावे आणि सर्व प्रशासकीय कामांचा मलिदा आम्ही खाणार .जे वीर ब्राह्मणधर्म स्वीकारतील त्यांना आम्ही क्षत्रिय म्हणून मान्यता देऊ मात्र त्यांची ताकद ही फक्त शासन संस्थेपुरतेच मर्यादित पाहिजे आणि सर्वोच्च प्रशासकीय संस्था मात्र पूर्णपणे ब्राह्मणांच्या ताब्यात असली पाहिजे . सर्व खरी खरी सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्याचा हा कावा आहे हे उघडच आहे. मात्र त्यासाठी युद्धात मरायची तयारी नाही. म्हणजे तुम्ही रिस्क घ्या आम्ही सत्ता टिकवतो. प्रश्न असा आहे की हे खरोखर नंतरच्या काळातील राजकीय वीर समाजातील शैव लोकांनी स्वीकारले का तर याचे स्पष्ट उत्तर नाही असे आहे . भारतातला जो इतिहास आता आपणाला माहिती झालाय त्यावरून स्पष्ट दिसते की भारतातले राजे स्मृती प्रमाण मानत नव्हते. स्मृति प्रामाण्य मानत नव्हते उलट ते स्वतःच्या राज्यातले कायदे स्वतःच करत होते अगदी शिवाजी महाराज यांच्या राजवटीत सुद्धा कायदे स्वतः महाराज करत होते . याला सर्वात मोठा छेद हा दहाव्या शतकानंतर निर्माण झालेला आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि हा प्रतिक्रांतीचा प्रयोग प्रथम महाराष्ट्रामध्ये ज्यांना नंतरच्या काळामध्ये यादव म्हटले गेले त्यांच्या राजवटीत भारतामध्ये झाला एका अर्थाने ज्याला स्मृती प्रमाणे कायदा म्हणता येईल तो प्रथम महाराष्ट्रात आला आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्येच ब्राह्मणी हिंदुत्ववादाची सुरुवात झाली आश्चर्याची गोष्ट त्याची सुरुवात करणारा मनुष्य हेमाद्री हा देशस्थ ब्राह्मण म्हणजेच पंडित होता हा ब्राह्मण धर्म स्वीकारल्यानंतर पंडितांच्या पेक्षा सुद्धा आणि ब्राह्मणांच्या पेक्षाही अधिक कट्टर ब्राह्मण झाला होता. म्हणजेच एखादा हिंदू मनुष्य बाटल्यामुळे अधिक कट्टर मुस्लिम होतो तसाच काहीसा प्रकार झालेला दिसतो त्याच्यामुळेच प्रथम यादवांच्या राजवटीत स्मृतिप्रधान राजवट येण्याला प्रारंभ झाला आणि याच राजवटीत प्रथमच ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना मृत्यू दंड देण्यात आला. अर्थातच अशा राजवटीचा अंत होणे अटळ असते म्हणजे स्मृती प्रधान राजवट स्वीकारल्यावर ताबडतोब यादवांचा सत्यानाश झालेला दिसतो . जोपर्यंत हे यादव शैव सैनन होते तोपर्यंत जिंकत होते वैष्णव झाल्यानंतर मात्र हे ताबडतोब मुस्लिमांच्याकडून पराभूत झाले कारण मुस्लिमांचे कायदे हे भारतातल्या युरेशियन वैष्णव स्मृतीच्या कायद्यापेक्षा अधिक उजवे होते आणि अधिक तपशीलवार होते मुख्य म्हणजे हे कायदे जन्मदत्त पद्धतीने राबवले जात नव्हते तर ते कर्मदत्त पद्धतीने राबवले जात होते आणि याचाच परिणाम कळत नकळत धर्मांतरामध्ये झालेला आहे . भारतातल्या अनेक युरेशियन धर्म स्वीकारलेल्या राजे लोकांनी इस्लाम स्वीकारण्याचे सर्वात मोठे कारण त्यांना नवीन आलेली कायद्याची व्यवस्था ही जास्त उजवी वाटत होती हे आहे.एका अर्थाने अनेक वैष्णव राजांनी जे स्मृती प्रमाण मानत होते त्यांनी या काळामध्ये इस्लाम धर्म स्वीकारलेला आहे आणि एकदा का राजाने इस्लाम स्वीकारला की प्रजा सुद्धा इस्लाम स्वीकारते असे वारंवार घडलेले आहे . याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आपणाला जम्मू आणि काश्मीरमध्ये दिसते. तिथे वैष्णव ब्राह्मणांनी जे मूळचे पंडित होते बौद्ध राजाचे धर्मांतर करून घ्यायला नकार दिला आणि राजा स्वतःच सुफी फकीरांच्या प्रभावाखाली येऊन मुस्लिम झाला आणि नंतर त्याच्या प्रभावाखाली येऊन संपूर्ण काश्मिरी प्रजा ही सुद्धा मुस्लिम झाली. अगदी बहामन शाही सुद्धा एका ब्राह्मणाची शाही असून सुद्धा मुस्लिम झाली याचे कारण तेच होते . कालबाह्य झालेले स्मृति कायदे आणण्याच्या आणि लोकांच्यावर थोपवण्याच्या नादामध्ये आपण इस्लाम कडून पराभूत झालो. जी चूक एकेकाळी भारतीय धर्मांनी केली ती चूक आता जगातील मुसलमान करतो आहे आणि शरीयतपाशी / मध्ये अडकून पडलेला आहे. अर्थात जी अवस्था हिंदूंची झाली तीच अवस्था नंतर त्याची होणे अटळ आहे ती म्हणजे गुलामगिरी ! या गुलामगिरी पासून सुटका करण्यासाठी म्हणूनच काही मुस्लिम धर्मांतर करायला लागलेले दिसतात . मुस्लिम समाजातील अनेक उच्च हळूहळू गुप्तपणे धर्मांतर करताना दिसतात त्याचे कारण सुद्धा हेच आहे एक नवे धर्मांतर होताना दिसते याचे कारण नेहमीच उच्च वर्गाला आपले भले कशात आहे ते कळत असते . एके काळी भारतातल्या काही उच्चवर्गीय लोकांनी असे धर्मांतर केले होते आणि इस्लाम स्वीकारला होता आता इस्लाम त्यागण्याची वेळ आलेली आहे म्हणून अनेक उच्च वर्गीय लोक हळूच इस्लामचा त्याग करून हळूच नवीन दुसरा धर्म स्वीकारत आहेत.(मुस्लिम लोकांच्या मध्ये धर्मांतर करणाऱ्याला मृत्युदंड आहे त्यामुळे स्वतःचे नाव हळूच बदलून आणि मग धर्म सोडून हे धर्मांतर केले जाते)
फुले यांचे जे इस्लामचे प्रेम आहे ते सुद्धा या पार्श्वभूमीतून आलेले आहे कारण त्यांच्या काळात इस्लाममध्ये जन्मदत्त समता आहे अशी अफवा खुद्द ब्रिटिश लोकांनी सुद्धा सोडली होती त्यामुळे तीच त्यांची ठाम समजूत होती . फुले यांना मुस्लिम लोकांच्यामधली समाज व्यवस्था जी जातीअधिष्ठितच होती का दिसली नाही हा एक फार मोठा प्रश्न आहे . कळत नकळत ब्राह्मणांचा द्वेष पराकोटीला गेल्यामुळे ब्राह्मणांच्या विरोधात असणाऱ्या प्रत्येकाचे कौतुक करायचे असे काही इथे घडले आहे का ते तपासले पाहिजे. शिवाय मुळात इस्लामचा धोका या काळात कळणे शक्यच नव्हते कारण त्यावेळी इस्लामची तत्कालीन हिंदुस्थानातील तत्कालीन लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या धड १५% ही नव्हती . त्यामुळे पाकिस्तान निर्मिती वगैरे महात्मा फुले यांना दिसणे अशक्यच होते . त्यामुळेच महात्मा फुले इस्लाम बाबत आंधळे झाली ही वस्तुस्थिती! दुर्दैवाची गोष्ट अशी की शब्द प्रामाण्य मानणारे काही लोक आपल्या काळामध्ये बदल झाला हे लक्षात न घेताच याबाबत ज्योतिबा फुले यांना फॉलो करत आहेत आपण असे त्यांना या संदर्भात फॉलो करण्याची गरज नाही आपल्याला वेगळे धोरण स्वीकारावे लागेल आपल्या पुढचा इस्लामचा प्रश्न फार वेगळा आहे आणि त्यावर मी बोललो आहे आणि पुढे बोलेनच .
अशा या सगळ्या पार्श्वभूमीवर धर्माचे आगमन झालेले असताना आता काय करायचे हा खरोखर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि हा प्रश्न ओबीसींच्या पुढे प्रामुख्याने ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्या संदर्भात पुन्हा पुन्हा निर्माण होतो आहे . ज्याप्रमाणे छगन भुजबळ यांची सध्या राजकीय कोंडी झाली आहे अगदी तशीच कोंडी समस्त ओबीसी लोकांची झालेली आहे . ही कोंडी सर्वात प्रथम वैचारिक कोंडी आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. अनेक ओबीसी लोक मला सतत सांगत असतात की काय करायचे ते समजत नाहीये तुम्हीच या विषयावर लिहा म्हणूनच हा विषय मी चर्चेला घेतला . आणि आताही घेतो आहे .
ज्याप्रमाणे ब्राह्मणांशी वागताना ब्राह्मण वेगळे आणि पंडित वेगळे असा भेद करावा लागतो आणि हे लक्षात घ्यावे लागते की पंडित हा जन्मदत्त नसतो तर करमदत्त असतो आणि कोणीही पंडित होऊ शकतो त्याचप्रमाणे क्षत्रियांशी वागताना सुद्धा आपणाला वीर समाज वेगळा आणि क्षत्रिय वर्ण वेगळा असा भेद करावा लागतो आणि या जगामध्ये कोणीही वीर होऊ शकतो कुठल्याही समाजातून आलेला मनुष्य पराक्रमी असू शकतो हे स्वीकारावे लागते. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की वीर विरुद्ध क्षत्रिय हा भेद आपण निर्माण केलेला नाही तर हा भेद ब्राह्मण धर्माने निर्माण केलेला आहे. त्यांनी प्रथम वीर लोकांच्यापासून क्षत्रिय नावाचा एक वर्ण निर्माण केला . आणि त्यामुळेच ही फूट पडलेली आहे.
सर्वसाधारणपणे ऋग्वेद हा स्पष्ट आणि स्वच्छपणाने वैदिक आहे परंतु ब्राह्मण ग्रंथ आणि स्मृति ग्रंथ हे पूर्णपणे ब्राह्मण धर्माचे ग्रंथ आहेत .
याबाबतीत मुळातच बहुदा ख्रिश्चन लोकांचा प्रभाव पडलेला असावा ज्याप्रमाणे ख्रिश्चन लोकांनी ज्यू लोकांचे ओल्ड टेस्टमेंट स्वीकारले पण प्रत्यक्षात मात्र नवे बायबलच ऑन ठेवले त्याचप्रमाणे ब्राह्मण लोकांनी ऋग्वेद ऑन ठेवला परंतु प्रत्यक्षात सर्व काम ब्राह्मण ग्रंथ आणि स्मृती ग्रंथ यांच्याप्रमाणे चालवले आणि नंतर ज्याप्रमाणे इस्लामने ज्यू लोकांचे ओल्ड टेस्टमेन्ट ख्रिश्चन लोकांचे बायबल स्वीकारून नंतर आपले कुराण मांडले त्याचप्रमाणे ब्राह्मण लोकांनी वैष्णव धर्माची स्थापना झाल्यानंतर तो धर्म ताब्यात घेऊन वैष्णव धर्मग्रंथ म्हणजेच रामायण आणि महाभारत आणि पुराने स्वीकारून पुराणांचा खेळ मांडलेला आहे त्याचा प्रसार केलेला आहे पौराणिक धर्म निर्माण केलेला आहे आणि त्यापासून हिंदू धर्म बनवण्याची प्रक्रिया आता सुरू आहे.
प्रत्यक्ष ऋग्वेदामध्ये क्षत्रिय नावाचे काहीही नाही कारण या काळामध्ये क्षत्रिय वर्ण अस्तित्वातच आलेला नव्हता त्याऐवजी विश समाजातून आलेला विशपती हाच राजा होत असे आणि हा विश म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून युरेशियन लोकांच्या मधला बहुजन समाज होता . हा प्रामुख्याने पशुपालक गोपालक होता आणि नंतर व्यापार स्वीकारणारा व्यापारी होता .
त्या उलट जेव्हा ब्राह्मण धर्म अस्तित्वात आला तेव्हा या ब्राह्मण धर्माने क्षत्रिय नावाचा स्पष्ट आणि स्वच्छ असा जन्मदत्त वर्ण निर्माण केला एका अर्थाने ब्राह्मण लोकांनी त्यांचे ऐकणारा आणि त्यांच्या स्मृतीनुसार शासन चालवणाऱ्या लोकांना क्षत्रिय म्हणायला सुरुवात केली. हे लोक स्पष्ट आणि स्वच्छ पणाने शैव धर्माचे शत्रू होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे हे ते लोक होते ज्यांनी यज्ञसंस्थेचा स्वीकार केला होता आणि यामध्ये काही अनार्य लोक सुद्धा होते जे धर्मांतर करून ब्राह्मण धर्मात गेले होते . पुढे या धर्मांतर केलेल्या शैव लोकांनी स्वतःचा एक वेद निर्माण केला तो म्हणजे अथर्ववेद अगदी आज सुद्धा त्यामुळेच गणपतीला अथर्वशीर्ष म्हटले जाते हा शैव लोकांनी ब्राह्मण धर्मात जाऊन निर्माण केलेला चौथा वेद आहे आणि मनुस्मृति मध्ये या वेदाचा समावेश नाही या लोकांनी का धर्मांतर केले हा एक वेगळाच मुद्दा आहे मात्र हे लोक नंतर स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेतात त्यांनी ब्राह्मणधर्म स्वीकारला आणि नंतर आपल्या स्वतःच्या धर्मात सुद्धा त्याचा प्रचार आणि प्रसार केला त्यातूनच मग शंकराला पुजणारे परंतु प्रत्यक्षात वेद प्रमाण स्वीकारणारे लोक निर्माण झाले. हे ते लोक आहेत जे दोन्ही बाजूनी प्रसाद खातात.
प्रश्न असा आहे की मग आपण काय करावे ? आपण एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात घेतली पाहिजे जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला क्षत्रिय म्हणवते तेव्हा त्याचा अर्थ तिने वर्ण जात व्यवस्था स्वीकारलेली आहे आणि स्मृती प्रामाण्य स्वीकारलेले आहे ब्राम्हण्य स्वीकारलेले आहे असा होतो तिने धर्मांतर सुद्धा केले आहे का हा प्रश्न आपण त्या त्या व्यक्तीलाच विचारावा आणि जर का तिने ब्राह्मण धर्म स्वीकारला असेल आणि ती व्यक्ती जर का हे कबूल करत असेल तर मात्र आपण तिला ती क्षत्रिय आहे आणि ती व्यक्ती आता शैव धर्मीय राहिलेली नाही अशी मान्यता द्यायला हरकत नाही .
क्षत्रियांच्या उलट वीर समाज हा मात्र वर्ण जात व्यवस्थेला स्पष्ट आणि स्वच्छ नकार देणारा होता आणि आहे . हा वीर समाज शैवधर्मी होता आणि आहे .त्याचे कुलदैवत हे नेहमीच शिव शंकर, शक्ती पार्वती ,स्कंद, विनायक किंवा सूर्य यांच्यापैकी एक किंवा त्यांच्या रूपा पैकी एक होते . उदाहरणार्थ खंडोबा हे स्कंदचे रूप आहे. तर मल्हारी मार्तंड हे सूर्याचे रूप आहे. शैवधर्मामध्ये सूर्य हे या सूर्यमालेतील मुख्य शिवलिंग मानले जाते हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
भारतामध्ये साधारणपणे नाईक नायक समाज (यामध्ये केरळचा आणि दक्षिणेतील नायर आणि नायक समाज सुद्धा येतात ) , मराठा समाज, जाट समाज , सोळंकी समाज , राजपूत समाज , शीख समाज , हर समाज( यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातला आणि इतर काही राज्यातला रक्षक समाज येतो उदाहरणार्थ महा हर, चर्महर ,मातेच्या अंगाची म्हणजेच मातंगी देवीची पूजा करणारा मांग यासारखे रक्षक समाज येतात) , गोंड समाज, वंजारी समाज , बंजारा समाज यासारखे अनेक समाज येतात . एकेकाळी यादव (मूळ नाव योद्धा समाज )समाज सुद्धा यामध्ये येत होता पण दुर्दैवाने तो पुढे वैष्णव झाला . भगवान श्रीकृष्ण यांच्यामुळे हे परिवर्तन घडले की त्यांच्या नावाला पुढे करून हे परिवर्तन घडवण्यात आले हा एक फार मोठा प्रश्न आहे . कारण महाभारतात तरी श्रीकृष्ण शिवभक्त होते पुढे मग त्यांच्या नावाने अनेक गोष्टी आल्या. आणि त्यांनाच देव करण्यात आले जेणेकरून त्यांच्या नावाने वर्ण जात व्यवस्था प्रस्थापित करता यावी . असो. जोपर्यंत या समाजांच्यातील कोणीही व्यक्ती तुमच्या समोर येत असेल आणि ती जर का वर्ण जात व्यवस्था पाळत नसेल तर समजून चला की ती शैव आहे . तिला पाठिंबा द्या महाराष्ट्रामध्ये खंडोबा तुळजाभवानी हे ज्यांचे कुल दैवत आहे असे अनेक मराठा आहेत जे वर्ण जात व्यवस्था पाळत नाहीत अशा लोकांना मतदान करावे पण जे जात आणि वर्णव्यवस्था पाळतात आणि स्वतःला क्षत्रिय समजतात त्या लोकांना आपणही क्षत्रिय समजावे आणि त्यांना मतदान करू नये.
त्यामुळे जर कोणी क्षत्रिय म्हणून तुम्हाला समोर येत असेल आणि तुम्हाला शूद्र म्हणत असेल अतिशूद्र म्हणत असेल किंवा आदिवासी म्हणत असेल आणि त्यावरून खालच्या जातीची/चे समजत असेल तर समजून चला की हा मनुष्य शैव नाही . जो उच्चनीचता पाळतो तो शैव असू शकत नाही अशा व्यक्तीला कसे हाताळायचे?
सर्वात प्रथम तिच्याशी सतत गोड बोलत रहा आणि तिला समजावून सांगत राहा की तिचे भले कसे वीर समाजात राहण्यात आहे .
तरीही जर का ऐकत नसतील तर मग आपणच संबंध कमी करत न्यावे हे बरे कारण शेवटी समजावण्याची सुद्धा एक मर्यादा असते .
भारतातले जवळजवळ सर्व क्षत्रिय हे मूळचे शैव आहेत पण दुर्दैवाची गोष्ट अशी की या सर्वांना आता विसर पडत चाललेला आहे . त्या सर्वांना या गोष्टीची जाणीव करून देणे आणि त्यांना वीर म्हणूनच सन्मान देणे त्यांचा उल्लेख करताना कायम वीर म्हणून उल्लेख करणे हे आता गरजेचे बनत चाललेले आहे . शिवाजी महाराज हे शैव होते वीर समाजातले होते आणि आपल्या प्रत्येक पत्रामध्ये ते श्री शंकर प्रसन्न किंवा तुळजाभवानी प्रसन्न असेच लिहीत होते अशी साधी गोष्ट सुद्धा हे लोक आता विसरत चाललेले आहेत .
वीर समाजाची युद्ध घोषणा हरहर महादेव ही आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे मात्र प्रत्येक काळ हा युद्ध काळ नसतो सतत युद्ध करणारे लोक विनाशाला आमंत्रण देत असतात. शांतीच्या काळात मात्र ओम नमः शिवाय ओम शांती शांती ओम हाच मंत्र आहे . तेव्हा तुम्ही जर स्वतःच वीर समाजातील असाल तर इतर वीर समाजाला समजवा . एक गोष्ट लक्षात ठेवा कोणीही वीर समाजामध्ये असू शकतो उदाहरणार्थ तानाजी मालुसरे हे कोळी समाजातून आलेले होते पण त्यांना आपण वीर समजतो आणि मराठाच म्हणतो बाजीप्रभू देशपांडे आणि मुरारबाजी देशपांडे स्वतःला मराठा समजत होते . गौतम बुद्ध हे शाक्त ( ब्राह्मण लोकांनी अत्यंत जाणीवपूर्वक हे नाव बदलून शाक्य करून टाकले )समाजातून आले होते आपण त्यांना वीर समजतो कारण ते स्वतःला खत्तीय (नंतरच्या काळात खत्री) समजतात . शिवाजी महाराज हे वीर समाजातून आलेले होते . आपण हे नीट लक्षात घेतले पाहिजे . वीरांचा उचित सन्मान ठेवला पाहिजे मात्र जे स्वतःला उच्चवर्णीय समजतात क्षत्रिय समजतात त्यांचे अज्ञान दूर केले पाहिजे . वर्ण जात लिंगभेद पाळणारा कोणीही व्यक्ती मग ती स्त्री असो किंवा पुरुष शैव असू शकत नाही.
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment